Monday, 8 January 2018

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


अति तिथे माती ही जुनी म्हण आजही सुसंगत ठरते आहे. आपल्याला गॅझेट हाताळण्याचं व्यसन लागलेलं आहे. हे कसं ओळखायचं? याची महत्त्वाची खूण म्हणजे त्यात आपला किती वेळ गेला आहे ते न कळणं. लोक कित्येक तास गॅझेट्स वर असतात आणि त्यांना ते समजतही नाही.
यापायी मुलं अभ्यास करत नाहीत, तरुण मुलांना करियर घडवण्याची ही महत्वाची वर्ष आहेत हे लक्षात येत नाही, काहींच्या नोकरी व्यवसायावर गदा येऊ शकते. अशी वेळ येऊ नये म्हणून काळजी घ्यायलाच हवी.
- आपण कोणत्या कामासाठी नेट सुरू केलं आहे हे लक्षात ठेवा आणि काम संपल्याक्षणी मोबाईल लांब ठेवा.
- शक्यतो मोबाईल दुसर्‍या खोलीत ठेवा आणि अभ्यास किंवा काम करण्यासाठी वेगळ्या खोलीत थांबा.
- स्वतःवर अजिबात नियंत्रण राहत नसेल तर घड्याळाचा alarm लावा, हा alarm मोबाईलवर लावू नका. घड्याळाचं ऐका.
- आपला आनंद केवळ नेटमधे लपलेला नाही, हे वारंवार स्वतःला सांगून खऱ्या गोष्टींमधला आनंद शोधण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी नव्या गोष्टी शिका. नव्या ठिकाणी फिरायला जा.
- जबाबदारीची नवी कामं मुद्दाम अंगावर घ्या.
- ज्याप्रमाणे अल्कोहोल किंवा कोकेनचं व्यसन लागल्यावर मेंदूमध्ये परिणाम दिसतात तसेच परिणाम इंटरनेटचेसुद्धा मेंदूवर दिसतात. अल्कोहोल मिळालं नाही तर व्यसनी माणसं जशी बेचैन होतात तसंच काहीसं इथंही घडतं.
- मेंदूतला ग्रे मॅटर म्हणजेच विचार करणारा भाग. 'सायकॉलॉजी टूडे'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार मेंदूत घडलेल्या बदलांची चित्र neuro-imaging तंत्रानुसार पाहिली आहेत. त्यातून जाणवलं की, कायम व्यसनात अडकलेल्या माणसांच्या मेंदूतील ग्रे मॅटरवर परिणाम असतो. जी लहान किंवा तरुण वयातली मुलं सात तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ गॅझेट वापरतात त्यांच्या निर्णयक्षमतेवर, भावनिक नियंत्रणावर परिणाम होतो.

याचा थेट परिणाम माणसाच्या भावनांवर आणि संवेदनांवर होत असतो. ही गोष्ट भावनिक बुद्धिमत्तेसाठी योग्य नाही. याचा परिणाम पुढे शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो.
- गॅझेट्स अतिवापराचा दुष्परिणाम एकाग्रता आणि स्मरणशक्ती यावरही आढळून आला आहे.
- मेंदूमध्ये व्हाइट मॅटर या नावाचा एक भाग असतो. इथूनच चेतासंस्थेतल्या ग्रे मॅटरकडे वागणुकीविषयीचे संदेश दिले जातात. ह्या व्हाइट मॅटरवरदेखील अति इंटरनेट वापराचा दुष्परिणाम दिसून येतो. टीनेजर्स वर झालेल्या अभ्यासातून हे दिसून आलं आहे. वागणुकीवर होणारा परिणाम फार सखोल मानला जातो.
- मनातल्या भावभावनांचा, ताण-तणावांचा, अतिरेकी लैंगिक उद्दीपनांचा, सतत गेम खेळण्यामुळे मिळणाऱ्या उत्तेजनाचा, एकूणच मेंदूला सतत दक्ष ठेवण्याच्या प्रयत्नांचा, आणि पुन्हा पुन्हा मागणी करणाऱ्या डोपामाइनचासुद्धा परिणाम मेंदूला भोगावा लागतो.
- गरज म्हणून फ्री वायफाय दिलं जातं, पण त्यावर बंधने असावीत.
- ज्या लोकांना इंटरनेटवर खूप वेळ रहायची संवय झाली आहे आणि सुटका हवी आहे, त्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन असावी.
- काही शैक्षणिक संस्थामध्ये नेटचा वापर करता येऊ नये यासाठी जॅमर्स बसवलेले असतात. त्याची संख्या पुढच्या काळात वाढवावी लागेल, असं चित्र आहे.
 : डॉ. श्रुती पानसे

इंजिनिअर सरपंच




"मुलगी आहात म्हणून एखादा निर्णय घेण्यास घाबरू नका, घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. यश नक्की मिळेल. फक्त प्रयत्न करणं थांबवू नका." हे बोल आहेत ऋतुजा आनंदगावकरचे. मंजरथ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी नुकतीच तिची निवड झाली.
सरपंच थेट जनतेतून निवडून द्यावयाचा असल्याने २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुका यावेळी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. बीड जिल्ह्यातील जनतेसाठी ही निवडणूक अभिमानाची ठरली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून दोन इंजिनिअर तरुणी सरपंच म्हणून निवडून आल्या. फक्त महिला म्हणून नाही तर उच्चशिक्षित उमेदवार म्हणून गावाने त्यांची निवड केली आहे.


मंजरथ हे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठचे एक संपन्न गाव. धाकटी काशी अशी या गावाची परिसरात ओळख. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदावर ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर निवडून आली. तर माजलगाव जवळील टालेवाडी गावातून सरपंच म्हणून काजल कमलाकर टाले हिची निवड झाली आहे. या दोघीही युवती इंजिनिअर आहेत. ऋतुजाने एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. ती सध्या अहमदाबाद येथे एका संस्थेत एरोनॉटिकल अनालिस्ट म्हणून काम पाहते आहे. तर टालेवाडीची सरपंच झालेली काजल इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून नुकतीच इंजिनिअर झाली आहे.
ऋतुजा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडून आली आहे. तर काजलने महिला सर्वसाधारण जागेवरून विजय मिळवला आहे. दोघीच्या घरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने प्रतिस्पर्धींना पराभूत करणं त्यांना जड गेलं नाही. आता गावाच्या विकासासाठी हिरिरीने पुढाकार घ्यायचं दोघींनी ठरवलं आहे. ऋतुजा सांगते, “आई वडिलांमुळे आमच्या घराला राजकीय पार्श्वभूमी होतीच. सरपंचपदाची निवडणूक लढवण्याचा गावकऱ्यांनी आग्रह केला. माझी नोकरी सांभाळून मला या पदासाठी वेळ द्यायचा होता. घरातून खंबीर साथ मिळाल्याने मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मला निवडून देत गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. समाजासाठी काही तरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आता मला ही संधी मिळाली आहे. मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करते तेथील प्रत्येकाचा मला या निवडणुकीसाठी पाठिंबा होता. त्यामुळे तेथील काम सांभाळून मी हे सरपंच पदाचे काम करू शकेल याची मला खात्री आहे.” ऋजुता पुढं म्हणते, “मी स्त्रीवादी, समानतावादी विचारांची असल्याने सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. मंजरथ गावाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याच मानस आहे. त्याचबरोबर गावातील युवक, युवतींना विविध क्षेत्रातील नोकरीच्या, कामाच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यात किती यश मिळेल हे तर येणारा काळच ठरवेल. पण मी मात्र माझं १०० टक्के योगदान यासाठी देणार आहे.”
काजल टालेवाडीची सरपंच. इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात असतानाच तिला सरपंच म्हणून निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला. आई, वडिलांचा पाठिंबा मिळाला. आणि नोकरीच्या शोधाएवजी तिने निवडणुकीला प्राधान्य दिलं. काजल म्हणाली की, “नोकरी केली तर मी आणि माझे कुटुंबीय एवढ्यांचा फायदा होऊ शकतो. पण सरपंच पदामुळे मला माझ्या गावासाठी चांगलं काम करता येईल. टालेवाडी या छोट्याशा गावातील रस्ते, घरकुल यासारख्या प्रश्नाकडे आपण लक्ष देणार असल्याचं काजलने सांगितलं. गावात सध्या सातवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी मुलींना बाहेरगावी जावं लागतं. किमान १० वी पर्यंत तरी वर्ग वाढवण्यास प्राथमिकता देणार असल्याचं तिने सांगितलं.” करिअर आणि सरपंच पद या दोन्ही जबाबदाऱ्या आपण समर्थपणे पार पाडू असा विश्वास दोघींच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे.
- राजेश राऊत.

Friday, 5 January 2018

इथं मिळतं हसतखेळत शिक्षण

निफाडमधील कोठुरे फाट्याची शाळा आधी वस्तीशाळा होती. या शाळेत सध्या कार्यरत असलेल्या रामदास चोभे सरांच्या वडिलांनी स्वत:ची पाच गुंठे जमीन शाळेला दान केली आणि इथं नियमित जिल्हा परिषद शाळा सुरु झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती बैरागी तीन वर्षांपूर्वी या शाळेत रुजू झाल्या आणि शाळेचं रुप हळूहळू इतकं पालटलं की 2015 साली या शाळेला आयएसओ मानांकन मिळालं.
सुरुवातीपासून बैरागी मॅडम आणि चोभे सरांनी हसत- खेळत, शैक्षणिक साहित्याचा आधार घेत शिकवणं चालू केलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वत:च्या मुलांनाही याच शाळेत दाखल केलं. वारंवार पालकांशी संवाद साधून शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं हे पटवून दिलं. या शाळेने पालक तसेच ग्रामपंचायतीकडून सुमारे अडीच लाखांचा निधी उभारला आहे. त्यात स्वत:ची भर टाकून शिक्षकांनी जमा झालेल्या निधीतून शाळेची रंगरंगोटी, तळफळे, इंग्रजी- मराठी शब्द, तसेच गणिती क्रियांचे आरेखन, स्वच्छतागृहासाठी पाण्याची सोय, पाईपलाईन, अॅक्वागार्ड इ. कामं केली आहेत.
गेल्या वर्षी इंग्रजी माध्यमातील 11 मुलं कोठुरे फाट्याच्या शाळेत दाखल झाली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांवर शिक्षक विशेष मेहनत घेत आहेत. काही शब्द दिले असता त्यावरून विद्यार्थी गोष्ट आणि कविता तयार करतात. उदा. कावळा- आवळा- सावळा- बावळा हे शब्द दिले असता विद्यार्थी खालीलप्रमाणे शीघ्रकविता तयार करतात.
'एक होता कावळा, दिसायचा सावळा|
होता जरा बावळा, पण खायचा तो आवळा||'
दुसरीकडे निफाडमधील सुंदरपूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची हुशारी पाहून चकित व्हायला होतं. या शाळेतील विद्यार्थ्यांचा भूगोल, इतिहास आणि इंग्रजी विषय मुळापासून पक्का करण्याचं संतोष मेमाणे सरांनी ठरविलं आहे. या शाळेतील तिसरी- चौथीचे विद्यार्थी उत्तम नकाशावाचन करतात. सरांनी कार्डबोर्डचा महाराष्ट्राचा नकाशा आणि कार्डबोर्डच्या छोट्या तुकड्यांवर जिल्हे, राज्यातील महत्त्वाच्या नद्या, शिखरं इ.ची नावं टाकली आहेत. विद्यार्थी नकाशावर प्रत्येक जिल्हा बरोबर लावतात. इतकेच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील नद्या, पर्यटनस्थळे, अभयारण्ये सुद्धा मिनिटभरात नकाशात ठेवून दाखवितात. त्यांच्यापेक्षा लहान असणारे दुसरीतील विद्यार्थी अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्याचा नकाशाही तयार करतात.
त्यांच्या वर्गांमधे नाशिकची वैशिष्ट्ये म्हणजे चलनी नोटांचा कारखाना, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र असं सगळं तक्त्यावर लावलेलं आहे. शिवाय प्राचीन काळातील राज्य आणि राजांची नावे, गडांची पूर्वीची आणि प्रचलित नावं, राज्ये आणि त्यांच्या राजधान्या यांचे रंगीत बोर्ड टांगलेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवर मेमाणे सर विशेष मेहनत घेत आहेत. त्यात तळफळ्यावर एखादे इंग्रजी मुळाक्षर लिहून त्यापासूनचे शब्द तयार करण्याचा खेळ, एखादी वस्तू उदा. बाटली हातात घेऊन त्याद्वारे क्रियापदांसकट इंग्रजी वाक्ये तयार करण्याचा खेळ (I am drinking the water, I will throw this bottle, I want to sell this bottle etc.) घेतला जातो. सुंदरपूरच्या शाळेतील चौथीचे विद्यार्थी इंग्रजीच्या सर्व काळात वाक्ये तयार करु शकतात. गाणे आणि नाचातून क्रियापदांचे वेगवेगळे काळ विद्यार्थी शिकतात. शिवाय विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी सरांनी चित्र- शब्दाच्या रुपातली अनेक इंग्रजी कार्डस् तयार करून घेतली आहेत.
- स्नेहल बनसोडे- शेलुडक.

इंग्लीश शिकणे गोडीचे

शहापूरच्या आदिवासी मुलींची यशकथा -
मुंबईजवळचं, तरीही दुर्गम डोंगराळ गाव. तिथली आदिवासी मुलंमुली. एवढं वाचल्यावर, काय चित्र येतं मनात? सोयीसुविधांचा अभाव, शिक्षक नाहीत, मुलांच्या शिक्षणात बरेच अडथळे...वगैरे. पण इथेच, एका शिक्षकाला दिसली संधी. हे शिक्षक इंग्रजी शिकवणारे. आदिवासी भागात इंग्लिश! मुळात आदिवासींची बोलीभाषा मराठी प्रमाणभाषेपेक्षा वेगळी. तिथे इंग्लिश कुठलं यायला? असं मनात येऊ शकतं. पण 2009 पासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे इथे शिकवणारे शरद पांढरे यांनी, बरंच काही घडवलंय. 8 वर्षांपूर्वी, या आश्रमशाळेत 300 मुली होत्या. आता, 568 मुली निवासी राहून शिक्षण घेत आहेत. इंग्लीश भाषा शिकणं त्यांच्यासाठी आनंदाचं झालं आहे, पांढरे सरांमुळेच. विद्यार्थिनींना इंग्रजी भाषा अवगत करणं सोपं व्हावं, यासाठी त्यांना भाषा जास्तीत जास्त ऎकवणं गरजेचं आहे, हे त्यांनी जाणलं. स्वतः शिकवलेले, वाचलेले पाठ स्मार्टफोनवर रेकॉर्ड करून त्यांनी मुलींना पुन्हा पुन्हा ऐकवले. मुलींच्या वारली, कातकरी, ठाकर व महादेव कोळी या बोलीभाषांचा वापर इंग्लीश शिकवताना केला. यामुळे मुलींना गोडी लागली. त्यांची श्रवण, वाचन, भाषण कौशल्यदेखील वृद्धिंगत झाली. ऑडिओ शब्दकोश, चित्ररूप कोश यांचा वापर मुली सहज करू लागल्या. शाळेत विद्यार्थिनींचे इंग्रजी आणि मराठी भाषा क्लब, स्पोकन इंग्लिश यासारखे अभ्यासक्रमही सुरु आहेत. ‘अ प्रोव्हर्ब अ डे’ या उपक्रमानेदेखील विद्यार्थिनींची शब्दसंपत्ती वाढवली.
आश्रमशाळेत, 2010 पासून, डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली आहे. तिथे इ-लर्निंग सॉफ्टवेअर्स, पीपीटीज, व्हिडीओ, प्रेझेंटर वगैरेंचा नियोजनबद्ध वापर होतो. 2014-15 पासून 8 कॉम्प्युटर्स, इंटरनेट, वायफाय, 2 मोठे एलसीडी टीव्ही, स्मार्टबोर्ड, प्रोजेक्टर्स या सुविधांच्या मदतीने अध्यापन सुरू आहे. विद्यार्थिनीही आता या वस्तू स्वतः हाताळतात.
शिकण्याची गोडी निर्माण झाल्याने गळतीचं प्रमाण कमी होऊन मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे. 8 वर्षांपूर्वी, शाळेचा 10 वी चा पट 23-24 असायचा. आत्ता, 10वीत 61 विद्यार्थिनी आहेत. 8 वर्षांपूर्वी, 12 वीत, 20 विद्यार्थिनी असायच्या. आता, 50ते 60 असतात. आदिवासी समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाप्रती आस्था निर्माण करून संस्कारक्षम विदयार्थी घडविल्याबद्दल अपर आयुक्त, ठाणे यांच्या वतीने, 2016 सालचा पुरस्कार पांढरे सरांना मिळाला. उत्कृष्ट आश्रमशाळेचा पुरस्कारदेखील शाळेला मिळाला आहे.
पांढरे सर सांगतात, “आमच्या विद्यार्थिनींची स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, जिद्द, समायोजन वाखाणण्याजोगं आहे. कला, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या या मुली आहेत. समर्पित शिक्षक सहकार्‍यांमुळेच या मुलींची एवढी प्रगती होऊ शकली.”
शरद पांढरे २०१५ पासून 6वी,7वी , 9वी च्या इंग्रजी, मराठी व इतर माध्यमांच्या पुस्तकांच्या लेखनात सहभागी आहेत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अणि ब्रिटीश कौन्सिल आयोजित व्हर्चुअल प्रशिक्षण उपक्रमात, ते मास्टर ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून महाराष्ट्रातल्या इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कामही अनेक वर्षांपासून करत आहेत.


अजिता विश्वास.

Wednesday, 3 January 2018

एक गाव कोथिंबिरीचं, लखपती शेतकऱ्यांचं..!

भाज्यांची सजावट ज्या कोथिंबिरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तिने मुंबईकरांच्या भाज्यांमध्ये चव निर्माण केलीच; पण याच कोथिंबिरीचं उत्पादन घेणाऱ्या गावकऱ्यांचंही जीवन बदलून टाकलं. गावातल्या प्रत्येकाला लखपती बनवून कोथिंबीरीने अल्प खर्चात मुबलक उत्पन्नाचा मंत्रच गावकऱ्यांना दिला. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी या छोट्याशा खेड्यातली ही यशकथा. गेल्या १५ वर्षातला हा बदल. खास कोथिंबिरीच्या वाहतुकीसाठी गावकऱ्यांनी सुमारे ३५ आयशर टेम्पो घेतले आहेत, हे विशेष.
उस्मानाबाद शहरापासून ३० किलोमीटरवरच्या भंडारीमध्ये कुणी शेतकरी पेरणीच्या तर कुणी कोथिंबीर काढणीच्या कामात मग्न आहेत. दिवसभर काढणी, बांधणी करून सायंकाळी टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना होतो. आणि दरवळणाऱ्या कोथिंबिरीच्या सुवासात शेतकऱ्यांची सायंकाळ सुसह्य होते. हे नगदी पीक. त्यात गुंतवणूक कमी. त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्यवसाय लाभाचा ठरत आहे. भंडारीत १२०० शेतकरी आहेत. जवळपास प्रत्येक कुटुंबात कोथिंबिरीचं उत्पन्न घेतलं जातं. अवघ्या ४० - ४५ दिवसांत कोथिंबीर काढणीला येते. आणि रान (जमीन) दुसऱ्या पिकासाठी सहज तयार करता येतं. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे अधिकच वळू लागले आहेत. कितीही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघालं तरी त्याचा दरावर परिणाम होत नाही. अलीकडे तर गावातच व्यापारी तयार झाल्यामुळे बांधावर उभं राहून कोथिंबिरीचा सौदा केला जातो. काढणीचा खर्चही व्यापारीच करतात. शिवाय कोथिंबीरकाढणीपूर्वीच पैसेही मिळतात.
काळ्याभोर जमिनीचं शिवार, ही भंडारीची जमेची बाजू. पण, निसर्गाच्या बेभरवशामुळे इथले शेतकरी हवालदिल होते. कामेगाव, कास्ती आदी खेड्यातून दोन छोटे टेम्पो भरून मुंबईच्या बाजारात पालेभाज्या जात होत्या. हे १५ वर्षापूर्वीच चित्र. त्यानंतर भंडारीतील काही शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची पेरणी केली. या टेम्पोतूनच कोथिंबीर मुंबईला पाठविण्यात येऊ लागली. कोथिंबिरीची गुणवत्ता आणि मुंबईच्या बाजारपेठेत मिळणारी मागणी लक्षात घेऊन मुंबईच्या काही व्यापाऱ्यांनी भंडारी गाव गाठलं. त्यांनी शेतकऱ्यांना कोथिंबिरीचं उत्पादन घेण्यास उद्‍युक्त केलं. हळहळू उत्पादन वाढलं. इथले टेम्पोचालकच आता व्यापारी झाले आहेत. गावातून कोथिंबीरीचे फड विकत घेऊन ते त्याच्या जुड्या मुंबईच्या बाजारात पोचवतात. जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोथिंबीरीचे उत्पन्न टप्प्या-टप्प्याने घेतलं जातं. काही शेतकरी बारमाही हे पीक घेतात.
बाजारात कोथिंबीरीच्या दराचा चढ-उतार लक्षात घेऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या कोथिंबीरीचा दर ठरवितात. पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांच्या दरम्यान कोथिंबीर काढणीला येते. एकरवर हा दर ठरतो. यावर्षी बाजारपेठेत कोथिंबिरीला चांगला दर मिळाला. त्यामुळे ५० हजार ते दीड लाख रुपयाला एकरभर कोथिंबीर विकली गेल्याचं शेतकरी प्रदीप पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे १० एकर कोथिंबीर आहे. कोथिंबीरीशिवाय ते अन्य उत्पन्न घेत नाहीत. पूर्वी उडीद-मुगाची शेती करत असताना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र कोथिंबिरीमुळे चांगली प्रगती झाल्याचं ते सांगतात. यावर्षी १० एकरातून १२ लाख रुपयांची कोथिंबीर निघाल्याचं त्यांनी सांगितलं. 
 चंद्रसेन देशमुख.

घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ इथे भेटतं...

“काय गं, खिचडी खाल्लीस का? हात स्वच्छ धुतलेस का? आस्थेने, आपुलकीने आपल्या शाळेतल्या विद्यार्थींनींची विचारपूस करणार्‍या मुख्याध्यापिका सुजाता पाटील आणि तेवढयाच आनंदाने प्रतिसाद देणारी विद्यार्थिंनी पाहताच मन हेलावलं. 
अलिबागच्या कुरुळ गावातल्या सु.ए.सो शाळेत ‘नवी उमेद’ने नोव्हेंबर महिन्यात बालहक्क सप्ताहात फेसबुक लाइव्ह केलं होतं, तेव्हा माझं तिथे जाणं झालं. मला ही शाळाभेट छान अनुभव देऊन गेली. शाळा म्हटलं की मुलांचा गोंगाट, शिक्षकांच्या ओरडण्याचे आवाज, छोट्या इयत्तेतल्या मुलांचं रडणं असं माझ्या मनात होतं. इथे आल्यावर मात्र भ्रम दूर झाला. शाळेत सगळेजण अगदी शांतपणे आपापली कामं करत होते. शिक्षकांशी बोलताना जाणवलं, की ते शिक्षक कमी आणि मुलांचे पालक जास्त आहेत. मुलं शिक्षकांभोवती इतक्या जिव्हाळ्याने वावरत होती, जणू आपल्या आईभोवतीच आहेत. एकंदरीत, शाळा एका घरात राहाणार्‍या एकत्र कुटुंबासारखी भासत होती. सुजातामॅडम प्रत्येक मुलाची कहाणी सांगत असताना जणू त्या मुलाची आई आता मीच.... इतकं मायेने सांगत होत्या.
१९९२ ला अलिबाग कुरुळ गावी सृजन प्राथमिक विद्यालय आणि सु.ए.सो. माध्यमिक शाळा ॲड प्रमोद आणि सुजाता पाटील या पतीपत्नींनी एका चाळीत सुरू केली. अनेक अडचणींवर मात करत तिला मोठं, सुसज्ज केलं. प्राथमिक शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहे. या शाळेची पटसंख्या १२५. शिक्षकसंख्या ८. आणि अमराठी भाषक मुलं सुमारे ६० टक्के. माध्यमिक शाळा अनुदानित. पटसंख्या १५४. शिक्षक ९. अमराठी भाषक विद्यार्थी सुमारे ५० टक्के. दोन्ही शाळांत, प्रत्येक वर्गात मुलांची संख्या २० ते २५ एवढीच. इथल्या वर्गात लक्ष वेधून घेतात भिंतीवर खाली लावलेले फळे. तसं का? तर मुलांच्या उंचीप्रमाणे त्यांना फळे वापरता यावेत, म्हणून. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र फळा, ज्यावर स्वत:ला वाटेल ते मुलं लिहू, रेखाटू शकतो. विचार करा, सिमेंटची भिंतही नसलेल्या पक्क्या घरांपासून वंचित असलेल्या मुलांना इथे स्वत:चं विश्व मुक्तपणे रेखाटायची संधी मिळते. मुलांनी आपापल्या फळ्यावर रेखाटलेली चित्रं मोठ्या आवडीने आम्हाला दाखवली. घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ आम्हाला इथे दिसलं.
मोठ्या इयत्तेतील मुलांकरिता सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, computer lab व वाचनालय. शाळेत स्थानिकांहून स्थलांतरित, मराठी मातृभाषा नसलेली मुलं अधिक आहेत. परप्रांतीय मुलांना तुम्ही कसं सामावून घेता? आम्ही विचारलं. सुजाता पाटील म्हणाल्या, आम्ही त्यांना मराठी शिकवून मेन स्ट्रीम मध्ये सामावून घेतो. आर्थिक हातभार लावण्याकरिता पालकांच्या कामात मदत करणार्‍या मुलांना ही शाळा शिक्षण देते. एकीकडे राज्यात पटसंख्या कमी असल्याने १,३०० शाळा एकाच वेळी बंद करण्याचा निर्णय सरकार घेतयं आणि दुसरीकडे स्थलांतरित मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे अचाट प्रयत्न सुजाता पाटील आणि त्यांचे शिक्षक करत आहेत. विद्यार्थी आणि फक्त विद्यार्थीच केंद्रस्थानी ठेवून ही शाळा चालवली जाते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यात सरकारी अनुदान तुटपुंजं. प्राथमिक वर्गांना अनुदान मिळतच नाही. अशा अनेक अडचणी. वेळप्रसंगी पदरमोड करून पैसे उभे करावे लागतात. तरीही एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाटील पतीपत्नी ही शाळा चालवतात.
ही शाळा पाहिल्यावर माझं शोधकार्य संपल्यासारखं झालं. माझ्या मनातली आदर्श शाळा मला सापडली. मला तिथल्या आनंदी विद्यार्थ्यांचा चक्क हेवा वाटला.

- लता परब.

Monday, 1 January 2018

सांगायला आनंद वाटतो की... 😊


‘नवी उमेद’नं गेलं वर्षभर लावून धरलेला विषय – शाळा-कॉलेजात मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन. इथे, फेसबुकवर, एकूणच सोशल मिडियावर आणि धोरणपातळीवरदेखील या विषयाची बरीच चर्चा आम्ही घडवून आणली. जागरुक आणि संवेदनशील आमदारांनी हा विषय उचलला. आमच्या टीमनेही प्रयत्न केले. यातून काही बरं घडलं, ते सांगायला आनंद वाटतो.
१) आमदारनिधीचा वापर मतदारसंघात मुली-स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग आणि डोस्पोजल मशिन्स बसवण्यासाठी करता येईल असा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. ही मागणी आमदार भारती लव्हेकर यांनी लावून धरली होती.
२) मुंबई: स्वतः भारती लव्हेकर यांनी त्यांच्या वर्सोवा मतदारसंघात अशी मशीन्स बसवली आणि सॅनिटरी नॅपकिन्स बॅंक हा अभिनव प्रयोगही सुरू केला. आमच्या प्रतिनिधी समता रेड्डी आणि लता परब यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
३) बीड: जिल्ह्यातल्या आष्टी मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांनी लगेच महिनाभरात कडा इथल्या, त्यांच्या आनंदराव धोंडे महाविद्यालयात तीन सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स बसवली. मुली त्याचा पुरेपूर वापर करत आहेत. आमचे प्रतिनिधी राजेश राऊत यांनी यासाठी खास प्रयत्न केले.
४) यवतमाळ: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दिग्रस-दारव्हा हा मतदारसंघ. मतदारसंघातल्या दिग्रस, दारव्हा, नेर या तीन शहरात चार मोठ्या कॉलेजमध्ये त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स बसवली. मतदारसंघातल्या 10 महिला बचत गटांना प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन विक्री आणि व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे. याच मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राठोड यांनी ‘स्वछ शाळा, सुंदर शाळा' हा उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्यानुसार शाळेत स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलींसाठी चेंजिंग रूम आणि परिसर स्वच्छता यावर भर दिला. आता नेर तालुक्यात 5 शाळांमध्ये चेंजिंग रूम तयार झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातले आमचे प्रतिनिधी नितीन पखाले यांनी इथे खास प्रयत्न केले.
५) नंदुरबार, धुळे आणि जालना जिल्ह्यांतही असे प्रयत्न सुरू आहेत.
#नवीउमेद