Wednesday 8 May 2019

गेल्या लोकसभेतल्या महाराष्ट्रातल्या खासदारांची कामगिरी

सतराव्या लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचा दिवस लवकरच उगवेल. मत कुणाला द्यायचं हे प्रचारावरून की विश्वसनीय माहितीच्या आधारे ठरवणार, हे विचारणारा पोल आम्ही अलिकडेच घेतला होता. त्यात ९७% वाचकांनी कळवलं की, माहितीचा आधार घेऊनच हा निर्णय घेणार. ‘फेक’ माहिती पसरण्याच्या सध्याच्या काळात अशी विश्वसनीय माहिती लोकांना हवी असणं, हे दिलाश्याचं. आपणा मतदारांसाठी ही कळीची वेळ, २०१४ साली आपण लोकसभेत पाठवलं, त्या खासदारांची कामगिरी समजून घेण्याची वेळ.
सोळाव्या लोकसभेच्या २०१४ ते १८ या काळातल्या एकूण १६ अधिवेशनांत खासदारांनी विचारलेल्या तारांकित आणि अतारांकित प्रश्नांची माहिती लोकसभेच्या संकेतस्थळावरून आम्ही संकलित केली. महाराष्ट्रातल्या ४८ खासदारांपैकी चार मंत्री वगळून उर्वरित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं विषयवार वर्गीकरण केल्यानंतर आमच्या हाती लागलेली काही निरिक्षणं अशी:
एक:-
जास्त प्रश्न विचारणारे खासदार
एक हजारच्यावर प्रश्नसंख्या असणारे ७ खासदार आणि त्यांची प्रश्नसंख्या
1) सुप्रिया सुळे, राकॉं, बारामती १,१६३ (सर्वाधिक प्रश्न)
2) धनंजय महाडिक, राकॉं, कोल्हापूर १,१५४
3) विजयसिंग मोहिते पाटील, कॉं, माढा १,११४
4) राजीव सातव, कॉं, हिंगोली १,०९७
5) शिवाजीराव पाटील, शिवसेना १,०८१
6) हीना गावित, भाजप, नंदुरबार १,०७६
7) आनंदराव अडसूळ, शिवसेना, अमरावती १,०३८
सातारा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत एकही प्रश्न विचारला नाही. ‍‍‍
दोन:-
मानवविकासाशी संबंधित विचारलेल्या प्रश्नांची संख्या
आरोग्य-कुटुंबकल्याण : १,५७६ / मनुष्यबळविकास : १,४१४
शेती आणि शेतकरीकल्याण : १,०९९ / महिला-बालकल्याण: १६०
पंचायतराज : ७६
तीन:-
पिण्याचे पाणी आणि स्वच्छता
या विषयावर सर्वाधिक १३ प्रश्न कल्याणचे श्रीकांत शिंदे, रामटेकचे कृपाल तुमाने (दोघंही शिवसेना खासदार) आणि दिंडोरीचे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण या तिघांनी विचारले आहेत.
हगणदारीमुक्ती, शौचालयबांधणी, जलाशय पाणीसाठवणक्षमता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता याबद्दलचे मुद्दे त्यात आहेत.
भाजपचे खासदार शरदकुमार बनसोडे, सोलापूर, राजेंद्र गावित, पालघर आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जालना यांनी या विषयावर एकही प्रश्न विचारलेला दिसत नाही.
चार:-
आदिवासी
गडचिरोलीचे अशोक नेते यांनी १६, दिंडोरी (नाशिक) चे हरिश्चंद्र चव्हाण यांनी १४ आणि नंदुरबारच्या हीना गावित यांनी ९ प्रश्न आदिवासी या विषयावर उपस्थित केले आहेत. हे तिघंही भाजपचे.
यात आदिवासी क्षेत्रांत उद्योगप्रशिक्षण केंद्र उभारणं, आदिवासी पाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असे मुद्दे आहेत.
हीना गावित यांनी विज्ञान-तंत्रज्ञान योजनांमध्ये आदिवासी स्त्रियांचा सहभाग, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पहाणीचे निष्कर्ष आणि त्यांचा धोरणआखणीशी संबंध यासारखे लक्षवेधक प्रश्न उपस्थित केलेले दिसतात. पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावीत हेही आदिवासी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे. मात्र, खासदार झाल्यापासूनच्या चार अधिवेशनांत आदिवासीविषयक एकही प्रश्न विचारलेला नाही
पाच:-
अविकसित, म्हणजेच अल्प मानव विकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांच्या खासदारांनी विचारलेले प्रश्न
अल्प मानव विकास निर्देशांक असलेले महाराष्ट्रातले नऊ जिल्हे:
नंदुरबार (०.६०४), गडचिरोली (०.६०८), वाशीम (०.६४६), हिंगोली (०.६४८),उस्मानाबाद (०.६४९), नांदेड (०.६५७), जालना आणि लातूर (०.६६३), धुळे (०.६७१)
या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणार्‍यांमध्ये सर्वाधिक १,०९७ प्रश्न विचारले हिंगोलीचे कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी.
त्या खालोखाल १,०७६ प्रश्न उपस्थित केले नंदुरबारच्या भाजप खासदार हीना गावित यांनी.
सर्वात कमी १०१ प्रश्न विचारले जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी.
सहा:-
खासदारांची अधिवेशनांतली उपस्थिती
संसदेचं कामकाज वर्षातील साधारणपणे ७० ते ८० दिवस चाललं आहे. २०१४ ते १८ या काळातल्या १६ अधिवेशनांचे एकूण ३२१ दिवस आहेत.
अधिवेशनकाळात १०० % उपस्थित असणारे खासदार आहेत मुंबई उत्तर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजपचे गोपाळ शेट्टी.
खासदार अरविंद सावंत, अनिल शिरोळे, किरिट सोमय्या, सुनील गायकवाड, सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांची उपस्थिती ९५ ते ९९ टक्के या वर्गवारीत आहे.
महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांच्या उपस्थितीची सरासरी ८०% आहे.
सात:-
महाराष्ट्रातल्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांविषयी निरीक्षणं
१६ व्या लोकसभेदरम्यान सामान्यतः प्रत्येक अधिवेशनात सरासरी ४०० तारांकित प्रश्न स्वीकारले आणि त्यापैकी जवळपास ७५ प्रश्नांना (सुमारे १९%) मंत्र्यांनी तोंडी उत्तरे दिली.
२०१८ मधली दोन, अर्थसंकल्पीय आणि हिवाळी अधिवेशनं वगळता इतर सर्व अधिवेशनांतले प्रश्नोत्तराचे तास फार व्यत्यय न येता, बऱ्यापैकी सुरळीतपणे पार पडल्याचं दिसलं.
या १६ अधिवेशनांत तारांकित आणि अतारांकित मिळून, एकूण ७७,३६५ प्रश्न उपस्थित केले गेले. त्यापैकी महाराष्ट्राच्या खासदारांनी २६,७२५ (३०% हून थोडे कमी) प्रश्न उपस्थित केले.
औद्योगिकीकरणात आणि सेवाक्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात शेती आणि ग्रामीण विकासाचे प्रश्न अजूनही जटील आहेत.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र हे तामिळनाडूखालोखाल सर्वाधिक नागरीकरण असलेलं राज्य आहे. राज्यातील जवळपास ४५% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. परंतु मुंबई, पुणे किंवा नागपूरसारखी मोठी शहरं वगळता अन्य शहरांच्या समस्यांबाबत किंवा एकंदरीत महाराष्ट्राच्या शहरी समस्यांचे प्रश्न इथे अभावानेच आढळून आले.
(माहितीआधार: लोकसभा संकेतस्थळ - loksabha.nic.in)
- टीम संपर्क / नवी उमेद
#नवीउमेद #खासदारांचीकामगिरी
Sampark - Communication for Advocacy

No comments:

Post a Comment