Tuesday 7 May 2019

थरार- अर्चनाच्या सुटकेचा

चिमुरड्या अर्चनाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. नंतर आईचं निधन झालं. अर्चना आता मुंबईत तिच्या व्यसनी मावशी आणि मामांसोबत राहू लागली.
स्वत:ची व्यसनांची हौस पुरवायला अर्चनाच्या मामाने तिच्या हाती भिकेचा कटोरा दिलाच, शिवाय धडधाकट अर्चनाला आंधळेपणाचं सोंगही घ्यायला लावलं. लवकरच अर्चनाच्या लक्षात आलं की भीक मागितल्याशिवाय आपल्या पोटात अन्नाचा कण पडणं शक्य नाही. म्हणून नाखुशीने का होईना तिनं भीक मागायला सुरूवात केली. लोकलने प्रवास करणारे पांडे काका अर्चनाला दररोज पाहायचे. ते तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. घाबरलेली अर्चना गप्प बसायची आणि तिचा मामा मात्र भाचीला वसतिगृहात ठेवणार आहे, वगैरे सारवासारव करायचा. पण पांडे यांना संशय आल्याने त्यांनी अर्चनाचा एक फोटो काढला आणि तो फेसबुकवर शेअर केला.
सोशल मीडियाचा फायदा असा झाला की पांडे यांच्या फेसबुक पोस्टची दखल केंद्रीय शालेय शिक्षण विभागाने घेतली. आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मा. नंदकुमार सरांनी याबाबतीत पुणे येथील विद्या प्राधिकरणातील समता विभागाला निर्देश दिले. त्या आदेशानुसार मुंबई जिल्हा बालरक्षक समन्वयक वैशाली शिंदे मॅडम यांच्या नेतृत्त्वात अरूण पाटील, कार्मेलिन डावरिया आणि मी स्वत: अशा टीमने अर्चनाच्या शोधमोहिमेची जबाबदारी घेतली.
अर्चनाचा शोध घेण्यासाठी अंधेरी स्टेशनपासून आसपासचा बराच परिसर आम्ही पिंजून काढला. रेल्वे पोलीस, सी.आर.पी.एफ. यांना निवेदन देऊन फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या पांडे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांच्या बोलण्यातून अर्चना नालासोपारा परिसरात राहात असण्याची शक्यता आहे, असं समजलं. स्टेशनवरच्या विक्रेते आणि भिकाऱ्यांकडे सतत तीन दिवस केलेल्या चौकशीनंतर अर्चना नालासोपाऱ्यातच राहते हे निश्चित समजलं.
27 फेब्रुवारी 2018 रोजी दिवसभराची आपापली ड्युटी संपवून संध्याकाळी 6 नंतर आमच्या बालरक्षक टीमने नालासोपाऱ्यात खूप शोधाशोध केली, पण ती काही आम्हांला सापडली नाही, उलट अर्चना अंधेरी स्टेशनवर भीक मागतेय असं कळलं. आम्ही धावत-पळत अंधेरीला पोहोचलो, तिथून पुन्हा अर्चना गायब. तिला तिच्या मामांनी लपवून ठेवलं असणार हे लक्षात आलं. हे सगळं करता करता रात्रीचे 9 वाजले. मात्र, अर्चनाला सोबत घेतल्याशिवाय आज घरी जायचंच नाही, असा ठाम निर्धार आम्ही बालरक्षकांनी केला होता.
दरम्यान आम्ही अर्चनाचा मामा राजू बिसवा याला पोलिसांच्या तावडीत दिलं. पोलिसांच्या चौकशीत अर्चनाचा मामा पोपटासारखा बोलू लागला. अर्चनाला जबरदस्तीने भीक मागायला भाग पाडलं असल्याचं त्यांनी मान्य केलं. शिवाय तिला नालासोपारा येथील एका झोपडीत दडवून ठेवल्याचंही त्यांनी कबूल केलं.
हे कळताच रात्री एक वाजता पोलीस अधिकाऱ्यांसोबत आम्ही पुन्हा नालासोपाऱ्याला जाऊन धडकलो. बिचारी अर्चना एका झोपडीत कुडकुडत घाबरून बसली होती. आपल्याला न्यायला पोलीस का आले आहेत, हे काही तिला समजेना. मात्र आम्ही तिची मदत करायलाच आलो आहोत, हा विश्वास तिला दिला आणि रात्री दोन वाजता तिच्या दुष्ट मामा- मावशीच्या तावडीतून आम्ही अर्चनाची सुटका केली. आता अर्चना रिमांड होममध्ये राहात असून, तिला शाळेतही दाखल केले आहे.
- रामलाल पवार, शिक्षक, सांताक्रूझ, मुंबई.
 

टीप- सुरक्षिततेच्या आणि गुप्ततेच्या दृष्टीने लेखातील चिमुरडीचे नाव बदललेले आहे . या शोधमोहिमेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/2VpGDSg
#नवीउमेद Snehal Bansode Sheludkar

No comments:

Post a Comment