Thursday, 30 November 2017

कुरुंजीतल्या सगळ्या घरांप्रमाणेच माझं घर पण मुलांसाठी खुलं असतं.

कुरुंजीतलं गमभन :
घरात एक कपाट आहे त्यात जुन्या ओढण्या, पुस्तकं, कापडाचे तुकडे, रंग, ब्रश, कागद, पेन्सिली, कात्री, सुईदोरे, वेगवेगळे रेशीम, लोकर, क्रोशा सुया, मणी असे बरेच प्रकार असतात. स्वैपाकघरात काही भांडी आहेत त्याबरोबर पुठ्ठ्याचे मोठमोठे रिकामे बॉक्स आणून ठेवले आहेत.
लहान मुलींना स्वैपाकघर आवडतं. एके दिवशी त्यांनी, ताई तुम्ही किती गबाळ राहता असं म्हणत, सगळे डबे, भांडी मांडणीतून काढून रिकामी करून घासली, मांडणीवर वर्तमानपत्र अंथरून पुन्हा मांडली. त्यांच्या घरात या गोष्टी आया करत असतात त्याचं हे अनुकरण ! मुलींना घर, शाळा खेळायला पण स्वैपाकघर लागतं. पुठ्ठे, ओढण्या घेऊन घरं, वर्ग बनतात, त्यातल्याच कुणी आई, मूल, शिक्षक, विद्यार्थी बनतं आणि खेळ चालू असतो.मुलग्यांना कुतूहल वाटून ते डोकवायचा प्रयत्न करतात तर त्या भांडखोर चिमण्यांसारख्या अंगावर येतात. मुलं माघार घेतात किंवा हळूच आत घुसतात. मग कल्ला!
खेड्यात मुलामुलींचे हात सतत चालत असतात. गप्पा मारताना सुद्धा त्यांचं हातानं काही ना काही करणं सुरू असतं.
घरात पोस्टर कलर आहेत. मुलामुलींना रंगवायला खूप आवडतं. बहुतेक सगळेजण आले की आधी कपाट उघडून रंग, कागद काढतात आणि काम सुरू होते. ब्रश नसले तरी अडत नाही. काड्या चालतात. मयूरने एकदा काडी पुढच्या बाजूने ठेचून ब्रश बनवून घेतला होता.थोडया मोठया मुलींना विणकाम भरतकाम करायचे असते. क्रोशा आवडतो. काही जणी शिकल्या सुद्धा. आरतीला भरतकामात रस आहे. यू ट्यूब वरून बरेच व्हिडीओ मी डाउनलोड करून नेले. तिने आणि बाकीच्या मुलींनी पण नमुने बनवून ठेवलेत. मुलग्यांना शिवायला आवडते. त्यांनी छोटे बस्कर शिवलेत आणि फळा पुसायला कापडी डस्टर पण.गोट्यांचा ब्रेन व्हिटा हा गेम मुलांना आवडला. साप शिडी, लुडो पण आवडतात. बुद्धिबळाचा गेम थोड्या दिवसांपूर्वी नेलाय. सुरुवातीला मी नियम सांगितले. पण नंतर त्यांनी स्वतः नियम बनवून खेळायला सुरू केलं.
या मुलांच्या खेळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकटं कुणी खेळत नाही. दोघेच जरी खेळत असले तरी अनेक सल्लागार बाजूला बसलेले असतात आणि त्यांचा सहभागही शंभर टक्के असतो.घरात किरकोळ दुरुस्ती किंवा काही असेल तर मुलं करतात. खिडक्यांना पडदे लावायचे होते. माझ्या दृष्टीनं काहीच मिळत नव्हतं.
 तुषार घराच्या भिंती नीट बघून आला आणि त्याला इकडेतिकडे चार खिळे मिळाले. बाहेरून मोठा दगड आणून त्याने खिळे मारून पडदे लावले.
गेल्या नवरात्रीच्या एका रात्री जेवण करून झोपायच्या बेतात असताना चार उंदीर बाहेरच्या खोलीतून आत पळताना दिसले. माझी पळापळ. देवळाजवळ मुलं दांडिया खेळायची तयारी करत होती. मी त्यांना बोलावून आणलं. घर मालकिणीनं घरात असावी म्हणून एका कोपऱ्यात मातीची चूल ठेवली आहे. मुलांनी तिथं पर्यंत माग काढला. घरात खिडक्यांना लावून उरलेली लोखंडी जाळी होती ती त्या चुलीला बांधून वर मोठे दगड ठेवून बंदोबस्त केला. अजूनही अधून मधून मुलं चूल तपासत असतात.
या सगळया खेळण्याबरोबर महत्त्वाचं घडतं ते म्हणजे गप्पा! आमच्या सतत गप्पा सुरु असतात. मी शुक्रवारी जाते. स्टॉपवरून घरी जाताना निम्मं गाव ओलांडायला लागतं.एखादं शाळेला न गेलेलं मूल मला बघून सोबत येतं. काहीतरी करत बसतं. गप्पा होतात. संध्याकाळी शाळा सुटल्यावर बरीच मुलं येतात. मग अंधार होऊन गेला तरी इथंच असतात. मग सरुबाईकडे जेवायला जाताना तीही आपापल्या घरी जातात. सकाळी सातलाच आशा, केतकी, राधा, मयूर, गौरव यापैकी कुणीतरी दार वाजवायला येतं. माझं आवरून झाल्यावर मी दार उघडते. मग आमचा दिवस सुरू होतो.
मुलांना खूप सांगायचं असतं. घराबद्दल, शाळेबद्दल, ऐकलेल्या, बघितलेल्या, केलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात.
गौरव अनेकदा शाळेत जाताना कंटाळा करतो. तो एकदा बोलताना पहिली पासूनच शिक्षक कसे मारत आलेत याबद्दल सांगत होता. अशा संवेदनशील मुलांना मग शाळा आवडेनाशी होते.
पहिलीतली राधा ते टी. वाय. बी. कॉम. ची आरती सगळे गप्पांमध्ये रमतात. करण आणि मयूर यांना भुताच्या गोष्टी सांगायच्या असतात. आरती आणि तिचा भाऊ प्रसाद कॉलेज बद्दल सांगतात, शाळेत जाणारी मुलं शाळेतल्या शिक्षकांच्या मित्रांच्या, घटनांच्या गोष्टी सांगतात.
माझ्यासाठी या अनौपचारिक गप्पा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्यातून मुलं समजत जातात. पुढं काय करायला पाहिजे याची दिशा दिसत राहते.
रंजना बाजी

Tuesday, 28 November 2017

मुलांना सुखी झालेलं पाहायचंय

कर्जाच्या ओझ्याने पतीने गळफास घेवून जीवन संपवले. पण त्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून द्राक्षबाग व ऊसाला वाढवतानाच, मुलांना जगवण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. आईला मदत व्हावी म्हणून मुलगा व मुलगी शिक्षण अर्धवट सोडून शेतात राबत आपल्या आईला मदत करतात. पती अर्ध्यावरती सोडून गेला म्हणून, कुढत घरात न बसता शेतीबरोबर मुलांचे आयुष्य फुलवण्यासाठी सुनंदा यांचा संघर्ष सुरु आहे.
निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथील सुनंदा हाडंसंगे. पती श्रीशैल चंद्रशा हाडसंगे यांनी कर्जबाजारी झाल्याने ४ जुलै २०१५ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सात एकर शेती त्यात तीन एकर द्राक्षबाग. त्यासाठी श्रीशैल त्यांनी कर्ज घेतलं होतं. २५ लाखाच्यावर कर्जाचे डोंगर डोक्यावर उभा राहिला. आणि त्या ताणापायी त्यांनी जीवन संपवले. दोन वेळच्या जेवणाला कुटुंब महाग झाले. पत्नी सुनंदा यांनी धीर सोडला नाही. शेतात कधी काम केलं नव्हतं. अचानक जबाबदारी अंगावर पडली. आणि त्यांनी शेती कसायला सुरूवात केली. मोठा मुलगा अमगोंडा, मुलगी रोहिणी दोघेही शाळा सोडून आईच्या मदतीसाठी शेतात राबू लागले. या तिन्ही मायलेकरांनी दिवसरात्र कष्ट करून द्राक्षबाग फुलविली. त्यासाठी नातेवाईकांनी आर्थिक मदत केली.
जिद्द व मेहनतीने सुनंदाने पुन्हा द्राक्षाबाग फुलविली. यावर्षी तीन एकर द्राक्षापासून त्यांनी पाच टन बेदाणा उत्पन्न काढलं. आता नव्याने दोन एकर ऊसाची लागवड केली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर सरकारी मदत मिळाली नाही. पण नातेवाईकांच्या मदतीने ती जिद्दीने शेती करत आहे. मुलगा अमगोंडा जबाबदारीने साथ देतोय. धाकटा मुलगा सोमलिंग सध्या वाघोली ( जि. पुणे) येथे आठवीत शिकत आहे. त्याला जैन सामाजिक संघटनेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
“घरातील कर्ता गेल्याने मुलांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आता मला मुलांना सुखी ठेवायचंय. बँकेने ३२ लाख कर्ज भरण्याची नोटीस दिली आहे. पण सध्या माझ्यासमोर मुलांना जगवण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी मी राबतेय. मुलगा हाताला आल्याने आधार वाटतोय. मुलीच लग्नही करायचं आहे. मला जगण्याबरोबर मुलांना सुखी झालेल पाहायचंय. म्हणून मी सारं दु:ख बाजूला ठेवून राबतेय,” असं सुनंदा यांनी सांगितलं.

- गणेश पोळ.

Monday, 27 November 2017

फड सिंचन पद्धतीची किमया न्यारी, विना खर्च शेतीला पुरवी पाणी

जलसाठ्यांचं विकेंद्रीकरण करून शेती जलसमृद्ध करायची हा विचार डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्ह्यातील जवाहर ट्रस्टने जलसंवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. पहिली काही वर्ष गाजावाजा न करता काम उभं केलं गेलं. आज धुळे तालुक्यात छोटी छोटी पाण्याची बेट तयार झाली आहेत. नदी - नाले यांचं पुनरुज्जीवन केल्याने आता तिथं पाणी ओसंडून वाहतंय. वाळवंट वाटणारा हा प्रदेश पिकांच्या हिरवळीने नटून निघाला आहे.
धुळे तालुका तसा दुष्काळी. त्यामुळे पिण्याचं पाणी वर्षभर टँकरने. अश्या भागात हे काम उभं राहिलं आहे. त्यामुळेच इथल्या दुष्काळी भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे आणि शेतीला पाणी शिल्लक राहू लागलं आहे. शेती सिंचनाच्या ४०० वर्ष जुन्या 'फड पद्धती सिंचन' व्यवस्थेला जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून पुनर्जीवित केलं गेलं. त्यामुळे सात गावांतील किमान दोनशे विहिरीं पाण्याने भरून निघाल्या आहेत. या कामात पुढाकार घेतला तो आमदार कुणाल पाटील यांनी.
खान्देशात शाश्वत सिंचन पद्धत म्हणून फड सिंचन पद्धतीकडे पहिलं जातं. या सिंचन पद्धतीत नदी पात्रात बांध घालून गुरुत्वाकर्षण आणि सायफन तत्व वापरून शेती सिंचनाखाली आणली जाते. खान्देशातील पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला अश्या पद्धतीचे फड पद्धती बंधारे होते. यातून पाटाच्या साहाय्याने पाणी शेतात जात होतं. कालांतराने ही पद्धत बंद पडली. जवाहर ट्रस्टने फड पद्धतीचे महत्व समजून घेतलं. आणि सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांची मदत घेतली. सर्व पारंपरिक माहिती जमा केली. नकाशे अभ्यासले गेले आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
दिवसरात्र काम करत संस्थेने मोराणे आणि हेंकळवाडी या दोन फड पद्धती बंधाऱ्यांना जीवनदान दिलं. मोराणे पाट तब्बल साडेसात किलोमीटर लांब कोरण्यात आला. ३२ दिवसात २२५०० घनमीटर काम झालं. आज या पाटाचा फायदा जापी, न्याहळोद, विश्वनाथ, सुकवद आणि मोहाडी या गावातील शेतकऱ्यांना होता आहे. मोराण्याच्या पाटात प्रचंड घाण आणि माती साचली होती. ती हटविण्यात आली. हेंकळवाडीच्या पाटाचा गुदमरलेला श्वासही मोकळा करण्यात आला. हा पाट नऊ किलोमीटर लांब कोरण्यात आला. याचा लाभ हेंकळवाडी आणि परिसरातील गावांना होत आहे. या पाटांचे काम पूर्ण झाल्यावर त्यातून पाणी वाहताना पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. पाटातलं वाहतं पाणी शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का होता.
या दोन पाटांच्या पुनरुज्जीवनामुळे चारशे हेक्टर शेतजमीन प्रत्यक्षात सिंचनाखाली आली. तसंच, पाटातून पाणी वाहू लागल्याने भूगर्भाची जलपातळी वाढली आहे. शास्त्राच्या निकषांवर हे दोन्ही पाट दोन मीटर रुंद आणि दीड मीटर खोल करण्यात आल्याने त्यांचा भविष्यात कुठलाही दुष्परिमाण नाही. त्यात पाटाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत असल्याने सर्वच शेतकरी आनंदी आहेत.

Sunday, 26 November 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदुचा प्रतिसाद


इ लर्निंग वापराचा आमचा एक अनुभव. चौथीच्या वर्गातलं एक दृश्य. इ लर्निंग स्क्रीनवर एक फिल्म चालू आहे. आवाज पूर्णपणे बंद केलेला आहे. मुलांना फक्त चित्र दिसताहेत. तरीही मुलं फिल्ममध्ये गुंगलेली आहेत. फिल्म सुरू व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की या गोष्टीतले संवाद ऐकू येणार नाहीत. ते तुम्हीच तयार करायचे आहेत. पंधरा मिनिटांनी ही फिल्म संपली. मुलांनी मनाने संवाद लिहिले. वर्गात वाचून दाखवले. पुन्हा एकदा आवाजासह मुलांना फिल्म दाखवली. आपण लिहिलेले संवाद आणि तिथले संवाद यातला साम्य आणि फरक मुलं ताडून बघत होती.
ई लर्निंग हे आजचं अतिशय प्रभावी आणि यशस्वी प्रकरण आहे यात शंका नाही.
हल्ली प्रत्येक शाळेला ई-लर्निंग हवं आहे.
काय आहे या ई-लर्निंग मध्ये? वर्गातच मोठा स्क्रीन असतो. त्यावर शिक्षक हवे ते व्हिडीओज दाखवू शकतात; यामध्ये बालभारतीतले धडे-कविता- गणित- परिसर- विज्ञान- इतिहास या सगळ्याशी संबंधित चित्रं, व्हीडिओज दाखवू शकतात. किंवा शिक्षकाच्या मोबाईलवर असलेला एखादा video शिक्षकाच्या मोबाईलवर असलेली गाणी, भाषणं, मुलाखती असं काहीही मुलांना दाखवायचं असेल तर ते सहज सोप्या रीतीने साध्य होतं. मुलांना वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष बघता येतात. आजची एखादी ताजी बातमीदेखील इंटरनेट कनेक्शन असल्यास मुलांपर्यंत पोचवता येते. मुलांना हे स्क्रीनशिक्षण अतिशय आवडतं हे तर प्रत्यक्षच दिसतं आहे.
- सरकार देखील ई-लर्निंगला अनुकूल आहे. एखाद्या शाळेत इ लर्निंग उपलब्ध आहे हे आता त्यांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा येऊ लागलेलं आहे.
- ई लर्निंग मुळे शिक्षकांच्या डोक्यावर असलेला भार काही अंशी उतरतो. शिक्षण सुकर होतं. ज्ञानरचनावादी पद्धतीत शिक्षकाने मदतनीसाच्या भूमिकेत जायचं आहे, त्यासाठी हे पूरक आहे.
पारंपारिक वर्गातलं चित्र असं असतं की, शिक्षक शिकवाहेत, मागे खडूफळा आहे, हातात पुस्तक आहे. ते बोलताहेत, मुलं ऐकताहेत. लिहून घेताहेत. प्रश्नांची उत्तरं देताहेत. अशा वेळी मेंदूच्या डाव्या भागात काम सुरू असतं . कारण डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे. ऐकणं, बोलणं, समजावून घेणं, उत्तर देणं, लिहून घेणं ही डाव्या बाजूची कामं आहेत.
आता हाच पाठ इ लर्निंग क्लासरूममध्ये चालू असेल तर मेंदूच्या केवळ डाव्याच नाही तर उजव्या भागातही उद्दीपन चालू होईल. मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरला जाईल. कारण उजव्या भागामध्ये रंग, चित्र, कल्पना, अभिनय, संवाद, संगीत याचं काम चालतं. या घटकांशी संबंधित क्षेत्रं उजवीकडे असतात. हे सर्व समोर स्क्रीनवर दिसत असतं. म्हणून केवळ ‘व्याख्याना’पेक्षा दृक-श्राव्य माध्यम जास्त परिणामकारक वाटतं. मेंदूची ही परिभाषा लक्षात घेऊन या ई लर्निंगचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करून घ्यायचा हे शिक्षकाच्या हातात आहे.
हे फायदे बघतांना एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, ती म्हणजे हाताने केलेल्या कुठल्याही कामाला ई-लर्निंग हा पर्याय असू शकत नाही. उदाहरणार्थ
१. एखादा प्रयोग पुस्तकातून वाचून दाखवणे
२. तो डिजिटली स्क्रीनवर दाखवणे आणि
३. मुलांनी तो प्रयोग प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने करणे
यात योग्य प्रकारे ब्रेन डेव्हलपमेंट ही ‘प्रत्यक्ष हाताने करून शिकणे ’ हीच असणार आहे. त्यामुळे जरी ई-लर्निंगद्वारे एखादा प्रयोग दाखवला तरी प्रत्यक्ष हातांनी करण्याला पर्याय नाही.
ई लर्निंगच्या स्क्रीनशिक्षणाला प्रोत्साहन देणारे आपण मुलांच्या हातात गॅझेट्स असण्याला मात्र नाकारतो. याची कारणं काय?
वाचूया पुढील भागात..

: डॉ. श्रुती पानसे

Saturday, 25 November 2017

एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!
शाळेच्या प्रांगणात उंच उभारलेली गुढी, सजविलेल्या बैलबंडीतून मुलांची निघालेली मिरवणूक, मुलांच्या डोक्यावरच्या रंगीबेरंगी टोप्या, हातात पकडलेले रंगीबेरंगी फुगे आणि पुष्पगुच्छ स्वीकारून स्मितहास्य करणारे पालक या दृश्याची गोंदिया जिल्ह्याला आता सवय झालेली आहे. राज्यात सर्वत्र पहिलीच्या मुलांचे प्रवेश जून महिन्यातच होतात, गोंदियामधे मात्र विद्यार्थी मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पहिलीत दाखल होतात. यावर्षी तर गोंदिया जिल्ह्यात गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच 28 मार्च 2017 रोजी तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाचे नाव आहे 'गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा'!!
2015- 2016 च्या शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरूवात झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून या 'प्रवेशगुढी' उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमातंर्गत गुढीपाडव्याआधी दहा दिवस जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गावातील पहिलीत दाखल होऊ शकणाऱ्या मुलामुलींची माहिती काढतात. त्यांची यादी बनवून, त्यांच्या आई- वडिलांना प्रत्यक्ष भेटून, त्यांना जिल्हा परिषद शाळेतच दाखल करण्याची विनंती करतात. शिवाय गोंदिया जिल्हयातील सर्व 1048 शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या झालेल्या असून सर्व शाळा डिजिटल आहेत. 

जिल्हा परिषद शाळांमधे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती ऐकून पालकही खुष होतात. या प्रयत्नांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले यश मिळते आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा कमी होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भरमसाठ फी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली प्रत्येक वेळी पालकांच्या खिशाला लागणारी कात्री, हे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मात्र अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कमीतकमी खर्चात केले जातात. शिवाय शाळेत प्रवेश घेताना कसलेही डोनेशन अथवा फी भरावी लागत नाही.
पालकांना पटवून झाले की प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत अतिशय उत्साहाने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत होते. जिल्ह्यात सर्वत्र नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शाळेत सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशफेरी निघते. विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या दिल्या जातात. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुगे आणि रंगीत फुले दिली जातात. 'गुढीपाडवा- शाळाप्रवेश वाढवा', 'आमचा ध्यास- गुणवत्ता विकास', 'साडेपाच वर्षांचे मूल- दाखल करा, दाखल करा' अशा घोषणा उत्साहात देत गावातून विद्यार्थी आणि शिक्षकांची प्रवेशफेरी निघते. मोहगाव तिल्ली जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे तर केळीच्या पानांनी, आंब्याच्या तोरणांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलबंडीतून पहिलीतील मुलांची प्रवेशफेरी निघते आणि शाळेत त्यांच्या हस्ते प्रवेशगुढी उभारली जाते.
तसेच यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे - 'आम्हीही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. आम्हांला सार्थ अभिमान आहे- जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा!' अशा आशयाच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले होते. खरोखर शोध घ्यायला गेले तर बहुतांश सनदी अधिकारी हे जिल्हा परिषद अथवा मनपाच्या शाळेतून शिकलेलेच असतात. त्यामुळे तुम्हांला गुणवत्ता पाहिजे असेल तर जिल्हा परिषद शाळांना पर्याय नाही, हे आम्ही लोकांवर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहोत. परिणामस्वरुप यंदा तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला.
गोंदियामधील या अभिनव प्रवेशगुढी उपक्रमाबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/11000-students-enrolled-in-a-singl…/

Friday, 24 November 2017

विदर्भातील पहिली बायोलॅब : संशोधन, निर्मिती, विक्री सर्वच कारभार महिलांच्या हाती

गेल्या तीन महिन्यात, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन तब्बल २१ लोकांना जीव गमवावा लागला. ८०० शेतकरी, शेतमजूरांना अपंगत्व, अंधत्व आलं. रासायनिक खतं, कीटकनाशकांमुळे खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चाचा आणि विषमुक्त असा जैविक शेतीचा पर्याय उभा राहत आहे. या शेतीला लागणारी खतं, कीटकनाशकं जैविक पध्दतीने निर्माण करण्यासाठी यवतमाळच्या संगीता सव्वालाखे यांनी विदर्भ बायोटेक लॅब उभी केली. विदर्भातील ही पहिलीच बायोलॅब असून या लॅबची उत्पादनक्षमता पाचशे टनांवर पोहचली आहे. कृषीविषयक औषधांचं संशोधन, निर्मिती, विक्री, व्यवस्थापन सर्वच कारभार महिलांच्या हाती आहे, हे या लॅबचं वैशिष्ट्य.

संगीता दीपक सव्वालाखे (काहारे) यांनी कृषी कीटकशास्त्रात पदव्युत्त्तर (एम.एसस्सी) शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे, १९९२ मध्ये या विषयात शिक्षण घेणाऱ्या त्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या. त्या म्हणाल्या, “बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर चंद्रपूर तालुक्यातल्या सिंदेवाही इथे सहा महिने शेतावर प्रात्यक्षिकाची संधी मिळाली. रासायनिक पध्दतीमुळे होणारं शेतीचं नुकसान प्रत्यक्ष अनुभवलं. आणि जैविक शेतीक्षेत्रातच काम करायचं, हे पक्कं झालं. १९९५ मध्ये घरातल्याच एका खोलीत लॅब सुरू केली. ट्रायकोकार्ड हा माझा पहिला प्रकल्प. २३ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत असून २००९ पासून यवतमाळ येथील एमआयडीसी परिसरात 'विदर्भ बायोटेक लॅब' नावाचे स्वतंत्र युनीट सुरू केले.”

बीजप्रक्रियेपासून उत्पादन हाती येईपर्यंत सर्वच काम या लॅबमध्ये महिलांच्या हाती आहे, हे विशेष. महिलांमध्ये शेतीविषयक संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विदर्भ बायोटेक या युनिटमध्ये संगीता सव्वालाखे यांनी ३० ते ३५ महिलांना रोजगार दिला आहे. इथे एकूण ११ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होते. यात ट्रायकोडर्मा, वंडर, ॲक्टीव्ह, थंडर, क्रायसोपर्ला, ट्रायकोग्रामी, उत्क्रांती, मॅलाडा आदी खतांचा समावेश आहे. यातील ट्रायकोडर्मा ४० ते ५० टन आणि उर्वरीत उत्पादने प्रत्येकी २० ते २५ टन तयार केली जातात. शिवाय दरवर्षी ४ ते ५ हजार लिटर द्रवरूप औषधांचीसुद्धा निर्मिती होते. रासायनिक खतांच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात ही खतं आणि कीटकनाशकं शेतक-यांसाठी पावडरी आणि द्रवरुपात उपलब्ध आहेत. ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे जिब्रालिक ॲसीड, एनझाईम्स् वापरण्याची गरज नाही. खरीप हंगामात महिनाभर पाऊस नाही आला, तरी ते झाड जिवंत राहतं, असं निरीक्षण संगीता यांनी नोंदवलं. या जैविक उत्पादनांना राज्यातील ७ ते ८ हजार शेतकरी, टाटा ट्रस्ट, स्वामिनाथन फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, बजाज फाऊंडेशन तसंच निमशासकीय संस्थांकडून मागणी असल्याचं त्यांनी‍ सांगितलं.
कृषीक्षेत्रातल्या पदव्या, संशोधन याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा, म्हणून संगीता यांनी नोकरीऐवजी स्वतंत्रपणे काम करायचं ठरवलं. माहेर- सासर या दोन्ही घरून भरपूर पाठिंबा मिळाल्याचं त्या आवर्जून सांगतात.
कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक काँग्रेस आणि लंडनच्या ओव्हरसीज डेव्हलपमेंटचं सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. याशिवाय युनेस्कोचा, शासनाचा महिला उद्योजकता पुरस्कार, पुणे मिटकॉनचा पुरस्कार, जिल्हा उद्योग केंद्राचा पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विदर्भ बायोटेक लॅबला सर्वोच्च असं ISO 9001-2015 चे मानांकन आहे.
पिकांसाठी वापरण्यात येणारी रासायनिक औषधं माणसांसाठी फार घातक ठरत आहेत. निरोगी जगण्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक अन्न आणि त्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. हा पर्याय लोकसहभाग आणि लोकचळवळीतूनच स्वीकारला जाईल, असं त्या सांगतात.
घरच्या घरी खतं कशी तयार करावीत, कोणत्या हंगामात कोणती पिकं घ्यावीत, याबाबत त्या शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. एकाच प्रकारच्या परंपरागत पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा वर्षभर पैसे येत राहतील, या दृष्टीने विचार करून शेती करावी, याबाबत त्या आग्रही असतात.
संपर्क : संगीता सव्वालाखे
विदर्भ बायोटेक लॅब
- नितीन पखाले.

कुरुंजीतलं गमभन : खेडेगावात मुलं वास्तवात जगतात


शहरात, विशेषतः मध्यमवर्गातल्या घरात, मुलं आणि मोठे, असे दोन वेगवेगळे भाग असतात. मोठ्यांचे काम घराबाहेर आणि शक्यतो बैठे, कॉम्प्युटर सोबत असते. तिथं मुलांच्या दृष्टीनं बघितलं, तर कोणतीही प्रक्रिया घडताना दिसत नाही. मुलांचा सहभागही नसतो. घरकामात बऱ्याच गोष्टी आउटसोर्स केल्या जातात. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वच्छता, स्वैपाक इ. यासाठी मशिन्स किंवा कामवाल्या बायका/ पुरुष असतात. त्यामुळे हे काम मुलांपर्यंत पोचत नाही. पुन्हा, मुलांनी शाळा, अभ्यास यावरच फोकस करावे, या अंधश्रद्धेमुळे घरात घडणाऱ्या या प्रक्रियांपासून मुलांना लांब ठेवण्यात येते. मुलांचा वेळ जावा म्हणून त्यांना रिझवायला तयार खेळणी विकत आणली जातात.
खेड्यात तसे नसते. खेडेगावात मुलं वास्तवात जगतात. म्हणजे खूप लवकर ते घराचा एक उपयुक्त घटक बनतात आणि खऱ्या जीवनाला भिडतात. कुरुंजीत मी बघते, की मोठ्या भावंडांना धाकट्यांची काळजी घ्यावी लागते. मुलींना घरकाम, मुलामुलींना बाहेर शेतात, जनावरांचं बघावं लागतं. आईवडील शेतात अडकलेले असतात. त्यामुळं मुलामुलींना हे करावंच लागतं. उन्हाळ्यात बरीच घरं दुरुस्तीला काढली जातात. दुरुस्तीच्या कामातही मुलं सहभागी असतात.
मुलांचे खेळणे दोन प्रकारांनी होताना दिसते. एक म्हणजे ते जे काही काम करत असतात, त्यात खेळकरपणा आणणे आणि दुसरे आपण प्रत्यक्ष घेतलेले अनुभव पुन्हा स्वतःच्या पद्धतीने जगून बघणे.
मुलं जे काही करत असतात त्यात खेळकरपणा आला, की तो आपल्या मोठ्यांच्या दृष्टीने त्यांचा खेळ होऊन जातो. मुलं बैलांना चरायला रानात घेऊन जातात तिथं रानमेवा जमा करतात, पाण्यात, मातीत खेळतात, थंडीत शेकोटी करतात, उन्हाळयात नदीत पोहतात. पावसाळ्यात भात लावायला माणसांची नितांत गरज असते. मुलं प्रसंगी शाळा चुकवून भात लावायला शेतात जातात, तेव्हा त्याचाही आनंद घेतात. मळणी चालू असते तेव्हा भाताच्या राशीत मुलं लोळतात, उड्या मारतात.
समीरला कोंबडीची पिल्लं खूप आवडतात. गेल्या वर्षी, त्याच्या कोंबडीने दहा अकरा अंडी घातली होती. ती उबवून त्यातून पिल्लं बाहेर पडली. या वर्षीही त्याच्या घरी आठ पिल्लं आहेत. घरातली कोंबडी आणि पिल्लं ही आता समीरची जबाबदारी झाली आहे. त्यांना दाणा-पाणी देणं, त्यांना डाळग्यात ठेवणं, त्यांचं रक्षण करणं ही त्याची कामं आहेत. तो या सगळ्यात खूप रमतो. या कामातून त्याचं कोंबड्यांबद्दल ज्ञान वाढताना दिसतं.
गेल्या शनिवारी, तो आणि गावातल्या दोन आज्ज्या गंभीरपणे अंड्यातून पिल्लू बाहेर येण्याबद्दल चर्चा करत होते. काही वेळा, पूर्ण दिवस भरले, तरी एखादं अंडं फुटत नाही. तेव्हा अंडं अलगदपणे सोलून पिल्लू बाहेर काढावं लागतं, ते लगेच ऊबेला कोंबडीखाली ठेवावं लागतं. समीरच्या कोंबडीनं अश्या पिल्लाकडं चक्क दुर्लक्ष केलं, तेव्हा त्याने ते पिल्लू बाकीच्या पिल्लांच्या मधोमध ठेवून त्याला जगवलं आणि मग कोंबडीनं त्याला स्वीकारलं. हे सगळं, समीर त्या प्रक्रियेतून स्वतः गेल्यामुळं समजू शकला. आपण याला खेळ म्हणू शकू. पण ही जगण्यातून आपोआप ज्ञान मिळण्याची प्रक्रिया आहे.
तसंच मुलांना शेतीबद्दल, झाडांबद्दल, जनावरांबद्दल असलेल्या समजेचं पण आहे. डोंगरावरच्या धनगरवाड्यातून बैल खरेदी करून गावात आणला, तेव्हा तो माणसांच्या वर्दळीमुळे बुजला, हे मुलांनी त्याला पाण्यावर नेताना समजून घेतलं. गावात कुठल्या झाडाला कधी फळ येतं, कुठल्या आंब्याला चांगल्या चवीची फळं येतात, कधी येतात हे सगळं त्यांना माहीत असतं.
मुलं एखादा अनुभव पुन्हा स्वतःच्या पद्धतीनं जगून बघत असतात, तेव्हा त्यांना त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ती स्वतः बनवतात. या वस्तूंना आपण मोठी माणसे खेळणी म्हणतो.
एकदा राधा( वय 6) आणि केतकी (वय 8) त्यांच्या घरासमोर बसून बाहुल्या बनवत होत्या. राधानं क्रूसाच्या आकारात दोन काडया जोडून त्याला कापड गुंडाळून त्याच्या बाहुल्या बनवल्या. जरीचं कापड साडीसारखं नेसवलेली नवरी आणि साधं कापड गुंडाळलेला नवरा. नवरीच्या गळ्यात मण्यांची माळ सुद्धा घातली होती. केतकीने बनवलेल्या दोन्ही बाहुल्या साडी नेसलेल्या होत्या. तिनं सांगितलं की या जावा जावा आहेत. मी कधी बाहुल्यांमध्ये, हे नातं बघितलं नव्हतं. तिच्या घरात आई आणि काकू असल्यामुळे तिला ते नातं जवळचं वाटलं असावं.
मुलांच्या खेळण्याबद्दल खूप गोष्टी मी नोंद केल्या आहेत. त्याबद्दल पुन्हा पुढच्या वेळी……….
  रंजना बाजी

Wednesday, 22 November 2017

बालदिनाच्या निमित्ताने


प्रिय अनन्या,
बालदिनाच्या निमित्ताने तुझी फारच आठवण येत होती. तशी नेहमीच येते हे खरं. पण आज मी कामासाठी घराबाहेर असल्याने विशेषच. 
पहिलं सांगायचं म्हणजे, मी तुझा बाबा म्हणून, तुला कधी काळी काही रागाने बोललो असेन, तुला ओरडलो असेन तर तुझी मी माफी मागत आहे. मी तुला जरी प्रमाने रागावलो असेन तरीही... मी यापुढे असं होऊ देणार नाही, याचं तुला वचन देत आहे. आम्हा प्रौढांना संयमाने वागायला हवं, आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं, हे खरं. 
आम्ही प्रौढ म्हणून तुझ्यासारख्या मुलांचं, तुमच्या हक्कांचं संरक्षण करण्यास अजूनही पूर्णपणे यशस्वी न झाल्याचं मला फारच वाईट वाटत आहे. बाळा, अजूनही मुलांवरचे अत्याचार कमी होत नाही आहेत. किंबहुना त्यातील क्रूरपणा फारच वाढत चालला आहे. शाळेत, घरात, प्रवासात, परिसरात अजूनही तुमच्यासारखी मुलं सुरक्षित नाहीत. अजूनही कित्येक मुलींना समाजाच्या भीतीमुळे शाळा सोडून घरी बसावं लागते. मुलींचं लग्न लावलं म्हणजे ती सुरक्षित झाली ही समाजाची विचारधारा अजूनही बदलत नाही.
अन्नू, तुला वाढवताना जरी अपेक्षांचं ओझं आम्ही तुझ्यावर टाकलं नसलं, तरी कित्येक मुलं अजूनही दप्तरांच्या ओझ्यासोबत पालकांच्या अपेक्षेचं ओझं घेऊन जगत आहेत. एकवेळ दप्तरांचं ओझं ठीक, पण पालकांच्या अपेक्षेचं नको, अशी अवस्था आज झाली आहे. पालकांशी मुलांचा संपत चाललेला संवाद, त्यातून निराशेकडे झुकणारी मुलं आणि मग त्यांचा दुर्दैवी अंत हे सारं, सहन न होणारं आहे गं.
स्वच्छ पाणी, हवा, वातावरण शाळेत भीतीमुक्त वातावरण, परिक्षेचं भूत, शिक्षणाचा दर्जा, सातत्याने त्यात होणारे घोळ, आरोग्यसुविधा, कित्येक मुलींना जन्माला येण्याअगोदरच मारणं वा जन्मलीच तर टाकून देणं... या सगळ्याची फारच खंत वाटते.
पण तुझ्याकडे, तुझ्यासारख्या मुलांकडे पाहिलं की एक आशावाद पुन्हा उफाळून येतो. आम्ही प्रौढ इतके तुमच्यावर अत्याचार करूनदेखील तुमचे ते विश्वास ठेवणारे, आश्वस्त डोळे आणि निरागस हास्य पाहिलं की लढायची ताकद मिळते.
म्हणून, मी आज तुला वचन देत आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ही परिस्थिती बदलण्याचा निकराने प्रयत्न करीन. पण हे करत असताना तुझ्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही याचं सातत्याने भान ठेवीन.
आणि हो, लाडके, तुला दररोज एक गोष्ट सांगण्याचं वचन मी तुला आज देत आहे.
तुझा प्रिय बाबा
विकास सावंत.

Monday, 20 November 2017

शाळा आली मदतीला धावून

इगतपुरी शहरातील फुलेनगर भाग. इथं राहणाऱ्या सोनाली आणि मोनाली जिल्हा परिषदेच्या तीन लकडी शाळेत शिकतात. वडील अनिल उन्हवणे मजुरीच्या करतात. त्यातूनच कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळतं. दिवाळी जवळ आलेली. एक दिवस दुपारच्या वेळी अचानक घरातल्या गॅस सिलेंडर्चा स्फोट झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पाच जणांचं हे कुटुंब रस्त्यावर आलं. सोनाली, मोनाली दोघींचीही शाळा दोन-तीन दिवस बुडली. मुली शाळेत दिसत नाहीत म्हणून शिक्षक उमेश बैरागी मुलींच्या घरी गेले. आणि मुलींच्या घराची परिस्थिती बघून त्यांना धक्काच बसला. घरातलं सामान, मुलींचं शाळासाहित्य असं सगळं सगळं जळून राख झालेलं. हे सरांच्या मनाला लागलं. त्यांनी लगेचच मुख्याध्यापक वासुदेव वराडे आणि बाकी शिक्षकांना हे सांगितलं. सगळ्यांनी मिळून उन्हवणे कुटुंबाला मदत करायचं ठरवलं. बैरागी सर म्हणाले, “संकटकाळी एकमेकांना मदत करा हे आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. मोनालीच्या घरावर आलेली आपत्ती मला माझ्या घरावर आलेल्या संकटाप्रमाणे वाटली." मुलांनाही सांगितलं, तर त्यांनीही लगेचच आपले खाऊचे साठवलेले पैसे, आईच्या वापरात नसलेल्या साड्या, भांडीकुंडी दिली. अन्य सहकारी शिक्षकांनीही तेच केलं. त्यांनी स्वतःहून धान्यासह अन्य सामान शाळेच्या आवारात आणून दिलं. गट विकास अधिकारी, केंद्रचालक यांनीही दायित्वाच्या जाणिवेतून त्या कुटुंबाला मदत केली याचा आनंद आहे, मुख्याध्यापक म्हणाले.
गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे यांनी तात्काळ रोख रक्कम, किराणा, शैक्षणिक साहित्य उन्हवणे यांच्याकडे दिलं. तेवढ्यापुरती सोय झाली. पण पुढं काय? हा प्रश्न होताच. मग सोशल मिडियाच्या माध्यमातून बैरागी सर आणि बाकी शिक्षकांनी मदतीचं आवाहन केलं. या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एका दिवसातच संसारोपयोगी भांडी, धान्य, कपडे अशी मदत उभी राहिली.
मदतीचा हा ओघ पाहून उन्हवणे कुटुंबाला भावना अनावर झाल्या. रक्ताच्या नात्यांपेक्षा घट्ट नातं निभावत संकटसमयी मदत करणाऱ्या सर्वाचे त्यांनी आभार मानले. सोनाली, मोनालीची शाळा आता सुरळीत सुरू आहे.

- प्राची उन्मेष.

Sunday, 19 November 2017

जिगरबाज शिवाजी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड गावातला शिवाजी आवटे. वय वर्ष ५०. एका हाताने अपंग असूनही बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या हाताखाली ते काम करतात. शिवाजीला वयाच्या तेराव्या वर्षी अपंगत्व आले. उच्च वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे त्याचा डावा हात खांद्यापासून तोडावा लागला.
मात्र या अपंगत्वाचा बाऊ न करता अगदी सुदृढ माणसाला लाजवेल असं काम ते करतात. शिक्षण केवळ पाचवी. शिवाजी अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याने मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली.
सिमेंट कालवलेला माल उचलून कोणाच्याही मदतीशिवाय ते बांधकामापर्यंत नेऊन टाकतात. एकाच हाताने भिंतीला प्लास्टर करणं, विटा वाहून नेणं, उंच बांधकामासाठी लागणारे बांबूचे पालकही बांधणं, एवढंच काय, गाजळीची बांधीही करतात. बांधकामामध्ये स्लॅब आणि पिलरसाठी बांधी करणं हे अतिशय कौशल्याचं काम समजलं जातं. काम करताना इतर मजुरांच्या चुका होतात, पण शिवाजी ते अतिशय सफाईदारपणे करतात.
मुख्य मिस्त्री रमेश वाढवे कुठेही बांधकाम निघालं की आधी शिवाजीला बोलावून घेतात. ते सांगत होते, “गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी माझ्या हाताखाली काम करतो. त्याला काम करताना पाहून तो अपंग आहे असं जाणवतच नाही. इतर मजुरांच्या तोडीस तोड काम. अपंग असल्याचं कोणत्याही प्रकारचं भांडवलसुद्धा करत नाही.”
एका हाताने शिवाजी खांद्यावर कावड घेऊन पाणी भरतात. एकाच वेळी तीन तीन घागरी उचलतात. दोन घागरी कावडीला आणि एक हातात. फिरण्याची आवड असलेले शिवाजी ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरून करतात. हंगामाच्या दिवसात शेतीची नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी ही सारी कामंही ते करतात. या कामात त्यांना पत्नीही मदत करते.
शिवाजी गावातील इतर युवकांचं प्रेरणास्थान आहे. त्याला हिरीरीने आणि मोठ्या उत्साहाने काम करताना पाहून अनेकजण कामाला लागले आहेत. अपघाताने आलेलं अपंगत्व हसतमुखाने स्वीकारून सतत काम करत राहाणं. जिगरबाज शिवाजीचं हे उदाहरण हाताला काम नाही म्हणून बेकार हिंडणाऱ्या व लोकांपुढे लाचारीने हात पसरणाऱ्या लोंकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे.


- गजानन थळपते.

ही धडपड शिक्षण थांबू नये म्हणून!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ठाण्यातील शहापूरच्या देसलेपाडा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही आणि आदिवासी, कामगार वर्गातील मुले असूनही विद्यार्थी शाळेला नियमित येतात, हे या शाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण शाळेच्या या परंपरेत 2016-2017 च्या शैक्षणिक वर्षात मात्र खंड पडला. शाळेत पाचवीत शिकणारा विद्यार्थी गणेश धानके दिवाळीनंतर शाळेत आलाच नाही. खरंतर या शाळेत कोणताच विद्यार्थी न सांगता शाळेला दांडी मारत नाही. मात्र गणेशच्या कुटुंबाकडून कसलाच निरोपही न आल्याने त्याच्या वर्गशिक्षिका मंगल डोईफोडे अस्वस्थ झाल्या. डोईफोडे मॅडमनी गणेशच्या वर्गमित्रांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र गणेश लांबच्या कादबाव पाड्यावरुन येत असल्याने नेमकी माहिती मिळेना. गणेशचे आई- वडील वीटभट्टी कामगार आहेत, ते त्याला दुसऱ्या गावी तर घेऊन गेले नसतील ना? अशी चिंता शिक्षिकांना वाटू लागली. त्यानुसार गावात चौकशी केली असता समजलं, की धानके कुटुंब खारबाव पाड्यावर वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतरित झालं आहे.
गणेश दुसऱ्या गावी गेलाय खरा, पण त्याचं शिक्षण चालू असेल का? हे पाहण्यासाठी त्याला खारबावला जाऊन भेटायचं असं त्यांनी ठरवलं. शिक्षिकांनी धानके कुटुंबाला खारबावला सोडणाऱ्या जीपचालकाला शोधून काढलं आणि गणेशकडे घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र 75 किमी अंतरावरील खारबावला जाण्यासाठी जीपचालक अडीच हजार रुपये मागू लागला. भाड्याची ही रक्कम दोन्ही मॅडमच्या आवाक्याबाहेरची होती. शेवटी कशीबशी त्याची समजूत घालत तो दीडहजार रुपयांवर तयार झाला.
शेवटी एका दिवशी शाळा सुटल्यावर दोघी शिक्षिका प्रचंड खड्डे आणि धुळीने भरलेल्या रस्त्यावरून खारबावला पोहोचल्या. त्यांनी गाडी थेट वीटभट्टीकडे घ्यायला लावली. जीपचा आवाज ऐकताच वीटभट्टीजवळच्या झोपडीतून एक बाई कोण आलंय, ते पाहायला आली. ती होती गणेशची आई. तिनं शिक्षिकांना ओळखलं आणि हाका मारून झोपडीत बोलावलं.
मॅडमना पाणी देऊन गणेशच्या आई वडिलांनी इकडे कशा काय आलात, असं विचारलं. “आम्ही गणेशचीच चौकशी करण्यासाठी आलो आहोत. आहे कुठे गणेश? आणि तुम्ही काहीच न कळवता कसं काय खारबावला आलात?” अशी चौकशी डोईफोडे मॅडमनी केली. मॅडमना उत्तर देण्याआधी, गणा…अशी जोरदार हाक वडिलांनी मारली आणि मातीत खेळणारा गणेश हजर झाला. ” बाई, तुम्ही इकडं आलात?” दोन्ही मॅडमकडे पाहून गणेश खूपच खुष झाला.
गणेशच्या वडिलांनी उत्तर दिलं, “बाई, आमचं जिणं हे असं हातावरचं. कादबावमधलं काम संपलं बगा. मग कान्ट्रॅक्टर म्हन्तू तिकडं जावं लागतं, नवं वीटभट्टीचं काम इकडं खारबावला लागलं. पोटासाठी पोराबाळांना घेऊन इकडं यावं लागलं बगा. पन इतंबी गणाला साळंत घातलंया, काळजी करू नगा. तुमाला कळवायचं तेवढं राहूनच गेलं बगा, निगताना.” गणेशनेही पुस्ती जोडली. “बाई मी आता खारबावच्या जिल्हा परिषद शाळेत जातोय, पर आपल्या शाळेची खूप आठवण येते बघा.”
आपल्या विद्यार्थ्याने गाव सोडले असले तरी शिक्षण सोडले नाही, याचा शिक्षिकांना आनंद झाला. “गणेशला खूप- खूप शिकवा, त्याचे शिक्षण मधेच थांबवू नका. दुसऱ्या गावात जायची वेळ आली तर प्रसंगी ‘शिक्षण हमी कार्ड’ घ्या” असा सल्लाही त्यांनी गणेशच्या पालकांना दिला. 

 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Friday, 17 November 2017

मातेसह सासुलाही अमरत्व देणारी डॉक्टर


रत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. मृत्युपश्चात नेत्रदानाचं महत्त्व आत्ता कुठं लोकांना थोडफार कळू लागलं आहे. अवयवदानाबद्दल केवळ जनजागृतीपर्यंतच न थांबता दुःख बाजूला सारून इथल्या नेत्रचिकित्सक डॉ. सोनाली पाथरे यांनी आदर्श घालून दिला आहे. नुकतंच त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. आणि त्याआधी काही काळ आईचं.
डॉ.सोनाली नेत्रदानाविषयी जनजागृती करतात. सोनाली यांच्या आईचं साधना भगाडे यांचं निधन झालं आणि आपल्या कुटुंबापासून अवयवदानाच्या अंमलबजावणीची सुरुवात करायला हवी. हे जाणून त्यांनीच स्वतः आईच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून डोळे काढले. त्यानंतर काही काळाने त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. यावेळी पती पराग पाथरे यांना मानसिक आधार देतानाच सासू अंजली पाथरे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे कोल्हापूर लॅबला पाठवून दिले. आई आणि सासू दोघींनीही केलेली नेत्रदानाची इच्छा सोनालीने पूर्ण केली. आणि 2 दोन गरजू अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाशकिरण पोचला.खरं तर, जवळच्या व्यक्तीच्या मूत्यूसमयी माणूस गळून जातो. तरीही, आपल्या सासूबाई आणि आईची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करताना, स्वतःच शस्त्रक्रिया करणाऱ्या सोनाली यांचं कौतुक करावं तितकं कमीच. एकीकडे जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत त्यांनी दोन अंधांना दृष्टी मिळवून दिली.

डॉ. सोनाली म्हणतात, “आई आणि सासूबाई दोघीही, आज डोळ्यांच्या रूपात समाजात वावरत आहेत. यापेक्षा मोठी आनंदाची दुसरी बाब नाही. जर दोघींनीही नेत्रदानाचा संकल्प केला नसता, तर या आनंदाचा अनुभव मिळाला नसता. आपल्या मायेची माणसं आपल्या भोवतीच वावरत असल्याचा भास होतो.” यासाठी पती डॉ.पराग पाथरे यांची खंबीर साथ मिळाल्याचं सोनाली सांगतात. 
- जान्हवी पाटील.

Thursday, 16 November 2017

कुरुंजीतलं गमभन

आपल्याला माहीत आहेच की मुलं मोठ्यांचं सतत निरीक्षण करत असतात आणि या निरीक्षणातल्या गोष्टी मुलांच्या वागण्यात झिरपत जातात.
कुरुंजीत आजीआजोबा, आईवडील, मुलं अशी एकत्र राहणारी कुटुंबं आहेत. त्याशिवाय चुलत, आते, मामे कुटुंबं पण शेजारीपाजारी राहतात. त्यामुळे मुलं नात्यांच्या एका विस्तृत पटाला सामोरी जात आहेत. चुलत भावंडं सख्ख्याइतकीच जवळची. आते, मामे भावंडंसुद्धा जवळची. त्यामुळे खूप वेगवेगळ्या वयाची मोठी माणसं, मुलं सतत एकत्र असतात.
यामुळे आपल्यापेक्षा लहानांची आणि वयस्करांची काळजी घेणं आपसूकच त्यांना समजतं.
कुरुंजीच्या देवीचं मंदिर नदीजवळ आहे. एकदा मुलांचा एक कंपू मला घेऊन देवळात गेला. यात बारा-तेरा ते सहा अशा वयाची बरीच मुलं-मुली होती. देवळापलीकडे एक शेत आणि नंतर नदी. एक मुलगा म्हणाला, चला आपण पाण्यापर्यंत जाऊया. लगेच त्यातले मोठे दोघे म्हणाले, नको. आपल्याबरोबर लहान मुलं आहेत. आपण नाही पाण्यात जायचं. आणि सगळी मागे वळाली.

कुरुंजीपासून एक-दीड तासाच्या चालायच्या अंतरावर डोंगरावर कचरेवाडी आहे. या वाडीतली मुलं शाळेच्या वसतीगृहात राहतात. दर शनिवारी चालत घरी जातात आणि सोमवारी परत येतात. तेरा-चौदा वर्षाच्या मुलामुलींबरोबर या वर्षी एक सहा वर्षाचा मुलगा पण आलाय.
एका शनिवारी शाळा सुटल्यानंतर गावातली मुलं आणि मी घरी परत येत होतो. रस्त्यात हा सहा वर्षाचा मुलगा एकटा चालत जाताना दिसला. मुलांनी त्याला विचारलं तर म्हणाला, बाकीचे आले नाहीत मी एकटा घरी चाललोय. गावातल्या मुलांचा जीव कासावीस. दोघे त्याच्या बरोबर थांबले, एक पळत पुन्हा शाळेत गेला. कचरेवाडीच्या मोठ्या मुलांना सांगितलं. तीही निघतच होती. त्यांना गडबड केली, सोबत आणलं आणि त्या सहा वर्षाच्या मुलाला जोडून दिलं. खरं तर गावातली मुलं निघून जाऊ शकली असती, पण एकत्र कुटुंबामुळं लहानांची काळजी करणं हा त्यांच्या वृत्तीचा भाग बनला आहे.
गावात वयस्कर मंडळी भरपूर. बहुसंख्य जणांचा मुक्काम घराबाहेर अंगणात किंवा गावात मध्यावर असलेल्या मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर असतो. येता जाता मुलांना हाक मारणं, कामं सांगणं चालू असतं, मुलं पण कुठल्या आजोबांना नाही म्हणत नाहीत. काही आजोबा रागराग करतात, शिव्या देतात पण मुलं ते स्वीकारतात किंवा काणाडोळा करतात.


आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे वयपरत्वे म्हाताऱ्या माणसांना कपड्यांचं भान राहत नाही. पण मुलं त्याकडे लक्ष देत नाहीत. एकदा आम्ही एका घराशेजारून चाललो होतो. तर समीर पोक्तपणे म्हणाला इकडून नको आपण पलीकडून जाऊ. मी कारण काय असावं असा विचार करत बघितलं तर त्या घरातली म्हातारी बाई तिथंच शू ला बसली होती. या गोष्टी लहान वाटतील. पण आजच्या चौकोनी कुटुंबाच्या काळात मुलांना म्हाताऱ्या माणसांच्या अशा गोष्टी स्वीकारणं जड जातं हे बघितलं आहे.
मुलं मला फिरायला सोबत नेतात तेव्हा त्यांचं माझ्याकडे लक्ष असतं. माझी पर्स, पिशवी धरतील, आधारासाठी मजबूत काठी तोडून आणतील, खूपच उतार असेल तर मला हाताला धरून नेतील. लहान-मोठ्यांची काळजी घेणं हा त्यांच्या वाढण्याच्या प्रक्रियेतला भाग बनला आहे.
गावात मुलांना कुठेही मोकळेपणाने हिंडण्याफिरण्याची पूर्ण मुभा असते. दहा-बारा वर्षाची मुलं जनावरं चरायला किंवा नदीवर पाणी पाजायला घेऊन जातात. एकटे किंवा सोबतीने. अंधार व्हायच्या आत घरी येणं महत्त्वाचं. अंधारात मुख्यतः सापाची जास्त भीती असते म्हणून!
गावातले सगळे एकमेकांना ओळखत असतातच. त्याबरोबर आजूबाजूच्या गावचे पण ओळखत असतात.
नववी-दहावीच्या मुलींबरोबर गप्पा मारताना भीती हा विषय निघाला. कशाकशाची भीती वाटते यावर मुली साप, भूत, अंधार असे उल्लेख करत होत्या. रस्त्यावरून एकट्या जात असताना भीती वाटत नाही का? मी विचारलं. त्यात काय भीती वाटण्यासारखं आहे? असा प्रतिप्रश्न मुलींनी केला. मी म्हटलं, रस्त्यावरून एकटं जाताना कुणी येईल असं नाही का वाटतं? मुलींना ही भीतीच समजली नाही. सगळे तर ओळखीचे असतात, कोण काय करणार, असा त्यांचा सूर होता. या मुली किती भाग्यवान असेच वाटून गेलं. खरं तर, मुली बैल चरायला घेऊन जात असतात तेव्हा बरेचदा रस्ता निर्मनुष्यच असतो. पण माणसांची भीती नाही हे किती चांगलं !
- रंजना बाजी

Tuesday, 14 November 2017

जिंदगी से संतुष्ट हूं : शम्स जालनवी


पहाटे 5 ची वेळ. एक म्हातारबाबा सायकलवरून पेपर वाटताना दिसतो. जवळ जाऊन बोलल्यावर कळतं की हे आहेत, महंमद शमशोद्दीन उर्फ शम्स जालनवी. जालन्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मोठं प्रस्थ... शायरी, मुशायऱ्यामधून प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत.
सध्या वय 91. गेल्या 40 वर्षांपासून ते पेपरवाटपाचं काम करत आहेत. 1926 साली त्यांचा जालन्यात जन्म झाला. शमशोद्दीन यांना वयाच्या 14 व्या वर्षांपासून गझल, शायरीचे वेध लागले. त्याकाळी शायरी गझलाच्या खूप मैफिली व्हायच्या, शायरी गझलांना चांगले दिवस होते. त्या वातावरणात शमशोद्दीन मोठे झाले. घरप्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी फिटरकीचं काम करू लागले. यंत्रांच्या संगतीतही त्यांचं शायरी, गझलांचं प्रेम कमी नाही झालं. तिथूनच शमशोद्दीन यांचा ‘शम्स जालनवी’ या नावाने प्रवास सुरु झाला. आजही त्यांना विविध ठिकाणांहून बोलावणं येतं, त्यांच्या कार्यक्रमाला चाहते आवर्जून उपस्थित राहतात. भारतभर त्यांनी शायरी मुशायऱ्यांना हजेरी लावली. ते म्हणतात, “हैद्राबाद म्हणजे तर घर-अंगण. तिथे मैफिलीत वाहवा मिळवण्याची मजा काही औरच !”1986 साली फिटरकीच्या व्यवसायातून ते दूर झाले. तेव्हाच त्यांनी पेपरवाटपाचं काम सुरु केले ते आजतागायत. शम्स यांना 3 मुलं, 3 मुली. या वयातही पेपरवाटपाचं काम का क

रता असं विचारल्यावर ते म्हणाले, "दिल की तसल्ली के लिये करता हूं। सरकार से हजार रुपये महिना मिलता है, अपना खुदका गुजारा हो जाता है। दोनों बेटे इलेक्ट्रिशियन हैं। लेकिन मैं खुद भी मेहनत करना चाहता हूं । किसीका लेना नही, किसीका देना नही। दोपहर तक पेपर बाटता हूं। उसके बाद आराम करता, पढते रहेता। आज भी नई नई गझले बनाता हु, जिंदगीसे संतुष्ट हूं । इस दुनिया में अच्छेबुरे सब मिलते, वादे करनेवाले भी और वादे तोडनेवाले भी। इसलीये मै हॅंसकर टाल देता हूं ।" 


- अनंत साळी


Sunday, 12 November 2017

बदललेल्या दीप्ती,प्रविणा,झायरा,नेहा


ब्लॅक फॉरेस्टपासून मावा केकपर्यंतचे विविध प्रकार, पान मसाल्यासारख्या चवीची चॉकलेट्स, वेगवेगळ्या नानकटाई आणि नाही म्हणू शकणार नाही इतका निखळ न प्रेमळ आग्रह अनुभवायला मिळाला तो मुंबईतल्या मालाड पूर्व इथल्या दोन कौशल्यविकास केंद्रांमध्ये. सरकारच्या कौशल्यविकास योजनेअंतर्गत आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या कांदिवली पूर्व मतदारसंघात महिलांसाठी कौशल्यविकास केंद्र सुरू केली आहेत. बेकरीसारख्या कोर्सेसची फी १५ ते २० हजार रुपयांपर्यंतही जाते त्याचं प्रशिक्षण इथे साहित्यासह मोफत मिळत असल्याचं इथे भेटलेल्या महिलांनी सांगितलं. ''पूर्वीही आम्ही घरी केक करत होतो पण क्लासमुळे आत्मविश्वास मिळाला. प्रोफेशनल टच मिळाला, नव्या कल्पना समजल्या'' असं इथल्या दीप्ती मोहनानी आणि प्रविणा पांचाळ यांनी सांगितलं.झायरा शेख यांना तर या कोर्समुळे मोठा आधार मिळाला आहे. झायरा यांच्या पतीचं पाच वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं. तेव्हा पदरात तीन आणि सात वर्षांची मुलं होती. मुलं झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली होती त्यामुळे उत्पन्नाचं कोणतंच साधन नव्हतं. मग त्यांनी शिवणकाम सुरू केलं. ते करताना त्यांना कौशल्यविकास केंद्राविषयी कळलं. ''बेकरीचा कोर्स केल्यानंतर उत्पन्नाचं चांगलं साधन मिळालं आहे. आमच्या प्रशिक्षक पद्मिनी दुबे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी मुलीच्या शाळेपासून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. आता महिन्याला साधारण पाच ते सहा मोठ्या ऑर्डर्स असतात. सणासुदीच्या काळात जास्त ऑर्डर्स मिळतात असं झायरा यांनी सांगितलं .


''उत्पादनाच्या निर्मितीबरोबरच त्याचं मार्केटिंगही तितकंच महत्वाचं आहे.आपलं उत्पादन विकणं हीदेखील कला आहे. यासाठीही आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो असं प्रशिक्षक पद्मिनी दुबे यांनी सांगितलं. दुबे यांचा बेकरी प्रशिक्षणाचा अनुभव दांडगा आहे. कोरा केंद्रातही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. कोर्स करून महिला जेव्हा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, आर्थिकदृष्टया स्वावलंबी होतात तेव्हा खूप समाधान वाटत असल्याचं दुबे मॅडम सांगतात.
कोर्स पूर्ण झाल्यावरही दुबे मॅडमकडून मार्गदर्शन मिळत असल्याचं कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नेहा सानपने सांगितलं. लिविंग फ़ुड्झ वाहिनीच्या २०१७च्या स्पर्धेची ती विजेती आहे.एकीकडे कॉलेजचं शिक्षण घेताघेताच ठाण्यात एके ठिकाणी तिने शेफ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे. स्त्रियांना बदल घडवायचा असेल तर आत्मविश्वास असणं , स्वावलंबी असणं जरुरीचं आहे असं मानणाऱ्या मंजू कल्याणसिंह यांनी या दृष्टीने आपल्याला कोर्सचा फायदा झाल्याचं सांगितलं.
२६ दिवसांचा हा कोर्स असून यात ९ प्रकारचे केक्स, चॉकलेट्सचे ३ प्रकार, १० प्रकारची बिस्किट्स, पिझ्झा ब्रेडसह ब्रेडसचे प्रकार शिकवले जातात. कोर्स पूर्ण झाल्यावर प्रेझेंटेशन ठेवलं जातं, अशी माहिती या केंद्रांचं व्यवस्थापन बघणाऱ्या शुभांगी हिवाळे यांनी दिली. अशाच प्रकारे या केंद्रात शिवणकाम आणि ब्युटी पार्लरचं पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. पार्लरच्या प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी घरी व्यवसायाला सुरुवात केली आहे. कॉलेजमधल्या मुलीना एकीकडे शिकता शिकता नववधूंना सजवण्याच्या ऑर्डर घेता येऊन कमाई करता येते. आतापर्यंत ३,००० महिलांनी या केंद्रांमधून प्रशिक्षण घेतलं आहे. या संपूर्ण प्रशिक्षणच्या खर्चाची, साहित्याची, प्रशिक्षकाच्या मानधनाची व्यवस्था आमदार अतुल भातखळकर करतात असं शुभांगी यांनी सांगितलं.
योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असेल आणि त्या राबवताना उत्तम व्यवस्थापन केलं जात असेल तर त्या सामान्य जनतेसाठी कशा उपयुक्त ठरतात ते या निमित्तानं पाहायला मिळालं.

- सोनाली काकडे

Saturday, 11 November 2017

तंत्रज्ञान घडविते किमयासुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :मी बालाजी जाधव, २००६ साली साताऱ्यात माण तालुक्यातील शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेत माझी नेमणूक झाली. इथल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक मेंढपाळ, वीटभट्टी मजूर आहेत. मुलं शाळा बुडवून आई वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी फिरायची. शिक्षणाविना मुलांचे भटकणे पाहून मी अस्वस्थ होत होतो. मग त्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मी कॉम्प्युटरची युक्ती योजली. आमच्या जि.प. शाळेत कॉम्प्युटर नव्हता, मग मी स्वखर्चाने लॅपटॉप आणला आणि मुलांना मुक्तपणे हाताळायला देऊ लागलो.


आणि माझी युक्ती लागू पडली, लॅपटॉपच्या आकर्षणाने मुलं नियमित शाळेला येऊ लागली. मुलं शाळेत नियमित येत आहेत याचं मला समाधान होतं, पण मी ‘लातूर पॅटर्न’ मधून आलेला विद्यार्थी असल्याने मुलांनी अभ्यासात उत्तम प्रगती करावी असं मला वाटत होतं. म्हणूनच मी चौथीच्या मुलांना शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी उद्युक्त केलं. पहिल्या वर्षी मी मुलांवर फार मेहनत घेतली, मुलांनीही अगदी झटून अभ्यास केला, सगळे उत्तीर्णही झाले पण एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही.
हे मनाला लागलं आणि मी मुलांवर आणखी मेहनत घेऊ लागलो. इंटरनेटवरून अभ्यासाशी संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडिओ मी शाळेत ऑफलाईन दाखवू लागलो. मुलांचा सराव वाढावा यासाठी भरपूर प्रश्नांची बँकच तयार केली आणि अर्थातच आमच्या प्रयत्नांना यश आले. 2008 साली आमच्या छोट्या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यानंतर सलग सात वर्षे गुणवत्तायादीत येण्याचा विक्रम आमच्या शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेने केला.

यामुळे विस्ताराधिकाऱ्यांची शाबासकी मिळाली आणि मग मी तयार केलेली 'क्वेश्चन बँक' आमच्या संपूर्ण बीटमधल्या 60 शाळांसाठी वापरली जाऊ लागली. दरम्यान मला 'ब्लॉग'विषयी समजलं. 2010 साली माझा पहिला ब्लॉग सुरू झाला- http://www.shikshanbhakti.in/ अभ्यास रंजक बनविण्यासाठी काय करावं, कोणते पूरक उपक्रम घ्यावे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका मी या ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या. या ब्लॉगला महाराष्ट्रातील शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कौतुकासोबत शिक्षक मित्रांची तक्रार होती, की ब्लॉगवरच्या प्रश्नपत्रिकांची प्रिंटआऊट काढून मग विद्यार्थ्यांना वाटावी लागते. हे जिल्हा परिषदेच्या शाळेला परवडणारं नाही, याची मला जाणीव झाली. मग मी HTML ही संगणकीय भाषा प्रणाली शिकलो. यानंतर मी थेट ऑनलाईन चाचण्या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून देऊ लागलो. या बहुपर्यायी चाचणीत योग्य पर्यायांवर क्लिक करून प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ‘सबमिट’वर क्लिक केले की दुसऱ्या मिनिटाला निकाल समोर येतो. यामुळे रोज सुमारे 12 हजार शाळा ब्लॉगला भेट देऊ लागल्या.
पण यासाठी इंटरनेटही गरजेचं असतं. ग्रामीण भागात जिथे 12 तास वीज नसते तिथं इंटरनेट कुठून आणणार, यावर उपाय मिळाला ऑफलाईन चाचण्यांचा. मी जाणीवपूर्वक हे अॅप अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी बनवलं. जेणेकरून इंटरनेट असताना शिक्षक त्यांच्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड करू शकतात. आणि मग शाळेत इंटरनेट नसतानाही मुले चाचणी ऑफलाईन सोडवू शकतात आणि त्यांना लगेच त्यांचा निकालही मिळतो. या ऑफलाईन अॅपमुळे 'गुगल इंडिया'ने 2014 साली माझा विशेष सन्मानही केलेला आहे.

- बालाजी जाधव.

Friday, 10 November 2017

'नवी उमेद' - सकारात्मक बदल

आपल्या 'नवी उमेद'ची दखल यंदा दोन महत्वाच्या दिवाळी अंकांनी घेतली. ‘अक्षर’ हा जुना आणि स्वत:ची वेगळी ओळख असलेला, वर्तमान घडामोडींची आवर्जून दखल घेणारा अंक. आणि मिडिया वाॅच हा नवा, तरूण, ताजे विषय हाताळणारा, स्वत:ची ओळख निर्माण करू पाहणारा अंक. या दोन्ही अंकांनी 'नवी उमेद' या आपल्या फेसबुक पेजची सजग दखल घेतली आहे.
बहुतेक फेसबुकनिवासी, फेसबुकचा वापर विरंगुळा म्हणून, मित्रमैत्रिणीशी संपर्कात राहाण्यासाठी, व्यक्तिगत आयुष्यातल्या घटनांचं शेअरिंग करण्यासाठी करतात. याच ‘सोशल मीडिया’चा उपयोग सकारात्मक बदल घडवून आणणा-या, गावोगावच्या बायामाणसांच्या, ख-याखु-या कहाण्या सांगण्यासाठी ‘नवी उमेद’ने केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद देणा-यांत आपलाही सहभाग आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
 


 


 ‘अक्षर’मधला मेधा कुळकर्णींचा आणि 'मिडिया वाॅच'मधला 
 लेख अवश्य वाचा. 'नवी उमेद'चं कौतुक म्हणून नाही. तर हा प्रयोग कसा सुरू झाला, त्यामागचा विचार, युनिसेफची साथ,
आमची टीम, कार्यपद्धती, डिजिटल, सोशल मिडियाकडे आम्ही कसं बघतो - हे सगळं जाणून घेण्यासाठी, आमचे लेख वाचा.
आणि ‘नवी उमेद’ला साथ देत राहाच.
- वर्षा जोशी आठवले, संपादक-समन्वयक
#नवीउमेद
Medha Kulkarni Hemant Karnik Aashay Gune Tanaji Patil Swati Mohapatra Anil Shaligram Amol Deshmukh Amol Saraf Balasaheb Kale Chandrasen Deshmukh Charushila Kulkarni Datta Kanwate Ganesh D. Pol Gitanjali Ranshur Manoj Jaiswal Janhavi Patil Lata Parab Manisha Bidikar Niteen Pakhale Prashant Pardeshi Rajesh Raut Sonali Kakade Suresh Kulkarni Unmesh Gaurkar @Surykant Netake Vijay Palkar Varsha Joshi Athavale

Thursday, 9 November 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजीच्या मुलांबरोबर हळूहळू ओळख होत गेली. मुलांना शक्यतो कशाही बाबत नाही म्हणायचं नाही, त्यांच्या नजरेतून जग बघायचं असंच ठरवलं होतं.
एका शनिवारी सकाळी कुरुंजीपासून एक किमी अंतरावरच्या त्यांच्या शाळेत गेले होते. साडेदहाला शाळा सुटल्यावर मुलांनी विचारलं, ताई, आज नवन्याच्या घरी जाऊ या का? मी म्हटलं, लांब कुठं चालवत नेऊ नका मला, आणि चढ उतारावर पण नको, मला त्रास होतो चालायचा.
करणनं कुरुंजीच्या विरुद्ध बाजूला मळे गावाकडे हात दाखवून म्हटलं, हे काय इथं आहे, सरळ चालत गेलं की आलं. काय त्रास नाही होणार.
मी हो म्हटल्यावर समीरनं दप्तर कुरुंजीतल्या एका मुलाकडं देऊन, आम्ही ताईंबरोबर फिरायला जातोय असा घरी निरोप दिला. तो निरोप बहुतेक सगळ्या मुलांच्या घरी गेला असावा. (खरं तर ही मुलं सतत कुठं ना कुठं फिरत असतात. त्यामुळं घरी अंधार व्हायच्या आत पोचली तर कुणी फारशी काळजी करत नाहीत.)
तर, नवन्या ( नवनाथ) सोबत होताच, त्याबरोबर समीर, मयूर, साहिल, करण , सार्थक, गंग्या ही मंडळी होती.
पाच मिनिटं चालत गेलो आणि मुलांनी रस्ता सोडून शेतातली वाट पकडली. उताराचीच वाट होती. मी दोनदा धडपडले. करणनं, ताईंचा हात धरा कुणीतरी , असं म्हणे पर्यंत मयूरनं एक चांगली दणकट काठी तोडून आणली, माझ्या हात दिली आणि, धरा ताई, चला आता, असं म्हणत मला मार्गी लावलं.
खाली उतरून गेलो तर अक्षरशः स्वप्नातलं वाटावं असं घर समोर उभं होतं. पूर्ण परिसरात एकच, मातीचं, उतरत्या कौलारू छपराचं घर , भोवती प्रशस्त जागा आणि झाडं!मुलं पळत घरात गेली. नवनाथच्या घरी नवीन बैल आणला होता. ते त्यांचं उत्सुकतेचं, भेटीचं मोठं कारण होतं. मुलांनी बैल बघितला, बैल या विषयावर भरपूर चर्चा झाली, कुणाचा बैल चांगला, कुणाचा किती किमतीचा, मोठ्या मयूरच्या घरी डोंगरावरच्या धनगरांकडून आणलेला बैल लोकांची सवय नसल्यामुळे कसा अजून बुजतो वगैरे..
एवढ्यात मळे गावात राहणारा नववीतला किरण आला. नवनाथच्या घरावरून जाणारी ही पायवाट म्हणजे त्याच्या घरी जायचा शॉर्ट कट होता. आम्हाला बघून तो पण घरात आला. गप्पा झाल्या.
मुलं म्हणाली, जवळच ओढा आहे तिथं जाऊ या. निघालो. तो ही मोठा उतार. या वेळी किरणनं हाताला धरून मला ओढ्यापर्यंत उतरवून दिलं.खाली लहानसा सुंदर ओढा होता. फारसा वाहत नव्हता पण मुलांना खेळायला पुरेसा! मुलं उधळली. पाण्यात उतरली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं. मस्तपैकी भिजली. पाण्यात नाचून झालं.
ओढ्यात अलीकडे मोठे खडक होते. त्यावरून पाणी वाहत आमच्यापर्यंत येत होतं. मुलं त्या खडकांवर चढली. एवढ्यात सार्थकला कपारीत भला मोठा साप दिसला. तो ओरडला. अरे, साप,साप करत मुलं खाली उतरली आणि शहाण्यासारखी चला इथून म्हणत पुन्हा नवन्याच्या घराकडे परत वळाली. रस्त्यात दिसणाऱ्या झाडांबद्दल रनिंग कॉमेंट्री चालूच होती. सापाचा कांदा हे झाड पहिल्यांदा मी बघितलं.
नवनाथच्या घरी पुन्हा! नवनाथ आणि त्याचा भाऊ विश्वास यांनी घरासमोर भाज्या लावल्या होत्या. कौतुकानं त्यानं ती बाग दाखवली. घराच्या मागे देखणा फणस होताच. विश्वासने एक मोठी काकडी (काकडाच होता तो) कापून आम्हा सगळ्यांना खायला दिली. मिरच्यांच्या झाडाला मिरच्या लागल्या होत्या. साहिल म्हणाला, मी मिरची अशीच खातो. विश्वासने एक मिरची दिली. साहिलनं ऐटीत खाऊन दाखवली. विश्वासनं पुन्हा एक काढून दिली. साहिलनं तोंडात टाकली आणि थू थू करत दंगा सुरू केला. भलतीच झोंबरी मिरची होती ती !
भरपूर पाणी पिऊन आम्ही परत कुरुंजीला निघालो.सकाळी सातला चहा पिऊन घरातून मुलं निघाली होती. काकडीच्या तुकड्याशिवाय पोटात काही गेलं नव्हतं. घरी पोचलो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. पण मुलांची एनर्जी तेवढीच होती. पळत, उड्या मारत, एकमेकांना ढकलत मस्त चालत होती. ‘लहान लहान’ गोष्टींचा आनंद घेत होती, असं मी म्हटलं असतं, पण त्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या होत्या.
मुलांबरोबरचं हे माझं पहिलं फिरणं. यानंतर बरंच फिरलो आम्ही. अजूनही फिरू.
अश्या फिरण्यातून मुलांचं विश्व, त्यांची सूक्ष्म निरीक्षणं, त्यांचे आनंद, त्यांचं एकमेकांमधलं नातं, मैत्री, बांधिलकी, त्यांची काळजी घेण्याची मानसिकता , त्यांची चालण्याची अचाट क्षमता अश्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.
- रंजना बाजी

डोंगरातली सयाआज्जी


दूर डोंगरात वसलेलं कळमनुरी तालुक्यातलं करवाडी हे आदिवासी गाव. जेमतेम २०० लोकवस्ती. अजूनही गावात जायला रस्ता नाही, सहा किलोमीटरची पायपीट करावी तेंव्हा डांबरी रस्ता नजरेला पडतो.
अशा दुर्गम गावातली 65 वर्षीय सयाबाई खोकले घरासमोरच्या दगडावर बसून सांगत होती, "या गावातल्या रस्त्यावर फिरणारं प्रत्येक पोरगं माझ्या हातावर जन्माला आलेलं आहे बाबा." याचं कारण सयाबाई या गावातील दाई आहेत. गावातले अंध समाजाचे आदिवासी लोक तिला सुईण म्हणतात. आणि सारा गाव तिला प्रेमाने सयाआज्जी म्हणून हाक मारतो. सयाआज्जी या गावासाठी देवदूत आहे. कारण या गावात कुण्या गरभारणीचं पोट दुखू लागलं तर या गावातले लोक अम्ब्युलन्स, जीप किंवा कारवाल्याला फोन करत नाहीत तर ते सयाआज्जीच्या घराची वाट चालू लागतात.
कारण गावाला रस्ता नाही. त्यामुळं तिथं कुठलंच वाहन पोहचू शकत नाही. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे नांदापुरला. ते सहा किलोमीटरवर. म्हणजे तेवढं चालणं आलं. कळा सुरु झाल्यावर गरोदर बाईला तेवढं चालवत नेणंही कठीण. त्यामुळेच घरी बाळंतपण केलं जातं. सयाआज्जी आजही सफाईदारपणे बाळंतपणं करते.
“तुमच्या हातावर कुणी बाळंतीण दगावली का?” सयाआज्जी सांगते, "नाही बाप्पा, एकसुद्धा नाही, अर उलट त्या पलीकडच्या गावात डॉक्टरची पोरगी बाळंत झाली तेंव्हा त्या डॉक्टरनंबी माझ्याच हातावर बाळंतपण केलं, त्योच डाक्टर दुसऱ्या बाईचे बाळांतपणाला पाच पाच हजार घ्यायचा अन माझ्या हातावर शंभर टेकवले बाबा."
सयाआज्जीने तिच्या हयातीत दोनशे ते अडीचशे बाळंतपणं केली आहेत. सयाआजी गरिबीत दिवस काढते. रोजगारावर काम करते. पण, बाळंतपणाचे पैसे घेत नाही. गावातले लोक तिला लुगडं चोळी नेसवतात. ती समाधानाने सांगते, "मी पैसे नाही घेत बाबा. पर मला साऱ्या हयातीत, एकदाही लुगडं इकत घ्याया नाही लागलं, ह्याच्यातच समदं आलं."
सरकार, विविध सामाजिक संस्था बाळंतपणं दवाखान्यात सुरक्षितपणे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. या लक्ष्याकडे वाटचाल सुरूच आहे. मात्र सयाआजीसारख्या पारंपारिक सुईणी, दाया यांचं ज्ञान आणि अनुभव कोणी नाकारत नाही. गडचिरोलीत डाॅ अभय-राणी बंग यांनी अशा दायांनाच प्रशिक्षण देऊन बालमृत्यू रोखण्याच्या कामात सहभागी करून घेतलं. खरंच, अशा अनेक सयाआजी आरोग्यसेविका बनू शकतील, हे निश्चित. 


- दत्ता कानवटे.

Tuesday, 7 November 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग सहा


मागच्या भागात काउन्सेलिंग प्रक्रियेची चांगली माहिती मिळाली. पण काउन्सेलिंगनेही सुटू शकत नाहीत, अशा काही केसेस असतात का? अशा केसेस कशा हाताळल्या जातात?
- काही वेळा मुलांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स दिसून येतात. लहानपणापासूनच काही मुलं आक्रमक असतात, सहजपणे खोटं बोलत असतात. अशा स्थितीत मुलांच्या हातात इंटरनेट गेलं तर खूपच मोठी समस्या तयार होते. अशा मुलांना ऍडमिट करणं, योग्य ते औषधोपचार देणं, जास्त काउन्सेलिंग करणं असे उपाय केले जातात. या संदर्भात दोन केसेसची उदाहरणं देते.
चार-पाच वर्षापूर्वी आमच्याकडे या विषयातली पहिली केस आली होती. एक मुलगा, विशाल म्हणूया त्याला. विशालचे वडील त्याला ॲडमिट करायलाच घेऊन आले. म्हणाले, माझ्या मुलाला इंटरनेटचं व्यसन आहे. त्याला ॲडमिट करा. या विषयाचा ते नीट अभ्यास करुन आले होते. खरं तर, विशालच्या वडिलांशी चर्चा केल्यानेच आम्हाला इंटरनेटव्यसन या विषयाचं गांभीर्य पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं. विशाल कॉलेजमध्ये जातो सांगून इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन बसायचा. विशालच्या अनुपस्थितीबद्दल कॉलेजकडून पत्र आल्यावर हा प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आला. आम्ही विशालला ॲडमिट करुन घेतलं. त्याने चांगला प्रतिसादही दिला आणि इंटरनेट ॲडिक्शनमधून तो व्यवस्थित बाहेरही आला. त्याला व्यायामाची चांगली सवय लागली. स्वतःच्या दिनक्रमाचं नीट वेळापत्रक आखून त्याने अभ्यास केला. नंतर उच्चशिक्षणही घेतलं.
आता दुसरी केस. ही टोकाची होती. एका टीन एज मुलाचं, अक्षयचं इंटरनेटवेडाचं प्रमाण वाढलेलं होतं. तो रात्रीचं जेवण झाल्यावर कंप्युटरवर बसायचा. तो रात्रभर बसायचा. एकदा सकाळी त्याच्या आईबाबांनी बघितलं, तर तो त्याच अवस्थेत तसाच डोळे तारवटून बसलेला. बसल्या जागी लघवी झाल्याचंही त्याला कळलेलं नव्हतं. म्हणजे नैसर्गिक विधीसाठीही तो जागेवरून उठला नव्हता. अशा वेळी ॲडमिट करण्याखेरीज पर्यायच नसतो.
अशा टोकाला गेलेल्या व्यक्तींसाठी ३० दिवसांचा एक कोर्स असतो. इंटरनेट किंवा मोबाईलपासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवलं जातं. त्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यांना थोडे विड्रॉवल सिंम्पटम्स येतात. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की हेही एक व्यसनच आहे. वर्तनात्मक व्यसन. अशा मुलांच्या पालकांविषयी तक्रारी ऐकून मुलं आणि पालक यांचं समुपदेशन केलं जातं. ॲडमिट झाल्यावर आमच्या केंद्रातलं दैनंदिन वेळापत्रक मुलांना पाळावं लागतं. त्यातून मुलांना एका सकारात्मक जीवनशैलीची ओळख होते आणि महिन्याभरात नव्या जीवनक्रमात मुलं रुळूनही जातात. या दिनक्रमाचं महत्व त्यांना कळतं. व्यायाम करुनही मन किती आनंदित होतं, हे त्यांना जाणवतं. आपले पालक आपलं ऐकतायत, आपल्याशी नीट बोलतायत हे लक्षात येतं. दारुच्या व्यसनींना दारूपासून पूर्णपणे दूर रहा असं सांगावं लागतं. मात्र इंटरनेटचं वेड बरं करताना या तंत्रज्ञानाच्या चांगल्या बाजू समजावून सांगितल्या जातात. गॅझेट्सचा योग्य कारणासाठी उपयोग, इंटरनेटचा स्मार्ट वापर करायची सवय लावली जाते. काही नियम घालून दिले जातात. सांगितलेलं पाळलं जातंय का याचा फॉलोअप ठेवला जातो. मुक्तांगणच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करुन घेतलं जातं. महाराष्ट्रातल्या आमच्या इतर फॉलोअप सेंटरमध्ये जाऊन ते इतर लोकांना मदत करतात. अक्षय या दीर्घ उपचारप्रक्रियेतून जाऊन बरा झाला. काउन्सेलिंग ही अशी मोठी आणि वेळखाऊ प्रकिया असते हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आता वर्तवणुकीतले आजार, मानसिक आजार वाढतायत. त्यामुळे काउन्सेलिंग ही आता काळाची गरज झाली आहे.
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी मुलांना वेगवेगळ्या गैरप्रकारांची उदाहरणं समजावून सांगा. त्यासंबंधीचे लेख त्यांच्यासोबत वाचा. मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे उत्तर नसेल तर मुलांबरोबर बसूनच ते शोधा. त‌ज्ञांचा सल्ला घ्या. इंटरनेटवरची सर्व महिती खरी असतेच असं नाही, हेही मुलांना समजावून सांगा.
आजची तरुण पिढी स्वकेंद्री, स्वार्थी आहे असं म्हटलं जातं. मला हे मान्य नाही. चांगले मार्ग दाखवले की मुलं ते अनुसरतात. मुलांना इतरांना मदत करायला आवडते. ती त्यांना करू द्या.
शेवटी मी पालकांना एवढचं सांगेन की, मुलांना मोकळ्या हवेत फिरायची, खेळायची सवय लावा. मुलं लहान असताना इंटरनेट आणि गॅझेटसपासून त्यांना शक्य तेवढं लांब ठेवा. टीन एजमध्ये मुलांना गॅझेट्सचा योग्य उपयोग करायची सवय लावा. इंटरनेट, सोशल मिडियाचं जग फसवं आहे, याची आणि खरोखरीचं जग सुंदर आहे, याची मुलांना परोपरीने जाणीव करून द्या.
(समारोप)

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक


Monday, 6 November 2017

महिला करत आहेत वीज मीटररीडिंग


वाशिमच्या महावितरण कार्यालयाजवळ जमलेल्या चार-पाच जणी. त्यांनी एक नवी जबाबदारी घेतली आहे, वीज मीटररीडिंगची. ‘वुमन्स स्कील डव्हलपंमेंट’ या त्यांच्या बचतगटाद्वारे वीज मीटर बिल रीडिंग घेणे आणि बिल वाटप करणे हे काम त्या सक्षमपणे पार पाडत आहेत.महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया म्हणाले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रीडिंग पद्धत आता सोपी झाली आहे. त्यामुळे बेरोजगार महिलांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाशीम शहरात प्रथमच हा प्रयोग सुरु झाला असून आता ग्रामीण भागातही हा प्रयोग अंमलात येणार आहे. पुरुष वर्गाकडून वारंवार होणाऱ्या मीटररीडिंगमधील चुका आणि त्यामुळे येणाऱ्या तक्रारी या महिलांना रीडिंग जवाबदारी दिल्याने कमी होत आहेत.” त्यामुळे हा प्रयोग आता पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून महिला बचतगटांनी ही कामे घेण्याकरिता पुढं येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
“वुमन्स स्किल डेवलपमेंट ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही १२ महिलांनी एकत्र येत या कामाला सुरवात केली. आमची एकच इच्छा होती ती की, आम्हाला पारंपारिक पद्धतीची कामं नको होती. आम्हाला आमच्या कामातून ओळख निर्माण करायची होती. म्हणून वीज मीटररीडिंगचं काम सुरु केलं,” असं या ग्रुपमधील सदस्य रुपाली अवचार यांनी सांगितलं.

- मनोज जयस्वाल.

Sunday, 5 November 2017

शाळा फक्त 'ती'च्यासाठी


तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावातली जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. या शाळेची विद्यार्थीसंख्या आहे फक्त एक.तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते, तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. गेल्या वर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावं लागेल. म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते. या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. शाळेत वीजही नसते. पण शाळा सुरू आहेच.हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, "धोकादायक इमारत असल्यास तिथं विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. विद्यार्थीसंख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे."
शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर तिने सांगितलं, "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे." यातून तिची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.
गटशिक्षणाधिकारी बारसागडे म्हणाले की, "विद्यार्थीसंख्या कमी असेल, तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो. मात्र इथून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच रस्ते चांगले नाहीत. गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणं क्रमप्राप्त होतं. तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे.”
''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं. शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं," तिचे वडिल राजू मडावी सांगत होते. 


- प्रतिनिधी, वर्धा 

Friday, 3 November 2017

सासू-सुनेची जोडी, त्यांना व्यवसायात गोडी


सासू-सुनेचं नातं कधी माय-लेकीसारखं असतं; तर कधी त्यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र बीड जिल्ह्यातील एका सासू-सुनेच्या जोडीने घराच्या छतावर रोपवाटिका सुरू करून रोपं विकण्याचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. संजय भोजने यांचं गावात कृषी सेवा केंद्र आहे. त्यांच्याकडे शेतकरी बी-बियाणं खरेदी करण्यास येत, त्यावेळी तयार रोपं कुणाकडे मिळतील का याचीही चौकशी करत.रोपांना मागणी असल्याने आपण घरीच अशी रोपं तयार करावीत का असा विचार त्यांनी घरात बोलून दाखवला. संजयच्या आई यमुनाबाई आणि पत्नी मनीषा यांनी तो उचलून धरला. रोपं तयार करून देण्याची इच्छा आणि तयारीही या सासू-सुनेने दाखवली. मात्र प्रश्न होता जागेचा. सुरवातीला दुसऱ्याच्या जागेत हे काम सुरू केलं. पण स्वतः भोजने कुटुंबाने नवीन जागा घेऊन दुमजली घर बांधलं, तेव्हा त्याच्या छताचा वापर रोपवाटिकेसाठी करायचं ठरवलं. घराच्या छतावर रोपवाटिकेसाठी व्यवस्था केली. भिंतीत लोखंडी पाइप बसवून ग्रीन नेट शेड तयार केलं. रोपं तयार करण्याच्या पध्दतीबद्दल सून मनिषा भोजने यांनी सांगितलं की, स्लॅबवर कोकोपीट अंथरून त्यावर रोपांचा ट्रे मांडला जातो. त्यात कोकोपीट भरून ज्या पिकाचं रोप तयार करायचं, त्याचं बी टोपलं जाते. दिवसातून दोनदा फवारा यंत्राद्वारे पाणी दिलं जातं. गरजेनुसार टॉनिकचा डोस याच पाण्यातून दिला जातो. एका ट्रे मध्ये शंभर रोपं तयार होतात.
साधारणपणे महिना दीड महिन्यात रोपं तयार होतात. चांगली वाढलेली रोपं मग कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी ठेवली जातात. वांगी, टोमॅटो, मिरची या भाज्यांची साधारण वीस हजार रोपं महिन्याकाठी तयार करतात. एक रुपयाला एक रोप याप्रमाणे रोपाची विक्री केली जाते. रोपांसाठी चांगलं बी वापरलं जात असल्याने शेतकरी याच रोपांची मागणी करतात. वर्षभरात सगळा खर्च वजा जाता किमान लाखभर रुपयाचं उत्पन्न मिळतं. अलीकडेच त्यांनी पपई आणि शेवग्याची रोपंही तयार करून विकण्यास सुरवात केली आहे. मात्र या रोपांना अधिक मेहनत लागते. आणि प्लास्टिक बॅगमध्ये तयार करावी लागत असल्याने या रोपांची किंमत जास्त आहे.
एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यावर विक्रीसाठी मार्केट शोधावं लागतं. पण इथे मार्केट उपलब्ध असताना उत्पादन तयार करण्याची गरज होती. सासू-सुनेने एकत्र येऊन हे घडवून आणलं, पेललं. गेली अडीच वर्षे त्यांचा हा रोपवाटिकेचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. स्वतःच्या शेतात काम केल्याचा आनंद ही रोपं तयार करताना मिळतो, असं वयाची साठी पार केलेल्या सासू यमुनाबाई म्हणतात. जोडीने आणि गोडीनेदेखील काम करणार्‍या यमुना-मनीषा या सासू-सुनेचं मालिकांमध्ये दाखवण्यात येणारं नकारात्मक नातं खोटं ठरवतात.

  – राजेश राऊत.

Thursday, 2 November 2017

कुरुंजीतलं गमभन
मी कुरुंजीत ज्या घरी जेवते तिथे एक आज्जी आहे. आज्जीला एकच मुलगा आणि तीन चार मुली आहेत. सुरुवातीच्या काळात शहरी पद्धतीने मी तुमचे वय काय असे विचारले तर आज्जीने हात हलवून माहीत नाही असा इशारा केला. तिचा मुलगा शेजारीच बसला होता, तो म्हणाला, असेल सत्तर पंचाहत्तर.
आज्जी सतत कामात असते. कोंबडी हा तिचा आवडता विषय असावा. घरात नेहमी कोंबड्या असतात. कोंबड्यांनी घातलेली अंडी त्यांच्याकडून उबवून घेऊन त्या पिल्लांकडे लक्ष देणे ती आवडीने करते. मागे एकदा मुलीकडे गेली तर मुलीने एक कोंबडी भेट दिली...आज्जी या कोंबडीला सवय होईपर्यंत पाय बांधून घरात खाटेला बांधून ठेवायची. नंतर कोंबडीने अंडी दिली तर ती नीट तिच्याकडून उबवून घेतली. येताजाता कोंबडी तिच्या पिल्लांबरोबर आणि आज्जी कौतुकाने तिच्याकडे बघताना दिसायची.

पुढच्या वेळेला गेले तर एकही पिल्लू नाही. पिल्लं कुठं गेली या प्रश्नाला, दोन तीन घरातल्या देवाला कापली, गोठ्यातल्या गाईनं दोन तोंडात धरली, ती ओढून घेताना मेली असा हिशेब मिळाला. काही कावळ्यांनी पण उचलली होती.
सर्व म्हाताऱ्या माणसांप्रमाणे आम्ही आमच्या काळात किती कामं करत होतो आणि आत्ता कशी कामं नसतात हे तिचं पण म्हणणं असतं.
आज्जी म्हणजे एक चालता बोलता इतिहास आहे. जुन्या काळच्या खूप गोष्टी तिच्याबरोबर बोलताना कळत राहतात.
पूर्वी रस्ता नव्हता त्यामुळं भाटघर धरणाच्या पाण्यातनं लांचीतून ( लाँच मधून) भोरला जावं लागे. घर सामान आणायचे असेल तर समोरचा डोंगर चढून उतरून पलीकडच्या गावाहून जड जड पिशव्या वाहून पायी यावं लागे. पायली पायली भात घरात कांडावा लागे, पूर्वी कशी चारचार दिवस लग्नं व्हायची इ. अनेक गोष्टी तिच्याकडून ऐकायला मिळतात.
कितीही म्हातारं झालं तरी आपल्याला झेपेल तसं काम करून घराला हातभार लावायचा हा गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा गुण आज्जीतही आहे.
आज्जी कधी बसून नसते. सतत काही काम सुरू असते. घरात, बाहेर. या पावसाळ्यात पण ती तिला झेपेल इतका भात लावायला शेतात उतरली होती. दुपारी डोक्यावर पदर घट्ट बांधून ती शेतात तण काढताना पण दिसते. कोंबडया बघणं असेल, घरातल्या गाई बैलांना वैरण पाणी देणं असेल, झाडून काढणं असेल ती करते. स्वैपाक मात्र ती करताना दिसत नाही. पण भांडी घासेल. घरात नात आहे तिच्याकडून कामं करून घेईल. उन्हाळ्यात ती गावातल्या बायकांबरोबर दुपारी गोधडी शिवताना सुद्धा दिसली होती.
सहा महिन्यांपूर्वी आज्जी खूपच आजारी पडली. ससूनमध्ये ठेवावं लागलं, दहा पंधरा हजार खर्च झाले. डिस्चार्ज मिळाल्यावर पुण्याहून परस्पर ती गोष्टीतल्या म्हातारीसारखी पलीकडच्या गावातल्या मुलीकडं गेली आणि विश्रांती घेऊन टुणटुुणीत बरी होऊन आली.
आज्जीकडे पारंपरिक माहितीचा साठा आहे. एकदा तिच्या दारात गप्पा मारत बसलो असताना घरासमोरच्या रस्त्याच्या कडेला उगवलेल्या प्रत्येक झुडपाचं नाव, वैशिष्ट्य आणि औषधी उपयोग ती सहज बोलता बोलता सांगत होती. पूर्वी तिनं सुईणीचं काम केलंय. त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा तिनं बोलताना सांगितला. ती म्हणाली, आमच्या काळात बायका आपणच बाळंत हुयाच्या. सुईण सगळ्यांना न्हवती लागत, कधीतरी फार अडचणीचं असंल तर सुईण बोलवायची.
आज्जी जेवताना कधी ताट घेत नाही. भाकरी मांडीवर ठेवेल, लहान ताटलीत किंवा वाटीत भाजी आमटी घेईल आणि हळू हळू चावत जेवेल. स्वतःला अगदी कमी महत्त्व द्यायची पूर्वीची पद्धत तिच्या वागण्यात दिसते.
झाडपाल्याची बरीच माहिती असली तरी आजकालच्या खेड्यातल्या लोकांप्रमाणे आज्जीला सुई टोचून घेतली, डाक्टरचं औषध घेतलं तरच बरं वाटतं. आधी कधीतरी विकत घेतलेली आणि खायची राहिलेली औषधं तिच्या पिशवीत असतात. एकदा तिनं मला अंगदुखीवर हे औषध खाऊ का म्हणून एक स्ट्रीप दाखवली. कधीच्या काळातल्या Amoxicilin च्या गोळ्या होत्या. गोळ्या डॉक्टरनं दिल्याशिवाय खायच्या नाहीत असं सांगितल्यावर तिनं काढून ठेवल्या.
गावातल्या सगळ्या लोकांप्रमाणे आज्जीचा गावातल्या देवीवर खूप विश्वास. शेजारच्या फार्महाऊसमधल्या माणसाला कित्येक दिवस मूल बाळ नव्हतं. त्यानं कुरुंजाई देवीला नवस केल्यावरच त्याला मुलगा झाला यावर तिला पूर्ण विश्वास आहे.
गावापासून बऱ्याच लांब असलेल्या देवळात जाताना ती घरापासूनच अनवाणी जाते. ती देवाकडं काही फार मागत असावी असं वाटत नाही. आहे त्यात ती समाधानी दिसते.
पुस्तकातच जगण्याचे धडे शोधू पाहणाऱ्या आजच्या काळात जगण्यातूनच जगण्याचं ज्ञान मिळवणारी असली माणसं हळूहळू संपत चालली आहेत याचं वाईट वाटत राहतं.
- रंजना बाजी