Wednesday 8 May 2019

एक विशेष अनाथ सनाथ झाला




  किरण अवघा दोन दिवसांचा असताना धुळ्यातील शिशु गृहात आणला गेला होता. पुढे रक्त चाचण्यांमध्ये त्याला एका जीवघेण्या आजाराने मगरमिठीत घेतल्याचं समोर आलं. संस्था चालक अतुलचंद्र बिऱ्हाडे यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. याच दरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या ‘कारा’च्या (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) विशेष मुलांच्या दत्तक श्रेणीत ठेवलं.
अमेरिकेत राहणाऱ्या बुश दांपत्याला विशेष श्रेणीत असलेला किरण भावला आणि त्यांनी त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एक वर्षभर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दाम्पत्याने किरणला दत्तक घेतलं. आता किरण अमेरिकन झाला आहे.
किरण असाध्य आजाराला घेऊन जन्माला असून तो आज पावणे तीन वर्षांचा आहे. त्याचा हा धुळे ते अमेरिका प्रवास संस्थेच्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेलं यश आहे. विशेष परिस्थितीत शिशु गृहात त्याचा अगदी नाजूक फुलाप्रमाणे सांभाळ केला गेला. एका अश्याच विशेष मुलाच्या शोधात असलेल्या अमेरिकन दांपत्याला किरण आवडला आणि त्याला दत्तक घेण्याचा निर्णय या दांपत्याने घेतला. या दांपत्याने आधीही असंच एक विशेष बाळ दत्तक घेतलं आहे.
किरणला एक सुंदर आयुष्य देण्यात शिशु गृहाच देखील मोलाचं योगदान ठरलं. उच्च न्यायालयाच्या आदेशापासून जन्मदाखला आणि पासपोर्ट काढण्यापर्यंत सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करत या संस्थेने अवघ्या पावणेतीन वर्षाच्या किरणांचा अमेरिकेचा प्रवास सुखकारक केला. या शिशु गृहने आजपर्यंत ९२ मुलांना दत्तक दिलं आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या एक नवा पैश्याचं अनुदान या संस्थेला मिळत नाही. पदरमोड करून या अनाथ मुलांचा सर्व खर्च भागवला जातो. समाजातील दानशूर व्यक्ती मदत करतात त्यातून थोडा दिलासा संस्थेला मिळतो.
किरणवर औषधोपचार सुरू आहेत. त्यामुळे किरणच्या संरक्षणाची हमी, भविष्यातील त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचं मान्य केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अमेरिकन दांपत्य किरणला घेऊन अमेरिकेकडे रवाना झाले. त्यांच्या या अनोख्या दातृत्वाच बळ अनेकांना किरणसारखी मुलं दत्तक घ्यायला प्रेरणा देईल.

- कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment