Saturday, 7 September 2019

विमानाचा शोध (आखुडबुद्धी बहुशिंगी)

एकोणीसशे पाच साली साली राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यानंतर ठीक अकरा वर्षांनी म्हणजे १९१६ साली माझ्या चुलत आजोबांनी, म्हणजे व्यंकटराव ब्रह्मेंनी त्याहीपेक्षा महत्त्वाचा शोध लावला. हा होता न उडणाऱ्या विमानाचा शोध!
चौदा वर्षांच्या अखंड अपयशानं किंचितही नाऊमेद न होता चुलत आजोबांनी हवेपेक्षा हलक्या पण न उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली. या विमानाचे नाव त्यांनी आपले पूर्वज सुंदरोजी ब्रह्मे यांच्यावरून ठेवले होते. हे विमान कोळशावर चालत नसे. ऑगस्ट महिन्यातल्या एका संध्याकाळी त्यांनी पुण्याच्या बंडगार्डन बंधाऱ्यावर न उडवून दाखवले. हे विमान तब्बल ऐंशी मीटर दूर उडालं नाही. दुर्दैवानं, नदीला आलेल्या अचानक पुरात ते विमान वाहून गेलं आणि मानवजातीचा एक अमूल्य ठेवा नष्ट झाला. त्यावेळी भारतावर ब्रिटिश अंमल असल्यानं या क्रांतीकारी शोधाचं म्हणावं तसं कौतुक झालं नाही. हेच जर त्यांनी इंग्लंडमध्ये केलं असतं तर कदाचित ते इतके प्रसिद्ध झाले असते की खुद्द इंग्लंडच्या राणीनं (ती जिवंत असती तर) त्यांच्यासारख्या मिश्या वाढवल्या असत्या. पारतंत्र्यात पिचलेल्या भारतीयांना त्यांची अजिबात कदर नव्हती. नाही म्हणायला पुण्याच्या गव्हर्नरनं दोन हत्यारबंद गुप्त पोलीस चुलत आजोबांच्या पाळतीवर ठेवले होते. कदाचित, चुलत आजोबा विमानाऐवजी ब्रिटिश सरकारला उडवतील अशी भीती त्यांना वाटली असावी.
लवकरच पहिलं महायुद्ध संपलं आणि पुढची वीसेक वर्षंतरी दुसरं महायुद्ध सुरू करायची कुणा राष्ट्राची इच्छा नव्हती. त्यामुळं या न उडणाऱ्या विमानांचा युद्धात उपयोग होण्याची सुतराम शक्यता नव्हती. अगदी शत्रूप्रदेशावर टेहळणी न करण्यासाठीही याचा उपयोग होत नव्हता. बाकी, शत्रूप्रदेशात बाँब न टाकणे, शत्रूच्या न उडणाऱ्या विमानांना न पाडणे, विमानातल्या मशीनगनने शत्रूसैनिकांना न मारणे वगैरे कामगिरी तर दूरचीच बात.
तरीही, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून चुलत आजोबांनी आपल्या शोधाचा प्रसार जोरात चालू ठेवला. पॅरीसहून न्यूयॉर्कला विमानानं विनाथांबा जायचा प्रयत्न करणाऱ्या धाडसी लोकांसाठी जसं बक्षीस जाहीर झालं होतं, त्याच धर्तीवर आपल्या विमानानं तुळशीबाग ते वाघोली न जाऊ शकणाऱ्यांसाठी त्यांनी रोख एकवीस रूपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तेव्हाच्या केसरीत ही बातमीही छापायला दिली होती. पण बळवंतराव नावाच्या तत्कालीन संपादकांनी "तुमचे डोके ठिकाणावर आहे का हो ब्रह्मे?" असा सवाल केल्यानं ती बातमी छापली गेली नाही. शेवटी पहिलं बक्षीस स्वतःलाच जाहीर करून त्यांनी ही दुर्गम स्पर्धा संपवली. विविध शहरांना जोडणारी हवाईवाहतूक सुरू होऊन त्यात हवाई सुंदऱ्या प्रवाशांना चहापाणी देऊन आदरातिथ्य करू लागल्या तसे कल्पक चुलत आजोबांनीही आपली ट्रान्स वेस्टर्न इंडीयन एअरलाईन्स सुरू केली. या कंपनीची विमाने कुठूनही कुठेच जात नसत. पण, प्रवाशांना प्रवासाच्या शीणाचा अनुभव व्हावा म्हणून चुलत आजोबांच्या प्रयोगशाळेतील लाकडी पाटावर पोटाला पट्टा बांधून (प्रवासी पळू नयेत म्हणून) बसवले जाई. हवाई सुंदरी म्हणून बालसुधारगृहात वॉर्डनच्या नोकरीचा अनुभव असलेल्या मालिनीबाई होत्या. त्या प्रवाशांची जमेल तितक्या प्रेमानं विचारपूस करून चहापाणी करत. प्रवासी अगदीच कळवळू लागला तर केलेला चहा त्याला प्यायला देत. सुमारे वीसेक चुकार प्रवाशांच्या अनुभवानंतर ही कंपनी बंद पडली.
तोपावेतो, दुसरं महायुद्ध सुरू झालं. न उडणाऱ्या विमानांपेक्षा उडणाऱ्या विमानांना जास्त महत्त्व येऊ लागलं. त्यातही काही जर्मन शास्त्रज्ञांनी जेट इंजिनवर काम सुरू केलं. भारतीय तंत्रज्ञान चोरून ते आपलंच आहे असं म्हणून खपवणाऱ्या पाश्चिमात्य देशांना चुलत आजोबांची महती यावेळी पटली. लुच्च्या ब्रिटिश सरकारनं चुलत आजोबांचे शोध चोरून त्याची माहिती हेरांकरवी जर्मन शास्त्रज्ञांना पुरवायला सुरुवात केली. लवकरच जर्मन शास्त्रज्ञ चुलत आजोबांच्या बुद्धिमत्तेच्या झळाळीनं दिपून जाऊन सैरभैर झाले आणि काहीच काम करेनासे झाले. नेमका याचा फायदा घेऊन दोस्त राष्ट्रांनी महायुद्ध जिंकलं. चुलत आजोबांच्या या असीम शौर्याचा गौरव म्हणून लंडनच्या बकिंमचंद्र पॅलेसमध्ये त्यांचा पुतळा उभा करायचा पार्लमेंटचा बेत होता. पण तो पुतळा पाहून जनमत सरकारविरुद्ध होईल असं म्हणत सहाव्या जॉर्ज राजानं विरोध केला.
या सततच्या यशाला कंटाळलेल्या चुलत आजोबांनी मग स्वतःपासून स्फूर्ती घेत न बुडणाऱ्या पाणबुडीचा शोध लावला.
- ज्युनिअर ब्रह्मे

टोलीवरचे दोन हिरो

नागपूर शहर. इथलं राहाटेनगर. हाच भाग रहाटे टोली म्हणूनही ओळखला जातो. जवळपास शंभर वर्ष जुनी असलेली ही मांग-गारुडयांची वस्ती. येथील लोकांकडे आजही स्वतःची ओळख पटवून देता येईल असा एकही पुरावा नाही. शासन दरबारीसुद्धा त्यांची नोंद नाही. मग मुलांचे भविष्य कसे असेल, ते कसे जीवन जगत असतील हे विचारायलाच नको.
खुशाल ढाक व नागेश मोते हे दोन मित्र इथल्या मुलांचं आयुष्य घडावं म्हणून झटत आहेत. मागील 14 वर्षापासून कोळशाच्या खाणीतून हिरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. खुशालचं एमए.बी.एड. झालेलं असून एका खाजगी कंपनीत ते कम्प्युटर आपरेटर आहेत. तर नागेश नगरसेवक आहेत.
खुशालला शिक्षक व्हायचं होतं. मात्र डोनेशन अभावी ते स्वप्न मागे पडलं. परंतु त्यांच्या आईने हातात ब्लॅकबोर्ड व चॉक देऊन ‘जा, हो शिक्षक’ म्हणून खुशालचे ख-या अर्थाने शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. वयाच्या 14 व्या वर्षीपासून यशवंत स्टेडियम परिसरात एका हॉटेलात कपबश्या धुण्याचं काम करता करता फूटपाथवरील मुलांना शिक्षणाचं दान देऊन खुशालने सुरुवात केली होती. आज हेच काम मोठया प्रमाणात विकसित झाल्याचं चित्र राहाटे टोलीमध्ये बघायला मिळत आहे.
खुशालने शिक्षणासोबत मुलांमध्ये खेळण्याची रुची वाढवली आहे. मुलं खेळांमध्ये एकाग्र होऊन व्यसनापासून दूर राहतात. त्याने या मुलांना फुटबॉल व क्रिकेटचं प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे. त्यांनी एक फुटबॉल टीम बनवली असून ही टीम झोपडपट्टी लीग फुटबॉल मॅचेसमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहोचली आहे. या टीमला जर्मनीचे मार्मीन नावाचे प्रशिक्षक आठवडयातून दोन दिवस प्रशिक्षण देत असतात. येथील मुलीही खेळात पुढं आहेत. ही मुलं मोठी होऊन डॉक्टर, पोलीस, शिक्षक बनण्याचं स्वप्न बघत आहेत. खुशालने फुटबॉलच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यांला नेवीमध्ये तर 2 विद्यार्थ्यांना सीआरपीएफ व इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात यश मिळविलं आहे.
चार हजार लोकवस्ती असलेला हा समाज स्त्री प्रधान आहे. या समाजातील स्त्रिया कामाला जातात तर पुरूष घर सांभाळतात. फुगे विकणं, कचरा व भंगार गोळा करणं असा त्यांचा नित्यक्रम. टोलीवरील समाज पूर्वीपासूनच गून्हेगारी व व्यसनामध्ये गुरफटलेला. यातून बाहेर पडण्याची समाजाची इच्छा आहे, परंतु हाताला काम नाही वा दुसरा उद्योग नाही. त्यासाठी अडचण म्हणजे शासकीय कागदपत्रांची! त्यांच्याकडे साधा जन्मदाखला नाही. अशा या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊनही मुलं बेरोजगारीच्या वाटेला लागून गुन्हेगारीकडे वळली आहेत. या सर्व समस्यावर उपाय म्हणून खुशालने आपली नोकरी सोडून त्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तर नागेश मोते हे आपल्या पदाचा वापर करत वस्तीतील लोकांची कागदपत्रं बनवण्यासाठी शासकीय दरबारी खेटे घालत आहेत. खुशाल आणि नागेशच्या प्रयत्नांमुळे वस्तीत सिमेंट रोड, वीज, पाणी आणून वस्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत.
- निता सोनवणे, नागपूर

दात्यांचा पुढाकार, वंचितांना मदत

संतोष काकडे मूळचे कोल्हापूरचे, पण आता कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहेत. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेकरता लागणारी औषधं, वैद्यकीय साधनं आणि उपकरणं विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पूर आला आणि आपल्या जन्मगावाशी जोडलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देईना. संतोष यांनी मदतीचं सामान स्वतः पूरबाधित भागात घेऊन जाण्याचं ठरवलं. त्यांनी चटकन याकरता दोन पातळ्यांवर काम करायला सुरूवात केली.
पहिलं, त्यांनी त्यांच्या कोल्हापुरातील मित्रांशी संपर्क साधून कोणत्या भागात किती नुकसान झालंय आणि तातडीने आवश्यक बाबी यांची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी सांगलीतील सतीश पाटील या मित्राची मदत झाली. दुसरं, त्यांनी चार माणसांच्या कुटुंबाला चार दिवस दोन वेळचं जेवण आणि नाश्ता याकरता तांदूळ, डाळी, ज्वारी-गव्हाचं पीठं, तेल, मीठ, मसाला याप्रकारचे जिन्नस किती प्रमाणात लागतील याची यादी बनवली. या एका किटला किती खर्च येईल याचा होलसेल बाजारात जाऊन अंदाज घेतला. त्यांना शक्य होईल तितक्या कुटुंबांना त्यांनी ही किट देऊन मदत करण्याचं ठरवलं. हे काम करत असतानाच संतोष यांनी सोसायटीत राहणाऱ्या संदीप देशपांडे आणि मिलिंद कुलकर्णी या दोन मित्रांनाही आपल्या योजनेबद्दल सांगितलं. या दोघांनाही संतोष यांची कल्पना आवडली.  
संदीप यांनी लगेचच त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा एक ग्रुप बनवून त्यांना त्यांच्या या योजनेची माहिती दिली. ‘मदत स्वतः घेऊन गरजूंपर्यंत पोहचवणार’ आणि ‘सामानाची किट’ यामुळे त्यांना लगोलग ग्रुपमधून प्रतिसाद मिळू लागला. या एका किटला किती खर्च येईल हेही ग्रुपमध्ये सांगण्यात आलं. यामुळे मदत करावीशी वाटतेय पण आपली मदत नक्की गरजूंपर्यंत पोहचेल का ही शंका असणारे किंवा वेळेअभावी प्रत्यक्ष जाऊन मदत करता येत नाही अशा लोकांनी पटापट संपर्क साधला. आर्थिक मदतीसोबतच इतर सामानाचीही मदत करण्याची तयारी लोकांनी दाखवली. एका व्यक्तीने सॅनिटरी पॅड तसेच प्रायमरी हेल्थ किट ज्यात अँटी डायरिया टॅब्लेट, पॅरासिटेमॉल, पेन किलर यासारखी औषधं द्यायची तयारी दाखवली. आणखी एका व्यक्तीने विद्यार्थ्यांकरता वह्या आणि पाचशे पेनं देत असल्याचं सांगितलं. ग्रुपमधील प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत होतं. या ग्रुपमधील सदस्यांच्या परिचयाच्या लोकांना कळल्यावर त्यांच्याकडूनही मदत येऊ लागली. विशेष म्हणजे हा ग्रुप बनल्यावर दहाच मिनिटांत संतोष यांच्या बँक खात्यात दुबईतून पाच हजार रुपये जमा झाले. संतोष यांच्या नातेवाईकाचे मित्र, मूळचे कर्नाटकतले पण सध्या दुबईत राहणारे रिझवान यांनी ही मदत केली. 12 ऑगस्टला हा ग्रुप बनला केवळ 48 तासांमध्ये 70 हजार रुपये आणि सर्व साहित्य जमा झाले.
संतोष यांची आता टीम बनली, कामाची विभागणी झाली. स्वयंपाकाच्या सामानाचं किट बनवणं, प्रायमरी हेल्थ किट बनवणं अशी कामं पटापट हातावेगळी होऊ लागली. संतोष आणि त्यांच्या टीमने स्वयंपाकाच्या जिन्नसाची सव्वाशे किटची व्यवस्था केली. कोल्हापूरच्या मित्रांकडून माहिती घेणं सुरूच होतं. पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात ही मदत करण्याचं पहिलं ठरलं. कवठेसार गावात मदत पोहोचवायचं ठरवलं. फार्मा क्षेत्रात असल्यामुळे संतोष यांचा या सर्व भागात चांगला संपर्क आहे. त्या लोकांकडून संतोष यांना सतत माहिती मिळत होती. कवठेसार गावात प्रचंड प्रमाणात मदत आल्यानं, आपली मदत अतिरिक्त ठरेल याचा संतोष आणि त्यांच्या टीमला अंदाज आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरिल हासूर गावात मदत पोहोचली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी हासूरमध्ये मदत पोहोचवण्याचे ठरवले.
वेगवेगळ्या भागातून वैयक्तिक आणि संस्थांमार्फत पूरबाधित क्षेत्रात मदतीचे ट्रक निघत होते. सर्व परिसरातील मदतीचा आढावा संतोष घेत असताना त्यांना एक अत्यंत खेदजनक गोष्ट कळली. काही पूरग्रस्त दमदाटी करून त्यांच्या गावच्या रस्त्यावरून जाणारे मदतीचे ट्रक अडवून, सर्व सामान जबरदस्तीने उतरवून घेत होते. त्यांना मदत मिळाली असतानाही इतरांकरता असणाऱ्या मदतीचे ट्रक पुढे जाऊन देत नव्हते. कित्येक जण साठा करत होते. त्यामुळे कित्येक गरजवंतांपर्यंत मदत वेळेत पोहचत नव्हती. कित्येक महापालिका कर्मचाऱ्यांनीही मदतीचं सामान लाटलं. त्यांच्यावर आता कारवाई होत आहे. त्यामुळेच मदत घेऊन जात असताना दक्ष राहण्याची जबाबदारी आणखी वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
15 ऑगस्टला सकाळी मदतीचा ट्रक पुण्यातून निघणार असं ठरलं होतं. हासूरच्या गावकऱ्यांशी संपर्कही साधला. पण नेमकं 14 तारखेला रात्री संतोष यांचा मुलगा तापाने फणफणला. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. संतोष यांचा जीव कासावीस होऊ लागला. एकीकडे मुलगा तर दुसरीकडे मदत पोहोचवण्याची धडपड अशा ताणात संतोष होते. मुलाला शुक्रवारी संध्याकाळी रूग्णालयातून सोडलं. त्यांनी लेकीला मुलासोबत बसवून शनिवारी पहाटे पत्नीसोबत हासूर गावाकडे कूच केली.
गावात पोहोचल्यावर संकटाच्या परिस्थितीतही हासूरच्या गावकऱ्यांनी त्यांच्यातील समंजसपणा आणि व्यवस्थापन खूप छानपणे टिकवून ठेवल्याचं संतोष आवर्जून नमूद करतात. हासूर गावात लोकवर्गणीमधून एक कम्युनिटी हॉल बांधण्यात आला आहे. या हॉलच्या एका भागात गावाला मिळत असलेली मदत एका रांगेत पद्धतशीरपणे जमा करून घेण्यात आली होती. नवीन येणारी मदत घेण्याकरता महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात येत होत्या. मदत घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची नोंद गावातीलच स्वयंसेवक एका नोंदवहीत करत होते. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला समान मदत मिळेल आणि न्यायही. गावातल्या लोकांच्या सौजन्याची आणखी एक प्रचिती संतोष यांना आली. आपल्याला मदत करणाऱ्या येणारी लोक खूप लांबून आल्याची जाणीव गावकऱ्यांना होती. दोन-तीन दिवसात आता ते जरा सावरले होते. मदत घेतल्यानंतर मिळालेल्या मदतीमधूनच येणाऱ्या लोकांच्या चहाची आणि पोह्यांची व्यवस्था हे गावकरी करत होते. इथं माणुसकीचं अनोखं दर्शन घडत होतं.
संतोष यांनी गावच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. मुख्यध्यापक त्यांना म्हणाले, विद्यार्थ्यांना जूनमध्ये सांगितलेल्या वह्या मिळायला इथं ऑक्टोबर उजाडतो. आता विद्यार्थ्यांकडे ना वह्या आहेत, ना पाठ्यपुस्तक त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर खूप बिकट परिस्थिती असणार आहे. आता संतोष यांचा पुढील उपक्रम या गावातली शाळा उभारणं हा आहे. त्यांनी कोल्हापूरातल्या त्यांच्या गणेश मंडळाशी संपर्क साधून यंदा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचं सांगितलं आहे. हे मंडळ बाहेरुन वर्गणी गोळा करत नाहीत. मंडळाचे सदस्यच आपापसांत वर्गणी गोळा करून देखावा, कार्यक्रम सादर करून उत्सव साजरा करतात. या मंडळाकडून यंदा जमा झालेली वर्गणी हासूरच्या शाळा उभारणीकरता खर्च करण्यात येणार आहे. आपला उद्देश चांगला असेल तर लोकं आवर्जून मदत करतात असा विश्वास संतोष यांना आहे. त्यामुळेच त्यांच्या या उपक्रमाला लोक मदत करतील अशी आशा संतोष यांना आहे.
शब्दांकन – साधना तिप्पनाकजे 

Iई सिगरेटची नको साथ, ती करते घात (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)

शिक्षिका असलेल्या मैत्रिणीकडून ई सिगरेट या व्यसनप्रकाराबद्दल समजलं. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतल्या, गावांतल्या शाळकरी मुलांना खर्रा, माव्याचं आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरांतल्या शाळकरी मुलांना तंबाखू, सिगरेटबरोबर ई सिगरेटचंही व्यसन लागतंय. 
ई-सिगरेट म्हणजे तरी काय? 
इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलीवरी सिस्टिम (ईएनडीएस) या नावानेही ती ओळखली जाते. ई सिगरेट पेन ड्राईव्ह, पेनसारख्या दिसतात.
ई सिगरेटमध्ये तंबाखू, टार यांचा वापर होत नाही. तीत द्रवरूपातलं निकोटिन असतं. ई सिगरेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. ती ओढताना एरवीची सिगरेट ओढल्याप्रमाणे प्रकाशमान होते.
ई सिगरेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काड्यापेटी लागत नाही. या सिगरेटच्या उपकरणात एखाद दोन लहान बॅटर्‍या असतात. सिगरेट ओढली जाते, तेव्हा या सिगरेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होते. या वाफेला एरवीच्या धूम्रपानासारखा वास नसतो. सिगरेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. दातांवर डागही पडत नाहीत. ई-सिगरेट हे उपकरण मोबाईलप्रमाणे चार्ज केलं जातं. सोबत चार्जरही दिला जातो. या ई-सिगरेटची किंमत सुमारे 500 रुपये आणि विशिष्ट फ्लेवर 100 रुपयांच्या आसपास मिळतो.
ई सिगरेट ओढल्यानंतर एरवीच्या धूम्रपानासारखा वास येत नसल्याने हे व्यसन लपवणं सोपं जातं. आणि एरवीच्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने, ती ओढायला मुलांना मजा वाटते. असं सगळं छान छान आणि फॅशनेबल वाटतं खरं. पण ही ई सिगरेट तंबाखूच्या सर्व प्रकारांइतकीच घातक आहे. म्हणूनच टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. राजन बडवे यांनी केंद्र सरकारला ई सिगरेटच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. देशभरातल्या एक हजार डॉक्टरांनीही पंतप्रधानांना तसं पत्र लिहिलंय. ‘ईएनडीस’ची विक्री, ऑनलाइन विक्री, उत्पादन, वितरण, व्यापार, आयात किंवा जाहिराती यांना परवानगी देऊ नये, अशी लिखित सूचना केंद्रीय औषध प्रमाणके नियंत्रण संस्थेने सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना दिल्या आहेत.
ई सिगरेटवर बंदी घालावी असं केंद्राने सर्व राज्यांना कळवलंय. त्यानुसार महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, मिझोरम, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांनी बंदी घातलीच आहे. तरीही छुपेपणे ती मिळतेच. केंद्राच्या बंदीच्या प्रस्तावाला दिल्ली न्यायालयात आव्हान दिलं गेल्याने न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता ईएनडीएसचं उत्पादन, विक्री आणि आयात याला बंदी घालणारा अध्यादेश जारी करण्याचा सरकारचा विचार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातल्या पहिल्या शंभर दिवसांत करण्याच्या कामांत या बंदीचा समावेश आहे.
मोदी सरकार दुसऱ्या वेळी स्थापन होऊन ७५ दिवसांहून अधिक कालावधी लोटला असल्याने केंद्रीय आरोग्य विभाग या बंदीसाठी सक्रिय झाला आहे. ई सिगरेट आणि तत्सम वस्तूंचं देशात उत्पादन, विक्री आणि आयात यावरच्या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा विचार सरकार करत आहे. सरकारने कायदेविषयक मतंही मागवली आहेत. सरकारने या बंदीसाठी अध्यादेश काढल्यास तसं विधेयक संसदेच्या पुढच्या सत्रात मांडणं आणि मंजूर होणं आवश्यक ठरेल.
सरकारने कायदेशीर बंदी घातली तरी आपल्या मुलांना अशी व्यसनं लागू नयेत यासाठी घरी, शाळेत आणि सगळीकडेच आपण त्यांची काळजी घेणं, समाजात चांगलं वातावरण तयार करणं याला पर्याय नाहीच
- लता परब, मुंबई

स्थानिक हवामान आणि बहुपीक पद्धतीचा अभ्यास करून शेती केली तर आत्महत्येचा विचारही शिवणार नाही- राजेंद्र भट

''भारतातील शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान आणि बहुपीक पद्धतीचा अभ्यास करून शेती केली तर आत्महत्येचा विचारही त्यांना शिवणार नाही.'' राजेंद्र भट सांगत होते. भट ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीत वाढलेले. इंजिनिअर. 
तरुणपणी गडकिल्ले पालथे घालत असताना जाणीव रुजायला लागली- आपण निसर्गाकडून फक्त घेतो आहोत, देत तर काहीच नाही.
१५ वर्ष एका कंपनीत नोकरी केली. मग नोकरी कायमची सोडून १९९३ मध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली. बदलापूर स्थानकापासून सुमारे 6 किमी अंतरावर बेंडशीळ इथली 1 एकर खडकाळ,नापीक जमीन.
शेतीचं फारसं ज्ञान नसतानाही भट यांनी पहिल्या वर्षी पालेभाजी आणि भाताचं पीक घेतले. एक एकरात फक्त ७०किलो पीक. आता सध्या त्यांची ५ एकर शेती आहे.शेतीरूपी जंगलाला त्यांनी 'निसर्गमित्र' अस नाव दिल आहे.त्यात सुमारे दरवर्षी एक ते दीड टन भात होतो. आवडीमुळे,निसर्गावरील प्रेमामुळे त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. चुकातून शिकता येत हा मूलमंत्र. जंगलात निगा न राखता, खत न वापरता चांगलं उत्पादन येतं. शेतातही हा प्रयोग करता येईल का ? जंगलात सगळीकडे एकाच प्रकारची झाडे,पक्षी,फळे, फुले पाहायला मिळत नाहीत. या निरीक्षणातून, विचारातून प्रयोग सुरू झाले. 

शेतीसाठी लागणाऱ्या मुख्य गोष्टी जसे बियाणं,कीटकनाशके, खते शेतातच बनवायला सुरुवात केली.झाडांची पाने तिथेच कुजवली, झाडांच्या फांद्या कापून भाजीपाल्यांसाठी मांडव तयार केले.पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी लेंडी पिपळीची वेल जागोजागी लावली. .देशी गांडूळाची मातीत निर्मिती करायला सुरुवात केली. पक्षांनी गांडूळ खाऊ नये म्हणून तण वाढू दिलं. तेच तण त्याच जागी कुजवलं. त्यातून सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली. झाडांचा पाला, शेतीतून उरलेले काष्ठपदार्थ पुन्हा शेतात टाकून शेतीचा कस वाढवला जातो. निसर्गाला हानी न पोहोचवता, कमीत कमी खर्चात, श्रमात, जास्त पीक कसे घेता येईल?याचा विचार भट यांनी केला.
शेती शेजारील असलेल्या बंधाऱ्यातच पाणी अडवून तेच पाणी बोरद्वारे संपूर्ण शेतीला वापरतात. आंतरपीक, बहुपीक पद्धत वापरतात. मध्यभागी नारळ , नारळावर चढलेली काळ्या मिरीची वेल, त्याच्या खाली असलेलं कॉफीच झाड,त्याखाली कंद,त्यांच्यावर भाजीपाला अशी असंख्य प्रकारची पिकं. मार्चपासून ऑगस्ट शेवटापर्यंत येणारे ५२ जातीचे आंबे,त्यामध्ये असलेली केळीची,पेरूची रोपे,कीड थांबवण्यासाठी खाली लावलेला गवती चहा,सीताफळ,रामफळ अशी फळे,बकुळ,केवडा, चाफा,नागचाफा अशी कितीतरी प्रकारची फुलं ; कुडुलिंब,हेरडा,बिब्बा,रिठा ह्यासारख्या औषधी वनस्पती. साग,शिवण,अगस्त,रोजवूड, काजू,फणस अशी जवळपास ४०० प्रकारची झाडं. ५० प्रकारचे पक्षी.
शेतीसोबत शेती पर्यटन,कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असा सल्ला भट देतात. त्यांनी सुरुवातीला ५ते ७ वर्ष दुग्धव्यवसाय केला.शेतीच्या ध्यासापायी त्यांनी सहा वर्षात त्यांच्या मुलांसोबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शेतीची पदवी संपादन केली.शेतीच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी केला. वर्षभर शेती विद्यालयात मुख्याध्यापक.
२००६ मधल्या पुरात त्यांनी तयार केलेली सगळी माती वाहून गेली पण त्यांनी न हरता पुन्हा जंगल तयार केलं. .सतत काहीतरी करण्याच्या धडपडीमुळे त्यांनी शेणामातीपासून गणपतीच्या मूर्ती घडवल्या. त्याचं विसर्जन घरातच केलं. तेच पाणी पुन्हा शेतीत वापरलं. त्यांचा प्रवासात कुटुंबाची साथ मिळाली.
२००५ सालापासून ते निवासी प्रशिक्षण शिबीर घेतात. भट यांना २०१२ साली कोकण विभागातून कृषिभूषण हा पुरस्कार मिळाला.

- संतोष बोबडे, ठाणे

पूरक व्यवसायात यशाचे रंग भरणारा चित्रकार

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं माका. इथले सेवानिवृत्त शिक्षक लिंबराज गुलगे. त्यांचे पुत्र सुरेश. वय ३६. सुरेश चित्रकलेतील प्रतिभा लाभलेले. जी. डी. आर्ट डीएडपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. २००५ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रांची प्रदर्शनं आणि विक्रीही सुरू झाली. मात्र त्याच वेळी सुरेशना घरच्या शेतीच्या जबाबदारीचीही जाणीव होती. परिसरात पाण्याची चिंता कायमचीच. केवळ कापूस, ज्वारी, बाजरीसारख्या पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून चालणार नाही, हे त्यांनी जाणलं. मग२०१५ मध्ये सुरेशनी १० शेळ्यांपासून शेळीपालन सुरू केलं. पण त्यातून उत्पन्नासाठी बराच कालावधी द्यावा लागत असल्यानं जोड म्हणून २०१६ मध्ये कोंबडीपालनाचा निर्णय. गावरान कोंबड्यांची खरेदी. कडकनाथ कोंबड्यांचं पालन करण्यासाठी मध्यप्रदेशातल्या झाबुआ इथून १२०० कोंबड्या आणल्या. सोबत टर्की, गीनीफाऊल, बटेर, व्हाईट पेकीन बदक, इंडियन रनर बदक, खाकी कॅंपबेल बदक, राजहंस कबुतर, अशा १० हून अधिक पक्षांचे पालन. कोंबड्या आणि पक्षांना संचारासाठी एक एकर क्षेत्र. त्याला चारही बाजूनं कुंपण. पक्षी संपूर्ण वाढवण्यापेक्षा महिनाभर वाढवून त्यांची विक्री केली तर पैसे लवकर हाती येतात, असं सुरेश सांगतात. 
सुरेश यांनी मशरूम, मधमाशी, मत्स्यपालन याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि आता ते इतरांना देतात.
सुरेश यांनी दुष्काळी भागात प्रथमच भुईमूग, करडई, तीळ, नारळ आदींपासून तेलनिर्मिती आणि विक्री सुरू केली आहे. त्यासाठी लाकडी घाणा आणला. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर ते करतात. त्यांनी मंगल ऍग्रो फार्म , यू ट्यूब चॅनलही त्यांनी सुरू केलं .
हे करताना त्यांनी चित्रकलाही जोपासली आहे. त्यांच्या चित्रांना दर्जा प्राप्त झाला असून बारा हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने ते चित्रांची विक्री करतात. त्यामुळे पूरक व्यवसायात यशाचे रंग भरणारा चित्रकार अशी त्यांची नगरमध्ये ओळख आहे.

- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

हप्तावसुली (आखुडबुद्धी बहुशिंगी)

स्थळ: नगरपालिकेची लायब्ररी. एक मिशाळ, ढेरीवाला माणूस येतो.
ग्रंथपाल: बोला, काय पाहिजे.
माणूस: चौकीतून आलोय मी.
ग्रंथपाल (आपल्या हुद्द्याला स्मरून): चौकीतून आलाय की तिर्रीतून हे कोण विचारलंय? काय पाहिजे ते सांगा.
माणूस: मी पोलीस चौकीतून आलोय. भांबुर्डे साह्यबानी पाठवलंय.
ग्रंथपाल: त्यांची मेंबरशिप आहे का इथं?
माणूस: नाही हो. मी हवालदार मानकामे.
ग्रंथपाल: बरं मग?
माणूस: मला भांबुर्डे साहेबांनी पाठवलंय.
ग्रंथपाल: बरं मग?
माणूस (कुजबुजत्या आवाजात): हप्त्यासाठी.
ग्रंथपाल: आं?
माणूस: आं काय? येवढं मोठं दुकान आहे तुमचं. रोज किमान दोन हजाराचा बिजनेस होत असणार...
ग्रंथपाल: ओ, वाचता येतं का?
माणूस: येत असतं तर मीच साहेब होऊन भांबुरड्याला धाडला नसता का तुमच्या दुकानात?
ग्रंथपाल: हे ग्रंथालय आहे. इथं आम्ही लोकांना वाचायला पुस्तकं देतो.
माणूस: आणि विकता काय?
ग्रंथपाल: काही नाही.
माणूस: ठीकाय. पाचशे रुपये कमी द्या. चला काढा हप्ता. नाहीतर...
ग्रंथपाल: नाहीतर काय?
माणूस: दुकानातला माल उचलून नेईन. सगळ्यात जास्त काय खपतं तुमच्याकडं?
ग्रंथपाल: बाबा कदम, स्नेहलता दसनुरकर, योगिनी जोगळेकर, वपु काळे…
माणूस: काळे नकोत, आपल्यात काळा रंग चालत नाय. पांढरे हायेत का?
ग्रंथपाल: हे कोण प्रकाशक आहेत?
माणूस: मला कसं माहीत? आता निमूटपणे हप्ता काढा नाहीतर तुमचा बिझनेस कायमचा बुडलाच समजा.
ग्रंथपाल: वेडेबिडे आहात का? मी नगरपालिकेच्या वाचनालयाचा ग्रंथपाल आहे. इथं आम्ही काहीही विकत नाही, समजलं?
माणूस: तुला असं नाय समजणार…
*****
स्थळ: पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर भांबुर्डे तीन दिवसांच्या सुट्टीवरून परत येतात.
भांबुर्डे: आं? मानकामे, आपल्या हद्दीत एकदमच गुन्ह्यात इतकी वाढ झाली? अरे, झोपा काढता की काम करता?
मानकामे: सायेब, आमचा तपास कसोशीनं चालू आहे.
भांबुर्डे: असे घडले तरी काय गुन्हे?
मानकामे: साहेब, गुन्ह्यांचं स्वरूप किरकोळ असलं तरी त्यामागच्या विघातक भावना पाहून आम्ही जनतेच्या कल्याणासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची परीस्थिती राखण्याच्या दृष्टीने…
भांबुर्डे: पुरे. काय घडले गुन्हे?
मानकामे: साहेब, काल सकाळी मी चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमास अटक केली.
भांबुर्डे: चुकीच्या दिशेने? हा काय गुन्हा आहे?
मानकामे: साहेब, चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडून रहदारीस अडथळा निर्माण करून पर्यायाने कायदा आणि सुव्यवस्थेची…
भांबुर्डे: बस! आणखी काही?
मानकामे: संशयास्पद वस्तू बाळगणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली.
भांबुर्डे: (संशयानं) काय होती ती वस्तू?
मानकामे: भाजीची पिशवी होती. पण एका माणसानं पाचसहा भाज्या सोबत बाळगणं संशयास्पदच आहे ना साहेब?
भांबुर्डे: अडीच वर्षांत नोंदवले नाहीत इतके गुन्हे तीन दिवसांत? बघू, हे काय लिहिलंय- धोकादायक शस्त्र बाळगण्याची शक्यता असणाऱ्या मनुष्यास अटक…
मानकामे: हो साहेब, तो मनुष्य खूपच धोकादायक दिसत होता. जाड चष्मा, अंगात खुनशी बुशशर्ट आणि हिंस्र पॅंट, पाशवी सॅंडल… 
भांबुर्डे: असो, हे काय- अवैधरित्या चष्मा बाळगणाऱ्या अज्ञात इसमास अटक.
मानकामे: होय साहेब, मीच पकडला त्याला. शिवाय, शिवाय चिथावणीखोर पुस्तकांचा प्रसार करून सरकारविरुद्ध उठाव करण्याच्या तयारीत होता तो.
भांबुर्डे: (वैतागून) मानकामे, अशानं आपली कोठडी भरून शेजारच्या बॅंकेच्या लॉकरमध्ये गुन्हेगारांना ठेवावं लागेल. किती जण आहेत सध्या?
मानकामे: सध्यातरी एकचजण आहे साहेब.
भांबुर्डे: बाकीचे कुठं गेले? पळाले की काय?
मानकामे: नाही साहेब, पळतोय कसा तो. पळाला तर पोलीस कोठडीतून पळाल्याच्या गुन्ह्याखाली पुन्हा अटक करेन त्याला. 
भांबुर्डे: भलताच सराईत गुन्हेगार आहे का?
मानकामे: तर हो साहेब, त्याच्यावर सव्वीस गुन्हे आहेत.
भांबुर्डे: (काहीतरी अंदाज आल्यानं) आणि हे सगळे गुन्हे आपल्याच स्टेशनला नोंदवले असतील ना? कोणाय हो हा?
मानकामे: आपल्या गल्लीतला लायब्ररीयन!
- ज्युनिअर ब्रह्मे