Sunday, 15 October 2017

ॲनीने घालून देलेला धडा

ट्रस्ट (Trust) हा २०१०चा हॉलिवूडपट. तेव्हा इंटरनेटवर चॅट साईट्स असायच्या. ओळखीचे-अनोळखी लोक एकमेकांशी त्या साईटवर चॅट करायचे. चित्रपटात अॅनी कॅमेरॉन ही चौदा वर्षाची मुलगी टीन चॅट नावाच्या साईटवर चार्ली नावाच्या अनोळखी मुलाशी बोलायला सुरवात करते. साईटच्या नावावरून उघड आहे, ती शाळकरी मुला-मुलींसाठी आहे. अॅनीबरोबर चॅट करणारा चार्ली आधी स्वत:चं वय सोळा सांगतो, नंतर ओळख वाढल्यावर वीस सांगतो, मग पंचवीस. हळूहळू ते फोनवरही बोलायला लागतात. अॅनी बराच वेळ त्याच्याबरोबर फोनवरही बोलताना दिसते. नंतर भेटायला येतो तेव्हा चाळीशीतील निघतो. अॅनी अर्थातच दचकते, त्याला जाब विचारते. पण तो पट्टीचा भामटा आहे. तो तिची समजूत काढून तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. जबरदस्तीने तिचं लैंगिक शोषण करून निघून जातो. ते त्याने रेकॉर्डही केलं आहे. अॅनीची मैत्रीण ब्रिटनी. झाला प्रकार तिच्या लक्षात येतो. ती शाळाप्रशासनाला ते सांगते. शाळा पोलिसांना कळवते. पोलिस तपास करण्यासाठी ॲनीला पोलिस स्टेशनवर घेऊन जातात, तेही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. तिच्या आई-वडिलांना कळवण्यात येतं. ध्यानीमनी नसताना हे घडलेलं. ते हबकलेले. त्यातच हे प्रकरण एफबीआयकडे जाते.
एका चौदा वर्षाच्या मुलीला फसवणं किती सोपं आहे. तू ब्युटीफुल आहेस, आय लव्ह यू म्हटलं की झालं. एकाच वयाची मुलं-मुली असतात तेव्हा ते समजण्यासारखं. संमतीने झालेली शारिरीक जवळीकही समजण्यासारखी. इथं तसं नाही. त्या विकृत माणसाने नियोजनपूर्वक त्या निरागस मुलीला घोळात घेतलंय. इंटरनेटवर चॅट करताना बोलण्यातली लैंगिकता, कामुकता वाढवत नेत तिला वासनेकडे ओढण्याची, तेही तिला जाणवू न देता व्यवस्थित आखलेली पध्दत. हे बघून आपल्याला प्रचंड संताप येतो. त्याला चांगला चोपावंसं वाटतं. पण गुन्हेगाराला शोधणं या पठडीबद्ध दिशेने चित्रपट जातच नाही. ॲनी, तिच्या आई-वडिलांवर झालेला परिणाम याचा वेध घेणं. वडील तर गुन्हेगाराला शोधून शिक्षा द्यायची या विचाराने पछाडलेले. ॲनीची आई त्यांना ताळ्यावर आणते. सांगते, मुलीला सावरणं महत्वाचं. तिच्याजवळ बसा, धीर द्या. आपण फसवलं गेलोय, हे मानायलाच ॲनी आधी तयार नाहीये. माझ्याबरोबरच्या मुलींचेही शाळेतल्या मुलांबरोबर शरीरसंबंध आलेले आहेत, मग तुम्ही माझ्याच बाबतीत गवगवा का करताय? ती वडिलांचा रागराग करतेय.
अमेरिकेतले स्थानिक पोलिसही हे प्रकरण फारशा संवेदनशीलतेने हाताळत नाहीत. वरच्या पातळीवर ते नीट हाताळलं जातं. मुलीच्या समुपदेशनासाठी पालक स्त्री समुपदेशकाचीही मदत घेतात. मुलीचं प्रकरण एकदा शाळेत माहीत झाल्यावर काही मु्लांकडून घाणेरडी शेरेबाजी करणार, ते नेटवर टाकणं, हे सगळं तिथेही झालंय. त्याचाही ॲनीला त्रास होतो. आत्महत्येच्या प्रयत्नातू्न ती आईच्या सतर्कतेमुळे वाचते. ॲनी आणि तिचे आई-वडील यांना झालेला त्रास हा चित्रपटाचा फोकस आहे. मुलगी आणि वडील यांच्यात निर्माण झालेलं अंतर कमी होतं, ते छान दाखवलं आहे. मुलीला कळतं की त्या माणसाने आणखी काही मुलींनाही याच पध्दतीने फसवलं आहे, तेव्हा ती भानावर येते. तो फार नाजूक क्षण.
मुलीला फसवणारा तो विकृत माणूस कोणी अट्टल गुन्हेगार असण्याची गरज नाही, आजूबाजूला वावरणारा, सभ्य वाटणारा, अगदी कुटुंबवत्सल माणूसही असू शकतो. चित्रपटात शेवटी तो विकृत माणूस निघतो, एका दूरच्या शहरातील एका शाळेचा एक शिक्षक. तो विवाहित, तरुण मुलांचा तो बापही आहे. दिसायलाही खरोखर कुटुंबवत्सल, सभ्य.
चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली दाखवताना त्याला समोर आणलं आहे. यातून दिग्दर्शकाचा हेतू कळतो. त्याला थ्रिलर बनवून गल्ला जमवायचा नाही तर जागृती करायची आहे. असे विकृत लोक असणारच, पण ॲनीची झाली तशी फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, प्रकार उघडकीला आल्यावर, पालक, शाळा, पोलिस यांनी ते कसे हाताळावेत, संवेदनशीलता दाखवावी, ते परिणामकारकपणे दाखवलं आहे.
आता चॅट साईट फारशा नाहीत, पण सोशल मिडियाचा वापर खूपच वाढला आहे. त्याचा वापर करून बदमाश लोक ॲनीची झाली, तशी फसवणूक करू शकतात. तेव्हा काळजी घ्यायलाच हवी, हाच ॲनीने घालून देलेला धडा.
- उदय कुलकर्णी

Friday, 13 October 2017

ज्ञानरचनावादाचे प्रणेते- कुमठे बीट

तुम्हांला आठवतं आपण मुळाक्षरं आणि संख्या कशा शिकलो ते? एकच अक्षर सतत गिरवून आणि घोकंपट्टी करून आपण अभ्यास शिकलो. पण आता मात्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची मुलं फार वेगळ्या पद्धतीने शिकतात. त्या पद्धतीचे नाव आहे- ज्ञानरचनावाद आणि ही पद्धत महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवून दाखविणाऱ्या शाळा आहेत सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या.



"ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोन असा आहे की मुलांना आधीपासून ज्ञान असते. मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचं मन म्हणजे एक कोरी पाटी असते, ही कल्पना चुकीची आहे. मुलं आपल्या सभोवतालच्या परिसरातून सारखं काहीतरी शिकत असतात. त्यांची निरीक्षण क्षमता आणि ग्रहण क्षमता जबरदस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते.” कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे सांगत होत्या. 
"कुमठे बीटमध्ये २०१२ साली पहिलीचा वर्ग दरवर्षीप्रमाणे १४ जूनला सुरु करण्याऐवजी १ मार्चलाच घ्यायचा ठरला. शाळेचं अंतर्बाह्य स्वरूप बदलून टाकण्यात आलं. या सुट्टीच्या काळात खेळांवर भर दिला गेला. अगदी लहान मुलांना एका जागी बसून रहायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवं हवं असतं. म्हणून आम्ही ठरवलं, की मुलांना खेळू द्यायचं आणि खेळातूनच शिकवायचं. मग शाळेत सागरगोटे, काचाकवड्या, गोट्या, सूरपारंब्या, आबाधुबी, ठिकरी यासारखे खेळ मुलं दररोज खेळू लागली. याचा खर्च काहीच नव्हता आणि मुलांना खूप मजा येत होती." 




"खरंतर, मुलं एकीकडे खेळत होती तर दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही होत होता. या खेळांमधून लवचिकता, शरीराचा तोल सांधणं, खिलाडूवृत्ती, सांघिक बळ, हस्तनेत्रसमन्वय, तर्कबुद्धीचा वापर अशा अनेक गोष्टी घडून येत होत्या. मुलांची शाळेशी खरी ओळख होऊ लागली. आता शिक्षकांची भीती तर वाटत नव्हतीच, उलट मैत्री झाली होती." भराडे मॅडम सांगत होत्या.
वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षकानीं अनेक प्रयोग केले. उदा. गणित म्हणजे मुलांचा नावडता विषय. यात मणी, खडे, चिंचोके आणि स्वतःचे अवयव मोजण्याने सुरुवात होते. कधी शिक्षक सांगतील त्या नंबराची आगगाडी बनवणे, तर कधी दोन विद्यार्थ्यांनी मिळून दोन अंकी संख्या तयार करणे असे खेळ घेतले जातात. उदा: २८ हा आकडा बनवायचा असेल तर, एक मूल दशक बनतं तर दुसरं एकक. दशक झालेल्या मुलाने दोन बोटं दाखवायची, त्याचवेळी एकक झालेल्या मुलाने ८ बोटे दाखवायची. 





कोणताही विद्यार्थी ‘ढ‘ नाही, कोणाविषयीही नकारात्मक बोलायचं नाही ही तत्त्वं येथील शिक्षक कटाक्षाने पाळतात. अगदी पहिलीतल्या मुलालासुद्धा जाण असते. मुलांना आपल्या बोली भाषेत बोलू द्यावं, ही सूत्रं इथं पाळली जातात. यामुळे अनेकदा असं होतं की इथली मुलं पुस्तकी बोलत नाहीत. ठोकळेबाज निबंध लिहीत नाहीत. शिक्षकांनाही माहीत नसलेले अनेक शब्द ही मुले वापरतात. स्वतःच्या शैलीत भावना व्यक्त करतात.
कुमठे बीटमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी हे मॉडेल स्वीकारलं. 





आजवर इथल्या शाळांना हजारो शिक्षकांनी भेट दिली आहे. कुमठे बीटप्रमाणे आपणही आपल्या शाळेत हे प्रयोग यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

कुरुंजीतलं गमभन



स्वारगेट वरून भोरची बस घ्यायची. भोरच्या अलिकडे माळवाडी फाट्याला उतरायचे. तिथून भोर ते मळे / भुतोंडी बस घ्यायची आणि कुरुंजीला उतरायचे असा प्रवास असतो. बस वेळेत मिळाल्या तर सव्वा तास अधिक दीड तास असा तीनेक तासाचा प्रवास. पण भोर ते कुरुंजी बसेस मनस्वी असतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे येतात जातात.
सकाळी आठची भोर बस घेऊन नऊ सव्वानऊला माळवाडी फाट्याला उतरायचं. साडेनऊनंतर पुढची बस मिळते. ही शक्यतो वेळेत असते.
या प्रवासाचा कधी कंटाळा येत नाही. याला कारण भेटणारी माणसं. माळवाडी फाट्याला म्हसवली आरोग्यकेंद्राला जाणारी नर्स बाई भेटते. तिच्याकडे त्या भागातल्या सर्व गर्भार आणि बाळंतीण बायकांच्या नोंदी असतात. कुरुंजीतली शेजारची सून तिसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तिला मुलगा झाल्याचं या बाईंनीच आधी सांगितलं आणि त्यांनी कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन केल्याचं पण.
माळवाडीच्या स्टॉपवर दुपारनंतर जवळपासच्या शेतकरणी स्वतः च्या शेतातली भाजी विकायला येतात. एकदा मटार घेऊन वयस्कर बाई बसली होती. किलोला चाळीस रुपयाच्या खाली एक पैसा कमी करणार नाही या तत्वावर विक्री चालू होती. एवढ्यात एका मोठ्या रिक्षातून शाळेची मुलं जाताना दिसली. हिनं हाक मारून थांबवलं. त्या अमकीचा नातू ना तू म्हणत एका मुलाच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवला आणि पिशवी भरून मटार त्याला खायला दिले आणि ड्रायव्हरला पण एक लहान पिशवी भर दिले. इथं व्यवहार मध्ये आला नाही.
या प्रवासात भेटणारी मंडळी मोकळी ढाकळी असतात.  खूपदा ते एकमेकांना ओळखत असतात, त्यामुळे बसमध्ये भेटले की लगेच गप्पा सुरु होतात.

कधी कधी शेजारचा प्रवासीपण बोलायला लागतो. एकदा शेजारी सत्तर वर्षाचे एक गृहस्थ बसले होते. ते एसटीत चालक म्हणून काम करायचे. रात्रीबेरात्री बस समोर कुणी हात केला तर ती व्यक्ती चांगली असेल का काही वाईट हेतू घेऊन चढत असेल हे ओळखायचं ट्रेनिंग एसटीत दिलं जातं असे ते सांगत होते.
दुपारच्या बसमध्ये गर्दी असते. लोक सर्रास दोघांच्या सीटवर तिघे बसतात. एकदा माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. त्यांना दुसरा मनुष्य जरा सरकून घ्या म्हणाला. तर या गृहस्थांनी माझ्याकडे इशारा करून ‘लेडीज मॅडम बसल्यात, सरकू शकत नाही’ असं सांगितलं.
या बसेसचे चालक वाहक लोकांमध्ये मिळून मिसळून असतात. एक तरुण वाहक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारत असतो. एकदा बसमध्ये ब्रेक ऑइल मध्येच संपले. वाहक रस्त्यावरून जाताना खिडकीतून बघत होता. एका घरासमोर ट्रॅक्टर आणि इतर मोठी वाहने दिसली. तिथे बस थांबवून तो त्या घरातून मागून ऑइल घेऊन आला आणि काम झाले.
एकदा भोरला जाताना कांबरे गावाच्या स्टॉपवर एका बाईने बांबूचा मोठा हारा बसमध्ये टाकला आणि वाहकाला सांगितले की हरणे गावात मावशी येईल तिला द्या. हरणे स्टॉप वर मावशी आली, तिला हारा दिला. तिने वाहक नको म्हणाला तरी भाजी करून खा म्हणत आठ दहा शेवग्याच्या शेंगा प्रेमाने त्याला दिल्या.
करंदी गावात एका चालकाचे नातेवाईक राहतात. भोरला जाताना खूप वेळा हा चालक करंदीला उतरून त्याच्याकडे चहा पिऊन येतो. प्रवासी सुद्धा, जावं लागतं त्याला पावण्याकं च्या प्यायला, म्हणत आपल्या गप्पा चालू ठेवतात.
पावसाळ्यात लावणीच्या काळात बायका, पुरुष वेगवेगळ्या गावातल्या नातेवाईकांकडे गडबडीनं भात लावायला जात येत असतात. घाईत डोक्यावर इरलं किंवा पोतं, साडी गुडघ्याच्या वर खोचलेली, पुरुषांची हाफ पॅन्ट, चिखलात भरलेले कपडे असेच बसमधून प्रवास करत असतात.
वयस्कर लोकांना निम्म्या तिकिटात प्रवास या एसटीच्या अत्यंत उपयुक्त सवलतीमुळे सगळ्या वयस्कर लोकांकडे कार्ड असते. आणि ते आनंदानं कार्ड दाखवत निम्म्या तिकिटात प्रवास करत असतात. आमच्या सरुबाईला तिचं आणि नवऱ्याचं वय विचारलं तेव्हा ह्यांचं कार्ड निघालंय आणि माझं नाही असा हिशेब सांगितला होता.
या वयस्कर लोकांना खूप बोलायचं असतं. एकदा दहा नातवंडं असलेली, कपाळभर कुंकू लावलेली बाई शेजारी बसली होती. सगळ्या मुलांबाळांबद्दल, लेकीसुनांबद्दल सांगून झाले. माहेरी भावाकडे चालली होती आणि या वयात पण माहेरी जायचं म्हणून हरकलेली ती बाई भावाबद्दल सांगताना कोवळी कोवळी होऊन गेली होती.
पुणे मुंबई शहरी प्रवासात चार तास ओठांना घट्ट मिठी बसलेली असते, भरल्या बसमध्ये पण बऱ्यापैकी शांतता असते. पण या भोर कुरुंजी प्रवासात माणसांचा जिवंतपणा खळखळून वाहत असतो.
- रंजना बाजी

Tuesday, 10 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
भाग तिसरा
माझे काका एक नंबरचे चक्रम आहेत असं बऱ्याच लोकांचं मत होतं. हे जनमत काकांचं लग्न होईपर्यंत शाबूत होतं. काकांनी लग्न करून बंगाली बायको घरात आणली तेव्हापासून त्यांना दोन नंबरचे चक्रम असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली.
काका तसे माझ्याशी प्रेमानं वागायचे. मला कधी माराबिरायचे नाहीत. स्वतःलाच पाढे पाठ नसल्यानं मला विचारायचा काही प्रश्न नव्हता. सहारा वाळवंटात नेऊन सोडलं तरी मी परत येईन याची खात्री असल्यानं ते आपण हरवू अशी शक्यता असल्याखेरीज मला कुठं घेऊन जायचे नाहीत. मी अंघोळ केली किंवा नाही केली तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. आजी मला बदडायची त्यातल्या निम्म्यांदा खुद्द काकाच माळ्यावर काही खुडबुड करत असायचे. थोडक्यात, बाकी कुणासारखे ते नव्हते. पण तरीही...
तरीही काका कायम विरोधीपक्षात असल्यासारखे आपण म्हणू त्याला विरोध करत. म्हणजे असं-
"काका काका..."
"काय रे ज्युनियर? शाळेला नाही गेलास?"
"आज शाळेला सुट्टी नाही का? रविवार आहे आज."
"म्हणून काय झालं गधड्या? आम्ही रविवारीही शाळेला जायचो. इतके कष्ट केलेत म्हणून आज असे उभे आहोत!" बंडी आणि पायजम्यावर उभं राहण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात हे मला तेव्हा कळलं.
"काका..." मी पुन्हा मूळ विषयावर.
"हं?" काका गुरकावतात.
"आपण गणपती बघायला जाऊयात?"
"कशाला? काय असतं रे त्यात बघण्यासारखं?"
"गणपती! आम्हाला शाळेत गणपतीवर निबंध लिहून आणायला सांगितलाय."
"हे असले फालतू उद्योग असतात म्हणून मी मध्येच शाळा सोडली. तूपण नको जाऊ उद्यापासनं."
"हो काका. आणि गणपती बघायलाही नाही जात."
"का नाही जाणार? कसा जात नाहीस ते बघतोच! तू काय तुझा काकापण जाईल!" काका आता इरेला पेटले असावेत. त्यांचे डोळे लकाकू लागतात.
"पण काका-"
"चल म्हणतो ना?" काका माझा हात धरून खस्सकन ओढतात. अचानक ओढल्याने मी त्यांच्या टणक पोटाला आदळून क्षणभरासाठी माझं नाक चपटं होतं.
"काका, जेवण करून जाऊया ना." माझा दुबळा विरोध.
"अरे, आज तुझ्या काकूनं जेवायला माझेर झोल केलाय. गेल्यावेळी खाल्ला तेव्हा दोन दिवस डोकं गरगरत होतं. चल, आज आपण बाहेरच काही खाऊ."
"परवा तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही म्हणाला होतात ना?"
"गाढवा! घरात असे पदार्थ बनत असतील तर स्वसंरक्षणार्थ माणसाला बाहेरच खावं लागतं. कळलं? आणि तिथं काही अरबट-चरबट खातो म्हणालास तर मुस्काट फोडीन. समजलं?"
"हो काका."
"हो म्हणून मान काय हलवतोस लेका? परवा ती दाबेली कुठं खाल्लेली आपण?"
"हौदाजवळच्या चौकात. तिथं जायचं?"
"तिथं कशाला? परवाच काकू आणि मी बागेतल्या गणपतीला जाताना एका ठिकाणी खाल्ली. तुझ्या काकूला अजिबात आवडली नाही."
"मग?"
"अरे मग काय? म्हणजे ती नक्कीच चांगली असणार. चल तिथंच जाऊ."
अशा प्रकारे काकांबरोबर मी नाईलाजाने गणपती बघून फुगे, पिपाणी वाजवत तुडुंब पोटानं घरी परतायचो. काकांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यानं मी तेव्हाच ठरवलं होतं की आपली मुलं होतील तेव्हा त्यांना हवं तिथं- हवं तेव्हा न्यायचं. पण आता काय झालंय ते पुढच्या भागात...

ज्युनियर ब्रह्मे 

Friday, 6 October 2017

आम्ही 'मोठ्ठ्या' साहेबांना भेटलो!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
शाळेची सहल म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी. शक्यतो या सहली जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी जातात. पण गडचिरोलीतील लेखा (मेंढा) गावातील जिल्हा परिषद शाळेची सहल मात्र यावर्षी हटके ठरली. कारण यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयांना शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली.
सर्वसामान्यांनासुद्धा जिल्हापरिषद किंवा महानगरपालिकेत जाऊन काम करून घ्यायचे म्हटले तर कठीणच वाटते. ती भली मोठी इमारत, कामासाठी योग्य भाषेत अर्ज करणे, ‘मोठ्ठे साहेब’ म्हणजेच अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सह्या करून आणणे, हे बहुतांश जणांना वैतागवाणे काम वाटते. आजची मुले ही उद्याचे जबाबदार नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना प्रशासकीय संस्थांच्या कार्याची चांगली ओळख व्हावी यासाठी शाळेने या आगळ्या सहलीचे नियोजन केले.
दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी लेखा जि.प. शाळेतील विद्यार्थी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना भेटून दिवसभराचा कार्यक्रम आखला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राला (NIC) दिलेली भेट विशेष रंगली. देशाच्या विज्ञान आणि माहिती- तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली एनआयसी किती महत्त्वाचे काम करीत आहे, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.

देशातील बहुतांश शासकीय विभाग, जिल्हापरिषदा आणि महानगरपालिकांच्या वेबसाईट या संबंधित एनआयसी केंद्रानेच तयार केलेल्या असतात. तसेच प्रशासकीय कामासाठी आवश्यक असणारी इमेल सेवा, राज्याच्या मुख्यालयांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सेवाही एनआयसी पुरविते. याशिवाय गडचिरोलीतील सर्व जमिनींचे सातबारा उतारे ऑनलाईन झालेले आहेत. शिवाय देशभरातील हरविलेल्या बालकांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या ‘नॅशनल चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ची माहितीही मुलांना मिळाली.
त्यानंतर नियोजनानुसार विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मा. शांतनू गोयल साहेबांच्या दालनात पोहोचले. गोयल सरांनी विद्यार्थ्यांसोबत सुमारे अर्धा तास मनसोक्त गप्पा मारल्या. तुम्ही कुठून आलात? कितवीत शिकता? तुमच्या कुटुंबाची शेती आहे का? असे अनेक प्रश्न गोयल साहेबांनी विचारले. त्यांच्या दालनात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या नकाशावर विद्यार्थ्यांनी आपला धानोरा तालुका आणि लेखा गाव बरोबर दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी केलेल्या नकाशावाचनाबद्दल गोयल साहेबांनी त्यांना शाबासकी दिली.
सीईओंनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे नाव, शिक्षण, कामाचे स्वरुप आणि गोयल साहेबांचे वडील काय करतात, याबद्दल माहिती विचारली. सीईओंनी त्यांच्या इतर प्रश्नांची उत्तरे दिली मात्र स्वत:चे नाव न सांगता विद्यार्थ्यांना एक आव्हान दिले. “या दालनात प्रवेश करण्याआधी माझे नाव बाहेरील पाटीवर मराठीत लिहिलेले होते आणि आपण बसलो आहोत तिथेही माझे नाव इंग्रजीमधे लिहिलेले आहे. ते नाव जे विद्यार्थी शोधून काढतील त्यांना माझ्याकडून 50 रुपयांचे बक्षीस!! ” आव्हान जाहीर होण्याचा अवकाश की जवळपास सात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हात वर करून उत्तर दिलेसुद्धा- शांतनू गोयल! विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर सीईओ खुष झाले आणि त्यांनी शाबासकी देत सात विद्यार्थ्यांच्या बक्षिसाचे 350 रुपये शिक्षकांकडे दिले.
यानंतर शिक्षकांनी मुलांसाठी मिठाई मागवली आणि मग ती मिठाई आणि घरुन आणलेल्या डब्यांवर ताव मारुन मुलं घरी परत गेली.
- नकुल लांजेवार.

Thursday, 5 October 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजी गावाला खेटूनच भाटघर धरणाचं बॅक वॉटर आहे. खरं तर त्या धरणाच्या जागेत पूर्वी असलेलं गाव धरण भरेल तसं वरती सरकत आलंय. चार पाच डुया झाल्या आम्ही वर सरकून अशी वृद्ध मंडळी सांगतात.
कुरुंजीत घरांच्या भिंतींवर घड्याळं मी बघितली नाहीत. असं दिसतं की लोकांनी निसर्गाच्या चक्राशी स्वतः ला जोडून घेतलंय. (आपण शहरात निसर्गाला वळवू बघतो.) सूर्य उगवला की लोक कामाला लागतात, काही जण गुरांना चरायला रानात नेतात, काही शेतात जातात. थंडीच्या दिवसात उशीरा तर उन्हाळ्यात लवकर! परत येऊन शेतात कामं, दुपारी पुन्हा गुरांना रानात नेतात. संध्याकाळी घरी परततात, बाई चुलीकडे वळते, बापय माणूस जनावरांना बघतो.
थंडीच्या दिवसांत रात्री नऊपर्यंत गाव शांत झालेला असतो. उन्हाळ्यात दुपारच्या उन्हात तीन चार बायका एकत्र गोधड्या शिवायला घेतात तर रात्रीच्या जेवणानंतर बराच वेळ अंगणात गप्पांचे फड रंगतात, पावसाळ्यात भात लावतात, हिवाळ्यात गवताचे भारेच्या भारे रानातून वाहून आणतात, उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी करतात. यात बायका पुरुष असा भेद नाही.


पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला पश्चिमेकडच्या भिंती अति पावसाने खराब होऊ नयेत म्हणून गवताचे झापे बांधतात.
मी पहिल्यांदा पावसाळ्यात गेले होते. घर ठरवलं पण राहायला जाईपर्यंत पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला होता. सगळ्या घरांनी झाप्यांचे घुंगट काढून टाकायला सुरुवात केली होती. गच्च बंद असलेल्या समोरच्या घराला पश्चिमेकडेही दार आहे ते त्यावेळी समजलं.
उन्हाळ्यात घरं दुरुस्तीला काढतात. पूर्ण घरच पुन्हा बांधायचे असले तर त्याला खूप अर्थपूर्ण शब्द आहे इथे. 'आम्ही घर उलगडलं' असं म्हणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला लोहार तीनचार दिवस झाडाखाली मुक्कामी असतो. गावातले विळे, कोयते, कुऱ्हाडी वगैरे दुरुस्त करून पुढच्या गावाला जातो.
मुलं रोज अंघोळ, जेवण आवरलं की शाळेत जातात. शाळेच्या वेळेआधी शाळेत पोहोचली तर खेळत बसतात. शनिवारी सकाळची शाळा असते. मळे गावाहून दूध गोळा करणारा टेम्पो आला की सात वाजले असे समजून मुलं शाळेची तयारी करतात.   कुणी गावकऱ्यानं गावात बस यायची वेळ दहा सांगितली तर ती साडेनऊ असू शकेल किंवा साडेदहा ! पण त्याने काही फार फरक पडत नाही. कारण बसेससुद्धा कधी वेळा पाळत नाहीत. आपण शाळा शिकलेले लोक मोजण्यासाठी आकड्यांचा वापर करतो. पण मी इथं संदर्भांचा वापर होताना जास्त बघते.

कुरुंजीत शेजारच्या बायका गप्पा मारायला आल्या होत्या. एक म्हणाली, सगळ्यात आधी आम्ही आलोय या शेजारात राहायला. इथं आल्यानंतर मला मुलं झाली. मी (शहरी सवयीनुसार) विचारलं, किती वर्षं झाली त्याला? ती म्हणाली, दहा वर्षं झाली असतील की. दुसरी तिला खोडून काढत म्हणाली, जास्त झाल्यात. आम्ही तुमच्यानंतर आलो. आम्ही आलो तेव्हा माझा विठ्ठल (मुलगा) पाच महिन्याचा होता, त्यानंतर तुला मुलं झाली. हे अवघड गणित सोडवण्यासाठी मी दुसरीला विचारलं, तुमचा विठ्ठल केवढा आहे आता? दुसरी उत्तरली, आत्ता तो चांगला जाणता आहे!
आज्जीला कोंबडया पाळायला आवडतात. एकदा तिला तिच्या मुलीने कोंबडी दिली. आज्जीने कोंबडीची नीट काळजी घेतली. कोंबडीनं अंडी घातल्यावर ती व्यवस्थित उबवून घेतली. मी तिच्या घरी गेले तर बऱ्याच पिल्लांची फौज घरात हिंडत होती. आज्जी त्यांना दाणे घालत बसली होती. त्यांचं खाऊन पिऊन होताच तिनं तत्परतेनं त्यांना डालग्यात ठेवून दिलं. घरात खूप अंधार होता. मी काळजीनं आज्जीला विचारलं, आज्जी मोजून घेतली का पिल्लं? सगळी आत गेली कसं कळेल? आज्जी उत्तरली, मोजायचं का म्हनून? कोंबडी कलकल आवाज करती सगळी पिल्लं आत येईपातूर.
मुलांच्या बरोबर मी कधीकधी शाळेत जात येत असते. त्यांचं परिसराचं निरीक्षण जबरदस्त आहे. एका पडीक जमिनीवर मातीचे बरेच भुसभुशीत लहान ढीग होते. मुलं म्हणाली या ठिकाणी भरपूर मुठं (खेकडे) मिळतील. मी विचारलं, भरपूर म्हणजे किती? एक मुलगा म्हणाला, दहा जणांचं कालवण सहज हुईल एवढं.
नुसत्या आकड्यांना खरं काही अर्थ नसतो हे इथं जास्त लक्षात येतंय.
- रंजना बाजी

Tuesday, 3 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा: भाग दुसरा
मी त्यांचा एकुलता एक नातू असूनही आजोबा माझ्याशी कधी प्रेमानं बोललेले आठवत नाहीत. नातवाशी बोलायचं झालं तर कायम कपाळावर आठ्या असल्या पाहिजेत असा काही त्यांचा नेम असावा. बोलण्यातल्या या नेमापेक्षा फेकून मारण्यातला त्यांचा नेम भलताच भेदक (आणि अचूक) होता. मधली काही वर्षं शब्दाविण संवादिजे, म्हणजे हातातला ग्लास, तांब्या, छत्री, काठी, छडी, झाडू इत्यादींच्या माध्यमातूनच ते माझ्याशी बोलायचे. क्वचित बोलले तरी, (एकेकाळी सहा महिने शाळामास्तरकी केली असल्यानं) मला एकोणतीसचा पाढा विचारायचे. तेवढाच एक विचारायचं कारण इतकंच की खुद्द त्यांनाही बाकी पाढे पाठ नसायचे. शेजारच्या मुजावरांनी बावीस अठ्ठे किती असं म्हटल्यावर आजोबा इतके गडबडले होते की त्यांना साडेतीन मिनिटं ठसका लागला होता. मुजावरांनी उत्तर सांगेपर्यंत आजोबा खोटंखोटं खोकतच राहिले होते. एकोणतीसचा पाढा आजही पाठ असण्याचं श्रेय केवळ आजोबांना जातं.
ज्यांचे आजोबा खवीस असतात अशा लोकांच्या आज्या मुलखाच्या प्रेमळ असतात. माझी आजी या नियमाला सणसणीत अपवाद होती. जातायेता धोपटून काढण्यासाठी नातवाचा जन्म झालाय अशी तिची समजूत होती. मी माळ्यावरच्या खोलीत काहीतरी खाऊ चोरायला जातो असं त्या माउलीला कुणी सांगितलं होतं कोण जाणे. कसलीही खुडबुड ऐकू आली की आजी कान टवकारत जागेवरूनच "ज्युनियर, ऐकत्येय हं मी. थांब आता आले की पाठीत लाटणंच घालत्ये तुझ्या." असा दम भरायची. दिवसभरात कधीही तिच्या तावडीत सापडलो की सगळ्या धमक्या एकदम खऱ्या करायची. तिला आजोबांसारखी काठी, छडी, लाटणं वगैरे शस्त्राची कधी गरज पडली नाही. 'तुला बदडून माझे हात घट्ट झाल्येत.' असं म्हणत पाठीत रट्टे देई. बायको कधीकधी 'असे कसे गेंड्याच्या कातडीचे आहात हो तुम्ही.' असं म्हणते तेव्हा यामागचे आजीचे कष्ट मला आठवतात. माझ्या ढालीआड उंदरांच्या अनेक पिढ्या आमच्या माळ्यावर सुखेनैव नांदल्या असतील.
आई फारशी त्रास द्यायची नाही. मुळात तिच्या लेखी मी म्हणजे इतर कामांसोबत करायचं एक फुटकळ काम असं काही असणार. मी अंघोळ करताना आई बाजूलाच दगडी चौथऱ्यावर भांडी घासत असायची. त्यामुळं "अरेरे, काय ही मान काळी झालीय? कावळ्याची मान बरी की रे तुझ्यापेक्षा!", "टाच घासलीस तर काय पायात किडे पडून मरशील का हरामखोरा?", "गाढवा, पाठीला काटे फुटलेत का? जरा पाणी लागू दे पाठीला." अशा तिच्या प्रेमळ सूचना चालू असायच्या. मी जेवत असताना ती परसदारी विहीरीशी कपडे धूत असायची. तिथूनही न बघता "जुन्या, गिळ की लेका घास! की रवंथ करत बसणारैस बैलासारखा?" नाहीतर "पानात भाजी शिल्लक दिसली तर खिशात भरून देईन हं." अशा धमक्या चालू असायच्या. आईला भाजी कशी दिसली असेल असा विचार मनात येण्यापेक्षा ती खरोखरच माझ्या खिशात भाजी भरेल या भीतीनं मी डोळे मिटून कशीबशी भाजी संपवायचो. आईला दिव्यदृष्टी असते असं कुण्या लेखकानं म्हटलंय. त्या लेखकाची आईही माझ्या आईसारखीच असावी.
मी शाळेचे कपडे घालत असायचो तेव्हा ती बाबांची तयारी करून त्यांचा डबा भरून देत असायची. तेव्हापण "जुन्या, साळींदरासारखे केस उभे दिसले तर मी येऊन भांग पाडेन!" अशी दटावणी यायची. आईच्या भीतीनं केस आपोआप डोक्यालगत चप्पट बसत. आजही अंगावर शहारा येतो तेव्हा माझे केस उभे न राहता अंगाला चिकटून असतात. लहानपणी आई कधीकधी रविवारी मला अंघोळ घालायची. त्याऐवजी ती मला सरळ बदडूनच का काढत नाही असा प्रश्न तेव्हा पडायचा.
हे असे पालक असताना मला तेव्हा वाटायचं आपण यांच्या तावडीतून सुटायचं असेल तर पटकन मोठं व्हायला पाहिजे. पण नाही, आज माओ आणि माओची आई मला त्यांच्यापेक्षा लहान समजून वागवतात ते पाहिलं की आधीचं लहानपणच बरं होतं असं वाटू लागतं.
ज्युनियर ब्रह्मे