Friday, 31 August 2018

एका टेक्नोसेव्ही शिक्षकाची गोष्ट

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका. येथील माटेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन हनुमंतराव ठाकूर. ठाकूर सरांना नुकताच मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट पुरस्कार जाहीर झाला आहे.ठाकूर यांचे शिक्षण बीए,बीएड. सुरूवातीची 7 वर्षे त्यांनी जालन्यात काम केलं. 2015 साली बदली होऊन ते पूर्णा तालुक्यात आले. सरांना तंत्रज्ञानाची विशेष आवड. तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना खडू-फळा मोहिमेऐवजी वेगळया पध्दतीने शिक्षण देण्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या स्काइप या टूलचा उपयोग केला. ‘स्काइप इन द क्‍लासरूम’ या उपक्रमातून मागील वर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसूनच 10 ते 12 देशांची सफर घडविली. यासाठी विद्यार्थ्यांना येणारी इंग्रजी भाषेची अडचणही हळूहळू दूर केली. दोन वर्षापूर्वी त्यांनी ‘चला शिकूया’ हे अ‍ॅप तयार केले. त्यांचे ‘टेक्नीकल गुरूजन’ या नावाने यू-ट्यूब चॅनलही आहे. 2016 मध्ये ‘आधारवड’ हा एज्युकेशनल ब्लॉग बनवला असून त्यावर ते आपले अनुभव मांडतात. उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मितीचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. मायक्रोसॉफ्टचा हा बहुमान त्यांनी दुसर्‍यांदा मिळवला आहे. यासाठी त्यांना उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शाळेचे मुख्याध्यापक बी.एम.रणवीर, सहशिक्षक दिलीप श्रंगारपुतळे यांनी मार्गदर्शन केले.
नांदेडच्या सुनील आलूरकर यांनी 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील तंत्रस्नेही (टेक्नोसेव्ही) शिक्षकांचा ‘टीम झेडपी गुरूजी’ या नावाने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवला आहे. त्यातून सचिन ठाकूर यांना मायक्रोसॉफ्टच्या या उपक्रमांची माहिती मिळाली. त्यात आवड निर्माण झाल्याने ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या साईटवर अकाऊंट ओपन केले. त्यानंतर प्रोफाईल तयार करून ते लिंक-कनेक्टिंग साईन्सच्या माध्यमातून स्काइप या टूलचा वापर करू लागले. ते बाहेरील शाळांशी या टूल्सद्वारे संवाद साधतात तेव्हा खास विद्यार्थ्यांसाठी ते स्वतःचा लॅपटॉप शाळेत आणतात. ठाकूर सर म्हणाले, “ज्या शाळेशी संवाद साधायचा आहे तेथील शिक्षकांचे प्रोफाईल पाहून, त्यावरील माहिती वाचून त्यांचं काम समजून घ्यावं लागतं. त्यानंतर त्यांना रिक्‍वेस्ट पाठवून आपल्या सोयीनुसार तारीख व वेळ देऊन संवाद साधता येतो. मुलांसाठी हा आगळा अनुभव ठरतो.” 
आजवर त्यांनी देश-विदेशातील 14 शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यात सोहेर झाकी-इजिप्‍त, पेंचन काँगपेट-थायलंड, रॅमिया अलसद--इजिप्‍त यांच्यासह भारतातील दिल्‍ली, गुडगाव, चेन्‍नई, हरियाणा आदी ठिकाणच्या शाळांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील रणजित डिसले-कोल्हापूर, सोमनाथ वाळके-बीड, मंजुषा स्वामी आदींशीही संवाद साधण्यात आला.
अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळा आयाम देणार्‍या शिक्षकांना हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. यावर्षी जगभरातून 7 हजार 600 शिक्षकांनी यासाठी अर्ज केला होता. भारतात 456 जणांना अशा प्रकारचे पुरस्कार देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात केवळ 6 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्काराविषयी ठाकूर सर सांगतात, “मायक्रोसॉफ्ट स्काइप या टुल्सचे जगभरात 7 हजार 600 शिक्षक सभासद आहेत. एप्रिल महिन्यात शेअर केलेल्या लिंकवर नोंदणी केल्यानंतर मायक्रोसॉफ्टने 2 मिनिटांचा पीपीटी मागवला होता. तसेच तुम्ही कधीपासून यावर काम करता, मागील वर्षभरात केलेले काम व भविष्यात कशाप्रकारे काम कराल? असे 3 प्रश्‍न त्यांनी विचारले होते. त्याआधारे माझी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मागील वर्षीदेखील मला हा बहुमान मिळाला आहे.” 
- बाळासाहेब काळे.

पोरक्या लेकरांचं जग : भाग 11


कुणीच पालक नाहीत आणि कुणाला तरी लांबचे का होईना पालक, नातेवाईक आहेत अशा दोन प्रकारची 'अनाथ' मंडळी संस्थेत वास्तव्यास असायची. पालकत्वाची जबाबदारी स्वतःहून नाकारणारे आणि सो कोल्ड नैतिक व्यवस्थेमुळे झालेली अनाथ बालके ही जणू निर्मिती प्रक्रिया अनाथालयांचा कणा होता की काय वाटत राहायचं. कारण ही प्रक्रिया अव्याहतपणे चालूच असायची. पालकत्त्वाची जबाबदारी नाकारणारी असंख्य बेगडी, स्वार्थी नातीही याच मुशीत पाहायला मिळाली. एकीच्या पालकांनी मुलीला 4 वर्षाची असताना संस्थेत दाखल केलं आणि ती एकदम 18 वर्षाची झाल्यावर घरी घेऊन जाण्यासाठी उगवले. 
मला सख्खी कोणतीही नाती नाहीत पण ज्यांची डोळ्यासमोर नाती दिसायची त्याचेही अनेक पैलू हळूहळू इथंच उलगडत गेले. 
तिघा भावंडांना रेल्वे ट्रॅकखाली सोडून देणारा सख्खा बाप, स्वतःच्याच पोरीवर जबरदस्ती करणारा बाप, भाऊ, पहिलं लग्नं फसलं म्हणून दुसरं लग्नं करायच्या आधीच पहिल्या नवऱ्याची मुलं संस्थेत सोडून जाणारी जन्मदात्री, घटस्फोट झाला म्हणून मुलांची जबाबदारी नाकारणारे पालक, 2-4 एकर शेती असलेल्या आजीने 7,8 वर्षाच्या दोघा नातवांना सांभाळता येत नाही म्हणून अनाथालयात आणून सोडले. आई घरातून निघून गेली/वारली पण वडील सांभाळू शकत नाही; यासारखी कितीतरी समाजमान्य नाती केवळ पालकत्व न निभावण्याच्या फोल कारणांनी संस्थेतील अनाथांची संख्या वाढवत असायची. संस्थेला जितक्या बालकांची मंजुरी तितकी बालकं असायचीच. अर्थातच यात मुलांचा दोष नव्हता. पण आपली पुरुष प्रधान संस्कृती बाईनंच पालकत्व निभवावं, अशी असल्यानं बऱ्याच कमी शिक्षित आया, आज्या आपल्या लेकरांना अनाथालयात सोडून जायच्या. 
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत अशी पालक असलेली मुलं सुट्टी संपवून पुन्हा संस्थेत दाखल व्हायची तेव्हा त्यांच्याकडे घरचा खाऊ, नवीन 3, 4 ड्रेस (जो आम्हाला फक्त एकच मिळायचा), शॅम्पू, तेलाची बाटली, पावडर मेकअपचं सामान असं काय काय घेऊन यायची. ही सगळी हौस मौज करायला यांच्याकडे पैसे आहेत आणि स्वतःचं पोर सांभाळायला संस्था कशाला हवी? असे प्रश्न तेव्हा मला पडायचे. त्यातील काही मुलांना त्यांच्याच पालकांकडून धोका आहे हे कळल्यावर ‘स्व ओळख’ ही अडचण सोडता आमच्यापेक्षा या पालक असलेल्या मुलांची अवस्था दयनीय आहे, हे लक्षात यायला लागलं. 
मी समाजमान्य नात्यांनी जन्मले नाही, मला का टाकलं? अनैतिक, पाप असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्या मनात थैमान घालायचे. पण तेव्हाच समाजमान्य नात्यांनीही फार काही मोठा तीर मारला नाही, हेही वेगवेगळ्या अनुभवांनी अधोरेखित व्हायचं.
कधीतरी एका क्षणी मी एका मोठ्या ताईला जिला आई होती नकळत भांडणात बोलून गेले. 'तुमच्या घरी टीव्ही, फ्रिज, स्वतःच घर आहे. अगदी तुला तुझी आई आहे (तेरे पास माँ हैं टाईप) तर इथं अनाथ म्हणून कशाला राहतेस? फुकट सगळं मिळतं म्हणून आलात ना? आईचा भार कमी करायला? तू तुझ्या आईकडून लाड करून घेतेस आणि इथंही करून घेतेस.'
एवढं बोलल्यावर तिने अंगावरचा फ्रॉक काढला आणि उघडी छाती दाखवली. म्हणाली “बघ गाये, मी रात्रभर घराच्या बाहेर उभी राहावी म्हणून आईनं मला कसे चटके दिलेत. एक काका आला होता तिच्याकडे झोपायला. छोट्याश्या खोलीत मला झोपायला जागा नव्हती. मग रात्रीचा पहारा मला द्यायला लावला तिने घराबाहेर उभं करून. तेव्हापासून मला आईची घाण वाटते. तुला बरंय तुझी आई किमान किती पुरुषांबरोबर झोपते हे तुला कळत नाही. पण, मला दर सुट्टीत तिचे वेगवेगळे पुरुष पहायला मिळतात. माझी आई जगाला दाखवत नाही पण मला माहितीये ती वेश्या आहे. आता बघ, 18 पूर्ण होऊन मी संस्था सोडायचीच ती वाट पाहतेय. मग ती माझं लग्नं लावून देईल तिच्या एका यारासोबत” हे सांगताना तिच्या डोळ्यातलं पाणी त्या चटका बसलेल्या फोडावरून घरंगळत गेलं. डोळ्यातल्या खाऱ्या पाण्यामुळे तर तिची जखम जास्तच चरचरीत झाली. “एक हात नाहीच आहे आपल्याला या दुःखापेक्षा एक हात सडका आहे आणि तो आपण काढूच शकत नाही आपल्या शरीरातून याचं दुःख क्षणाक्षणाला बोचत असतं गं.” 
माझं ते वाक्य तिला इतकं लागलं की त्याच वर्षी तिने संस्थेला राम राम ठोकला. कालांतराने तिची माझी सहज रस्त्यावर गाठ पडली तेव्हा लक्षात आलं की संस्थेतील वातावरण किमान मुलींसाठी तरी जास्त सुरक्षित होतं. दुदैवाने तिच्या बाबतीत फारच वाईट झालं. 24 तास दारूत बुडलेला घोड नवरा, मारहाण, शिवीगाळ, 3 पोरं या पलीकडे तिचा संसार नाही.
हे सगळं पाहून बरं झालं आपलं आयुष्य कुणा पालकांच्या ताब्यात नाही या जाणिवेने स्वतःचं अनाथपण साजरं करावसं वाटायचं. 18 वर्षानंतर आपणच आपले माय-बाप ही संकल्पना 'समाजमान्य' नात्यांची अनेक फोल उदाहरणं पाहिल्यावर मनाला स्पर्शून जायची. तरीही समाजमान्य नात्यांच्या अनेक चांगल्या पैलूंचं गारुड माझ्या मनावर आहेच. त्यामुळेच समाजमान्य नात्यांचा हव्यास अनेक वर्ष टिकून राहिला आहे.
- गायत्री पाठक

‘स्मार्ट’ कुसळंब

''गावाचा विकास हा एकच अजेंडा गावकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे प्रत्येक प्रत्येक शासकीय योजनेच्या जोडीला गावकरीही लोकसहभागातून निधी उभारतात. योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचा किंवा त्यातून नवीन काही करण्याचा प्रयत्न असतो.''कुसळंब गावच्या सरपंच रोहिणी पवार सांगत होत्या. ग्रामसेवक दत्तात्रय लोमटेही दुजोरा देतात. 
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातलं 'स्मार्ट' गाव- कुसळंब. लोकसंख्या ३ हजार १४०. कुटुंब ६३१. 
साधारण तीन वर्षांपूर्वी १३व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लॅन्ट आणि वॉटर एटीएम सुरू करण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारचं जिल्ह्यातलं पहिलंच वॉटर एटीएम. अवघ्या 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी.
दोन वर्षांपूर्वी स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत गावात कचरा संकलनासाठी घंटागाडीची खरेदी. डंपिंग ग्राउंड. साधरण पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचचं संकेतस्थळही करण्यात आलं. पाणंदमुक्तीची योजना सुरू होताच वर्षभरापूर्वीच अवघ्या एका महिन्यात पाणंदमुक्ती. गावात १२ फुट झाडांचं रोपण करण्यात आलं.
सध्या गावची करवसुली जवळपास ९० टक्के. शंभर टक्के वसुलीसाठी ग्रामपंचायतीनं जय मल्हार पिठाची गिरणी सुरू केली. कर भरणााऱ्यांना मोफत दळण.
ग्रामपंचायतीनं संत गाडेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही राबवलं. यंदा औरंगाबाद विभागाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार कुसळंबला मिळाला.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत कुसळंबनं तालुकास्तरावर प्रथम येत दहा लाख रुपयांचं आणि जिल्हास्तरावर प्रथम येऊन ४० लाख असं एकूण ५० लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं. ही रक्कम मिळाल्यानंतर यातूनही विविध विकासकामं करण्यात येणार आहेत.
-अमोल मुळे.

पोरक्या लेकरांचं जग : भाग 10


खंड्या(खंडेराव), बारक्या(बाळकृष्ण), पोपट्या(पोपट) आणि गाई म्हणजे मी गायत्री! तर अशा चौंघांची आमची लहानपणी लै गट्टी. खंड्या म्होरक्या. त्याच्या उग्र, हिंस्र स्वभावाला सगळेच घाबरायचे. त्याला एखादी वस्तू मिळाली नाही की मारहाण ठरलेली, अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत. बरं, याला कोणी मोठी लोकं मारायला धावली की हा पठ्ठया हात, तोंड वेडंवाकडं करून फिट्स आल्याचं नाटक करायचा. तेव्हा मारणं बाजूला राहून त्याला कांदा, चप्पल दाखवून मूळ पदावर आणेपर्यंत मुख्य हाणामाराची घटना विसरलेली असायची. दुसऱ्याच्या हातातलं हिसकावून घेणे, कोणत्याही खेळात त्याच्यावर राज्य कधीच येणार नाही असा खेळ खेळणे, बॅटिंगला नेहमीच पहिलं, किमान 5 वेळा आऊट झाल्याशिवाय ऑफिशियल आऊट म्हणून डिक्लेर करायचं नाही, अशा कितीतरी गोष्टी खंड्यासाठी आम्ही भावंड (मी सोडून) करत असू.
पोपट्या नावाप्रमाणेच बोबडं बोलणारा. बनेल, एक पायाने अधू, सतत सहानुभूती मिळवणारा, खंड्यापेक्षा स्वभावाने सौम्य पण बुद्धीने हुशार, चिडला की कुणाचंच न ऐकणारा. कुणी त्याच्या वाटेला लागलं की शिस्तीत सगळ्यांची धुलाई करणारा. बारक्या सगळ्या खेळात प्रवीण व्हायचा प्रयत्न करायचा. शाळेत 35 टक्यांवर पास होत असला तरी आपलं अक्षर सुंदर असावं, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारा. विशेषतः खंड्याचा सख्खा धाकटा भाऊ असल्याने खंड्याला घाबरून कुणी त्याच्या नादाला लागायचं नाही.
मी. 'आप तो मुझे जानतेही हो!!!' खुद की क्या तारीफ करू?? तर आम्ही सगळे अगदी लंगोट मित्र बरंका! (बाळ असल्यापासून) त्यांच्याबरोबर तालमीत खेळताना मीही लंगोट घालायचे ना! आम्हा चौघांना इतर भावंडं जॅम टरकून असायची. आम्ही इतरांशी खूप भांडायचो, खोड्या, हाणामाऱ्या करायचो पण आपापसात एकमेकांना टरकून असल्यानं चौघेही एकमेकांच्या नादी लागण्यापेक्षा मित्र होणं जास्त पसंत करायचो. एकदा गोट्या खेळताना मी जास्त गोट्या जिंकल्या म्हणून खंड्या, पोपट्या आणि माझ्यामध्ये वादावादी झाली. तेव्हा ही पोरगी, सहज मारून गोट्या काढून घेऊ म्हणून दोघं अंगावर धावून आले. मीही तेव्हा कराटेच्या क्लासला जायचे. किक, साइड किक कशी मारायची हे शिकवल्यामुळे मस्त दोघांच्या गोट्यांवर लाथ मारली होती. तेव्हापासून ते माझ्या वाटेल लागले नाहीत कधी.
मोठे झालो तसं खरंच सगळे विखुरलो. 18 वर्षांनंतर अनाथ आश्रमातून बाहेर पडायला लागल्याने या तिघांचंही शिक्षण अपूर्ण राहिले. खंड्या-बारक्याची आई त्यांना घेऊन गेली त्याच्या गावी. पोपटराव कुठं उडताहेत पत्ता नाही. आता माग काढतेय जुन्या मित्रांचा. प्रत्येकाचा संस्था सोडल्यावरचा प्रवास निराळा, संघर्ष निराळा पण अनाथपणाचं ओझं मात्र तेवढ्याच वजनाचं आहे. मी शोधतेय हे अनाकलनीय वजन कसं उतरवता येईल माझ्यासकट यांच्या खांद्यावरूनही...
परीक्षा कधी संपते आणि मे महिन्याच्या सुट्ट्या कधी लागतात अशी आमची इतर कुटुंबातील मुलांसारखी मागणी कधीच नसायची. वाटलं तर अभ्यास कर, शाळेला जा, झोपा काढ नाही तर 'खा खीर, बोंबलत फिर' अशी काहीशी प्रेरणा आम्हाला आमच्या मोठ्या ताई दादांकडूनच मिळालेली. मोठे ताई दादा हे 7वी, 8 वी, 10 वी पलीकडे न गेल्याने त्यांच्यासारखंच कुठेतरी चपराश्याची नोकरी करू किंवा लग्न करून दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू. 18 पूर्ण झाल्यावर संस्था दुसऱ्या महिलाश्रमात भरती करेलच, हीच मानसिकता. शिक्षणाविषयी अनास्था आणि समोर कोणतंच रोल मॉडेल नाही. त्यात संस्थेने दिलेली मोकळीक. मी तर 'अय्या, आपण 7 वीत कसे काय पास झालो? जाऊ दे, पास झालेच आहे, तर चला पुढे शिकू!' असं करत मी अखेर 10 वी गाठली. परिक्षेच्याच आधी अभ्यासाला बसायचं असतं हे आम्हाला माहिती! संस्थेत शिकवणी घ्यायला बाई यायच्या पण तिथंही शाळेसारख्याच दांड्या.
रोजचा खेळ भातुकली, क्रिकेट, गोट्या नाहीतर लगोरी, ह्याला मार त्याला मार यातच आमचा दिवस जायचा. अशा या दैनंदिनीत शाळेला रोजचं सुट्टी. अभ्यासाचा लोड कधीच घ्यायचा नसल्याने मे महिन्याचं कौतुक आम्हाला कधीच नव्हतं. पालक असलेली मुलं शाळेला सुट्ट्या लागल्या की घरी निघून जायची. मे महिन्यात खेळायला फार कुणी नाहीत, आश्रम एकदम शांत शांत व्हायचा. नव्हे, भकास वाटायचं. इतर मुलांच्या आया, मामा वगैरे त्यांना भेटायला आले तरी माझ्या मनात अनाथ असल्याची कालवाकालव व्हायची. 'यार झोपडी का असेना त्यांची, पण ती आईच्या कुशीत तरी झोपत असेल ना', या विचाराचं थैमान मनात.
जी 10-15 मुलं सुट्टीत उरायची त्यांच्यासाठी खास 4 दिवसांची ट्रिप निघायची. संस्थेकडे आम्हा मुलांचे लाड पुरवायला पैसा नव्हता. पण, संस्थाचालक त्यातल्या त्यात, मुलांना आनंद कसा मिळेल हेही पहायचे. ट्रिप गणपतीपुळे, कोकण, असं लांब निघायची. तीही एका ऍम्बुलन्स मधून! कारण तीच संस्थाचालकांच्या मालकीची असल्याने मुलांना ही चैन ते करू द्यायचे, तेही आनंदाने. कधीतरी गाडीत बसल्यामुळे उलट्यांचा त्रास होणाऱ्या आम्हा मुलांना अख्ख्या ट्रिपभर वाळीत टाकलेलं असायचं, कोपऱ्यात कुठेतरी जागा. गाडीत दाटीवाटीने बसून गाणी, मस्कऱ्या करण्यात रममाण असायची. बऱ्याचदा गाडी धुतलेली नसल्याने ऍम्बुलन्सचा तो भयंकर वास! या ट्रिपमध्येही संस्थेतील मुलं कमी आणि संस्थेतील अधीक्षकांची मुलं, बायका, नातेवाईकांच्या मुलांचाही भरणा जास्त. मग खिडकीजवळची सीट यांच्या मुलांना आधी द्या असा प्रघात असायचा.
संस्थेचा अधीक्षक आणि मुलं हे एक भयंकर नातं प्रत्येक संस्थेत पहायला मिळतं. जन्माचे वैरी असंच त्याचं वर्णन करावं लागेल. क्वचित, एखाद्या संस्थेला मुलांचं खरंच हित पाहणारा चालक मिळतो. म्हणूनच, आम्हा मुलांचा भावनिक, व्यक्तिगत जो काही विकास झाला, तो संस्था सोडल्यावरच!
- गायत्री पाठक

ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातली सीमा झाली पोलीस निरीक्षक

नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं दुर्गम खरवंडी गाव. याच गावात वडील, पाच चुलत्यांसह एकत्र राहणारं काशिनाथ खंडागळे यांचं कुटुंब. कुटुंबातली मुलगी सीमा. शिकून स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचं स्वप्न बघणारी. त्यासाठी कष्ट घेणारी. गावकरी म्हणत, पोरीला कशाला शिकवता? लग्न करून टाका. पण कुटुंबाने याकडे साफ दुर्लक्ष केलं. खंडागळेेंची स्थिती बेताचीच. शेती पावसावर अवलंबून. जिल्ह्यात जिथून बोलावणं येईल तिथे ऊसतोडणीला जायचं. मात्र, शिक्षणाअभावी आपली हेळसांड झाली तशी मुलांची होऊ द्यायची नाही असं खंडागळे कुटुंबातल्या ज्येष्ठांनी पक्क ठरवलं होतं. त्यामुळेच सीमा पोलीस उपनिरीक्षक झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात अनुसूचित जाती प्रवर्गात ती राज्यात 14 वी आली . कुठलीही शिकवणी न लावता तिनं हे यश मिळवलं. 
गावातल्या जिल्हा परिषद शाळेत तिचं प्राथमिक शिक्षण. मनमाडमधल्या सेंट झेवियर मनमाड बोर्डिंग स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण.इंग्रजी आणि इतिहास विषय घेऊन पदवीपर्यंत शिक्षण. नाशिकच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी तिनं सुरू केली. हवालदार भर्तीत ती अवघ्या एका गुणानं अपयशी ठरली. कोणाचंही मार्गदर्शन नसल्यामुळे दिशाहीन घोकंपट्टी सुरू होती. कालांतरानं गणेश सास्ते यांचं मार्गदर्शन मिळालं. सास्ते सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये लेखापाल. एमपीएससीसाठी अभ्यास नेमका कसा करायचा, प्रवेश अर्ज कसा भरायचा, याचं मार्गदर्शन त्यांनी सीमाला केलं.
घरचे पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानंच यश मिळाल्याचं सीमा सांगते. तहसीलदार होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिच्या यशाबद्दल येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.
 - प्राची उन्मेष.

पोरक्या लेकरांचं जग : भाग 9


एखाद्या बालकाच्या वाट्याला 'अनाथपण' येतं, त्याला एकटी कुमारी, विधवा माता जबाबदार नसते. तर एकूणच ढासळलेली कुटुंबव्यवस्था जबाबदार असते.
अनोळखी ठिकाणी, रस्त्यावर अचानकपणे सोडलेल्या बालकांची अवस्था कुमारी मातांच्या मुलांपेक्षा फारशी वेगळी नाही. कुमारी मातांवर मातृत्व लादलेल्या घटना त्या निर्दोष असल्याची ग्वाही देतात. पण समाजमान्य मुलं जन्माला घालून केवळ सांभाळता येत नाहीत, म्हणून बेजबाबदारपणाने आपल्या बालकांना सोडून दिलेल्या पालकांना इथं कोणतीच शिक्षा नाही. आपला समाज कुमारी मातेला जितकी नावं ठेवतो, तितकी लग्नाच्या बाळाचा त्याग करणार्‍याला नावं ठेवत नाही. ही मोठी वैचारिक गडबड आहे. जन्म देलेल्या बाळासाठी पालक म्हणून सर्वार्थाने जबाबदार असणं, हे साधं मूल्य सुशिक्षित मानत नाहीत. तर, अशिक्षितांकडून काय अपेक्षा करायची? घटस्फोटितांची संख्या वाढत असताना बालकांचे मूलभूत हक्क सोयीने विसरणारा आपला समाज! प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्याच हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढतेय, असं जाणवत राहतं. पालकांच्या बेजबाबदार वागण्याला कोणतंही न्यायालय कोणतीच शिक्षा न करता, त्या बालकालाच जेव्हा अनाथाश्रमात धाडून निराश्रित म्हणून आजन्म शिक्षा देत राहतं, तेव्हा 'उद्धवा, अजब तुझे सरकार!' असं म्हणावसं वाटतं.
माणुसकीला, ममत्वाला, नात्यांना आणि बालकांच्या हक्कांना, अधिकारांना पायदळी तुडवून एकूणच सोयीने मूल्यशिक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा आपणही एक भाग आहोत, याची साधी जाणीवही आपल्याला होत नाही, हे खरं दुर्दैव. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून टाक पोराला अश्रमात, नवऱ्याने सोडून दिलं म्हणून, पोरं सांभाळता येत नाही म्हणून, अर्धवट शिक्षण, कधी एकल पालकत्व, तर टाक आश्रमात... अनाथालयं तुडुंब भरून गेली आणि जणू अनाथालयांच्या निर्मितीचा कारखाना चालू झाला. तो आजही ओसंडून वाहतोय.
आपल्या मुलींना लग्न करून धाडायच्या आधी स्वावलंबी बनवणं, अन्याय सहन न करणं, जबाबदारी न टाळणं, पुरुषी व्यवस्थेला बळी न पडणं या गोष्टींचं शिक्षण द्यायला समाज गेली अनेक वर्ष विसरत आहे की काय? अशी स्थिती. दुसरीकडे पराकोटीचा स्वार्थ, बदले की आग, हतबलता या सर्व कारणांमुळेही बालकांचे हक्क आणि अधिकार वेशीला टांगले जात आहेत.
हीच मुलं जेव्हा मोठी होतात, तेव्हा ‘अनौरस’ असा व्रण जरी त्यांच्या मनात नसला तरी बेजबाबदार पालकांची आपण अपत्य आहोत, याची बोच कायम त्यांच्या मनात असते. एक वेळ कुमारी मातेचं मूल आईला सहज माफ करू शकतं. पण बेजबाबदार पालकांचं मूल आपल्या आईवडि‍लांना कधीच माफ करत नाहीत.
- गायत्री पाठक

... आणि रडणारी अदिती शिकू लागली!

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आमची बहिरामकोटक जिल्हा परिषद शाळा. आमच्या शाळेत अदिती पाटील नावाची एक मुलगी पहिलीत दाखल झाली होती तेव्हाची गोष्ट.
अदिती शाळेत बसायला तयारच नसायची. शाळेत आली की सारखी रडायची, घरी जायचा हट्ट करायची नाहीतरी कोपऱ्यात गप्प बसून राहायची. अगदी मधल्या सुट्टीतसुद्धा इतर मुलांसोबत खेळत नसे, कुणासोबत मिसळत नसे. तिच्या रडण्यामुळे आणि चिडचिड्या स्वभावामुळे इतर मुलं तिला चिडवायची, त्यामुळे अदिती जास्तच कोषात जात होती.
मला सुरूवातीला वाटलं, पहिलीत बसताना मुलं त्रास देतातच, कारण त्यांना शाळेची फारशी सवय नसते. पण हळूहळू लक्षात आलं की शाळेतली बाकीची मुलं दोन महिन्यात धूळपाटीत अक्षरे गिरवायला लागली, पण अदितीला मात्र त्यात साध्या रेघोट्याही ओढाव्या वाटायच्या नाहीत. अदिती गतिमंद आहे, हे माझ्या लक्षात आलं. तिला शाळेत टिकविण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे नाहीतर अदिती कायमची शाळेपासून दूर जाईल आणि शाळाबाह्य होईल, हे उमगलं.
अदितीला शिक्षणाची गोडी लावायची असेल तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिकवून चालणार नाही. तिच्या आवडीप्रमाणे तिला गोष्टी पुरवायला हव्यात. तिच्या गतीनं, तिच्या कलानं घ्यायला हवं हे जाणवलं. तिच्यासाठी वेगळं काय करता येईल याचा मी विचार करू लागलो. दरम्यान सातत्याने तिच्याशी संवाद, तिला प्रेमाने थोपटणं, शाळेतले रंगीत शैक्षणिक साहित्य खेळायला देणं सुरू ठेवलं. एके दिवशी असाच तिला शाळेचा अल्बम पाहायला दिला. तिला तो खूप आवडला, अदिती त्यात रमली. त्यातील व्यक्ती ओळखू लागली आणि मग मला एक युक्ती सुचली.
मी तिच्या घरातील व्यक्ती, वस्तू, प्राणी यांचे फोटो काढून त्यापासून अदितीसाठी एक पुस्तक तयार केलं. त्यामध्ये तिचे आई – वडील, आज्जी- आजोबा, भाऊ- बहीण, तिचं घर, तलाव, होडी असे फोटो चिकटवून हे अभिनव पुस्तक तिच्या समोर ठेवलं. मग त्या फोटोंच्या साहाय्याने तिला मुळाक्षरांची ओळख पटवून देऊ लागलो. अदितीला सर्वसामान्य पुस्तकांतून मुळाक्षरांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर ते तिला पटलं नसतं. कारण आपल्या पुस्तकांत एक स्त्री लहान मुलाला घेऊन असते अन् त्या पुढे शब्द असतो ‘आई’. सर्वसामान्य मुलांना समजतं की ही ‘आई’ आहे. पण अदितीसाठी आई म्हणजे फक्त आणि फक्त तिचीच आई. अदितीसाठी घर म्हणजे फक्त आणि फक्त तिचं घर.
अदितीला पुस्तक खूप आवडलं कारण तिचं घर, तिचं जग आता शाळेत आलं होतं. तासनतास त्या पुस्तकातील फोटोत, त्या शब्दांत रमून जाऊ लागली. आता ती रोज शाळेत येऊ लागली, शाळेत बसू लागली. ती फोटो वरून मुळाक्षरे, शब्द ओळखू लागली. मग मी तिच्या आईच्या फोटो सोबत ‘आ’ वरून सुरू होणारे आगगाडी, आरसा, आकाश असे शब्द तिला शिकविले. त्यांची चित्रे दाखविली. मग अदिती हळूहळू धूळपाटीवर लेखनाचा सराव करू लागली. अदितीला अक्षर आणि अंकांची ओळख होऊ लागली.
माझा उद्देश सफल झाला, कारण आमची रडणारी अदिती आता शाळेत रमली आहे बरं!

- राजेश भोईर, शिक्षक.

पोरक्या लेकराचं जग - भाग 8


जिजाचा काका तिला आणि बाळाला संस्थेत सोडून पसार झाला, तो कधी पुन्हा आलाच नाही. तेव्हा मी 10 वीत होते. जिजाचा चेहरा फारच काळवंडलेला होता, पण एकूण जिजा दिसायला फटाका होती. आम्ही तिचा अवतार नीट करत असू. संस्थेतली मोठी वयात आलेली मुलं तिच्याभोवती पिंगा घालायची. मग आम्ही मुली तिच्या संरक्षणासाठी तयार व्हायचो, ढाल म्हणून. काय तिची उंची, गोरा रंग. नाकेडोळी मस्त. नुकतीच बाळंत झाली असली तरी तिचा कमनीय बांधा सॉलिड होता. त्यात तिने साडी नेसली की विचारता सोय नाही. पण तिच्या एकूण चेहऱ्यावरील हालचाली वेडसरपणाकडे झुकलेल्या होत्या. ती असंबद्ध बडबडत असायची. मधूनच शून्यात जायची.
''हनम्या हाजीर हो... गणप्या हाजीर हो.... नाग्या हाजीर हो.... '' अशी अनेकांची ती नावे घ्यायची. जणू ती कोर्टात आहे, असं तिला वाटत राहायचं.
''हवालदार सायेब हा नाग्या .... रक्त निगेपर्यंत ओठ चावलं रें रांडच्या...'' म्हणून रडत स्वतःच्या योनीवर, छातीवर मारून घ्यायची. तिचं हे रूप बघून आम्ही खूप घाबरायचो.
मग तिची रवानगी अनाथालयातल्या तळघरात झाली. आता तळघरात ती आणि तिचं बाळ असं दोघेच. तिला एकटीला असं संस्थाचालकांनी कोंडून ठेवल्यामुळे आम्ही अस्वस्थ व्हायचो. बाळाशी तिचं असलेलं नातं कधी अतीव ममतेचं असायचं तर कधी भयानक क्रूर असायचं. तळघरात ठेवल्यावर तिसऱ्याच दिवशी बाळाच्या अंगावर नखांनी ओरबडल्याचे व्रण दिसले. बाळाच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. बाळाच्या तोंडावर ती काजळ फेसायची. स्वतःवर लादलेल्या या बाळंतपणाचा निषेध व्यक्त करायला ते एक बाळच हातात होतं तिच्याकडे. बाळाच्या अंगावर झालेल्या जखमा, तिने बाळाचं केलेलं काळ तोंड पाहून आम्ही पुरत्या हादरून गेलो होतो. तिचं बाळ तिच्याकडून काढून घेतलं.
बाळंत झाल्यापासून तिने बाळाला दूधच पाजलं नव्हतं. अवघ्या 4 दिवसात त्या जीवाने प्राण सोडला. ती त्याच ठिकाणी शून्यात नजर हरवून बसलेली मला आजही दिसते.
अशा रस्त्यावरच्या अनेक मनोरुग्ण स्त्रिया आहेत, ज्या दरवर्षाला प्रेग्नंट राहतात आणि संस्थेत येऊन बाळ दाखल करतात. काहींचा यात मृत्यूही होतो .
(मजकुरात उल्लेखलेल्या व्यक्तींची नावं बदलली आहेत.)
- गायत्री पाठक

विक्रमगडचा सर्पमित्र

“सकाळची वेळ. फोन वाजला. यशवंत नगरमधील प्रमोद डंबाळी यांच्या घरावर साप दिसल्याने त्यांनी फोन केला होता. घरात सगळे घाबरले होते. मी लगेचच बाहेर पडलो. एक विषारी नाग घराच्या कौलांवर बसला होता. मी घरावर चढलो. वर कौलं असल्याने चढणं सोपं नव्हतं. तरीही मी तिथे चढलो.कधीही पाय घसरुन पडण्याची भीती वाटत होती. तरीही, तो विषारी नाग पकडला. मात्र, खाली उतरत असताना दोन वेळा पाय घसरला. मनातून थोडी भीती वाटत होती. कारण हातात विषारी साप. तोल गेला तर साप हातातून सुटेल आणि आणि आंगावर पडला तर विषारी दंशाची भीती. स्वत:ला सावरत खूपप काळजीपूर्वक खाली उतरलो.” गोपाळ दीक्षित सांगत होते. आणि आवाजातूनही त्या वेळचा थरार डोळ्यासमोर उभा राहत होता.
पालघर जिल्ह्यातलं विक्रमगड. येथील गोपाळ दीक्षित. विक्रमगड हायस्कूलमध्ये ते शिक्षक आहेत. सर्प मित्र ही सरांची दुसरी ओळख. कुठे साप दिसला की ''दीक्षित सरांना फोन करा'' हेच वाक्य अनेकांच्या तोंडी अगदी सहज येतं.
सापांविषयीच्या गैर समजामुळे साप दिसताच त्याला ठार मारण्यात येतं. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक. गोपाळ दीक्षित हे 19 वर्षांपासून साप वाचविण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 1700 सापांना जीवनदान दिलं आहे. विशेष म्हणजे कुठंही साप पकडायला ते स्व-खर्चाने जातात. त्यासाठी काही मानधनही घेत नाहीत.
दीक्षित यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून त्यांना ‘सर्प मित्र’ म्हणून ओळखपत्र मिळालेलं आहे. आणि असं ओळखपत्र मिळवणारे ते पालघर जिल्ह्यातील ते पहिलेच आहेत. त्यांनी अनेक संस्थांसोबत पर्यावरण विषयक जनजागृतीमध्ये सहभाग घेतला आहे. विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात वन विभागाच्या साहाय्याने वन्यजीव संवर्धनामध्ये त्यांनी मोलाचे सहकार्य केलं आहे.
नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजलं जातं. पण, साप दूध पीत नाही. सापाची शरीर रचना मांसाहारी असल्याने तो दगावतो. शेतकऱ्यांचा मित्र ही खरी सापाची ओळख.शेतीसाठी उपद्रवी ठरणाऱ्या उंदरांना साप खातो. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत नाही. भारतात सापाच्या 263 जाती आहेत. यापैकी काही बिनविषारी, विषारी व काही सौम्य विषारी आहेत. मात्र, बिनविषारी सापांचे प्रमाण जास्त आहे.
नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजऱ्या, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी. धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीण, पाणदिवड, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यात 23 प्रकारचे साप आढळतात. अशी माहिती गोपाळ दीक्षित यांनी दिली. त्यांनी आत्तापर्यंत विविध जातीचे साप पकडून विक्रमगड, जव्हार, डहाणू परीसरातील जंगलात सोडले आहेत. शाळा-काॅलेजमधील विद्यार्थी तसेच शेतकरी बांधव, दुर्गम डोंगराळ भागातील लोक यांना विषारी-बिनविषारी सापांविषयी माहिती देऊन अंधश्रध्दा, गैरसमज दूर करणे, सर्प हत्या थांबविणे, सर्प दंश झाल्यास प्रथमोपचाराची माहिती देणे आणि सापांचे महत्व समजावून देणे, मूल्यशिक्षण, पर्यावरण, परिसर, विज्ञान या विषयांशी संबधित माहिती देणे या उद्दिष्टांच्या पूर्तीकरता सर्पविषयक जनजागृतीची शिबिरे वन विभागाच्या सहकार्याने घेणार असल्याचे दीक्षित सरांनी सांगितलं.
दीक्षित सांगतात, “वन विभागाच्या सहाय्याने अनेक सापाना जीवनदान देणं शक्य झालं. दुर्गम भागात आपला जीव धोक्यात घालून निसर्गाचं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यास जे सर्पमित्र मदत करतात त्यांची सुरक्षा त्यांना किमान विमा कवच वनविभाग व महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दयावं, तसंच सर्पमित्रांना मानधन देण्यात यावं. प्रत्येक तालुक्यात सर्प पकडण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी साधने उपलब्ध करून द्यावीत.”
- सचिन भोईर.

पोरक्या लेकराचं जग :भाग 7


आ...ई, या दोनच अक्षरांत मी अनेक वर्षे वेगवेगळ्या विचारांनी अडकले होते. अजूनही अडकले आहे. आई या नात्याचा खरा लळा लागला तो माझ्या एका मैत्रिणीच्या आईमुळे! ती भरभरून प्रेम करायची. पण कुठंतरी काहीतरी हातच राखून आहे असंही वाटत राहायचं.
हे हातचं राखणं म्हणजे नेमकं काय, ते काही कुमारी मातांच्या अनुभवामुळे कळत गेलं. कुमारी मातांमधलं ममत्व कोरडं असतं, हे मी लहानपणापासून अनुभवत आले. ज्या माता स्वतःच्या पोटच्या गोळ्याला ममत्व देऊ शकत नाहीत त्या दुसऱ्याला काय देतील? हा विचार एकीकडे. पण दुसरीकडे वर्षाची आई, जना, श्रीरंगची आई यांच्या अनुभवामुळे आई काय चीज असते हे कायमचं कोरलं गेलं.
वर्षाची आई. सातव्या महिन्याचं पोट घेऊन संस्थेत आली होती. तिचं घराणं घरंदाज, राजकीय प्रस्थवालं ! बयो शिकत होती कॉलेजला. मामाच्या मित्रावर तिचं प्रेम. बऱ्याचशा माता निराश मनानं इथं 'रिकामं' व्हायला यायच्या. पण हिला तसं 'रिकामं' व्हावं असं, वाटत नव्हतं. गरोदरपण एन्जॉय करायची ती. तिला भेटायला आलेल्यांसमोर, आता बाळ इथं सोडणारच आहे, तर किमान सोडताना पोटातल्या बाळाचे लाड तरी पुरवा म्हणून 'मला हे खावंसं वाटतंय , ते खावंसं वाटतंय' म्हणून काहीबाही पालकांकडे मागत राहायची. पालकही मग खाण्यातले सगळे लाड पुरवायचे. संस्थेच्या लायब्ररीत दासबोध होता, हे तिनेच शोधून काढलं. रोज रात्री झोपताना न चुकता तो वाचायची. चिंचा, कैऱ्या तर तिच्या उशाशी असायच्याच. ते ती आम्हालाही द्यायची. खारीक, बदाम, काजू असेही श्रीमंती पदार्थही तिच्याकडे असायचे. मग काय 'खाण्यापूर्ती गट्टी' आमच्यात होतीच की!! तिच्या एकूण वागण्याबोलण्यात कसलाच गिल्ट नसायचा. संस्थेतल्या कामावरच्या बायका तिला 'रांडेला सवय दिसतेय कूस उजवायची, बघा किती बिनधास्त खिदळतेय कशी. लाज नाही कसलीच या पोरीला, घराचं नाव वेशीला टांगली आणि इथंही मजा करतेय.' वगैरे बोलून तिला इतर जास्तीची कामं सांगायच्या. पण बयो या सगळ्याकडे दुर्लक्षच करायची. कुणाचं लक्ष नसताना एकटीच कोपरा पकडून पोटातल्या बाळाशी बोबडं काहीतरी बोलत असायची, तासन् तास. त्या बाळाला धीर द्यायची, 'मी आहे कायम तुझ्यासोबत आहे.' एकटीच हुंदके देऊनदेऊन रडायची. त्या बाळासोबतचा सगळा संवाद कमालीचा ममतेचा.
ही आपल्या बाळाला का सोडून देणार आहे? मला प्रश्न पडायचा. 'काश मेरी भी माँ...' या वाक्यावर लगेच माझी कॅसेट अडकायची. लैच इमोशनल व्हायचे मग. एकंदरीत नको असलेलं मूल सोडतात हे एव्हाना मला कळलं होतं. पण हवी असलेली मुलंही का सोडतात, की सोडावी लागतात, हे माहीत नव्हतं.
बयो बाळंतीण झाली. छान गोंडस गोरेगोमटं बाळ. नर्सकडून स्वतःहून मागून घेत अचानकपणे तिनं इतके दिवस साठवलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. जिवाच्या आकांतानं ती धाय मोकलून रडायलाच लागली. तिची हॉस्पिटलमध्ये समजूत घालता घालता, डॉक्टर, नर्स, कामवाल्या बायकांच्या नाकी नऊ आले. शेवटी तिच्या आईवडिलांना बोलावलं.
कधीही याबाबतीत मोकळेपणाने न बोलणारी ती बयो तिच्या बाबांना एवढंच वारंवार सांगत होती. 'बाबा मी तुमच्या पायाशी राहते पण माझ्या बाळाला माझ्यापाशी राहुद्या, घरात, गावाकडच्या शेतात एका झोपडीत कुणाला दिसणार नाही असे दिवस काढेन, तुमच्या अब्रूला धक्का लागेल असं वागणार नाही पण मला याच्यापासून तोडू नका....' तिची एकेक वाक्य सर्वांच्याच काळजाला खिंडार पाडत होती आणि ते कोवळं पिल्लू आपल्या आईकडे टकमक निरागसतेनं हलकंच हसत होतं.
बयोचे हतबल आईवडील, डॉक्टर, नर्स, कामवाल्या बायका आणि हा नैतिकतेच्या कचाट्यात अडकलेला दुर्बल समाज तरी कशी आणि काय तिची समजूत घालणार होता?
(मजकुरात उल्लेखलेल्या व्यक्तींची नावं बदलली आहेत.)
- गायत्री पाठक

पोरक्या लेकरांचं जग भाग 6


माझ्या मनात उमलणार्‍या प्रेमाचा खरा अर्थ कळायच्या आधीच आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंत पोहचवणाऱ्या 'त्या' मैत्रिणीला थँक्स म्हणावं की तिचा आणि स्वतःचाही तिरस्कार करावं ,हे कळेनासं झालं होतं. त्यानंतर, समोर येणार्‍या कुमारी मातांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. येईल त्या बाळाविषयी अधिक ममत्वाची आणि कुमारी मातांवुषयी तिरस्काराची भावना मनात येऊ लागली. मी त्यांच्याशी फार बोलणंही टाळत होते.
या अशा मुली आपल्यासारख्यांना जीवांना जन्म देऊन सोडून जातात, कोरडेपणाने! कुणाच्या सुखासाठी आपलं जगणं विनाकारण अनौरस ठरलं? स्वतःविषयीच नाकारलेपणा!
मला ज्या शाळेत घातलेलं होतं त्या शाळेतल्या बाई मी संस्थेतील आहे, म्हणून जास्त तिरस्कार करायच्या. मी जरासं काही केलं तरी भयंकर मारायच्या. 'कुणाची आहे ही घाणेरडी ब्याद, या असल्या चांगल्या शाळेत या मुलांना का ऍडमिशन दिली जाते ? बाई घरातला, शाळेचा सगळा राग मला पट्टीने झोडपत काढायच्या. खूप अपमानास्पद वागणूक, मुद्दाम शिक्षा द्यायच्या. माझ्या बाजूने त्या बाईंना बोलणारे कुणीच नाही,याची बोच जास्त अस्वस्थ करायची. आपलं स्वतःचं कुणी असायला हवं, ही माझी माफक अपेक्षा तेव्हा, केवळ बाईंच्या तावडीतून सुटण्यासाठी होती. त्या बाईंमुळे मी 1ली ते 4 थी त्या शाळेला भयंकर घाबरून होते. त्यामुळेही आईने नाकारल्याची जाणीव अधिक स्पष्ट होत गेली. दुसरीकडे शाळेतल्या इतर मैत्रिणींच्या कुटुंबाकडे पाहून आपलं कुटुंब नसल्याची भावना जोर धरत होती.
5 वीत वेगळ्या शाळेत आले, तेव्हा माझी त्या मारकुट्या बाईपासून सुटका झाली. मी खूप आनंदात असायचे त्या शाळेत. तिथलं वातावरण मला जास्त आवडायचं. कारण तिथल्या एक बाईं माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या. इतकं कुणी प्रेमानं वागण्या -बोलण्याची मला सवय नव्हती. तिरस्काराच्या भावनेमुळे मी स्वतःच्याच नजरेतून कोलमडून पडले होते. ती उभारी लगेच कशी मिळेल? आपली जगण्याची लायकी नसताना का जगायचं? का जगतोय आपण? या विचाराने मी अनेक वर्ष न्यूनगंडात घालवली. कुणी दुःखावर फुंकर घालायला लागलं की, दुःखाची जाणीव अधिक गडद होत जाते, तसही काहीसं होत होतं माझ्या बाबतीत.
या शाळेत असतानाच मला कविता करण्याचा, वाचनाचा नाद लागला होता. त्याच दरम्यान देवयानी ययाती, ऍन फ्रॅंक, काही धार्मिक अशी पुस्तकं संस्थेत देणगी म्हणून आली होती. ती वाचल्यामुळे, कुमारी मातांच्या अनुभवामुळे आपल्याला किमान आई तरी हवी ,ही भावना बळावत गेली.
- गायत्री पाठक

रत्नागिरीची स्नेहज्योती

लहानगी आशिका. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ती संगीत विशारद झालीये. डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी तिच्या शाळेत येऊन दिलेली शाबासकीची थाप तिच्यासाठी खासच. मंडणगड तालुक्यातल्या घराडी इथली स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय , ही तिची शाळा. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली अंधशाळा. 
वर्ष २००३. वीज, पाणी यासारख्या मूलभूत सोयींचाही अभाव. मात्र आशाताई कामत आणि प्रतिभाताई सेनगुप्ता या दोघी बहिणींनी हार मानली नाही. ४ मुलांना घेऊन शाळा सुरू झाली. आज या शाळेत ५ ते १७ वर्षांची तीस मुलं आहेत. मुलामुलींसाठी वेगळी वसतिगृहं आहेत. त्यांचा राहण्याखाण्याचा , शिक्षणाचा संपूर्ण खर्च शाळा करते. अनेक दाते यासाठी मदत करत आहेत. व्यावसायिक शिक्षण, संगीत शिक्षण, विविध परिक्षांसाठी मार्गदर्शन.

संगणक प्रशिक्षणामध्ये अंधांसाठी असलेले खास software -JAWS शिकवलं जातं. वारी, दहीहंडी अशा कार्यक्रमातून आनंद लुटायला शिकवलं जातं .
मुख्याध्यापिका प्रतिभाताई सेनगूप्ता स्वतः ब्रेलतज्ज्ञ. त्यांनी ५० पेक्षा जास्त ब्रेल पुस्तकाची निर्मिती केली आहे.
शाळेला आतापर्यंत यमुनाबाई खेर पुरस्कारासह, लायन्स क्लब, चिपळूण आणि विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. २०१४ मध्ये चक्क सचिन तेंडुलकरनं शाळेला दिलेली भेट आजही शाळेतल्या सर्वांच्या स्मरणात आहे.
आगामीे काळात स्नेह्ज्योतीला अंध मुला-मुलीनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण सुरू करायचं आहे. इथल्या मुलांमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आहे. त्यांना स्नेहज्योतीची साथ आहे. 
-मेघना धर्मेश

पोरक्या लेकरांचं जग: भाग 5


अनाथालयात बाळ ज्या ज्या अवस्थेत सापडतं किंवा येतं त्याचे वेगवेगळे अगम्य प्रसंग माझ्या मनात कोरत होते. हे होत असनाच ज्या मुली,बायका बाळ संस्थेत ठेवायला यायच्या त्या कुमारीमाता, विधवा, परितक्त्या याही माझ्या डोळ्यासमोरून आजही हलत नाहीत. माझ्याशी असा काही फार त्यांच्यासोबत संवाद होता अशातला भाग नव्हता. तात्पुरत्या सोयीसाठी अडगळीत जगणं त्यांनी मान्य केलं होतं. कुणाशीही न बोलणं, न मिसळणं, खाली मान घालून पश्चातापात बुडालेल्या. सुटका करून घेणं ,या एकाच विचारानं वावरायच्या. संस्थेतील कामवाल्या बायका त्यांच्याशी 'अग भवाने तू सुख भोगलीस ना आता बाळाला तरी दूध दे ' म्हणून भांडायच्या. त्यांच्यातलं हे भांडण समजायला इयत्ता 7वी गाठावी लागली मला. त्या का दूध पाजत नाहीत या कोड्याची उकल व्हायला मी सरिताच्या आईशी मैत्री कारणीभूत ठरली. (नाव बदललं आहे)आम्ही या बाळंतीण झालेल्या किंवा बाळंतपणासाठी आलेल्या मातांना त्यांच्या बाळांच्या नावाने हाक मारायचो. पण बाळंतपणाच्या आधी मावशी म्हणायचो. 
गेले 8 दिवस शाळा सुटल्यावर माझ्या पाठीमागे एक मुलगा लागला होता. तो मला शाळा ते संस्था असं सोडायला यायचा. म्हणजे न बोलता पाठीमागूनच! आज एकदम हिंमत करून त्यानं मला विचारलंच नव्हे सांगितलंच... 'आय लव यु' ,'मला तू आवडतेस गायु'
तेच्या मारी !!!मला आयुष्यात कुणीही गायु म्हणून हाक मारली नाही. गाये, म्हशे, भवाने, उंडगे.....लैच सभ्य कुणी बोललं तर गायत्री बस्स . पण हा एकदम गायु??? एकदम हृदयाची तार छेडली गेली त्याच्या त्या गायु या एका उच्चाराने!! 
म्हणून जरा ते आय लव यु समजलं नाही पण 'गायु'मुळे थेट भावनाच त्याच्या कळल्या मला. जळलं पाघळले ना मी ! आयुष्यात लाजणे काय प्रकार असतो तेव्हा कळलं. मी त्याच्याशी न बोलता घरी आले(संस्थेत) आले. पण जाम खुशीत होते. आपण कुणालातरी आवडतोय हे भावनाच फार ग्रेट होती माझ्यासाठी. 
आता ही इतकी महत्त्वाची घटना सांगू कुणाला? सरीच्या आईला येऊन 15 दिवस झाले होते. खरंतर ती माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी म्हणजे असेल 14 वर्षाची . आठ दिवसच झाले होते तिला बाळ होऊन. त्या बाळाचं नाव आमच्या एका मोठ्या ताईने ठेवलं होतं 'सरिता'. 
तर सरीची आई मला सापडली तो आनंद सांगायला.कधी कधी शाळेतल्या मैत्रिणींच्या गप्पा तिला सांगायचे, गणित तिच्याकडूनच मी समजून घेत होते. म्हणून माझं तिचं जरा पटत होतं. मी आपलं तिला 'आय लव यु' म्हणजे काय असतं ग विचारायला सुरुवात केली. तिला काही कळेना . ही एकदम आज असं का विचारतेय. तिनं मला एकदम विचारलं, तू अशी का लाजतेय? काय झालं? मी फार आढेवेढे न घेता सरळ झालेला प्रसंग सांगितला. 
'ये आता तुही माझ्या लायनीत' म्हणत तिनं मला झाडायला सुरुवात केली . ही मुलं असंच मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि पोटूशी बनवतात. म्हणून रडायला सुरुवात केली तिनं. तो शिरप्याही तसाच त्यानंही असंच प्रेमाचं नाटक केलं , कपडे काढायला लावले आणि शरीराला चटक लावली स्पर्शाची आणि गरोदर केलं बघ. 
मी हँग!!! मला सेक्स, शरीराची चटक वगैरे काही माहीत नव्हतं. त्यात चूक कशाला आणि का म्हणायची हेही उमगत नव्हतं. 
मी आपलं बाळबोधपणानं सर्व विचारत राहिले तिला. तिनंही हुंदके देत शिरप्यानं तिला फसवल्याची कहाणी सांगितली. तेव्हा माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, शारीरिक संबंध आणि अनैतिक संबंधातील फरक. 'प्रेम हे अनैतिक संबंधाचा जन्मदाता आहे', हा चुकीचा धडाही मी पहिल्यांदा तिच्याकडूनच गिरवला. त्यानंतर कुमारीमातांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. मीही अनैतिक संबंधातून, नकारातून जन्माला आल्याची बोच मला अस्वस्थ करायला लागली. स्वतःचीच एकप्रकारे घाण वाटायला लागली. या विचारातून बाहेर पडण्यासाठी किती आणि कसा काळ गेला, हे न कळलेलेच बरं.
- गायत्री पाठक

फवारणी पंप घेऊन आयएएस अधिकारी शिवारात

यवतमाळ शहारानजीकचं भिसनी गाव. सुरेश पाडसेकर यांचं शेत. अंगावर फवारणी सुरक्षा कीट, पाठीवर पंप. खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख कीटकनाशक फवारणीचं प्रात्यक्षिक देत होते. आयएएस अधिकाऱ्यानं फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्याची ही पहिलीच घटना.कीटकनाशकांची फवारणी करताना गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेनं मृत्यू झाला. कारण केवळ योग्य खबरदारीचा अभाव. यावर्षीसुद्धा शासकीय रूग्णालयात रूग्ण दाखल होऊ लागले. त्यामुळे कृषी, आरोग्य विभागानं जागृती सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या जनजागृतीला फाटा दिला. 

गतवर्षीच्या घटनेनंतर शासनाकडून फवारणीसाठी शेतकऱ्यांना सुरक्षा कीट देण्यात येत आहे. मात्र शेतकरी अद्यापही याचा वापर करत नाहीत. सुरक्षा कीटशिवाय फवारणी करूच नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलं. कीटकनाशक फवारणी करताना लिहिलेल्या प्रमाणातच मिश्रण तयार करावं, हवेच्या विरूद्ध दिशेनं फवारणी टाळावी, हेल्मेट, हातमोजे, मास्क, डोळ्यांवर चष्मा किंवा गॉगल वापरावा, हात धुतल्याशिवाय खाऊ नये अशा सूचना दिल्या.
कृतीतून जगजागृती केली तर विषबाधा होण्याचं प्रमाण निश्चितच घटेल, या विश्वासातून त्यांनी हे पाऊल उचललं.
देशमुख वर्षभरापूर्वी यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी रूजू झाले. शेती आणि शेतकरीविषयक प्रश्नांनी जिल्हा सतत चर्चेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन आणि त्यांच्यात समरस होऊनच त्यांच्यात प्रशासनाविषयी असलेली नकारात्मकता दूर करता येईल, हे डॉ. देशमुख यांनी हेरलं.
पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाच राष्ट्रीयकृत बँकांवर थेट कारवाई करून त्यांनी आपले अधिकार दाखवून दिले. कारवाईच्या धास्तीनं बँकांनी पीककर्ज वाटपात उत्तम कामगिरी केली. जिल्ह्यात शेततळी निर्मिती, तूती लागवड अशा कार्यक्रमांना प्राधान्य दिल्यानं बरेच बदल जाणवू लागले.
कृषी विभागावर योजनांच्या अंमलबजावणीची अधिक जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याऐवजी या विभागातील अधिकारी कायम जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी व सादरीकरणामध्येच व्यस्त राहायचे. डॉ. राजेश देशमुख यांनी सर्वप्रथम सततच्या बैठकांची ही परंपरा खंडीत केली. आवश्यक तेवढ्याच बैठका बोलावून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर पिटाळले आणि त्यातून शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत सकारात्मक संदेश गेला.
-नितीन पखाले.

पोरक्या लेकरांचं जग - भाग 4


रात्री जरा झोपायला उशीरच झाला. नवीन आलेलं एक 7 दिवसाच बाळ सारखं किरकिरत होतं. त्याला मांडीवर घेऊन पाहिलं, थोपटलं, दूध दिलं तरीही शांत होतं नव्हतं. बरं, हे बाळ आमच्या बाहेरच्या अंगणात रात्री भर पावसात कुणीतरी अचानकपणे ठेवून गेल्यानं, पावसाच्या आवाजात ते समजायलाही वेळ लागला. किती वेळ ते पावसात रडत होतं देव जाणे! ते इतकं भिजलेल्या अवस्थेत सापडलं होतं की, लगेच त्याला पुसून स्वेटर वगैरे घालून दवाखान्यात नेण्यात आलं. तिथून ते बाळ संस्थेत आणलं. त्याला पाळण्यात झोपवून किरकिरत असतानाच झोके देण्याचे उद्योग आम्ही लहान मुली करत असू. मला तर त्या पाळण्याच्या झोक्याच्या कुरकुर आवाजानेच गाढ झोप लागायची. 
मुलींच्या हॉलजवळच बाळांची खोली होती. तिथं नेहमी 7,8 बाळं असायचीच. दोन, तीन कुमारी मातांचीही सोय त्याच पाळणाघराला लागून असलेल्या मुलींच्या हॉलमध्ये असायची. आमच्या संस्थेत मुलींचा हॉल, मुलांचा हॉल, स्वयंपाकघर, जेवणाचा हॉल, ऑफिस, तळघर, टेरेस, छोटंसं का होईना अंगण असा प्रशस्त परिसर होता. तो आजही तसाच आहे.
आज सकाळपासूनच गडबड होती. संस्थेतील गृहमाता कमालीची भेदरलेली होती. एकसारखा घाम पुसत होती. सकाळची शाळा असल्याने मी आपली माझं आवरण्याच्या गडबडीत होते. सहज तिला विचारलं, काय झालं सुमनमावशी? 
ती काहीच न बोलता, बाळांना अंघोळी घालायच्या तयारीला लागली. मनातून भयंकर भेदरलेली होती, हे तिच्या एकूण हलचालींवरून लक्षात येत होतं. मधूनच डोळे पुसत होती, पदर घेऊन घाम पुसत होती, तेही सकाळ सकाळ! मला वाटलं रात्रभर बाळांनी झोपून नसेल दिलं, तशीही ती कामाला येऊन 15 दिवसच झालेत. म्हणूनही कदाचित सुमनमावशींच्या भेदरलेपणाकडे कुणी लक्ष दिलं नाही. मीही मग शाळेला निघून गेले.
शाळेतून आल्यावर संस्थेत कमालीचा शुकशुकाट होता. पोरं नेहमीसारखी खेळत नव्हती, कामवाल्या मावश्यांनी, मोठ्या तायांनी त्यांना गप्प बसून राहण्याची तंबी दिली होती. 
शाळेतून आल्यावर मला जाम भूक लागल्यानं शाळेचा ड्रेस वगैरे न बदलताच मी स्वयंपाक खोलीत (स्वयंपाकघर वगैरे इतके 'घरेलू' शब्द तेव्हा मला माहित नव्हते) बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत मला संस्था सोडून मैत्रिणीच्या घरी गेल्यावर कळली.
मी कसंबसं ताट वाढून जेवायला बसले. आज मस्त श्रीखंड पुरीचं जेवण होतं. भुकेचा आगडोंब शांत होणार, या आनंदात हावऱ्यागत मी ताटात जरा जास्तीचं वाढून घेतलं होतं. आणि जेवणाच्या खोलीचा एक कोपरा पकडून बसले जेवायला. दोन घास गेले नसतील तेवढ्यात छायाताई अंगावर खेकसली. ''गाये, लाज वाटते का ? ते परवा आलेलं बाळ गेलंय की भोसडे!! उंडगे गावभर फिरून येऊन जेवायला बसलीस? कोणी पोरं जेवलीत का, हे तर बघायचं की भवाने...." ती पुढचं काय बोलतेय, हे मला कळत नव्हतं. पण परवाचं आलेलं बाळ गेलं, हे ऐकूनच मी पळत पळत वरती बाळांच्या खोलीत गेले. अर्थातच बाळ तिथं नव्हतं, पण सुमनमावशींच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा एकसारख्या वाहत होत्या. मी दिसल्यावर त्या गळ्यातच पडून रडायला लागल्या. माझ्या तर डोळ्यासमोरून त्या बाळाचा चेहराही जाईना. कालही त्याला ताप भरला होता. पहाटे 4 वाजता सुमनमावशींनी त्याला दवाखान्यात नेलंही होतं. त्याला ऍडमिट केलं आणि तिथंच ते दुपारी गेलं हा सगळा वृत्तांत कळला. 
मला एकदम परवाची अंगणात चिमणीच पिल्लू मेल्यानंतरची घटना आठवलीे. त्या संध्याकाळी, 'इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना...’ही प्रार्थना मी जास्त मनापासून म्हटली.
- गायत्री पाठक

पोरक्या लेकरांचं जग : भाग 3


आजही तो प्रसंग आठवतो. पाच-सहा वर्षाची मुलं खेळत होती अंगणात. आभाळाकडे बघत ‘विमान, विमान चिठ्ठी दे’चा नुसता गजर चालू होता. का तर म्हणे, असं डोक्यावरून विमान गेलं आणि त्याला आपली नखं दाखवली तर नखांवर लगेच पांढरे डाग पडतात. आणि ते डाग त्या विमानाची चिठ्ठी असते. ती चिठ्ठी त्यांच्या प्रिय आई-बाबांची असते म्हणे! हा खेळ नुकताच त्यांना शिकवला होता एका देणगीदाराने. त्यामुळे डोक्यावरुन जाणा-या विमानाला त्या चिल्लर पार्टीने बरोब्बर हेरलं होतं. आता चिठ्ठी नक्की आपल्याला वाचायला मिळणार, या आशेने ते बेंबीच्या देठापासून ओरडत सुटले होते. 
अंगण काही फार मोठं नव्हतं. लहानग्यांबरोबरच १० ते १४ वर्षांची मुले-मुलीसुध्दा खेळायला आली होती अंगणात. त्या आम्हा मोठ्या मुला-मुलींच्या घोळक्यात ‘आईचं पत्र हरवलं’ हा खेळ रमला होता. 
पण लहानग्यांच्या आरडा-ओरडीमुळे ते पत्रं नक्की कुणाच्या मागे पडणार हे कळेनासं झालं. जिच्यावर राज्यं होतं तिचा आवाजही येत नव्हता. म्हणून त्यातल्याच एका दांडग्या मुलानं उठून या लहानग्यांवर रुबाब दाखवायला सुरवात केली. एका चिमुकल्यानं त्या दादाचा धपाटाही खाल्ला. तेव्हा थोडा गलका कमी झाला. पुन्हा दहा मिनिटांनी ही चिल्लर पार्टी ओरडायला लागली. ‘विमान विमान चिठ्ठी दे’, ‘विमान विमान चिठ्ठी दे’, मग या मोठ्यांनाही चेव चढला. ‘आईचं पत्रं हरवलं ते मल्ला सापडलं’. दोन्हीत सरमिसळ झाली. ‘चिठ्ठी’ हरवली की ‘पत्रं दे’ असा काहीसा गोंधळ ही त्यांच्यात निर्माण झाला. 
तेवढ्यात आकाशातून एका चिमणीच्या चोचीतून तिचं पिल्लू त्या लहान मुलांच्या घोळक्यात पडलं. चिठ्ठीचा आवाज एकदम बंद झाला. ते पिल्लू फार उंचावरुन पडलं नसल्याने, थोडीशी हालचाल करत होतं. चोचीतून थोडं रक्तही येतं होतं त्याच्या. ‘पिल्लू पडलं, पिल्लू पडलं’ म्हणत ही चिल्लर पार्टी घाबरली. त्यांच्या चेह-यावर कमालीचं आश्चर्य होतं. त्या पिल्लाची आई, अशी कशी चोचीतून त्याला ढकलून निघून गेली? आता पत्रं आणि चिठ्ठीचा गलका थांबला. सगळे त्या पिल्लाकडे धावले. एका मोठया मुलीनं त्या पिल्लाला स्वत:च्या मांडीवर ठेवलं. ती त्या पिल्लाला कुरवाळायला लागली. ‘आई येईल हं तुझी न्यायला’ म्हणून त्याला समजावायला लागली. त्यातल्याच एका चिमुकल्यानं अंगणात असलेल्या हंड्यातलं पाणी ओंजळीतून पाजायला सुरवात केली. सगळे जण त्याची तासभर देखभाल करत होते. कुणी हात लावून पहात होतं, कुणी त्याला वारा घालत होतं. 
तेव्हढ्यात अंगणात या मुलांवर लक्ष ठेवणा-या बाईंनी फर्मान सोडलं. ‘चला खेळायची वेळ संपली, जेवायला चला’. मुलं तिथून हालत नव्हती. सगळे जण तिला गलका करत सांगायला गेले की, आम्हाला एक पिल्लू सापडलंय. त्याला खूप लागलं आहे. थोडं रक्तही येतंय. त्याला आपण थोडा वरण-भात देऊया का? बाईंनाही फार काही विचार करायला वेळ नव्हता. संस्थेच्या आवारात प्राणी-पक्षी आणायचे नाहीत. माहितीये नं तुम्हाला?’ झालं....मुलं काही आत जायला तयार नव्हती. ती म्हणाली, ‘त्या पिल्लाला आत घ्यायचंय आम्हाला. त्याची आई थोड्या वेळाने येईल आणि घेऊन जाईल. तोपर्यंत आपण किमान त्याला बलं कलून खायला तली घालू!' बाईंनी फार न लक्ष देता त्या सगळ्यांना आत नेलं. पिल्लासकट!!
मुलांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की, पिल्लू मलूल होऊन पडलंय. प्रतिसाद देत नाहीये. पाणीही पित नाहीये. एकाच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली. तो जोरात रडायला लागला. 'अरे पिल्लू मेलंय ते...! ' त्याबरोबर प्रत्येकाने पिल्लाला हात लावून पाहत खरंच ते मेलंय का खात्री करायला सुरुवात केली. काहींच्या डोळ्यातून पाणी आलं तर काही एकदम गप्पं बसले. काही कावरे बावरे झाले. 
आता या पिल्लाचं करायचं काय?
त्यातल्याच एका दादाने सांगितलं. ‘मी टिव्हीत बघितलंय. मेलेल्या माणसाचे आई-बाबा, ताई-दादा, आज्जी-आजोबा असे सगळे जण मेलेल्या माणसाला जमिनीत पुरतात. तेव्हा डोक्यावर फडकं लावलेला एक माणूस काहीतरी श्लोक म्हणतो. मग आपणही या पिल्लाचे खोटे खोटे आई- बाबा, आजी- आजोबा, ताई-दादा होऊया. अंगणात खड्डा खणू, त्यात त्याला पुरुया. 
सगळ्यांनी आपापला रोल ठरवला. त्यातलाच एक चिमुकला पुढं आला. डोक्यावर रुमाल बांधला. त्या मुलांकडे बघून श्लोक कुठला म्हणू असं विचारायला लागला. तेव्हा एक मुलगी त्याच्या अंगावर खेकसली, ‘अरे आपल्याला शिकवलेली प्रार्थना म्हण नं! तो म्हणायला लागला, ‘इतनी शक्ती हमे देना दाता.. मन का विश्वास कमजोर हो ना...’
आईच्या चोचीतून पडलेल्या पिलाची शोकसभा आणि ‘इतनी शक्ती हमे दे नं दाता’. कोण कुणाला धीर देत होतं ते मला आजतागायत समजेना. 
- गायत्री पाठक

Monday, 27 August 2018

मिसबाह आता शाळेत रमली आहे

बीडमधील गेवराई तालुक्यातील टोकाचं एक गाव, शनिचे राक्षसभुवन. या गावातील जिल्हा परिषद शाळा. शाळेला भेट दिली तेव्हा अनेक विद्यार्थी त्यांची खेळणी म्हणजेच बाहुली, बॉल, कार घेऊन आले होते नंतर शिक्षकांनी ती खेळणी एकत्र केली आणि त्या खेळण्यांच्या नावाच्या कार्डबोर्डच्या चिठ्ठ्याही एकत्रीत केल्या. मग पहिलीत नुकताच प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्या ढिगातून नेमकं आपलं खेळणं उचलून आणत होते आणि सोबत त्याच्या नावाची चिठ्ठीही उचलत होते. शाळा सुरू होऊन एक महिनाही होत नाही, तोवर हे विद्यार्थी शब्द ओळखू शकतात, हे या शाळेत राबविल्या जाणाऱ्या ज्ञानरचनावादाचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे यश आहे.
जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2015 साली विस्ताराधिकारी प्रवीण काळम-पाटील यांच्या नेतृत्त्वात बीडमधील शिक्षकांनी सातारा जिल्ह्यातील प्रगत कुमठे बीटला भेट दिली. ज्ञानरचनावादाची संकल्पना, त्यासाठीच्या युक्त्या आणि अगदी अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांनाही कसं तयार करावं, याचे धडे या भेटीतून मिळाल्याचे राक्षसभुवन शाळेचे अशोक निकाळजे सर सांगतात. "कुमठे बीटमध्ये हे सगळं जाणून घेताना मला आमच्या शाळेतील मिसबाह आणि रोहन या दोन अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांची सारखी आठवण येत होती. राक्षसभुवनला परतताच मी पहिलीचा वर्ग अध्यापनासाठी मागून घेतला, जेणेकरून मुळापासून ज्ञानरचनावादाची पेरणी करता येईल" निकाळजे सर बोलत होते.
"मिसबाह आणि रोहन यांना पहिलीपासूनच शाळेत रमविण्याचं मुख्य ध्येय मी ठरविलं होतं. मिसबाह गतिमंद आहे तर रोहन कर्णबधीर मुलगा आहे. सुरूवातीला हे दोघं वर्गात स्थिरही बसू शकायचे नाहीत, रोहन तर सारखा रडायचा. त्यांना वर्गात किंवा वर्गाबाहेर पाहिजे तिथे जायची मुभा मी देऊन टाकली. वर्गातील ज्ञानरचनावादी साहित्याला किंवा कुठल्याही खेळण्याला हात लावायलाही परवानगी होती."
त्याचा परिणाम असा झाला की मिसबाह आणि रोहन शाळेत रमले. शिवाय निकाळजे सरांनी वर्गातल्या मित्र-मैत्रिणींनाही या दोघांची चेष्टा न करता त्यांच्याशी मैत्री करायला शिकविलं. वयानुरूप आता हे दोघं चौथीत आहेत. पहिल्यांदा वर्गातही न बसू शकणारी मिसबाह आता धूळपाटीवर मुळाक्षरे गिरविते. सांगितलेला शब्द फळ्यावर किंवा जमिनीवर लिहून दाखविते. रोहनलाही आता अंक ओळख झाली असून, त्याला आता कर्णबधीर मुलांच्या शाळेत दाखल केल्याचं निकाळजे सर सांगतात.
या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे शिक्षकांनी तयार केलेला लमाण, वडार, पारधी आणि कहार या बोलीभाषांचा शब्दकोश. राक्षसभुवन शाळा आणि आजूबाजूच्या परिसरातील जि.प. शाळांत या समाजाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येतात. बऱ्याचदा नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांना मुलांचे अनेक शब्द समजत नाहीत आणि विद्यार्थ्यांनाही नेमके मराठी शब्द माहीत नसतात. ही अडचण सोडवून त्यांची भाषा शिक्षकांना कळावी आणि मुलांनाही मराठी शब्द कळावेत म्हणून विद्यार्थ्यांच्याच मदतीने सुमारे साडेतीन हजार शब्दांचा हा शब्दकोश राक्षसभुवन शाळेतील शिक्षकांसह गूळज केंद्रातील इतर शिक्षकांनी तयार केला आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

सृजनाचे हात

सेनापती बापट रस्ता. इथूनच थोडं आतल्या भागात गेलं की चतुर्श्रुंगी डोंगरापर्यंत जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, लाल चाळ, गोखले नगर अशा वसाहती दिसतात. काही पानशेतच्या पुरानंतर इथं स्थायिक झालेले. तर बरेचसे बाहेरच्या गावांतून, राज्यांतून स्थलांतरित. चिकटून असलेल्या बैठ्या चाळी. चिंचोळे रस्ते. याच गल्लीबोळांत सुरू असते लहानग्या मुलांना घडवण्याचे काम... अंगणवाड्यांमधून.
नुकतंच या अंगणवाड्यांत जायला मिळालं. तेव्हा तिथली सर्जनशीलता आणि सृजनशीलता दोन्ही जाणवली. अतिशय कमी वेतन, तेही कधी दोन तर कधी सहा महिन्यांनी मिळणारे. तरीही जीव ओतून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस पाहिल्या की आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. अंगणवाडीत साधारण अडीच ते पाच वर्षांची मुलं पटावर असतात. पण यांच्या सर्व्हेत वस्तीतील शून्य ते सहा वर्षांची बालकेही असतात. त्यामुळे बऱ्याचदा दीड वर्षांपासूनची मुलं इथं दिसतात. कुणाला नाही न म्हणता सर्वांना त्या सांभाळतात. इथले पालक रोजंदारीवर काम करणारे. घरी दुसरं कुणी नाही. त्यामुळे एक-दीड वर्षांची बाळं पाळणाघराप्रमाणे इथं सोडली जातात. त्यांनाही पोषक आहार दिला जातो. खेळात-गाण्यात सामावून घेतलं जातं. 
१९८५ मध्ये भूक आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी अंगणवाड्या सुरू झाल्या. पुढं त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण जोडलं गेलं. साधारण १००० घरांमागे एक अंगणवाडी असते. पुणे जिल्ह्यात साधारण ६००० अंगणवाड्या आहेत. आजूबाजूला नव्याने सुरू झालेल्या बालवाड्या, खाजगी शाळा यांचं आव्हान आता निर्माण झालं आहे. पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले तरी त्यांना आपलं मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवावं असं वाटतं. त्यामुळे बऱ्याचदा तीन–साडे तीन वर्षांपर्यंत अंगणवाडीत मोफत आणि नंतर फी भरून खाजगी शाळेत, असं सध्याचं चित्र असल्याचं या सेविका सांगतात. तरीही अंगणवाडी सेविका त्यांचं काम मनापासून करत आहेत. 
वस्तीतल्या कुठल्याशा समाज मंदिरात, एखाद्या संस्थेच्या भाड्याच्या टिचभर जागेत अंगणवाड्या चालतात. ऐसपैस जागा, नवी करकरीत खेळणी आणि फॅन्सी शालेयसाहित्य नसले तरी या वयात मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक गोष्टी अंगणवाडी सेविका स्वत: तयार करतात. टाकून दिलेला पुठ्ठा, बॉक्स, वर्तमानपत्राचा कागद, दोऱ्यांचे रिळ. कधी लोकसहभागातून आलेली जुनी-नवी खेळणी, रंगीत खडू आणि इतर साहित्य अशा अगदी मिळेल त्या वस्तूपासून या सेविका खेळणी तयार करतात. मुलांची हजेरी घ्यायची इथली पद्धतही आगळी आहे. एका काठीवर मुलाचा फोटो चिकटवून ठेवलेला असतो. हा हजेरी पट. मूल शाळेत आलं की त्याने आपला फोटो असलेली काठी उचलून टेबलवर ठेवायची. 
सकाळी दहा वाजता मुलं येऊ लागतात. एखादं मूल सतत रडत असतं आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस त्यांना उचलून घेत, त्यांचे शेंबडं नाक पुसत, खेळवत त्यांना शांत करतात. मग खेळत खेळत शिकायचे. कधी शरीराला व्यायाम होणारा खेळ, कधी हाताच्या स्नायुंना बळकटी देणारा, कधी नजर उत्तम करणारा...सर्व खेळ एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाला अनुसरून बनवलेले. अंगणवाडी सेविका नाचून, अभिनय, आवाजात चढउतार करून गाणी-गोष्टी सांगतात तेव्हा मुलंही मस्त रंगून जातात. खाजगी शाळेपेक्षा फरक पडतो तो जागेचा, परिसराचा, सुविधांचा. मुलं तीच. शिकवणारेही तितकेच प्रेमळ. किंबहुना काकणभर सरसच. यांच्या हाताखाली मुलांचा सांभाळ होतो, ती खेळतात, अक्षरओळख होते, पोषक खाऊ मिळतो. पण एवढंच त्यांचं काम नाही. गरोदर मातांचा सर्व्हे, त्यांचं समुपदेशन, सरकारी योजनांची माहिती देणं, त्यासाठी आवश्यक कागदपत्रं जमवण्यात मदत करणं, लसीकरण, बाळंतपणानंतर गृहभेटी, बाळांचं लसीकरण, शिक्षणाच्या अधिकाराखाली सहा वर्षानंतर या मुलांना जवळच्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळवून देणं अशी एक ना अनेक कामंही अंगणवाडी सेविका करतात. या सर्वांची नोंद रोजच्या रोज ठेवावी लागते. 
इथल्या एका अंगणवाडीत काम करणाऱ्या सुजाता रेड्डी. त्यांच्या मुली उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या. तरी या मुलांना घडवण्याचा ध्यास म्हणून त्या आजही मुलात मूल होऊन बागडतात. बीए, बीएड असणाऱ्या स्मिता धिवार खाजगी शाळेतील संधी नाकारून याच मुलांसाठी काम करायचं ठरवून अडचणींवर मात करत इथं रमतात. वंदना इंगळे शिलाई काम करत असल्यामुळे अंगणवाडीसाठी कापडी खेळणी स्वत: शिवतात. त्यांनी कल्पकतेने हवामानाचा तक्ता शिवला आहे. रोज मुलं बाहेर जशी हवा असेल तशा चित्राचा कापडी तुकडा निवडून बोर्डवर लावतात. एकूण सृजनशीलता इथं काहीच कमी नाही. म्हणूनच या अंगणवाडी ‘सेविका’ नसून मुलांना घडवणारे ‘सृजनाचे हात’ आहेत.
- सुप्रिया शेलार.

पोरक्या लेकरांचं जग: भाग 2


शाळेत असताना मैत्रिणींचे मस्त डबे पाहून स्वतःचा डबा त्यांच्यासमोर खायला लाज वाटायची. चारचौघात लाज वाटण्यासारख्या तर अनेक गोष्टीचे अनुभव माझ्याकडे होते. शाळेत इस्त्री सोडाच, पण कधी धुतलेला गणवेशही नसायचा. चप्पल, आतल्या कापड्यांची वानवा, रोजचा मधल्या सुट्टीतला डबा, पुस्तकं, कंपास बॉक्स, पेन पेन्सिल याही गोष्टी कधी नसायच्या. दरवेळेस शाळेत उसनं मागायला लागायचं मैत्रिणींकडून. 
कधी कधी संस्थेत नाष्टा चांगला व्हायचा तेव्हा मी डबा न्यायचे. पण एरवी मी डबा काढत नाही म्हटल्यावर एका समजूतदार मैत्रिणीने तिच्या घरून 2 डबे आणायला सुरवात केली. जबरदस्तीने मला ती तिचा डबा खाच म्हणून मागे लागायची. तो खातानाही भयंकर लाज वाटायची स्वतःचीच स्वतःला. पण ती माझ्या इतकी प्रेमात होती की शाळा सुटल्यावर घरी चल, जेवून जा म्हणून मागे लागायची.
मग तिला वाईट नको वाटायला म्हणून मीही तिच्या मागोमाग जायचे. जसजशा तिच्या घरच्यांशी ओळख व्हायला लागली तेव्हा कुटुंब म्हणजे काय, आई-बाबाचा, बहिणीचा, भावाचा प्रत्येकाचे रोल कळू लागले. तेही पुसटसे. मैत्रीण तिच्या आईसारखी दिसते, म्हणून ती आईची लाडकी, तिची बहीण आजीसारखी दिसते, म्हणून आजीची लाडकी. माझ्या नकळत मी कुणासारखी दिसते, माझा रंग, नाक, डोळे कुणासारखे हे प्रश्न भेडसावायला लागले. इतरांसारख कुटुंब मला का नाही? का गेली असेल माझी आई मला सोडून? कुटुंबातील लाड माझ्या आयुष्यात का नाही? मी का आश्रमात?
आश्रमात येणारे देणगीदार, पाहुणे यांच्या सहानुभूतीच्या नजरा मला एव्हाना त्रास देऊ लागल्या. संस्थेत वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम साजरा करायला येणारे पाहुणे यांनी मी खूप अस्वस्थ व्हायला लागले.
आपण असे का नाकारले गेलोय, हे कळण्याचे मार्ग मी खरं तर शोधायला लागले होते. माझ्या भोवताली असणारी लहान मुलं, मोठी मुलं, आम्ही इथं का आलोय, याची उत्तरं मग माझ्या छोट्या आजूबाजूच्या भावंडांकडून कळायला लागली. ते संस्थेत कसे दाखल होतात, तशीच मीही दाखल झाले आहे, हे एव्हाना उमगायला लागलं. शिवाय कुमारी माता, विधवा, परितक्त्या याही होत्याच. माझ्या संस्थेतल्या प्रवेशाची थोडी अंधुकशी कल्पना देणारेही अनुभव गाठीशी पडत होते.
- गायत्री पाठक

पोरक्या लेकरांचं जग : भाग 1


'फॉर्म नीट वाचता येत नाही का? पूर्ण नाव लिहायला काय धाड भरलीय का?' कॉलेजच्या क्लार्कने जोरात मला फायरिंग करायला सुरुवात केली.
मी कशीबशी स्वतःला सावरत 'मी असंच नाव लिहतेय. मधलं नाव नाही लिहीत'.
माझा बुध्यांक तपासण्याची मला नितांत गरज असल्याचा कटाक्ष टाकत आणि तिने मला पुन्हा डाफरत 'बापाचं नाव लावायला लाज वाटते का?' असा सरळ निशाणा माझ्यावर रोखला. 
मी आपली खाली मान घालून, काय सांगू न कसं सांगू असा विचार करत, तोंडातल्या तोंडात इतकंच म्हणाले, 'मॅडम मी अनाथ आहे.'
मॅडमचा सूर जरा खाली आला पुन्हा म्हणाली, 'अग पण वडिलांचे नाव असेल की काहीतरी?'
मी पुन्हा, जोर देऊन म्हणाले, 'मॅडम, मला माझे वडील माहीत नाहीत, त्यामुळे त्यांचे नाव माहीत नाही.' तिच्या चेहऱ्यावर एव्हाना अनेक प्रश्नांच्या गोंधळाचे रंग चढले होते. तिने पुन्हा हळू आवाजात विचारले, 'तुझ्या आईचे नाव काय मग?'
मी पुन्हा, 'मला माहित नाही.'
तिला काय विचारू ते कळेना.
मग मी आवंढा गिळत म्हणाले, 'मॅडम मी अनाथ आश्रमातील मुलगी आहे. मला तिथं आडनाव पाठक लावलं म्हणून मी ते लावते. पण बाकी काही माहीत नसल्याने मी ते काही सांगू शकत नाही.' कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आई-बाप सांगणं इतकं महत्वाचं आहे, हे मला माहीत नव्हते. मला हे कुणाला सांगायचं नव्हतं. कारण लगेच माझ्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलणार आहे. पण माझा नाईलाज झाला. कारण मला कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे.
क्लार्कने लगेच 10 मिनिटं थांब म्हणत, प्राचार्यांच्या केबिनकडे मोर्चा वळवला. 15 मिनीटांनी बाहेर आली आणि म्हणाली, तुला पूर्ण फी भरावी लागेल. पण मॅडम मी कुठं म्हणाले की मला फी अर्धी भरायची आहे किंवा माफ करा म्हणून? क्लार्क थोडी वरमली आणि फॉर्मवर शिक्के मारायला लागली.
कॉलेजमधला ऍडमिशन फॉर्म असो किंवा बँकेतील खातं काढायचा फॉर्म असो. मला आता याबाबत काहीच वाटेनासे झालेय. हो...नाही मला माहित माझं पूर्ण नाव, गाव, पत्ता, आईबाप, कूळ, धर्म, जात, वंशावळ. काय म्हणणं आहे तुमचं? साध्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत म्हणून उद्वेग होतो खरा. पण, जखमांवर मीठ चोळतेय की काय ही व्यवस्था?
इतरांसारखं बालपण माझं नक्की गेलं नाही पण भरपूर मित्र मैत्रिणी आणि काहीसे वेगळे अनुभव मिळाल्याने प्रत्येक अनुभवांकडे जरा वेगळ्या नजरेने पाहता येतेय. माझं बालपण एका अनाथ आश्रमातल्या चार भिंतीत गेलं. आजूबाजूला जसे खोडकर, टारगट, सवंगडी होते तसेच कुमारी माता, विधवा माता, निराश्रित आजी आजोबा हेही माझं वेगळं बालपण सार्थ करायला सहभागी होते. आपल्याला आई-बाबा नाही, कुटुंब नाही याची जाणीव तसं पहायला गेलं तर खूपच उशीरा झाली.
- गायत्री पाठक

Wednesday, 8 August 2018

'लोकांनी, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’

आपल्या खिशाला परवडेल अशी चांगली आरोग्य सेवा आपल्याला कुठं मिळू शकेल का? या प्रश्नाला, ‘होय, मिळू शकेल’, असं उत्तर नांदेड येथील रयत आरोग्य मंडळाने दिलं आहे. माफक दरात योग्य व समाधानकारक रूग्ण सेवा देता येऊ शकते, हे गेल्या 13 वर्षाच्या अथक रूग्ण सेवेनंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश खुरसाळे हे रयत आरोग्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. 21 सदस्यांची कार्यकारिणी रयत रूग्णालयाचा कारभार चालवते. प्रत्येक सदस्याकडून 25 हजार रूपये देणगी घेऊन रूग्णालय सुरू करण्यात आलं. डॉ. खुरसाळे म्हणतात, “समाजाला दवाखान्याची गरज असते. त्यामुळे समाजातील विविध स्तरातील व्यक्तींनी एकत्र येऊन, भांडवली खर्च करून दवाखाना उभा करायला हवा. तसंच रूग्णांकडून रास्त शुल्क घेऊन तो चालवला पाहिजे. या विचाराने माझ्यासह नांदेडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर, प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी आम्ही एकत्र येऊन हे हॉस्पीटल सुरू केलं.” ‘लोकांनी, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’ हे या हॉस्पीटलचं वैशिष्टयं आणि तत्त्वं. 
नांदेड येथील कला मंदिर भागात राजेश लॉजच्या तीन मजली इमारतीत एक लाख रूपये मासिक भाड्याचा करार करून, 3 जुलै 2005 रोजी रयत रूग्णालय सुरू झालं. पुढे 2008 मध्ये ही जागा विक्रीस निघाली. भाड्यापोटी वर्षाला 12 लाख रूपये जात होतेच. म्हणून मग जागाचं विकत घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला. या जागेची किंमत 1 कोटी 5 लाख रूपये सांगण्यात आली. जागा घ्यायची ठरवली. पण रयत आरोग्य मंडळाकडे एवढी रक्कम नव्हतीच. संस्थेने समाजातील 100 दानशूर व्यक्तीकडून एक लाख रूपये बिन व्याजी ठेवीच्या स्वरुपात गोळा करायचं ठरवलं, आणि बघता बघता फक्त महिन्याभरात दीड कोटी रूपये जमा झाले. त्यातील एक कोटी रूपये घेऊन उर्वरित रक्कम कार्यकारी मंडळाने लोकांना परत केले. तर उर्वरित एक कोटी रूपये दरमहा दोन व्यक्ती असा लकी ड्रा काढून ठेवीदारांना परत केले. आता रयत रूग्णालयाची हक्काची जागा झाली.
अनेक ठेवीदारांनी आपली रक्कम परत न घेता रयतलाच आग्रहाने देणगी म्हणून दिली. हा समाजाने रयत आरोग्य मंडळ करत असलेल्या कार्याला दिलेला मोठा पाठिंबाच होता.
रयत कार्यकारिणीने आरोग्य सेवांचे दर पत्रक रूग्णालयातील प्रत्येक विभागात सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याची व्यवस्था केली. त्यामुळे रयतमध्ये येणार्‍या प्रत्येक रूग्णाला तेथे लावलेल्या दर पत्रकाप्रमाणे फी देणं व डॉक्टरांना ती घेणे बंधन कारक आहे.
2005 मध्ये रूग्णांच्या प्रथम तपासणीचा दर होता 30 रूपये व फेरतपासणी दर 20 रूपये होता. तर आज 2018 मध्ये रयत रूग्णालयातील प्रथम तपासणीचा दर आहे 50 रूपये आणि फेरतपासणी दर आहे 40 रूपये. पॅथालॉजीतील तपासण्याचे दर शहरातील खाजगी पॅथालॉजी पेक्षा 40 टक्के कमी आहेत. तर रूग्णालयात राहून उपचार करून घेण्यासाठी प्रतीबेड 130 तर स्पेशल रूम 400 रूपये भाडे आकारण्यात येतं. यामध्ये डॉक्टर व्हिजिट, नर्सिंग अशा सर्व सेवा अंतर्भूत आहेत, कुठल्याही प्रकारचे छुपे दर घेतले जात नाहीत. हे रयतचं वैशिष्ट्य.
रयतमध्ये मोठं ऑपरेशन केलं तर औषध गोळयासह सात ते आठ हजार रूपयांत होतं, तर फ्रॅक्चर, अ‍ॅपेंडिस्क, गर्भाशय अशा छोटया शस्त्रक्रीया फक्त चार-पाच हजार रूपयांच्या आत होतात. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालवले जाणारे औषध दुकान इथं आहे. यात सर्व जेनरिक औषधांची विक्री केली जाते.
रयतमध्ये 30 रूम आहेत. दोन स्पेशल रूम, दोन ऑपरेशन थिएटर, एक पॅथालॉजी, बाहयरूग्ण विभाग, अस्थि रोग विभाग, स्त्री रोग विभाग, त्वचा रोग विभाग, जनरल फिजिशिअन विभाग आहेत. या विभागात नांदेडमधील अनुभवी, तज्ज्ञ असे विविध विषयातील डॉक्टर अत्यल्प मानधनावर सेवा देतात. यात डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. केंद्रे, डॉ. अर्जून मापारे, डॉ. महाले, डॉ. मंगला देशमुख, डॉ. मनिषा खुरसाळे, निवृत्त सी.एस. डॉ. एन.जी. राठौड आदींचा समावेश आहे. तर 50 पगारी कर्मचारी रूग्णालयात कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातून निवृत्त झालेले अनेक अधिकारी व कर्मचारी रयत रूग्णालयाचे प्रशासन सांभाळतात.
रयतच्या बाह्यरूग्ण विभागातून रोज 80 ते 90 पेशंट उपचार घेतात. तर रोज 25 ते 30 रूग्ण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होतात. बेवारस वृद्धांना कोणीतरी रयतमध्ये दाखलं करून जातं, तेव्हा त्याचा खाण्यापिण्याचा, औषधोपचारापर्यंतचा सर्व खर्च रयत प्रशासन करतं. रयतच्या उपचारांनी बरं झाल्यानंतर एका बेवारस वृद्धाने रयतला घड्याळ भेट दिलं होतं, त्या वृद्धाचं ते घडयाळ म्हणजे रयतच्या सर्व टीमसाठी मोठा पुरस्कार होता. तर कै. इंदूताई व मनोहर काळीकर या पती-पत्नीने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता रयतला दान केली आहे. त्यांची आठवण म्हणून रयतनेही त्यांच्या क्ष-किरण विभागाला त्यांचे नाव दिलं आहे. रयतच्या कार्याची दखल घेत, स्टेट बँक ऑफ इंडियाने रयतला 10 लाख रूपयांची कार्डियाक एम्बुलन्स भेट दिली. तर एलआयसी ऑफ इंडियाने 25 लाख रूपयांचे डायलीसीस युनिट दिलं आहे.
माफक दरातील आरोग्य सेवा देऊन देखील रयत आज पैशाच्या बाबतीत स्वावलंबी आहे. लोकांमुळेच रयत रूग्णालयाचे नाव आणि ‘लोकांनी,लोकांचे, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’ हे तत्त्वं सार्थक झालं आहे.
आता वर्षातून दोनदा स्माईल ट्रेनचे संचालक डॉ. गुरूप्रताप सिंघजी प्लास्टीक सर्जरीचे मोफत शिबीर घेतात. यामध्ये ज्या रूग्णांना शारिरीक व्यंगामुळे अपंगत्व आलयं, अशा रूग्णांची प्राधन्याने प्लास्टीक सर्जरी करून त्यांचे अपंगत्व दूर केलं जातं.
स्वस्त आयसीयुची व्यवस्था करण्याची रयत आरोग्य मंडळाची इच्छा आहे. परंतु आयसीयुत पूर्णवेळ काम करणारे चांगले डॉक्टर्स बाहेरची भरपूर पैसा मिळणारी प्रॅक्टीस सोडून रयतमध्ये काम करण्यास तयार नाहीत. परिणामी आज तरी रयतचं स्वस्त आय.सी.यु.ची सुविधा देण्याचं स्वप्न अपूर्ण आहे.
रयत रूग्णालय 
- उन्मेष गौरकर.

'लाख’ मोलाची बचतबीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातलं तीन-चार हजार लोकसंख्येचं वारणी गाव. कायम दुष्काळी शिरुरमध्ये शेतीतून प्रगती साधणं म्हणजे दिवास्वप्नचं! सततच्या दुष्काळानं प्रत्येक कुटुंबाचाच आर्थिक गाडा दारिद्र्याच्या चिखलात फसलेला. सन २०१३. पंधरा महिलांनी सावित्रीबाई फुले बचतगट सुरू केला. महिन्याला शंभर रुपयांची बचत. 
2014 मध्ये चंचला बडे, तारामती केदार, जयश्री घुले, सीता केदार यांना गटाची प्रत्येकी पंधरा हजारांची मदत. चौघींनीही शिवणयंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. मुमताज शेख यांनी बचतगटाचं १५ हजार रुपये कर्ज आणि स्वत:ची बचत यातून पिठाची गिरणी घेतली. आज हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तारामती केदार यांनीही पिठाची गिरणी सुरू केली. काशीबाई खेडकर यांचे पती दिव्यांग. संसाराचा गाडा काशीबाईच ओढतात. बचतगटाकडून २० हजारांचं कर्ज घेऊन काशीबाईंनी पतीला पानटपरी सुरू करून दिली. आज ही पानटपरी त्यांच्या जगण्याचं साधन आहे. तर शेतीला दुधाचा जोडधंदा म्हणून पुष्पा गिरी यांनी ३० हजार रुपयांच्या मदतीतून म्हैस घेतली. शोभा केदार आणि जयश्री गिरी यांनी प्रत्येकी दोन शेळ्यांसाठी दहा हजार रुपये घेतले. त्यांनाही यामुळे आर्थिक आधार मिळला आहे. 
कौशल्या केदार यांनी मुलाला संगणक घेऊन् देत फोटो स्टुडीओसाठी तर चंचला बडे यांनी मुलाला ऑटोगॅरेजसाठी मदत केली . सुशीला जाधव यांनी अभियांत्रिकीसाठी तर मीरा यांनी बीएस्सी कृषीसाठी मुलांचं शुल्क भरलं आहे. जयश्री घुले आणि शोभा केदार यांनी आपल्या मुलामुलींना स्पर्धा परीक्षेची शिकवणी लावली आहे. नुकताच गटाने पाच लाखांच्या कर्जातून स्वत:चा पापड व्यवसायही सुरू केला आहे.
या महिलांच्या कामाची दखल घेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच देण्यात आला. गटामुळे आम्ही आत्मनिर्भर होऊ शकलो, असं अध्यक्ष मीरा गिरी सांगतात.

-अमोल मुळे, बीड

प्राथमिक शिक्षक ते डीवायएसपी


डीवायएसपी गणेश इंगळे. पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीला. सुरुवातीला भौगोलिक परिस्थिती, नक्षलवादी चळवळ, तिथल्या हिंसक घटना, नक्षल चळवळीचा पाया म्हणून काम करणारे नक्षलसमर्थक, ग्रामरक्षक दल, एरियारक्षक दल आणि संघटन कार्यकर्ते यांच्या कारवायांचा बारकाईनं अभ्यास केला. आदिवासी जनतेच्या मनातली पोलिसांची भीती दूर केली. मानसिकता बदलण्याचा प्रयत्नही केला. नक्षलवादी विकासापासून दूर नेत असल्याचं समजावलं. ६ नक्षल्यांना अटक, नक्षली साहित्य जप्त अशी कारवाई. वावरणंही कठीण असलेल्या परिसरात दोन वर्षात शांती मेळावा, जनमैत्री मेळावा, विकास मेळावा, ज्ञानगंगा- फिरते वाचनालय, अनुसुचित जाती-जमातींना मार्गदर्शन, महिला आरोग्य शिबीर, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती कार्यकम, दिवाळी भेट उपकम. याच कामगिरीची दखल घेऊन काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना विशेष महासंचालक पदक जाहीर केलंयगडचिरोलीतल्या सामाजिक उपक्रमात लोकसहभाग मोठा होता. हे उपक्रम राबवताना खूप समाधान लाभलं, रत्नागिरीतही असे काही उपक्रम राबवणार असल्याचं इंगळे सांगतात. वर्षभरापूर्वी त्यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. 
इंगळे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पानवली गावचे. आईवडिलांचं लहानपणीच देहावसान. शिक्षण मुंबईत घाटकोपरला मावशीकडे. मावशी, मामा, नातेवाईकांच्या सहकार्यानं डीएडपर्यंतचं शिक्षण. स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या जिद्दीतून नाशिकमधल्या रायता गावात वर्षभर शिक्षक. रोजची १२ किमीची पायपीट. मग एमपीएससी आणि 2013 मध्ये डिवायएसपी म्हणून निवड. शांत, मनमिळावू स्वभाव, तपासकामातली चतुराई, धाडसी वृत्ती, समस्या मार्गी लावण्याचा हातखंडा यामुळे अल्पावधीतच इंगळे यांनी पोलीस खात्यात आदर्श अधिकारी म्हणून नाव कमावलं आहे. परिस्थिती कशीही असली तरी आपण ध्येय सोडता कामा नये , असं ते सांगतात. 
-जान्हवी पाटील.

साळा लय आवडते, साळंत यायचं हाय

“गावात एका आजींच्या दोन नाती शाळेत न येता शेळ्या चारायला, कापूस गोळा करायला जायच्या. त्यातील एक मुलगी तर शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या नदीकाठी शेळ्या चरायला आणायची आणि शाळेतल्या शिकविण्याकडे टक लावून बघत बसायची. तिला ‘शाळेत ये ना’ , असं म्हटलं तर ‘साळा लय आवडते, साळंत यायचं हाय, पर आजी नाय बोलते मला’ असं म्हणायची. आम्ही शिक्षकांनी तिच्या आजीलाही नातींना शाळेत पाठविण्याची विनंती केली. पण त्या ऐकतच नव्हत्या.’
‘पोरींचे आयबाप तिकडं मंबयीत हाएत चार पैसं कमवायला. आमी गरीब हावोत. पोरगी कापूस वेचायला गेली तर पन्नास रुपये मिळतात. घरच्या शेळ्या- करड्यांना कोण चारणार? माझं वय झालंय, म्या काय जाऊ शकत नाही शेळ्या चाराया. पोरींनीच जायाला हवं. काय करायचंय गरिबाला शिक्षान?’ असाच आजींचा धोशा असायचा. मुली शिकल्या तरच तुमची गरिबी मिटू शकेल, त्यांनाही शाळेत यायची इच्छा आहे, हे परोपरीने सांगूनही आजी काही बधत नव्हत्या.शेवटी गावातील माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव राठोड यांनी मध्यस्थी केली आणि आजींना चक्क महिन्याला 100-200 रुपये देऊन शेळ्या सांभाळणारा माणूस बघून दिला, पण पोरींना शाळेत पाठवाच असं सांगितलं. आज पायल आणि काजल राठोड या दोन्ही मुली कर्नावळच्या शाळेत शिकत आहेत.” अराळकर सर सांगत होते.
ही गोष्ट आहे जालना जिल्ह्यातला मंठा तालुक्यातली. इथल्या कर्नावळ जिल्हा परिषद शाळेत धनंजय अराळकर शिक्षक आहेत. जवळपास 95 टक्के बंजारा वस्ती. सर सांगत होते, “2014 साली मी या शाळेत रुजू झालो तेव्हा वेगळी परिस्थिती होती. बहुतांश विद्यार्थी शाळेला दांडी मारायचे, अनेक विद्यार्थी पालकांसोबत ऊसतोडणीच्या गावी जायचे. मुलांनी नियमित शाळेत येणं, आम्हां शिक्षकांना गरजेचं वाटत होतं. त्यासाठी आम्ही शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेऊन, त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजवायला सुरूवात केली. मुलांना शाळेत पाठवाल तर त्यांचे भविष्य चांगलं असेल हे समजावण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण हे काम सोपं नव्हतं, कारण गावातील बंजारा समाजाच्या लोकांची गोरमाटी ही बोलीभाषा आम्हांला येत नव्हती. आम्ही मराठीतून बोलायचो आणि ते त्यांच्या भाषेत उत्तरं द्यायचे. अनेकदा तर आम्ही विद्यार्थ्यांनाच दुभाषक म्हणून काम करायला सांगायचो. पण शाळेचं महत्त्व पटवायचोच.”
हळूहळू गावकऱ्यांना शिक्षकांची धडपड लक्षात येऊ लागली. शिक्षक शिकविण्यासाठी एवढी मेहनत करीत आहेत तर आपणही आपली मुलं गावातच ठेवायला हवीत हे त्यांना समजलं. 2015-16 साली तर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शाळेने स्थलांतर करणाऱ्या पालकांच्या मुलांची सकाळच्या नाष्ट्याची आणि रात्रीच्या जेवणाची सोयही केली होती. शिवाय त्यांना लागणारे कपडे, जीवनावश्यक वस्तू, गरज पडल्यास दवाखान्यात घेऊन जाणे, हेही शिक्षकांनी केलं. त्यामुळे गेल्या वर्षी तब्बल 37 विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबलं, अराळकर सर सांगतात. हे विद्यार्थी झोपायला फक्त नातेवाईकांकडे जायचे, बाकी शाळेने त्यांची पूर्ण काळजी घेतली. यातल्या 5-6 मुलांचे नातेवाईकही गावात नव्हते, पण गावकऱ्यांनी केवळ शिक्षकांच्या शब्दांवर त्या मुलांची आपल्या घरी राहण्याची सोय केली.
शिक्षकांनी इतके कसून प्रयत्न केल्यामुळे त्याचं तितकंच चांगलं फळही त्यांना मिळालं. विद्यार्थ्यांचं स्थलांतर 100 टक्के रोखलं गेलं. एवढंच नव्हे तर उत्तम गुणवत्तेमुळे कॉन्व्हेंटची 18 मुलं या कर्नावळ जिल्हा परिषद शाळेत दाखल झाली.
या शाळेतील शिक्षकांनी मुलांना गोरमाटी भाषेच्या माध्यमातूनच मराठीची गोडीही लावलेली आहे
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर