Thursday 9 November 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजीच्या मुलांबरोबर हळूहळू ओळख होत गेली. मुलांना शक्यतो कशाही बाबत नाही म्हणायचं नाही, त्यांच्या नजरेतून जग बघायचं असंच ठरवलं होतं.
एका शनिवारी सकाळी कुरुंजीपासून एक किमी अंतरावरच्या त्यांच्या शाळेत गेले होते. साडेदहाला शाळा सुटल्यावर मुलांनी विचारलं, ताई, आज नवन्याच्या घरी जाऊ या का? मी म्हटलं, लांब कुठं चालवत नेऊ नका मला, आणि चढ उतारावर पण नको, मला त्रास होतो चालायचा.
करणनं कुरुंजीच्या विरुद्ध बाजूला मळे गावाकडे हात दाखवून म्हटलं, हे काय इथं आहे, सरळ चालत गेलं की आलं. काय त्रास नाही होणार.
मी हो म्हटल्यावर समीरनं दप्तर कुरुंजीतल्या एका मुलाकडं देऊन, आम्ही ताईंबरोबर फिरायला जातोय असा घरी निरोप दिला. तो निरोप बहुतेक सगळ्या मुलांच्या घरी गेला असावा. (खरं तर ही मुलं सतत कुठं ना कुठं फिरत असतात. त्यामुळं घरी अंधार व्हायच्या आत पोचली तर कुणी फारशी काळजी करत नाहीत.)
तर, नवन्या ( नवनाथ) सोबत होताच, त्याबरोबर समीर, मयूर, साहिल, करण , सार्थक, गंग्या ही मंडळी होती.
पाच मिनिटं चालत गेलो आणि मुलांनी रस्ता सोडून शेतातली वाट पकडली. उताराचीच वाट होती. मी दोनदा धडपडले. करणनं, ताईंचा हात धरा कुणीतरी , असं म्हणे पर्यंत मयूरनं एक चांगली दणकट काठी तोडून आणली, माझ्या हात दिली आणि, धरा ताई, चला आता, असं म्हणत मला मार्गी लावलं.
खाली उतरून गेलो तर अक्षरशः स्वप्नातलं वाटावं असं घर समोर उभं होतं. पूर्ण परिसरात एकच, मातीचं, उतरत्या कौलारू छपराचं घर , भोवती प्रशस्त जागा आणि झाडं!



मुलं पळत घरात गेली. नवनाथच्या घरी नवीन बैल आणला होता. ते त्यांचं उत्सुकतेचं, भेटीचं मोठं कारण होतं. मुलांनी बैल बघितला, बैल या विषयावर भरपूर चर्चा झाली, कुणाचा बैल चांगला, कुणाचा किती किमतीचा, मोठ्या मयूरच्या घरी डोंगरावरच्या धनगरांकडून आणलेला बैल लोकांची सवय नसल्यामुळे कसा अजून बुजतो वगैरे..
एवढ्यात मळे गावात राहणारा नववीतला किरण आला. नवनाथच्या घरावरून जाणारी ही पायवाट म्हणजे त्याच्या घरी जायचा शॉर्ट कट होता. आम्हाला बघून तो पण घरात आला. गप्पा झाल्या.
मुलं म्हणाली, जवळच ओढा आहे तिथं जाऊ या. निघालो. तो ही मोठा उतार. या वेळी किरणनं हाताला धरून मला ओढ्यापर्यंत उतरवून दिलं.



खाली लहानसा सुंदर ओढा होता. फारसा वाहत नव्हता पण मुलांना खेळायला पुरेसा! मुलं उधळली. पाण्यात उतरली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं. मस्तपैकी भिजली. पाण्यात नाचून झालं.
ओढ्यात अलीकडे मोठे खडक होते. त्यावरून पाणी वाहत आमच्यापर्यंत येत होतं. मुलं त्या खडकांवर चढली. एवढ्यात सार्थकला कपारीत भला मोठा साप दिसला. तो ओरडला. अरे, साप,साप करत मुलं खाली उतरली आणि शहाण्यासारखी चला इथून म्हणत पुन्हा नवन्याच्या घराकडे परत वळाली. रस्त्यात दिसणाऱ्या झाडांबद्दल रनिंग कॉमेंट्री चालूच होती. सापाचा कांदा हे झाड पहिल्यांदा मी बघितलं.
नवनाथच्या घरी पुन्हा! नवनाथ आणि त्याचा भाऊ विश्वास यांनी घरासमोर भाज्या लावल्या होत्या. कौतुकानं त्यानं ती बाग दाखवली. घराच्या मागे देखणा फणस होताच. विश्वासने एक मोठी काकडी (काकडाच होता तो) कापून आम्हा सगळ्यांना खायला दिली. मिरच्यांच्या झाडाला मिरच्या लागल्या होत्या. साहिल म्हणाला, मी मिरची अशीच खातो. विश्वासने एक मिरची दिली. साहिलनं ऐटीत खाऊन दाखवली. विश्वासनं पुन्हा एक काढून दिली. साहिलनं तोंडात टाकली आणि थू थू करत दंगा सुरू केला. भलतीच झोंबरी मिरची होती ती !
भरपूर पाणी पिऊन आम्ही परत कुरुंजीला निघालो.



सकाळी सातला चहा पिऊन घरातून मुलं निघाली होती. काकडीच्या तुकड्याशिवाय पोटात काही गेलं नव्हतं. घरी पोचलो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. पण मुलांची एनर्जी तेवढीच होती. पळत, उड्या मारत, एकमेकांना ढकलत मस्त चालत होती. ‘लहान लहान’ गोष्टींचा आनंद घेत होती, असं मी म्हटलं असतं, पण त्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या होत्या.
मुलांबरोबरचं हे माझं पहिलं फिरणं. यानंतर बरंच फिरलो आम्ही. अजूनही फिरू.
अश्या फिरण्यातून मुलांचं विश्व, त्यांची सूक्ष्म निरीक्षणं, त्यांचे आनंद, त्यांचं एकमेकांमधलं नातं, मैत्री, बांधिलकी, त्यांची काळजी घेण्याची मानसिकता , त्यांची चालण्याची अचाट क्षमता अश्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.
- रंजना बाजी

No comments:

Post a Comment