Friday, 31 January 2020

रद्दीच्या पैशातून मुलांच्या संगोपनाला आधार

नागपूरमधले नागेश पाटील. सामाजिक क्षेत्रात गेली २० वर्ष कार्यरत. गरीब,अनाथ पण हुशार मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावीत, यासाठी ते काम करतात. २०१२ मध्ये त्यांनी 'जिव्हाळा' ही संस्था यासाठी सुरू केली.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’‘रद्दी देई बुद्धी’ या त्यांच्या संस्थेच्या ब्रीदवाक्यातून देशालाही बेटी बचाओचा संदेश मिळाला. सध्या त्यांच्या संस्थेत एकूण ४२ मुलं. त्यापैकी १५ मूलं आणि १९ मुली अरूणाचल प्रदेशमधल्या तर ८ मूली विदर्भातील. ५ वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारी. भरतनाटयमपासून अभियांत्रिकीपर्यंत वैविध्यपूर्ण शिक्षण घेणारी. नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून ९ मुली नोकरीही करत आहेत.
नागलोक बुद्धिस्ट सेंटरमध्ये अरुणाचल प्रदेशातला चकमा नावाचा युवक शिकायला होता. त्याची पाटील यांच्याशी भेट झाली. त्याला त्यांच्या कार्यविषयी समजलं. आपल्या बहिणीच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेण्याची विनंती चकमानं पाटील यांना केली. तिच्याबरोबर १३ मुली आल्या. असं करतकरत अरुणाचल प्रदेशमधली मुलं संस्थेत येऊ लागली.
मुलं आणि मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था. मुलींसाठी एक वॉर्डन. जेवण स्वतः पाटील यांच्या पत्नी करतात. मदतीला एक आचारी. मुलांना शहरातल्या प्रतिष्ठित शाळांमध्ये घातलं आहे. पाटील यांच्या कामात त्यांच्या पत्नीचा न बँकेत काम करणाऱ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. पाटीलही पूर्वी नोकरी करायचे. पण मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नसल्याचं वाटल्यानं त्यांनी नोकरी सोडली.
आईवडिलांशी भेट घालून देण्यासाठी ते दरवर्षी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुणाचल प्रदेशला घेऊन जातात. या कामासाठी पाटील यांना दरवर्षी २५ ते ३५ लाख रुपये खर्च येतो. यासाठी काही दानशूरांची साथ त्यांना आहे. काही दाते नियमितपणे रद्दी देतात. ही रद्दी विकून मिळणारे पैसे ते मुलांसाठी वापरतात.
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र भूषणसह ७० पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

- नीता सोनवणे, नागपूर

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १ (वाचक : नीना कुळकर्णी)

लिंक : https://www.facebook.com/watch/?v=395853391333371

कल्पकतेला वाव अन‌् मिळाली जगण्याची उमेद

ही सुंदर, कल्पकतेने घडवलेली शुभेच्छापत्रं पाहताय? यासह टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या आकर्षक पिशव्या पण. कोणी बनवल्यात माहितीये? त्या बनवल्यात पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया आनंदवनातील युवती अन‌् महिलांनी.
एचआयव्ही बाधितांचे जगणे म्हणजे व्यक्तीगत आयुष्यातील संघर्ष अन समाजाकडून होणारी उपेक्षा. अशा स्थितीत जीवनात आनंद यावा, तरी कसा. याच विचारांतून इन्फंट इंडियातील महिला, युवती, मुलांसाठी दोन वर्षांपूर्वी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आलं. अभ्यासाविषयी फारशी उत्सुक नसलेली व काहीशी आत्ममग्न असलेली आसमा शेख. तिला शुभेच्छापत्रे बनवायला, टाकाऊ वस्तूंपासून विविध शिल्प बनवायला, कापडी बॅग बनवायला आवडायचं. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आसमासह प्रकल्पातील सर्व महिला, मुलींना त्यांची कल्पकता वापरता यावी, यासाठी कौशल्य विकास केंद्राची संकल्पना मांडली. त्याला समाजातील मान्यवरांचे पाठबळ मिळाले अन‌् हे केंद्र सुरुही झाले.
आज आसमासह १८ मुली फावल्या वेळेत पिशव्या, शुभेच्छापत्र बनवतात. विविध ठिकाणी असलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने स्टॉल लावून त्याची विक्रीही करतात. यातून या कामाचा मोबदलाही मिळतो अन‌् आपल्या हातून काहीतरी घडत आहे, त्याचे समाधानही. नव्या वर्षात आता या मुली, महिलांनी बनवलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सर्वांच्या जगण्याला, कल्पकतेला नवे आयाम देणारा हा उपक्रम उत्तरोत्तर बहरत जात आहे.
- अनंत वैद्य, बीड

केम छो? मजा मा!

बरेच वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रॉफी सारख्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्यामुळे मी चालणे काय उभाही राहू शकत नाही. अशा परिस्थितीत कोणीही नैराश्यग्रस्त होऊ शकतो. पण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आणि नवीन गोष्टींबद्दल जिज्ञासा यामुळे मी कायम आनंदी असतो.
मला गुजराती माणसांची एक गोष्ट खूप आवडते दोन गुजराती माणसं एकमेकांना भेटली की एक संवाद हमखास होतो; 'केम छो?' आणि दुसरा म्हणणार 'मजा मा' म्हणजे मजेत. किती छान! नुसतं ठीक म्हटलं की चाललंय आपलं कसंतरी असं वाटतं.
शारीरिक अस्वास्थ्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही पण कोणी मला विचारलं "काय कसं काय?"तर मी लगेच 'मजा मा' असंच म्हणतो. कारण खरंच मी नेहमी मजेत असतो.
रोज जरी बाहेर जात नसलो तरी महिन्या दोन महिन्यात एकदा विवियाना मॉलला जातो आणि केएफसी चिकन खातो. जमलं तर एखादा चित्रपट सुद्धा पाहतो.
तुम्हाला खोटं वाटेल पण मी आठ वेळा अमेरिकेला जाऊन आलो आहे आणि एकदा तर एकटा जाण्याचं धाडस सुद्धा केलं आहे.
तिकडे मुलाने एक स्कूटरपण घेतली आहे माझ्यासाठी. मग मी स्कूटरवरून मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जाऊन खरेदी सुद्धा करतो. माझा मुलगा आणि सून मला सगळीकडे म्हणजे हॉटेलमध्ये किंवा बर्थडे पार्टीमध्ये आवर्जून घेऊन जातात. तिकडे अशी सोय सर्व ठिकाणी असते. एकदा तर सुनेने ब्युटी पार्लरमध्ये नेऊन माझं पॅडिक्यूअर आणि मॅनिक्युअर सुद्धा करून आणलं आहे. अशा रीतीने तीन-चार महिने राहून भरपूर मजा करून आणि अमाप पॉझिटिव्हिटी घेऊन परत येतो. या सर्वांमध्ये माझ्या पत्नीची सक्रिय साथ असते म्हणूनच हे शक्य होते. ही पॉझिटिव्हिटी मला पुढच्या वारी पर्यंत पुरते.
घरी असलो तरी मला कधीही कंटाळा येत नाही कारण सकाळी उठल्यावर संपूर्ण पेपर वाचून काढतो. नंतर एखादे चांगले पुस्तक सुद्धा वाचतो घरातल्या स्मार्ट टीव्ही वर अँग्री बर्ड, quizup वगैरे गेम सुद्धा खेळतो. तसेच गुगल स्ट्रीट व्ह्यू वर वेगवेगळ्या शहराची सफर सुद्धा करतो. व्हाट्सअपवर मुलांशी आणि नातलगांशी व्हिडिओ चॅट करतो. मागे एकदा मुलगा नवीन घर घेणार होता तेव्हा गुगलवर वेगवेगळी घरं बघून त्याला नवीन घराबद्दल माहिती पण देत असे. शिवाय टिव्हीवर नॅशनल जिओग्राफिक ऍनिमल प्लॅनेट आणि मराठी सिरीयल तर पाहतोच त्यामुळे घरात असून सुद्धा वेळ कसा जातो कळतच नाही.
आता सांगा कोणी गुजराथी माणसानं मला जर विचारलं 'केम छो' तर मी 'मजा मा' असंच म्हणणार ना?
- सुधीर शेवडे, ठाणे

Wednesday, 29 January 2020

वाडीचा प्रसाद होणार न्यायाधीश

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील वाडी. ८५० घरांची वस्ती असलेलं खेडेगाव. इथला प्रसाद ठाकरे. वय २७. राज्य लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.
प्रसाद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत. १० वीला ६० टक्के. १२ वीत ५१ टक्के. गुण कमी असल्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बारगळलं. प्रसाद काहीसा हिरमुसलाच. घरची शेती करायची ठरवलं. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकूणच पाऊस अनियमित. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमालीचं घसरलेलं. प्रसादनं तीन वर्ष शेती केली. त्यातच दीड लाखांचं कर्ज झालं.
त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरवलं. एलएलबीला ५७ टक्के तर एल एल एम ला 70 टक्के. शेतीतून घर आणि शिक्षण खर्च निघणं अशक्य होतं. प्रसादने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास.
२५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  ''परिस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. संघर्ष करावाच लागतो. जिद्द मात्र सोडायची नाही. कुठे ना कुठे यश मिळतंच.'' असं तो आत्मविश्वासानं सांगतो. वडील साहेबराव यांची प्रेरणा आणि अखंड साथ यामुळे जिद्द कायम राहिली, असं प्रसाद सांगतो.


-दिनेश मुडे, बुलडाणा

सिनेमा (ब्रह्मेपीडीयातील एक नोंद) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

शीतकपाट (रेफ्रीड्जरेटर)मध्ये ज्याप्रमाणे कामप्रेस केलेला फ्रीऑन वायू खेळवून तापमान खाली उतरविले जाते त्याच्या विरुद्ध तत्वावर चालणारे यंत्र. या यंत्राची कल्पना लिओनार्दो दा विंचीला प्रथम सुचली असावी. त्याने याचे संकल्पचित्र बनवून त्याला हेलिकापतर असे नाव दिले. काम्प्रेसरमधून वायू फिरवून थंड केला जातो तद्वत एका मोठ्या प्रोजेक्टरमध्ये माणसांना छोटे करून त्या प्रतिमा वेगात फिरवून दाखवल्या जातात. या कलेचा शोध नवयुगात एडिसन प्रयोगशाळेने लावला. तदनंतर स्फूर्ती घेऊन फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी १८९५ साली सिनेमाचा पहिला प्रयोग केला. त्याच सुमारास भारतात हरिभाऊ ब्रह्मे यांनी पुणे येथे गणपती उत्सवात पहिला सिनेमा १८९३ साली दाखवला असे समजले जाते. हा सिनेमा रंगीत, आवाजासहित आणि ल्युमिएर बंधूंसारखा फिल्मवर चित्रीत केलेला नसून जिवंत होता. या सिनेमात बंदूकीच्या गोळीने समोरच्या माणसाच्या शरीराला छिद्र पाडण्याचा एक प्रसंग दाखवला जायचा. शुभारंभाच्या प्रयोगांनंतर या सिनेमाचे प्रयोग (पात्रांअभावी) होऊ शकले नाहीत. या सिनेमाच्या फिल्म कुठेही उपलब्ध नसल्याने पहिलेपणावर ल्युमिएर बंधूना हक्क सांगता आला.
ल्युमिएर बंधूंच्या यशाने प्रभावित होऊन जगभर सर्वत्र सिनेमाची पाळेमुळे रुजली. रात्रभर चालणाऱ्या लांबलचक नाटकांपेक्षा आटोपशीर असलेला हा प्रकार लवकरच लोकप्रिय होऊन सगळीकडे सिनेमा दाखवणारी थिएटरे उभी राहू लागली. अमेरिकेत क्यालिफोर्निया, भारतात कोल्हापूर, ब्राझीलमध्ये ॲमेझॉन, चीनमध्ये शांघाय आणि रशियात सायबेरीया या निसर्गरम्य ठिकाणी नवनव्या सिनेमांचे शूटींग धडाक्याने होऊ लागले.
सुरुवातीला, सिनेमा पाहणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून मूक सिनेमे बनवले जात. चारली चापलीन नामक नट या काळात अमेरिकेत प्रसिद्धीस पावला. या काळात सबटायटल्स (उपशीर्षकां)शिवाय सिनेमा पाहण्याची लाट असल्याने त्याचे इंग्रजी सिनेमे लोकांना न कळून इतरत्र त्याची लोकप्रियता फारशी झाली नाही. लारेल हार्डी नावाचा कधी जाड तर कधी बारीक असणारा नटही याच सुमारास उदयाला आला. सिनेमा पाहणाऱ्यांना विडीकाडीसाठी अथवा शेंगागंडेरीसाठी वेळ देता यावा म्हणून सिनेमात मध्येमध्ये गाणी वाजवण्याची प्रथा सुरु झाली. लोकांनी चहापाणी करण्याऐवजी गाणी ऐकत बसू नये म्हणून वाईट आवाजाच्या लोकांकडून गाणी म्हणवून घेण्याचा प्रघात होता. (हे लोण भारतात उशीराने पोचल्याने किमान शब्बीरकुमार, मुन्ना अजीझ आदी गायकांची सोय झाली.) गाणी वाजविता यावीत यासाठी सिनेमाला आवाज देण्याच्या कलेचा शोध लावला गेला. जाझ सिंगर या बोलपटापासून बोलपटांचे (टाकीज) युग सुरु झाले. केवळ वक्र भृकुटीच्या सहाय्याने अभिनय करणाऱ्या नटांची पंचाईत होऊन, स्टेजप्रमाणे आपली भाषणेही चोख पाठ करणे क्रमप्राप्त बनले. बरेच मूक अभिनेते या काळात पडद्याआड लुप्त झाले.
तत्कालिन कृष्णधवल रंगांमुळे पडद्यावर कृष्णकृत्ये करणारे खलपात्र दाखवण्यास अडचण येत असलेने सिनेमे रंगवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस एकएक चित्र स्वतंत्र रंगवले जाई. चंद्रावर स्वारी (१९०५) हा फ्रेंच सिनेमा कृष्णधवल कॅमेऱ्याचे चित्रीत करून नंतर रंगवला गेला. पुढे रंगीत कॅमेऱ्यांचा शोध लागल्याने रंगीत सिनेमे बनवणे सोपे झाले.
भारतात या कलेचा प्रसार बहुतच वेगाने झाला. नाटकांप्रमाणे सिनेमांसाठी अभिनयाची गरज नसलेने नुसते पडद्यावर उभे राहू शकणारे नट नायक म्हणून उदयास आले. पियानोवर भाकरी थापटल्यासारखे हात हलवणे, कॅमेरासमोर स्थितप्रज्ञासारखे उभे राहणे, हृदयविकाराचा झटका आला आहे असा चेहरा करून प्रेमगीत गाणे या अभिनयबळावर अनेक अभिनेते भवसागर तरून गेले. ७०च्या दशकात, आशा पारेख नामक नटीचा उदय झाला. तिचे दोन्ही डोळे एकाचवेळी कॅमेराच्या फिल्डमध्ये मावत नसलेने ७० एमएम वाईडस्क्रीनचा शोध लावावा लागला. कालांतराने भलत्याच भरीव अंगाच्या दाक्षिणात्य नटींना नीट न्याहाळण्याची सोय म्हणून थ्रीडी सिनेमाचीही सुरुवात झाली. जेव्हा बहुतांश सुस्वर गायक काळाच्या पडद्याआड लुप्त झाले तेव्हा गाणी सहनीय व्हावी म्हणून डॉल्बी नावाचे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. यामुळे, गाणे सुसह्य वाटत नसले तरी नवीन तंत्रज्ञान असल्याने गाणे चांगले वाटते अशी समजूत लोक करून घेतात.
सध्या भारत देशात सर्वाधिक सिनेमे दरवर्षी बनवले जातात (हे सिनेमे प्रेक्षागारात दाखवून प्रेक्षकांनाही बनवले जाते.)

- ज्युनिअर ब्रह्मे

चला, मुलगे घडवूया (भाग १६)

नवी उमेदवर सध्या 'चला, मुलगे घडवूया' ही मालिका सुरू होती. मला दोन्ही मुली आणि मला सख्खा भाऊ नाही. त्यामुळे मुलामुलीतला भेद आमच्या घरी आमच्या वाट्याला आलाच नाही. घरात मुलगाच नसल्यामुळे जी सो कॉल्ड कामं मुलांनी करायची ती सगळी आम्ही मुलीचं करत होतो.
आता मात्र माझ्या मुली लहान आहेत आणि आजूबाजूच्या आयांकडून आणि कित्येकदा मुलांकडूनही मुली हे करत नाहीत, ते करत नाहीत हे ऐकायला मिळायचं. ही मुलं एकत्र खेळताना मुली नर्स व्हायच्या तर मुलगे डॉक्टर. एकदा मधे पडून मला सांगावं लागलं की मुलीही डॉक्टर असतात.
नुकतंच धाकटीला एक वाढदिवसाला जायचं होतं. गिफ़्ट आणायला गेलो. दुकानदाराने लगेच 'लडकेको देना है या लडकीको' असं विचारलं. मुलींसाठी गिफ़्ट दाखवली ती गळ्यातलं, कानातलं बनवायचं खेळणं, क्विलींगचा सेट, आर्टिफिशियल नखं आणि दुसरं खेळणं होतं अर्थातच भातुकली. पुन्हा 2 ते 3 दिवसांनी मुलीला पाण्याची बाटली हवी होती. पुन्हा एकदा तोच प्रश्न - 'बॉटल लडकी के लिये या लडके के लिये' या वेळी मात्र हा प्रश्न ऐकून त्याला म्हटलं, 'अरे, पाण्याच्या बाटलीत काय आहे मुलगी आणि मुलगा?' तर दुकानदार म्हणे, 'है ना । लडकीयोंके लिए पिंक ओर बार्बीकी पिक्चर्सवाली बोटल्स है । ओर लडकोके लिए अव्हेनजर्स, स्पायडरमॅन । ' हे ऐकूनच खरंतर चिडचिड झाली. त्याला म्हटलं हा फरक तुम्ही करताय. सगळ्याच मुलींना पिंक कलर, बार्बी आणि भातुकली आवडते असं नाही. तुम्ही वेगळं काही दाखवलंत तर तेही त्यांना आवडू शकतं.
अशी उदाहरणं बघितली की वाटतं, हे मुलगा मुलगी प्रकरण इतकं खोलवर झिरपलं आहे की हे बदलण्यासाठी काय करावं, कसं करावं हा प्रश्नच पडावा.
सरकारी शाळांत मीना राजू मंच हे काम करतो आहे. पण उच्च मध्यमवर्गीय शाळांचं आणि घरांचं काय?
उमेदवर मालिका सुरू केली तेव्हा हैदराबाद प्रकरण ताजं होतं. पोलिसांनी आरोपींचं एन्काऊंटर केलं तेव्हा काहीजण याविरुद्ध बोलले तर काही लोक बाजूने. विरुद्ध बोलण्याऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत सुनवायला कुणालाच लाज वाटली नाही. आपल्या नावात आईचं नाव लावणाऱ्या काहींनी इथं आपण मनातून कसे आहोत हेही दाखवून दिलं.
तेव्हा मात्र हे सगळं बदलण्यासाठी काय करायला हवं हा विचार आमच्या उमेद टीमच्या मनात घोळू लागला. आणि आशय गुणे या उमेद टीममधल्या समंजस मुलाने 'चला, मुलगे घडवूया' हा विषय सुचवला. टीममधल्या काहींनी याविषयी लिहिलंच शिवाय उमेदसाठी म्हणून बऱ्याच जणांनी या विषयावर त्यांच्या घरात काय चर्चा झाली, त्यांच्या घरातील मुलांचे स्त्रियांविषयी विचार काय आहेत, ते घडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते लिहून पाठवलं.
या सगळ्यातून बऱ्याच टीप्स समोर आल्या. ज्यांच्या घरात लहानगी मुलं मुली दोघेही मोठी होताहेत त्यांच्यासाठी या टीप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलांशी मोकळा संवाद हवा.
शंका, प्रश्न न टाळता समजतील अशी उत्तरं द्यायला हवीत.
घरात आई बाबा दोघांनी मिळून कामं केली तर मुलांवरही ते बघून असंच करायला हवं हे संस्कार सहज होतात. वेगळं सांगावं लागत नाही.
खेळाबाबतही हे खेळ मुलींचे, हे मुलांचे असं वर्गीकरण न करता मुलालाही भातुकलीची आवड कशी निर्माण होईल हे पाहायला हवं.
वाईट वाटलं, मन भरून आलं तर रडलं तरी चालतं, पण मन मोकळं करायला हवं हे मुलांनाही आवर्जून सांगायला हवं.
मुलांचे मित्रमैत्रिणी कोण हेही पालकांना माहीत हवं.
निर्णयही आईचं मत विचारात घेऊन घेतले जातात हे मुलांसमोर घडायला हवं. कुटुंबातल्या पुरूषांना सर्व स्त्रियांविषयी आदर असणं. रंगरूपापेक्षा गुण, कतृत्त्वाला महत्व.
या मालिकेत एकूण 17 पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या. पुरुष पालकांपैकी 5 बाबा लोकांनी मालिकेसाठी लिहिलं. तर 9 आयांनी लिहिलं. विशेष म्हणजे एका आजींनी त्यांच्या नातवंडांविषयीही लिहिलं. मालिकेतलं सर्वच जण विविध क्षेत्रातले आहेत. काही वकील आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, पत्रकारितेतले आहेत तर डॉक्टर आईही आहेच.
हैद्राबाद रेपवरच्या प्रतिक्रियांत हे रोखण्यासाठी काय कारावं, कसं करावं यावर चर्चा खूप झाली. पण, आम्ही पालक म्हणून काय जबाबदारी पार पाडलीये याबद्दल चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटलं. कारण, आम्ही चांगली बाजू लोकांपुढे आणत असते. आमच्याच टीममध्ये मृणालिनी, लताचा नवरा संदीप परब, जालन्याचे उमेद प्रतिनिधी अनंत साळी, नाशिकची चारूशीला, मुंबईची मेघना असे कितीतरी जागरूक पालक आहेत, हे जाणवलं. त्यांनीही लिहिलं आणि ही मालिका सिद्ध झाली. यातून नव्या पालकांना मुलं वाढवताना मदत झाली आणि मुलं वयात येणाच्या टप्प्यातल्या पालकांना दिशा मिळाली हा हेतू साध्य व्हावा, हीच इच्छा.
- वर्षा जोशी - आठवले