Wednesday, 29 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग १५)

दुपारी चारची वेळ असेल. मी आणि माझी चुलत बहीण खेळत आहोत. थोड्या वेळाने आम्ही एक सरबत ब्रेक जाहीर करतो. किचनमध्ये असलेल्या आजीला त्याची चाहूल बहुदा आधीच लागलेली असते. त्यामुळे आम्ही किचनमध्ये येतो तेव्हा दोन ग्लासात सरबत ओतलेले असते. आणि त्या सरबताच्या पातळी पर्यंत आपली नजर नेत आजी हे बघत असते, की मला आणि माझ्या बहिणीला समान वाटणी मिळाली आहे का? लहानपणीचे हे दृश्य मी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात फ्रेम करून ठेवले आहे. आता लक्षात येते की 'स्री-पुरुष समानता' ह्या विषयातील तो पहिला धडा होता. आता विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मुलगा म्हणून माझा नैसर्गिक हक्क घरातील कोणत्याही वस्तूवर (किंवा कशावरही) नाही हे ही छोटी पण महत्वाची उदाहरणं मनात बिंबवतात. त्यामुळे माझ्यातला मुलगा घडत गेला तो ही सर्वसमावेशकता घेऊनच!
आज देखील भोवती अशी बरीच कुटुंब आहेत जी कोणत्याही नवीन गोष्टीचा पहिला मान मुलाला देतात. मी लहान असताना काही कुटुंब अशी होती जी मोबाईल, सायकल किंवा दुचाकी वाहन हे पहिले मुलांसाठी घेत. आपण कुणीतरी विशेष आहोत हे मुलांना वाटतं ते अशा कृतीतून. घरात आपल्याला मान आहे, सर्व गोष्टींवर पहिला अधिकार आपला आहे हे वाटण्याची सुरुवात इथून आहे. स्री-पुरुष समानतेची दुसरी शिकवण मला मिळाली ती माझ्या आई-वडिलांकडून. पालकांचे घरातील वर्तन हे देखील मुलगे घडविण्यासाठी जबाबदार असते. मी घरातील सर्व निर्णय आई आणि बाबांच्या चर्चेनंतर घेतलेले बघितले आहेत. त्यात दोघांची चर्चा, मतं जाणून घेऊन मगच निर्णय घेतला जात असे. पण गोष्टी इथेच थांबत नाहीत. घरात कुणी आलं की त्यांच्या समोर बायकोला ओरडणे, सतत धाकात ठेवणे, तिने काही मत व्यक्त केलं की लगेच त्याची खिल्ली उडवणे किंवा तिच्यावर डाफरणे हे मी काही घरात बघितले आहे. त्यामुळे केवळ निर्णय घेण्यात बायकोचे मत जाणून घेणे हे न होता एकूणच तिच्या अस्तित्वाचा सन्मान झाला पाहिजे ही शिकवण मला अगदी घरीच मिळाली आणि मुलगा म्हणून घडण्यात मला त्याची मदत झाली. कोणत्याही मुलाला आपला स्रीवर 'हक्क' आहे ह्याची जाणीव वरील उदाहरणं पाळली गेली तर मनात खोल रुतून बसू शकते.
ही झाली लहान असतानाची काही उदाहरणं. तिथे मुलांची भूमिका निरीक्षण करण्याची असते. पण खरी कसोटी असते teen-ages मध्ये (वय वर्ष १३ ते १९). मी लहान असताना मुलं आणि मुली एकमेकांना फारसा स्पर्श करत नसत. आता परिस्थिती थोडी बदललेली जाणवते आणि वातावरणात अधिक खुलेपणा दिसतो. मात्र हा 'स्पर्श' चांगला की वाईट ह्याची शिकवण द्यायची गरज आहे. "सतत मुलींना हात लावू नकोस, त्यांना ते आवडत नाही", असं प्रत्येक 'गेट-टुगेदर'च्या वेळेस माझी आई सांगायची. परंतु जर 'हक्क' गाजविण्याचे संस्कार घेऊन तो मुलगा मोठा झाला असेल तर? असं असल्यास त्या स्पर्शात देखील 'हक्क' डोकावेल आणि त्याचे रूपांतर अहंकाराच्या भावनेत होईल. आणि मग समोरच्या मुलीने तो स्पर्श स्वीकारण्यास नकार दिला तर लहानपणापासून मनात रुजलेला हक्क आणि अहंकार दुखावून त्याचे रागात रूपांतर होईल. मला वाटतं मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. Good Touch आणि Bad Touch ह्यातला फरक मुलग्यांना शिकविला पाहिजे.
त्यामुळे मुलगे घडवताना ह्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं - लहानपणी घरात मुलगा आणि मुलगी समान आहेत असे वातावरण घडविणे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा 'नैसर्गिक हक्क' आहे असं मुलग्यांना वाटू न देणे, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ह्यातला फरक त्यांना समजावणे आणि त्यांना नकार पचविण्याची सवय लावणे. ह्या एवढ्याच गोष्टी पाळल्याने गोष्टी सुधारतील असा माझा मुळीच दावा नाही. हा विषय आणि त्याचे परिणाम खूप व्यापक आहेत हे देखील मला माहिती आहे. मात्र मुलग्यांच्या मानसिक जडणघडणीत हे उपाय काही मौलिक बदल घडवू शकतील हे मात्र नक्की!

- आशय गुणे

Saturday, 25 January 2020

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग चार)

हौसेला मोल नसते असं म्हणतात... याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर आपल्याला सारंगखेड्याच्या घोडे बाजारात रपेट मारावी लागेल. या घोड्यांच्या बाजारात लाखो रुपये किमतीचे घोडे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. यात सर्वाधिक वेड लावले आहे ते कल्याणी आणि राजवीर या घोड्यांच्या जोडीने.
यंदा लोकसहभागातून सुरू झालेला सारंगखेड्याचा घोड्यांचा बाजार या वर्षी अतरंगी अश्वानी सजला आहे. या घोडे बाजारात यंदा २२०० घोडे दाखल झाले आहेत. पहिल्या तीन दिवसात या बाजाराची उलाढाल कोटीच्या वर गेली. या सर्व अश्वांमध्ये लक्षवेधी ठरते आहेत ती कल्याणी नावाची घोडी. काळा रंग आणि पांढऱ्या रंगाचे पाय यामुळे कल्याणीचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. त्यामुळेच कल्याणी या यात्रेत सर्वाधिक पसंतीला उतरणारी ठरली आहे. कल्याणीने देशांतर्गत घोड्याच्या स्पर्धेत सलग सहा वेळा विजयी मिळवला आहे. अस्सल मारवाड जातीची कल्याणी ही ब्लड लाईनची (उत्तम वंशावळीची) असून एका उत्तम अश्वात असावे ते सर्वगुण तिच्यात आहेत. तिचा आहार विहार पाहिल्यावर अवाक व्हायला होते. तिची निगा राखण्यासाठी स्वतंत्र नौकरांचा ताफा काम करतो. १० लिटर दूध, तूप असा कल्याणीचा खुराक असून ती अदन्त प्रकारात मोडते. नाशिकच्या एक अश्व शौकीनाने कल्याणी २१ लाख रुपयांना मागितली आहे. मात्र ५१ लाखात ही घोडी विकायची असल्याचे तिचे मालक पवनसिंह चोप्रा सांगतात.
कल्याणीला या यात्रेत साजेसा दिसतो तो राजवीर हा पांढऱ्या रंगाचा घोडा. राजवीर हा आपल्या उंची आणि पांढऱ्या शुभ्र रंगाने सेल्फी काढणाऱ्यांना आपल्याकडे मोहित करीत आहे. राजवीरला ११ लाख रुपयांना मागितले गेले आहे. मात्र बाळू पाटील यांनी हा घोडा विकलेला नाही. राजवीरची सेवा करण्यासाठी २४ तास ४ मजूर असतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावरान तूप आणि चणा डाळ, गहू आणि बाजरी त्या सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो. राजवीरमध्ये भुजबळ नावाचं शुभ लक्षण आहे. लाखो घोड्यातून एकातच ते असते. या घोड्यात असल्यामुळे त्यांची किंमत आसमंताला गवसणी घालत असल्याचे बाळू पाटील हे राजवीरचे मालक सांगतात.
हे महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शौकींना शक्य नसले तरी बहुतांश या अश्वांसोबत फोटो जरूर काढून दुधाची तहान ताकावर भागवतात. एकाहून एक सुंदर आणि रूबाबदार घोडे पाहण्याचा हा दुर्मिळ योग दरवर्षी लाखो अश्व शौकीन साधतात. कल्याणी... राजवीर हे अश्व आपल्या अदांनी आणि किमतीने अवाक करणार असले तरी त्यांना पाहणे ही देखील एक मोठी पर्वणी आहे. ही पर्वणी साधण्यासाठी आणि या अश्वांप्रमाणे अनेक नामी अश्व पाहण्यासाठी आपल्याला एकदा सारंगखेड्याच्या या अश्व पंढरीची एक वारी अवश्य करावी लागेल. 
- कावेरी परदेशी, धुळे

चला, मुलगे घडवूया (भाग १४)

मुलांचं बालपण आठवायचं म्हणजे आयुष्यातली 25 आणि 27 वर्षं rewind करायची. सौरभ आणि मिहीर यांचं बालपण म्हणजे "पालक" म्हणून आमच्या दोघांचा घडण्याचा काळ !
एकत्र कुटुंबात असल्यामुळे आजी आजोबांचे अनुभव मुलांच्या दुखण्याखुपण्यात नेहमीच उपयोगी ठरत. त्यांच्या मायेची अगदी आजीने स्वतः शिवलेल्या गोधडीची ऊब मुलांना मिळाली. खाऊ, खेळणी आणि मुलग्यांसाठी त्यातल्या त्यात जे काही फॅशनचे टी शर्ट, शर्ट पॅन्ट, जोधपुरी, धोती वगैरे खरेदी करून आमची हौस आम्ही भागवत असू. छान छान गोष्टी आणि बालगीतांच्या कॅसेट्स लावत असू. माझी रेडिओची नोकरी असल्याने दिवसाची सुरुवात गाणी, भाषणं, मुलाखती यांनी होत असे, आजही तसंच सुरू आहे. त्यामुळे चांगलं ऐकणं हा एक अविभाज्य भाग होता. चांगली व्याख्यानं ऐकणं, कविता, गाणी, नाटक अधिक प्रमाणात आणि कधीतरी सिनेमा बघायला जात असू.
मुलांना मराठी आणि पुढे सेमी इंग्लिश माध्यमात शिकवण्याचा निर्णय आम्ही दोघांनी एकमताने घेतला. त्याचबरोबर इंग्रजी अक्षर ओळख, मराठी आणि सोप्या इंग्लिशमधली चित्रगोष्टींची पुस्तकं वाचन असं सुरू असायचं. मुलांशी गप्पा माझ्या तर खूपच कारण आज रेकॉर्डिंगला कोण मोठी व्यक्ती आली होती, त्यांनी काय सांगितलं, त्यांचे काही अनुभव मी तेव्हा आणि आजही सांगत असते. मोठ्या लोकांचा साधेपणा, अभ्यासपूर्ण बोलणं याचे किस्से मुलंही मनापासून ऐकायची. मात्र शाळेत काय झालं त्याविषयी बोलण्यात त्यांना रस नसे. विशेषतः मुलींच्या आया सांगायच्या, ती वर्गात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगते. ही दोन्ही मुलं त्याबाबतीत अतिशय अनुत्साही. शाळेतल्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमात दोघेही भाग घ्यायचे. त्यासाठी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिलं, तयारी करून घेतली. पुढे सौरभ कराटे शिकू लागला आणि मिहीर गाणं. सौरभने कराटेच्या परीक्षा दिल्या. मिहिरने मात्र 3 परीक्षा झाल्यावर परीक्षा न देता गाणं शिकणं सुरू ठेवणार असं सांगितलं. त्यालाही आमची ना नव्हती. शाळेचा अभ्यास दोघांचाही व्यवस्थित होता. मिहीर वर्गात साधारण पहिल्या पाचात आणि सौरभ पहिल्या पंधरात. एकाला दोन्ही स्कॉलरशिप मिळाल्या, एकाला नाही. शाळेचा अभ्यास सातवी पर्यंत घरीच घेतला. स्कॉलरशिपची तयारी बाबा करून घेत असे.
घरात संख्येने पुरुषांची majority होती. सासरे, नवरा, दीर आणि दोघे मुलगे. तरीही काहीही ठरवताना सासुबाई आणि माझा विचारही नेहमीच घेतला जातो. महत्त्वाचं काही असलं की, कालनिर्णय घेऊन गोलमेज परिषद भरते, असं आम्ही गमतीने म्हणतो. पुढे चर्चेत मुलंही सहभागी होऊ लागली. त्यांचंही ऐकलं जातं.
माझी एक मैत्रीण म्हणायची, नोकरी करणाऱ्या आईची मुलं adjustive असतात. त्याचा प्रत्ययही आलाच. पण हे केवळ नोकरीमुळे नसेल तर एकूणच घरकाम हे फक्त बाईनेच करायचं असं वातावरण नसल्याने मुलंही शिकत गेली. भांडी घासणारी मावशी आली नाही तर त्यांचे आता 85 वर्षांचे असलेले आजोबा हे पूर्वीपासून आपलं ताट आपण घासायचे. साहजिकच बाबा आणि मिहीर सुद्धा आपापलं ताट वाटी घासून इतर कॉमन भांडी घासायला सुरूवात करतात. फरशी पायाला चिकट लागली की फिनेलच्या पाण्याने अख्खं घर कुणीही न सांगता मुलं पुसून काढतात.
एकाला स्वच्छतेची तर दुसऱ्याला स्वयंपाकाची आवड आहे. गंमत म्हणून किंवा नवीन डिश ट्राय करताना एकजण जिन्नस आणून देईल आणि दुसरा पदार्थ करेल. मिहीरचं सुरीने भाजी चिरणं, डिश सजवणं अतिशय सुबक काम. बाकी त्याला पसारा घालण्याची आणि सौरभला आवराआवर करायची आवड आहे. त्यावरून वाद व्हायचे. शिस्त, नीटनेटकेपणा यावरून एकमेकांना बोलणं सुरू असायचं. भांडण होऊन परत एक होणं ठरलेलंच असे.
घरात मुलगीच नसल्यामुळे मुलगे काम करतात, असं कुणी म्हणतात. पण ते खरं नाही. घर हे सगळ्यांचं आहे, हे त्यांच्या बाबाने आपल्या कृतीतून शिकवलंय. आज सौरभ चार्टर्ड अकाऊंटंट होऊन एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो आहे. तो फ्रेंच अनुवादक म्हणून नोकरी करणाऱ्या त्याच्या पत्नीला, अदितीला घरकामात मदत करतो. मिहीर एमबीबीएस झाला. आता एमडीची तयारी सुरू आहे.
मुलींनी शिकून उत्तम करिअर केलं पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. प्रियांका रेड्डीची बातमी आल्यावर मिहीर खूप अस्वस्थ झाला. "हिम्मतच कशी होते यांची? किती घाणेरडी, बेकार वृत्ती आहे ही. कडक आणि कठोर शिक्षा लगेच व्हायला हवी या गुन्हेगारांना," असं म्हणत तरूण रक्त सळसळलं. सौरभ म्हणाला, " हे फार घाणेरडं आहे. भयंकर आहे. ह्याने देशाची प्रतिमाही किती वाईट होते."
दोघांनाही मित्र मैत्रिणी आहेत. कधीतरी बाहेर फिरायला, जेवायला जाणं वगैरे अगदी नॉर्मल मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना मदत करणं हे अगदी सहज होतं. पण एकूणच आजच्या कॉर्पोरेट जगात मुलगे आणि मुली यांचं वागणं थोडं अधिक स्वैर होताना दिसतंय, असं सौरभचं मत आहे.
माझ्या रेडिओतल्या कामाबद्दल दोघांनाही आदर, प्रेम आहे. सौरभ तर गमतीत एकदा म्हणालाही होता, I am proud of you.
ह्या दोघांच्या वाढण्या घडण्यात बालमोहन शाळा, चाळ कम ब्लॉक मधला उत्तम शेजार हे सारंच मोलाचं आहे. हे सगळं लिहिणं खूप आनंदाचं आहे.

- नेहा खरे

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग तीन)

पंचकल्याण, देवमान, कंठळ, जयमंगल, पद्य, श्यामकर्ण, भुजबळ असे एक ना अनेक गुण असलेले घोडे केवळ याच बाजारात पाहायला आणि विकत घ्यायला मिळतात. त्यामुळे सारंगखेड्याचा हा घोडे बाजार देशातल्या नामवंत अश्व शौकिनांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. पांढ-या आणि काठियावाड घोड्यांची या बाजारात हुकूमत आहे. या वर्षी या यात्रेत मारवाडी आणि कुमेड अश्वांचा बोलबाला आहे.
सारंगखेड्याचा घोडे बाजार नेहमीच वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत आलाय. आता सारंगखेड्यात आंतरराष्ट्रीय घोड्यांविषयी माहिती देणारं ग्रंथालय आणि संग्रहालय उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगातील अश्व प्रेमींना सारंगखेड्यात आकर्षित करण्यासाठी आणि सारंगखेड्याला ग्लोबल अभ्यास केंद्र बनविण्यासाठीही कष्ट घेतले जात असल्याचे जयपालसिंग रावल सांगतात.
एकाहून एक आरस्पानी सौंदर्याचे धनी असलेल्या जातिवंत घोड्यांचं हे आगळं वेगळं विश्व आपल्यालाही वेड लावेल असे आहे. सोबतच ऐतिहासिक सारंगखेड्याला लाभलेला तापीचा विस्तीर्ण किनाराही आपल्याला साद घालतो.
सारंगखेडा गावाला तापी नदीनं भरभरुन वैभव दिलंय. सारंगखेड्यात नदीवर ब्यॅरेज बांधण्यात आला असून अथांग पाणी या प्रकल्पात आहे. तापीचं पात्र पाणी साठवण्यासाठी अव्वल का आहे हे सारंगखेडा ब्यॅरेज पाहिल्यानंतरच लक्षात येतं. हा ब्यॅरेज या गावालाच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरालाही सुजलाम सुफलाम ठेवतोय. ऊसाचे मळे आणि शेतातल्या हिरवळीचं वैभव याच ब्यॅरेजनं दिलंय. ऊस, कापूस, गव्हाची हिरवीगार शेतं तर आपल्याला भुरळ पाडतात. सातपुड्याच्या डोंगररांगांच्या भव्यतेची आणि तापीच्या पुण्याईची चुणूक दाखवणा-या सारंगखेडा गावात आपल्याला आपलंसं करण्याची खासियत आहे. अथांग पाणी आपल्या कुशीत घेऊन बसलेल्या पण शांत तापी नदीच्या किनारी वसलेल्या सारंगखेडा गावाला निसर्गानं भरभरुन दिलंय. 
- कावेरी परदेशी, धुळे

दहावी ते पीएचडी व्हाया ३० ‘सेट’ नेट

सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचे तोळणूर गाव. इथले धानय्या गुरुलिंगय्याकवटगीमठ. वय 37. 24 राज्यांच्या सेट, 3 नेट आणि 3 टीईटी उत्तीर्ण होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
धानय्या यांचे वडील शेतमजूर आणि आई गृहिणी. निरक्षर कुटुंबात जन्म. इंग्रजीत दहावीला ३६ तर बारावीला ३७ गुण. तोळणूरमधल्याच जिल्हा परिषद कन्नड शाळेत सातवी तर सिद्धेश्वर प्रशालेत दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण. अकलूजमधल्या महात्मा फुले महाविद्यालयातून बी. एड. २००८ मध्ये अक्कलकोटच्या मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून रूजू. तिथे ते मुलांना कन्नड भाषेतून इतिहास -भूगोल शिकवत. शाळा सांभाळून सोलापूर विद्यापीठातून ते एम. ए. झाले. 
याच दरम्यान त्यांची सांगलीतल्या आटपाडी इथल्या प्रकाश स्वामी या प्राथमिक शिक्षकांशी भेट झाली. स्वामी नुकतेच सेट पास झाले होते. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. २०१२ महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची तयारीला सुरुवात. शाळा सांभाळून सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ४ तास अभ्यास. 
सुरुवात अपयशाने झाली. यशानं दोन वर्षं हुलकावणी दिली. याच दरम्यान त्यांनी आपल्या अभ्यासाची तयारी किती झाली आहे हे जाणून घेण्यासाठी केरळ राज्याची सेट परीक्षा दिली. त्यात यश मिळालं. मग त्यांनी इतर राज्यांच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. 
२०१५ साली ३५० पैकी २७० गुण मिळवत महाराष्ट्राच्या सेट परीक्षेत ओबीसीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
आपल्या विषयातील खोलवर ज्ञान मिळविण्यासाठी आणि इंग्रजी लिटरेचरमध्ये प्रत्येक राज्यात काय वेगळेपण असते हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इतर राज्यांच्या सेट परीक्षा देण्याचाही पायंडा सुरू केला. ज्या-ज्या राज्यात परीक्षा देण्यास गेले. तिथल्या मुख्य विद्यापीठाला भेट देऊन ३७ विषयांचा अभ्यासक्रम गोळा केला. देशातल्या१४ मुक्त विद्यापीठ आणि ५० केंद्रीय विद्यापीठांना भेट दिली. हे सारे करत असतानाकर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहिला. पण अभ्यासात त्यांनी खंड पडू दिला नाही. 
केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, ईशान्येकडल्या सात राज्यांची मिळून गुवाहाटी विद्यापीठाची परीक्षा दोनवेळा देऊन धानय्या उत्तीर्ण झाले. मात्र यावर समाधान न मानता सोलापूर विद्यापीठातून सुधा मूर्तींचे साहित्य चरित्र याविषयावर डॉ. प्रा. तानाजी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच. डी. करण्यास सुरुवात केली.
ब्रिटिश कौन्सिल, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, प्राथमिक शिक्षा अभियान यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून ते कामही करत आहेत. देशातल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. 
वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक इंग्लंड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम अमेरिका, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड हॉंगकॉंग, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आस्ट्रेलिया तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांचं नामांकन झालं आहे. यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण कुमार पटवर्धन यांच्या हस्ते त्यांचा यूजीसीत सत्कार झाला. 
धानय्या यांनी नेटसेटवर नऊ पुस्तकं लिहिली असून चार प्रकाशित झाली आहेत. नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं, इंडिया इअर बुक, कुरुक्षेत्र आणि योजना मासिकं, केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाची पुस्तकं, एम्प्लॉयमेंट न्युज यांचा परीक्षेसाठी खूप उपयोग झाल्याचं धानय्या सांगतात.

-अमोल सीताफळे, सोलापूर 

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची (भाग दोन)


 नाथ संप्रदायातील एकमुखी दत्ताचं मंदिर, ऐटदार घोडे बाजार आणि अथांग भरलेली तापी नदी असा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक त्रिवेणी संगम म्हणजे सारंगखेडा. बाजारात पंजाबी नुकरा, काठियावाड, मारवाड, सिंध आणि गावठी अशा सर्व प्रकारचे घोडे एकाचवेळी पहायला मिळतात. बादल, बिजली, दरबार अश्या राजबिंड्या घोड्यांकडे पाहिलं की त्यांची श्रीमंती आपसूकच डोळ्यात भरते.
ऑडी, मर्सिडीज घेणं सोपं पण हे घोडा घेणं अवघड. सर्व भेदाभेद आणि अर्थिक स्तर या यात्रेत मिटून जातात. अश्व प्रेम आणि आकर्षण याच रंगात या यात्रेत येणारा प्रत्येक जण लीन होतो. इथं होणारी उलाढालही कोट्यवधींच्या घरात असते. सारंगखेड्याच्या बाजारात पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशातून घोडे व्यापारी आणि खरेदीदार येतात. या घोडे बाजाराला भेट देणा-यांची संख्या वर्षागणिक लाखोंनी वाढते आहे.
आजघडीला या बाजाराला आधुनिक फेस्टिव्हलचं रूप आलं आहे. सारंगखेड्यात होणाऱ्या घोड्यांची रेस, डान्स कॉम्पिटीशन, चेतक फेस्टिव्हल. एक ना अनेक, घोड्यांशी निगडीत उत्सव आणि प्रदर्शन इथंच आपल्याला अनुभवता येतं. वीर योद्धा महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक आणि शिवरायांची घोडी कृष्णा या नावांवरून सारंगखेड्याच्या स्पर्धेत बक्षीस दिलं जातं. यावर्षी या यात्रेत २३०० अश्व विक्रीसाठी आले असून सुरुवातीच्या काही दिवसात दीड कोटी रुपयांची अश्व खरेदी विक्रीतून उलाढाल झाल्याचे या यात्रेचे आयोजक जयपालसिंग रावल सांगतात.
गेल्या चार शतकांपासून ही यात्रा स्थानिक आयोजन समितीकडून भरवली जात होती. गेली दोन वर्षं या यात्रेला पर्यटन विभागाने मदत केली होती. यावर्षी मात्र ही यात्रेला आणि चेतक फेस्टिवल लोकसहभागातून आयोजित करण्यात आल्यासह या यात्रेचे प्रमुख जयपालसिंग रावल सांगतात. येणाऱ्या काही वर्षात या यात्रेला जागतिक स्तरावर स्थापित करण्याचा संकल्प सारंगखेडा यात्रेला आयोजन समितीने केला आहे. 
- कावेरी परदेशी, धुळे

दुष्काळ पडला तरी घोडे कुटुंबाला एक वर्ष पाणी पुरेल...

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं गाव बारी. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी हे गाव. पावसाचं प्रमाण जास्त परंतु उताराची जमीन अन कातळ खडक यामुळे पावसाळ्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याच दुर्भिक्ष जाणवतं. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन जावं लागे. 
बाळू घोडे हे तेथील प्रयोगशील शेतकरी. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचं त्यांनी ठरवलं. 
जानेवारी 2019 ला घराच्या बाहेरील बाजूस त्यांनी खड्डा काढून पाण्याची टाकी बांधली. विशेष म्हणजे टाकीची रचना त्यांची स्वतःचीच. ८ फूट लांब, ६ फूट रुंद, ६ फूट खोल. खर्च ५० हजार रुपये. ही टाकी सुमारे २००० लीटर पाणी साठवते.
पावसाळ्यात समोरचं घरआणि स्वतःच्या घराच्या पत्र्यावरचं पाणी पाईपद्वारे साठवून पिंपात सोडलं जातं. मग ते टाकीत सोडलं जातं. पावसाचं पाणी एकत्र करून ते पिंपात सोडताना पाईपच्या मुखावर कापड बसवून पाणी गाळतात . पाण्यात किडे होऊ नये म्हणून त्यात मासे आणि ग्रामपंचायतीतून मिळणारे निर्जंतुक औषध टाकलं जातं . पाणी घेताना त्यावर सूर्यप्रकाश पडू नये याची काळजी घेतली जाते,सूर्यप्रकाश पडल्यास त्यात किडे होण्याची शक्यता असते.
बाळूभाऊ म्हणतात,जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर,माझ्या कुटुंबाला वर्षभरासाठी पुरेल इतके पाणी टाकी साठवते. बाळूभाऊंमुळे गावतील इतर मंडळी टाकी बनवण्यास उत्सुक आहेत.
यासोबतच काळी नाचणी,काळी वरई,कालभात,कारले,दोडका,दुधी,उडीद,पावटा,राजमा अशा सुमारे ४० देशी वाणांच्या बियाणांचं जतन त्यांनी केलं आहे. गेली चार वर्षे झाले ते सेंद्रिय शेती करतात. कृषी विद्यापीठातले अनेक विद्यार्थी, पर्यटक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात.
बाळू घोडे- ९४२३७ ४०५१६ 

- संतोष बोबडे