Tuesday, 5 September 2017

पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत शिकण्याची कला आहे

प्रवास पालकत्वाचा :
"Having a child is like getting a tattoo ... on your face. You better be committed."
—"Eat Pray Love" by Elizabeth Gilbert
पालक होऊ पाहाणाऱ्या आणि पालक असणाऱ्या प्रत्येकाने हे वाक्य डावीकडून उजवीकडे निदान तीन वेळा वाचावं. तुम्ही कितव्यांदा पालक बनणार, तुमच्या घरात कोण असतं, तुमचं चिंगरं मुलगा की मुलगी, तुमच्या दोन मुलांत किती वर्षांचा फरक आहे, तुमचा तसंच मुलांचा स्वभाव या आणि अश्य़ा किती तरी गोष्टींवर या टॅटूचा रंग, आकार, चित्र अवलंबून असतो. पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत वाढत वाढत शिकण्याची कला आहे. तरीही समाजशास्त्रज्ञांनी पालकत्वाच्या होयबा पालक (जेली फिश पॅरेन्ट्स), आदर्श पालक (टायगर पॅरेन्ट्स), मालक पालक (डॉल्फीन पॅरेन्ट्स) आणि कोरडे पालक (ऑस्ट्रीच पॅरेन्ट्स) अश्या काही टेम्प्लेट तयार केल्या आहेत. स्वतःकडे डॊळसपणे बघितलं किंवा काही छोट्या परीक्षा दिल्या की तुम्हाला तुमची टेम्प्लेट सहज समजते.
तेरा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पालक झालो तेव्हा मुलाला असंच वागवायचं किंवा आपली पालकत्वाची अमूक एक टेम्प्लेट आहे असं कुठं डोक्यात नव्हतं. आमच्या पालकांची आम्हाला वाढवायची पद्धत आणि आम्हाला आदर्श वाटणारी काही आई-बाबा मंडळी यांचं बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस असं काही तरी आपण वागू असं कुठं तरी सबकॉन्शसली वाटायचं. नऊ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा पालक झालो, तेव्हा आमचे पालकत्वाचे ठोकताळे बऱ्यापैकी तयार होते, त्याचा हा सारांश.
माझा थोरला तेव्हा सहा-सात वर्षाचा असेल. रोज रात्री एक गोष्ट सांगायची असा आमचा अरेबियन नाईट्सचा प्रयोग सुरु होता. त्यात कधी तरी ’श्यामची आई’ उगवली आणि तिसऱ्याच दिवशी श्य़ाम हा एक नंबरचा बावळट मुलगा असणार असं माझ्या मुलानं जाहीर करुन टाकलं. कडेलोट म्हणजे ’सिनेमा बघणं वाईट असतं रे बाळा’ असं वाक्य कुठल्याश्य़ा गोष्टीत आलं आणि महीन्यातून सरासरी एक सिनेमा बघणाऱ्या वाईट्ट लोकांनी श्य़ाम आणि त्याच्या आईला कुठल्याश्य़ा कपाटात कायमचं कैद करुन टाकलं. मुलांमध्ये व्हॅल्यु सिस्टीम (चारित्र्य हा फारच मोठा शब्द!) निर्माण करायची तर श्यामच्या आईच्या हातचा तयार काढा उपयोगाचा नाही हे तेव्हाच लक्षात आलं. चांगलं-वाईट, चूक-बरोबर, खरं-खोटं यांच्या संकल्पना मुलांच्या मनात पालक काय बोलतात, कसं वागतात यावरुन तयार होतात. घरात त्यामुळे चौघांसाठीही नियम तेच असतात. जे मुलांसाठी वाईट, ते आम्ही करत नाही आणि ज्या गोष्टी आम्हाला मान्य असतात त्या साठी आम्ही मुलांना आडवत नाही. यात घरी परत येण्याच्या वेळेपासून खाण्याच्या सवयीपर्यंत, लोकांशी वागण्याच्या पद्धतीपासून रीतीभातीपर्यंत सगळ्या गोष्टी येतात.
स्क्रीन टाईम हा आजच्या पालकांचा काळजीचा विषय. टीव्ही, टॅब, स्मार्टफोन यांचा चक्रव्युह भोवंडून टाकणारा आहे. व्यसनाच्या पातळीवर गेलेलं मोबाईल गेमचं, सोशल मिडीयाचं वेड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या घरोघरी दिसतात. दुर्दैवाचा भाग म्हणजे या समस्या आहेत याचं भानही कित्येक पालकांना नाही. आमच्याकडे मुलांचा टॅब फक्त उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्यासुट्टीत बाहेर निघतो. त्यावर लॉग-ईन आमच्या ईमेल आयडीने असल्यानं आम्हाला मुलं काय डाऊनलोड करतात हे लगेच कळतं. थोरल्याकडे क्लासला जाण्यापुरता फोन असतो आणि सगळ्यांच्या फोनचे स्क्रीन लॉक एकाच किल्लीने उघडतात. आमच्या सोसायटीत खेळायला भरपूर जागा आणि मुलं आहेत. त्यामुळं आमच्याकडे खरेखुरे सबवे सर्फर दिसतात आणि सोबतच फुटबॉल आणि क्रिकेटचा घमासान. मुळात आम्हाला सिनेमे पाहायला आवडतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्ही घरी किंवा बाहेर एखादा सिनेमा नक्कीच बघतो. पण आठवडाभर आमचा टीव्ही रोज जेमतेम तासभर चालतो.
आम्ही लहानपणी केलेल्या काही गोष्टी मुलांमध्ये उतरलेल्या बघतो तेव्हा जनुकांच्या चिवटपणाचं कौतुक वाटतं. धाकट्यानं नुक्तंच अवांतर वाचन सुरु केलय पण थोरला भरपूर वाचतो. त्यांना लायब्ररी तर आहेच शिवाय आम्ही त्यांना पुस्तकांच्या दुकानात तासंतास सोडून देतो ते निराळंच. प्रत्येकाची आदर्श पालकत्वाची व्याख्या निराळी असते. आम्हाला जमलेल्या आणि न जमलेल्या गोष्टीं आम्ही मुलांसमोर ठेवतो. त्यातलं त्यांना जे आवडतं, जे जमतं ते त्यांनी निवडावं. आमच्या प्रतलापल्याडच्या त्यांच्या आवडींना आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ते कधी जमतं तर कधी साफच फसतं. पण यात संवादाची एक नवीन शक्यता नक्कीच दडलेली असते.
आम्ही दोघंही छोट्या शहरांत वाढलो, मोठे झालो, आमच्या संवेदना महानगरीय नाहीत. शहरातली नाती, दैनंदिन ताण, अंतरं, व्यवहार, सोई न् प्रश्न या आणि इतर अनेक गोष्टी आमच्या पालकत्वाच्या व्याखेत डोकावत राहिल्या. पालक म्हणून काही गोष्टी ठरवून केल्या गेल्या तर काही चुकतमाकत शिकत गेलो. काही गोष्टी ठरवूनही जमल्या नाहीत तर काही पार चुकल्याच. या चर्चा कधी मोकळेपणानं होतात तर कधी वैतागून. हे स्वतःला असं वारंवार चाचपून पाहाणं मात्र गरजेचं. शेवटी हा प्रश्न चेहऱ्यावर गोंदवलेल्या टॅटूचा आहे!
 संवेद गळेगावकर

Sunday, 3 September 2017

चौसष्ट घरांचा राजा



बुद्धी आणि जिद्दीची मैत्री झाली कि काय होऊ शकतं हे शैलेश नेर्लीकरकडे पाहून कळतं. शैलेशची पहिली ३ वर्ष अगदी बाकी मुलांसारखीच गेली. नंतर वडीलांची जोहेवरून सोळांकूर ता.राधानगरी जि.कोल्हापूर इथं बदली झाली आणि चित्रंच पालटलं. सोळांकूरला नदीच पाणी नळांना येतं. ते अत्यंत प्रदुषित. त्यामुळे लहानगा शैलेश वारंवारं आजारी पडू लागला. प्रतिकार शक्ती कमी झाली. कोल्हापूरातील बालरोगतज्ञांना दाखविलं. शरीरात कँल्शीयम कमी असेल म्हणून त्यांनी कँल्शीयम सिरप, टँल्बेट आणि इंजेक्शनचा मारा सुरु केला.
शैलेशचे वडिल मधुकर नेर्लीकर हे शिक्षक. शेतकरी कुटूंबातील मुलांनी शिक्षण घ्यावं ही त्यांची इच्छा. त्यासाठी आसपासच्या गावात घरोघरी जाऊन ते पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत. आणि मुलामुलींना शाळेत आणत. वडिल असे शाळेच्या कामात अडकलेले. त्यामुळे शैलेशच्या आईनेच त्याच्या दवाखान्याच्या वाऱ्यांची जबाबदारी घेतली. कँल्शीयमच्या अतिरिक्त मात्रेमुळे शैलेशचं खाली बसायचं बंद झालं. शरीरावर कँल्शीयमच्या गाठी उठू लागल्या. उपचारासाठी मिरज, मुंबई गाठलं पण काही उपयोग झाला नाही. साताऱ्याला जाऊन आयुर्वेदिक उपचार घेतले पण जैसे थे. सतत हॉस्पिटलमुळे शाळा बंद झाली. मग आईनेचं घरी शिकवायला सुरुवात केली.



साधारण १९८५ चा हा काळ. शैलेश आठ वर्षाचा झाला. याच काळात शेजार घरी जाऊन त्याला बुद्धीबळाचा खेळ पाहण्याचं वेडं लागलं. एका शेजाऱ्यांनी त्याला बुद्धीबळ शिकविलं. मोठा भाऊ महेश बुद्धिबळातला सोबती झाला. आता सगळे उपचार थांबवून १५ वर्ष झाली होती. २०००साली शैलेशची बहीण कोल्हापुरात बी.एस्सी करत होती. तिची मैत्रीण गीतांजली हिची ताई चंद्र्मुखी गरड आयुर्वेदिक डॉक्टर. शैलेशविषयी कळल्यावर त्या त्यांचे आर्युवेदाचार्य डॉ.विवेक हळदवणेकर यांना घेऊन घरी आल्या. त्यांनी त्याला तपासलं आणि फी न आकारता उपचार सुरु केले. स्वेह्न-स्वेदन आणि औषधोपचारांमुळे शैलेशच्या शरीरात आठवड्याभरातच चांगला फरक पडला. शरीरावरील गाठी विरघळून गेल्या. गाठीमधून कँल्शीयमचे चिंचोक्यापासून ते हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराचे खडे निघायचे. एकएक जखम सहा महिने बरी होत नसे. डॉ. चंद्र्मुखी गरड यांचे सतत उपचार चालूच होते.



डॉ.विवेक हळदवणेकर यांच्या प्रेरणेमुळे बुद्धीबळ हेच शैलेशच्या आयुष्याचं ध्येय झालं. आज आपल्या देशात तर शैलेशने विविध स्पर्धा गाजवल्या आहेत. पण मलेशिया, जर्मनीतही त्याने आपलं बुद्धीबळावरचं प्रभुत्व दाखवलं आहे. दोन्ही वेळा परदेश स्पर्धेचा सर्व खर्च बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, बारटी यांनी केला. आतापर्यंतच्या पुरस्कारात २००८ साली मिळालेला राजश्री शिव-शाहू पुरस्कार शैलेशसाठी खूप महत्वाचा आहे.
आज शैलेशच्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आहेत. १०-१५ मिनिटांच्या वर त्याला उभं राहता येतं नाही. व्हीलचेअरशिवाय तो बसू शकत नाही. झोपूनचं खेळावं लागत. स्वतःचं विकसित केलेल्या तंत्राने तो खेळतो. सुरवातीला घोडके सरांनी त्याला मार्गदर्शन केलं. त्याला गरज आहे ती दररोज २-३ तासाच्या प्रशिक्षणाची. पण प्रशिक्षकाची फी परवडणारी नाही. कागलचा राजर्षी शाहू साखर कारखाना गेली १२ वर्षे त्याला 3 हजार रुपये महिना शिष्यवृत्ती देत आहे. त्यांतच सर्व खर्च जमवण्याचे त्याचे प्रयत्न आहेत.
आई आणि बुद्धिबळाचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद त्याचं प्रेरणास्थान. २०१६ मध्ये त्याला विश्वनाथन आनंदला भेटायची संधी मिळाली. त्याचे वडिल मधुकर नेर्लीकर आता मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. मोठा भाऊ महेश शिक्षक आहे तर बहिण सुनिता नेर्लीकर-क्षीरसागर तहसीलदार आहे. नेर्ली गावची सरपंच असलेली आई हे सगळेच त्याच्या पाठीशी आहेत.
वयाच्या २५ व्या वर्षी शैलेश व्यावसायिक स्पर्धेकडे वळला. “खेळामुळे मानसिकता बदलते, कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं रहाण्याची सवय होते. आपल्या लक्ष्यावर नजर ठेवली तर अशक्य काहीचं नाही”, असं शैलेश सांगतो. नकारात्मकता, आत्महत्या अश्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, हेच शैलेशचं सांगणं आहे. परिस्थितीमुळे निराश न होता आनंदी, सकारात्मक रहावं ह्यावर शैलेशचा पूर्ण विश्वास आहे. शैलेशला आता "Grand Master" व्हायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे नवीन खेळाडूंना प्रशिक्षित करायचं, घडवायचं आहे.
– मेघना धर्मेश.

निर्माल्यातून इथं बनतंय खत

परभणीतली आनंदालय मानव विकास सेवा संस्था. मागील 10 वर्षांपासून या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गणेश मुर्तीपुढे जमा होणारे निर्माल्य गोळा करत आहेत. या वर्षीच्या गणेशोत्सवात तसंच नवरात्रोत्सव काळातही तो राबविण्यात येणार आहे. पुजेनंतर विसर्जित झालेली फुले, पाने, हार, दुर्वा, हळदी-कुंकू, बेल, प्रसाद आदी निर्माल्य पायदळी तुडवलं जातं. तसंच ते नदी, नाले, विहीर, कालवा आदी ठिकाणी विसर्जित केलं जातं. त्यामुळे पाण्याच्या प्रदुषणाचा गंभीर प्रश्नक निर्माण होतो. हे टाळण्यासाठी संस्थेने हा उपक्रम सुरु केला.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सच्चिदानंद कुलकर्णी म्हणाले की, “यंदा परभणीतील सर्व गणेश मंडळांना निर्माल्य कुंड्यांचे संस्थेतर्फे वितरण करण्यात आलं आहे. अनंत चर्तुदशीच्या दिवशी सर्व मंडळांकडून निर्माल्य जमा केलं जाईल. त्याचं कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे.” या उपक्रमात अॅनड. कुलकर्णी यांना टोपाजीराव फुलपगार, नरेंद्र शुक्ल , ओंकार धर्माधिकारी, धनंजय शुक्लम, विकास देशपांडे, अनंतराव महाजन, विनायक महाजन, मिलींद देशपांडे, मिलींद देशपांडे, दिलीप पदमवार, ओंकार पाटील, चेतन पावडे, बालाजी गाडगे, संजय पाठक, सुमेध कुलकर्णी यांची मदत होते आहे.
सार्वजनिक गणेश मंडळात दररोज हार, दुर्वा, हळद, गुलाल अर्पण करण्यात येतो. भाविकांची संख्या जेवढी अधिक तेवढी हार फुलांची संख्याही वाढत जाते. ही फुले व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने गणेश भक्तांच्याच पायदळी तुडविलं जाऊ शकतं. त्यामुळेच आनंदालय संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम महत्वाचा आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून जमा झालेलं निर्माल्य शेवटच्या दिवशी गोळा करतात. त्यानंतर ते निर्माल्य शहरापासून दूर शेतामध्ये शेणामातीच्या मिश्रणासह एका खड्यात पुरलं जातं. एक-दीड महिन्यानंतर हेच निर्माल्य खत म्हणून शेतकरी आणि इतरांना दिलं जातं.
आता या उपक्रमाला गणेश मंडळांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी जवळपास 15 क्विंटल निर्माल्याचे संकलन आनंदालय संस्थेने केले होते. अॅतड. कुलकर्णी यांना निर्माल्य संकलनाची प्रेरणा वडिलांपासून मिळाली. त्यांचे वडिल प्रभाकर कुलकर्णी हे घरातील निर्माल्य शेतात पुरायचे. एरवीही चांगल्या कामाची सुरूवात गणेशाला वंदन करून केली जाते. त्यामुळेच निर्माल्य संकलनासाठी गणेशोत्सवाची निवड केल्याचं त्यांनी सांगितले.

- बाळासाहेब काळे.

Friday, 1 September 2017

‘माई’चा शिक्षणाचा मार्ग झाला खुला!


रायगड जिल्ह्यातील रोहा. इथल्या संतोषनगरमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे. याच भागात 2016 च्या डिसेंबर महिन्यात वाघमारे कुटुंब राहायला आलं. आई- वडिल, तीन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब. आदिवासी कातकरी समाजातील हे कुटुंब संतोषनगरच्या परिसरात छोटीशी झोपडी टाकून राहू लागलं. आणि लवकरच रूळलं. कारण इथं कातकरी समाजाची भरपूर वस्ती आहे.
किसन वाघमारे आणि त्यांच्या पत्नी शेतावर मजुरीला जाऊ लागल्या. नवं कुटुंब गावात आलं आहे. पण त्यातील मुलं शाळेत येत नाहीत, हे शाळेचे शिक्षक गजानन जाधव सरांनी हेरलं. त्यांनी मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी मॅडमसह झोपडीवर जाऊन वाघमारे पती-पत्नींची भेट घेतली.
वाघमारे कुटुंबाने शिक्षकांचे स्वागत केलं. आठ वर्षांचे माई आणि करण शाळेत का येत नाहीत, या प्रश्नाला गरिबीमुळे आमच्या घरातील कोणीच कधीच शाळेत गेलेले नाही, इतकंच उत्तर पालकांनी दिलं

मुलांनी शाळेत आलंच पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. मुला-मुलींना मोफत शिक्षण आहे. पाठ्यपुस्तकेही मोफत मिळतात आणि माध्यान्ह भोजन योजनाही आहे. शिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते, हे शिक्षकांनी सांगितलं. शिक्षकांचं बोलणं ऐकून पालकांनी माई आणि करणला डिसेंबरमध्येच शाळेत दाखल केलं.
पण पहिल्या दहा दिवसातच माईने शाळेला दांडी मारली. जाधव सरांनी ‘आजारी असेल’ असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण 2017 साल उगविलं तरी माई काही शाळेत येईना. तेव्हा अस्वस्थ झालेल्या जाधव सरांनी पुन्हा कुलकर्णी मॅडमसोबत वाघमारेंची झोपडी गाठली.
लहानगी माई मळलेला गणवेष घालून बहिणींना खेळवत बसली होती. “का गं, माई शाळेत का येत नाहीस?” असे सरांनी विचारताच, “येऊशी वाटते, पन आवशी न्हाय बोलते.” असं उत्तर त्या चिमुरडीने दिलं. “माईला शाळेत का पाठवत नाही?” विचारल्यावर तिची आई म्हणाली, “बाई, तुमच्या सांगन्यावरून साळंला पाठिवलं एक डाव. पर आता मलाबी कामासाठी भाईर जावं लागतंय. माईबी साळंला आली तर ल्हान्ग्या दोगींना कोन सांबाळणार? मला कामाला जावंच लागतंया बगा. न्हायतर खायाचं काय? पोरीच्या जातीला काय करायचंय सिकशान? पोराला पाठीवतीय की साळंला!!”
हे ऐकून कुलकर्णी मॅडमनी मुलग्यांसोबत मुलींचं शिक्षण गरजेचं आहे, हे समजावून सांगितलं. मुलगी ही मुलग्यापेक्षा कुठेच कमी नसते. शिक्षण घेतलं तर नोकरीही मिळेल. शिवाय पाचवीपर्यंतचा माईचा वह्या, पेन-पेन्सिलीचा, कपड्यांचा खर्च, हा सगळा वरखर्च मी स्वत: उचलेन, असं वचन कुलकर्णी मॅडमनी दिलं.
दुसरीकडे लहानग्या बहिणींचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी जाधव सरांनी घेतली. संतोषनगरच्या शाळेत अंगणवाडी नाही, मात्र तरीही माईच्या दोघा बहिणींना सांभाळण्याची ग्वाही सरांनी दिली.
आता माई आणि करण दररोज शाळेला येतात. त्यांच्या लहानग्या बहिणी तिच्या वर्गाजवळच एका सतरंजीवर दिवसभर खेळतात. तिथंच त्यांना माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं जेवण आणि मधल्या वेळेला बिस्किटं मिळतात. आता माईच्या चेहऱ्यावरचं अकाली मोठेपण दूर होऊन ती हळूहळू तिच्या वयाच्या मुलांमधे मिसळून खेळू लागली आहे. 


लेखन: छाया वर्तक.

Thursday, 31 August 2017

त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :  विवेक नवरे यांना मला आदरार्थीच संबोधायचंय खरं तर, पण याला त्यांचा तीव्र नकार. मैत्रीत वयाच्या लहानमोठेपणाला कशाला आणायचं असं त्याचं म्हणणं. मला आधी ते अवघड गेलं, पण आता सवय करतेय. म्हणून त्यांच्याबद्दल लिहिताना आदर ठेवून एकेरीत येतेय. - तर मला अगदी पहिल्यांदा फोन आला तेव्हा विवेक म्हणाला, ‘‘सोनाली, तुझं ‘ड्रीमरनर’ वाचून माझ्यातली चिकाटी आणखी थोडी जागी झालीय. काही युक्त्याही मिळाल्यात त्यातून. तुझ्या ऑस्करसारखाच जे आकाराचा पाय लावून मी मुंबईत नुकताच ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ला धावलोय. आता कोल्हापुरात येतोय. भेटूया. - तू प्रत्यक्षात हा ‘कार्बन फ्लेक्स फूट’ पाहिला नसशील तर तो दाखवतो.’’
२०१३ मध्ये कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या मॅरॅथॉनमध्ये सामील होण्यासाठी विवेक आला होता. झालं असं होतं की त्याचं ‘ऑटोबॉक’ प्रायोजित मुंबईतल्या मॅराथॉनमधलं धावणं ‘झळकलं’ तेव्हा ते कोल्हापुरातल्या भूलतज्ज्ञ असणार्‍या डॉ. किरण भिंगार्डे यांच्या पाहण्यात आलं. अशा माणसाला धावताना कोल्हापूरकरांनीही पाहायला हवं म्हणून डॉ.भिंगार्डे यांनी आयोजकांच्या वतीनं विवेकला निमंत्रण दिलं. या मॅराथॉनमध्ये वाहतुकीचा भर असणार्‍या रस्त्यावरून जवळपास तीन किलोमीटर अंतर एका कृत्रिम पायासह एका तासात विवेकनं पार केलं. पुढं चेंबूरमधल्या मॅराथॉनमध्ये तर ५ किलोमीटर धावला तो आणि मुंबई महापौर सायक्लॉथॉनमध्ये विशेष व्यक्ती म्हणून ३ किलोमीटर अंतर सायकलनं कापायची सवलत असताना ‘जाऊन तर बघू’ म्हणत त्यानं एकूण १६ किलोमीटर सायकल चालवली नि बक्षीस मिळवलं. - पण या टप्प्यापर्यंत येईतो विवेकनं स्वत:ला प्रचंड कष्टवलंय. रक्ताळून घेतलंय.
ऑक्टोबर १९९०. डोंबिवलीत डेअरी व्यवसायानं नावारूपाला आलेला साधारण सत्ताविशीचा विवेक असाच रस्त्याच्या बाजूला अगदी सुरक्षित अंतरावर उभा होता इतक्यात समोरून एक ट्रक येताना त्यानं पाहिला. बघता बघता क्लिनरच्या बाजून ट्रक त्याच्या डाव्या पायाला घासून गेला नि त्या फटक्यात पायाची पोटरी नि नडगी जवळपास लोंबकाळू लागली. तुटलीच. त्वचेच्या पांघरूणामुळं हे सगळं बाहेर न येता लटकत राहिलं. अपघात झाला तेव्हा विरुद्ध दिशेला झेप गेल्यामुळं पाय संपूर्ण तुटला नाही किंवा जीव गेला नाही इतकंच. जवळच्या हॉस्पिटलमध्ये लोकांनी नेलं तेव्हा त्यांनी उपलब्ध सुविधेनुसार प्लास्टर स्लॅब घातला, जवळपास तीस बाटल्या रक्त लागलं नि ४८ तासांनी केईएम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. त्यानंतर जबरदस्त फटका बसला संसर्गाचा. या क्षेत्रात चिकित्सेतील कौशल्यामुळं अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ.अरविंद बावडेकरांचं नाव कुणी सुचवल्यावर विवेक तिकडं गेला. डाव्या पायाच्या घोट्यापासून ते मांडीपर्यंत जवळपास १३ किलो वजनाच्या स्टीलच्या स्क्रूंचा भार सांभाळत विवेक चिकाटी ठेवून होता याचं कारण डॉ.बावडेकरांचा विश्वास! २ महिन्यांनी हे स्क्रू फिक्सर काढले, प्लास्टर उरलं. मात्र जवळपास दोनअडीच वर्ष दर तीन आठवड्यांनी एक्सरे काढून स्थिती तपासायची व नवं प्लास्टर चढवायचं चालू राहिलं. पाय असा प्लास्टरमध्ये अडकल्यामुळं पाऊल सुजायचं, केशवाहिन्या व रक्तवाहिन्या हालचालीअभावी गोळा झाल्या होत्या त्या ठणकायच्या. संसर्ग त्यामुळं ताप हे चक्र चालूच. पाय वाचवायचे सगळे उपाय थकल्यामुळं शेवटी (१९९६) डॉ.बावडेकर म्हणाले, ‘विवेक, मी कोनिकल शेपमध्ये पाय ऍम्प्यूट करतो. त्यानंतर कृत्रिम पाय वापरून तुम्ही धावाल असं काही मी म्हणणार नाही, पण औषधं, ताप हे सगळं चक्र थांबेल.’ - या सगळ्या काळात झालेला खर्च विवेकनी स्वत:च्या कमाईतून केला होता. आता पुढचं पाहायलाच हवं होतं. पण मन नाराज होतं की हे सगळं करून अखेर काय फायदा? - मात्र ही मनोवस्था काहीच क्षण टिकली. त्यांनी डॉक्टरांना होकार दिला... डावा पाय गुडघ्यापासून काढण्यात आला. दोन महिने आराम करून विवेकनं निष्ठेनं फिजिओथेरपी सुरु केली. यातून काहीतरी भलं होणारे म्हणत थकवलं स्वत:ला. १९९७ ला कृत्रिम पायानं विवेक चालायला लागला. त्याचा सराव तोंडात बोटं घालायला लावेल असा... दादर स्टेशनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत ४-६ वेळा किंचित टेकत जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतर चालून हा पठ्ठ्या फॉलोअपसाठी पोहोचायचा! डॉक्टर नि ज्यांच्याकडून कृत्रिम पाय घेतला ते मि.नेगी दोघंही म्हणाले, ‘‘नवरे, तुमच्यासारखे तुम्हीच!’’
आज, अशा अपघातानं धक्का बसलेल्या-खचलेल्या, अवयव गमावलेल्या माणसांच्या खाचखळग्यांच्या प्रवासात खारीचा वाटा उललण्यासाठी विवेक पदरमोड करत पोहोचतो व पुढचा प्रवास निराशाजनक नाहीये हे समजावतो. लागेल ते मार्गदर्शन करतो. मागच्या वर्षी त्यानं रिक्षा घेतली. का? - तर अशा पेशंट्सना गावातल्या गावात फिजिओथेरपीसाठी योग्य वेळेत सोडणं, आणणं याकरिता इतर वाहनांवर अवलंबून रहायला नको म्हणून! विवेक गप्पिष्ट... मनानं स्वच्छ पण थोडासा कडक बोलणारा. का करावं वाटतं हे सगळं विचारल्यावर एरवी लांबलचक बोलणारा विवेक लांबड न लावता सांगतो- ‘‘जी मदत मला मिळाली असती तर माझा प्रवास सोपा झाला असता अशी मदत मी इतरांना करतो, त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून!’’
- सोनाली नवांगुळ

Tuesday, 29 August 2017

प्रिय अगस्ती



प्रिय अगस्ती,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा.
महाराज, अरे तू जन्मलास, एकेका वर्षानं मोठा होत गेलास. आणि आता तू पूर्ण अठरा वर्षांचा झालायस! किती दिवसांत तुला पत्र लिहिणं झालं नाही. आज मुद्दाम लिहितो आहे. पालकत्व म्हणजे नेमकं काय असतं, हे नीटसं समजलेलं नसताना छोट्या मोठ्या प्रसंगातून, घटनांतून तू आम्हाला काही नवं शिकवत राहिलास. पालक म्हणून घडवत राहिलास.
आपली साथसोबत अठरा वर्षांची कधी झाली, हे कळलंच नाही. तुझं आमच्या आयुष्यात येणं ही गोष्टच केवढी सुंदर होती आणि हे. तुझं आनाव अगस्ती. अवकाशातल्या एका ताऱ्याचं नाव. खगोल भौतिकशास्त्र तुझ्या आवडीचं, हा योगायोग! दंडकारण्यातला पहिला शेतकरी अगस्ती. आपण शेतकरी, कष्टकरी समाजातून आलेलो. त्या परंपरेशी नातं सांगणारं नाव! गणित, विज्ञानाचा तू विद्यार्थी आहेस. चिकित्सक आहेस. सतत प्रश्न विचारत आलास. आम्ही जमतील तशी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत आलोय. कोणतीही वस्तू घेताना तू किती बाजूंनी विचार करत असतोस. या बाबतीत आपले मतभेद होत. पुढं मात्र मी बॅकफूटवर गेलो. कारण मला हे समजलं होतं,की तुझ्या मनातल्या शंका मिटेपर्यंत तू काहीच मनापासून स्वीकारत नाहीस.
लहानपणी हातात पुस्तक घेतलं की ते संपवताना आम्ही झोपी गेलो, तरी तू एकटा जागायचास. हे सारं तू दुसरी-तिसरीत असताना. तुझ्या वाचनयोगाने घरातली आपली लायब्ररी समृद्ध होत गेली. पुस्तकांनीच तुला स्टिव्ह जॉब्ज, थोर गणिती रामानुजन आणि यांसारख्यांच्या प्रेमात पाडलं. अगदी वाचायला यायला लागल्यापासून तू वृत्तपत्रं वाचत आला आहेस.
‘अमूकच कर’ असा आग्रह आम्ही तुला कधीच केला नाही. अगदी लहान असल्यापासून तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य करत आम्ही पुढं गेलो. विज्ञान तुझ्या खास आवडीचं. विज्ञान प्रदर्शनात तू भाग घ्यावास, असं आम्हाला मनापासून वाटे. “कोणीतरी तयार करून दिलेलं मॉडेल मी बाहुला बनून मांडणार नाही. मला काहीतरी भारी सुचलं तर मांडीन”, असं बाणेदार उत्तर देऊन तू मला पूर्णपणे निरुत्तर केलं होतंस! तू इंटरमिजीयटसाठी चित्र काढत होतास. बहुतेक मुलं हॉलबाहेर आली होती. मी तुला शोधत आलो. तेव्हा हॉलमधल्या तुझ्या बाकाभोवती मुलांनी गर्दी केली होती. तू दंग होऊन चित्र काढत होतास. वाव...असं म्हणत मुलं तुला दाद देत होती. चौथी, सातवीत शिष्यवृत्त्या मिळवल्यास. मी रानवेडा माणूस. माझ्याबरोबर तू जंगलात भटकायला येऊ लागलास. तूदेखील जंगलाच्या प्रेमात पडलास. माझ्या हातातला कॅमेरा नकळत तू तुझ्या हातात घेतलास. रानातले भन्नाट फोटो घेऊ लागलास. निसर्गात हिंडताना पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील बनलास. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना, समजून घेताना ती अगदी मनापासून, खोलात जाऊन कशी समजून घ्यावी याचा वस्तूपाठ तू अनेकदा दाखवून दिलास. शिक्षक म्हणून वर्गात शिकवत असताना अडचणी आल्यावर तुला फोन लावला की, तू लगेच रस्ता दाखवायचास.

मला आठवतं, भारतानं सोडलेलं मंगळयान मंगळ ग्रहावर उतरलं होतं. सातवीतल्या मुलांनी दुसऱ्या दिवशी ‘यान मंगळावर कसं गेलं?’ असं विचारलं. मला कसं सांगावं, हेच समजेना. तेव्हा ‘बेंचेस बाजूला सरकवून वर्गात फरशीवर अशी आकृती काढून दाखवा, म्हणजे मुलांना समजेल,’ असं तू सुचवलंस आणि केवळ मुलंच नाहीतर आम्ही शिक्षकदेखील ते नीटपणे समजलो. माझ्या पालकत्वाच्या प्रवासादरम्यान माझ्यातला शिक्षकदेखील समृद्ध होत गेला. कसं वागलेलं मुलांना आवडतं? कसं नाही? याचा उलगडा तुझ्यामुळे नेमकेपणाने होत गेला. अनेक पुस्तकं वाचून समजलं नसतं, हे तुझ्यासारख्या मुलानं आम्हाला शिकवलं.
एखादी गोष्ट समजली नाही की त्याचा तुला त्रास होतो. पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही समजत. कधी कधी वेळही लागतो नव्या गोष्टी, अपरिचित संकल्पना समजायला. सगळंच समजलं पाहिजे, यातूनही तुला बाहेर पडायला हवं. तू बुद्धिमान आहेस. पण गुणांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व देशील. पैशाच्या मागे तू धावू नकोस. कारण पैशांच्या मागे धावणारे लोकं सुखी, समाधानी नसल्याचे आम्ही रोज बघतोय. तुझ्याकडं असलेलं ज्ञान, माहिती, कौशल्य भोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी वापरशील तर तुझा आम्हाला जास्त अभिमान वाटेल. अर्थातच हादेखील आग्रह नाहीये. तू तुझा स्वतंत्र आहेस. आयुष्यात आरोग्य फार महत्त्वाचे आहे. पैशांच्या मागे लागलेल्या अनेक लोकांच्या तब्बेतीचा पाढा सुरु झाल्याचं दिसतं. तेव्हा काळजी घे. तब्बेतीला जप. आनंदी राहा! सध्याच्या जगातले ताण-तणाव बघताना असं सतत जाणवतं की, आनंदी राहायला छंद जोपासायला हवेत. माणसांशी नातं जोडावं. गॅझेट्सना जे लोकं सुरक्षित अंतरावर ठेवतील, ते लोकं सुखी असतील! अशी एकूण स्थिती आहे.
ऊन-पावसासारखं सुख-दु:खं असतं. या गोष्टी कोणालाच चुकल्या नाहीत. यश-अपयशही पचवता आलं पाहिजे. आयुष्य कठोर परीक्षा घेतं. धीरानं त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. तुझ्या पिढीची मुलं एखादी गोष्ट नकारात्मक घडली, की फार लवकर निराश आणि नाउमेद होऊन जाता रे. अशा वेळी तुमच्या पिढीची खरेच काळजी वाटते. तू खूप संवेदनशील, जास्त हळवा आहेस. माणूस म्हणूनही उंच आहेस. हे खूप छान आहे. निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही काहीही मनाविरुद्ध घडलं तरी खचून जायचं नाही. कोसळून पडायचं नाही. नवा दिवस नव्या संधी घेऊन उगवतो. जी गोष्ट केल्यानं तुला आनंद मिळतो, अशा आवडीच्या क्षेत्रात तू तुझं करिअर करावंस. बाकी तुझी मर्जी. आता तू कायद्यानं सज्ञान झाला आहे. तू या देशाचा जबाबदार नागरिक बनला आहेस.
स्तूती, कौतुक तुला आवडत नाही. तू नेहमी जमिनीवरच असतोस. इतकं असं लिहिणं तुला कदाचित रुचणारही नाही. तरीही लिहिलं आहे. तू समजून घेशील. कारण आपलं नातं इतकं औपचारिक नाहीचये. बापलेकापेक्षाही आपण चांगले दोस्त आहोत. पुन्हा एकदा तुला आभाळभरून सदिच्छा! तुझ्या लाडक्या स्टीव्ह जॉबच्या भाषेत सांगायचं तर stay hungry stay foolish!
तुझा,
आबा.
भाऊसाहेब चासकर.

Monday, 28 August 2017

रोपट्यांची गणेश मूर्ती



लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करायचं तर गणेशोत्सव हा उत्तम मार्ग. हेच ओळखलं वाशीम शहरातल्या देवपेठ येथील महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने. एक हजार एकशे अकरा रोपट्यापासून दहा फूट उंच गणेश मूर्ती त्यांनी साकारली आहे. ही आगळी वेगळी गणेश मूर्ती बघण्यासाठी शहरातील नागरिकांची एकच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे गणेश विसर्जनानंतर या रोपट्यांचं वाटप भक्तांना करून ती जगवण्याची शपथ दिली जाणार आहे.