Tuesday 21 May 2019

एका पक्षाची अखेर... आखुडबुद्धी बहुशिंगी


शनिवारी बाजारात हणमंतराव भेटले. लोखंडी खोरं, टोपल्या, साखळ्या, कुलपं असलं जडशीळ हार्डवेअर त्यांच्या पिशवीत भरलेलं दिसलं. मी थोडासा सभ्य आणि सरळमार्गी मनुष्य असल्यानं माझी अशी कल्पना झाली की हणमंतरावांनी निवडणुकीनंतरची तयारी आत्ताच सुरू केलीय. म्हणजे, घोडेबाजार सुरू झाला की खासदारांना बांधून ठेवायला साखळ्या, खरेदी केलेल्यांच्या तोंडाना बांधायला कुलपं, खासदारांना तोलायला टोपल्या आणि नंतर सर्वात शेवटी पैसे ओढायला खोरं. पण नाही, हणमंतराव तर खुश दिसत होते. देशाचं राज्य चालवण्याचं ओझं येणार असल्याच्या काळजीही एक रेषही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.
मग, त्यांच्याऐवजी मीच चेहरा पाडून विचारलं, "काय हणमंतराव, कसली खरेदी चाललीय? घरबिर बांधताय का?" मी प्रश्नाला मुद्दाम घरगुती वळण दिलं हे चतुर वाचकांना कळलं असेलच.
"छे हो," मनोजकुमारसारखा गंभीर चेहरा करून हणमंतराव म्हणाले, "टीव्हीवर जातोय."
बाजारातल्या गर्दीच्या धक्क्यांत अक्षरांची उलटापालट झाली असावी, मला ते व्हीटी असं ऐकू आलं.
"व्हीटीला कशाला जाताय?"
"व्हीटीला नाही हो, टीव्हीवर जातोय." हणमंतराव अँकरसारख्या तारस्वरात ओरडले.
"कशाला?"
"कशाला म्हणजे? टीव्हीवर डिबेट आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा नेता म्हणून मला गेलंच पाहिजे." हणमंतराव अजूनही ओरडूनच बोलत होते. मग मीच त्यांना सावलीत घेऊन गेलो. चहा पाजला.
"पण त्यासाठी हे का घेतलंय?"
"या टोपल्या आहेत ना, त्या ठोकून त्यांचं चिलखत करायचंय. या साखळ्या शहंशाहसारख्या हाताला गुंडाळणार, काही झालं तर आम्ही सगळ्यांचे बाप आहोत."
"आणि कुलूप?"
"कुणी प्रवक्ता आगाऊपणा करायला लागला तर त्याच्या तोंडाला घालायला."
हे सगळं पटण्यासारखं होतं. खोऱ्याचा उपयोग काय करणार हे मला कळत नव्हतं. बरं, एखाद्याची बिनपाण्यानं हजामत करायची तर तिथं हे खोरं चाललं नसतं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून हणमंतरावच पुढं म्हणाले, "आणि हे जुनी प्रकरणं उकरून काढायला."
मी समजल्यासारखी मान हलवली.
"तराजूपण घ्याना सोबत, त्यांना कदाचित बॅलन्स्ड प्रवक्ता हवा असेल."
"छे छे, संतुलित लोकांचं टीव्हीवर काय काम?"
*****
वर सांगितलं तसा मी सभ्य आणि थोडासा सरळमार्गी माणूस असल्यानं टीव्हीवरचा तो डिबेट बघण्याच्या वाटेला गेलो नाही. काही दिवसांनी हणमंतरावच भेटले मंडईत. भलतेच निराश दिसत होते. कदाचित देश चालवायची जबाबदारी अंगावर पडली असावी. खांदे पाडून सायकल ढकलत होते ते.
"नमस्कार हणमंतराव, कसा झाला डिबेट? झाली का हाणामारी?"
"कसलं काय हो? तिथं कुणी येडा अँकर आणून बसवला होता चॅनलवाल्यांनी. त्याची समजूत होती की त्याच्या प्रश्नांना आम्ही उत्तरं द्यायची. हे असं काही करायचं असतं तर त्यासाठी आम्ही टीव्हीवर कशाला गेलो असतो?"
मला एकदम डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये लोखंडी पिंजऱ्यात मल्लांना कोंडून केलेली तूफानी मारामारी आठवली. आपल्या टीव्हीवाल्यांनीही हा कित्ता गिरवायला हरकत नाही. सगळे प्रवक्ते गोळा करून पिंजऱ्यात सोडायचे आणि आपण बाहेर मज्जा बघत बसायचं. फारतर एक पिंजरा बनवायचा खर्च केला की मनोरंजनाची फुल्टू गॅरंटी. सगळे पक्ष तगडा उमेदवार शोधायचा सोडून तगडा प्रवक्ता शोधू लागतील. आणि आजवर जे बुरख्याआड आहे तेच सामोरं येईल. असो.
"मग? द्यायची ना उत्तरं? तुम्ही कुणाच्या बापाला घाबरता काय?" मी हणमंतरावांना म्हणालो.
"दिली असती, पण परंपरा आडवी आली."
"कोणती परंपरा?"
"अहो, आपल्याकडं आजवर कोणत्याही पक्षानं कुणाच्या प्रश्नाला उत्तरं दिल्याचा इतिहास आहे का? नाही ना? म्हणजेच हा आपल्याकडचा अलिखित संकेत आहे. तो पायदळी तुडवून कसं चालेल?"
"हो, तेही खरंच. पण यावर मध्यममार्ग म्हणून तुम्ही खोटी उत्तरं द्यायला काही हरकत नव्हती ना?" मी सुचवलं.
"वा रे वा! आता मात्र तुम्ही लोकशाही धोक्यातच आणणारच असं दिसतंय. अहो, आम्ही खोटी उत्तरं दिली आणि मग विरुद्धपार्टीचे पत्रकार त्यातल्या चुका शोधत बसले तर विरुद्धपार्टीच्या पत्रकारांच्या चुका काढणारे आमचे पत्रकार बेकार होऊन समतोल ढासळणार नाही का?"
मी तसा सरळमार्गी मनुष्य असल्यानं मला ही राजकीय गुंतागुंत कळली नाही. तरीही मी त्यांची री ओढत म्हणालो,
"हो बरोबर आहे, त्यामुळं चौथा स्तंभ डळमळीत होऊन लोकशाही कोसळायची शक्यता आहे."
"मग? म्हणून आम्ही एक ठरवलंय-"
"काय ठरवलंय आता?"
"सगळे पक्ष हरामखोर असतात असं जाहीर करून आपला पक्ष विसर्जन करून टाकायचा!"
हणमंतराव आधीपासून सज्जन होतेच, पण या वाक्यामुळं ते अद्यापही सज्जन आहेत याची खात्री पटली.
- ज्युनिअर ब्रह्मे
#नवीउमेद

No comments:

Post a Comment