Thursday, 9 November 2017

डोंगरातली सयाआज्जी


दूर डोंगरात वसलेलं कळमनुरी तालुक्यातलं करवाडी हे आदिवासी गाव. जेमतेम २०० लोकवस्ती. अजूनही गावात जायला रस्ता नाही, सहा किलोमीटरची पायपीट करावी तेंव्हा डांबरी रस्ता नजरेला पडतो.
अशा दुर्गम गावातली 65 वर्षीय सयाबाई खोकले घरासमोरच्या दगडावर बसून सांगत होती, "या गावातल्या रस्त्यावर फिरणारं प्रत्येक पोरगं माझ्या हातावर जन्माला आलेलं आहे बाबा." याचं कारण सयाबाई या गावातील दाई आहेत. गावातले अंध समाजाचे आदिवासी लोक तिला सुईण म्हणतात. आणि सारा गाव तिला प्रेमाने सयाआज्जी म्हणून हाक मारतो. सयाआज्जी या गावासाठी देवदूत आहे. कारण या गावात कुण्या गरभारणीचं पोट दुखू लागलं तर या गावातले लोक अम्ब्युलन्स, जीप किंवा कारवाल्याला फोन करत नाहीत तर ते सयाआज्जीच्या घराची वाट चालू लागतात.
कारण गावाला रस्ता नाही. त्यामुळं तिथं कुठलंच वाहन पोहचू शकत नाही. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे नांदापुरला. ते सहा किलोमीटरवर. म्हणजे तेवढं चालणं आलं. कळा सुरु झाल्यावर गरोदर बाईला तेवढं चालवत नेणंही कठीण. त्यामुळेच घरी बाळंतपण केलं जातं. सयाआज्जी आजही सफाईदारपणे बाळंतपणं करते.
“तुमच्या हातावर कुणी बाळंतीण दगावली का?” सयाआज्जी सांगते, "नाही बाप्पा, एकसुद्धा नाही, अर उलट त्या पलीकडच्या गावात डॉक्टरची पोरगी बाळंत झाली तेंव्हा त्या डॉक्टरनंबी माझ्याच हातावर बाळंतपण केलं, त्योच डाक्टर दुसऱ्या बाईचे बाळांतपणाला पाच पाच हजार घ्यायचा अन माझ्या हातावर शंभर टेकवले बाबा."
सयाआज्जीने तिच्या हयातीत दोनशे ते अडीचशे बाळंतपणं केली आहेत. सयाआजी गरिबीत दिवस काढते. रोजगारावर काम करते. पण, बाळंतपणाचे पैसे घेत नाही. गावातले लोक तिला लुगडं चोळी नेसवतात. ती समाधानाने सांगते, "मी पैसे नाही घेत बाबा. पर मला साऱ्या हयातीत, एकदाही लुगडं इकत घ्याया नाही लागलं, ह्याच्यातच समदं आलं."
सरकार, विविध सामाजिक संस्था बाळंतपणं दवाखान्यात सुरक्षितपणे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. या लक्ष्याकडे वाटचाल सुरूच आहे. मात्र सयाआजीसारख्या पारंपारिक सुईणी, दाया यांचं ज्ञान आणि अनुभव कोणी नाकारत नाही. गडचिरोलीत डाॅ अभय-राणी बंग यांनी अशा दायांनाच प्रशिक्षण देऊन बालमृत्यू रोखण्याच्या कामात सहभागी करून घेतलं. खरंच, अशा अनेक सयाआजी आरोग्यसेविका बनू शकतील, हे निश्चित. 


- दत्ता कानवटे.

Tuesday, 7 November 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग सहा


मागच्या भागात काउन्सेलिंग प्रक्रियेची चांगली माहिती मिळाली. पण काउन्सेलिंगनेही सुटू शकत नाहीत, अशा काही केसेस असतात का? अशा केसेस कशा हाताळल्या जातात?
- काही वेळा मुलांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स दिसून येतात. लहानपणापासूनच काही मुलं आक्रमक असतात, सहजपणे खोटं बोलत असतात. अशा स्थितीत मुलांच्या हातात इंटरनेट गेलं तर खूपच मोठी समस्या तयार होते. अशा मुलांना ऍडमिट करणं, योग्य ते औषधोपचार देणं, जास्त काउन्सेलिंग करणं असे उपाय केले जातात. या संदर्भात दोन केसेसची उदाहरणं देते.
चार-पाच वर्षापूर्वी आमच्याकडे या विषयातली पहिली केस आली होती. एक मुलगा, विशाल म्हणूया त्याला. विशालचे वडील त्याला ॲडमिट करायलाच घेऊन आले. म्हणाले, माझ्या मुलाला इंटरनेटचं व्यसन आहे. त्याला ॲडमिट करा. या विषयाचा ते नीट अभ्यास करुन आले होते. खरं तर, विशालच्या वडिलांशी चर्चा केल्यानेच आम्हाला इंटरनेटव्यसन या विषयाचं गांभीर्य पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं. विशाल कॉलेजमध्ये जातो सांगून इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन बसायचा. विशालच्या अनुपस्थितीबद्दल कॉलेजकडून पत्र आल्यावर हा प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आला. आम्ही विशालला ॲडमिट करुन घेतलं. त्याने चांगला प्रतिसादही दिला आणि इंटरनेट ॲडिक्शनमधून तो व्यवस्थित बाहेरही आला. त्याला व्यायामाची चांगली सवय लागली. स्वतःच्या दिनक्रमाचं नीट वेळापत्रक आखून त्याने अभ्यास केला. नंतर उच्चशिक्षणही घेतलं.
आता दुसरी केस. ही टोकाची होती. एका टीन एज मुलाचं, अक्षयचं इंटरनेटवेडाचं प्रमाण वाढलेलं होतं. तो रात्रीचं जेवण झाल्यावर कंप्युटरवर बसायचा. तो रात्रभर बसायचा. एकदा सकाळी त्याच्या आईबाबांनी बघितलं, तर तो त्याच अवस्थेत तसाच डोळे तारवटून बसलेला. बसल्या जागी लघवी झाल्याचंही त्याला कळलेलं नव्हतं. म्हणजे नैसर्गिक विधीसाठीही तो जागेवरून उठला नव्हता. अशा वेळी ॲडमिट करण्याखेरीज पर्यायच नसतो.
अशा टोकाला गेलेल्या व्यक्तींसाठी ३० दिवसांचा एक कोर्स असतो. इंटरनेट किंवा मोबाईलपासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवलं जातं. त्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यांना थोडे विड्रॉवल सिंम्पटम्स येतात. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की हेही एक व्यसनच आहे. वर्तनात्मक व्यसन. अशा मुलांच्या पालकांविषयी तक्रारी ऐकून मुलं आणि पालक यांचं समुपदेशन केलं जातं. ॲडमिट झाल्यावर आमच्या केंद्रातलं दैनंदिन वेळापत्रक मुलांना पाळावं लागतं. त्यातून मुलांना एका सकारात्मक जीवनशैलीची ओळख होते आणि महिन्याभरात नव्या जीवनक्रमात मुलं रुळूनही जातात. या दिनक्रमाचं महत्व त्यांना कळतं. व्यायाम करुनही मन किती आनंदित होतं, हे त्यांना जाणवतं. आपले पालक आपलं ऐकतायत, आपल्याशी नीट बोलतायत हे लक्षात येतं. दारुच्या व्यसनींना दारूपासून पूर्णपणे दूर रहा असं सांगावं लागतं. मात्र इंटरनेटचं वेड बरं करताना या तंत्रज्ञानाच्या चांगल्या बाजू समजावून सांगितल्या जातात. गॅझेट्सचा योग्य कारणासाठी उपयोग, इंटरनेटचा स्मार्ट वापर करायची सवय लावली जाते. काही नियम घालून दिले जातात. सांगितलेलं पाळलं जातंय का याचा फॉलोअप ठेवला जातो. मुक्तांगणच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करुन घेतलं जातं. महाराष्ट्रातल्या आमच्या इतर फॉलोअप सेंटरमध्ये जाऊन ते इतर लोकांना मदत करतात. अक्षय या दीर्घ उपचारप्रक्रियेतून जाऊन बरा झाला. काउन्सेलिंग ही अशी मोठी आणि वेळखाऊ प्रकिया असते हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आता वर्तवणुकीतले आजार, मानसिक आजार वाढतायत. त्यामुळे काउन्सेलिंग ही आता काळाची गरज झाली आहे.
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी मुलांना वेगवेगळ्या गैरप्रकारांची उदाहरणं समजावून सांगा. त्यासंबंधीचे लेख त्यांच्यासोबत वाचा. मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे उत्तर नसेल तर मुलांबरोबर बसूनच ते शोधा. त‌ज्ञांचा सल्ला घ्या. इंटरनेटवरची सर्व महिती खरी असतेच असं नाही, हेही मुलांना समजावून सांगा.
आजची तरुण पिढी स्वकेंद्री, स्वार्थी आहे असं म्हटलं जातं. मला हे मान्य नाही. चांगले मार्ग दाखवले की मुलं ते अनुसरतात. मुलांना इतरांना मदत करायला आवडते. ती त्यांना करू द्या.
शेवटी मी पालकांना एवढचं सांगेन की, मुलांना मोकळ्या हवेत फिरायची, खेळायची सवय लावा. मुलं लहान असताना इंटरनेट आणि गॅझेटसपासून त्यांना शक्य तेवढं लांब ठेवा. टीन एजमध्ये मुलांना गॅझेट्सचा योग्य उपयोग करायची सवय लावा. इंटरनेट, सोशल मिडियाचं जग फसवं आहे, याची आणि खरोखरीचं जग सुंदर आहे, याची मुलांना परोपरीने जाणीव करून द्या.
(समारोप)

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक


Monday, 6 November 2017

महिला करत आहेत वीज मीटररीडिंग


वाशिमच्या महावितरण कार्यालयाजवळ जमलेल्या चार-पाच जणी. त्यांनी एक नवी जबाबदारी घेतली आहे, वीज मीटररीडिंगची. ‘वुमन्स स्कील डव्हलपंमेंट’ या त्यांच्या बचतगटाद्वारे वीज मीटर बिल रीडिंग घेणे आणि बिल वाटप करणे हे काम त्या सक्षमपणे पार पाडत आहेत.



महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया म्हणाले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रीडिंग पद्धत आता सोपी झाली आहे. त्यामुळे बेरोजगार महिलांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाशीम शहरात प्रथमच हा प्रयोग सुरु झाला असून आता ग्रामीण भागातही हा प्रयोग अंमलात येणार आहे. पुरुष वर्गाकडून वारंवार होणाऱ्या मीटररीडिंगमधील चुका आणि त्यामुळे येणाऱ्या तक्रारी या महिलांना रीडिंग जवाबदारी दिल्याने कमी होत आहेत.” त्यामुळे हा प्रयोग आता पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून महिला बचतगटांनी ही कामे घेण्याकरिता पुढं येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
“वुमन्स स्किल डेवलपमेंट ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही १२ महिलांनी एकत्र येत या कामाला सुरवात केली. आमची एकच इच्छा होती ती की, आम्हाला पारंपारिक पद्धतीची कामं नको होती. आम्हाला आमच्या कामातून ओळख निर्माण करायची होती. म्हणून वीज मीटररीडिंगचं काम सुरु केलं,” असं या ग्रुपमधील सदस्य रुपाली अवचार यांनी सांगितलं.

- मनोज जयस्वाल.

Sunday, 5 November 2017

शाळा फक्त 'ती'च्यासाठी


तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावातली जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. या शाळेची विद्यार्थीसंख्या आहे फक्त एक.तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते, तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. गेल्या वर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावं लागेल. म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते. या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. शाळेत वीजही नसते. पण शाळा सुरू आहेच.



हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, "धोकादायक इमारत असल्यास तिथं विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. विद्यार्थीसंख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे."
शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर तिने सांगितलं, "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे." यातून तिची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.
गटशिक्षणाधिकारी बारसागडे म्हणाले की, "विद्यार्थीसंख्या कमी असेल, तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो. मात्र इथून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच रस्ते चांगले नाहीत. गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणं क्रमप्राप्त होतं. तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे.”
''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं. शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं," तिचे वडिल राजू मडावी सांगत होते. 


- प्रतिनिधी, वर्धा 

Friday, 3 November 2017

सासू-सुनेची जोडी, त्यांना व्यवसायात गोडी


सासू-सुनेचं नातं कधी माय-लेकीसारखं असतं; तर कधी त्यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र बीड जिल्ह्यातील एका सासू-सुनेच्या जोडीने घराच्या छतावर रोपवाटिका सुरू करून रोपं विकण्याचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. संजय भोजने यांचं गावात कृषी सेवा केंद्र आहे. त्यांच्याकडे शेतकरी बी-बियाणं खरेदी करण्यास येत, त्यावेळी तयार रोपं कुणाकडे मिळतील का याचीही चौकशी करत.



रोपांना मागणी असल्याने आपण घरीच अशी रोपं तयार करावीत का असा विचार त्यांनी घरात बोलून दाखवला. संजयच्या आई यमुनाबाई आणि पत्नी मनीषा यांनी तो उचलून धरला. रोपं तयार करून देण्याची इच्छा आणि तयारीही या सासू-सुनेने दाखवली. मात्र प्रश्न होता जागेचा. सुरवातीला दुसऱ्याच्या जागेत हे काम सुरू केलं. पण स्वतः भोजने कुटुंबाने नवीन जागा घेऊन दुमजली घर बांधलं, तेव्हा त्याच्या छताचा वापर रोपवाटिकेसाठी करायचं ठरवलं. घराच्या छतावर रोपवाटिकेसाठी व्यवस्था केली. भिंतीत लोखंडी पाइप बसवून ग्रीन नेट शेड तयार केलं. रोपं तयार करण्याच्या पध्दतीबद्दल सून मनिषा भोजने यांनी सांगितलं की, स्लॅबवर कोकोपीट अंथरून त्यावर रोपांचा ट्रे मांडला जातो. त्यात कोकोपीट भरून ज्या पिकाचं रोप तयार करायचं, त्याचं बी टोपलं जाते. दिवसातून दोनदा फवारा यंत्राद्वारे पाणी दिलं जातं. गरजेनुसार टॉनिकचा डोस याच पाण्यातून दिला जातो. एका ट्रे मध्ये शंभर रोपं तयार होतात.
साधारणपणे महिना दीड महिन्यात रोपं तयार होतात. चांगली वाढलेली रोपं मग कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी ठेवली जातात. वांगी, टोमॅटो, मिरची या भाज्यांची साधारण वीस हजार रोपं महिन्याकाठी तयार करतात. एक रुपयाला एक रोप याप्रमाणे रोपाची विक्री केली जाते. रोपांसाठी चांगलं बी वापरलं जात असल्याने शेतकरी याच रोपांची मागणी करतात. वर्षभरात सगळा खर्च वजा जाता किमान लाखभर रुपयाचं उत्पन्न मिळतं. अलीकडेच त्यांनी पपई आणि शेवग्याची रोपंही तयार करून विकण्यास सुरवात केली आहे. मात्र या रोपांना अधिक मेहनत लागते. आणि प्लास्टिक बॅगमध्ये तयार करावी लागत असल्याने या रोपांची किंमत जास्त आहे.
एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यावर विक्रीसाठी मार्केट शोधावं लागतं. पण इथे मार्केट उपलब्ध असताना उत्पादन तयार करण्याची गरज होती. सासू-सुनेने एकत्र येऊन हे घडवून आणलं, पेललं. गेली अडीच वर्षे त्यांचा हा रोपवाटिकेचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. स्वतःच्या शेतात काम केल्याचा आनंद ही रोपं तयार करताना मिळतो, असं वयाची साठी पार केलेल्या सासू यमुनाबाई म्हणतात. जोडीने आणि गोडीनेदेखील काम करणार्‍या यमुना-मनीषा या सासू-सुनेचं मालिकांमध्ये दाखवण्यात येणारं नकारात्मक नातं खोटं ठरवतात.

  – राजेश राऊत.

Thursday, 2 November 2017

कुरुंजीतलं गमभन




मी कुरुंजीत ज्या घरी जेवते तिथे एक आज्जी आहे. आज्जीला एकच मुलगा आणि तीन चार मुली आहेत. सुरुवातीच्या काळात शहरी पद्धतीने मी तुमचे वय काय असे विचारले तर आज्जीने हात हलवून माहीत नाही असा इशारा केला. तिचा मुलगा शेजारीच बसला होता, तो म्हणाला, असेल सत्तर पंचाहत्तर.
आज्जी सतत कामात असते. कोंबडी हा तिचा आवडता विषय असावा. घरात नेहमी कोंबड्या असतात. कोंबड्यांनी घातलेली अंडी त्यांच्याकडून उबवून घेऊन त्या पिल्लांकडे लक्ष देणे ती आवडीने करते. मागे एकदा मुलीकडे गेली तर मुलीने एक कोंबडी भेट दिली...आज्जी या कोंबडीला सवय होईपर्यंत पाय बांधून घरात खाटेला बांधून ठेवायची. नंतर कोंबडीने अंडी दिली तर ती नीट तिच्याकडून उबवून घेतली. येताजाता कोंबडी तिच्या पिल्लांबरोबर आणि आज्जी कौतुकाने तिच्याकडे बघताना दिसायची.

पुढच्या वेळेला गेले तर एकही पिल्लू नाही. पिल्लं कुठं गेली या प्रश्नाला, दोन तीन घरातल्या देवाला कापली, गोठ्यातल्या गाईनं दोन तोंडात धरली, ती ओढून घेताना मेली असा हिशेब मिळाला. काही कावळ्यांनी पण उचलली होती.
सर्व म्हाताऱ्या माणसांप्रमाणे आम्ही आमच्या काळात किती कामं करत होतो आणि आत्ता कशी कामं नसतात हे तिचं पण म्हणणं असतं.
आज्जी म्हणजे एक चालता बोलता इतिहास आहे. जुन्या काळच्या खूप गोष्टी तिच्याबरोबर बोलताना कळत राहतात.
पूर्वी रस्ता नव्हता त्यामुळं भाटघर धरणाच्या पाण्यातनं लांचीतून ( लाँच मधून) भोरला जावं लागे. घर सामान आणायचे असेल तर समोरचा डोंगर चढून उतरून पलीकडच्या गावाहून जड जड पिशव्या वाहून पायी यावं लागे. पायली पायली भात घरात कांडावा लागे, पूर्वी कशी चारचार दिवस लग्नं व्हायची इ. अनेक गोष्टी तिच्याकडून ऐकायला मिळतात.
कितीही म्हातारं झालं तरी आपल्याला झेपेल तसं काम करून घराला हातभार लावायचा हा गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा गुण आज्जीतही आहे.
आज्जी कधी बसून नसते. सतत काही काम सुरू असते. घरात, बाहेर. या पावसाळ्यात पण ती तिला झेपेल इतका भात लावायला शेतात उतरली होती. दुपारी डोक्यावर पदर घट्ट बांधून ती शेतात तण काढताना पण दिसते. कोंबडया बघणं असेल, घरातल्या गाई बैलांना वैरण पाणी देणं असेल, झाडून काढणं असेल ती करते. स्वैपाक मात्र ती करताना दिसत नाही. पण भांडी घासेल. घरात नात आहे तिच्याकडून कामं करून घेईल. उन्हाळ्यात ती गावातल्या बायकांबरोबर दुपारी गोधडी शिवताना सुद्धा दिसली होती.
सहा महिन्यांपूर्वी आज्जी खूपच आजारी पडली. ससूनमध्ये ठेवावं लागलं, दहा पंधरा हजार खर्च झाले. डिस्चार्ज मिळाल्यावर पुण्याहून परस्पर ती गोष्टीतल्या म्हातारीसारखी पलीकडच्या गावातल्या मुलीकडं गेली आणि विश्रांती घेऊन टुणटुुणीत बरी होऊन आली.
आज्जीकडे पारंपरिक माहितीचा साठा आहे. एकदा तिच्या दारात गप्पा मारत बसलो असताना घरासमोरच्या रस्त्याच्या कडेला उगवलेल्या प्रत्येक झुडपाचं नाव, वैशिष्ट्य आणि औषधी उपयोग ती सहज बोलता बोलता सांगत होती. पूर्वी तिनं सुईणीचं काम केलंय. त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा तिनं बोलताना सांगितला. ती म्हणाली, आमच्या काळात बायका आपणच बाळंत हुयाच्या. सुईण सगळ्यांना न्हवती लागत, कधीतरी फार अडचणीचं असंल तर सुईण बोलवायची.
आज्जी जेवताना कधी ताट घेत नाही. भाकरी मांडीवर ठेवेल, लहान ताटलीत किंवा वाटीत भाजी आमटी घेईल आणि हळू हळू चावत जेवेल. स्वतःला अगदी कमी महत्त्व द्यायची पूर्वीची पद्धत तिच्या वागण्यात दिसते.
झाडपाल्याची बरीच माहिती असली तरी आजकालच्या खेड्यातल्या लोकांप्रमाणे आज्जीला सुई टोचून घेतली, डाक्टरचं औषध घेतलं तरच बरं वाटतं. आधी कधीतरी विकत घेतलेली आणि खायची राहिलेली औषधं तिच्या पिशवीत असतात. एकदा तिनं मला अंगदुखीवर हे औषध खाऊ का म्हणून एक स्ट्रीप दाखवली. कधीच्या काळातल्या Amoxicilin च्या गोळ्या होत्या. गोळ्या डॉक्टरनं दिल्याशिवाय खायच्या नाहीत असं सांगितल्यावर तिनं काढून ठेवल्या.
गावातल्या सगळ्या लोकांप्रमाणे आज्जीचा गावातल्या देवीवर खूप विश्वास. शेजारच्या फार्महाऊसमधल्या माणसाला कित्येक दिवस मूल बाळ नव्हतं. त्यानं कुरुंजाई देवीला नवस केल्यावरच त्याला मुलगा झाला यावर तिला पूर्ण विश्वास आहे.
गावापासून बऱ्याच लांब असलेल्या देवळात जाताना ती घरापासूनच अनवाणी जाते. ती देवाकडं काही फार मागत असावी असं वाटत नाही. आहे त्यात ती समाधानी दिसते.
पुस्तकातच जगण्याचे धडे शोधू पाहणाऱ्या आजच्या काळात जगण्यातूनच जगण्याचं ज्ञान मिळवणारी असली माणसं हळूहळू संपत चालली आहेत याचं वाईट वाटत राहतं.
- रंजना बाजी

Wednesday, 1 November 2017

झाडं लावली, झाडं जगवली



परभणीतल्या गजानन नगरात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं आता बरीच मोठी झाली आहेत. कुणालाही हेवा वाटावा असा हा हिरवागार परिसर. उन्हाळ्यात या परिसरात माणसांना थांबण्यासाठी किंवा वाहनं लावण्यासाठी सावलीचा शोध घ्यायची गरज भासत नाही. झाडं लावा, झाडं जगवा असा प्रचार सतत सुरू असतो. झाडं लावण्याचा एखादा सरकारी उपक्रम लोकांचाच होणं, याचं यशस्वी उदाहरण असं परभणीत घडलंय. लोकसहभागातून सुमारे 12 हजार झाडं लावून अनेक वसाहती हिरव्यागार बनविण्याची किमया परभणीतील वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी केली आहे. पुढे येणार्‍या पावसाळ्यात 5 हजार रोपे लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
कैलास गायकवाड हे सध्या मानवत इथे मंडळ कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून परभणीत ते राहत असलेल्या गजानन नगर भागातून त्यांनी वृक्षारोपण उपक्रमाची सुरूवात केली. 2008-09 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी वृक्षलागवड आणि संवर्धन अभियान हाती घेतलं होतं. त्यांनी शहरातील नागरिक, संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांनाच वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार कैलास गायकवाड यांनी आपल्या वसाहतीत लोकसहभागातून पहिल्याच वर्षी अडीच हजार रोपं लावली. त्यानंतर दरवर्षी ते 2 ते 3 हजार रोपं नियमितपणे लावत आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या घरासमोर ही रोपे लावली जातात, ते रहिवासी या झाडांना पाणी घालून निगा राखतात. रोपं लावण्यासाठी योग्य पद्धतीने खड्डे खोदावे लागतात. त्यानंतर योग्य प्रकारच्या रोपांची निवड करणं आणि ती लावणं. रोपांना पाणी कमी पडणार नाही याचीही दक्षता घेणं हे सगळं करावं लागतं. केवळ रोपं लावून न थांबता गायकवाड नागरिकांचं प्रबोधनही करतात. त्यांची निःस्वार्थ वृत्ती आणि तळमळ पाहून नागरिक स्वतःहून पुढे येतात आणि गायकवाड यांना मदत करतात. काही नर्सरीचालकांनीही या उपक्रमासाठी रोपं विनामूल्य दिली आहेत.

आतापर्यंत गजानन नगरचं अनुकरण करून त्याच भागातील दत्त नगर, श्रीराम नगर, समझोता कॉलनी, आनंद नगर, तुळजा भवानी नगर, सरगम कॉलनी इथल्या रहिवाशांनी झाडं लावायला सुरूवात केली आहे. गायकवाड यांनी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरातही 101 रोपे लावली आहेत. कैलास गायकवाड यांनी आजवर लावलेल्या 12 हजार झाडांत प्रामुख्याने औषधी वनस्पतीच आहेत. कैलास गायकवाड यांच्या सांगण्याप्रमाणे करंज या रोपात औषधी गुण असतात. तसंच वर्षभर हिरवंगार राहून रखरखत्या उन्हाळ्यातही त्याला कोवळी पालवी फुटते. त्यामुळे तापमान कमी होण्यास या वृक्षांची मदत होते. या रोपांसाठी पाणी कमी लागतं. ट्री गार्डची गरज नाही आणि जनावरंही करंजाची रोपं खात नाहीत. 

– बाळासाहेब काळे.