Tuesday 21 May 2019

अक्षय जिद्द


रत्नागिरीतील परांजपे कुटुंबात १० ऑक्टोबर १९९५ ला एक छान बाळ जन्माला आलं . त्याचं नाव "अक्षय". अचानक ६ व्या वर्षी अक्षयला ऐकू येईनासं झालं. त्यावर मात करून शिक्षण सुरू असताना १० वीला सहामाही परीक्षेदरम्यान 'विलसन्स डिसीज' या आजारानं ग्रासलं. तरीही आज जिद्दीनं अक्षयनं मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून ओळख निर्माण केली आहे.
नामवंत अभिनेते सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी त्याचे चाहते आहेत.
'विल्सन्स डिसीज', लाखात एखाद्या व्यक्तीला होणारा आजार. देशभरात त्याचे दीड ते दोन हजार रुग्ण असतील. शरीरात तांबं साठून राहतं. सर्व अवयवांवर परिणाम होऊन रूग्ण पूर्णपणे परावलंबी होतो. सांधे जखडतात. बोटं वाकडी होतात. कोणती वस्तू अधिककाळ पकडता येत नाही. जबडा जाम होतो, त्यामुळे नीट खाता येत नाही. काविळीनं या आजाराची सुरुवात होते. आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. आठवडाभर गोळ्या चुकल्यास पुन्हा अंथरुणाला खिळणं आणि महिनाभर चुकल्यास रुग्णाचा मृत्यू निश्चित.
अक्षयला मे २०११ च्या दरम्यान आजाराचं निदान झालं. त्यानंतर तो पूर्णतः अंथरुणाला खिळला. जवळपास साडेतीन वर्षे तो या आजाराशी नेटानं लढला. सोबत त्याचे आईवडील, धाकटी बहीण आणि आजीआजोबा. त्याला खाणं द्रवस्वरूपातलं, अगदी बारीक केलेलं भरवावं लागे. पहाटे ४ वाजता न चुकता गोळ्या. आईवडील हबकून गेले असता त्यांना धीर दिला, स्वतः अक्षयनेच. मुंबईतील अंबानी हॉस्पिटलच्या डॉ. अन्नू अगरवाल यांच्याकडे अक्षयचे उपचार सुरू होते. ४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अक्षय त्यातून आता सुमारे ६०% बरा झाला आहे. या आजारातून पूर्ण बरं होण्यासाठी उपचार नाहीत.
१२ वी कला शाखेत ८६.६७ टक्के त्यानं मिळवले. त्याच सुमारास फोटोग्राफी आवडू लागली. रत्नागिरीत फोटोग्राफर अभिजित बोडस यांनी त्याला बेसिक टिप्स दिल्या.
अक्षयची इच्छा लक्षात घेऊन घरच्यांनी त्याला गेल्या वर्षी एकट्याला पुण्यात राहायला परवानगी दिली. मग दिग्दर्शक लाला देशमुख यांचं मार्गदर्शन. एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश. शिकताशिकता प्रेस कॉन्फरन्स, चित्रपट प्रिमियरला जाऊन फोटो. शरीर नखशिखांत हलत असतानाही चल स्थितीतले फोटोही तो उत्तम टिपतो.निकॉन कंपनीनं त्याला साथ दिली. अभिनेता सुबोध भावेच्या 'अश्रूंची झाले फुले' नाटकाच्या रंगीत तालमीचे फोटो, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर अपलोड केलेला फोटो, स्वप्नील जोशीचं स्पेशल शूट, मेक माय ट्रिपची ऑफर, असं यश त्याला मिळतंय.
(अभिनेते सुबोध भावे यांनी अक्षयचं खास कौतुक केलं आहे. ते कसं हे पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.  https://www.facebook.com/watch/?v=474269536650794 )


-अभिजित नांदगावकर
 #नवीउमेद #रत्नागिरी #पुणे

कृतिशील चांगलेपणाचा विस्तार क्षितिजापर्यंत जावो, हीच सदिच्छा!



 नवी उमेदच्या व्यासपीठावर ज्या कामाला, ज्या व्यक्ती वा संस्थांना प्रसिद्धी मिळते; त्यांच्याबद्दल वाटणारा विश्वास. त्यात खोटेपणा नसेल, प्रचार, जाहिरातबाजी नसेल हा विश्वास. नवी उमेद स्वतःची टिमकी वाजवत नाही, वाजवणार नाही, याबद्दल विश्वास.
आणखी खूप सांगता येईल. नवी उमेदमला महाराष्ट्रातल्या कुठल्या गावाला, शहराला, प्रदेशाला बांधता येत नाही. नवी उमेद व साऱ्या महाराष्ट्राचा अधिकार आहे. हे एक असं व्यासपीठ आहे जिथे प्रांतिक भेद गळून पडतात.
नुसते प्रांतिक भेदच नाहीत. नवी उमेद वयोगट कोणता? शिक्षण गट कोणता? तिथे पुरुष असतात ती महिला? तिथल्या कामांचा उगम सत्तेत होतो की पारंपारिक वर्चस्वात?
या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे : नवी उमेद सर्वांचं आहे. ज्या कुणाला भविष्याबद्दल उमेद वाटते, कृतिशील हातभार लावावासा वाटतो, तसा हातभार लावणाऱ्यांना आपल्या परिवारात सामील करून घ्यावं असं वाटतं; त्या सगळ्यांची नवी उमेद.
आता नवी उमेद मांडत आहे : महाराष्ट्रभरच्या लोकप्रतिनिधींची संसदेतली / विधानमंडळातील कामगिरी. सुजाण नागरीक या नात्याने हेसुद्धा आपणा सर्वांना माहीत हवंच.
मराठीने हे एक दैदिप्यमान उदाहरण घालून दिलं आहे. त्याचा प्रसार देशभर झाला, तर आशेची एक नवी ज्योत देशभर निश्चित उजळेल!
यशाची कमान अशी चढती राहो आणि कृतिशील चांगलेपणाचा विस्तार क्षितिजापर्यंत जावो, हीच सदिच्छा!
- हेमंत कर्णिक, नवी मुंबई
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

साच्यापलीकडे....

''अगं, हे माध्यम वेगळं आहे. शैलीही त्यानुरूप असायला हवी.'' मेधा मॅडम सांगत होत्या. साधारण सव्वा -दीड वर्षांपूर्वी नवी उमेदसाठी वर्षाबरोबर पोस्ट संपादन करायला सुरुवात केली. त्याआधी संपर्कचे काही प्रकल्प आणि नवी उमेदसाठी लिहिलं होतं. गेल्या काही वर्षांपासून बातम्या, लेख लिहिताना, संपादन करताना त्याला अनुरूप साचा नकळत तयार झाला होता. त्याची जाणीव मेधा मॅडमनी करून दिली.
उमेदसाठी येणारी प्रत्येक पोस्ट वेगळ्या प्रकारची. सुरुवातीपासून लिहिणाऱ्या प्रतिनिधींच्या पोस्टमध्ये आजही तितकाच ताजेपणा जाणवतो. नावीन्य, सर्वसामान्यातलं असामान्यत्व शोधून काढण्याची आमच्या प्रतिनिधींची हातोटी वाखाणण्याजोगी. नवे प्रयोग करणारी, कष्टातून वर आलेली, कुठलाही बाऊ न करता संकटाला भिडणारी, गाजावाजा न करता कोणाच्या मदतीसाठी, बदल घडवण्यासाठी आपापल्या परीनं काम करणारी राज्यभरातली माणसं या पोस्टमधून सकारात्मकता जागवत असतात. ऊर्जा देत असतात. त्यामुळे या पोस्ट उत्तमप्रकारेच वाचकांसमोर आल्या पाहिजेत, ही जबाबदारी आपोआपच त्या वाचताक्षणीच जाणवते.
प्रवास पालकत्वाचा, श्रुती पानसे यांचे लेख पालक म्हणूनही उपयुक्त ठरले. अनुजा संख्ये, गायत्री पाठक, कादंबरी काळे यांच्या मालिका माझ्याही जाणिवा विस्तारणाऱ्या ठरल्या.

-सोनाली काकडे 
  #नवीउमेदतिसरावर्धापनदिन

खारीएवढे योगदान आपणालाही देता आले, हीच समाधानाची बाब

गेली ९ वर्ष मी वृत्तपत्रात काम करतो आहे. वाचनाची प्रचंड आवड. भेळ, वडापावसह आलेल्या कागदावर काय मजकूर आहे, तो कागद कुठल्या दैनिकाचा आहे, हे पाहणंही न सोडणारा मी. दीड वर्षांपूर्वी कार्यालयातील सहकाऱ्यांसह अक्षरांच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांमुळे काय बदल होत आहेत, दैनिक, नियतकालिकं या तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहेत, याबाबत चर्चा करत असताना ‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचं नाव निघालं.
उत्सुकतेपोटी लगोलग हे पेज शोधलं, थोडसं स्क्रोल केलं. या ठिकाणी अनेक उमेदकथा दिसल्या. त्याही अस्सल! सभोवतालच्या. या कथा ज्या व्यक्तींभोवती, संस्थांभोवती गुंफलेल्या होत्या, त्या होत्या, काहीतरी वेगळेपण असलेल्या, आपल्या कृतीने, उपक्रमाने समाजाला दिशा देणाऱ्या. विशेष म्हणजे या कथा वाचणारे, लिहिणारे, लाईक, कमेंट आणि शेअर करणारे हे केवळ चांदा ते बांदा पुरते मर्यादित नव्हते. ते सबंध जगभर विखुरलेले दिसले. नवी उमेद कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेतलं.
ज्या ‘संपर्क’ संस्थेद्वारे ‘नवी उमेद’ ही कल्पना पुढे आली, त्या ‘संपर्क’चे ‘केल्याने होत आहे, आधी संपर्क पाहिजे’ हे ब्रीदवाक्यचं बरंच काही सांगून गेलं.
मग आपणही काही उमेदकथा लिहीत सामाजिक बदलाचा भाग व्हायला पाहिजे, अशी इच्छा झाली. त्या आधी बरेच सहकारी नवी उमेदसाठी लिहीत होतेच. मग काय, ३ एप्रिल २०१८ रोजी पहिली उमेदकथा लिहिली. ती होती मंटो, सेक्रेड गेम्समध्ये वेधक भूमिका निभावणाऱ्या मराठमोळ्या राजश्री देशपांडेच्या जलसंधारणविषयक कामाची. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजश्रीच्या कामाचं अनेक ठिकाणी कौतुक झालं, काहींनी या कामातून प्रेरणा घेत स्वतःही श्रमदान केलं. या नंतरही अनेक कथा लिहिता आल्या, राज्यातील विशेषत्वाने मराठवाड्यातील दुष्काळ झळांवर ‘सदा आबा’ या ऊसतोड कामगाराच्या नजरेतून पाहता आलं. या सर्व कथांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून सांगता येतं की, समाजमाध्यमांचा जनमानसावर आज मोठा पगडा आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झालं, माहितीची साधनं बदलली, जग हातात आलं. या संक्रमणावस्थेतही सामाजिक भान जागवणाऱ्या अन लोकशिक्षण करणाऱ्या माध्यमांची जबाबदारी उत्तरोत्तर वाढत आहे, ती ‘नवी उमेद’ कसोशीने निभावत आहे. यात खारीएवढे योगदान आपणालाही देता आले, हीच समाधानाची बाब.


- अनंत वैद्य, बीड.
 #नवीउमेदतिसरावर्धापनदिन

एका पक्षाची अखेर... आखुडबुद्धी बहुशिंगी


शनिवारी बाजारात हणमंतराव भेटले. लोखंडी खोरं, टोपल्या, साखळ्या, कुलपं असलं जडशीळ हार्डवेअर त्यांच्या पिशवीत भरलेलं दिसलं. मी थोडासा सभ्य आणि सरळमार्गी मनुष्य असल्यानं माझी अशी कल्पना झाली की हणमंतरावांनी निवडणुकीनंतरची तयारी आत्ताच सुरू केलीय. म्हणजे, घोडेबाजार सुरू झाला की खासदारांना बांधून ठेवायला साखळ्या, खरेदी केलेल्यांच्या तोंडाना बांधायला कुलपं, खासदारांना तोलायला टोपल्या आणि नंतर सर्वात शेवटी पैसे ओढायला खोरं. पण नाही, हणमंतराव तर खुश दिसत होते. देशाचं राज्य चालवण्याचं ओझं येणार असल्याच्या काळजीही एक रेषही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.
मग, त्यांच्याऐवजी मीच चेहरा पाडून विचारलं, "काय हणमंतराव, कसली खरेदी चाललीय? घरबिर बांधताय का?" मी प्रश्नाला मुद्दाम घरगुती वळण दिलं हे चतुर वाचकांना कळलं असेलच.
"छे हो," मनोजकुमारसारखा गंभीर चेहरा करून हणमंतराव म्हणाले, "टीव्हीवर जातोय."
बाजारातल्या गर्दीच्या धक्क्यांत अक्षरांची उलटापालट झाली असावी, मला ते व्हीटी असं ऐकू आलं.
"व्हीटीला कशाला जाताय?"
"व्हीटीला नाही हो, टीव्हीवर जातोय." हणमंतराव अँकरसारख्या तारस्वरात ओरडले.
"कशाला?"
"कशाला म्हणजे? टीव्हीवर डिबेट आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा नेता म्हणून मला गेलंच पाहिजे." हणमंतराव अजूनही ओरडूनच बोलत होते. मग मीच त्यांना सावलीत घेऊन गेलो. चहा पाजला.
"पण त्यासाठी हे का घेतलंय?"
"या टोपल्या आहेत ना, त्या ठोकून त्यांचं चिलखत करायचंय. या साखळ्या शहंशाहसारख्या हाताला गुंडाळणार, काही झालं तर आम्ही सगळ्यांचे बाप आहोत."
"आणि कुलूप?"
"कुणी प्रवक्ता आगाऊपणा करायला लागला तर त्याच्या तोंडाला घालायला."
हे सगळं पटण्यासारखं होतं. खोऱ्याचा उपयोग काय करणार हे मला कळत नव्हतं. बरं, एखाद्याची बिनपाण्यानं हजामत करायची तर तिथं हे खोरं चाललं नसतं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून हणमंतरावच पुढं म्हणाले, "आणि हे जुनी प्रकरणं उकरून काढायला."
मी समजल्यासारखी मान हलवली.
"तराजूपण घ्याना सोबत, त्यांना कदाचित बॅलन्स्ड प्रवक्ता हवा असेल."
"छे छे, संतुलित लोकांचं टीव्हीवर काय काम?"
*****
वर सांगितलं तसा मी सभ्य आणि थोडासा सरळमार्गी माणूस असल्यानं टीव्हीवरचा तो डिबेट बघण्याच्या वाटेला गेलो नाही. काही दिवसांनी हणमंतरावच भेटले मंडईत. भलतेच निराश दिसत होते. कदाचित देश चालवायची जबाबदारी अंगावर पडली असावी. खांदे पाडून सायकल ढकलत होते ते.
"नमस्कार हणमंतराव, कसा झाला डिबेट? झाली का हाणामारी?"
"कसलं काय हो? तिथं कुणी येडा अँकर आणून बसवला होता चॅनलवाल्यांनी. त्याची समजूत होती की त्याच्या प्रश्नांना आम्ही उत्तरं द्यायची. हे असं काही करायचं असतं तर त्यासाठी आम्ही टीव्हीवर कशाला गेलो असतो?"
मला एकदम डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये लोखंडी पिंजऱ्यात मल्लांना कोंडून केलेली तूफानी मारामारी आठवली. आपल्या टीव्हीवाल्यांनीही हा कित्ता गिरवायला हरकत नाही. सगळे प्रवक्ते गोळा करून पिंजऱ्यात सोडायचे आणि आपण बाहेर मज्जा बघत बसायचं. फारतर एक पिंजरा बनवायचा खर्च केला की मनोरंजनाची फुल्टू गॅरंटी. सगळे पक्ष तगडा उमेदवार शोधायचा सोडून तगडा प्रवक्ता शोधू लागतील. आणि आजवर जे बुरख्याआड आहे तेच सामोरं येईल. असो.
"मग? द्यायची ना उत्तरं? तुम्ही कुणाच्या बापाला घाबरता काय?" मी हणमंतरावांना म्हणालो.
"दिली असती, पण परंपरा आडवी आली."
"कोणती परंपरा?"
"अहो, आपल्याकडं आजवर कोणत्याही पक्षानं कुणाच्या प्रश्नाला उत्तरं दिल्याचा इतिहास आहे का? नाही ना? म्हणजेच हा आपल्याकडचा अलिखित संकेत आहे. तो पायदळी तुडवून कसं चालेल?"
"हो, तेही खरंच. पण यावर मध्यममार्ग म्हणून तुम्ही खोटी उत्तरं द्यायला काही हरकत नव्हती ना?" मी सुचवलं.
"वा रे वा! आता मात्र तुम्ही लोकशाही धोक्यातच आणणारच असं दिसतंय. अहो, आम्ही खोटी उत्तरं दिली आणि मग विरुद्धपार्टीचे पत्रकार त्यातल्या चुका शोधत बसले तर विरुद्धपार्टीच्या पत्रकारांच्या चुका काढणारे आमचे पत्रकार बेकार होऊन समतोल ढासळणार नाही का?"
मी तसा सरळमार्गी मनुष्य असल्यानं मला ही राजकीय गुंतागुंत कळली नाही. तरीही मी त्यांची री ओढत म्हणालो,
"हो बरोबर आहे, त्यामुळं चौथा स्तंभ डळमळीत होऊन लोकशाही कोसळायची शक्यता आहे."
"मग? म्हणून आम्ही एक ठरवलंय-"
"काय ठरवलंय आता?"
"सगळे पक्ष हरामखोर असतात असं जाहीर करून आपला पक्ष विसर्जन करून टाकायचा!"
हणमंतराव आधीपासून सज्जन होतेच, पण या वाक्यामुळं ते अद्यापही सज्जन आहेत याची खात्री पटली.
- ज्युनिअर ब्रह्मे
#नवीउमेद

उमेदला आपला हातभार लागतो आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो

नवी उमेद पेज, जवळजवळ सुरु झाल्यापासून, मी अधून मधून वाचते. पण संपर्क आणि पर्यायाने नवी उमेद पेज साकारणाऱ्यांबरोबर आपल्यालाही काम करायची संधी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. गेल्या वर्षभरात संपर्कच्या ग्रुप बरोबर काम करताना, त्यांच्याशी संवाद साधल्यावर, त्यांचा आजूबाजूच्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिल्यावर यांनी इतके unique पेज सुरू केलं यात काही नवल नाही, असंच वाटलं.
अशा उपक्रमाशी आपण जोडले गेले आहोत आणि अप्रत्यक्षपणे का होईना, नवी उमेदला आपला हातभार लागतो आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. मेधाताई, वर्षा, आशय, लता, अनंत आणि सर्वच प्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

- मृणालिनी जोग

#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

निःस्वार्थीपणे काम करणाऱ्यांना ओळख मिळवून देणारा मंच

नवी उमेद हे नाव मी सहा महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या तोंडून ऐकलं होतं. मला फेसबुकवर याच नावाचे एक वेबपेज दिसलं. त्यानंतर मी त्यातील सर्व पोस्ट वाचायला सुरुवात केली. तेव्हा मला समजलं की, हे काय तरी वेगळं रसायन आहे. आज समाजमाध्यमांमुळे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील विविध चॅनेलमधून अनेक प्रकारची माहिती आपल्याला सहज उपलब्ध होत आहे. या माहितीपेक्षा वेगळी, समाजाला काहीतरी फायदा होईल, अशी माहिती देण्याचा प्रयत्न मला नवी उमेद पेजवर दिसला. म्हणूनच, या पेजचं नाव नवी उमेद असावं, असं मनोमन वाटू लागलं. मित्राकडून मी पेजचं काम करणाऱ्यांचा फोन नंबर घेतला. फोन केल्यानंतर मला वर्षा मॅडमनी तू सुद्धा तुझ्या स्टोरी आम्हाला पाठवू शकतोस, आमच्या बरोबर काम करू शकतोस, असं सांगितलं. त्यानंतर मी या संस्थेशी जोडला गेलो.
मला या संस्थेचं काम करण्याची पद्धत, यावरील लेखन खूप आवडतं. नवी उमेद अनेक सामाजिक विषयांना समोर आणून त्यावर चर्चा घडविण्याचं महत्त्वपूर्ण काम करते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक सामाजिक प्रश्न उजेडात आणून प्रशासनाला त्याची दखल घ्यायला लावते. तसेच समाजात निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या अनोळखी माणसांना ओळख मिळवून देते. हे काम इतर माध्यमांतून फारसं पुढे येत नाही. त्यामुळेच नवी उमेदचे खूप खूप आभार.
- रोहित आवळे, सातारा

#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

एक पाऊल नवी उमेदच्या दिशेने


गेल्या १० वर्षांपासून सातत्याने गुन्हेगारी जगताशी संबंधितच लिखाण करत होते. समाजातल्या सकारात्मक गोष्टीही लिहायला मिळाव्यात ही फार इच्छा होती. मात्र तसा मंच मिळत नव्हता. नवी उमेदशी पहिल्यापासून जोडलेले बाळासाहेब काळे माझे सिनियर मित्र. साधारण महिन्याभरापूर्वी त्यांच्याकडून नवी उमेदबाबत कळलं. नवी उमेदसोबत त्यांनीच संपर्क घडवून दिला. मला नेहमी माझ्या कामाच्या स्वरूपामुळे १०-१२ पानं लिहायची सवय. पेजची गरज छोट्या पोस्टची. पण काळे सरांनी आत्मविश्वास जागवला. सोबत संपादक- समन्वयक वर्षा मॅडमचे शब्द, ' तुम्ही लिहित्या व्हा, मग आपण बघू', खरोखरच माझ्यासाठी नवी उमेद दाखवणारे ठरले. वाचकांना माझं लिखाण आवडेल का, ही भीती वाटत होती. तीही वर्षा मॅडमनीच दूर केली.
अखेर पहिली पोस्ट प्रकाशित झाली. नवी उमेदच्या संपूर्ण टीमने त्याचं कौतुक केलं. मला टीममध्ये सामावून घेतलं.
नवी उमेदच्या टीमने आत्मविश्वास जागवला. त्यामुळे सकारात्मक लिखाणाची साखळी आता मला करता आली आहे. नवी उमेदने माझ्याही आयुष्यात नवी उमेद जागवली. धन्यवाद टीम नवी उमेद..!
-नीता सोनवणे, नागपूर
#नवीउमेदतिसरावर्धपानदिन

सकारात्मक विचारांची टीम


 जगताना प्रत्येकाला एक भूमिका घेऊन जगावं लागतं. सकारात्मक किंवा नकारात्मक. मार्ग कोणता निवडायचा हे आपलं आपणच ठरवत असतो. मी सकारात्मक पत्रकारितेचा मार्ग निवडला आहे. अनेकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने लिखाण केल्यानंतरही त्या व्यक्तीला आपण अपेक्षित असा न्याय देऊ शकलो नाही, अशी खंत होतीच. परिसरात प्रेरणादायी घटना अनेक घडतात. ती घटना दिसत असली तरी त्यामागील प्रेरणा पाहण्याची नजर वाचकाला द्यावी लागते. यात मी खूप कमी पडतो आहे असं वाटत होतं.
२००६ मध्ये माझी नांदेड येथून हिंगोली इथे पदोन्नती झाली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून मला जबाबदारी मिळाली. त्यावेळी कार्यालयातील सहकारी बाळासाहेब काळे यांचा काही काळ सहवास लाभला. आमची मैत्री झाली, अनेक विषयांवर बाळासाहेब भरभरून बोलत होते. बाळसाहेब म्हणजे संपूर्ण राज्यात दांडगा संपर्क असलेलं व्यक्तिमत्त्व. कोणत्याही जिल्ह्यात त्यांचा मित्र असायचाच. त्यावेळी ते चित्रलेखासाठी काम करीत होते. एके दिवशी त्यांनी अचानक माझ्या हातात फोन दिला आणि समोरच्या व्यक्तीशी माझा परिचय करून दिला. ते होते चित्रलेखाचे महाराव सर. त्यांनी मलाही लिखाणासाठी प्रोत्साहित केलं. मी मात्र बघू म्हणून विषय पुढे ढकलला. तरीही, बाळासाहेबांनी माझा पिच्छा सोडला नाही. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांना आपणच न्याय देऊ शकतो, ही आपली जवाबदारी आहे, हे आपलंच कर्तव्य आहे हे पटवून दिलं. त्यामुळे मी माझे गुरुवर्य मित्र प्रा. जयदेव डोळे, डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही सांगितलं, मासिक, साप्ताहिक की आणखी कुठे, लिखाणाची संधी मिळाली तर सोडू नको. मासिक लहान आहे की मोठं याला अर्थ नसतो, तू किती प्रभावी लिखाण करू शकतोस, याला महत्त्व आहे. त्यांच्या या सल्ल्याने मी लिहिता झालो. २०१० मध्ये हिंगोली येथून बुलढाणा इथे पुन्हा बदली झाली.
काही महिन्यांपूर्वी एक दिवस अचानक बाळासाहेबांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, मी तुझ्या बद्दल वर्षा मॅडमशी बोललो आहे, आणि तुला नवी उमेदच्या परिवारात सहभागी करून घेतलं आहे. बुलढाण्याची जबाबदारी तुझी. थेट निर्णय देऊन टाकला. नवी उमेदमध्ये जोरदार स्वागतही झालं आणि कामही सुरू झालं. या परिवारात आधी असं वाटलं की, सकारात्मकतेचा विचार आहे, तसा नकारात्मक विचारही असेल. मात्र असं काहीच नाही. या ठिकाणी सर्वच मंडळी सकारात्मक असून उत्कृष्ट लिखाण करणारीही आहे. सर्वांजवळ एकापेक्षा एक सकारात्मक, प्रेरणादायी स्टोरीज आहेत. या परिवारात येऊन मनस्वी समाधान वाटतं.
 
- दिनेश मुडे, बुलढाणा
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

जोडलेली माणसं टिकवून कशी ठेवायची ते नवी उमेदमुळे कळलं

नोकरीच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क येतो. दररोज नवीन लोक जोडले जातात. मात्र हीच जोडलेली माणसे टिकवून कशी ठेवावी हे मला शिकायला मिळाले नवी उमेदमुळे. नावाप्रमाणेच आम्हाला जगण्याची कला, सामाजिक भान शिकवणारी नवी उमेद. मेधाताई,लताताई आणि वर्षा मॕडम यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन नेहमी चालना देते. संवादातून सर्वच प्रश्न सुटतात. मात्र तो सुसंवाद असला पाहिजे हे लताताईंचे वाक्य. आपले संवादकौशल्य प्रभावी असले तर कोणत्याही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविता येतो. हा त्यानंतरचा अनुभव. कामानिमित्ताने राज्यभर फिरत असताना कधी मध्येच आमचा कॉल आला तर प्रेमळ उत्तर देणा-या लता ताई. सक्सेस स्टोरिज आणि त्यातून बदललेले संबंधितांचे आयुष्य, सर्वांनाच प्रेरणा देते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भेटायला येणारे सदाबाबा आणि त्यांच्या वाणीतून समोर येणारे भयानक वास्तव अंगावर शहारे आणते खरे पण त्यावर मार्ग काढता येतो हेदेखील सुचविते.
जनसंवाद साधताना अंतर्गत सुसंवाद कसा ठेवावा?, एकीचे बळ काय असते ?याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवी उमेदची टीम. वरिष्ठ, कनिष्ठ असा कोणताही भेद न करता सामंजस्याने काम करणारी आमची टीम जिथे 'इगो' ला कोणातच कोपऱ्यात स्थान नाही. प्रत्येक दिवशी मिळालेली अनुभवाची शिदोरी जगण्याचे बळ देते. प्रशांतदादांमुळे नवी उमेदशी जोडले गेले. नवी उमेदशी जोडल्याचा सार्थ अभिमान आहे. भविष्यातही याच जोमाने कार्य करून नवी उमेदच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. वर्धापन दिनाच्या याच कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा.


-चेतना चौधरी, धुळे
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

सकारात्मक विचारांची टीम


 जगताना प्रत्येकाला एक भूमिका घेऊन जगावं लागतं. सकारात्मक किंवा नकारात्मक. मार्ग कोणता निवडायचा हे आपलं आपणच ठरवत असतो. मी सकारात्मक पत्रकारितेचा मार्ग निवडला आहे. अनेकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने लिखाण केल्यानंतरही त्या व्यक्तीला आपण अपेक्षित असा न्याय देऊ शकलो नाही, अशी खंत होतीच. परिसरात प्रेरणादायी घटना अनेक घडतात. ती घटना दिसत असली तरी त्यामागील प्रेरणा पाहण्याची नजर वाचकाला द्यावी लागते. यात मी खूप कमी पडतो आहे असं वाटत होतं.
२००६ मध्ये माझी नांदेड येथून हिंगोली इथे पदोन्नती झाली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून मला जबाबदारी मिळाली. त्यावेळी कार्यालयातील सहकारी बाळासाहेब काळे यांचा काही काळ सहवास लाभला. आमची मैत्री झाली, अनेक विषयांवर बाळासाहेब भरभरून बोलत होते. बाळसाहेब म्हणजे संपूर्ण राज्यात दांडगा संपर्क असलेलं व्यक्तिमत्त्व. कोणत्याही जिल्ह्यात त्यांचा मित्र असायचाच. त्यावेळी ते चित्रलेखासाठी काम करीत होते. एके दिवशी त्यांनी अचानक माझ्या हातात फोन दिला आणि समोरच्या व्यक्तीशी माझा परिचय करून दिला. ते होते चित्रलेखाचे महाराव सर. त्यांनी मलाही लिखाणासाठी प्रोत्साहित केलं. मी मात्र बघू म्हणून विषय पुढे ढकलला. तरीही, बाळासाहेबांनी माझा पिच्छा सोडला नाही. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांना आपणच न्याय देऊ शकतो, ही आपली जवाबदारी आहे, हे आपलंच कर्तव्य आहे हे पटवून दिलं. त्यामुळे मी माझे गुरुवर्य मित्र प्रा. जयदेव डोळे, डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही सांगितलं, मासिक, साप्ताहिक की आणखी कुठे, लिखाणाची संधी मिळाली तर सोडू नको. मासिक लहान आहे की मोठं याला अर्थ नसतो, तू किती प्रभावी लिखाण करू शकतोस, याला महत्त्व आहे. त्यांच्या या सल्ल्याने मी लिहिता झालो. २०१० मध्ये हिंगोली येथून बुलढाणा इथे पुन्हा बदली झाली.
काही महिन्यांपूर्वी एक दिवस अचानक बाळासाहेबांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, मी तुझ्या बद्दल वर्षा मॅडमशी बोललो आहे, आणि तुला नवी उमेदच्या परिवारात सहभागी करून घेतलं आहे. बुलढाण्याची जबाबदारी तुझी. थेट निर्णय देऊन टाकला. नवी उमेदमध्ये जोरदार स्वागतही झालं आणि कामही सुरू झालं. या परिवारात आधी असं वाटलं की, सकारात्मकतेचा विचार आहे, तसा नकारात्मक विचारही असेल. मात्र असं काहीच नाही. या ठिकाणी सर्वच मंडळी सकारात्मक असून उत्कृष्ट लिखाण करणारीही आहे. सर्वांजवळ एकापेक्षा एक सकारात्मक, प्रेरणादायी स्टोरीज आहेत. या परिवारात येऊन मनस्वी समाधान वाटतं.
- दिनेश मुडे, बुलढाणा
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

आमच्या पक्षाचा जाहीरनामा... (आखुडबुद्धी बहुशिंगी )


काल हणमंतराव भेटले. त्यांनी आपल्या गप-रे पक्षाचा जाहीरनामा दाखवला. सगळा वाचला नाही, पण एकूणच गप-रेनं किती सूक्ष्म पातळीवर जाऊन काम केलंय हे त्यामुळं लक्षात आलं. त्यातल्या काही कलमांवर चर्चाही झाली आमची.
मी: सर्व पातळीवरील जनतेचं उत्पन्न किमान दहापट वाढावं अशी सोय केली जाईल. हे कसं साधणार?
ह: सगळ्या नोटा दहापट करू आम्ही. म्हणजे, दहा रुपयांची नोट ही शंभरची समजली जाईल, शंभरची हजारांची, आणि हजारची दहा हजारांची. यामुळं प्रत्येकाकडचा पैसा अचानक वाढून तो बाजारात येऊन मार्केट बूस्ट मिळेल.
मी: पण ज्यांना काही उत्पन्नच नाही त्यांनी किंवा ज्यांच्याजवळ पैसेच नाहीत त्यांनी काय करावं?
ह: ज्यांना पैसे कमावणं शक्य नाही यांच्यासाठी आता पैसे विकत घेण्याची सोय असेल. उदाहरणार्थ, शंभरच्या दहा नोटा कोणत्याही सरकारी कार्यालयात अकराशे रुपयांत विकत घेता येतील. त्यामुळं, कमाईचं काहीही साधन नसलेल्या लोकांना पैसे मिळवण्याची संधी मिळेल.
मी: अरे वा, आर्थिक आघाडीवर तुमच्या योजना नामी आहेत. सामाजिक जागृती व्हावी, सलोखा वाढावा यासाठी काही?
ह: आहे ना? सार्वजनिक ठिकाणी मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी लोकांकडून सामुहिक पाढेपठण केलं जाईल. यामुळं, गणिताची आवड जनतेत रूजवली जाईल.
मी: यामुळं सलोखा निर्माण होईल? की दहशत वाढेल? शिवाय, परवाच तुमचे दोन कार्यकर्ते बावीस पंचे किती यावरून मारामारीला उतरले होते. शेवटी दोघंही बरोबर आहेत असा मध्य काढला गेला.
ह: तुमचं बरोबर आहे. एकाच गणिताला अनेक उत्तरं असतात, हे तत्व सर्वांना समजायला थोडा वेळ लागेल. 'गणितता में विविधता' हे आमचं स्लोगन यासाठी जनजागृती करेल.
मी: तुमच्या पक्षात परवाच एका कवयित्रीनं प्रवेश केला असं कळलं. याचा तुमच्या पक्षाच्या लोकप्रियतेवर वाईट परिणाम होईल असं वाटत नाही?
ह: अजिबात नाही. कवयित्रीचा प्रवेश होताच दोन नवगणितवादी भामटे आमचा पक्ष सोडून पळाले हे यश तुम्ही विसरताय. शिवाय, आमच्या पक्षात कवींना आम्ही स्पेशल ड्युटी लावणार आहे.
मी: कवींना कसंकाय कामाला लावणार बुवा?
ह: आम्ही कवितातून गणिताचा प्रचार करणार आहोत. जसं, ही पाढ्यांची कविता ऐका-
दुकानातून आणले पीठमीठमैदा
सात एके सात, सात दुणे चौदा।
आणताआणता भोक पडले पिशवीस
सात त्रिक एकवीस, सात चोक अठ्ठावीस।
मी: (गडबडीनं) अरे वा, कवींना राष्ट्रकार्याला जुंपताय म्हणजे तुम्ही. आणखी काय आहे हो तुमच्या जाहीरनाम्यात?
ह: तसं बरंच काही आहे, पण जागेअभावी आम्ही तो जाहीरनामा निवडणुकीनंतर जाहीर करायचं ठरवलं आहे. सध्यातरी हेच मुख्य मुद्दे आहेत.
मी: परवा तुम्ही कुठं दिसला नाहीत हो, गावी वगैरे गेला होतात की काय?
ह: (घसा खाकरून, अभिमानानं) परवा आमच्या पक्षाचा भव्य मोर्चा कम मेळावा होता.
मी: अरे वा! म्हणजे एफसीरोडवर ट्रॅफिक जॅम झालेला तो तुमच्यामुळंच का? किती लोक होते मेळाव्याला?
ह: लोक तसे बरेच होते. म्हणजे भरपूर होते असं म्हणता येईल.
मी: अंदाजे आकडा सांगता येईल? म्हणजे अगदी जवळपास जाणारा अंदाज असला तरी चालेल…
ह: अंदाजे नाही, पण तसं म्हणायचं तर एक पूर्णांक आठ होते.
मी: (आश्चर्यानं) एक लाख ऐंशी हजार?
ह: नाही हो. एक पूर्णांक आठ नग माणूस.
मी: हे कसं जमवलंय बुवा?
ह: एकतर, एक म्हणजे मी अख्खा होतो. शिवाय माझा मुलगा. त्याचं हाफ तिकीट असतं म्हणून त्याला अर्धं मोजलं.
मी: आणि उरलेले शून्य पूर्णांक तीन?
ह: आमच्या तीन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी होऊन पोलिसयंत्रणेवर ताण पडू नये म्हणून घरी बसून मोर्च्याला नैतिक पाठिंबा दिला होता.
मी: अच्छा! मग मोर्च्यात काय झालं?
ह: काही कलाकारांनी आमच्या पक्षाला मत द्या असं जनतेला आवाहन केलंय, सदाचारी भ्रष्टांना आणि छुप्या दडपशहांना मदत न करता बावळट गणितप्रेमी पक्षाला मत द्या असा काहीसा त्याचा मसुदा होता.
मी: अरे वा! कलाकारांनी पाठिंबा दिलाय तुम्हांला? कोण आहेत?
ह: अहो, बरेचजण आहेत. मला वाटतं किमान सहाशेसातशे प्रसिद्ध लोकांनी सह्या केल्यात.
मी: सहाशेसातशे? नीट बघा, सहासातच असतील. कोणकोण आहेत हे लोक?
ह: बरेच आहेत, आपले ए के हंगल, केष्टो मुखर्जी, आंतोनी झुबीझुरेटा, आर्थर सी क्लार्क, ह्युगो शावेझ या सगळ्यांनी आमच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय.
मला यात काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, पण 'गप-रे' हे पक्षाचं नाव बघून गप्प बसलो.
- ज्युनिअर ब्रह्मे.

रोजची नवी गोष्ट हेच उमेदचं वेगळेपण

आज नवी उमेदचा तिसरा वर्धापनदिन. नवी उमेदसोबत काम करायला लागून मला तीन वर्ष झाली हे खरंच वाटत नाहीये, आजही. कारण रोजच्या कामात असणारं नवेपण. रोज ताजी पोस्ट, तीही लोकांच्या जगण्याच्या विषयावरची, वेगळी माहिती, वेगळं गाव आणि वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण माणसं या निमित्ताने स्टोरीतून भेटतात. हेच या कामाचं वेगळेपण.
२५ जिल्ह्यांतल्या, उमेदसाठी लिहिणार्‍या सर्वच प्रतिनिधींशी सतत चर्चा सुरू राहाते. तिथल्या घडामोडी कळत राहतात. आपापल्या जिल्ह्यातलं अमूक सांगायला हवं, हे लोकांना कळायला हवं, ही व्यक्ती वेगळं काम करते आहे, ते पुढं यायला हवं, असं सर्वांनाच वाटत असतं. आणि त्यातूनच नव्यानव्या कहाण्या उमेदवर येत असतात. माझ्या या सहकार्‍यांशी वरचेवर बोलत राहणं, त्यांच्याकडून काही ऐकत राहणं, हे सगळंच नवा उत्साह देणारं असतं. एखाद्या विषयावर सखोल मांडणी करणार्‍या मालिका किंवा सदरं हे नवी उमेदचं वेगळेपण. अशा मालिका सुचवणं, महाराष्ट्रभरचे लेखक मिळवून देणं आणि मिटिंगच्या काळात हिरीरीने नव्या कल्पना मांडणं, हे सगळंच टीमचा उत्साह वाढवत असतं.
खरा आनंद मिळतो तो एखादी पोस्ट जेव्हा हजारो, लाखो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सचा टप्पा पार पाडते. अगदी सुरूवातीच्या वर्षातली बार्शी इथल्या सीताफळ बागेची, नंतर बीड इथल्या दत्तप्रसाद भोजनालयाच्या अन्नदानाची, मलकापूरच्या मुलींसाठीच्या बससेवेची, रत्नागिरीच्या डॉ ढाकणे यांच्याविषयीची, बीडच्या सर्पराज्ञी प्राणी अनाथालयाची आणि नुकतीच प्रकाशित झालेली हातखंब्याची आधुनिक सावित्री यासारख्या कथांनी असे उच्चांक गाठले आणि नवी उमेद टीमला आपल्या कामाचं समाधान मिळवून दिलं. रोज ताजी कथा पाठवणारे माझे सहकारी जिल्हा प्रतिनिधी यांचाच नवी उमेदच्या यशात, वाचकप्रियतेत खरा वाटा आहे. त्यासाठी त्या सर्वांचे मनापासून आभार.
वाचकांना असंच सकस, उमेद देणारं द्यायला हवं ही जबाबदारी वाढते आहे. तिसर्‍या वाढदिवसानिमित्त तीन नव्या मालिकांची घोषणा पेजवरून केली आहेच. येत्या वर्षात, काही नव्या मालिका आणि कल्पनांसह भेटतच राहू. दररोज.
- वर्षा जोशी - आठवले, संपादक - समन्वयक, नवी उमेद
 

#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

एक घास, एक घोट


एक घास, एक घोट या नावाने काढलेल्या मदत फेरीत लोक भरभरून मदतीची रक्कम टाकत होते. ही मदत गोळा केली जात होती. वन्यप्राणी आणि पशु पक्षांच्या अन्न पाण्यासाठी. बीड जिल्ह्यात कडा या गावातील युवकांनी हा उपक्रम राबविला.
नितीन अळकुटे या तरूणाने सुरू केलेला हा उपक्रम. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा या गावात हा युवक दरवर्षी उन्हाळ्यात झाडावर पाणी, धान्याच्या कुंड्या लटकवत असायचा. यावेळी उन्हाळ्याची दाहकता तीव्र आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची गरज त्याला जाणवली. 
त्याने ती आपल्या मित्रांना बोलूनही दाखवली. प्रवीण बहिर, दीपक पवळ, संतोष थोरवे, गोवर्धन पवळ, अक्षय दळवी, गणेश पवळ, गणेश भुजबळ, घोडके, मिश्रा, अनिल अष्टेकर आणि मुकेश गांधी हे त्याचे मित्र एकत्र आले. सर्वांनी एकत्र येत प्रत्यक्ष श्रमदान करून गावालगत वेगवेगळ्या दिशांना पाच पाणवठे तयार केले. पाणवठे तयार झाले. पण, पाणी टंचाई होतीच. शेवटी टँकरचे पाणी विकत घ्यावं लागलं. यासाठीच त्यांनी गावात एक घास, एक घोट मदत फेरी काढली. फेरीत लोकांनी नऊ हजाराची मदत केली. त्यातून आता या पाणवठ्यात पाण्याची सोय झाली आहे. विविध पक्षाबरोबर ससे, हरीण, कोल्हे यासारख्या प्राण्यांची तहान आता भागते आहे.
नितीन अळकुटे यांचा संपर्क क्र. - ९६७३८०८०२६

- राजेश राऊत, बीड

दुष्काळावर मात, सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात उभारली वॉटर बँक... सदा आबाची ऐका वाणी (भाग क्रमांक १३)

दुष्काळ जसां माणसाला पोळवतो, तसा धडाबी देतो. त्यातून माणूस सुधरतो. आता एक चांगली गोष्ट सांगतो. धडगाव (जि.नंदूरबार) हा तालुका अति दुर्गम अन‌् सातपुड्याचा डोंगर दऱ्यातला. इथ अनेक नद्याचां उगम व्हतो. पावसाचं पाणी वाहून जातं. गेल्या पाच वर्षापासून पर्जन्यमान कमी झालं. त्यात जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ.
या भागातील वाहून जाणारे पाणी साचले तर ते उन्हाळ्यात कामास येईल, ही आयड्या वसंत पाडवी या काकरदा इथल्या शेतकऱ्याला सुचली. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या शेताशेजारील आठ ते दहा शेतकऱ्यास्नी एकत्र केलं. त्यांनी शासनाच्या सामूहिक शेत तळे योजनेचा लाभ घेतला. मात्र, या अनुदानात पाहिजे त्या आकाराचे तळे हुत नव्हतं. मंग काय या गड्यांनी पदरचे पैसे टाकले आण‌् ४० गुंठ्यांत शेत तळे बनवले. कृषी अधिकारी आर.एम.पाडवी यांनीबी साथ दिली. त्यात पावसाळ्यात हजारो लिटर पाणी साचले. त्यात मत्स्य व्यवसायबी सुरू केला. यातून खर्च निघून ४० हजार रुपये नफाबी निघला. इशेष म्हंजे हे पाणी वापरण्याची बी आचार संहिता शेतकऱ्यांनी केलीयं.
याला शेतकरी वॉटर बँक म्हणत्यात. काकरदा येथील एका शेतकऱ्याने वाईस पुढाकार घेतला आन दुष्काळावर मात करण शक्य झालं. या भव्य वॉटर बँकेतून अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत हाये. हे पाणीबी ठिबक, स्प्रिंकलर, ड्रीपने वाचवून दिल जातयं. प्रत्येक शेतकऱ्याला एका दिवसा आड २० मिनिट पाणी मिळतं. या पाण्यातून सीताफळ, आंबा, आवळा, काजू, भाजीपाला ही पिके ते घेतात. पाणीबचतीतून उन्नती साधत शेतकऱ्यांनी ‘जलही जीवन है’ ह्यो संदेश दिलायं.
धडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील वाॅटर बँक आता सरकारने दुष्काळग्रस्त भागात राबवावी हीच ह्या सदाआबाची इच्छा... 

- रूपेश जाधव, नंदूरबार

एमबीए शिक्षण घेतलं शेतमालविक्रीच्या कामी आलं


दिनेश चव्हाण. शिक्षण बी एस्सी झुओलॉजी आणि एमबीए इन मार्केटिंग. पुण्यात पाच वर्ष फार्मा क्षेत्रात नोकरी. सध्या मुक्काम पोस्ट दापोली. दापोलीच्या भाजी मंडईत भाजी विक्री.

दिनेश यांचं बालपण आजीसोबत दापोलीत गेलं. तेव्हाच शेतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे शिक्षण पुण्यात झालं तरी नोकरी न करता गावाला जायचं याची खूणगाठ बांधली गेली होती. साधारण चार वर्षांपूर्वी, वर्षभरासाठी अर्थार्जनाची तरतूद त्यांनी केली. नोकरी सोडली आणि दापोलीत आले. भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर कलिंगडाचं पीक घेतलं. खर्च आला ६० हजार रुपये. उत्पन्न मिळालं ५ हजार रुपये. सोबत भाजी विक्री केली. पहिल्या वर्षी १५ हजार रुपये नफा.  पहिलं वर्ष अर्थार्जनाच्या दृष्टीनं फारसं नफ्याचं ठरलं नाही तरी काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातली एक म्हणजे शेतकरी मेहनतीनं पीक तर घेतो पण योग्य बाजारपेठ मिळवण्यात तो मागे पडतो. दिनेश यांनी याबाबत आपल्या शिक्षणाचा, मार्केटिंगमधल्या अनुभवाचा उपयोग करायचा ठरवलं. विषमुक्त शेतीचं महत्त्व लक्षात घेऊन दापोलीच्या आसपासच्या अशा शेतकऱ्यांना त्यांनी शोधलं. तिसऱ्या वर्षी नफा १ लाख ३० हजार रुपयांवर पोहोचला.
    सध्या पाच शेतकऱ्यांचा शेतमाल ते दापोली बाजारात विकतात. घरपोच सेवाही पुरवतात. शेतमाल विकण्यासोबतच दिनेश शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन कणगरे, कडधान्ये, हळद, आलं, भोपळा अशी विविध पिकं घेतात.  शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना योग्य भाव मिळवून देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. जे करतोय त्यात आनंद असल्याचं ते सांगतात. कोकणातला तरुण पुन्हा शेतीकडे वळत असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. ' शेतीशिवाय पर्याय नाही , शेती विकू नका' असा सल्ला ते आपल्या शेतकरी मित्रांना देतात.
दिनेश चव्हाण-७३७८८३६०१५

- संतोष बोबडे, रत्नागिरी

गोष्ट साधनाबेनच्या हिमतीची


नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातलं लोणखेडा. इथं राहणारे सी आर उर्फ छोटूलाल रामदास पाटील. सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातले सेवानिवृत्त कुलसचिव. पाटीलना यांना गेल्या वर्षभरापासून यकृताचा त्रास होत होता. शहादा, नाशिक इथं प्राथमिक उपचार झाले. काहीतरी गंभीर जाणवत होतं. मुंबईत तपासणी झाली. पाटील यांचा यकृताचा काही भाग आकुंचन पावला होता. त्यामुळे त्रास होत असल्याचं निष्पन्न झालं. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. पत्नी साधनाबेन, मुलगा रामेश्वर, विवाहित मुलगी किंजल सगळेच त्यांना यकृत द्यायला तयार होते. चेन्नईतले डॉ मोहम्मद रेला. यकृत प्रत्यारोपणासाठी त्यांचं रेला इन्स्टिट्यूट मेडिकल सेंटर प्रसिद्ध. आतापर्यंत पाच हजार रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. त्यांच्याचकडेच शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. 
साधनाबेन, रामेश्वर, किंजल सर्वांची तपासणी झाली. साधनाबेनचं यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य होतं. साधनाबेन यांचं पतीवर निरतिशय प्रेम. क्षणाचाही विलंब न लावता पतीला यकृत देण्यासाठी त्या तयार झाल्या. पुढील तपासण्या, कायदेशीर प्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रिया झाली. पाटील यांच्या शरीरातलं यकृत पूर्णपणे काढून टाकण्यात आलं. साधनाबेन यांच्या यकृताचा ६५ टक्के भाग कापण्यात आला. पाटील यांच्या शरीरात त्याचं रोपण करण्यात आलं. दोघांचं यकृत १०० टक्के पूर्ण झालं. शस्त्रक्रिया होऊन आता दोन महिने झाले आहेत. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे आणि आता दोघेही पूर्वीसारखीच कामं करत आहेत. पतीच्या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी साधनाबेन यांनी दाखवलेल्या हिमतीचं परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. 

-हिरालाल रोकडे, नंदुरबार

आमचा नवा पक्ष... (आखुडबुद्धी बहुशिंगी)

"राजकारणाचं गणित बहुसंख्य लोकांना समजत नाही कारण तो निव्वळ आकड्यांचा खेळ असतो."
- तिम-अल-बख्तून (साडेबाराव्या शतकातला प्रसिद्ध अरब तत्त्ववेत्ता)
कुठंतरी हे वाक्य वाचलं आणि मग अनेक लोक राजकारणापासून दूर का पळतात, हे कळलं. आधी, आपल्या इथं लोकांना साधं गणित समजायची मारामार, त्यात हे राजकारणाचं क्लिष्ट गणित कसं समजणार बुवा? परवाच, मी आमच्या पानवाल्याला x= x+1 हे बाळबोध समीकरण समजावून सांगत होतो. सुमारे अर्धा तास शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला, "म्हणजे, एक एक्स गेली की दुसरी मिळते. बरोबर ना साहेब?" गणितीय जगाकडं खेचून नेलं तरी, काहीजण भौतिक जग सोडायला तयार नसतात. माझ्या चेहऱ्यावर राग दिसताच भेदरून त्यानं माझ्याकडून सिगारेटचे पैसे घेतले नाहीत.
या सगळ्याला पर्याय काय, असा गहन प्रश्न पडला होता. नुकतंच, हे गणित सुटलं. आमचे मित्र हणमंत खंचनाळे यांनी एक राष्ट्रीय पक्ष स्थापन केलाय. पक्षाचं नाव आहे "गणित पक्ष-रेनेदेकार्तवादी", अर्थात 'गप-रे'!
याबद्दल अधिक माहिती मिळवायला हणमंतरावांशी (दोन हात अंतर ठेवून) गप्पा मारल्या-
मी: तर हणमंतराव, तुमच्या पक्षाची ध्येयधोरणं काय असतील?
ह: तशी सोपी असतील. आमचं पहिलं ध्येय म्हणजे आकड्यांचा खेळ करून सत्ता मिळवायची. अर्थात, आमच्यासाठी हा अगदीच पोरखेळ आहे. कारण, आमचे ∞+1 कार्यकर्ते सगळ्या मतदानकेंद्रांवर सकाळी मत द्यायला जातील. संध्याकाळचे पाच वाजले तर, आमचं मत देऊन संपणार नाही. आणि अशी ∞ मतदानकेंद्रं असतील तर...
मी: हो हो, तसं सोप्पं काम आहे हे.
ह: आणि एकदा का आमचा पक्ष सत्तेत आला की, मग आम्ही आमच्या गणिताचा प्रसार देशभर आणि पर्यायानं जगभर करू. बाहीवर दुहेरी भागाकाराचं चिन्ह असलेला युनिफॉर्म ल्यालेले आमच्या एमएम संघटनेचे....
मी: ही एमएम काय भानगड आहे?
ह: एमएम म्हणजे मॅथ्स मॅनिॲक. गणिताची आवड असलेल्या लोकांची छुपी संघटना आहे आमची. तर, आमचे कार्यकर्ते चौकाचौकात उभे असतील. केवळ सत्तावीसचा पाढा येत नाही, या संशयावरून हजारोंची धरपकड होईल. गणितात ढ असलेल्या लोकांना शून्य आकडा असलेला बॅज वापरावा लागेल. तीन महिन्यांच्या बाळापासून ते नव्वद वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी, रोज किमान वीस गणितं सोडवून देशोन्नतीच्या कार्यात आपला वाटा उचलावा असं आवाहन....
मी: आवाहन?
ह: म्हणजेच थोडक्यात सक्ती हो. इतकंच नव्हे, तर सर्व नागरिकांची वर्षातून एकदा गणिताची परीक्षा घेतली जाईल. नापास विद्यार्थ्यांना आम्ही सायबेरीयाला पाठवू.
मी: अहो, पण सायबेरीया तर रशियात आहे ना?
ह: (गडबडून) अं अं, आम्ही त्यांना राजस्थानच्या वाळवंटात पाठवू.
मी: पण या सगळ्याचा उपयोग काय होणार?
ह: काय होणार म्हणजे? अख्खी गणितज्ञ पिढी तयार होईल. भाजीबाजारात गेलात तर, सतरा रुपये किलोनं वांगी सव्वातीनशे ग्रॅम, तेवीस रुपये किलोनं भेंडी सव्वा किलो आणि नऊ रुपयांची कोथंबिरीची पेंडी हा हिशेब कॅल्क्युलेटरशिवाय अर्ध्या मिनिटांत करतील लोक. '१३ मेरा ७' सारखे किरकोळ विनोद न करता '70-80-82' असे मोठे....
मी: सेवंटीएटीएटीटू हासुद्धा पीजेच आहे ना पण?
ह: (चिडून) पण किमान आकडा मोठा आहे, हे तरी मान्य कराल ना? जरा मोठी स्वप्नं बघायला शिका. माझं एक स्वप्न आहे....
(इथं मला उगाच मार्टीन ल्यूथर किंगची आठवण आली.)
"होय, माझं एक स्वप्न आहे. त्या स्वप्नात लोक बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास करतायत. आमच्या देशात लोक नावानं ओळखले न जाता, केवळ एक आकडा म्हणून ओळखले जातायल. लोकांत विषमता नाही, आहेत ते फक्त सम आणि विषम आकडे…
मी: पुरे पुरे. पण हे सगळं करायला कार्यकर्ते आणणार तरी कुठून? असं ऐकलंय की, हल्ली सतरंजी उचलायलाही लोक मिळत नाहीयेत.
ह: आमच्या पक्षात प्रवेश घेणं अतिशय सोप्पं असेल. १२४९६ पर्यंतच्या सगळ्या अंकांपर्यंतचं चौथं मूळ पाठ असलेला कोणीही गप-रेमध्ये येऊ शकतो.
मी: पण कसा?
ह: आमच्या पक्षाच्या रजिस्ट्रेशन नंबरवर कॉल करून.
मी: इतकं सोप्पं?
ह: हो. तुम्ही कॉल केलात की, एक ओटीपी येतो. तो ओटीपी तुम्हांला मिळाल्यावर सहा सेकंदात सांगून रजिस्टर करावा लागतो. सहा सेकंदानंतर तो एक्सपायर होतो.
मी: ओटीपी किती वेळात येतो?
ह: येत्या बत्तीस वर्षात कधीही!
- ज्युनिअर ब्रह्मे

गोष्ट आशाताईंच्या शाळेची

 जिल्हा धुळे. तालुका शिरपूर. इथलं थाळनेर गाव. या छोट्याशा गावात गरीब कुटुंबात जन्मलेल्या आशा पाटील. शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. लग्न, गरिबीचाच संसार सुरू होता. अल्पशा आजाराने पतीचं निधन झालं. तरीही, स्वतःचं दुःख बाजूला सारत त्यांनी समाजातील दुर्लक्षित माणसांसाठी काम सुरू केलं. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी रुग्णांना औषधोपचारासाठी शासकीय योजनांमधून मदत मिळवून देत असतानाच मूकबधीर विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क झाला. आणि आशाताईंचं ममत्व जागं झालं. आईविना गेलेल्या बालपणामुळे जाणवलेली पोकळी भरून काढता येईल, अपुरं राहून गेलेलं शिक्षिकेचं स्वप्न या मुलांमधून पूर्ण करता येईल, असं वाटलं. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, हा विचार सुरू झाला. 
प्रथम लगतच्या आदिवासी पाड्यात अशा मुलांचं सर्वेक्षण केलं. मुळातच गरिबी, त्यात अशिक्षितपणा, अंधश्रद्धा. मूकबधीर बालक जन्माला येणं, म्हणजे मोठा अपराध वाटायचा. अशा पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी तयार करणं, हे मोठं आव्हानच होतं. स्वतःची साठवलेली थोडीफार मिळकत आणि देणगीदारांचं सहकार्य या बळावर आशा यांनी 2005 मध्ये गावातच भाड्याच्या खोलीत ‘सावित्रीबाई फुले निवासी मूकबधीर विद्यालय’ सुरू केलं. विनाअनुदानित असल्याने पूर्णतः लोकांच्या मदतीवर सुरू असलेलं हे विद्यालय. मुलाचं दोन्ही वेळचं जेवण, शैक्षणिक, कपड्यांचा खर्च यासह अन्य गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न उभा राहायचा. सकाळीच घरातून बाहेर पडून कोणीतरी मुलांना मदत करेल, याचा शोध सुरू करायचा. गावात कोणाचा वाढदिवस, पुण्यस्मरण या निमित्ताने मुलांना जेवण मिळेल ही आस आशाताईंना वाटत राहायची. सणासुदीला अवास्तव खर्च करण्याऐवजी आमच्या मुलांसाठी दान, प्रासंगिक दान द्या अशी विनंती त्या लोकांना करायच्या.
आशाताईंच्या अथक प्रयत्नांमुळे आज बारा वर्षात विद्यालयातील एकही विद्यार्थी कधी उपाशी राहिला नाही. या मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडेही दिले. सातवीपर्यंतच्या या शाळेतून आजपर्यंत दीड हजार मुलं शिकून बाहेर पडली आहेत. आज याच शाळेत शिकून स्वावलंबी झालेली मुलं आशाताईंसाठी मदतीचा हात पुढं करत आहेत. शिक्षणाबरोबरच रोजगारकौशल्य मिळाल्यामुळे ही मुलं चांगली नोकरी मिळवून स्थिरस्थावर झाली आहेत.
आशाताई सांगतात, “मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं तर, त्यांच्या पालकांना हे पटवून देणं अवघड असतं. गरीब मागासवर्गीय वस्तीत जन्माला आलेल्या या मुलांना शिक्षण मिळत आहे याचा मला आनंद आहे. विनाअनुदानित असल्यामुळे लोकसहभागाने काम सुरू आहे. असंख्य अडचणी आल्या. तरीही, काम अखंडपणे सुरूच आहे.”
- चेतना चौधरी, धुळे

आधुनिक सावित्री


प्रथमेश आणि सोनाली डांगे हे हातखंबा, डांगेवाडीत राहतात. एकाच वाडीत असल्याने पूर्वीपासून एकमेकांचा परिचय होता. दोघं खूप चांगले मित्र. सोनालीला नर्सिंग प्रवेशासाठी पैशाची गरज होती. सोनालीने आपली समस्या घरच्यांबरोबर प्रथमेशलाही सांगितली. सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. फी भरणं अशक्यच होतं. म्हणून प्रथमेशने आपले दागिने विकून तिची फी भरली. इतकेच नव्हे, तो दर महिन्याला तिला खर्चासाठीही पैसे देत होता. आपलं शिक्षण केवळ पैसे नसल्यामुळे अडलं होतं, त्यावेळी प्रथमेशच्या मदतीनेच आपण शिक्षण पूर्ण करू शकलो, ही भावना सोनालीच्या मनात सतत असायचीच.
दरम्यान, प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता. तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे.
कॅन्सरबाबत आजही अनेक समज-गैरसमज आहेत. खरंतर, कॅन्सरग्रस्त रूग्णांना भक्कम पाठिंबा आणि आधाराची गरज असते. प्रथमेशच्या घरच्यांनी त्याला साथ दिली दि्ली. आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी सोनालीने केली. त्यामुळेच आज प्रथमेश चांगल्यापैकी स्थिर झाला आहे.
“प्रथमेशवर उपचार सुरू होते, तेव्हा त्याच्या यातना मला चांगल्या प्रकारे कळत होत्या. मी केवळ मैत्रीण म्हणून नव्हे, तर एक नर्स असल्यानेही त्या वेदना जाणवत होत्या. अशा वेळी माणसाला वैद्यकीय उपचाराबरोबर प्रेमाचीही गरज असते. आज ना उद्या प्रथमेश पूर्णपणे बरा होईल याची मला खात्री आहे. त्याची जगण्याची उमेद आता दुपटीने वाढली आहे. सासू-सासरे मार्गदर्शक म्हणून उभे राहिले आहेत," सोनाली सांगते.
गावात आणि हातखंबा पंचक्रोशीत सोनालीची ओळख आधुनिक सावित्री अशी झाली आहे. पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणणारी ती पुराणकथेतली सावित्री सोनालीच्या रूपाने आजच्या काळात अवतरली आहे जणू. प्रथमेश-सोनाली. परस्परांवर निस्सीम प्रेम करणारं जोडपं. त्यांचं उदाहरण सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं डांगेवाडीतील त्यांचे नातेवाईक सांगतात.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी
 

रामराम मंडळीहो, मी तुमचा सदाआबा.. सदा आबाची ऐका वाणी (भाग क्रमांक १२)



आता पतोर तुमाला दुष्काळाच्या कथा सांगितल्या, आता मी एक मुलाखत घेणारै. ते पत्रकार लोक घेत न्हाईत का तशी. तर सिध्दार्थ पाटील यांना आपण बोलणार हाईत. ते आधुनिक शेतकरी, शिक्षण संस्था चालक अन‌् बॅडमिंटनचे खेळाडू हाईत.
    दुष्काळाची दशा कशी झाली अन‌् लोकाह्यचे कसे हाल होत्यात, त्यावर काय उपाय हाय का? हे आम्ही त्यास्नी ईचारलं.  ते बोलले, ‘यंदा हिवाळ्यापासूनच दुष्काळाची झळ जाणवतेय. सुरुवातीचा जो पाऊस होता, तो फारसा झाला नाही. मराठवाड्यातली शेती परतीच्या पावसावर फार अवलंबून असते, तो पाऊस तर यंदा झालाच नाही. याचा पिकावर फार वाईट परिणाम झाला. विशेषतः कपाशीचे, तुरीचे फार वाईट हाल झाले. तिसऱ्यांदा वेचणीला येणारा कापूस यंदा पहिल्या वेचणीतच संपला. दुसरे उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांकडे राहिले नाही, अशी परिस्थिती या दुष्काळाने निर्माण केली आहे.
शिवाय शेतीसाठी जमिनी कमी राहिल्यात. एका गावामधले बहुतेक शेतकरी ५ एकरापेक्षा कमी जमीन असलेले अल्पभूधारक. पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. पाण्याचे स्रोत दुष्काळामुळे आटले. वारंवार पिक घेण्याच्या पध्दतीमुळे किंवा ज्या पिकांना जास्त पाणी लागतं, अशा पिकांना प्राधान्य दिल्यामुळे जमिनीखालच्या पाण्याची पातळी फार खाली गेली. शेतकऱ्यांचे हाल फार वाईट आहेत. मागच्या पंधरा वर्षांमध्ये कधी गावाकडचे लोक हिवाळ्यात मजुरीसाठी बाहेर पडल्याचं दिसले नव्हते. उन्हाळ्यात रोहयोची कामं सुरू व्हायची आणि त्यासाठी लोक बाहेर पडत असत पण आज हिवाळ्यातच लोक कामाच्या शोधात दारोदार फिरत आहेत.
औरंगाबादेतल्या काही कंपन्यांत या लोकांसाठी आम्ही काही जागा निर्माण केल्या आहेत पण ती व्यवस्था पुरेशी नाही. तीनशे रूपये साडेतीनशे रुपये रोजाने काम करण्यासाठी हे लोक औरंगाबाद एमआयडीसी भागात आश्रयाला आलेतं. या लोकांमध्ये काही बागायतदार शेतकरी तर उरलेले सर्व कोरडवाहू शेतकरी आहेत.
मराठवाड्यात मुळात पीक पध्दतीमध्ये आपण बदल करू शकलो किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या तोंडांची संख्या कमी करू शकलो तर शेतीमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न घेणे शक्य आहे. पण त्याच्यासाठी पाण्याचे नियोजन फार आवश्यक आहे. लोकांची स्मरणशक्ती फार वाईट आहे. पाण्याच्या अभावी जे हाल होतात, त्यांचा विसर त्यांना पाणी उपलब्ध असताना होतो. पावसानंतर २४ तास तलावावरच्या विहिरीवरच्या मोटारी सुरू असतात. आपल्याला आलेल्या अनुभवातून लोकांनी शिकले पाहिजे, आणि अनुभवांवर आधारित शेतीपद्धत विकसित केली पाहिजे. असं झालं तर मराठवाड्यासारख्या भागात शेती हा व्यवसाय म्हणून फार उत्तमरित्या नसला तर कुटुंब चालेल अशा पद्धतीने करता येईल.
शिवाय शिक्षणक्षेत्रात किती भीषण परिस्थिती आहे याची कल्पना मोठ्या शहरांत राहणाऱ्यांना करता येणार नाही. इथल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलांना न शिकता डिग्री मिळते. या गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये चालतात असे मी बिलकूल म्हणणार नाही, पण बऱ्याच छोट्या गावांमध्ये शिक्षणाचे असेच हाल आहेत. म्हणायला डिग्री आहे, पण प्रत्यक्षात शिक्षणच न घेतल्याने त्या डिग्रीचा कोणताही उपयोग होत नाही. नोकरी मिळत नाही.
आता लोक विचारतात दुष्काळावर मात कशी करता येईल, शेतकऱ्यांचे जीवन कसे सुधारता येईल, या सगळ्या लोकांना मी एकच सांगतो, “चांगल्या पध्दतीची शिक्षणपध्दती अस्तित्वात आली पाहिजे. या मुलांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा एकमेव उपाय हा आहे. पुढच्या पन्नास वर्षांत मराठवाड्याचं वाळवंट होईल म्हणतात, मग शेती हे या मुलांचं भविष्य असेल असं कसं म्हणायचं. एका एकरात या मुलांची पिढी कशी टिकणार, भविष्यात या पध्दतीत बदल झाला नाही तर उद्या शेतकरी आत्महत्यांबरोबरच नोकरी न मिळालेली शेतकऱ्यांची मुले जीव देतील अशी भीती वाटते. त्यांना वाचवलं पाहिजे. त्यांना चांगले शिक्षण देऊन शहाणे केले पाहिजे. याची सुरूवात शाळेपासून झाली पाहिजे.” llभाग12ll
(सिध्दार्थ पाटील हे स्वतः शेतकरी आहेत, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कन्नड इथे कॉलेज चालवतात, त्याचप्रमाणे वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.)
- भक्ती चपळगांवकर

धुळ्यातल्या रँचोंसाठी..


धुळ्यातल्या ३० महाविद्यालयीन तरुणांनी गेल्या काही दिवसात १६ नवनवीन उद्योग निर्मितीची मॉडेल तयार केली. त्यातल्या ४ उद्योगांसाठी १० लाखांपासू २५ लाखांपर्यंतचं भांडवल उपलब्ध होणार आहे. यामागे प्रयत्न आहेत हर्षल विभांडिक यांचे.
देशातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये नवं कल्पनांचे भांडार असलेले अनेक रॅंचो आहेत. याच रँचोच्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देत त्या प्रत्यक्ष साकारण्यासाठी सामर्थ्य देण्याचे काम हर्षल विभांडिक करत आहेत.
मूळचे धुळ्याचेच असलेले हर्षल अमेरिकेतल्या एका इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत सहभागीदार. ते स्वतः अत्यंत गरिबीतून वर आलेले. अत्यंत जिद्दीनं, मेहनतीनं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. साधारण १२ वर्ष अमेरिकेत काम करून २०१५ मध्ये ते धुळ्यात परतले ते धुळ्यासाठी काहीतरी करण्याची आस बाळगूनच. 


जिल्ह्यातील ११०३ शाळा त्यांनी डिजिटल केल्या आहेत. त्यासाठी गावागावात प्रेरणासभा. शाळा डिजिटल करताना लोकसहभागाला प्राधान्य. जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्यावर त्यांनी याच शाळा सौर शाळा करण्याचं काम हाती घेतलं. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना , धुळ्यातील तरुण पुणे, मुंबई अथवा विदेशात रोजगाराच्या शोधात भटकंती करत असल्याचं लक्षात आलं. त्यातून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगार मिळावा, उद्योग उभा करण्यासाठी त्यांना भांडवल मिळावं यासाठी काही करण्याची गरज हर्षल यांना वाटू लागली. सध्या जिल्ह्यातील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या नवकल्पना जाणून घेत आहेत. त्यांचा अभ्यास करून योग्य कल्पनांना भांडवल उभारणीसाठी मदत करत आहेत.
सकाळी सामाजिक कामं आणि रात्री कंपनीचं काम असा त्यांचा दिनक्रम आहे.

- कावेरी परदेशी, धुळे

स्वच्छतेची सुरूवात, स्वत:पासून

नागपूरमधल्या रामदास पेठ इथल्या वंदना मुजुमदार. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना. शहरात स्वच्छतेसाठी काहीतरी करण्याची निकड वाटत होती. वंदना यांच्या भगिनी कल्पना केंकरे भोपाळमध्ये राहायला. त्यांनी तिथे आय क्लीन भोपाळ गट सुरू करून शहरातल्या विविध ठिकाणांची साफसफाई सुरू केली होती. वंदना यांनी बहिणीपासून प्रेरणा घेतली. सोबत चार -पाच महिला. त्यातून साधारण चार वर्षांपूर्वी आकाराला आला आय क्लीन नागपूर गट. त्यांचं काम पाहून एकेक जण स्वयंप्रेरणेनं त्यात सहभागी होऊ लागला. 
गेल्या चार वर्षांपासून शाळा, महाविद्यालयं, बस स्टॉप्स, रेल्वे स्थानक, सार्वजनिक शौचालयं, अशा विविध ठिकाणी गटानं काम करायला सुरुवात केली. भिंती स्वच्छ केल्या. पण पुन्हा त्या अस्वच्छ झाल्या तर हा प्रश्न होताच. मग त्या पांढऱ्या रंगानं रंगवल्या. वारली चित्रकला महाराष्ट्राचं भूषण. ती या भिंतींवर साकारण्यात आली. अशा १५० हून अधिक जागांचं सुशोभीकरण गटानं केलं आहे. आता १४० ते १५० जण या गटात आहेत. ३० ते ४० जण नियमित काम करणारे. वयोगट सात वर्षांपासून ७५ वर्षांपर्यंत. आपली रोजची कामं, शाळा-कॉलेज सांभाळून दर रविवारी हा गट नागपूरमध्ये कुठे ना कुठे काम करताना दिसतो. काम करताना लहान-मोठा भेद नसतो. सगळे जण एका पातळीवर येऊन काम करतात. ज्या कोणाला काम करायची इच्छा असेल त्या सर्वांसाठी गट खुला आहे.
-विजय भोईर, नागपूर

लाईट…कॅमेरा … अॅक्शन!


मला स्वत:ला नाटकांची आवड असल्याने जि.प. शाळेत नोकरी करताना हा नाट्यकलेचा आनंद आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळायला हवा असे वाटायचे. त्यामुळे १९९२ सालापासून कल्याणच्या जि.प. शाळा वाहोलीपासून मी बालनाट्यांचं लेखन आणि दिग्दर्शन सुरू केलं. २००६ साली पिसवलीच्या जि.प. शाळेत रूजू झालो. इथंही झाडांना आपले मित्र मानणारे ‘आमचा मित्र’, डोंबारी समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची गोष्ट सांगणारे ‘बिऱ्हाड’ ही नाटके विशेष गाजली. ठाण्याचे गडकरी रंगायतन, दादरचे शिवाजी नाट्य मंदिर, तसेच माटुंगा, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई इथल्या नामवंत रंगमंदिरामध्ये गेली १२ वर्षे पिसवलीच्या बालकलाकारांना घेऊन मी वेगवेगळी नाटके सादर करतो आहे.
आम्हांला अनेक पुरस्कारही मिळत होते, मात्र नंतर माझ्या मनात आले की आपली जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले टीव्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर का नाही दिसू शकत? त्यांच्यात गुणवत्ता तर आहेच, पण त्यांना तशी संधी कोण देणार? ही संधी कोणाकडून मिळेल याची वाट न पाहता आपणच ती संधी निर्माण केली पाहिजे, हे जाणविलं. ऑडिओ- व्हिज्युअल मीडियात काम करायचं तर आधी त्याचं प्राथमिक ज्ञान हवं म्हणून, मी मुंबईत कुर्ला येथे एका खाजगी संस्थेत फिल्म मेकिंगचा सहा महिन्यांचा पार्टटाईम कोर्स केला.
हा कोर्स झाल्यानंतर मला आत्मविश्वास आला की, आपण लघुपट निर्मिती करू शकतो. इच्छा तर खूप दांडगी होती, पण लघुपट बनविणं मोठ्या खर्चाचे होतं. माझ्या स्वकमाईतील दीड ते दोन लाख रुपये मी या लघुपटासाठी खर्च करण्यास तयार झालो, शिवाय काही सहकारी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनीही आर्थिक मदतीची तयारी दाखविली. मग मुद्दा आला कथेचा- त्यावेळी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड या विषयावर सरकारतर्फे बरीच जनजागृती होत होती. तोच विषय मध्यवर्ती धरून लघुपट निर्मिती करायचे मी निश्चित केले, मी त्याची प्राथमिक पटकथा लिहून शाळेतील विद्यार्थ्यांना परिपाठादरम्यान ऐकविली. मुलं कथेवर जाम खूश होती.
शाळेला प्रोत्साहन म्हणून सधन ग्रामस्थांनी सुमारे दीड- दोन लाखांची एकत्रित मदत द्यायचं ठरवलं आणि मग आम्ही वेगाने कामाला लागलो. या लघुपटात पिसवलीचे विद्यार्थी आणि शिक्षकही काम करणार होते. कॅमेरापर्सन गावात आले, चित्रीकरणासाठी लाईट आणि ट्रॉली फिरू लागली आणि संपूर्ण पिसवली आमच्या पहिल्या ‘धुळवड’ लघुपटासाठी उत्साहाने कामाला लागले. २०११ साली आमचा हा लघुपट सर्वांच्या समोर आला ज्याची कथा धुळवडीच्या वेळी प्लॅस्टिकच्या फुग्यांनी कसे नुकसान होते हे सांगणारी आणि पर्यावरणपूरक होळी तसेच धुळवडीचे महत्त्व पटविणारी होती.
या चित्रपटाची आम्ही डीव्हीडी तयार केली आणि आजूबाजूच्या शाळांमध्ये दाखवू लागलो. या लघुपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. आवर्जून सांगायला हवं की आमच्या पिसवली शाळेतही हा लघुपट बनविण्याच्या कितीतरी आधीपासून आम्ही पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करीत आहोत. आणि या लघुपटाचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या अनेक शाळांतही पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड सुरू झाली. या लघुपटानंतर 'आम्ही फुले बोलतोय', ‘बंधारा’, ‘माझ्या गुरूजींची गाडी’ असे अनेक लघुपट आम्ही तयार केले असून त्याला आजवर बरीच पारितोषिकेही मिळाली आहेत.
पिसवली शाळेच्या अन्य लघुपटांविषयी जाणून घेण्यासाठी क्लीक करा: https://bit.ly/2WIoZtp

- अजय लिंबाजी पाटील, पदवीधर शिक्षक जि.प.शाळा पिसवली, कल्याण- ठाणे.
 

आई-बाबांसह प्रत्येकाला सांगणार, मतदान हक्क बजावा, तेही जाहीरनामा बघूनच


आईला सांगणार, बाबांना सांगणार, काका-काकू, मामा-मामी, दादा, ताई, वहिनी या सर्वांना आम्ही भेटणार. मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांना करणार. त्यातही जाहीरनामा बघून मतदान करायला लावणार, असा संकल्प केला आहे माजलगावच्या (जि.बीड) महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयाच्या पाचशे विद्यार्थ्यांनी. 
  देशात निवडणुकांचे धुमशान रंगते आहे. या निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढावा, शिवाय बालकांशी निगडीत आरोग्य, पोषण, स्वच्छता, सुरक्षा हे मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर यावेत, यासाठी युनिसेफने ‘व्होट फॉर मी’ मोहिम होती घेतली आहे.  माजलगावचे पाचशे विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी झाले. हे विद्यार्थी आता पालक, नातेवाईक, परिचितांना राजकीय पक्षांचे जाहीरनामे पाहूनच मत द्यावे, असा आग्रह करत आहेत. “आम्ही मतदार नसलो तरी देशाचे भवितव्य आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या संपर्कातील प्रत्येक मतदाराला मताधिकार बजावण्याचे सांगत आहोत”, असं आठवीची विद्यार्थिनी निलोफर शेख सांगते. शिवाय हे विद्यार्थी मोठ्यांना ‘वाचा प्रत्येक जाहीरनामा, तेव्हा तुमचे मत येईल कामा’, ‘याचे असू द्या भान, सर्वश्रेष्ठ अधिकारी, सर्वश्रेष्ठ कर्तव्य म्हणजे मतदान’ अशा घोषणा देत जनजागृतीही करतात.
या मोहिमेबाबत बोलताना मुख्याध्यापक प्रभाकर साळेगांवकर सांगतात, “दोन दिवसांपासून या विद्यार्थ्यांनी अनेक मतदारांना भेटून प्रभावी मतदार जागृती सुरू केल्याने देशाची जबाबदार पिढी घडण्यास मदत होते आहे.”
निलोफर शेख या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापक प्रभाकर साळेगांवकर यांची मुलाखत घेतली. या माध्यमातून तिने निवडणुकीशी निगडीत अनेक पायाभूत प्रश्न विचारत विद्यार्थ्यांचे शंका निरसन करून घेतले.
- अनंत वैद्य, बीड

दक्ष राहिली अंगणवाडीसेविका विवाहात अडकण्यापासून सुटली बालिका..

  यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एक गाव. पांडुरंग कुटुंबासह रोजमजुरी करून गुजराण करतात. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं. लहान मुलगीही वयात आलीच होती. घरात लग्नाचा मंडप पडणार आहे तर मोठीसोबतच लहानीचेही हात पिवळे करण्याची तयारी सुरू झाली. घाटंजी तालुक्यातील एका खेड्यातील तरूणाने लहान ग्रीष्मास(नाव बदलले आहे) पसंत केलं. दोन्ही मुली एकाच दिवशी बोहल्यावर चढणार म्हणून घरात आनंद होता. लग्नाच्या पत्रिका न छापता नातेवाईक व गावकऱ्यांना ३ एप्रिलला होणाऱ्या या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आलं. गावातील अंगणवाडीसेविकेला ग्रीष्मा अल्पवयीन असल्याचं माहीत होतं. तिने पांडूरंगरावांची भेट घेतली. ती सज्ञान होईपर्यंत लग्न करू नका असं समजावलं. पंरतु ग्रीष्माच्या कुटुंबियांनी चुकीची माहिती भरून काढलेलं आधार ओळखपत्र दाखविलं. त्यात ग्रीष्माचा जन्म २००० साली झाल्याची नोंद होती. तर अंगणवाडीसेविकेच्या दप्तरातील नोंदीनुसार ३ एप्रिल रोजी ग्रीष्माचे वय १६ वर्ष ६ महिने इतकं होतं. तरीही कुटुंबियांनी लहान मुलीचा विवाह करण्याचा घाट घातला.
बुधवारी ३ एप्रिल रोजी सकाळीच ‘चाईल्ड लाईन १०९८’ या हेल्पलाईनवर मुंबई येथे एक निनावी कॉल आला. मारेगाव नजीक एका गावात अल्पवयीन मुलीचा सकाळी १० वाजता विवाह होणार असल्याची ‘टिप’ पलीकडून मिळाली. यवतमाळ येथील चाईल्ड लाईनच्या केंद्र समन्वयक अर्पणा गुजर यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले यांना कळविलं. इंगोले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ त्या गावी पाठवलं. महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे, बाल संरक्षण कक्षाचे विसुरडे यांच्यासह चाईल्ड लाईनच्या अर्पणा गुजर, शीतल काटपल्लीवार, दिलीप दाभाडकर तत्काळ गावात पोहचलं. गावात बालविवाह होत असल्याची माहिती मारेगाव तहसीलदार, पोलीस ठाण्यात दिली. हा चमू गावात पोचला तेव्हा दोघींच्याही लग्नाची तयारी झाली होती. ग्रीष्मा आणि तिची मोठी बहीण दोघीही नटून थटून बोहल्यावर चढण्यासाठी तयार होत्या. मोठीचा नियोजित वर मंडपात दाखल झाला होता. ग्रीष्माच्या वराची प्रतीक्षा सुरू होती. मात्र मंडपात अचानक चाईल्ड लाईन, महिला बालविकास विभागाचे अधिकारी, पोलीस पोहचल्याने खळबळ उडाली. नातेवाईकांनी प्रारंभी हा बालविवाह नसून ग्रीष्मा सज्ञान असल्याचंच ठासून सांगितलं. मात्र अंगणवाडीचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा ग्रीष्मा अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं. हा बालविवाह लावून दिल्यास उपस्थित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत ग्रीष्माच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांची सभा घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी, ग्रामसभेने गावात बालविवाह होऊ न देण्यासाठी घ्यावयाचे वचन आदी माहिती दिली. त्यावेळी ग्रीष्माच्या वडिलांनी आपल्याला या कायद्याची माहितीच नव्हती, असं सांगितलं. गावातही यापूर्वी अशी जनजागृती झाली नसल्याची बाब यानिमित्ताने पुढं आली. अखेर ग्रीष्मा सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असं वचन तिच्या पालकांनी दिलं. ग्रीष्माच्या नियोजित वरास व त्याच्या कुटुंबियास ती अल्पवयीन असल्याने हा विवाह होणार नसल्याचा निरोप पाठविण्यात आला. त्यामुळे हे वऱ्हाडी लग्न मंडपात न येताच माघारी फिरले.
या घटनेत अल्पवयीन मुलीचा विवाह रद्द केल्याने कोणावरही कारवाई झाली नाही. या घटनाक्रमानंतर ग्रीष्माच्या मोठ्या बहिणीचा विवाह दुपारी ३ वाजता पार पडला. मात्र चर्चा रंगली ती वधूच्या तयारीत लग्नमंडपात आपल्या मोठ्या बहिणीमागे निरागसपणे फिरणाऱ्या अल्पवयीन ग्रीष्माचीच!

- नितीन पखाले, यवतमाळ

आदिवासी शेतकरी बेरोजगार, स्थलांतराने होताहेत हाल... सदा आबाची ऐका वाणी ११


 उसतोड मजूराच स्थलांतर नवं न्हाई राजंहो. पर जवा शेतकरी, जगाचा पोशिंदाच गाव सोडत असल तर आपली काय बिशाद!
ह्यो प्रसंग हाय नंदूरबार जिल्ह्यातला. मागल्या सालात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला हुता. म्हणून दुष्काळ पडला हायं. सारं कस ठप्प झालयं. सातपुड्याच्या महाकाय डोंगरात वसलेला नदंूरबार ह्यो जिल्हा. आदिवासी शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून असत्याती. औंदा पाऊस न्हाही झाला अन्् शेतशिवारं ओस पडली. हाताला काम नसल्याने आदिवासी बांधव आपला कुटुंब कबिला घेऊन सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशकडं गेला. ऊस तोडणी आणि बांधकाम, जिथ कुठबी काम मिळलं तिथ निघालेचं. विंचवाच्या बिऱ्हाडागत समदी गाव सोडताहेत. सरकार म्हणतयं मागेल त्याला काम देऊ, त्या टीवीवरबी जाहिरात येतीयं, रोजगार देऊ, हमी देऊ. पर कसचं काय? खर पाह्यल तर कशातच काय नाय. हजारोनं स्थलांतर होत हाय? पोराबाळांची पाटी फुटत हायं. इथले मजूर गेलते काम मागायला शासनाकडं. पर त्यास्नी कळाल काम अगुदरचं लईच जोरात सुरु हायती. परं कागदावर. मंग काय कोणचाबी सायेब पुसतं नसल्यान सोडल गाव.
मजूर तर मजूर, शेतकरीबी घर, शेती सोडून जातय लेकाहो. जिल्ह्यातील अनेक गावं-पाडे अशीच ओस पडल्याती. अनेक गावांमध्ये दिस-रात्र मसन शांती असत्ये. काही म्हातारी हाईत गावात, ती बी अखेरच्या घटका माेजीत. तुमीबी हे चित्र बघसाल ना रडसाल, मंडळीहो.
कवा सरकार ह्यांच्यासाठी काय करलं ते करलं.
पर याबी दुखा:त बळीराजा, मजूर आशा करतोय
‘दिस् येतील, दिस् जातील....
दुःख सरलं दुःख जातील...’


- रूपेश जाधव, नंदूरबार

Wednesday 8 May 2019

लता आणि शांती

शांती नॉर्मन. राहायला जर्मनीत. जन्म १९७४ चा,परभणीतल्या सरकारी दवाखान्यात. जन्मदात्रीनं बेवारस सोडून दिलं. पुण्यातल्या अनाथालयानं संगोपन केलं आणि एका जर्मन दाम्पत्याकडे दत्तक दिलं. आयुष्य मार्गी लागलं.
आपल्या जन्माचा शोध घेण्याची इच्छा शांतीला होती. पुण्याच्या अनाथालयातून माहिती घेऊन ती परभणीत पोहोचली. इथं भेट झाली विकल्प इंडियाचे संचालक सारंग साळवी आणि समन्वयक लता साळवी यांच्याशी. लता विकल्प इंडियाच्या माध्यमातून मुलं, महिला, वंचितांसाठी काम करणाऱ्या. गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या. त्यांच्याबरोबर काम करण्याची विशेषतः अनाथ मुलामुलींसाठी काम करण्याची इच्छा शांतीनं व्यक्त केली. यातून आकाराला आलं ' प्रोजेक्ट शांती-जर्मनी'.
तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या हस्ते ८ मार्च २०१४ ला प्रकल्पाचं उदघाटन झालं. प्रकल्पासाठी लतांनी स्वतः ची एक एकर जमीन दिली.
शांती जर्मनीत खासगी नोकरीबरोबरच नृत्य-गाण्याचे शो करतात. यातून आणि जर्मनीतल्या नागरिकांकडून मिळणारी देणगीचीे रक्कम परभणीला पाठवतात. यातून लता यांनी २०० महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला. शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या गरजू १५० महिलांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली. १७ युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली. शाळाबाह्यप्रवण १२० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. ८० मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन शहरात ३ ठिकाणी त्यांच्यासाठी नियमित मार्गदर्शन वर्गाची सोय केली.
कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता हे काम सुरू आहे.

- बाळासाहेब काळे, परभणी

पुढाकार डॉक्टरचा सहभाग लोकांचा

 २६ लाख लोकसंख्येचा बीड जिल्हा. ५० प्राथमिक आरोग्य केंद्र , उपजिल्हा, ग्रामीण आणि स्त्री रुग्णालय, राज्य शासानची सुमारे २० आरोग्य केंद्र आणि एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ही आरोग्य यंत्रणा. ग्रामीण भागातल्या अनेक रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव. तज्ज्ञांची कमतरता. जिल्ह्यात अनेक रुग्णालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांची पदं रिक्त होती. गावांमध्ये गर्भवती मातांना प्रसूतीपूर्व तपासणी सुविधा मिळण्यात अडचणी. सोनोग्राफीसाठीही शहरात यावं लागे. आलेला रुग्ण वरिष्ठ केंद्राकडे पाठवण्याचा पायंडा. रुग्णांची धारणाही थेट जिल्हा रुग्णालय गाठणंच बरं अशी. ३०० खाटांची क्षमता असलेल्या बीड जिल्हा रुग्णालयात एका वेळी ७५० ते ८०० रुग्ण. उपलब्ध मनुष्यबळ, औषधं आणि उपलब्ध साधनसामग्रीमध्ये रुग्णसेवा देणं मोठं आव्हानात्मक.
दोन वर्षांपूर्वी डॉक्टर अशोक थोरात यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला. सरकारी निधीची वाट पाहण्यापेक्षा लोकसहभागातून रुग्णालयविकासासाठी प्रयत्न करण्याचं त्यांनी ठरवलं. पदभार घेतल्यापासूनच त्यासाठी सुरुवात केली. हारफुलांऐवजी औषधं देऊन सत्कार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. '' काही तासातच दीड ते दोन लाख रुपयांची औषधं जमा झाली. कमतरता असलेल्या आरोग्य केंद्रांना आम्ही ती पाठवली.'' डॉक्टर थोरात सांगतात.'' पहिलाच उपक्रम यशस्वी ठरला. मग वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवला. ज्यांच्याकडून मदत मिळणं शक्य आहे त्यांच्याकडे न लाजता मागितली.''
यातून जिल्हा रुग्णालय, गेवराई उपजिल्हा रुग्णालय आणि धानोरा ग्रामीण रुग्णालयासाठी ५० लाखांहून अधिक किमतीची साधनसामग्री जमा झाली. औषधांपासून आयसीयूमधील मॉनिटर, सोनोग्राफी मशीन, एक्स- रे मशीन , खाटा, गाद्या असं विविध साहित्य लोकसहभागातून जमा झालं. डॉक्टर थोरात यांनी स्वतः एक्स -रे मशीन जिल्हा रुग्णालयाला दान केलं. जिल्ह्यातल्या खासगी स्त्रीरोगतज्ज्ञांना महिन्यातला एक दिवस सरकारी रुग्णालयात येण्याचं आवाहन केलं. सरकारी रुग्णालयात प्रसूतीचा टक्का वाढला. सिझेरिअन सुरू झाल्यानं नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा राज्यात अव्वल ठरला.
जिल्हा रुग्णालयातील ६ खाटांच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करायचा होता. मॉनिटर, खाटा, गाद्या, साहित्य आवश्यक होतं. '' एका कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची भेट झाली. धर्मादाय विभागाकडून मॉनिटर मिळावेत यासाठी विनंती केली. सहा लाखांचे सहा मॉनिटर त्यांनी दिले.'' डॉक्टर थोरात यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी खाट, गाद्या असं साहित्य दिलं. इतरांनीही वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आणि हा विभाग आता २० खाटांचा झाला आहे. गंभीर रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळणं आता शक्य झालं आहे.
लोकसहभागातून रुग्णालय विकास करण्याचा हा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी आदर्श आहे.
- अमोल मुळे,बीड