Wednesday 8 May 2019

...अन् 'पीएसआय'च्या वर्दीवर पाच वर्षांनी गावात पाऊल!

मंगेश केशव वडणे. मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील जळकोटवाडी (ता. तुळजापूर). गावातील जि. प. शाळेतच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. तर, माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी येथे झाले. शेळगाव (ता.बार्शी) येथील ज्युनिअर कॉलेजमधून त्याने अकरावी, बारावी पूर्ण केली. त्यानंतर, २०१० साली पाणीवच्या (ता. माळशिरस) श्रीराम अध्यापक विद्यालयातून इंग्रजी माध्यमातून डीएडची पदविका घेतली. पुढे, तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून औरंगाबाद विद्यापीठाची फिजिक्स विषयातून बीएसी पदवी प्राप्त केली. तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे खासगी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्याने तीन वर्षे नोकरी केली. स्पर्धापरिक्षेतून अधिकारी बनण्याचं ध्येय त्याला स्वस्थ बसून देत नव्हतं. पण कौटुंबिक परिस्थिती अनुकूल नव्हती. २०११ साली दीर्घ आजाराने आईचं निधन झालं होतं. वडीलच आई- बाप अशी भूमिका बजावायचे. शेवटी, परिस्थतीशी दोन हात करीत मंगेशने ध्येयपूर्ती साध्य करण्यासाठी पुणं गाठलंच. 'एमपीएससीतून पोस्ट घेऊन खाकी वर्दीवरच गावात पाऊल टाकेन' हा संकल्प त्याने केला. अन् त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. सातत्यपूर्ण अभ्यासाला कठोर मेहनतीची जोड देत सन २०१५ पासून स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात झाली.
पुण्यात आला. स्पर्धा परिक्षेच्या क्लासेससाठी खरंतर पुणं प्रसिद्ध. तरीही, कोणताही क्लास न लावता, मंगेशने केवळ अभ्यासिकेत अभ्यास केला. एमपीएससीतून सीआयडी पीएसआय, एक्साईज पीएसआय, एसटीआय, असिस्टंट आणि पीएसआय यासह एकूण बारा मुख्य परिक्षांपर्यंत धडक मारली. पण अंतिम मेरीटमध्ये नाव काही येत नव्हतं. त्याला नैराश्य यायचं. त्यातून सावरण्यासाठी योगा- मेडिटेशनकडे लक्ष दिलं. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मोठा भाऊ विनोद वडणे आणि विवाहीत बहीण प्रवीणा वडणे- पोखर्णा यांनी मदत केली. बहिणीने तर चक्क स्वत:चे दागिने गहाण ठेवले. या मदतीची क्षणोक्षणी जाणीव ठेवत, मंगेश पुन्हा हिंमतीने अभ्यास अन् शारीरिक चाचणीची तयारी सुरू ठेवायचा. अखेर २०१७सालच्या पीएसआय परीक्षेत त्याने यशाचा झेंडा रोवलाच. शारीरिक चाचणीत तर १०० पैकी १०० गुण घेत त्याने यश मिळवलं.
आपला संकल्प तडीस नेत तब्बल थेट पाच वर्षांनी 'पीएसआय'च्या वर्दी मिरवत गावात पाऊल टाकलं. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. गावातील महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. वडील, भाऊ आणि बहिणी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. कोणत्याही क्लासविना केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर मंगेशने मिळविलेलं हे यश सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरलं आहे.

- नितीन ठाकरे, सोलापूर

No comments:

Post a Comment