Tuesday 7 May 2019

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.....

 नवरा बायकोमध्ये तक्रार असेल किंवा नाती जपणं अवघड ठरत असेल तर आपण एकदा धुळे जिल्ह्यातील चिचखेडा गाव शिवारातील पाटील दांपत्याला भेटायला हवं. ‘नवऱ्याची सर्वात चांगली मैत्रीण बायको असते तर बायकोचा सर्वात उत्तम मित्र हा नवरा असतो’, हा विचार प्रमाण मानून जगणारं हे दांपत्य. विशेष म्हणजे हे दोघे उच्च शिक्षित नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या सो कोल्ड निकषात बिलकुल बसत नाही. कारण पाटील दांपत्यातील लताबाई या जवळपास निरक्षर तर बाबुराव हे अल्प शिक्षित. आणि हो, या दोघांच्या लग्नाला ४४ वर्ष झाली आहेत. भीषण दुष्काळाचा सामना ते करत आहेत, उद्यासाठी खिश्यात दमडी नाही, मुलांनी साथ सोडली आहे. तरीही या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि निवांतपणा अवर्णनीय आहे.

धुळे जिल्ह्यातील मुकटी - चिचखेडा हा आडवळणाच्या रस्ता. इथंच असलेल्या शेताच्या एका कोपऱ्यात बाबुराव आणि लताबाई पाटील यांचं छोटसं दोन खोल्यांचं घर. शेत शिवारात आणि त्यातूनही रस्त्याला लागून असलेलं हे घर म्हणजे तहानलेल्या, गरजू, भुकेल्या लोकांचं हक्काचं ठिकाण. बाहेरून आलेला प्रवाशी अथवा गाववाला येथे आल्यावर पाटलांच्या या घराच्या प्रेमात पडतो. घराबाहेर शेणाने सारवलेलं अंगण, रांगोळी, नीटनेटकं घर आणि सावली देणारी झाडं असं इथलं सगळंच प्रेमात पाडणारं वातावरण. या दाम्पत्याला आयुष्याभर अनेक दुःख पाहावी लागली. आजही ते एकटेच शेतात राहतात आणि राबतातही, मात्र या जगण्याच्या संघर्षात ते खचलेले नाहीत. इथं येणाऱ्या प्रत्येकाचं ते हसतमुखाने स्वागत करतात. त्यांना दोन मुलं आहेत तीही सोयीने आई वडिलांना शेतात एकटं सोडून गावात राहतात.
मुलांनी आई वडील जिवंत असतानाच सर्व संपत्ती वाटून घेतली आहे. बाबुराव आणि लताबाई यांना शेतातलं घर आणि शहरात एखादं अपार्टमेंट उभं करता येईल इतकी जमीन दिली गेली आहे. या जमिनीत जे पिकेल त्यावर त्यांचा वर्षभराचा चरितार्थ निर्भर आहे. उन्हाळ्यात पोट भरता यावं यासाठी बाबुराव यांनी मुलांच्या हिश्यात असलेल्या विहिरीतला गाळ काढला. त्यावर २५ हजार खर्च केले, उपयोग मात्र झाला नाही. भेंडी जगणार नाही हे वास्तव आता डोळ्यासमोर आहे. आकाशातून पाऊस बरसत नाही आणि भूजल संपले आहे. अश्या बिकट परिस्थितीतही हे दाम्पत्य शेतात राहतं. एकीकडे उन्ह्याळ्याचे उष्ण वारे त्यांचं घर, अंगण तापवत आहेत. दुष्काळ म्हातारपणातही टोकाची परीक्षा पाहत आहे. उद्या काय? हा प्रश्न आहे.
तरी हे दाम्पत्य येणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुख स्वागत करतं. चहापाण्याची वेळप्रसंगी जेवणाची विचारपूस केल्यावाचून राहत नाही. त्यांना निसर्गाने आणि नात्यांनी अनेक दुःख, हालअपेष्टा दिल्या आहेत. मात्र त्यांची कोणाविषयी तक्रार नाही. निरपेक्ष आणि निर्मोही असं त्यांचं जगण्याचं तत्वज्ञान. आपण एकमेकांची साथ सोडायची नाही आणि सुख - दुःखाचा सोबत सामना करायचा, हा या दांपत्याचा संकल्प नात्यांची वीण घट्ट करणारा आहे. वयाच्या सत्तरीतही बाबुराव हे आपल्या पत्नीला आणि लताबाई आपल्या नवऱ्याला ज्या पद्धतीने सांभाळतात, धीर देत आनंदी राहतात ते छोट्या - मोठ्या कारणासाठी भांडणाऱ्या दांपत्यांनी जरूर अनुभवावं असं आहे.

- कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment