Saturday, 2 December 2017

आदिवासी वस्तीतील आदर्श शाळेचा वस्तुपाठ- टेंभेपाडा

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
टेंभेपाडा- धुळे जिल्ह्यातील 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचं गाव. टेंभेपाडा जिल्हा परिषद शाळेने शिरपूर तालुक्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना मागं टाकत सर्वप्रथम आयएसओ मानांकन मिळविलं आहे. शाळेची उत्तम रंगविलेली इमारत, अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेला रॅम्प, प्रोजेक्टर असलेली डिजिटल क्लासरुम, हात धुण्यासाठी हँड वॉश स्टेशन, दर आठवड्याला स्वच्छ धुतली जाणारी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि नानाविध उपक्रम राबविणारे तळमळीचे शिक्षक ही शाळेची काही प्रमुख वैशिष्ट्यं आणि याहीपेक्षा महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पावरा आदिवासी समाजाचा शाळेच्या विकासात असलेला सक्रिय सहभाग.

मात्र काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली होती, वर्गात मुलांची उपस्थिती टिकवून ठेवणंही अवघड होतं. पण इथले मुख्याध्यापक, शिक्षक आणि धुळे DIECPD च्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील मॅडम यांच्या एकत्रित प्रयत्नातून या शाळेने गरूडझेप घेतली. पाटील मॅडम यांनी गावात प्रेरणासभा घेऊन आदिवासींच्याच पावरी बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधला. गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवं याचा आग्रह आणि शाळेच्या सुधारणेसाठी आर्थिक मदतीचं आवाहन त्यांनी केलं. गावकऱ्यांनी 35 हजार रुपयांची मदत शाळेला केली. त्यातून शाळेची रंगरंगोटी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालं.                                                                     शिवाय या शाळेचे शिक्षक स्वत: दरवर्षी सुमारे 10 हजार रुपयांची वर्गणी गोळा करुन शाळेच्या विकासासाठी देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी धडपडत आहेत, हे ठाऊक असल्याने ग्रामपंचायतही शाळेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 'पेसा' (पंचायत एक्सटेंशन टू शेड्युल्ड एरिया अॅक्ट) योजनेअंतर्गत या शाळेला सुमारे 1 लाख 15 हजारांची देणगी मिळवून दिलेली आहे. शाळेने हा सर्व पैसा डिजिटल वर्गखोलीसाठी वापरला आहे. शाळेत प्रोजेक्टर, लॅपटॉप, इंटरनेट आहे. या आदिवासी गावातील मुलांना शाळेत बोक्या सातबंडे, तारे जमीं पर, ब्ल्यू तोता यासारखे चांगले चित्रपट आवर्जून दाखविले जातात. 

इतर ज्ञानरचनावादी शाळांप्रमाणे या शाळेतदेखील गणित- भाषेच्या मूलभूत संकल्पना तळफळे आणि शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने समजावून सांगण्यात येतात. तसंच या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक आवर्जून आजूबाजूच्या शेतांमध्ये मशागत, पेरणी, खत आणि सिंचन, धान्याची मळणी- कापणी असे अन्ननिर्मितीचे वेगवेगळ्या टप्पे पाहण्यासाठी घेऊन जातात. शिवाय गावातील 'कुशल कारागिरांची भेट' असा एक वेगळा उपक्रमही घेतला जातो. यातंर्गत विद्यार्थी चर्मकार, लोहार, सुतार, कुंभार यांना भेट देऊन त्यांची कामं जाणून घेतात आणि प्रात्यक्षिकही करून पाहतात. बुद्धिकौशल्य आणि शारीरिक मेहनत, या दोहोंचाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोग होतो, हे मुलांना कळावं म्हणून या भेटींचं आयोजन केलं जातं.
टेंभेपाड्याच्या शाळेत लिंगसमभावासाठी 'मीना- राजू मंच' कार्यरत असून त्यांचे अनेक उपक्रम नियमित घेतले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांची आसनव्यवस्थाही नेहमीपेक्षा वेगळी आहे. या शाळेत मुले आणि मुलींची वेगवेगळी बैठकव्यवस्था नसून मुलगे आणि मुली एकत्र बसतात, एकत्रच गटात काम करतात. या शाळेत मातापालक आणि शिक्षकपालक सभांचं नियमित आयोजन केलं जातं. गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका शाळेत येऊन पौगंडावस्थेतील मुलांना आवश्यक मार्गदर्शन करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणीही होते आणि डॉक्टरांकडूनही 'वयात येताना' या विषयावरचं मार्गदर्शन मिळतं. 
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Friday, 1 December 2017

दुसऱ्या वर्षीही मांजरा नदीचं पात्र तुडूंब, ३५० हेक्टरवरील शेती बहरली, भूजल पातळीमध्येही झाली वाढ

|दुष्काळग्रस्त जिल्ह्याला यावर्षी समाधानकारक पावसाने दिलासा दिला आहे. आजही नद्या-नाल्यांमध्ये, शेत-शिवारांमध्ये जलसंचय दिसत आहे. जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामांमुळे हे सकारात्मक चित्र दिसत आहे. २०११ मध्ये समाधानकारक पाऊस होऊनही पाण्याचा संचय झाला नव्हता. मराठवाड्यात तुलनेने उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक क्षमतेची, दर्जेदार आणि शेतीला उपयुक्त ठरतील, अशी कामे झाली. यासाठी 'अहिल्याबाई होळकर जलमीटर पुरस्कार' उस्मानाबाद जिल्ह्याने मिळवला आहे. लोकसहभाग आणि शासनाच्या पुढाकारातून कळंबच्या मांजरा नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या वर्षीही हे नदीपात्र सुमारे २२०० मीटर तुडुंब भरले असून, त्यातून ३५० हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे. शिवाय शहरासह परिसरात भूजल पातळीत वाढ झाली आहे.लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मांजरा प्रकल्पावरील मांजरा नदीचे खोलीकरण १० एप्रिल ते १५ जून २०१६ दरम्यान करण्यात आले. कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी रोटरी क्लब, व्यापारी संघटना, शहरातील नागरिक आणि शासनाने पुढाकार घेतला होता. हे काम ६६ दिवसांत पूर्ण झाले. या कामातून ३ लाख, ३० हजार क्युबिक मीटर गाळ निघाला होता. या गाळातून सुमारे १५० हेक्टर जमीन सुपिक झाली असल्याचे रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष तथा मांजरा नदी पुनरुज्जीवन समितीचे अध्यक्ष विश्वजीत ठोंबरे यांनी सांगितले.
शहरी भाग असूनही शासनाने पहिल्यांदाच मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी ८४ लाख, ७ हजार रुपये दिले होते. लोकसहभाग ४० लाख, ४८ हजार, २४ रुपयांचा होता. एकूण १ कोटी, २४ लाख, ५५ हजार, ९० रुपये इतका खर्च झाला. कामानंतर नदीचे पात्र ३ मिटरपर्यंत खोल तसेच ७ मिटरपर्यंत रुंद झाले. नदीमध्ये ३३ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. नदीच्या पुनरूज्जीवनमुळे शहरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या जवळपास सव्वादोन किलोमिटरचा भाग पाण्याने तुडूंब भरलेला आहे. नदीच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला शेती, असे चित्र आहे. याच नदीवरून अंबाजोगाई रस्ता जातो. छायाचित्रकार सुखदेव गायके (येरमाळा, ता.कळंब) यांनी ड्रोनद्वारे चित्र टिपल्यानंतर नदीचा विस्तीर्ण परिसर, शेती आणि कळंबचे मनमोहक सौंदर्य दिसत होते.


- चंद्रसेन देशमुख.

Thursday, 30 November 2017

कुरुंजीतल्या सगळ्या घरांप्रमाणेच माझं घर पण मुलांसाठी खुलं असतं.

कुरुंजीतलं गमभन :
घरात एक कपाट आहे त्यात जुन्या ओढण्या, पुस्तकं, कापडाचे तुकडे, रंग, ब्रश, कागद, पेन्सिली, कात्री, सुईदोरे, वेगवेगळे रेशीम, लोकर, क्रोशा सुया, मणी असे बरेच प्रकार असतात. स्वैपाकघरात काही भांडी आहेत त्याबरोबर पुठ्ठ्याचे मोठमोठे रिकामे बॉक्स आणून ठेवले आहेत.
लहान मुलींना स्वैपाकघर आवडतं. एके दिवशी त्यांनी, ताई तुम्ही किती गबाळ राहता असं म्हणत, सगळे डबे, भांडी मांडणीतून काढून रिकामी करून घासली, मांडणीवर वर्तमानपत्र अंथरून पुन्हा मांडली. त्यांच्या घरात या गोष्टी आया करत असतात त्याचं हे अनुकरण ! मुलींना घर, शाळा खेळायला पण स्वैपाकघर लागतं. पुठ्ठे, ओढण्या घेऊन घरं, वर्ग बनतात, त्यातल्याच कुणी आई, मूल, शिक्षक, विद्यार्थी बनतं आणि खेळ चालू असतो.मुलग्यांना कुतूहल वाटून ते डोकवायचा प्रयत्न करतात तर त्या भांडखोर चिमण्यांसारख्या अंगावर येतात. मुलं माघार घेतात किंवा हळूच आत घुसतात. मग कल्ला!
खेड्यात मुलामुलींचे हात सतत चालत असतात. गप्पा मारताना सुद्धा त्यांचं हातानं काही ना काही करणं सुरू असतं.
घरात पोस्टर कलर आहेत. मुलामुलींना रंगवायला खूप आवडतं. बहुतेक सगळेजण आले की आधी कपाट उघडून रंग, कागद काढतात आणि काम सुरू होते. ब्रश नसले तरी अडत नाही. काड्या चालतात. मयूरने एकदा काडी पुढच्या बाजूने ठेचून ब्रश बनवून घेतला होता.थोडया मोठया मुलींना विणकाम भरतकाम करायचे असते. क्रोशा आवडतो. काही जणी शिकल्या सुद्धा. आरतीला भरतकामात रस आहे. यू ट्यूब वरून बरेच व्हिडीओ मी डाउनलोड करून नेले. तिने आणि बाकीच्या मुलींनी पण नमुने बनवून ठेवलेत. मुलग्यांना शिवायला आवडते. त्यांनी छोटे बस्कर शिवलेत आणि फळा पुसायला कापडी डस्टर पण.गोट्यांचा ब्रेन व्हिटा हा गेम मुलांना आवडला. साप शिडी, लुडो पण आवडतात. बुद्धिबळाचा गेम थोड्या दिवसांपूर्वी नेलाय. सुरुवातीला मी नियम सांगितले. पण नंतर त्यांनी स्वतः नियम बनवून खेळायला सुरू केलं.
या मुलांच्या खेळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकटं कुणी खेळत नाही. दोघेच जरी खेळत असले तरी अनेक सल्लागार बाजूला बसलेले असतात आणि त्यांचा सहभागही शंभर टक्के असतो.घरात किरकोळ दुरुस्ती किंवा काही असेल तर मुलं करतात. खिडक्यांना पडदे लावायचे होते. माझ्या दृष्टीनं काहीच मिळत नव्हतं.
 तुषार घराच्या भिंती नीट बघून आला आणि त्याला इकडेतिकडे चार खिळे मिळाले. बाहेरून मोठा दगड आणून त्याने खिळे मारून पडदे लावले.
गेल्या नवरात्रीच्या एका रात्री जेवण करून झोपायच्या बेतात असताना चार उंदीर बाहेरच्या खोलीतून आत पळताना दिसले. माझी पळापळ. देवळाजवळ मुलं दांडिया खेळायची तयारी करत होती. मी त्यांना बोलावून आणलं. घर मालकिणीनं घरात असावी म्हणून एका कोपऱ्यात मातीची चूल ठेवली आहे. मुलांनी तिथं पर्यंत माग काढला. घरात खिडक्यांना लावून उरलेली लोखंडी जाळी होती ती त्या चुलीला बांधून वर मोठे दगड ठेवून बंदोबस्त केला. अजूनही अधून मधून मुलं चूल तपासत असतात.
या सगळया खेळण्याबरोबर महत्त्वाचं घडतं ते म्हणजे गप्पा! आमच्या सतत गप्पा सुरु असतात. मी शुक्रवारी जाते. स्टॉपवरून घरी जाताना निम्मं गाव ओलांडायला लागतं.एखादं शाळेला न गेलेलं मूल मला बघून सोबत येतं. काहीतरी करत बसतं. गप्पा होतात. संध्याकाळी शाळा सुटल्यावर बरीच मुलं येतात. मग अंधार होऊन गेला तरी इथंच असतात. मग सरुबाईकडे जेवायला जाताना तीही आपापल्या घरी जातात. सकाळी सातलाच आशा, केतकी, राधा, मयूर, गौरव यापैकी कुणीतरी दार वाजवायला येतं. माझं आवरून झाल्यावर मी दार उघडते. मग आमचा दिवस सुरू होतो.
मुलांना खूप सांगायचं असतं. घराबद्दल, शाळेबद्दल, ऐकलेल्या, बघितलेल्या, केलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात.
गौरव अनेकदा शाळेत जाताना कंटाळा करतो. तो एकदा बोलताना पहिली पासूनच शिक्षक कसे मारत आलेत याबद्दल सांगत होता. अशा संवेदनशील मुलांना मग शाळा आवडेनाशी होते.
पहिलीतली राधा ते टी. वाय. बी. कॉम. ची आरती सगळे गप्पांमध्ये रमतात. करण आणि मयूर यांना भुताच्या गोष्टी सांगायच्या असतात. आरती आणि तिचा भाऊ प्रसाद कॉलेज बद्दल सांगतात, शाळेत जाणारी मुलं शाळेतल्या शिक्षकांच्या मित्रांच्या, घटनांच्या गोष्टी सांगतात.
माझ्यासाठी या अनौपचारिक गप्पा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्यातून मुलं समजत जातात. पुढं काय करायला पाहिजे याची दिशा दिसत राहते.
रंजना बाजी

Tuesday, 28 November 2017

मुलांना सुखी झालेलं पाहायचंय

कर्जाच्या ओझ्याने पतीने गळफास घेवून जीवन संपवले. पण त्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून द्राक्षबाग व ऊसाला वाढवतानाच, मुलांना जगवण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. आईला मदत व्हावी म्हणून मुलगा व मुलगी शिक्षण अर्धवट सोडून शेतात राबत आपल्या आईला मदत करतात. पती अर्ध्यावरती सोडून गेला म्हणून, कुढत घरात न बसता शेतीबरोबर मुलांचे आयुष्य फुलवण्यासाठी सुनंदा यांचा संघर्ष सुरु आहे.
निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथील सुनंदा हाडंसंगे. पती श्रीशैल चंद्रशा हाडसंगे यांनी कर्जबाजारी झाल्याने ४ जुलै २०१५ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सात एकर शेती त्यात तीन एकर द्राक्षबाग. त्यासाठी श्रीशैल त्यांनी कर्ज घेतलं होतं. २५ लाखाच्यावर कर्जाचे डोंगर डोक्यावर उभा राहिला. आणि त्या ताणापायी त्यांनी जीवन संपवले. दोन वेळच्या जेवणाला कुटुंब महाग झाले. पत्नी सुनंदा यांनी धीर सोडला नाही. शेतात कधी काम केलं नव्हतं. अचानक जबाबदारी अंगावर पडली. आणि त्यांनी शेती कसायला सुरूवात केली. मोठा मुलगा अमगोंडा, मुलगी रोहिणी दोघेही शाळा सोडून आईच्या मदतीसाठी शेतात राबू लागले. या तिन्ही मायलेकरांनी दिवसरात्र कष्ट करून द्राक्षबाग फुलविली. त्यासाठी नातेवाईकांनी आर्थिक मदत केली.
जिद्द व मेहनतीने सुनंदाने पुन्हा द्राक्षाबाग फुलविली. यावर्षी तीन एकर द्राक्षापासून त्यांनी पाच टन बेदाणा उत्पन्न काढलं. आता नव्याने दोन एकर ऊसाची लागवड केली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर सरकारी मदत मिळाली नाही. पण नातेवाईकांच्या मदतीने ती जिद्दीने शेती करत आहे. मुलगा अमगोंडा जबाबदारीने साथ देतोय. धाकटा मुलगा सोमलिंग सध्या वाघोली ( जि. पुणे) येथे आठवीत शिकत आहे. त्याला जैन सामाजिक संघटनेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
“घरातील कर्ता गेल्याने मुलांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आता मला मुलांना सुखी ठेवायचंय. बँकेने ३२ लाख कर्ज भरण्याची नोटीस दिली आहे. पण सध्या माझ्यासमोर मुलांना जगवण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी मी राबतेय. मुलगा हाताला आल्याने आधार वाटतोय. मुलीच लग्नही करायचं आहे. मला जगण्याबरोबर मुलांना सुखी झालेल पाहायचंय. म्हणून मी सारं दु:ख बाजूला ठेवून राबतेय,” असं सुनंदा यांनी सांगितलं.

- गणेश पोळ.

Monday, 27 November 2017

फड सिंचन पद्धतीची किमया न्यारी, विना खर्च शेतीला पुरवी पाणी

जलसाठ्यांचं विकेंद्रीकरण करून शेती जलसमृद्ध करायची हा विचार डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्ह्यातील जवाहर ट्रस्टने जलसंवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. पहिली काही वर्ष गाजावाजा न करता काम उभं केलं गेलं. आज धुळे तालुक्यात छोटी छोटी पाण्याची बेट तयार झाली आहेत. नदी - नाले यांचं पुनरुज्जीवन केल्याने आता तिथं पाणी ओसंडून वाहतंय. वाळवंट वाटणारा हा प्रदेश पिकांच्या हिरवळीने नटून निघाला आहे.
धुळे तालुका तसा दुष्काळी. त्यामुळे पिण्याचं पाणी वर्षभर टँकरने. अश्या भागात हे काम उभं राहिलं आहे. त्यामुळेच इथल्या दुष्काळी भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे आणि शेतीला पाणी शिल्लक राहू लागलं आहे. शेती सिंचनाच्या ४०० वर्ष जुन्या 'फड पद्धती सिंचन' व्यवस्थेला जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून पुनर्जीवित केलं गेलं. त्यामुळे सात गावांतील किमान दोनशे विहिरीं पाण्याने भरून निघाल्या आहेत. या कामात पुढाकार घेतला तो आमदार कुणाल पाटील यांनी.




खान्देशात शाश्वत सिंचन पद्धत म्हणून फड सिंचन पद्धतीकडे पहिलं जातं. या सिंचन पद्धतीत नदी पात्रात बांध घालून गुरुत्वाकर्षण आणि सायफन तत्व वापरून शेती सिंचनाखाली आणली जाते. खान्देशातील पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला अश्या पद्धतीचे फड पद्धती बंधारे होते. यातून पाटाच्या साहाय्याने पाणी शेतात जात होतं. कालांतराने ही पद्धत बंद पडली. जवाहर ट्रस्टने फड पद्धतीचे महत्व समजून घेतलं. आणि सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांची मदत घेतली. सर्व पारंपरिक माहिती जमा केली. नकाशे अभ्यासले गेले आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
दिवसरात्र काम करत संस्थेने मोराणे आणि हेंकळवाडी या दोन फड पद्धती बंधाऱ्यांना जीवनदान दिलं. मोराणे पाट तब्बल साडेसात किलोमीटर लांब कोरण्यात आला. ३२ दिवसात २२५०० घनमीटर काम झालं. आज या पाटाचा फायदा जापी, न्याहळोद, विश्वनाथ, सुकवद आणि मोहाडी या गावातील शेतकऱ्यांना होता आहे. मोराण्याच्या पाटात प्रचंड घाण आणि माती साचली होती. ती हटविण्यात आली. हेंकळवाडीच्या पाटाचा गुदमरलेला श्वासही मोकळा करण्यात आला. हा पाट नऊ किलोमीटर लांब कोरण्यात आला. याचा लाभ हेंकळवाडी आणि परिसरातील गावांना होत आहे. या पाटांचे काम पूर्ण झाल्यावर त्यातून पाणी वाहताना पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. पाटातलं वाहतं पाणी शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का होता.
या दोन पाटांच्या पुनरुज्जीवनामुळे चारशे हेक्टर शेतजमीन प्रत्यक्षात सिंचनाखाली आली. तसंच, पाटातून पाणी वाहू लागल्याने भूगर्भाची जलपातळी वाढली आहे. शास्त्राच्या निकषांवर हे दोन्ही पाट दोन मीटर रुंद आणि दीड मीटर खोल करण्यात आल्याने त्यांचा भविष्यात कुठलाही दुष्परिमाण नाही. त्यात पाटाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत असल्याने सर्वच शेतकरी आनंदी आहेत.

Sunday, 26 November 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदुचा प्रतिसाद


इ लर्निंग वापराचा आमचा एक अनुभव. चौथीच्या वर्गातलं एक दृश्य. इ लर्निंग स्क्रीनवर एक फिल्म चालू आहे. आवाज पूर्णपणे बंद केलेला आहे. मुलांना फक्त चित्र दिसताहेत. तरीही मुलं फिल्ममध्ये गुंगलेली आहेत. फिल्म सुरू व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की या गोष्टीतले संवाद ऐकू येणार नाहीत. ते तुम्हीच तयार करायचे आहेत. पंधरा मिनिटांनी ही फिल्म संपली. मुलांनी मनाने संवाद लिहिले. वर्गात वाचून दाखवले. पुन्हा एकदा आवाजासह मुलांना फिल्म दाखवली. आपण लिहिलेले संवाद आणि तिथले संवाद यातला साम्य आणि फरक मुलं ताडून बघत होती.
ई लर्निंग हे आजचं अतिशय प्रभावी आणि यशस्वी प्रकरण आहे यात शंका नाही.
हल्ली प्रत्येक शाळेला ई-लर्निंग हवं आहे.
काय आहे या ई-लर्निंग मध्ये? वर्गातच मोठा स्क्रीन असतो. त्यावर शिक्षक हवे ते व्हिडीओज दाखवू शकतात; यामध्ये बालभारतीतले धडे-कविता- गणित- परिसर- विज्ञान- इतिहास या सगळ्याशी संबंधित चित्रं, व्हीडिओज दाखवू शकतात. किंवा शिक्षकाच्या मोबाईलवर असलेला एखादा video शिक्षकाच्या मोबाईलवर असलेली गाणी, भाषणं, मुलाखती असं काहीही मुलांना दाखवायचं असेल तर ते सहज सोप्या रीतीने साध्य होतं. मुलांना वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष बघता येतात. आजची एखादी ताजी बातमीदेखील इंटरनेट कनेक्शन असल्यास मुलांपर्यंत पोचवता येते. मुलांना हे स्क्रीनशिक्षण अतिशय आवडतं हे तर प्रत्यक्षच दिसतं आहे.
- सरकार देखील ई-लर्निंगला अनुकूल आहे. एखाद्या शाळेत इ लर्निंग उपलब्ध आहे हे आता त्यांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा येऊ लागलेलं आहे.
- ई लर्निंग मुळे शिक्षकांच्या डोक्यावर असलेला भार काही अंशी उतरतो. शिक्षण सुकर होतं. ज्ञानरचनावादी पद्धतीत शिक्षकाने मदतनीसाच्या भूमिकेत जायचं आहे, त्यासाठी हे पूरक आहे.
पारंपारिक वर्गातलं चित्र असं असतं की, शिक्षक शिकवाहेत, मागे खडूफळा आहे, हातात पुस्तक आहे. ते बोलताहेत, मुलं ऐकताहेत. लिहून घेताहेत. प्रश्नांची उत्तरं देताहेत. अशा वेळी मेंदूच्या डाव्या भागात काम सुरू असतं . कारण डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे. ऐकणं, बोलणं, समजावून घेणं, उत्तर देणं, लिहून घेणं ही डाव्या बाजूची कामं आहेत.
आता हाच पाठ इ लर्निंग क्लासरूममध्ये चालू असेल तर मेंदूच्या केवळ डाव्याच नाही तर उजव्या भागातही उद्दीपन चालू होईल. मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरला जाईल. कारण उजव्या भागामध्ये रंग, चित्र, कल्पना, अभिनय, संवाद, संगीत याचं काम चालतं. या घटकांशी संबंधित क्षेत्रं उजवीकडे असतात. हे सर्व समोर स्क्रीनवर दिसत असतं. म्हणून केवळ ‘व्याख्याना’पेक्षा दृक-श्राव्य माध्यम जास्त परिणामकारक वाटतं. मेंदूची ही परिभाषा लक्षात घेऊन या ई लर्निंगचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करून घ्यायचा हे शिक्षकाच्या हातात आहे.
हे फायदे बघतांना एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, ती म्हणजे हाताने केलेल्या कुठल्याही कामाला ई-लर्निंग हा पर्याय असू शकत नाही. उदाहरणार्थ
१. एखादा प्रयोग पुस्तकातून वाचून दाखवणे
२. तो डिजिटली स्क्रीनवर दाखवणे आणि
३. मुलांनी तो प्रयोग प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने करणे
यात योग्य प्रकारे ब्रेन डेव्हलपमेंट ही ‘प्रत्यक्ष हाताने करून शिकणे ’ हीच असणार आहे. त्यामुळे जरी ई-लर्निंगद्वारे एखादा प्रयोग दाखवला तरी प्रत्यक्ष हातांनी करण्याला पर्याय नाही.
ई लर्निंगच्या स्क्रीनशिक्षणाला प्रोत्साहन देणारे आपण मुलांच्या हातात गॅझेट्स असण्याला मात्र नाकारतो. याची कारणं काय?
वाचूया पुढील भागात..

: डॉ. श्रुती पानसे

Saturday, 25 November 2017

एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!
शाळेच्या प्रांगणात उंच उभारलेली गुढी, सजविलेल्या बैलबंडीतून मुलांची निघालेली मिरवणूक, मुलांच्या डोक्यावरच्या रंगीबेरंगी टोप्या, हातात पकडलेले रंगीबेरंगी फुगे आणि पुष्पगुच्छ स्वीकारून स्मितहास्य करणारे पालक या दृश्याची गोंदिया जिल्ह्याला आता सवय झालेली आहे. राज्यात सर्वत्र पहिलीच्या मुलांचे प्रवेश जून महिन्यातच होतात, गोंदियामधे मात्र विद्यार्थी मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पहिलीत दाखल होतात. यावर्षी तर गोंदिया जिल्ह्यात गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच 28 मार्च 2017 रोजी तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाचे नाव आहे 'गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा'!!
2015- 2016 च्या शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरूवात झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून या 'प्रवेशगुढी' उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमातंर्गत गुढीपाडव्याआधी दहा दिवस जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गावातील पहिलीत दाखल होऊ शकणाऱ्या मुलामुलींची माहिती काढतात. त्यांची यादी बनवून, त्यांच्या आई- वडिलांना प्रत्यक्ष भेटून, त्यांना जिल्हा परिषद शाळेतच दाखल करण्याची विनंती करतात. शिवाय गोंदिया जिल्हयातील सर्व 1048 शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या झालेल्या असून सर्व शाळा डिजिटल आहेत. 

जिल्हा परिषद शाळांमधे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती ऐकून पालकही खुष होतात. या प्रयत्नांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले यश मिळते आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा कमी होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भरमसाठ फी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली प्रत्येक वेळी पालकांच्या खिशाला लागणारी कात्री, हे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मात्र अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कमीतकमी खर्चात केले जातात. शिवाय शाळेत प्रवेश घेताना कसलेही डोनेशन अथवा फी भरावी लागत नाही.
पालकांना पटवून झाले की प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत अतिशय उत्साहाने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत होते. जिल्ह्यात सर्वत्र नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शाळेत सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशफेरी निघते. विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या दिल्या जातात. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुगे आणि रंगीत फुले दिली जातात. 'गुढीपाडवा- शाळाप्रवेश वाढवा', 'आमचा ध्यास- गुणवत्ता विकास', 'साडेपाच वर्षांचे मूल- दाखल करा, दाखल करा' अशा घोषणा उत्साहात देत गावातून विद्यार्थी आणि शिक्षकांची प्रवेशफेरी निघते. मोहगाव तिल्ली जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे तर केळीच्या पानांनी, आंब्याच्या तोरणांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलबंडीतून पहिलीतील मुलांची प्रवेशफेरी निघते आणि शाळेत त्यांच्या हस्ते प्रवेशगुढी उभारली जाते.
तसेच यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे - 'आम्हीही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. आम्हांला सार्थ अभिमान आहे- जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा!' अशा आशयाच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले होते. खरोखर शोध घ्यायला गेले तर बहुतांश सनदी अधिकारी हे जिल्हा परिषद अथवा मनपाच्या शाळेतून शिकलेलेच असतात. त्यामुळे तुम्हांला गुणवत्ता पाहिजे असेल तर जिल्हा परिषद शाळांना पर्याय नाही, हे आम्ही लोकांवर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहोत. परिणामस्वरुप यंदा तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला.
गोंदियामधील या अभिनव प्रवेशगुढी उपक्रमाबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/11000-students-enrolled-in-a-singl…/