Tuesday 7 November 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग सहा


मागच्या भागात काउन्सेलिंग प्रक्रियेची चांगली माहिती मिळाली. पण काउन्सेलिंगनेही सुटू शकत नाहीत, अशा काही केसेस असतात का? अशा केसेस कशा हाताळल्या जातात?
- काही वेळा मुलांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स दिसून येतात. लहानपणापासूनच काही मुलं आक्रमक असतात, सहजपणे खोटं बोलत असतात. अशा स्थितीत मुलांच्या हातात इंटरनेट गेलं तर खूपच मोठी समस्या तयार होते. अशा मुलांना ऍडमिट करणं, योग्य ते औषधोपचार देणं, जास्त काउन्सेलिंग करणं असे उपाय केले जातात. या संदर्भात दोन केसेसची उदाहरणं देते.
चार-पाच वर्षापूर्वी आमच्याकडे या विषयातली पहिली केस आली होती. एक मुलगा, विशाल म्हणूया त्याला. विशालचे वडील त्याला ॲडमिट करायलाच घेऊन आले. म्हणाले, माझ्या मुलाला इंटरनेटचं व्यसन आहे. त्याला ॲडमिट करा. या विषयाचा ते नीट अभ्यास करुन आले होते. खरं तर, विशालच्या वडिलांशी चर्चा केल्यानेच आम्हाला इंटरनेटव्यसन या विषयाचं गांभीर्य पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं. विशाल कॉलेजमध्ये जातो सांगून इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन बसायचा. विशालच्या अनुपस्थितीबद्दल कॉलेजकडून पत्र आल्यावर हा प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आला. आम्ही विशालला ॲडमिट करुन घेतलं. त्याने चांगला प्रतिसादही दिला आणि इंटरनेट ॲडिक्शनमधून तो व्यवस्थित बाहेरही आला. त्याला व्यायामाची चांगली सवय लागली. स्वतःच्या दिनक्रमाचं नीट वेळापत्रक आखून त्याने अभ्यास केला. नंतर उच्चशिक्षणही घेतलं.
आता दुसरी केस. ही टोकाची होती. एका टीन एज मुलाचं, अक्षयचं इंटरनेटवेडाचं प्रमाण वाढलेलं होतं. तो रात्रीचं जेवण झाल्यावर कंप्युटरवर बसायचा. तो रात्रभर बसायचा. एकदा सकाळी त्याच्या आईबाबांनी बघितलं, तर तो त्याच अवस्थेत तसाच डोळे तारवटून बसलेला. बसल्या जागी लघवी झाल्याचंही त्याला कळलेलं नव्हतं. म्हणजे नैसर्गिक विधीसाठीही तो जागेवरून उठला नव्हता. अशा वेळी ॲडमिट करण्याखेरीज पर्यायच नसतो.
अशा टोकाला गेलेल्या व्यक्तींसाठी ३० दिवसांचा एक कोर्स असतो. इंटरनेट किंवा मोबाईलपासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवलं जातं. त्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यांना थोडे विड्रॉवल सिंम्पटम्स येतात. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की हेही एक व्यसनच आहे. वर्तनात्मक व्यसन. अशा मुलांच्या पालकांविषयी तक्रारी ऐकून मुलं आणि पालक यांचं समुपदेशन केलं जातं. ॲडमिट झाल्यावर आमच्या केंद्रातलं दैनंदिन वेळापत्रक मुलांना पाळावं लागतं. त्यातून मुलांना एका सकारात्मक जीवनशैलीची ओळख होते आणि महिन्याभरात नव्या जीवनक्रमात मुलं रुळूनही जातात. या दिनक्रमाचं महत्व त्यांना कळतं. व्यायाम करुनही मन किती आनंदित होतं, हे त्यांना जाणवतं. आपले पालक आपलं ऐकतायत, आपल्याशी नीट बोलतायत हे लक्षात येतं. दारुच्या व्यसनींना दारूपासून पूर्णपणे दूर रहा असं सांगावं लागतं. मात्र इंटरनेटचं वेड बरं करताना या तंत्रज्ञानाच्या चांगल्या बाजू समजावून सांगितल्या जातात. गॅझेट्सचा योग्य कारणासाठी उपयोग, इंटरनेटचा स्मार्ट वापर करायची सवय लावली जाते. काही नियम घालून दिले जातात. सांगितलेलं पाळलं जातंय का याचा फॉलोअप ठेवला जातो. मुक्तांगणच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करुन घेतलं जातं. महाराष्ट्रातल्या आमच्या इतर फॉलोअप सेंटरमध्ये जाऊन ते इतर लोकांना मदत करतात. अक्षय या दीर्घ उपचारप्रक्रियेतून जाऊन बरा झाला. काउन्सेलिंग ही अशी मोठी आणि वेळखाऊ प्रकिया असते हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आता वर्तवणुकीतले आजार, मानसिक आजार वाढतायत. त्यामुळे काउन्सेलिंग ही आता काळाची गरज झाली आहे.
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी मुलांना वेगवेगळ्या गैरप्रकारांची उदाहरणं समजावून सांगा. त्यासंबंधीचे लेख त्यांच्यासोबत वाचा. मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे उत्तर नसेल तर मुलांबरोबर बसूनच ते शोधा. त‌ज्ञांचा सल्ला घ्या. इंटरनेटवरची सर्व महिती खरी असतेच असं नाही, हेही मुलांना समजावून सांगा.
आजची तरुण पिढी स्वकेंद्री, स्वार्थी आहे असं म्हटलं जातं. मला हे मान्य नाही. चांगले मार्ग दाखवले की मुलं ते अनुसरतात. मुलांना इतरांना मदत करायला आवडते. ती त्यांना करू द्या.
शेवटी मी पालकांना एवढचं सांगेन की, मुलांना मोकळ्या हवेत फिरायची, खेळायची सवय लावा. मुलं लहान असताना इंटरनेट आणि गॅझेटसपासून त्यांना शक्य तेवढं लांब ठेवा. टीन एजमध्ये मुलांना गॅझेट्सचा योग्य उपयोग करायची सवय लावा. इंटरनेट, सोशल मिडियाचं जग फसवं आहे, याची आणि खरोखरीचं जग सुंदर आहे, याची मुलांना परोपरीने जाणीव करून द्या.
(समारोप)

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक


No comments:

Post a Comment