सासू-सुनेचं नातं कधी माय-लेकीसारखं असतं; तर कधी त्यांच्यातून विस्तव जात
नाही. मात्र बीड जिल्ह्यातील एका सासू-सुनेच्या जोडीने घराच्या छतावर
रोपवाटिका सुरू करून रोपं विकण्याचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. संजय भोजने यांचं गावात
कृषी सेवा केंद्र आहे. त्यांच्याकडे शेतकरी बी-बियाणं खरेदी करण्यास येत,
त्यावेळी तयार रोपं कुणाकडे मिळतील का याचीही चौकशी करत.


रोपांना मागणी
असल्य
ाने आपण घरीच अशी रोपं तयार करावीत
का असा विचार त्यांनी घरात बोलून दाखवला. संजयच्या आई यमुनाबाई आणि पत्नी
मनीषा यांनी तो उचलून धरला. रोपं तयार करून देण्याची इच्छा आणि तयारीही या
सासू-सुनेने दाखवली. मात्र प्रश्न होता जागेचा. सुरवातीला दुसऱ्याच्या
जागेत हे काम सुरू केलं. पण स्वतः भोजने कुटुंबाने नवीन जागा घेऊन दुमजली
घर बांधलं, तेव्हा त्याच्या छताचा वापर रोपवाटिकेसाठी करायचं ठरवलं.
घराच्या छतावर रोपवाटिकेसाठी व्यवस्था केली. भिंतीत लोखंडी पाइप बसवून
ग्रीन नेट शेड तयार केलं. रोपं तयार करण्याच्या पध्दतीबद्दल सून मनिषा
भोजने यांनी सांगितलं की, स्लॅबवर कोकोपीट अंथरून त्यावर रोपांचा ट्रे
मांडला जातो. त्यात कोकोपीट भरून ज्या पिकाचं रोप तयार करायचं, त्याचं बी
टोपलं जाते. दिवसातून दोनदा फवारा यंत्राद्वारे पाणी दिलं जातं. गरजेनुसार
टॉनिकचा डोस याच पाण्यातून दिला जातो. एका ट्रे मध्ये शंभर रोपं तयार
होतात.
साधारणपणे महिना दीड महिन्यात रोपं तयार होतात. चांगली वाढलेली रोपं
मग कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी ठेवली जातात. वांगी, टोमॅटो, मिरची या
भाज्यांची साधारण वीस हजार रोपं महिन्याकाठी तयार करतात. एक रुपयाला एक रोप
याप्रमाणे रोपाची विक्री केली जाते. रोपांसाठी चांगलं बी वापरलं जात
असल्याने शेतकरी याच रोपांची मागणी करतात. वर्षभरात सगळा खर्च वजा जाता
किमान लाखभर रुपयाचं उत्पन्न मिळतं. अलीकडेच त्यांनी पपई आणि शेवग्याची
रोपंही तयार करून विकण्यास सुरवात केली आहे. मात्र या रोपांना अधिक मेहनत
लागते. आणि प्लास्टिक बॅगमध्ये तयार करावी लागत असल्याने या रोपांची किंमत
जास्त आहे.
एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यावर विक्रीसाठी मार्केट
शोधावं लागतं. पण इथे मार्केट उपलब्ध असताना उत्पादन तयार करण्याची गरज
होती. सासू-सुनेने एकत्र येऊन हे घडवून आणलं, पेललं. गेली अडीच वर्षे
त्यांचा हा रोपवाटिकेचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. स्वतःच्या शेतात काम
केल्याचा आनंद ही रोपं तयार करताना मिळतो, असं वयाची साठी पार केलेल्या
सासू यमुनाबाई म्हणतात. जोडीने आणि गोडीनेदेखील काम करणार्या यमुना-मनीषा
या सासू-सुनेचं मालिकांमध्ये दाखवण्यात येणारं नकारात्मक नातं खोटं ठरवतात.
– राजेश राऊत.
No comments:
Post a Comment