Thursday, 30 March 2017

कशाचीही बळजबरी करायची नाही

माझं लग्न त्या मानाने लवकर झालं होतं. मी तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर मूल हवं, असा विचार केला होता. मला मुलांची फार आवड नाही, मी मुलांत फार रमत नाही. लग्नाला चार वर्षं होत होती, त्या सुमारास गार्गी झाली. आम्ही दोघं नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असायचो. माझे सासूसासरे आणि आमच्या घरची एक सदस्य असलेली आमची साहायक लीला यांनी गार्गीचा अधिक सांभाळ केला. ती सहासात वर्षांची झाली तेव्हा मी नोकरी सोडली. त्यानंतर मला तिचा जास्त सहवास मिळाला. तिला वाढवताना अमुक एक करायचं हे ठरवलं नसलं तरी तिच्यावर कशाचीही बळजबरी करायची नाही, इतकं नक्की होतं. १८ वर्षांपर्यंत ती आपली, त्यानंतर ती स्वतंत्र असेल आणि आपणही तिच्यावर भावनिकदृष्ट्या विसंबून राहायचं नाही, हे ठरवलेलं होतं.
ती अगदी लहान असल्यापासून तिला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आम्ही ऐकवत होतो. तिला घेऊन प्रवासही करत असू. ती अडीच वर्षांची असताना मी तिला देवनागरी वाचायला शिकवलं. मी फार मेहनती, अभ्यासू वगैरे नाही, त्यामुळे मी तिला अभ्यासासाठी आग्रह करत नाही. दहावीत मार्क महत्त्वाचे आहेत कारण कॉलेजचा प्रवेश त्यावर अवलंबून आहे, इतकंच तिला सांगितलं होतं. ती शाळेत असताना फार काही अॅक्टिव्हिटी करत नव्हती. गाणं शिकणंही तिने मधेच सोडून दिलं होतं. तिच्या मनात नसताना तिने ते चालू ठेवावं, असा माझा हट्ट नव्हता. पण कॉलेजला जायला लागल्यापासून ती प्रचंड उद्योगी झाली आहे. आता ती सरोद शिकतेय, लिहिते, प्रचंड वाचते, खूप भटकते, इंग्रजी/हिंदी/मराठी गाणी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत दोन्ही ऐकते, तिचं विस्तृत मित्रमंडळ आहे, ज्यात मित्र-मैत्रिणी आणि LGBTQ गणल्या जाणाऱ्या व्यक्तीही आहेत. त्यांना स्वीकारण्यासाठी मन खुलं करायला तिने मला शिकवलं आहे.
मी पत्रकार आहे, त्यामुळे सणावाराला मी घरी असतेच असं नाही. अनेकदा मला कामानिमित्त बाहेर जावं लागतं. ते तिने स्वीकारलं आहे. ती त्याविषयी कटकट करत नाही. ती आठनऊ वर्षांची असताना, २६/११च्या हल्ल्यांच्या वेळी मी फिक्सर म्हणून काम करत होते, गार्डियनच्या पत्रकारासोबत ताजच्या परिसरात होते. २७ला सकाळीही मी तिला शाळेत पाठवलं होतं, कारण आपलं काम आपण करत राहायला हवं, हे तिला कळायला हवं होतं. त्या दुपारी टीव्हीवर लाइव्ह टेलिकास्ट पाहून तिने काळजीने मला फोन केला होता, आई तू ताजच्या जवळ नाहीयेस ना, तिथे बाँबिंग होतंय. मी तिथेच होते, पण तिला अर्थातच मी तसं सांगितलं नाही. आई असले काहीतरी उद्योग करत असते, हे तिला तेव्हापासून ठाऊक झालंय.
पाचसहा वर्षांपूर्वी एकदा घरातला तिचा पसारा पाहून चिडून मी तिला काहीतरी बोलत होते. तेव्हा तिने मला थांबवून म्हटलं होतं, आई, तुझ्या पहिल्या वाक्यात मला कळलंय काय हवंय ते. पुढचं लेक्चर देऊ नकोस. त्या क्षणापासून मी कमीत कमी शब्दांत माझा राग वा नाराजी व्यक्त करायला शिकले. आताही घरात पसारा असतोच, जेवणाखाण्यात दिरंगाई असते, पण मी दुर्लक्ष करायला शिकलेय. ती १८ वर्षांची झाली तेव्हाच मी तिच्या छोट्यामोठ्या बाबींमध्ये लक्ष घालणं थांबवलंय. बँकेतलं तिचं खातं सांभाळणं, कॉलेजातल्या परीक्षा, अटेंडन्स वगैरेची जबाबदरी तिच्यावर असते. त्यातनंही कधीतरी गडबड होते, पण तेही होतच राहणार हे आम्ही गृहीत धरलं आहे. मी निष्काळजी आहे, असं यातनं वाटू शकतं. पण व्यक्तिस्वातंत्र्यावर नुसता विश्वास असून उपयोग नाही, ते आचरणात आणायला हवं ना? खून आणि बलात्कार याव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट माफ करण्यापलिकडची नाही, असं माझं ठाम मत आहे. मी स्वत: अतिशय चुकतमाकत शिकत या टप्प्याला येऊन पोचलेय. त्यामुळे ती वयपरत्वे चुका करणारच, त्याचा बाऊ करण्याची गरज मला वाटत नाही. तिच्या चुकांमधनं मीही शिकतेयच कीे!
मृण्मयी रानडे, पत्रकार.

वेळ, जमीन आणि खर्च कमी तरी मिळवला नफा


बुलढाणा जिल्ह्यातलं देऊळगाव मही गावं. दत्तात्रय शिंगणे यांची वडिलोपार्जित पाच एकर जमीन. शिक्षण फक्त दहावी. पारंपरिक शेतीत खर्च भागणे अशक्य. म्हणून मग खाजगी कामांची जोड दिली. एकीकडे धाकट्या भावाचं शिक्षण सुरु. त्यामुळे त्याचीही मदत कमीच. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. मग विचार करत दत्तात्रय यांनी पूर्णवेळ घरची शेतीच कसायचा निर्णय घेतला. अर्थातच, त्यासाठी गरज होती मेहनत आणि जिद्दीची. 
नुकताच, परिसरात खडकपूर्णा प्रकल्प झाल्याने शेती ओलिताखाली आलेली. त्यामुळे पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला, गहू, हरभरा, मका, ऊस अशी पिके घ्यायला त्यांनी सुरुवात केली. नंतर मात्र या पिकांना फाटा देत वेगळी शेती करण्याचे शिंगणे यांच्या डोक्यात आले. त्यांनी दीड क्विंटल मेथीच्या भाजीचे बी आणले आणि ते दीड एकर शेतात टाकले. 


मेथी वाढू लागली. आणि अवघ्या महिनाभरात शेत हिरवंगार दिसू लागलं. मग एक दिवस त्यांनी व्यापाऱ्यांनाच शेतात आणलं. एका व्यापाऱ्याने मेथी पाहून जागेवरच दीड लाखाचा सौदा केला.
मेथीचे बी, खत आणि इतर असा त्यांना २० हजार खर्च आला. पण केवळ एकाच महिन्यात मेथीतून त्यांनी १ लाख ३० हजारांचा निव्वळ नफा कमावला.
आता मेथीच्या शेतात आंतरपीक म्हणून मका लावला आहे. मक्यापासून शिंगणे यांना पुढील काळात दीड लाख उत्पादनाची अपेक्षा आहे. मेथी, ऊस आणि मका या तीनही पिकांपासून एकूण चार लाखावर उत्पादन होईल आणि खर्च वजा जाता निव्वळ नफा तीन ते साडेतीन लाख रुपयांचा मिळेल असं ते सांगतात. कमी वेळात, कमी शेतीत आणि कमी खर्चात जास्त नफा मिळाल्याने दत्तात्रय आनंदी आहेत.
अमोल सराफ.

खूप काही शिकायला मिळत


आमची दोन्हीही मुलं (मोठी मुलगी--लहान मुलगा) घडवताना पालक म्हणून आम्हांलाही खूप काही शिकायला मिळत आहे. मुलगी शांत, समंजस तर मुलगा खोडकर, व्रात्य. काही गोष्टी अनुभवल्यावरच मुलांच्या पक्क्या लक्षात रहातात, हे माझ्या नवर्यावचे मत. त्यामुळे वर्षातून एक - दोनदा आम्हा सर्वांचं एकत्र पर्यटन हे ठरलेलंच. 
मुलांना दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी सहज समजाव्यात म्हणून आम्ही पालक कायम दक्ष असतो. त्याचसाठी आम्ही मुलांची शाळाही अशी निवडली की जिथे ‘अभ्यास एके अभ्यास’ नसतो. चौफेर शिक्षण म्हणजे चित्रकला, नाट्यअभिनय, खेळ, गायन-वादन, हस्तकला यासोबत हसतखेळत शिक्षणही सुरू आहे. यात कधीकधी पारडं एकाच गोष्टीकडे झुकतं. मग इतर विषयांकडे साहजिकच दुर्लक्ष होतं. अशा वेळी मुलं स्वतःच त्यावर विचार करून दुर्लक्ष झालेल्या विषयांवर मेहनत घेतात.
मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पालक देऊ शकत नाहीत. पण मुलांना प्रश्न तर पडलेले असतातच. मग त्यांची उत्तरं बाहेरून चुकीच्या पध्दतीने मिळवण्यापेक्षा मीच सर्रास ती देते. त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल अशा रीतीने देते.
याआधी मुलं जेव्हा प्राथमिक शाळेत होती, तेव्हा मी एक अनुभवलं. तिथले पालक -शिक्षक फक्त अभ्यासाचे चाहते. त्यामुळे बिचारे विद्यार्थी अक्षरशः बेजार. "माझा मुलगा काहीच अभ्यास करत नाही...” अशी काळजीवजा तक्रार जेव्हा पहिलीतल्या मुलाची आई करते, तेव्हा मला नवल वाटतं. मी अशा खूपशा पालकांचं बौद्धिक घेतलं आहे, "अहो, त्याचं वय किती लहान आहे! या लहानग्याकडून तुमच्या अपेक्षा तरी किती? पहिलीतल्या मार्कांमुळे त्याला नोकरी मिळणार आहे का? की खूप मोठं नुकसान होणार आहे? लहान आहे मुलगा. खेळू द्या, त्याला जे वाटतं ते करू द्या." मुलांना समजून घेणारे पालक कमीच भेटले.
 माझा मुलगा खोडकर. त्यामुळे शाळेतून वारंवार काही ना काही तक्रारी यायच्या. एकदा मी शाळेत जाऊन शिक्षकांना सुनावलं, "काय हो? 'तारे जमी पर' करता का माझ्या मुलाचं? अहो तो खोडकर आहे, हे मलाच काय सांगता? त्याच्या या बुध्दीचा कुठे वापर होईल, त्याला कसं व्यस्त ठेवता येइल ते पहा ना तुम्ही. माझी तुम्हाला साथ असेल. सुदैवाने मला भेटलेल्या शिक्षकांना हे पटलेलंही आहे. त्यांनी तसे प्रयोग सुरू केले. मग माझा मुलगा कायम भाषण पाठ करण्यात, नाटक अथवा समूहगीत सरावात दंग राहू लागला. कौतुक होतं म्हटल्यावर जिद्दीने अभ्यासही करून त्यातही यश मिळवू लागला. त्यामुळे सर्वांचाच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
हा सगळा अनुभव आनंदाचा आहे. आमचं आनंदी पालकत्वाचा अनुभव घेणं सुरूच आहे. मुलांसोबत आम्हीही नवे धडे गिरवतोय.
वर्षा मुसळे, सोलापूरच्या ‘नवी उमेद’च्या वाचक.

सौरउर्जा आली, वीजटंचाई पळाली


नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरचं आष्टी तालुक्यातलं केरुळ. इथं मुस्ताक शेख यांची दहा एकर शेती. शेतीवरच उदरनिर्वांह. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्याची त्यांची कायमची धडपड. शेतीसाठी एकीकडे पाणी महत्त्वाचं. पण पाणी द्यायचं तर आपल्याकडे विजेचा प्रश्न कायम सतावणारा. पाणी आहे पण वीज नाही ही स्थिती तर नेहमीचीच.
रब्बीचा हंगामात भारनियमन असेल तर शेतकऱ्यांची तारांबळही ठरलेली. हे सगळं बघून शेख यांनी आधी इंजिनपंप वापरायला सुरुवात केली. पण, त्यासाठी लागणारं इंधन परवडेना. काय करायचं असा विचार सुरु असतानाच शेख यांना नागपुरात एका कृषी प्रदर्शनात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाची माहिती मिळाली. मग त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा पंप आपल्या शेतात बसवायचे ठरवले.
शासनाच्या ‘अटल सौर ऊर्जा' योजनेने त्यांना आधार दिला. या योजनेतून महावितरणतर्फे सौर उर्जेंचे युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. जैन इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी शेख यांना मार्गदर्शन केले. शेख यांनी महावितरणकडे अटल सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्प बसवण्यासाठी मागणी केली.प्रकल्प मंजुर झाला. हे युनिट होतं सहा लाख 75 हजार रुपयांचं. त्यासाठी शेख यांनी 34 हजार सातशे रुपये भरले. आणि 75 टक्के अनुदान मिळालं. अन्‌ पाच अश्विशक्तीचा विद्युत पंप सौर उर्जेवर सुरु झाला. यात सोळा प्लेटचे तीन पॅनेल वीज निर्मिती करतात. थेट जोडणी असलेला (डीसी) विद्युत पंप बसवला असून दिवसभर पंप सुरु राहतो. सध्या शेख यांच्या शेतात तीन एकर गहू, एक एकर कांदा, दोन एकर ज्वारी, अडीच एकर हरभरा, दीड एकर चारापीके आहेत. अशी दहा एकरावरची शेती सौरउर्जेच्या वीजेतून हिरवीगार झाली आहे. सौरउर्जेतून तयार होणारी वीज साठवली जात नाही तर थेट पंप चालू राहत असल्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जागरण करण्याची गरज पडत नाही. तसंच पिकांना पाणी देण्यासाठी जलमापक यंत्र बसवल्यामुळे सगळी यंत्रणा मोबाईलद्वारे हाताळली जात आहे.
मुस्ताक शेख म्हणतात, ’सौरउर्जेवर वीज निर्मिती करणारा प्रकल्पामुळे शेतीला वेळेवर व मुबलक पाणी मिळू लागले आहे. वीजटंचाई आणि इंधनखर्चातून मुक्तता तर झालीच. शिवाय शेतीला किती पाणी दिले याचे मोजमाप करण्यासाठी जलमापक बसवल्यामुळे पाणीही नियंत्रित देता येते’.
संपर्क - मुस्ताक शेख - ७७५६०५०७६७

- सूर्यकांत नेटके.

मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्तही काही करावं.

''आताच्या तरुण पिढीला वाटतं की आपल्या मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्तही काही करावं. त्यांचा सहभाग,सजगता आणि उत्साह यामुळे खेळाला आता पुरेसं महत्व मिळताना दिसतं'', जागतिक स्तरावर भारतीय नेमबाजीच्या सुवर्णयुगाचा पाया रचणाऱ्या अंजली भागवत सांगत होत्या. 
त्यांच्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थींमध्ये वय वर्षं १२ पासून ४२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे . त्यांचं प्रशिक्षण हेही एक प्रकारे पालकत्वच. “नेमबाजी हा मेंटल गेम जास्त आहे. यात सायकॉलॉजी खूप महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे, वयाप्रमाणे हाताळणं, समजावणं, प्रेरित करणं, निकोप स्पर्धा ठेवणं आव्हानात्मक असतं”, अंजली म्हणतात. प्रशिक्षण देताना, काही वेळेस आपल्याला पूर्वी न पडलेल्या शंका विद्यार्थी विचारतात. त्यातून स्वतःलाही खूप शिकायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. 
“लहान मुलांना इगो खूप असतो. तो न दुखावता त्यांना कुठलीही गोष्ट कशी शिकवायची, त्यांच्या कलानं कसं घ्यायचं हे आव्हानात्मक असतं. खुद्द माझ्या सहा वर्षांच्या मुलाकडून, आराध्यकडून खूप शिकायला मिळतं. माझ्या माहेरी वेदपाठकांकडे, मोठं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे भावंडाना सांभाळायचा मला अनुभव होता. तो आराध्यसाठी उपयोगी पडला”, अंजली भागवत यांनी सांगितलं. 
लहान मुलांचं विश्वच आई असतं. सर्वाधिक तक्रारीही आईबाबतच असतात आणि सर्वाधिक प्रेमही आईवरच असतं, असं त्या म्हणतात. "आराध्य साडे तीन महिन्यांचा असल्यापासूनच मी पुन्हा खेळायला सुरुवात केली. मी जिथे जात होते तिथे त्याला बरोबर नेत असल्यामुळे तो लहानपणापासून खूप माणसांमध्ये वावरला आहे.
 तरी त्याला खूप गर्दी, खूप आवाज आवडत नाही. घरातली माणसं, मावशी ,आत्या, भावंडं वगळता तो इतरांशी फारसा बोलत नाही." त्यावर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “तो त्याचा स्वभाव आहे. त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न मी करत नाही. पण त्याला माणसांमध्ये नेण्याचंही सोडत नाही,” अंजली सांगतात. 
"आराध्य स्वतःच्या वस्तू खूप छान सांभाळतो. त्याला गाड्या खूप आवडतात. विशेष म्हणजे त्याच्या संग्रहातली एकही गाडी त्याच्याकडून मोडलेली नाही. त्याला अभ्यास आवडत नाही आणि त्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करत नाही. पण जेवढया किमान गोष्टी आवश्यक आहेत तेवढया त्याच्याकडून खेळीमेळीने करून घेते, खास त्याच्यासाठी दिवसभारातला दीड तास राखून ठेवते. सायकल चालवणं, झाडावर चढणं यासारखे मैदानी खेळ त्याला खूप आवडतात. तो भरपूर खेळतो.” अंजली सांगतात. स्वतःचं बालपण जसं खेळामुळे समृद्ध झालं, तसाच खेळाचा मनमुराद आनंद आराध्य घेत असल्याबद्दल अंजली भागवत आनंद व्यक्त करतात.
अंजली भागवत, जागतिक कीर्तीच्या नेमबाजपटू
- सोनाली काकडे - कुळकर्णी

Wednesday, 29 March 2017

फळबाग बहरली, ऊस मोडला

बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर तालुक्यातलं धुनकवड गाव. चारही बाजू डोंगराने वेढलेल्या. इथल्या कुलकर्णी कुटुंबाने डोंगरावर ऊस आणि डाळिंबाची शेती करून परिसर हिरवाईने नटविला आहे. कल्याण कुलकर्णी हे सार्वजनिक बांधकाम खात्यात बीड उपविभागीय कार्यालयात भांडारपाल. ते म्हणाले, ‘पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष्य. सगळी जमीन डोंगराळ. या भागात 1986 मध्ये कुंडलिका मध्यम प्रकल्प झाला. पाणी बऱ्यापैकी साचून राहू लागले. धुनकवड, नागझरी, आंबेवडगाव या तीन गावांचं सखल भागातून पहाडी भागात पुनर्वसन झालं. माळरानावरची जमीन नापिकीचीच. तलावाच्या बॅक वॉटरमध्ये आमची शेती गेली. वडिलोपार्जित पंधरा एकर जमीन होती. वडिल गावातील राजकारणातच अधिक रमले. नावापुरत्या शेतीत खरीपात हायब्रीड ज्वारी, थोडी बाजरी तर रब्बीला मूग, मटकी, चवळी ही कडधान्य असायची. उत्पन्न जुजबीच होतं. घरची परिस्थिती हलाकीची. मी 1995-96 पासून शेतीत लक्ष घालायला सुरवात केली’. 

वडीलांचं रेशन दुकान. विकलेल्या मालाचे पैसे कोणाला मागत नसत. घरावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. सावकाराला जमीन लिहून द्यायची वेळ आली आणि मुलांनी कर्ज फेडल्याचे ते सांगतात. इथूनच शेतीत कायापालट सुरू झाला. माजलगावचे धैर्यशील सोळंके यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. जिल्हा बँकेचं कर्ज मिळालं. डोंगरापर्यंत जलवाहिनी घेतली. आणि ऊस शेतीने हात दिला. दोनशे, तीनशे टन ऊस होऊ लागला. कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात ऊस शेती फायदेशीर ठरली. कर्जमुक्त होऊन घरात सुबत्ता नांदू लागली. रात्री तलावातून सोडलेलं पाणी सकाळपर्यंत वाहायचं बंद झालं. दुष्काळामुळे पाणी बचतीचं महत्व कळू लागलं. 


मग 2000 मध्ये त्यांनी 35 एकर नवीन शेती घेतली. धैर्यशीलकाकांनीच डाळिंब लागवडीचं सुचवलं. नगर, नाशिकच्या डाळिंब बागाही दाखवल्या. याच दरम्यान चऱ्हाटा गावच्या मकरंद उबाळे यांनी खडकाळ जमिनीत डाळिंब लागवडीचा प्रयोग केला होता. तो बघून कल्याण यांनी जैन टिश्यूकल्चरची रोपं आणली. डाळिंब आणि ऊस शेती ठिबकवरच केली. आज अडीच हजार डाळिंब रोपं हलक्या डोंगराळ जमिनीत फोफावली आहेत. डाळींबाचं पहिलं पीक चोवीस महिन्यांनी धरलं आणि सतरा लाखांचा नफा झाला. कोलकाता, सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी शेतातून पीक नेलं. मागच्या वर्षी पन्नास टन उत्पादन झालं. माल एक्स्पोर्ट झाला आणि नांदेड, वजिराबाद, हैदराबाद येथेही गेला.

कुलकर्णी सांगतात, ‘जिल्ह्यात दुष्काळ असताना आम्हाला डाळिंबाने साथ दिली. आता केशरआंबा, मोसंबी, लिंब आणि डाळिंब अशी फळबाग झाली आहे. डोंगर फोडून पाच एकर जमीनही केली आहे. धरणातील गाळ टाकल्यामुळे ती बागायती सुपीक झाली आहे. फळबागांनी साथ दिल्याने ऊस मोडल्याचं समाधान मिळतं’. कुलकर्णी यांची शेती पाहून गावातही बदल घडला. आता तीस एकरहून अधिक क्षेत्रावर गावात डाळिंब लागवड झाली आहे. भाजीपाला देखील शेतकरी ठिबकवर घेऊ लागले आहेत. 
कल्याण कुलकर्णी संपर्क - 9422745544
 मुकुंद कुलकर्णी.

“जिंकण्या-हरण्यातली सीमारेषा मुलांना समजावून सांगणं.

 “जिंकण्या-हरण्यातली सीमारेषा मुलांना समजावून सांगणं आणि पालक म्हणून आपल्याला ते सांभाळता येणं खूप महत्त्वाचं आहे", अभिनेत्री, मॉडेल आणि मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड मिडियाच्या संचालक मधुराणी प्रभुलकर सांगत होत्या. “सध्याचं युग स्पर्धेचं असलं तरी मुलांवर स्पर्धेचा ताण येता कामा नये. मुलांना खूप अॅडक्टिव्हिटीजमध्येही गुंतवू नये.” त्या म्हणाल्या. 
अकॅडमीच्या निमित्ताने अनेक मुलं, पालक त्यांच्या संपर्कात येतात. त्या अनुभवाआधारे मधुराणी म्हणाल्या, “पालक म्हणून आपल्यामध्ये संयमाची खूप गरज आहे. बर्‍याचदा मुलांनी एखादी गोष्ट शिकावी, असं तीव्रतेने पालक म्हणून आपल्याला वाटत असतं. पण मुलांच्या तयारीला पुरेसा वेळ द्यावा लागतो. एखादी गोष्ट मुलांना नाही जमली तर काय बिघडतं? चार वर्षांच्या मुलांना नाही जमली स्टॅण्डिंग लाइन तर काय बिघडलं? अभ्यास असो वा इतर काही.. मुलांच्या डोक्यावर बसून करून घेण्यात काहीच अर्थ नसतो”.
 मधुराणी यांची पावणेचार वर्षांची लेक स्वराली खूप समजूतदार आहे. धकाधकीत मूल वाढवायचं नव्हतं. त्यामुळे मुलासाठी वेळ देता येइल, अशा टप्प्यावरच मधुराणी आणि प्रमोद यांनी मूल होण्याचा निर्णय घेतला. स्वरालीसाठी त्यांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे मुंबईहून पुण्याला शिफ्ट होणं. आमच्या करिअरच्या दृष्टीनेही हा मोठा निर्णय होता. मुंबईत प्रवासामुळे मुलं दमतात. पुण्यात हवामान, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण अधिक पोषक वाटल्याने हा निर्णय घेतल्याचं त्या सांगतात. मराठी भाषा आणि संस्कृतीला पोषक वातावरणात तिला वाढवायचं आहे. स्वरालीला तिच्या वयापासून ते अगदी पंधरा वर्षांपर्यंत, सर्व वयोगटातल्या मैत्रिणी आहेत आणि बिनधास्तपणे त्या कधीही कोणाच्याही घरी खेळू शकतात. असं मुलांना अनुकूल वातावरण मुंबईत कमी आढळतं, असं त्यांना वाटतं. “सगळ्या स्तरातल्या मुलांबरोबर ती राहावी, तिच्या जाणिवा, सामाजिक भान, एका वर्गापुरता मर्यादित न राहता व्यापक व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असतो. यादृष्टीने तिला एसएससी बोर्डाच्या साध्या शाळेत घातलं आहे”, मधुराणी सांगतात.
"स्वरालीच्या जन्मानंतर आयुष्य तर बदललंच; पण आयुष्याकडे पाहाण्याची माझी दृष्टीही बदलली. कुठलीही गोष्ट असेल.. साधं फुलपाखरू असेल, रोप असेल... स्वराली जेव्हा ते पहिल्यांदा पाहते, त्याचा आनंद घेते तेव्हा तिच्या नजरेतून मीही तो आनंदसोहळा पहिल्यांदाच अनुभवत असते." मधुराणी म्हणाल्या
मधुराणी प्रभुलकर

सोनाली काकडे,हेमंत कर्णिक.

‘टॉप सिक्रेट’नं भेदलं दुष्टचक्र

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील फुल शेतीची ही गोष्ट. परंपरागत शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. वर्षानुवर्षे शेतकऱ्याच्या माथी असलेलं दुष्टचक्र भेदलं गजानन ढगे यांनी. ढगे यांनी १० गुंठे जमिनीत जून २०१६ मध्ये गुलाब शेती सुरु केली. त्यासाठी पुण्यातून हार्टीकल्चरचं प्रशिक्षण घेतलं. आणि ‘टॉप सिक्रेट’ जातीची १० हजार रोपं खरेदी केली. त्यासाठी खर्च आला प्रति रोप सात रुपये. त्यापैकी ९ हजार रोपांची लागवड केली. लागवडीच्या जागेत लालमातीचा वापर केला. रोपांना निंबोळी पावडरची ट्रीटमेंट दिली. हे फूल पॉलिहाऊसमधलं. हवामानानुसार पाण्याची गरज. उष्ण हवामानात अर्धा तास आणि एरवी पंधरा ते वीस मिनिटे ठिबकद्वारे. गुलाबासाठी खत महत्त्वाचे. दर सहा दिवसांनी खतांचा डोस द्यावा लागतो. हिवाळ्यात भुरीचा त्रास जाणवला तर त्यासाठी रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक यांच्या कॉम्बिनेशनने भुरी कंट्रोल करावा लागतो. अश्या पद्धतीनं गुलाब शेतीचे पाणी, खते आणि कीड नियोजन करावं लागतं. 
पॉलिहाऊसमधल्या गुलाबांची गुणवत्ता उत्तम असते. आणि फुलं निर्यातही होतात. फुलशेतीसाठी ढगे यांना १० लाखांचा खर्च आला. पैकी एक लाख त्यांनी जमापुंजी वापरली. आणि नऊ लाख रुपये बॅंकेचं कर्ज घेतलं. कृषी विभागाने चार लाख एकाहत्तर हजार सबसिडी दिली. त्यामुळे आता चार लाख पंचवीस हजारांचे कर्ज ढगे यांच्यावर आहे.
लागवडीनंतर चार महिन्यांनी गुलाबाचे उत्पादन सुरु झाले. सुरुवातीला साडेतीनशे तर आता पाचशे ते सहाशे फुलं रोज निघतात. ढगे यांच्याकडची फुले चांगल्या प्रतीची. त्यामुळे त्यांना सरासरी चार रुपयांचा दर मिळत असून दोन हजार रुपयांचं रोज नगदी उत्पन्न मिळतं आहे. यामध्ये खते आणि फवारणीचा खर्च वजा होऊन ढगे यांना ३० हजार रुपये महिना निव्वळ नफा राहातो. अकोला आणि अमरावतीत त्यांची फुले हातोहात खपतात. विदर्भाचे हवामान, पाण्याची कमतरता आणि बाजारावर अवलंबून असलेली फुलशेती यात जोखीम आहेच हे गजानन ढगे जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी 'टॉप सिक्रेट' या जातीची लागवड केली. ही जात दिसायला उंच. मार्केट डाऊन असते तेव्हा रोपांची छाटणी करून पाणी बंद केले की फुलांची उगवण बंद करण्याची सोय आहे. पुन्हा पाणी देऊन फुलांची उगवण सुरु करण्याची सोय या जातीत आहे. त्यामुळेच बाजारातील चढ़ उतारात त्यांचे नुकसान होत नाही. 

कोरडवाहू भागातील कापूस सोयाबीन पट्ट्यातील बाकी शेतकऱ्यांप्रमाणेच ढगे यांची आधी परिस्थिती होती. केवळ ‘टॉप सिक्रेट’मुळे त्यांचं जीवन बदललं आहे.
- अमोल सराफ.

Wednesday, 22 March 2017

मुलींना आपणच मोठं करणं महत्त्वाचं वाटलं

माझ्या मुलींच्या वाढीच्या टप्प्यांत मी त्यांच्यासोबत असावं, असं वाटायचं. मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीला जाणाऱ्या मैत्रिणींच्या अनुभवांवरून मुलींना आपणच मोठं करणं महत्त्वाचं वाटलं. आता मुली आठ वर्षांच्या झाल्यात, त्या माझ्यावर अवलंबून नाहीत. तानाजीनं तसं सुचवूनदेखील नोकरी-व्यवसाय करण्याचा सध्या तरी माझा विचार नाही. 
अद्वैता आणि अनन्या जुळ्या असल्या, तरी त्यांचे स्वभाव, चेहरामोहरा, आवडीनिवडी सगळं वेगळं आहे. अद्वैता फक्त एक मिनिट आधी जन्मली म्हणून ती मोठी. खरोखरच ती जबाबदारीची भूमिका निभावते. बहिणीनं मारलं, तर तिला मोठ्या मनानं माफ करणं आणि पुढं भांडण न वाढवणं... एखाद्या गोष्टीसाठी बहिणीनं हट्ट धरला, तर समजूतदारपणे ती वस्तू तिला देऊन टाकणं, असं चालतं.
दोघी अगदी छोट्या होत्या, तेव्हा त्यांना वाढवताना तारांबळ उडायची. प्रवासाला किंवा दवाखान्यात जाताना आई जरी सोबत असली तरी आणखी एक तिसरं माणूस मदतीला लागायचं. पण दोन्ही बाळांची प्रत्येक गोष्ट आपण स्वत: करायची, असं ठरवलेलंच होतं. 
कान टोचायला नेलं, तेव्हा अद्वैताचे कान टोचले. पण रडण्याचा धुमाकूळ दोघींचा. दुसऱ्या बाळाला कान टोचायला पुढे केलं. सोनार म्हणाला, ‘अरे, या बाळाचे तर कान टोचलेले दिसतात.’ आधीच रडायला सुरुवात केल्यामुळे अनन्याचे कान टोचलेत, असंच वाटलं होतं! असे काही किस्से वगळता, बाकी मूल वाढत असताना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्याच गोष्टी मलाही कराव्या लागल्या होत्या. मी, तानाजी दोघंच घरात असल्यामुळे बाळांची रात्रीची जागरणं, दुखणी काढताना कसरत व्हायची. एकीला शांत केलं की दुसरीला मांडीवर घ्यायचं.
चालायला, बोलायला शिकताना बाळाला आईचं सगळं लक्ष आपल्याकडेच असावं, असं वाटत असतं. त्यात त्यांना वाटेकरी नको असतो. परंतु आमच्या मुलींनी बहिणीला वाटेकरी म्हणून पाहिलं नाही. त्या अजाण वयात एकमेकींचा दुस्वास केला नाही. अन्यथा ते दिवस परीक्षा बघणारेच ठरले असते.

जुळ्या मुलींचं पालकत्व विशेषत्वानं जाणवलं, ते मुली शाळेत गेल्यावर. दोघींच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी एकीला नाचाचा क्लास लावला की दुसरीलाही त्याच क्लासला जायचं असतं. त्यांना ‘दोघी’ म्हणून राहण्याची इतकी सवय झाली होती की त्यांना बाकी कुठल्या मित्रांची गरज वाटत नव्हती. त्यांनी समवयस्कांमध्ये मिसळावं म्हणून प्रयत्न करावे लागले.
शाळेत विद्यार्थ्यांच्या तुकड्या दर वर्षी बदलण्याची पद्धत आहे. पण जुळी भावंडं असली की ती एकमेकांना सोडण्यास राजी नसतात. ती दोघांसाठी एकच तुकडी मागतात. मुली ज्युनिअर केजी मधून सिनिअर केजीमध्ये गेल्या तेव्हा त्यांची तुकडी बदलणार होती. शाळेनं आम्हाला बोलावून तसं सांगितलं. या दोघींच्या तुकड्या आता बदलणार. तुम्ही म्हणालात तर दोघींना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू. मात्र आम्ही विचार केला, एक वर्ष दोघींना वेगळ्या तुकडीत बसवून बघायला काय हरकत आहे? पुढे याचे परिणाम चांगले झाले. दोघींचं फ्रेंड सर्कल वेगळं आहे. शिक्षिकाही वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे आम्हाला शिकवण्याच्या विविध पद्धती माहीत होतात. सहलीला गेल्या तेव्हाही दोघी आपापल्या वर्गसोबत्यांबरोबर होत्या. एकमेकींना भेटल्याही नव्हत्या. अशा प्रकारे दोघी स्वतंत्रपणे अनुभव घेतात आणि घरी आल्यावर ते शेअर होतात त्यामुळे प्रत्येकीला अधिक अनुभव मिळतो.
टीव्हीचा रिमोट हा दोघींमधल्या भांडणाचा विषय सध्या तरी नाही. कार्यक्रम किंवा चॅनल यांबाबत दोघींचा चॉइस आज तरी समान आहे. एकमेकींसाठी जीव टाकणं हे इतर कोणत्याही घरामधल्या दोन भावंडांसारखंच आहे.
आसावरी तानाजी पाटील
- सुलेखा नलिनी नागेश

झिरोबजेट शेतीनं सावकारी कचाटा सुटला

नांदेड जिल्हा. लोहा तालुक्यातील दापशेड येथील विश्वनाथ गोविंदराव होळगे यांच्या झिरोबजेट शेतीची ही गोष्ट. विश्वनाथ होळगे यांचं एकत्र कुटुंब. घरची १४ एकर शेती. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके वापरून शेती नापीक बनलेली. प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च वाढत गेल्याने तोट्यात चालणारी. गावातील अॅड.उदय संगारेड्डीकर आणि केशव राहेगावकर हे पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या बार्शी येथील शिबिरातून शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकून आलेले. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना या शेतीचे तंत्र समजावून दिले. होळगे यांनीही हे तंत्र शिकून घेतलं आणि घरच्या शेतीत हा प्रयोग करायचं ठरवलं. झिरोबजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय तर कोणतंही पीक घेताना मुख्य पिकात त्याच हंगामात येणारी आंतरपिके घ्यायची. या आंतरपिकाच्या उत्पन्नातून मुख्य पिकाचा पेरणी, बियाणे, मशागत असा सर्व खर्च निघत असल्याने, मुख्य पिक शून्य खर्चात म्हणजेच झिरोबजेट होते. 
बिजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा ही झीरोबजेट शेतीची चतु:सूत्री. 
यापद्धतीत कोणतीही खते, कीटकनाशके, औषधे शेतात टाकावी लागत नाहीत. एका गावरान देशी गायीपासून या पद्धतीत 30 एकर शेती करता येते. केवळ १० टक्के विजेची गरज असते. त्यामुळे वीज आणि पाणीबचत. महागड्या ठिबक सिंचनाची, शेततळ्याची कटकट नाही. उत्पादित शेतमाल विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार आणि स्वादिष्ट असतो. 
होळगे यांनी हेच तंत्र वापरलं. आणि शेतात गतवर्षी पाच एकर डाळींब लागवड केली. पाण्याचा दुष्काळ असल्याने बोअरच्या तुटपुंज्या पाण्यातून त्यांनी डाळींबाची १५०० झाडे जगविली. यावर्षी यातल्या दोन एकर डाळींबाच्या शेतात बटाटे, काऱ्हाळ, लसूण आणि मोहरी ही आंतरपिके घेतली. सध्या डाळींबाची झाडे लहान असल्याने त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे यावर्षी मुख्य पीक बटाटा हेच आहे. या पिकाचा खर्च आंतरपिकांत वसूल झाला आहे. केवळ देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासून शेतातच बनविलेल्या जीवामृताच्या फवारण्या यामुळे बटाटे पीक उत्तम आलेले आहे. 
दुसरीकडे तीन एकर डाळींबाच्या शेतात गव्हाचे मुख्य पीक घेतले आहे आणि त्यात हरभरा आणि मोहरी, कोथिंबीर, गवार ही आंतरपिके घेतली आहेत. तिथे साठ क्विंटल गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे.
बाजूच्या शेतकरी मित्रांकडे प्रचंड रासायनिक खते, कीटकनाशके आणि औषधांच्या फवारण्या करून फक्त गव्हाचे एकच पीक असल्याचे होळगे सांगतात. होळगे यांच्या गव्हाची ओंबी मोठी आहे आणि गव्हाच्या दाण्याची संख्याही जास्त आहे. गव्हाआधी याच तीन एकरात त्यांनी खरीपात २२ क्विंटल सोयाबीन आणि पाच क्विंटल तुरीचे उत्पन्न मिळवले आहे. होळगे म्हणतात, ‘हे तंत्र वापरून शेतीला सुरुवात केल्यानंतर आमच्या मागचा सावकार सुटला. दरवर्षी पेरणीच्या वेळी ३० हजारांची रासायनिक खते लागायची, पुन्हा चांगल्या पिकासाठी दहा हजाराचे डी.ए.पी. खत लागायचे. शिवाय कीटक आणि तणनाशके लागायची ती वेगळीच. त्यातून ५०-६० हजारांची उधारी व्हायची. नगदी पैसे नसल्यामुळे दुकानदार उधारीत जो भाव लावेल तो मुकाट्याने द्यावा लागायचा. मग कापूस किंवा अन्य पिके येताच दुकानदार सव्वापट रक्कम वसूल करायचा. सुमारे ७० ते ८० हजार रुपये उत्पादनातून दुकानदार म्हणजेच सावकाराला द्यावे लागत’. हा भुर्दंड या तंत्राने वाचवला आणि सावकार सुटला आहे.
- सु. मा. कुळकर्णी.

पालकत्व हा आयुष्यातील जबाबदारीचा टप्पा असतो

मुलांना वाढवणं, पालक होणं या सुंदर गोष्टी असतात, त्यांना आपणच आकार द्यावा लागतो, पालकत्व हा आयुष्यातील जबाबदारीचा टप्पा असतो हा संस्कार आई-वडिलांकडून झाला. मुलं होतील तेव्हा त्यांना वेळ देता येण्याइतके आपण मोकळे असलो पाहिजे, हे पक्कं ठरवलेलं होतं. शिक्षण, नोकरी संपेपर्यंत मूल होणार नाही, याची डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतली. आपलं मूल देखणं, हुषार असावं असं वाटण्यापेक्षा ते सामान्य असावं, त्याला साध्या साध्या गोष्टींमधून आनंद घेता यावा एवढीच इच्छा होती. पोटात मूल तयार होणं, वाढणं हे बेबीसेंटरच्या वेबसाईटवर पाहताना आनंदून जायचो. मूल होणं ही खरोखर निसर्गाची जादूच! जन्मानंतर मुलाला विविध टप्प्यांवर वाढताना बघताना कमाल वाटते. एकाच आई-बापाची दोन मुलं वेगवेगळी असणंही विलक्षणच!


ओजस दहा आणि तुहिन सहा वर्षांचा. माझ्या आईबाबांकडून अनुभवलेला ओलावा पालक म्हणून आपल्यालाही मुलांना देता यावा असं वाटतं. ओजसचं स्वतःची ओळख शोधण्याचं वय. अपमान सहन न होणं, एकदम भडकणं, कोणाचंही न ऐकणं, उलट उत्तर देणं, लहान भावंडाला मारणं आणि तरीही सगळे लाड करून घेणं हे आम्ही ओजसच्या रुपाने अनुभवतो आहोत. स्वतःला कायमचं ठरवून घ्यावं लागतं की तो रागावला तरी मी रागावणार नाही. ठाम शब्दात त्याचं काय चुकतंय, ते कसं बदलता येईल हे सुचवीन. त्याला विचारीन की हे बदलण्यासाठी काय प्रयत्न करू शकशील, त्यात माझी काही मदत होईल का? आणि मुळात चुकतंय हे पटतंय का? या संवादात त्याला माझं काही चुकतंय का हेही सांगण्याची पूर्ण मोकळीक आहे. हे बोलूनही तो पुन्हा असाच वागणार आहे आणि मला शांत रहायची कसोटी पार करत पुन्हा हेच बोलावं लागणार आहे. मीच जर त्याच्याशी रागावून वागले तर तो माझ्यापासून आणि स्वतःपासूनही दूर जाईल अशी भीती वाटते. म्हणून हा खटाटोप. हे सगळं एका क्षणात जमलेलं नाही. वाचन, मनाची तयारी केल्यावरच प्रत्यक्षात आणता आलं आहे. हे जमल्यामुळे मला पालक म्हणून खूप छान वाटतं आहे.
तुहिनला दादाचं अनुकरण करायचं असतं. शिवाय त्याला सर्व खेळणी आणि वस्तू तोडून बघायच्या असतात. आत काय आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. काही वेळा माझा संताप अनावर होतो. पण रागावलं की चिमुकली मुलं बिचारी घाबरतात, त्यांचा मोठ्या माणसांवरचा विश्वास उडतो. त्यापेक्षा समजावून सांगणं किंवा हे तोडून बघण्यापेक्षा अजून इतर काहीतरी कर, असे पर्याय समोर ठेवले की त्याच्या सृजनशक्तीलाही मार्ग मिळतो आणि रागवावंही लागत नाही.
मुलं जे करत असतात त्यामागे नक्की काहीतरी कारण असतं, विचार असतो यावर विश्वास ठेवणारी मी पालक आहे. हा विश्वास मीच गमावला, तर मुलाने कोणाकडे बघायचं? कितीही कठीण वाटलं तरी मुलाला नेमकं काय हवंय हे समजून घेणारे पालक तयार होणं हा मुलाचा हक्क आहे. तो मिळवून देणं हे पालकांच्याच हातात आहे.
आभा भागवत

जोखीम घेऊन मिळवलं यश

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका. इथल्या नारळी-कुरळी गावातील युवा शेतकरी गणेश उतळे. गणेश यांचे वडील विठ्ठल रामचंद्र उतळे यांनी मजुरीतून पै-पै जोडून जमेल तशी शेती घेतली. आज या कुटुंबाकडे ३० एकर ओलीताची शेती आहे. शिक्षणानंतर नोकरीमागे न लागता वडिलांनी दिलेला शेतीचा वारसा गणेश यांनी चालविण्यास घेतला. 
पारंपरिक सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसोबत शेतीत हळूहळू प्रयोग सुरू केले. प्रारंभी ऊसाचे पीक घेतले. त्यातून आर्थिक जम बसला. कालांतराने गणेश यांचा उमरखेड तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक राहूल वाघमारे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी ‘कृषी तंत्रज्ञान' हे पुस्तक वाचायला सांगितल. हे पुस्तक आणि वाघमारे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि उतळे यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
‘त्या पुस्तकाच्या मदतीने आमच्या शेतीची दशाच बदलली', असं गणेश उतळे उत्साहाने सांगतात.पूर्वी शेतीत सोयाबीन, कापसासह केवळ ऊस हे एकमेव नगदी पीक घेत होते. आता त्यांनी परभणीहून तायवान ७८६ हे पपईचे बियाणे आणले. घरीच त्यापासून रोपे तयार केली. शेतीत अडीच एकर जागा तयार करून ५ बाय ६ अंतरावर अडीच हजार रोपांची लागवड केली. पैकी ८०० रोपांनी काही दिवसांत मान टाकली. उतळे निराश झाले. आपलं काय चुकलं, याचा शोध घेतला. तेव्हा आवश्यक तापमानाचे नियोजन करण्यात गफलत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उर्वरित१७०० झाडांची त्यांनी काळजी घेतली. १० महिन्याच्या कालावधीत सल्फर, पोटॅश, प्रमाणात युरिया खत घालून झाडांचं संगोपन केलं. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही झाडे प्रत्येकी २२५ ते २५० पपयांनी लदबदली. ती उतळे यांनी उमरखेडसह किनवट, अकोला येथील व्यापाऱ्यांना आठ रूपये किलो दराने विकली. ८००० रूपये टनाप्रमाणे त्यांनी जवळपास ७० टन पपई तीन महिन्यात विकली. यातून त्यांना जवळपास साडेपाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळालं. शेवटच्या टप्प्यातील हिरवी पपई तीन रूपये किलोनं दिल्ली येथील चेरीच्या व्यापाऱ्याला विकली. त्यातूनही ३० हजार रूपयांचे उत्पन्न मिळालं.
योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा स्वीकार, अभ्यास आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर उतळे लखपती झाले. पपईच्या झाडांमधील जागेत त्यांनी मल्चिंग पद्धतीने टरबुजाचं पीक घेतलं. त्यातही विक्रमी ३८ टन उत्पादन मिळालं. मात्र गेल्यावर्षी टरबुजाचा भाव पडला आणि ८५ हजार रूपयांचे नुकसान सहन करावं लागलं.
दराच्या अस्थिरतेमुळे शेती करणं धोक्याचं झालं आहे. मात्र जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही, असं गणेश म्हणतात. पपईच्या लागवडीपासून काढणीपर्यंत ९५ हजार रूपये खर्च आला. खर्च वजा जाऊन साडेचार लाख रूपये उत्पन्न मिळाल्याने पपईने यावर्षी मोठा आर्थिक आधार दिल्याचे ते सांगतात.
आज गणेश उतळे यांच्याकडे तीन कामगार वार्षिक वेतनावर तर हंगामाच्या काळात ५० मजूर काम करतात. कष्टातून कमाईचा मंत्र वडिलांनीच दिला, असं ते कृतज्ञपणे सांगतात. शासनाच्या अनेक योजना चांगल्या असल्या तरी सबसिडी मिळविताना बरेचदा फसगत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेश उतळे यांचा संपर्क ८८०५८८२७३१

नितीन पखाले

Sunday, 19 March 2017

पालक म्हणून काही सांगावं

पालक म्हणून काही सांगावं, लिहावं असा अधिकार आहे का मला? पालकत्व स्वीकारताना सजगतेनं विचार केला होता का आम्ही? आम्ही मुलीला घडवलं की तिनंच आमच्यातल्या पालकत्वाला शहाणं केलं? एकदा तिनं मला मेसेज केला होता- "तुमचं बघून, मी स्वत: करून तसं वागायला शिकले. तुमच्या धाकामुळे किंवा शिकवणीमुळे नाही. आपल्यात वाद-मतभेद होतात, होत राहतील. पण त्यातही तुम्ही मला कधीच चुकीचं ठरवलं नाही..."
राहीच्या जन्माची थोडी जास्तच वाट पाहायला लागली होती. नातेवाईकांच्या गोतावळ्यात चार मुलांसारखी ती वाढली. तिच्या शालेय जीवनाची सुरुवात अलिबागजवळच्या कुरूळ गावातल्या अंगणवाडीत झाली. गोष्टी ऐकणं-सांगणं, पुस्तकं यांची तिला आवड. तिला मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं हे पक्कं होतं. माझं बीएडमधलं शिक्षणशास्त्राचं अध्ययन, लीलाताई पाटील, रेणू दांडेकर यांचं लेखन, तोत्तोचानसारख्या पुस्तकांचं वाचन यामुळे मुलीला शिकण्याचा आनंद घेता आला पाहिजे हा विचार होता. तेव्हा “मराठी मीडियममध्ये आपल्या स्टँडर्डची मुलं नसतात, मुलं काहीतरी घाणेरडं शिकून येतात” ...अशी शेरेबाजीही झाली. मात्र आपला निर्णय अचूक आहे हे मला आई आणि शिक्षिका म्हणून पक्कं माहीत होतं. सध्या राही पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आजपर्यंत कधीही ती मराठी माध्यमात शिकल्याचा यत्किंचितही पश्चाताप झालेला नाही. उलट ती म्हणते की, मराठीत शिकल्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व मिळवता आलं.
ती शाळेत असताना काही काळ आम्ही “इतर मैत्रिणींना बघ, स्कॉलरशिप मिळाली. तू अभ्यासच करत नाहीस” - अशा अगदीच टिपिकल भूमिकेत शिरलो होतो. आजूबाजूच्या वातावरणाचं दडपण फक्त मुलांवरच नाही, तर पालकांवरही येतं. मात्र लेकीच्या आवडी, कल, गुण लक्षात आल्यावर ही तुलना थांबली. एक दिवस राहीच ठामपणे म्हणाली, ‘मी त्या अमुक-तमुकसारखी नाही होऊ शकत, मी 'मी' आहे!’ हे ऐकून मी भानावर आले.
राहीचं गणिताशी कधी पटलं नाही. तिला भाषाविषयांत गती होती, आहे. पण “त्याचा काय उपयोग?” -असा शिक्षकांचा दृष्टिकोन असे. भाषाविषयांत राहीची उत्तरं 'गाईडमधल्यासारखी नसल्यामुळे' मार्क्स कमीच देत. या सगळ्याचा परिणाम होऊन दहावीच्या वर्षात तिला डोकेदुखीचा आजार झाला. सगळ्या तपासण्या होऊनही निदान होईना. शेवटी समुपदेशकाची मदत घ्यावी लागली. दहावीचा गणिताचा पेपर देऊन घरी आल्यावर यापुढे गणिताशी माझा संबंध येणार नाही, म्हणून तिने अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला.
एकदा ती गंभीरपणे म्हणाली, “आई, शाळा-कॉलेजात जाऊन आपण आयुष्यातली शिकण्याची वर्षं वाया घालवतो असं वाटत नाही तुला?” या प्रश्नाचा विचार मी तेव्हापासून करते आहे. शिक्षणपद्धतीवरचा तिचा विश्वास उडू न देणं हे मला आव्हान वाटतं. विविध क्षेत्रांतल्या मित्रमैत्रिणींचा या स्थितीत आधार मिळतो. ते राहीशी बोलतात, अडचणी सोडवायला मदत करतात. 
क्रिकेटवरची पुस्तकं मिळेल तिथून गोळा करणारी राही हर्ष भोगलेसारखं करिअर करायचं म्हणते. स्वत:ला अपडेट ठेवते. जाणीवपूर्वक स्वत:ला घडवणाऱ्या अशा मुलांकडूनच आपलं पालकपण घडत असतं, असंच वाटतं.
सुजाता पाटील

कमी जमीन, योग्य नियोजन, भरघोस उत्पादन


अमरावती जिल्ह्यातला चांदूर रेलवे तालुका. इथल्या बासलापूर गावातले विवेक चर्जन. घरची जेमतेम एक एकर जमीन. या जमिनीवर त्यांनी संत्र्याची १३५ झाडं लावली. केवळ संत्रा उत्पादनावर ते थांबले नाहीत, तर आहे त्या जागेचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. झाडांच्या मधल्या जागेत त्यांनी आंतरपीक घ्यायला सुरुवात केली. काकडी, टोमॅटो, कारले, पालक, कोथिंबीर, कोबी, कांदा, टरबूज अशा काही भाज्यांचं त्यांनी नियोजन केलं. अगदी धुऱ्यावरही त्यांनी पेरू, रामफळ, सिताफळ, फणसाची लागवड केली.
यावर्षी ६० हजार रुपये खर्च झाला. आत्ताच ४० हजार रुपयांचं उत्पन्न त्यांनी भाजीपाल्यातून मिळवलं आहे. तर मागील वर्षी सर्व खर्च वजा जाता १ लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं. रासायनिक खताचा कमीत कमी वापर हे त्याचं वैशिष्ट्य. त्याऐवजी पिकांवर जीवामृत, ताकाची फवारणी यासारखे पारंपारिक उपाय केले. यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच पण पिकांचं कुठलंच नुकसान होत नाही.
सातवी, दहावी आणि बारावीत शिकणारी तिन्ही मुलं त्यांना आता शेतीत मदत करतात. पाणी आणि खताचं नियोजन ठिबकच्या मदतीने मुलं करू लागली आहेत. सातवीत शिकणाऱ्या विशालला कारलं पिकाची संपूर्ण माहिती अवगत असून शेतीची सर्व कामं अभ्यासासह तो अगदी सहज सांभाळतो. चर्जन यांच्या पत्नीही शेतातली सर्वच कामं सहजपणे हाताळतात. सगळं कुटुंबच शेतीत असल्यामुळे बाहेरचे मजूर लावण्याची गरज चर्जन यांना पडत नाही.
सध्या शेतकरी हा अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी हवालदिल झाला आहे. शेती करणे म्हणजे एक प्रकारचा जुगार खेळणे अशी परिस्थिती आहे. उत्पन्न चांगलं झालं, तरी त्याला चांगला भाव मिळेलच याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळेच तूर, कापूस अन सोयाबीन या पिकांमध्येच तो गुंतून राहतो. चाकोरीबाहेर जाऊन शेती करण्याची मानसिकता सहसा दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर चर्जन यांचं काम उठून दिसतं. कमी जमीन असूनही मेहनत, जिद्द आणि चिकाटीने योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन घेता येतं, हे चर्जन यांनी दाखवून दिलं आहे.
अमोल देशमुख.

धुळे जिल्ह्यातल्या शाळेची 'वायफाय' अमेरीकन सफर

एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा लोकल ते ग्लोबल प्रवास आपण कधी पहिला आहे? आज आम्ही आपल्याला धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या जिल्हा परिषद शाळेचा ग्लोबल प्रवास दाखवणार आहोत. हा प्रवास आपल्याला थक्क करणारा तर आहेच. अनुकरणीयसुद्धा आहे. 
धुळे जिल्ह्यातलं घाणेगाव. साक्री तालुक्यातल्या माळमाथा परिसरात असल्याने दुर्लक्षित. भटके विमुक्त आणि मागासांच्या लोकवस्तीचं. गावाची लोकसंख्या तीन हजार. मात्र आता गावातील जिल्हा परिषद शाळेने राष्ट्रीय पातळीवर लौकिक कमावला आहे. या शाळेतील मुलांना थेट अमेरिकेतील शिक्षक शिकवायला येतात. आपल्याला आश्चर्य वाटेल... मात्र हे खरं आहे! शाळा वायफायने जोडली असल्याने डिजिटल क्लास रूमद्वारे इथली मुलं थेट परदेशात जोडली गेली आहेत. धुळ्यातील तरुण अमेरिकन उद्योजक हर्षल विभांडीक यांच्या मदतीतून हे घडलं आहे. 
शाळेत शिकणार्‍या सर्व मुलांना एकसमान आणि दर्जेदार शिक्षण मिळतं. मुलं मजुरांची किंवा नोकरदारांची असोत. शाळेतील बहुतांश मुलं संगणक साक्षर आहेत. मुलं शिक्षकांच्या मदतीने स्वतःच अनुभवशिक्षण घेतात. त्यांचा आत्मविश्वास चकित करणारा आहे. काही वर्षांपूर्वी शाळेत फक्त १२० मुलं होती. आज गावात एक नव्हे तर दोन जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्या असून त्याची पटसंख्या १९० च्या घरात आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारी ३० मुलं पुन्हा या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित झाली आहेत.
जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त शाळा, गुणवत्ताविकासात प्रथम क्रमांक, जिल्ह्यातील पहिली वायफाय शाळा, शिक्षण हक्क कायदयानुसार सर्व भौतिक सोयीसुविधांनी युक्त शाळा... घाणेगावच्या या शाळेच्या नावाने असे अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. शाळेतला प्रत्येक कोपरा मुलांशी बोलणारा.
शाळेला हा दर्जा मिळवून देण्यात शाळेतील शिक्षक, शिक्षणविभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि हर्षल विभांडीक हा तरुण उद्योजक यांचा मोठा वाटा आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे जगातील कुठलंही ज्ञान मिळवणं या मुलांसाठी एका क्लीकइतक्या अंतरावर आहे.

- प्रशांत परदेशी.

७० हजार जणांची ‘अन्नपूर्णा’

दुपारची बाराची वेळ. दोन तरुण उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात येतात. रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा आला आहे का, असं विचारतात. नकारार्थी मान हलताच त्यांचे नाव लिहून घेतले जाते. जेवणासाठी रुग्णालयाबाहेरच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं जातं. गेल्या वर्षभरात असे सुमारे ७० हजार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नपूर्णा ग्रुपने जेवणाची मोफत सोय करून आधार दिला आहे.
२६ डिसेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये अन्नपूर्णा हा उपक्रम सुरू झाला. विविध क्षेत्रातील तरुण यासाठी एकत्र आले आहेत. या तरुणांनी सुरुवातीला स्वत:च खर्च करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी सोय केली. त्यानंतर कुणी वाढदिवस, स्मृतीदिन तर कुणी दातृत्वाच्या भावनेनं अन्नदान करू लागलं. पाहता-पाहता वर्ष झालं.
मात्र अन्नदानाचा या यज्ञ अखंडितपणे सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना शासकीय भोजन मिळत असलं तरी त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होते. मुळातच सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची परिस्थिती जेमतेम असते. त्यात बाहेरचे जेवण घेणं परवडत नाही. परिणामी, नातेवाइकांना उपाशी रहावं लागत असल्याचं धक्कादायक वास्तव अतुल अजमेरा, जितेंद्र खंडेरिया या तरुणांना दिसलं. मग जवळच्या मित्रांशी बोलून त्यांनी अशा नातेवाइकांसाठी अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आता योजनेला सामाजिक बळ मिळालं आहे. त्यामुळे हा उपक्रम आता कायम सुरू राहील, अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी या ग्रुपचं कौतुक केलं. सरकारी अनास्थेमुळं दुर्लक्षित असलेल्या मधुबन कुष्ठधाममधील रुग्णांनाही दररोज गरम जेवणाची सोय अन्नपुर्णा ग्रुपचे सदस्य करीत आहेत. आज अभिजीत निंबाळकर यांच्यासह संपूर्ण टीम त्यासाठी सज्ज असते
- चंद्रसेन देशमुख.

आजोबांच्या शेतीतंत्राची आठवण

उत्तम शेती :आजोबांच्या शेतीतंत्राची आठवण, पारंपरिक बियाणांचं जतन, कमी खर्चात शेतीउत्पादन
विडा (ता. केज, जि बीड) इथले रहिवासी पत्रकार अतुल अविनाश कुलकर्णी. सध्या ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांच्या बालपणच्या आजोळच्या (गौर, जि.उस्मानाबाद) आठवणींत आजोबांची पारंपरिक शेती, सेंद्रीय बियाणांचं त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं वाटप आणि गावरान धान्याची चव हे मनावर कोरलं गेलेलं. खतं आणि बियाणं विकत घेताना शेतकर्‍याचं कंबरडं मोडतं, हे लक्षात आल्यावर त्यांनी आजोबा गणपतराव कुलकर्णी यांचं तंत्र अंमलात आणत स्वतःच्या शेतीत प्रयोग करून बळीराजासाठी बियाणं बँक सुरू केली आहे.पारंपरिक बियाणांचं वाण जतन करून केलेली सेंद्रीय शेतीच किफायतशीर असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
अतुल कुलकर्णी सांगतात, "बीड जिल्ह्याचा गवगवा एक मागास जिल्हा आणि महाराष्ट्रातील बिहार असाच झाला आहे. महागडी बी-बियाणं आणि फवारणीसाठीची औषधं. आधी पाण्याचा बेसुमार वापर आणि मागील तीन वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती...यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढच होत गेली. पारंपरिक कसब सोडून शेती कसणारा शेतकरी चोहोबाजूने संकटात सापडतो आहे". पारंपरिक पद्धतीने (बियाणे आणि खतांवर खर्च न करता) शेती करण्याला शेतकरी फारसा धजावत नाही. दुकानातून कापूस, सोयाबीनच्या बियाणाच्या पिशव्या, खताचं पोतं उचलून शेतात न्यायचं. भरमसाठ खर्च करूनही पावसाने ताण देताच हताश व्हायचं. 
हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी अतुल यांनी आजोबांचा मार्ग निवडला. घाटावरच्या ‘काळीकुसळी’ या जातीलाच ‘बन्सी गहू’ या नावाने ओळखलं जात असल्याचं त्यांनी हेरलं. पूर्वी जोडगहू असायचा. तव्यावर पोळी टाकली, की भाजताना टर्र होऊन फुगायची. आज हाच गहू औषधांची थोडीफार मात्रा लावून पॅकबंद होऊन बियाणाच्या रूपात येतो. वीस रूपये किलोचा गहू शेतकऱ्याला मात्र पन्नास ते सहासष्ट रूपये किलोनं बियाणं म्हणून मिळतो. यातून पेरणीचा खर्च वाढत जातो. आजोबांच्या काळातल्या शेतीविषयी अतुल सांगतात, ‘पूर्वी अशा कंपन्या नव्हत्या. पाऊसकाळही दरवर्षी भरमसाठ नव्हता. तरीही निसर्गावर अवलंबून शेती केली जायची. शेतीत पिकलेल्या मालातून निवडक कणसं जतन केली जायची. त्यांना गोमूत्र, हस्त नक्षत्रात साठवून ठेवलेलं पावसाचं पाणी लावून बीजप्रक्रिया करत. हंगाम सुरू होताच पेरणी व्हायची. पेरणीखर्च शून्य. आता दुकानदाराकडे चकरा माराव्या लागतात. खेड्यात असं म्हणतात, बारा गावं बदलली की भाषा बदलते, मग मातीत नसेल का बदल होत? गावकूस, रचना, जमिनीचा प्रकार वेगळा नसेल का? मग एकाच कंपनीचं पिशवीबंद बियाणं सगळीकडे कसं चांगलं येईल? बियाण्यात आणि मातीत फरक पडणारच ना. माझे आजोबा ज्वारीचं वाण सगळ्या शेतकऱ्यांना देत. पाणी असो वा नसो.. त्यांच्या साडेचोवीस एकर शेतीत दोनशे पोती ज्वारी हमखास व्हायची’. 
2005 मध्ये अतुल शेती कसायला लागले. बियाणं, खतांचा 25 हजारांवर जाणारा खर्च परवडणार नाही हे लक्षात आलं आणि आजोबांची आठवण झाली. मग चांगलं बियाणं संकलित करायला सुरवात केली. बीड जिल्ह्यातील बालाघाट परिसरातून बन्सी गहू, कळंबकडून हुरड्याचे गुळभेंडी वाण, मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरणारी पिवळी ज्वारी, दगडी, शाळू ज्वारी तर मालदांडी ज्वारी बार्शीकडून आणली. विड्यातील शेतात झिपरी (पिवळी) ज्वारी तयार झाली. यासोबतच कळंबचा बन्सी गहू, लखनऊ येथून कुदरत जातीचा गहू उपलब्ध केला. हुरड्यासाठी सुरती, गुळभेंडी आदी प्रकार उपलब्ध झाले. मागील वर्षभरापासून त्यांनी पंचवीस - तीस शेतकऱ्यांना या बियाण्यांचं वाण दिलं, ते पुढील हंगामात दुपटीने बियाणं परत करण्याच्या अटीवर. त्यासाठी पैसे घेतले नाहीत. यातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ‘धान्य बँक’ कोठी पद्धतीने सुरू करणार असल्याचं ते म्हणाले. पारंपारिक बियाणं जतन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं हा यामागचा हेतू. हा प्रयोग नक्कीच अनुकरणीय आहे. 
अतुल कुलकर्णी - मोबाईल 9422633300
- मुकुंद कुलकर्णी.

Friday, 17 March 2017

: पालकत्व केवळ कुटुंबापुरतंच नसतं

प्रश्न : पालकत्व केवळ कुटुंबापुरतंच नसतं. आमदार या नात्याने तुम्ही मतदारसंघातल्या सर्वच मुलांचे पालक आहात; त्यांच्याबाबतची कोणती जबाबदारी तुम्हाला जाणवते?
उत्तर : मतदारसंघात विविध सामाजिक स्तर आहेत. तसे ते शाळांच्या आणि मुलांच्या बाबतीतही आहेत. सरसकट एक धोरण ठरवून, एक उपक्रम राबवून सर्वांचं भलं साधणं शक्य नाही. ई लर्निंगचा प्रसार झाला पाहिजे. शिकणं-शिकवणं सगळ्या ज्ञानेंद्रियांचं विकसन करणारं हवं. शाळांनी सर्व प्रकारच्या क्षमता असलेल्या मुलांचं हित लक्षात घ्यावं, असा माझा प्रयत्न असतो. विकसित देशांत प्रत्येक मूल खास आहे, या विचाराने शिक्षणक्रम ठरवतात. ते इथे व्हावं. हे एकदम होणार नाही. पण माझा विचार त्या दिशेनं चालला आहे.
प्रश्न : एखादं उदाहरण ?
उत्तर : इथल्या एका मुलाच्या क्षमता नीट न तापसता शाळेनं त्याला विशेष मुलांच्या शाळेत पाठवा, असं पालकांना सांगितलं. मुलाची स्थिती अशी होती की सामान्य मुलांच्या शाळेत त्याच्या क्षमता विकसित होण्यास वाव होता. मग ती शाळा त्याला का मिळू नये? मी हालचाल करून त्याला सामान्य मुलांच्या शाळेत शिकण्याची व्यवस्था केली. गरीब कुटुंबातल्या या मुलासाठी खर्चाच्या व्यवस्थेतही मी लक्ष घातलं. अशा प्रकारची मदत मी करतच असतो.
प्रश्न : एखादं धोरणात्मक उदाहरण?
उत्तर : बारावीच्या परीक्षेच्या वेळी (विशिष्ट क्षमतांचा अभाव असलेल्यांना) बेसिक कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी देणारं धोरण झालं, ते माझ्या प्रयत्नांतूनच. विद्यार्थ्याची हुशारी तपासण्याची पद्धत पूर्णत: बदलायला हवी. क्षमतांचा अभाव असलेल्यांचं ज्ञान तपासताना त्यांना काही मदत पुरवणंही गरजेचं आहे.
प्रश्न : हा मुद्दा तीव्रतेनं जाणवण्याचं खास कारण?
उत्तर : माझा मुलगा नववीत असताना त्याची क्षमता आणि कल आम्ही जाणून घेतला. हे तंत्र चांगलं आहे. मानवी मेंदूंचं पूर्ण मॅपिंगच होतं त्यात. विज्ञानाचा असा उपयोग सर्व मुलांसाठी होणं गरजेचं आहे. मात्र आज तरी हे फार खर्चिक आहे.
प्रश्न : मुलाचा विषय निघाला हे छान झालं. तुमच्या स्वत:च्या पालकत्वाविषयीही उत्सुकता आहे.
उत्तर : पालक म्हणून मी समाधानी आहे. आमचं बाप-लेकाचं नातं मित्रत्वाचं आहे. तो मला ‘अरे बाबा’ म्हणतो. मी त्याला ‘चत्र्या’ म्हणतो. तसाच आहे सौमित्र. मी नाकासमोर चाललो नाही, वेगळ्या प्रकारे जगून पाहिलं... तोही तसाच आहे. त्याची वाट तो निवडतो. नागरिक म्हणून मी जाणीवपूर्वक एकच मूल, कुटुंबाचा आकार सीमित, सौमित्रला मराठी माध्यमातच घालणं हे केलं.
प्रश्न : आपले वडील सौमित्रच्या नजरेत कसे आहेत?
उत्तर : (मोठ्याने हसतात) त्याचा राजकारण्यांवर राग आहे. राजकारणातील वाईट गोष्टींना तो टीकेचं लक्ष्य करतो. मी त्याच्यावर कधीही दबाव आणला नाही, याची त्याला जाणीव आहे. मोकळेपणानं वाढण्याची मौज त्यानं अनुभवली.
प्रश्न : खंतावण्याचे प्रसंग कधी आले?
उत्तर : त्याला वाचनाची आवड मी लावू शकलो नाही. सामाजिक व्यक्ती होण्याकडे त्याचा कल नाही, याचं काही अंशी वैषम्य आहे.
आमदार अतुल भातखळकर
(मुलाखत : सुलेखा नलिनी नागेश, समता रेड्डी)

त्यांनी फक्त चांगलं माणूस व्हावं

मुलांना एका विशिष्टच पद्धतीनं वाढवायचं अशा काहीही कल्पना मनात नव्हत्या. मी आणि माझा नवरा निरंजन मोकळ्या वातावरणात वाढलो. मला मुलगी म्हणून कधी वेगळी वागणूक, बंधनं नव्हती. वडलांना मी मुलांशी मैत्री करणं थोडं इनसिक्युअर करायचं खरं; पण म्हणून त्यांनी कसलीही बंधनं घातली नाहीत. बाबांना मी academic काही करावं असं वाटायचं. मी राज्यशास्त्रात एमए केलं. त्यात गोल्ड मेडल्सही मिळाली. पण आता वाटतं की कदाचित मी डिझायनिंग सारखं काहीतरी करायला हवं होतं.
आम्हाला दोन मुली. त्यांनी फक्त चांगलं माणूस व्हावं इतकी आणि इतकीच अपेक्षा होती आणि आहे. मोठी मुलगी सावनी शाळेत असताना अतिशय उत्साही होती. ती स्वतःहून स्पर्धात्मक परीक्षांना बसायची. तिला गणिताची प्राविण्य आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली. अशा परीक्षा त्यांच्या हिताच्याच असतील, इतकं आम्ही सांगत असू पण त्याचा आग्रह धरला नाही. धाकट्या शर्वरीनं ‘मी काहीही करणार नाही’ असं आधीच जाहीर केलेलं!
सावनीनं बारावीनंतर आर्ट्सला जाणार हे बारावीच्या सुरूवातीलाच सांगितलं. त्यानुसार तिनं तिची शाखा बदलली. पण तो तिचा निर्णय होता. सायन्सला जाण्याचा निर्णयही तिचाच होता. धाकट्या शर्वरीनं पहिल्यापासूनच आर्ट्सला जाणार हे नक्की केलं होतं.
अवतीभवती वेगवेगळ्या संधी उपलब्ध असताना आपल्याला नेमकं काय आवडतंय, कशात रस आहे हे जाणून घेण्यासाठी निदान त्यांची ओळख करून घेतली पाहिजे. त्या संधी एक्स्प्लोअर करून बघितल्या पाहिजेत. त्यानुसार दोन्ही मुलींना सुचवत गेलो पण त्यांनी ज्यात निरुत्साह दाखवला त्याचा आग्रह धरणं व्यर्थ होतं. तरी पर्यायांचा अनुभव घेत राहावा, असं वाटतंच राहातं.
आपली अपत्यं ही स्वतंत्र व्यक्ती आहेत हे आम्हा दोघांनाही मान्य आहे. माझ्यापेक्षाही माझ्या नवऱ्याला ते फारच मान्य आहे. एक प्रसंग सांगते– बाहेर जाण्याची तयारी चाललेली. ६-७ वर्षांच्या शर्वरीनं स्वतःचे कपडे स्वतः निवडले. ते मॅचिंग नाहीत, ते बदल असं मी तिला सुचवल्यावर निरंजन म्हणाला, ‘तुला कधीतरी कळलंच ना की कसे कपडे घालावेत, कशावर काय घालावं? तसंच तिलाही एक दिवस कळेल. आता तिचं तिला काय घालायचं ते ठरवू दे.’
दोघीही मुली लहानपणापासून खूप वाचतात. सावनीचं वाचन इंटरनेटवर अधिक तर शर्वरी भरपूर पुस्तकं घेणारी, त्यांचा फडशा पाडणारी. नवीन लेखक, संगीतकार, नवीन संगीत, नवीन अभिनेते याबद्दल आम्हाला त्यांच्याकडून कळत असतं.
मुली आमच्या मैत्रिणी आहेत. मी मित्रमंडळींमध्ये जास्त गुंतते, मग काही अप्रिय अनुभव आले तर मुलीच मला कसं वागावं हे सांगत असतात. आम्ही चौघेही एकमेकांशी याबाबतीत बोलत असतो. आता तर मुलींना घरातल्या आर्थिक निर्णयांचीही माहिती असते.
पालकांच्या तुलनात्मक वागण्याचे आघात मनावर कायमचे राहतात. मुलींमध्ये कसलाही भेदभाव करायचा नाही ही गोष्ट कटाक्षानं पाळली. आणि जेव्हा सावनी – फक्त आई Impartial आहे असं म्हणते तेव्हा मला बरं वाटतं. सावनी लहान असताना एकदा मी तिला रागानं थप्पड मारली. तेव्हा तिनं केविलवाणेपणानं – आई, मारू नकोस गं... असं म्हटलं त्याक्षणी ठरवलं की हे पुन्हा कधीही घडता कामा नये. त्या दिवसानंतर पुन्हा कधीही मी मुलींवर हात उगारला नाही. कारण मला कायम सावनीचा तो असहाय चेहरा आठवत राहिला.
१३-१४ वर्षांच्या झाल्यापासून मुली मुंबईत एकट्या फिरायला लागल्या. त्यांच्या क्लासेसना,मित्रमंडळींकडे एकट्या जायला लागल्या. त्यांचा बाबा त्यांना बरेचदा आणायला-सोडायला जायचा,लाडानं त्यांना अजूनही कधीतरी आणायला जातो. पण त्या अवलंबून नाहीत. भूक लागली तर हातानं करून खाण्याइतक्या त्या स्वतंत्र आहेत.
आईवडलांचंही एक स्वतंत्र आयुष्य असतं हे त्यांना मान्य आहे. आम्ही एकत्र सिनेमांना, जेवायला बाहेर जातो, प्रवास करतो. पण याच गोष्टी कधीतरी फक्त आईबाबा करणार आहेत हे त्यांना फार लवकर उमगलं.
लवकरच सावनी २१ तर शर्वरी १८ वर्षांची होईल. आता जगाबद्दल त्यांच्याकडून आम्हाला कळत असतं. या दोघी- किंबहुना ही पिढीच- जजमेंटल नाही. त्यांचे विचार इतके मोकळे आहेत की कधीकधी मी स्तिमित होते. त्यांच्यामुळे माझे विचारही अजून मोकळे झाले आहेत. जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक खुली झाली आहे. मुली आता नवीन चित्रपटांबद्दल सांगतात, आम्ही बाहेर निघालो तर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जावं ते सुचवतात. वागण्यात काही चुकलं तर सौम्यपणे आमची चूक लक्षात आणून देतात. घरात काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी आपुलकीनं, आदरानं वागतात. आपल्या आजीबरोबर रोज वेळ घालवतात. आठवणीनं तिच्यासाठी खायला आणणं, तिचं काही काम करणं, तिला दवाखान्यात नेणं सहज घडतं. एक पालक म्हणून माझ्यासाठी हे पुरेसं आहे.
(सायली राजाध्यक्ष या ब्लॉगर आहेत. 'अन्न हेच पूर्णब्रह्म' आणि 'साडी आणि बरंच काही' हे त्यांचे ब्लॉग्ज आणि फेसबुक पेजिस आहेत. निरंजन राजाध्यक्ष हे 'मिंट' या अर्थविषयक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.)
सायली राजाध्यक्ष

नापिकीच्या फेर्‍यातून दूधव्यवसायाने केली सुटका

शिक्षण फक्त नववी, घरची सहा एकर शेती. त्यातही काही वर्षांपासून सततची नापिकी, बदलतं हवामान. उत्पादन कमी आणि खर्च जास्त. एकीकडे मुलांचं शिक्षण आणि घरखर्च. या सगळ्या फेऱ्यात चिखली तालुक्यातला सवणा इथला शरद हाडे हा तरुणही अडकलेला. त्याने शेतीला जोड म्हणून दूधव्यवसाय निवडला आणि नापिकीच्या फेर्‍यातून त्याची सुटका झाली. 
ओळखीच्या ठिकाणी जाऊन दुग्धव्यवसायाची माहिती घेतली. साठवलेले काही पैसे, मित्रांकडून उसने घेतलेले पैसे एकत्र केले आणि मागील वर्षी गुजरातला जाऊन जाफरी जातीच्या २४ म्हशी विकत आणल्या. शरदचा दुधाचा व्यवसाय सुरू झाला. या म्हशींपासून दररोज सकाळ-संध्याकाळ मिळून एकूण २५० लिटर दूध मिळतं. सुरुवातीला शरदने शहरात ४० रुपये लिटर प्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना दूध विकलं. त्यातून दररोज ८ ते १० हजार रुपये मिळू लागले. वर्षभर हॉटेल व्यावसायिकांना दूध विकल्यानंतर त्याने पुढचं पाउल टाकलं. शहरात दूध डेअरी सुरु केली. दूध ताजं आणि पाणी कमी असल्याने ५० रुपयांचा भाव मिळाला. 
उरलेल्या दुधापासून दही, पनीर, तूप, ताक बनवणंही चालू केलं. आता त्यातून शरदला दररोज १० ते १२ हजार रुपये मिळतात. शेती कमी असल्याने म्हशींना चारा, ढेप, कुटार, हे सर्व विकत आणावं लागतं. चारापाणी, मजूर हा खर्च होऊनही शरद आता दररोज निव्वळ नफा म्हणून ७ ते ८ हजार रुपये कमावतोय. 
म्हशींच्या व्यवसायापासून शरदला वर्षाला ४० ते ५० ट्रॉली शेणखत आणि मलमूत्रही मिळतं. स्वतःच्या शेतात काही शेणखत टाकून उर्वरित शेणखत आणि मलमूत्र तो २००० हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे इतर शेतकऱ्यांना विकतो. त्यातूनही आता उत्पन्न मिळू लागलं आहे. आता तीन मजुरांना त्याने रोजगार मिळवून दिला आहे. पहिल्याच वर्षी शरदने म्हशी विकत घेण्यासाठी उसने घेतलेले पैसे फेडून टाकले. अल्पशिक्षित असूनही मेहनत आणि हुशारीने शरदने दुग्धव्यवसाय वाढवला आहे.
- अमोल सराफ.

Friday, 10 March 2017

अखेर मी मुंबईची नोकरी सोडली

तुम्ही आई-बाबा होणार, म्हणजे तुमच्या समोर मोठं आव्हान आहे. अमूक-तमुक पुस्तक वाचा, मुलं कशी सांभाळायची, घडवायची?.. तयार मटेरियल वाचा आणि मुलांना त्या साच्यात ओतून घडवा... असे कितीतरी सल्ले आम्हाला गार्गी-गायत्रीच्या जन्मानंतर मिळाले. पालक होणं आव्हान वगैरे वाटलंच नाही. आव्हान संकटांचं असतं आणि गार्गी-गायत्री या चिमण्या तर आमचं काळीज आहेत. त्यांना घडविण्या सारखी दुसरी आनंददायी गोष्ट सध्यातरी असूच शकत नाही.
खरं तर, गार्गी-गायत्रीच्या जन्मवेळेची परिस्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक होती. गर्भात जुळं आहे, हे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आनंद, कुतूहल आणि चिंता असे भाव आमच्या चेहऱ्यावर उमटले होते. पत्नीला सक्तीची विश्रांती होती.
दिलेल्या वेळेआधी, सातव्या महिन्यातच (प्री-म्यॅच्युअर) दोघींचा जन्म झाला. वजन अनुक्रमे ९०० आणि १००० ग्रॅम! दोघींचीही जगण्याची शाश्वती शून्य! डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करतो, बाकी ईश्वराच्या हातात आहे. स्त्रियांमध्ये जबरदस्त 'वील पॉवर' असते, असं वाचलं होतं. स्वत:च मनाला बळं दिलं. आम्हाला पहिली मुलगीच हवी होती! निसर्गानं दोन मुली पदरात घातल्या होत्या. 
म्हटलं, “आता डॉक्टरांचे परिश्रम आणि चिमण्यांची इच्छाशक्तीच जिंकेल. त्यांना आमच्यापासून कोणीही हिरावू शकणार नाही!" काळजीचे 'ते' ७२ तास संपले आणि पुढच्या ४५ दिवसांत काचेच्या पेटीतल्या (इन्क्युबेटर) त्या दोघींसोबतचा आमचा प्रवास दवाखान्यातच सुरू झाला.
गार्गी-गायत्री एक वर्षाच्या होण्याआधीच मला शासकीय सेवत, तर अर्चनाला शिक्षिकेची नोकरी लागली. त्यावेळी मुलींच्या भविष्याचा विचार करून आम्ही नोकरी स्वीकारलीही. पण मुलींच्या जडणघडणीचा आनंद हिरावून बसलो. आपण कायम घरात वडिलधाऱ्यांच्या हे करायचं नाही, ते करायचं नाही अशा कौटुंबिक दडपणात वावरलेलो. त्यामुळे हवा तसा विकास झाला नाही, याची खंत आजही वाटते. तशा नकारात्मक वातावरणात मुलींना घडवायचंच नाही, हा निश्चय आम्ही त्यांच्या जन्मवेळीच केलेला. पण या कल्पनेला आमच्या दोघांच्याही नोकरीने छेद दिला होता. मुलींचं खेळणं-बागडणंही बघता येत नाही, यासाठी दोघेही प्रचंड अस्वस्थ व्हायचो. मुलींच्या संगोपनासाठी वेळ देता यावा, त्यांच्यासोबत, त्यांच्या अवती-भवती राहता यावं यासाठी पत्नी किंवा मी, दोघांपैकी एकाने नोकरी सोडायचं ठरवलं. त्यावेळी मी मुंबईला माहिती व जनसंपर्क विभागाच्या 'अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने' या कार्यालयात होतो. अखेर मी मुंबईची नोकरी सोडली. पत्नी नोकरी करते आहे. आता घरी सर्वांसोबत राहून मी खाजगी व्यवसाय करतो. आमच्या मुली आमच्यासोबत आनंदाने वाढताहेत. आता त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देता येतंय, याचा विशेष आनंद आहे. करिअर घडतंच; पण घडत्या वयात मुलांना आई-बाबांचीच अधिक गरज असते, हेच नोकरीनिमित्त गार्गी-गायत्रीचा सहवास तुटला, त्या काळात मनावर अधोरेखीत झालंय! पालकत्वाचा प्रवास मुलांसोबत त्यांच्या वयाचं होऊन केला, तर तो फार सोपा आहे, हे मला आणि पत्नी अर्चनाला आता-आता कळायला लागलं आहे.
नितीन पखाले.

शेती पॉलिहाऊसची शोभिवंत झाडांची

नगरपासून पंधरा किलोमीटरवरचे देहेरे गाव. बलभीम पठारे यांची इथे तेरा एकर शेती आहे. इथले शेतकरी नवीन तंत्रज्ञानचा वापर करुन शेती करु लागले आहेत. त्यात आता पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये नियंत्रित शेती करण्यावर भर आहे. बहुतेकदा पॉलिहाऊसमध्ये काकडी, टॉमेटो, रंगीत ढोबळी मिरचीसह अन्य भाजीपाला आणि फुलांचे पीक घेतले जाते. तसाच प्रयत्न पठारे यांनीही केला. पारंपरिक शेतीऐवजी अत्याधुनिक शेती करण्यासाठी त्यांनी सहा एकरावर पॉलिहाऊसची उभारणी केली. पाणी, खते देण्यासाठी ठिंबक सिंचन. पाणी साठवणीसाठी शेततळे केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला. पावसाळ्यात नदीवरील पाणी आणून शेततळ्यात साठवले.

पॉलिहाऊसमध्ये दोन वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेले हिरव्या काकडीचे उत्पादन इतरांपेक्षा दुपटीने निघाले, मात्र फारसा दर मिळाला नाही. त्यामुळे नफा नाही. शेतमालाच्या दराची ही नेहमीचीच रड. मग पठारे यांनी शोभिवंत झाडांचे उत्पादन घेण्याचा प्रयोग केला. तो यशस्वीही झाला. असा प्रयोग करणारे ते या भागातील पहिलेच शेतकरी आहेत. सध्या पठारे यांनी एक एकरावर पॉलिहाऊसमध्ये शेवंती लावली आहे. पांढऱ्या शेवतींची 20 फुलांची एक गड्डी केली जाते. तिला नोव्हेंबरात 50 ते 60 रुपयांचा भाव होता. मात्र, नंतर नोटाबंदीचा फटका बसल्याचं ते सांगतात. पाच एकरच्या पॉलिहाऊसमध्ये एग्लोमिना व्हेरिगेटेड, क्रीप्टॉन्थस, गोल्डन मनीप्लांट, ग्रीन व्हेरिगेटेड मनीप्लांट, झामिया, पेट्रा क्रॉटॉन, पेप्रेमिया, मनीप्लांट ग्रीन, सेंसेव्हेरा आदी सुमारे वीस प्रकारची रोपे तयार करतात. पॉलिहाऊसमध्ये आर्द्रता कायम ठेवण्यासाठी फॉगर्सचाही उपयोग केला जातो. शोभिवंत झाडांना मुंबई-पुण्यासह देशभरात मागणी आहे. शेतीतज्ज्ञ अमोल चोपडे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
पठारे यांचं मूळ गाव टाकळी खातगाव (ता. नगर). सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी गावांत शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर वीस फूट खोली, शंभर फूट रुंदी व दीड हजार फूट लांबीचा बंधारा बांधला आहे. त्याचा खातगाव टाकळीसह जखणगाव परिसराला फायदा होत आहे. पठारे यांना गावं ओळखतं ते रंगकर्मी आणि उद्योजक म्हणून. ‘नीलकंठ मास्तर’ या चित्रपटाचे ते निर्मिते. आज हाडाचा शेतकरी अशीही त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.
संपर्क - बलभीम पठारे, मो. 8378918001 / अमोल चोपडे, (व्यवस्थापक) मो. 9762029007
- सूर्यकांत नेटके.