Monday 24 April 2017

लेकरांकडूनही बरंच काही शिकता येतं

पालक म्हणून जी जबाबदारी असते ती पार पाडताना कधी-कधी चुकलेल्या पालकांना लेकरांकडूनही बरंच काही शिकता येतं आणि त्यातून खऱ्या अर्थाने पालकत्वाचा प्रवास सुरु होतो. असंच माझ्या आयुष्यात घडलं. पोरांच्या सांगण्यामुळे मी व्यसनमुक्त झालो. त्यालाही आता तीन वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला. मला आता त्याचा अभिमान वाटत आहे.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या मागास तालुक्या्तील कोळवाडी हे माझं मूळ गाव. गावं नव्हे, खेडं. इथली चार-दोन पुढारलेली माणसं सोडली तर सारी कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर, बांधकामावर जाणारे मजुर. अर्ध्याहून अधिक लोक ऊसतोड कामगार. माझं कुटुंबही त्यातलं. माझ्या आईवडीलांनी तब्बल पंचवीस वर्ष ऊस तोडायचं काम केलं. मी थकलेल्या आजी-आजोबांसोबत गावी रहायचो. सुटीच्या दिवशी शिरुर कासारच्या बाजारपेठेत असलेल्या अशोक गणपत भांडेकर यांच्या हॉटेलात काम करायचो. त्यातूनच शाळेसाठी लागणारा खर्च भागायचा. ग्रामीण भागातील कष्टकरी माणसं व्यसनाच्या आहारी जातात. सर्वाधिक तंबाखू खाल्ली जाते. ग्रामीण बाजारात अगदी किलोने त्याची खरेदी होते. अलिकडच्या काळात तंबाखुसह मावा, गुटखा खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.
माझंही तसंच झालं. शाळा शिकताना हॉटेलचं काम सोडून बांधकामावर मजुर, वाळूचे टॅक्टचर भरायला जायला लागलो. याच काळात, वयाच्या पंधराव्या वर्षी नकळत मला तंबाखुचं व्यसन लागलं. बघता- बघता तंबाखु, माव्याच्या आहारी गेलो. पुढे पत्रकारितेत आलो. समाजिक कामात झोकून दिलं. मात्र हे व्यसन सुटत नव्हतं. त्यात लग्नानंतर बऱ्याच वर्षांने मुलगी झाली, पाठोपाठ तीन वर्षाने मुलगा. सारं सुरळीत सुरु होतं. समाजिक कार्यकर्ता, प्रगल्भ पत्रकार म्हणून नावलौकीक होत असताना माझी व्यसनाधीनता मलाच किळसवाणी वाटत होती.
माझ्या घरात फक्त मीच तंबाखुच्या पूर्णपणे आहारी गेलेलो. वडीलांनीही अनेक वेळा मला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला. मी तंबाखु, माव्याला सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मला सोडत नव्हती.
मुलगी शिवानी, मुलगा मेघराज आणि पत्नी शारदा यांनी मला व्यसनमुक्त करण्याचा चंगच बांधला. चार-पाच वर्षांची लेकरं मला तंबाखू खाण्याबाबत डिवचत, माझा रागराग करत. पोरांच्या बोलण्याचा राग येई. त्यांच्या सततच्या आग्रहाने एकदा इतका राग आला की खिशातील तंबाखुची, माव्याची पुडी फेकून दिली. १९९४ साली वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी लागलेलं व्यसन पोरांमुळे २०१४मध्ये म्हणजे वीस वर्षांनी सुटलं. माझे सहकारी अचंबित झालेच.
कितीही प्रयत्न केले तरी सहजपणे कधीच न सुटणारी तंबाखु सोडून एक वर्षांचा काळ लोटल्यावर मात्र सगळ्यां सहकाऱ्यांनी मिळून माझं कौतुक केलं.
मी व्यसनमुक्त होऊन आता तीन वर्षाचा काळ लोटतोय. आता आमच्या बापलेकरांत वेगळंच मैत्रीचं नातं निर्माण झालय. पोरगी मुद्दामहून विचारते, “पप्पा तंबाखू खाल्ली काय?” मी उत्तर देतो, “नाही खाल्ली अन्‌ खाणारही नाही.” आमच्यात झालेल्या मैत्रीच्या नात्याचाही मला अभिमान वाटतो. खरं म्हणजे केवळ पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो. माझ्या पालकत्वाचा हाच खरा प्रवास मी समजतो.
 सूर्यकांत नेटके

कपड्याकडून सॅनिटरी नॅपकीनकडे

‘नवी उमेद’ने गेल्या आठवड्यात #तिचेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया या पोस्टची कँपेन केली, तेव्हा अनसरवाडा (जिल्हा लातूर. निलंगा तालुका) गावालगतच्या गोपाळ खेळकर या भटक्या समाजाच्या वस्तीतल्या स्त्रियांना अंतर्वस्त्र का वापरायची हे छाया काकडे समजावून सांगत होत्या. 
मासिक पाळीच्या काळातलं मुलींचं, स्त्रियांचं आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय असला, तरी त्याबद्दल उघड बोलणं शहरी समाजातही अवघड असतं. मग तिथे काय वातावरण असेल...? जेमतेम ६०० लोकवस्ती. त्यात २७५ महिला. तारेवर चालणं आणि रिंगखेळ हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय. वस्तीशाळेतला तरूण शिक्षक नरसिंग झरे याने इथं महिलांसाठी काम सुरू केलेलं. गेल्या सहा महिन्यांपासून छाया काकडे यांनीही आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी या वस्तीत जायला सुरुवात केली. छायाताईंचं पारधेवाडीत सॅनिटरी नॅपकिन तयार करायचं एक युनिट. त्याविषयी ‘नवी उमेद’मध्ये आम्ही मागे लिहिलंच होतं. विचारधारा ग्रामीण विकास या त्यांच्या संस्थेमार्फत छायाताई अनेक कामं करत असतात.
गोपाळ वस्तीतल्या महिलांशी बोलताना जाणवलं की, आरोग्यविषयक जागरुकता नाही. केसाला ना तेल, ना साबण, ना रोजची आंघोळ. छायाताई सांगतात, "पहिल्यांदा संध्याकाळी वस्तीत गेले. अर्ध्याच तास थांबले. पण जमलेल्या महिलांपैकी दहा जणी दारूच्या नशेत. मग काय बोलणं होणार? मग तेव्हा ठरवलं की, इथं दिवसाच यायचं."
नंतर घराघरात जाऊन महिलांशी चर्चा सुरू केली. आरोग्यशिबिरं घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, या काळात स्वच्छता कशी राखायची हे सांगणं सुरु झालं. छायाताई म्हणतात, "आमचा उद्देश होता, की महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापराच्या प्रवाहात आणायचं." पाळीच्या काळातल्या विविध समजुती इथंही होत्याच. एकतर पालं छोटी, कपडे वाळवायलाही जागा नाही. त्यातून ती लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून दुसऱ्या कुठल्यातरी कपड्याखाली ठेवलेली. कित्येकदा तर पाळी संपली की ती कापडं कुठेतरी वळचणीला, दगडाखाली ठेवली जातात. नंतर पुढच्या पाळीला ती तशीच मळलेली, धुळीची वापरायची. यातून जंतूसंसर्ग होणार, नाही तर काय? काहींना तर महिन्यातले १०-१२ दिवस रक्तस्त्राव सुरूच. त्यातून कापड वापरल्याने मांड्यांवर पुरळ, जखमा ठरलेल्या.
छायाताईंनी हळूहळू सर्वांना सॅनिटरी नॅपकिन दाखवायला सुरुवात केली. नॅपकिन कसा वापरायचा हे समजावताना पॅड निकरमध्ये लावायचं हे सांगितल्यावर कळलं की या महिला अंतर्वस्त्रचं वापरत नाहीत. आता अंतर्वस्त्र का वापरायची इथूनच सुरुवात करावी लागणार होती. सॅनिटरी नॅपकिन तर मोफत देणार होतोच. अंतर्वस्त्रासाठीही पैसे उभे करावे लागणार होते. छायाताई सोशल मिडियाचा उपयोग करत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना स्वतःच्या कामाची माहिती देत असतात. त्याचं फळ कधीतरी मिळतंच. या वेळी मदत मिळाली ती - महिलाआरोग्याबात जिव्हाळा असणार्‍या प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांची.
तरीही प्रश्न होता भाषेचा. या समाजाची भाषा गुजराती. वस्तीतल्या सखुबाईला चांगलं मराठी येतं. तिनं मदत केली. छायाताई सखूबाईला आणि सखूबाई बायांना सांगू लागली. बायांशी असा संवाद सुरू झाला. समजूत पटून काही जणी पॅड वापरू लागल्या आणि अनुभवही मैत्रिणींना सांगू लागल्या. एकजण म्हणाली, "कपड्यामुळे शेतात काम करताना त्रास व्हायचा, मांडीच्या बाजूला दुखायचं. आता न्यापकीनमुळे आम्हांला गादी मिळाली आहे’.
- वर्षा आठवले.

कर्णबधीर मुलंही शिकतील, श्रवणयंत्र सेल बँकेच्या साथीने


कर्णबधीर मुलं ही इतर सर्वसामान्य बालकांसारखीच. केवळ ऐकण्याच्या क्षमतेचा अभाव हे त्यांच्यातील वैगुण्य. पण, या वैगुण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व झाकोळते. समोरचा काय सांगतो ते समजत नाही, समजत नसल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद देता येत नाही. यावर मात करण्यासाठीच श्रवणयंत्र वापरले जाते. त्यासाठीची बॅटरी सतत वापरल्याने खराब होते. हीच अडचण मुलांसोबत नेहमीचं वावरल्याने अर्चनाताईंच्या लक्षात आली. चार दिवसात हे सेल बदलावे लागतात. त्याचा महिन्याकाठी खर्च येतो चारशे रुपये. बॅटरी उतरली की, यंत्र बंद पडते. सर्वच पालकांना हा खर्च कसा पेलणार? वास्तविक श्रवणयंत्र मुलांनी दिवसभर वापरायला हवं. पण, खर्चामुळे काटकसरीचे धोरण ठेवून ते वापरले जाते. त्यामुळे, कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येते. 

नाशिक इथल्या ‘श्रीमती माई लेले श्रवणविकास विद्यालयातील ही गोष्ट. अर्चना कोठावदे इथल्या शिक्षिका. मुलांच्या शिक्षणप्रक्रियेतला हा अडथळा त्या रोजच पाहत होत्या. अर्चनाताई म्हणतात, ‘श्रवणयंत्राद्वारे विद्यार्थ्यांना काही अंशी ऐकू येते. सभोवतालचे शब्द एकसारखे कानावर पडले की, त्यांना संवाद साधण्यात मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत यंत्र वापरणे गरजेचे आहे. सेलचा खर्च अधिक असल्याने यंत्राचा वापर टाळला जातो. सर्वसाधारण श्रवण यंत्रासाठी (दोन्ही कानाची मिळून) किमान २५ हजारपासून ६५ हजार रुपये मोजावे लागतात. ती कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवण्याचा खर्चही मोठा आहे. ही यंत्रणा कार्यान्वित राखणे अनिवार्य आहे’. म्हणूनच मग त्यांच्या मनात ‘श्रवणयंत्र सेल बँके’ची कल्पना आली.
श्रवणयंत्र सेल बँक उभी करणं हा प्रवास सोप्पा नव्हता. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी राज्यात कुठेही अशी सेल बँक अस्तित्वात नाही. हे बघून नाशिकमधील ‘रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थे’ने या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचे ठरवले. बँकेचा श्रीगणेशा झाला तो श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात. गंगापूर रस्त्यावरील माई लेले शाळेत एकूण १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील शून्य ते पाच वयोगटातील २६ विद्यार्थी शिशूनिदान केंद्रात आहेत. आज हे विद्यार्थी या बँकेचा लाभ घेत आहे. प्रकल्पसमन्वयक अर्चना कोठावदे आहेत. तर प्रकल्पप्रमुख तुषार जिंतुरकर. श्रवणयंत्र सेल बँकेद्वारे कर्णबधीर युवकांना कमीत कमी किंमतीत सेल उपलब्ध करणे, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत सेल, प्रौढ कर्णबधीरांना सेलचे वितरण, वृध्दत्वामुळे कर्णबधीरत्व आलेल्या ज्येष्ठांनाही मदत करण्याची मुख्य उद्दिष्टे असल्याचे अर्चनाताईंनी सांगितले.

प्राची उन्मेष.

आपलं अन्न विषमुक्त कधी होईल?

 शोषणमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नाच्या निर्मितीला पूरक धोरणं बनावी यासाठी काही शेतकरी आणि युवक एकत्र येऊन ‘बीजोत्सव’ नावाची चळवळ उभी करू पाहत आहेत. ही चळवळ उभी करायला हे लोक पुरे पडतील का? आपलं अन्न विषमुक्त होईल का? शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल का? शेती प्रश्नाला खरं उत्तर काय असावं.. ? प्रश्न खूप मोठे आहेत. कदाचित आपल्या आवाक्याबाहेरचे. अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणारा शेतीविषय कसा मांडला जातो यावरून सर्वसामान्य माणसाची भूमिका ठरते. 

शेतकऱ्याची सगळीकडूनच पिळवणूक होतेय यावर दुमत नाहीच. शेतीविषयात जरा खोलात डोकावलं, तर अनेक प्रश्न असल्याचं जाणवतं. बियाण्यांवरचा शेतकऱ्यांचा अधिकार निसटत चाललाय, संपूर्ण यंत्रणेचं बाजारीकरण होऊ लागलेलं आहे. त्यामुळे बियाणं आणि जमीन टिकली तरच आपले शेतकरी टिकतील, याच विचाराने बियाण्यांवर काम करणारे शेतकरी एकत्र जमले. प्रश्न जरी खूप बिकट असला तरी ह्याचा गुंता सोडवायला सुरुवात झालीच पाहिजे, आणि ती सक्रीय आणि शाश्वत काम उभारूनच होईल याच ध्येयाने बिजोत्सवाची सुरुवात झाली.

बियाण्यांचं जतन आणि देवाणघेवाण उत्सवासारखं साजरं करणं म्हणजेच बीजोत्सव. बीजोत्सवच्या माध्यमातून सेंद्रिय शेतकरी, ग्राहक आणि ह्या चळवळीला हातभार लावणारे लोक एकत्र येतात. आणि अनुभवांची देवाणघेवाण करून पुढच्या वर्षीच्या नियोजनाला लागतात. हे गेली पाच वर्ष सुरु आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांपासून बिजोत्सवाची सुरुवात झाली. आता ह्या उपक्रमात शेकडोने लोक सहभागी होताना दिसतात. इथे तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग आहे. बियाण्यांवर अधिकार शेतकऱ्यांचाच असावा असा आग्रह धरणारे हे तरुण. आज आणि उद्या सगळ्यांनाच विषमुक्त अन्न मिळो, ही संकल्पना लोकांपर्यंत पोचवणं हेच बिजोत्सवाचं मुख्य काम.
अन्नाची गरज आपल्याला रोजच भासते. तेव्हा बीजोत्सवसारख्या एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल आपण जाणून घ्यायला हवं. एक गोष्ट आपण सहज करू शकतो. ते म्हणजे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटणं, त्यांच्या कामाला बळ देणं, त्यांचे अनुभव जाणून घेणं. आपण ग्राहक असलो म्हणून काय झालं, मला विषमुक्त अन्नसेवन करण्याचा अधिकार आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही...
भविष्यातल्या पिढीलाही ‘विषमुक्त अन्न मिळो’ ही अपेक्षा ठेऊन बिजोत्सव कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. आपणही या प्रवासात जरूर सामील व्हायला हवे. 
- तेजश्री कांबळे.

मुलांना त्यांच्या आवडीनुसार वागू द्यायचं

"अपघात म्हणजे काय, आई? त्यांचे चेहरे का झाकलेत? सर्वजण टाळ्या का वाजताय? मोदींनी काय सांगितलं? तुम्ही काय ऐकताय?..." अशा प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. एका प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत दुसरा प्रश्न पुढ्यात येऊन उभा. त्यांना कार्टुन पाहा सांगितलं की मुलं बातम्या किंवा ‘आस्था’वर योगासनं पाहतात. मात्र मी बातम्या पाहण्यासाठी रिमोट हातात घेतला की त्यांना कार्टुन किंवा आवडती मालिका पहायची असते. त्यावेळी मुलांना त्यांच्या आवडीनुसार वागू द्यायचं किंवा काय हा प्रश्न मला पडतो. 
२०१०मध्ये आर्या आणि रुद्रच्या रुपात दोन चिमुकले जीव एकत्रच माझ्या ओंजळीत आले. त्या चिमुकल्यांना बघायला येणार्यांनकडून नातं सांगण्याची स्पर्धा सुरू असतांना त्या दोघांना एकत्र वाढविणं कसोटी ठरणार याची प्रचिती येण्यास सुरूवात झाली. माझी नोकरी असली तरी आमचं एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी माझ्या एकटीवर आलीच नाही. घरातल्या प्रत्येकाने माझा भार हलका केला. सुजाण पालकत्व, मुले कशी वाढवणार अशी काही पुस्तकं वाचली. मात्र पालक या शब्दाशी खरी ओळख व्हायला सुरूवात झाली ती पूर्व प्राथमिकच्या वर्गात प्रवेश घेतला तेव्हापासून. त्यांना अभ्यासाची गोडी लावायची, त्यांचे लाड पुरवतानाही शिस्तही लावायची. त्यांच्यासाठी काय योग्य काय नाही हे ठवायचं. त्यांच्या खेळकर वृत्तीला विधायकतेकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. अशी पालक म्हणून आपली परीक्षा सुरूच राहते. 
आर्या आणि रुद्र दोघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असल्याने दोघांना एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. ती एकमेकांशी तुलनाही करतात. त्याला तसं, मग मला असं का? हा मुलांकडून विचारला जाणारा प्रश्न माझ्या सहनशक्तीचा अंत पाहणारा असतो.
आर्या हसरी, खेळकर, अभ्यासासाठी आग्रही, नीटनेटकी, सर्व कामांमध्ये स्वतःहून पुढाकार घेणारी, सगळं काही शिकण्याची तयारी दाखवणारी. रुद्र नेमका उलट. नाव सार्थ करणारा. जरा मनाविरूध्द काही घडलं तर चिडणारा. अभ्यास सोडून सर्व काही बोला हा त्याचा तोरा. या दोघांना सांभाळतांना लक्षात आलं की पुस्तकी ‘सुजाण पालकत्व’ इथे कामी येणार नाही.
अभ्यासात त्यांनी पुढे असावं हा आग्रह नाही पण आपण काय शिकतोय हे त्यांना किमान कळावं, कळलेलं इतरांपर्यंत पोचवता यावं, ही अपेक्षा आहे. माझ्या कामानिमित्ताने समाजात काय घडतयं हे वेळोवेळी समजत असतं. ते मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्नही करते. दिवसभरात काय बातम्या केल्या, कुठे गेले हा तपशील मुलांना रोज सांगते. त्यांच्या परीने आकलन करून घेत असतीलच. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं एवढंच माझ्या हातात असतं. बातम्या सुरू झाल्या की आई, तुझी बातमी यात का नाही? मग तू नव्हती का गेलीस, त्या कार्यक्रमाला? असे अनेक प्रश्न. संगोपन असं खास काही करत नाही. पण माझ्या मुलांनी एक चांगली व्यक्ती व्हावं. आपल्याला मिळणार्याच सुखसुविधा काहींना मिळतदेखील नाहीत, ही जाणीव त्यांनी ठेवावी हीच माझी इच्छा. 
 चारूशीला कुलकर्णी.

लाईन वूमन



दूरवर तयार होणारी वीज आपल्या घरापर्यंत येते. लाइनमनने जवळच्या एखाद्या खांबावरून वायर जोडून वीज आपल्या घरातील मीटरपर्यंत पोचवलेली असते. ट्रान्सफॉर्मर, फ्यूज यासारखी तांत्रिक नावे कधीतरी आपल्या कानावर पडलेली असतात. ‘डीपी जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित’ यासारख्या बातम्या पेपरात वाचलेल्या असतात. वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणशी, आपला याहून अधिक संबंध नसतो. एका युवतीने मात्र याच महावितरणकडे लोकांचं लक्ष वळवलं आहे. उषा भाऊसाहेब जगदाळे हे तिचं नाव. कडा गावात महावितरणमध्ये ती लाईनमन म्हणून काम करते. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातलं कडा हे १८ हजार लोकवस्तीचं गावं. गावात सहा महाविद्यालयं, पाच-सहा शाळा, दवाखाने आहेत. तिथं महिला नोकरी करतातही. पण महावितरणमध्ये लाईनमन म्हणून काम करणाऱ्या गावातील पहिल्या महिलेचा मान उषाकडे जातो. 
लाईनमनची कामं कोणती? विजेच्या खांबावर चढून वीज कनेक्शन जोडून देणे, डीपी दुरुस्त करणे, फ्यूज जोडून देणे. अर्थातच ही तांत्रिक कामे करणारे केवळ पुरुषच दिसतात. पण त्यांच्याच बरोबरीने ही कामे उषा सहजपणे करते आहे. 


आष्टी तालुक्यातलं देवीगव्हाण माहेर आणि तवलवाडी हे तिचं सासर. उषा मूळची खो खो खेळाडू. तब्बल अकरा वेळा ती राष्ट्रीय पातळीवर खो खो खेळली आहे. त्यामुळेच उषाची महावितरणमध्ये खेळाडूसाठीच्या राखीव जागेवर नोकरीसाठी निवड झाली. २०१३ मध्ये ती कनिष्ठ तंत्रज्ञ या जागेवर रुजू झाली. आष्टीच्या कार्यालयात तिला लिपिक वर्गाचे काम देण्यात आले होते. तिथे काम करतानाच तिने आयटीआयचा वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केला. मग वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कड्यात पदोन्नतीवर बदली झाली. आता कड्यात वीज बिल वसुलीसोबतच लाईनमनची सगळी कामं ती करते. एरवी इमारतीच्या गच्चीवरून खाली पाहिले तरी अनेकांना गरगरते. उषासाठी मात्र कोणत्याही आधाराशिवाय खांबावर चढून तारा जोडणे हा रोजच्या कामाचाच भाग. उषाची सफाईदारपणे चाललेली कामे अनेक महिला मुली मोठ्या कौतुकाने पाहत असतात. 
उषाच्या घरी शेती हाच व्यवसाय. त्यामुळे घरची आणि शेतातली कामे पूर्ण करून उषा नोकरीच्या फिल्डवर आपले कर्तव्य बजावत असते. अमुक कामे पुरुषांची तर तमुक महिलांची असा समज निदान महावितरणपुरता तरी उषाने आपल्या कामाने दूर केला आहे.
- राजेश राउत.

सामूहिक शेतीचं तीर्थक्षेत्र - 'आमळी'

धुळे जिल्ह्यातलं आदिवासी गाव - आमळी. पाच पाड्यांनी बनलेली ग्रामपंचायत, चार हजार लोकवस्ती. जिल्हा मुख्यालयापासून तब्बल ९० किलोमीटर दूर. आमळीला जाण्यासाठी नागमोडी रस्ता पार करत ओसाड दिसणाऱ्या डोंगररांगामध्ये शिरावं लागत. 
असं दुर्गम गाव सामूहिक शेतीचं तीर्थक्षेत्रच बनलं आहे. इथल्या बचतगटांचा विकास आणि सामूहिक सेंद्रिय शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी गेल्या बारा वर्षात तब्बल पंधरा हजार लोकांनी आमळीला भेट दिली आहे.
जो इतर आदिवासींचा जीवनसंघर्ष, तोच इथं. मात्र गेल्या बारा वर्षात गावाचं रुपडं बदललं. हे घडवून आणलं भीमराव बोरसे यांनी. फक्त पाचवी शिकलेल्या भीमरावांनी. आपलं गावं समृद्ध करायचं स्वप्न त्यांनी पाहिलं. विविध विकसित गावांना त्यांनी भेटी दिल्या आणि गावाच्या मानवविकासाचा कृती आराखडा डोक्यात पक्का केला. वर्ष होत २००४. 
पहिलं काम, शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्याचं. 'एक काडी भात' पद्धतीने भात लागवड करून यश मिळवलं. आज याच ‘एक काडी भात लागवड पद्धती’चा अवलंब आदिवासी करत आहेत. पुढे उत्पादित माल कवडीमोल भावात विकायचा नाही, हे ठरवलं. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. आणि गावात उत्पादित झालेला तांदूळ, गहू, नागली, हरभरा, वाटाणा व्यापाऱ्यांना न विकता स्वतः पॅकिंग करून कृषी प्रदर्शनात विकण्याचा संकल्प केला. या कामासाठी महिलांची मदत घेतली गेली. एकेक करून गावात २२ महिला बचत गट सुरु केले गेले. या बचतगटांना उत्पादित शेतमालाचं ग्रेडिंग, पँकिंग करण्याचं प्रशिक्षण दिलं. 

आज सुमारे ३०० आदिवासी महिला या पद्धतीने शेतमाल बाजारात विकत आहेत. यातून १२ लाखांची गंगाजळी आज घडीला या बचतगटांकडे जमा झाली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांसह महिलांचाही आर्थिक स्तर उंचावला. याचं श्रेय भीमरावांनाच. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना, महिलांना राज्यात, परराज्यात कृषीसहलींना नेऊन कृषीसाक्षर केलं. त्यातून वेगवेगळे प्रयोग केले आणि तोट्यातील शेती नफ्यात आणून गावगाडा रुळावर आणला. 
मग पुरुषांचेही बचतगट तयार केले. गावातील ३५० हून अधिक शेतकरी आता बचतगटात आहेत. हे सर्वजण एकत्र येऊन शेतीचं नियोजन करतात. सामूहिक शेती हे इथलं वैशिष्ट्य. कोण काय पेरणी करेल, सर्वाना किती आणि कोणत्या प्रकारचं बियाणे, खतं लागतील याचा हिशोब केला जातो. सामूहिकपणेच ते खरिदलं जातं. सर्वांनाच सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण मिळाल्याने शेतकरी जीवामृत, गोमूत्र, गांडूळखत तयार करतात. 
भीमरावांनी कृषी विभागाच्या मदतीने सामूहिक शेती अवजार बँक तयार केली आहे. या बँकेतली ४८ अवजारं गरजेप्रमाणे वापरायला मिळतात. त्यासाठीचं मूल्य प्रति दिवस १५ ते ४०० रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम वर्षाअखेरीस ग्रामविकास संस्थेत जमा केेली जाते. याच संस्थेमार्फत शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विकला जातो. विक्रीतून मिळालेल्या नफ्याच्या रकमेतून गरजू शेतकऱ्यांना कर्जवाटप केलं जातं. अवघ्या एक टक्के दराने या शेतकऱ्यांना वर्षभर कर्ज मिळतं. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन खर्च कमी होतो. हातसडीच्या तांदळाचा उत्पादन खर्च ४० रुपये किलो आणि तो विकला जातो ८० रुपये किलोने. यावरून या शेतकऱ्यांच्या अर्थचक्रात झालेला बदल आपल्या लक्षात येईल. 
भीमराव बोरसे यांनी गावात पाणलोट विकासही केला आहे. सेंद्रिय शेती, देशी वाणाचं संवर्धन, समूहशेती यातून निसर्गाची परंपरा कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या या कामामुळे आदिवासी समाज संघटित तर झालाच. आणि स्थलांतर, मुलांची शिक्षणातील गळती कमी होऊन आदिवासी बांधवांचं जीवनमानही उंचावलं आहे.
- प्रशांत परदेशी.

बॅडमिंटन चॅम्पियनचा पिता म्हणून मीच घडत गेलो


बॅडमिंटन चॅम्पियनचा पिता म्हणून मीच घडत गेलो, असं मला वाटतं. अमन जन्मला तेव्हा आम्हा दोघांपैकी मी त्याच्या संगोपनासाठी अधिक वेळ देणार, हे ठरलं होतं. त्याच्यातला क्रीडापटू फार लवकर आमच्या लक्षात आला कारण आम्ही त्याच्याबरोबर बॅडमिंटन खेळायचो. मग त्याला उत्तम प्रशिक्षण द्यायचं ठरलं. ठाण्यात ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’मध्ये ते सुरू केलं. कुटुंबाचे दैनंदिन व्यवहार मग ह्या कोचिंगला अनुसरून आखले. आम्ही पनवेलमध्ये राहात होतो. आठ वर्षांच्या अमनला कोचिंगसाठी पहाटे साडेपाचला निघावं लागायचं. आधी उठून त्याचा डबा तयार करून मी त्याला उठवायचो. आमच्याकडे गाडी होती. मी चालवायचो नि तो स्टेडियम येईपर्यंत झोप काढायचा.
स्टेडियममध्ये त्याचा सराव सुरू असताना मी लॅपटॉपवर, फोनवरून माझं काम करत बसायचो. फ्री लान्स पद्धतीचं काम मी निवडलं होतं. सामाजिक काम हे माझं ध्येय मी या वेळापत्रकात बसवू शकत होतो. राज्य पातळीवर खेळत असताना अमनच्या टूर्नामेंट जिल्ह्यांत असायच्या तेव्हा मी त्या त्या जिल्ह्यांतली कामं जोडून घ्यायचो. शाळेनं अमनला सरावासाठी सूट दिली होती. त्याचा तो योग्य उपयोग करत होता. तरीही ठाण्याचं दादोजी कोंडदेव स्टेडियम लांब पडायचं. म्हणून ठाण्यात राहायचं ठरवलं. तिथे माझं वर्तुळ नव्हतं. जाण्यायेण्याच्या वाटा बदलल्या. फार दिवस त्या वातावरणात राहू शकलो नाही. परत पनवेलला आलो.
दरम्यान मी ‘प्रथम’मध्ये पूर्ण वेळ काम सुरू केलं होतं. मी कामात अधिक व्यस्त नि अमनही मोठा बऱ्यापैकी स्वतंत्र झालेला.
त्याच्यावर संस्कार असे काही वेगळे केले नाहीत. ‘फुले-आंबेडकरी चळवळीचा वारसा’ वगैरे माझ्या मनात नसतं. पण माझ्या कामांचा विषयच सामाजिक असल्याने अमनला समानता, मूलभूत हक्कांविषयी माहिती आहे. २६ जानेवारी हा संविधान दिन कसकसा महत्त्वाचा आहे, हे त्याला आईमुळे माहीत आहे. क्लास वन अधिकारी या नात्याने सरकारी कार्यालयांत तिच्या हस्ते झेंडावंदन व्हायचं. आम्ही सगळेच कार्यक्रमाला असायचो. या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर आहेत. आमच्याकडे पूर्णवेळ कामाला असणाऱ्या मुलीचं शिक्षण अर्ध्यावर सुटलंय. हा म्हणतो, तिला आपण नाइट कॉलेजमध्ये घालू. तिला चांगला जॉब शोधता येईल...
टूर्नामेंटमध्ये यशस्वी होण्याची त्याला सवय आहे. मात्र २००६मध्ये तो अंडर १० गटात रनर अप ठरला. अव्वल न आल्याचं खापर तो परिस्थितीवर फोडू लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं, कोणत्या मूव्ह चुकल्या होत्या त्या हेरून त्यावर मात कशी करता येईल, याचा विचार करण्यासाठी हा वेळ, शक्ती खर्च कर. नंतर कधीही त्यानं आरोपवजा तक्रारी केल्या नाहीत.
शाळेत तो फार हजर नसल्यामुळे त्याला मित्र फारसे नाहीत. माझ्या मित्रांच्या मुलांबरोबर मात्र त्याचं छान शेअरिंग असतं. त्यामुळे पिअर ग्रुपची गरज भागते.
आई म्हणजे वात्सल्य नि वडील म्हणजे भावनेपेक्षा कर्तव्यबुद्धी असा सर्वसामान्य समज. पण आमच्या बाबतीत उलटं आहे. मी भावनिकपणे सगळं हाताळतो. अमनला माझ्या वात्सल्याची अधिक सवय आहे. आणि तोही मला नेमकं ओळखतो. मला वैचारिक पुस्तकांची भेट त्यानं अनेकदा दिली आहे. मी त्याचं सगळं सहजपणे करू शकलो कारण माझ्या आईनं बहिणींच्या बरोबरीनं मलाही घरकाम शिकवलं होतं. सगळ्यांना सगळी कामं यावीत, असं तिचं म्हणणं. त्याचं फळ मला पालकत्व एंजॉय करताना मिळालं.
एकल पालकत्व वाट्याला आलं तेव्हा मात्र कमावत्या पालकाची उरलेली ५० टक्के भूमिकाही करावी लागली. पूर्णवेळ काम करून ती निभावण्याचा प्रयत्न करत आहे. अमनला गरजेपुरता स्वयंपाक येतो. प्रशिक्षणासाठी देशापरदेशात महिना महिना राहायचं तर कपडे धुणं, घराची स्वच्छता या बाबतीत तो परावलंबी नाही. हे सगळं शिकताना आमच्यात खटके असे कधी उडाले नाहीत.
२०१६मध्ये चंदीगढ इथं त्यानं नॅशनल चॅम्पियनशिप पटकावली. ठाणे डिस्ट्रिक्ट टूर्नामेंटमध्ये तर अंडर १७ फायनल, अंडर १९ फायनल जिंकण्याबरोबर मेन्स ओपनमध्येही त्यानं चमक दाखवली आहे. त्याच्या यशाबरोबर माझ्यासमोरचं आव्हानही मोठं होत आहे.
प्रवास पालकत्वाचा: संजय लोखंडे
शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश

Thursday 20 April 2017

आधी झेंडा दर्ग्यावर, मग गुढी घरोघरी



सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं मेंढा गावं. लोकसंख्या ३५००. निजामोद्दीन अवलिया यांचा दर्गा आणि विठ्ठल मंदिर हे गावाचं दैवत. दोन्ही धर्मातील भाविक दर्ग्यापुढे नतमस्तक होतात. ऊरुसानंतर येणारा पाडव्याचा सण म्हणजे दोन्ही धर्मासाठी आनंदाची पर्वणी. गुढी उभारण्यापूर्वी गावातील विठ्ठल मंदिरातून झेंड्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी दर्ग्याला पहाटेपासून पाणी घातले जाते. ऊद चढविला जातो. गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिक यात सहभागी होतो. पहाटे सुरु झालेली ही मिरवणूक सकाळी दर्ग्यापर्यंत येते. दर्ग्याच्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर पांढरा, चंद्रकोर असलेला झेंडा बांधला जातो. हा झेंडा बांधण्याचा मान गावातील मुलाणी यांच्याकडे आहे. यानंतरच गावात घरोघरी गुढी उभारली जाते. गावाने अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपली आहे. कच्चीर बेग म्हणतात, ‘दोन्ही धर्मातील नागरिक आनंदाने एकमेकांच्या सणामध्ये भाग घेतात. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. गावात कधीही जातीय वाद निर्माण झालेला नाही. आम्ही दोन्ही समाजातील देवतांचा आदर करतो. सगळ्यांनी सामाजिक भान जपले आहे.’ 

गुढी पाडव्याचा सामाजिक गोडवा कायम टिकवण्यासाठी बाहेरगावी राहणारे अनेक चाकरमाने उत्सवाला गावी येतात. गावाने जपलेला हा सामाजिक एकोपा आदर्श आहे. निजामोद्दीन दर्गा आणि विठ्ठल मंदिर या दोन्ही देवतांचा गावकरी आदर करतात. अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रत्येक कुटुंब वर्गणी देतं. त्यासाठी कुणाला जबरदस्ती करण्याची गरज पडत नाही. सप्ताहातील सर्व कार्यक्रमाला मुस्लिम मंडळी मदत करतात. ऊरुसासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून माणशी ५० रुपये वर्गणी दिली जाते. ऊरुसातील प्रत्येक कार्यक्रमही एकमेकांना मान देऊनच केले जातात. ‘ऊरुसामध्ये कंदुरीचा मोठा कार्यक्रम केला जातो. शाकाहारी नागरिकांसाठी मुस्लिम समाजातर्फे वरण भाकरीचा कार्यक्रम केला जातो. ऊरुसादरम्यान कुणीही भुकेला राहणार नाही,याची खबरदारी घेतली जाते, असं ग्रामस्थ गौतम कोचेटा यांनी सांगितलं. 
 चंद्रसेन देशमुख.

नवा दृष्टिकोन आला, शेतीत बदल घडू लागला


जिल्हा नाशिक. तालुका दिंडोरी. द्राक्षांसाठी प्रसिद्ध. इथल्या वणी गावात वरुण पाचपेंड या तरुणाची वडिलोपार्जित २२ एकर शेती. या शेतीनंही आजपर्यंत द्राक्षंच पाहिलेली. पण, शेतात राबराबून पिकाला मिळणारा अत्यल्प भाव, निर्यातीसाठी पाठवल्यानंतर, नाकारून अचानक परत येणारा माल या सगळ्यातून वडिलांना येणारी हतबलता, हे सगळंच वरुणनी लहानपणापासून अनुभवलं. त्यामुळेच आता त्यानं या नेहमीच्या शेतीपद्धतीला फाटा द्यायचं ठरवलं. नव्या दृष्टीने शेतीकडे बघायला आणि शिकायला हवं म्हणून वरुणनी अग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला. सध्या तो शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. पण सोबतच वडिलांबरोबर त्यानं शेतीत प्रयोग चालू ठेवले. शेतीत टोमॅटोची लागवड केली. आंतरपीक पद्धतीनं झेंडू आणि तुळशीची लागवड केली. यामुळे टोमॅटोवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला नाही. उत्पादनही वाढले. हे सगळं सुरु असतानाच ‘स्पिरुलीना’ म्हणजेच शेवाळशेतीविषयी लेख वाचनात आला. 
अहमदनगर येथे जाऊन त्याने ‘स्पिरुलीना’ शेतीचं प्रशिक्षणही घेतले. तसेच ही शेती कुठे सुरू आहे, बाजारपेठेत तिला मागणी किती अशी माहिती त्यानं गोळा केली. नगर, पुणे, आष्टी, बाभळेश्वर या ठिकाणी ही शेती सध्या सुरू आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन त्याने पाहणीही केली. आता नाशिकमध्येही शेवाळशेती सुरू व्हावी यासाठी तो शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करतो आहे. मात्र शेवाळशेतीविषयी कमालीचे गैरसमज असून याविषयी कुठलाही धोका पत्करण्यास शेतकरी तयार नाहीत, असं तो सांगतो. 
शेवाळशेती करण्यासाठी विशिष्ट आकारातील टॅकमध्ये मीठ तसेच काही रासायनिक घटक मिसळून खारे पाणी तयार केले जाते. त्यात स्पिरुलीनाची पूड विरघळून घेतली जाते. दिवसातून तीन ते चार वेळा ती हलवावी लागते. विशिष्ट तापमानात या वनस्पतीची वाढ उत्तम होते. १० -१५ दिवस ही प्रक्रिया सुरू राहते. मग पाण्यावर हिरव्या रंगाचा थर तयार होतो. त्या थरावर प्रक्रिया करत स्पिरुलीनाची भुकटी मिळते. या भुकटीचा वापर उत्पादनाच्या गरजेनुसार करता येतो.
वरूण म्हणतो, स्पिरुलीना ही एक समुद्रातील वनस्पती आहे. जैवप्रतिबंधक म्हणून तिचा उपयोग केला जातो. समुद्राच्या खारट पाण्यात तिची वाढ चांगली होत असली तरी कृत्रिम पध्दतीने बाथरुममधल्या टपापासून घराच्या छपरावरही ही शेती कमी खर्चात करता येऊ शकते. यासाठी पारंपरिक पध्दतीने लागणारा वेळ, पैसा आणि श्रम सहज वाचविता येऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न यातून मिळू शकते. आज बाजारपेठेत स्पीरूलीनाला विशेष मागणी आहे. कित्येक आजारांवर औषधे तयार करण्यासाठी स्पिरुलीना वापरली जाते. याशिवाय ही वनस्पती पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणूनही वापरली जाते’.
 सध्या प्रायोगिक तत्वावर तो ही शेती करतो आहे. पुढे व्यापक स्वरुपात, व्यवसायिक दृष्टया हे काम करण्यासाठी त्याचं संशोधनही सुरू आहे. सध्या शेवाळशेतीसोबतच अमेरिकन केशर व ड्रॅगन फ्रुट यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष लागवड त्याने केली आहे.
- प्राची उन्मेष.

घर ज्यांचे दूर गेले....

तीन वर्ष वय असताना वडील सोडून गेले, पाठोपाठ काही दिवसातच आई सोडून गेली. जग कळायच्या आत माय-बापाच्या मायेला ती पोरकी झाली. थकलेल्या आजी-आजोबांनी आधार दिला. तीन-चार वर्षांनी त्यांनाही संभाळणं अवघड झालं. अनाथ प्रतिक्षाला (नाव बदललं आहे) ‘सावली’चा आधार मिळाला अन्‌ जगायला वाट मिळाली. ‘दहा-अकरा वर्ष झाली, मी इथं राहतेय. हे माझं घर आहे. मी अनाथ आहे असं मला कधी वाटतच नाही, अन्‌ वाटणारही नाही’, अकरावीत शिकणारी प्रतिक्षा सांगत होती.
नगरच्याकेडगावांतलं 'सावली' नावाचं अनाथालय. म्हणायला अनाथालय. पण खरंतर आई-वडील नसलेल्या मुलांचं हक्काचं घर. आणि नात्यातल्या माणसांनी सोडलेल्या लेकरांना आधार देणारी, जगवणारी आणि नव्या उमेदीने जगायला सांगणारी एक संस्था. येथे गेल्या दहा-अकरा वर्षापासून राहणारी प्रतिक्षा बोलती झाली. 
संस्थेचे अध्यक्ष नितीन बनसोडे यांनी प्रतिक्षाचा जीवनपट उलगडला. ते म्हणाले, ‘शहरातील एका नावाजलेल्या भागात राहणारं एक कुटूंब. त्यांना तीन वर्षांची मुलगी. सुरळीत संसार सुरु असताना दृष्ट लागली. आई-वडील गेले. एका मित्राकडून तिच्याविषयी समजले. मी तिचा सांभाळ करण्याची जबाबादारी घेतली. नियमानुसार सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आणि ती सावलीत दाखल झाली. शाळेत घातलं. तिच्या सारख्या अनेक मुली इथं घरातल्यासारख्या वावरत आहेत’. 
बनसोडे सांगत होते की, ‘सरकारी नियमानुसार अनाथालयात सहा ते अठरा वर्षापर्यत राहता येतं. त्यानंतर त्यांनी जायचं कुठे हा आमच्यासाठी कायमचा प्रश्नच असतो. म्हणून मी त्या मुलांचे नातेवाईक शोधून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यत मी दोनशे पेक्षा जास्त मुलांना नातेवाईक शोधून त्यांचे पुनर्वसन केलेय. काही मुलांना रोजगार मिळवून दिलाय. इथे संख्येपेक्षा मुलांना मी आधार देऊ शकतो हे मी महत्वाचे मानतो.'
आईवडील नसलेला प्रत्येक जण जगात अनाथच असतो. मात्र जग कळायच्या आत अनाथ झाल्यावर ज्यांना आधाराची गरज असते, ती सावलीतून मिळते हे प्रतिक्षांच्या बोलण्यातून दिसत होते, म्हणूनच
"घर ज्यांचे दूर गेले, इथे उरली सावली
याच इथे छताखाली, नाती इथे विसावली''
कवी संतोष पवार यांच्या या कवितेच्या ओळी खरंच जोडलेल्या नात्याची आणि 'सावली'तल्या सावलीची प्रचिती देते.
 - सूर्यकांत नेटके.

Friday 7 April 2017

रक्तदानाची व्हॉट्स ऍप चळवळ

धुळ्यातील मालेगाव रोडवरचं जिनिअस ऑटो स्पेअर शॉप. या दुकानाचा मालक कल्पेश दीपक शर्मा उर्फ 'केडी'. या साध्या-सुध्या पस्तिशीतल्या केडीने रक्तदात्यांची मोठी फौज तयार केली आहे. केडी यांचे वडील दीपक एका ऑपरेशनसाठी दवाखान्यात होते. केडी आणि मोठा भाऊ विनोद दोघांचंही रक्तदान चळवळीत मोठं काम. त्यामुळे रक्त मिळण्यात अडचण नव्हतीच. पण शेजारील बेडवरच्या रुग्णाच्या नातेवाईकांची घालमेल वडील बघत होते. हा रुग्ण बाहेरगावचा. धुळ्यात ओळखी नाहीत. त्यातून हव्या त्या गटाचे रक्त मिळण्यात त्यांना अडचणी येत होत्या. ते बघून वडिलांनीच दोन्ही मुलांना सांगितलं की आधी त्या रुग्णाची गरज भागवा. या आजारातून वडील बाहेर आले नाहीत. पण त्यांचे हे शेवटचे शब्द मात्र मुलांना प्रेरणा देऊन गेले. ‘दुसऱ्याला आधी मदत करायची, त्याची गरज भागवायची ही शिकवण वडिलांकडून मिळाल्याचं, केडी सांगतात. 
जून २०१६ ला केडीने आपल्या जवळच्या मित्रांसह वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'श्री दीप रक्त सेवा' नावाचा व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानाचं काम करता करता या व्हॉट्स ऍप ग्रुपवर आज घडीला ३,३०० रक्तदाते जोडले गेले आहेत. दुर्मिळ ब्लड ग्रुपसाठी स्वतंत्र लिंक तयार केल्या आहेत. अवघ्या काही महिन्यात धुळे, नाशिक, जळगाव, मलकापूर, नंदुरबार जिल्ह्यात, ‘श्री दीप रक्तसेवा’ नावाचे १७ ग्रुप तयार झाले आहेत. कुणाकडूनही आर्थिक मदत न घेता आणि २४ तास रक्तदानाची सेवा देणारा महाराष्ट्रात एवढा मोठा एखादाच ग्रुप असेल.
पार मुंबईपर्यंतच्या गरजूंना या खानदेशातल्या ग्रुपची मदत होते, यावरून या तरुण रक्तदात्यांचा झपाटा आपल्या लक्षात येईल. जातपात, धर्म, प्रदेश अशा सर्व गोष्टी बाजूला ठेवून हे तरुण रक्तदाते ‘करुनी दान रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे’ या बांधिलकीने सक्रीय आहेत. गरजूंपर्यंत रक्तदाता पोचण्याची एक व्यवस्था ग्रुपवर केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकाकडून किंवा रुग्णालयाकडून केडीला अथवा व्हॉट्स ऍप ग्रुपला कळवलं जात. केडी त्या भागातल्या ग्रुपवर रक्तगट आणि गरजू व्यक्तीचा नंबर टाकतात. काही वेळाने रक्तदात्याचा, गरजूला रक्तदान केल्याचा रिप्लाय येतो. रक्तदाते गरज भासल्यास रात्री-अपरात्रीदेखील रक्तदानाला तयार असतात. ते चहा-नाश्त्याचा खर्चसुद्धा गरजवंताला करू देत नाहीत, हे विशेष.
 सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करता येतो हे केडीने दाखवून दिलं आहे. केडीने हव्या त्या रक्तगटाचे हवे तिथे आणि पाहिजे तितके रक्त उपलब्ध करून देण्याचा अनेकवेळा विक्रम केला आहे. रक्तदानाची ही व्हॉट्स ऍप चळवळ केडीच्या चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नामुळे आता ग्रामीण भागात आणि तालुक्यापर्यंत जाऊन पोहचली आहे.
केडी यांचा संपर्क क्र. - 9423622267 / 9373709091
 - प्रशांत परदेशी

नको तेरवीचं जेवण...करू पाणीसाठवण

वाशीम जिल्हा. कारंजा तालुका. जानोरी गावं. जेमतेम ८०० लोकसंख्या. एका विहिरीवर आणि कूपनलिकेवर लोकांची भिस्त. डिसेंबर महिन्यातच इथं पाणीटंचाई सुरु होते. त्यामुळे दुष्काळ तसा कायमचाच. म्हणूनच पाणी फाऊंडेशननं स्पर्धेसाठी इतर गावांसोबत कारंजा तालुका निवडला. मग जानोरीतून तीन पुरुष आणि दोन महिलांची ग्रामसभेनं प्रशिक्षणासाठी निवड केली. पाणी संधारणाची कामं झालेल्या ठिकाणी ही टीम गेली. आणि अभ्यास करून आली. या गटानं गावातल्या लोकांना जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली. महत्त्व समजावून सांगितलं. 
गावातल्याच अन्नपूर्णा बचत गटाच्या महिलांना लगेचच या कामाचं महत्त्व समजलं. कारण सगळ्यांनीच पाण्यासाठी वणवण केलेली. मग या महिलांनी एकत्र येत "आमची तेरवी करू नका, तो पैसा जलसंधारणाच्या कामाला द्या’ असं आवाहन आपल्या मुलांना केलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन लाखांचा निधीही जमा केला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशी गावाला गोड जेवण घालायची खर्चिक प्रथा आहे. त्याऎवजी हा खर्च पाणीबचतीसाठी केला जावा, असा आग्रहच गावातल्या बायांनी धरला. 
 "गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी तेरवीत होणा-या पैश्याच्या खर्चातून गावात जलसंधारणाची कामे करा. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही. दुष्काळाची झळ सोसतांना आम्हाला झालेलं दुःख शब्दात मावण्यासारखं नाही. तेव्हा पाणी अडवा, पाणी जिरवा हीच आजच्या काळात खरी भक्ती आहे" - बचत गटाच्या सदस्य गंगाबाई भिंगारे मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात.
 : मनोज जयस्वाल 

उसाचा रस भारी...येतो तुमच्या दारी

नवं काही करणार्‍याला गुगलची साथ असतेच...
उस्मानाबाद जिल्ह्यातलं मुरूम गावं. गावातली ७० कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून सकाळी चहाऐवजी उसाचा रस घेतात. रस्त्याच्या बाजूला, बसस्थानकावर मिळणारा उसाचा थंडगार रस आपण कधी-कधी घेतो. विशेषत: उन्हाळ्यात रसाचा आस्वाद घेणारे अनेक शौकीन आहेत. पण, मुरूम शहरात पावसाळा वगळता दररोज उसाचा रस मिळतो - तोही घरपोच, ताजा, सकाळी सात वाजता. रस पुरवणारा शेतकरी आहे रामलिंग रेवणाप्पा मुळे. विशेष म्हणजे दुधाप्रमाणे या शेतकऱ्याकडे उसाचा रतीब लावण्यात आला आहे. त्यातून त्यांना चांगला रोजगारही मिळाला आहे, शिवाय उसाच्या रसाचे सेवन करणाऱ्यांचे आरोग्यही ठणठणीत आहे. उसाचा रस आरोग्यदायी मानला जातो. शेतामध्ये गुऱ्हाळात किटलीने रस पित होतो, असं सांगणारी जुनी पिढी आता काळाआड जात आहे. पण, नव्या पिढीलाही रसाचे महत्त्व उमगले आहे. 
उमरगा तालुक्यातील तुगाव इथं मुळे यांची शेती. शेतात एक एकरावर उस आहे. दिवसभर शेतात काम करून रामलिंग पहाटेच्या कामाचे नियोजन करतात. पहाटे चार वाजताच गुऱ्हाळ सुरु होते. रस गाळला जातो. आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये हा रस भरला जातो. आणि मुरूम गावात रतीब ठरलेल्या घरी पोहोचवला जातो. २०१० पासूनचा हा त्यांचा नित्यनेम. रामलिंग यांचे वडील रेवणाप्पा यांचा रसविक्रीचा व्यवसाय होता. तेही रसविक्रीसाठी मुरुमला जायचे. तेव्हा घागरीत रस आणून ग्लासमधून त्याची विक्री व्हायची. आता ही जुनी पद्धत अनेकांना पटत नाही. रेवणाप्पांनंतर हाच व्यवसाय नव्या पद्धतीने चालवायचा रामलिंग यांनी निर्णय घेतला. शहरी लोकांना रसाचे महत्त्व पटवून द्यायचे तर आधुनिक साधनं वापरायला हवीतच. त्यांनी आधार घेतला तो ‘गुगल’चा. उसाच्या रसाचे शरीराला होणारे फायदे कोणते, याची माहिती गुगलवरून घेतली. आणि माहितीपत्रके छापली. ही पत्रके पुढे घरोघरी वाटली. मुरुमवासियांना रसाचे महत्त्व पटले. आणि रसाला मागणी येऊ लागली. मग पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्याद्वारे लिटरप्रमाणे रस विक्री त्यांनी सुरू केली. आधुनिकता, स्वच्छता आणि वेळेवर मिळणाऱ्या सेवेमुळे ग्राहकांमध्ये वाढ झाली. आता ७० कुटुंबात दररोज आणि ३० हून अधिक कुटुंबात अधूनमधून रसाची मागणी आहे.
मुळे म्हणतात, "वडिलांमुळे मी या व्यवसायात झोकून दिलं. रसविक्रीतून एकरी चार लाख रुपये मिळतात. शिवाय लोकांसाठी आरोग्यदायी काम केल्याचा आनंद मिळतो. या गुऱ्हाळावर माझं घर चालतं. रसाचं महत्त्व समजल्याने आता परिसरातील ग्रामीण भागातही विक्री वाढली आहे". आता दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा होत नसल्याचेही ते सांगतात. पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रसवंतीगृह सुरू केले असून, इथंही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
- चंद्रसेन देशमुख.

आपलं मुलं विशेषचं असतं

पनवेलच्या अर्चनाताई माझ्या फेसबुकमैत्रीण. पुढे प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या पालकत्वाचा हृद्द्य प्रवास मला कळला. पालकांसाठी आपलं मुलं विशेषचं असतं. पण जेव्हा एक नाही, दोन्ही मुलं खरोखरच ‘विशेष – special’ असतील, तर? कर्णबधीर रश्मी आणि तिच्यानंतर अडीच वर्षांनी जन्मलेला ऑटिस्टीक जतिन – या भावंडांचं पालकत्व करणारे त्यांचे आई-बाप अर्चना आणि सुरेश पाटील हेही विशेषच. 
लग्नानंतर वर्षभरात रश्मी जन्मली. सर्व आनंदात होते. अर्चनाताईंना तर मुलगीचं हवी होती. रश्मी ५-६ महिन्यांची असताना ती आवाजाला प्रतिसाद देत नाही, हे कळलं. कल्याणच्या तज्ञ डॉक्टरने सबुरीने घ्यायला सांगितलं. पुढे अलियावर जंग संस्थेत तपासण्या करून रश्मीला Hearing Aid दिलं, तेव्हा ती पावणे दोन वर्षांची होती. एक धक्का पचवून तिचं संगोपन सुरू केलं. जतिनच्या वेळेस मनात शंकाचं काहूर होतं. ऑटिझम हा शब्दही ऎकला नव्हता. दुसर्‍या मोठ्या धक्क्यातून सावरण्यापेक्षा ऑटिस्टिक जतीनला सांभाळायचं कसं, हा प्रश्न होता. तेव्हापासून पालक आणि मुलं एकमेकांसाठी, असं झालं.
Pathologist अर्चनाताईंना लॅब सुरु करायची होती. परवान्यासाठी अर्ज करण्याच्या चार दिवस आधी जतिनच्या ऑटिझमबद्दल कळलं. त्याच्या संगोपनाला प्राधान्य देणं अटळ होतं. काम आणि मुलं दोन्ही सांभाळण्यासाठी सुरेशनेही आपल्या वकिलीचं कार्यालय घरीच थाटलं. नातेवाईकांना या मुलांची लाज वाटायची. मुलांमध्ये व्यंग आहे म्हणून सासर-माहेरच्यांनी अर्चना-सुरेशना कायमचं दूर लोटलं. आज सर्वदूर रश्मी-जतिनचं कौतुक होत असताना नातेवाईक एखादा फोन करण्याची तसदीदेखील घेत नाहीत. 

अर्चना-सुरेश यांनी एकच ध्यास घेतला - ज्या समाजाने नाकारलं, तिथेच मुलांना स्थान मिळवून देणं. रश्मीचं शिक्षण आग्रीपाड्याच्या Central school for the Deaf इथे सुरु झालं. अर्चनाताईंनी रश्मीसोबत Parent’s Guidance कोर्स केला. घरीच थेरपी देण्यासाठी कोर्सचा उपयोग झाला. रश्मी-जतिनसह अर्चनाताईंचा पनवेल-भायखळा असा दोन-अडीच तासांचा प्रवास व्हायचा. मुलांचे हाल, शाळेतले वाईट अनुभव... सगळ्यावर मात करत रश्मी बारावी झाली. आता पुढचं शिकते आहे. सहाव्या वर्षांपासून भरतनाट्यम् शिकली. सर्व परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली विशीतली रश्मी आज भरतनाट्यम् शिक्षिका आहे. फोटोग्राफी, पेटिंग, स्केटिंग, पर्यटन या स्वतःच्या आवडी जपत क्राफ्ट जुलरीचा व्यवसाय उत्तमपणे संभाळत आहे
जतिनसुद्धा बारावीनंतर पुण्याला Indian Institute of Science Education and Research इथे BS-MS करतो आहे. गणित हा त्याचा आवडीचा विषय. विशेष म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या 2015-16 Persons with Disability (PWD) विभागात जतिन देशात पहिला आणि IIT JEE(Advanced) (PWD) मध्ये सोळावा आला. जतिनला वैज्ञानिक व्हायचं आहे. 
मुलांना आवडीचं शिक्षण घेऊ देणं, आपल्या इच्छा मुलांवर न लादणं, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणं याला पाटील दांपत्याने महत्त्व दिलं. अर्चनाताई सांगतात, “निराशेचे क्षण तर आयुष्यात असतातच. पण दोन्ही मुलांनी आम्हाला ‘रश्मी-जतिनचे आई-बाबा’ ही ओळख मिळवून दिली. यात सारं भरून पावलं.” त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा अभिमान, डोळ्यांत दाटलेलं मुलांचं प्रेम, कौतुक खूप काही सांगून जातं. 
आपल्या मुलांना समाजाने नाकारणं आणि आज कौतुकाने स्वीकारणं या दोहोतला प्रवास केवढा अवघड होता. पण प्रयत्न, जिद्द आणि चौघांनी एकमेकांना दिलेली साथ यामुळे प्रत्येक प्रसंग त्यांनी निभावून नेला. रश्मी-जतिनमध्ये काही कमी आहे, असं अर्चना-सुरेश यांनी मुलांना कधीच जाणवू दिलं नाही. मुलांना जसंच्या तसं स्वीकारलं. ‘Never give up’ ही वृत्ती त्यांच्या जगण्याची प्रेरणा ठरली. आपल्याच वाट्याला हे का... असा प्रश्नदेखील त्यांनी कधी स्वतःला विचारला नाही. आव्हानं हा आयुष्याचा भाग आहे असं मानणाऱ्या अर्चना-सुरेशचा प्रवास पालकत्वाचा खरोखर आदर्शवत आहे.
अर्चना आणि सुरेश पाटील
- मेघना धर्मेश, मुंबई

Wednesday 5 April 2017

विसाव्याची भेळपुरी

दरवर्षी अनेक मुलं-मुली ही भेळ खाऊनचं दहावी-बरावीचे पेपर देण्यासाठी जातात. सध्या परीक्षा सुरू आहेत. आजही भेळ खाण्यासाठी अनेक विद्यार्थी येत होते. त्यांची भेळेची ऑर्डर पुरी करून त्यांना बेस्ट लक देण्यात वेळ कसा गेला, ते कळलंच नाही. माझी भेळ खाल्ली की त्यांचा पेपर चांगला जातो, असं मुलं म्हणतात....” नांदेडच्या विसावा उद्यानातील भेळपुरी सेंटरचे उत्तमराव मोतीराम वाघ सांगत होते. 
गेल्या ३६ वर्षापासून नांदेड शहरातील महानगर पालिकेच्या विसावा उद्यानात ते ‘विसावा भेलपुडी सेंटर’ चालवित आहेत. भेळ सगळीकडे मिळते. पण उत्तमरावांच्या भेळेची चव मात्र गेल्या तीन दशकांपासून नांदेडवासियांना भूरळ पाडते आहे. ही भेळ खाल्ल्यावर यश मिळतं, हे विद्यार्थ्यांचं म्हणणं किती खरं, किती खोटं हे माहित नाही. पण या भेळने उत्तमराव वाघ यांना मात्र १०० टक्के यश दिलं, हे निश्चित.
उत्तमराव अभिमानाने सांगतात, “एकदा 7-8 वर्षाच्या मुला-मुलीने माझी भेळ खाल्ली की त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण होईपर्यंत, ते भेळ खायला येत राहातात. माझ्या भेळेचे असंख्य फॅन आज सातासमुद्रापार गेले आहेत. परंतु ते जेव्हा नांदेडला येतात तेव्हा त्यांच्या मुला-बाळांसह माझी भेळ खाल्ल्याशिवाय वापस जात नाहीत.” 
नाशिक तालुक्यातील एका अदिवासी खेडयातून चाळीस वर्षापूर्वी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तमराव वाघ हा तरूण नांदेडात आला. अस्थिरतेमुळे वडलोपार्जित शेती, गाव, घर सोडावं लागलं. काही दिवस खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम केलं. एका सहकाऱ्याने त्यांना ते आज तयार करत असलेली भेळ शिकवली. तेव्हा पुसटशीही कल्पना नव्हती की, ही भेळ आपलं आयुष्यच बदलून टाकणार आहे. 
वाघ सांगतात, “१९८० मध्ये नांदेडला विसावा उद्यानाची उभारणी करण्यात आली. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विसावा उद्यानात उभे राहात होते. आजची फास्ट फुड लाईफ स्टाईल आली नव्हती. नांदेडमध्ये भेळ बनवणारे फारसे लोकही नव्हते. त्यात पुन्हा व्यवसायिक भेळ बनवणारे तर फारचं कमी. याच संधीचा फायदा घेत विसावा उद्यानात भेळचा स्टॉल सुरू करण्याचं मी ठरवलं. मी बनवलेल्या भेळची चव नांदेडमधल्या लोकांना खूप आवडली. पाहाता पाहाता माझी भेळ लोकप्रिय झाली. सुरूवातीला ५० पैसे, १ रु, २-३-५-८-१० रूपये करत आज २० रू प्लेट दरात मी भेळ देतो. आता दिवसाला हजार- दीड हजार रुपयांची कमाई होते. कधी अगदी ४० -५० प्लेट भेळ विकली जाते. तर कधी कमी. गेल्या ३६ वर्षांत भेळेचा दर्जा मी कधीही खालावू दिला नाही. भेळेसाठी लागणारे शेव, कांदा, कोथींबीर, नांदेडी मुरमुरे, चिंच, गूळ वगैरे उत्कृष्ट दर्जाचेच वापरले. ग्राहकांमध्ये भेदभाव नाही. एकाच चवीची भेळ सगळ्यांना. माझ्या भेळेच्या प्रतिष्ठित चाहात्यांची यादी खूप मोठी आहे.
 मी अनेक लग्नाकार्यात भेळचे स्टॉल लावतो. ही चविष्ट भेळ बनवण्याची कला मी माझ्या मुलाला देखील शिकवली आहे.
काही वर्षापूवी नांदेडमधले एकजण दुबईला लेकीकडे निघाले होते. तुझ्यासाठी काय घेवून येवू? असं लेकीला विचारल्यावर विसावा उद्यानातील भेळ घेवून या, असं तिने सांगितलं. माझी भेळ आज विदेशात देखील गेली आहे.
उत्तमराव वाघ, मो.8698691072
 - उन्मेष गौरकर.

कुटुंब रंगलंय गोपालनात

अहमदनगर येथील निसळ गुरुजींच्या गोशाळेची ही गोष्ट. गुरुजी व्यवसायाने पुरोहित. पौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात. त्यासाठी शेण, गोवऱ्या, गोमूत्र लागायचे. म्हणून त्यांनी एक गीर गोवंशाची कालवड विकत घेतली. या गाईची सहा वितं घरातच घेतली. यातून आज 16 गाईंची आधुनिक गोशाळा आकाराला आलीय. आता थारपारकर जातीची देशी गाय नव्याने आलीय. सावरकर म्हणायचे गोपूजन नको गोपालन हवे. निसळ गुरुजींकडे दोन्हीही चालते. वडील दत्तात्रेय निसळ, पत्नी सोनाली आणि गायत्री, रेणुका, वेद अशी तिन्ही मुलं असं अख्खं कुटुंबच रंगलंय गोपालनात.
‘आज अडीच एकर शेत, घर, चारचाकी गाडी आणि सुबत्ता आहे, हे सगळं या गोधनामुळेच’, गुरुजी सांगत होते. दोन वर्षे दुष्काळ पडला, चारा महागला तरी गुरुजींनी गाई विकल्या नाहीत. गीर जातीच्या गाई १४ लिटर दूध देतात. निसळ गुरुजींनी दुधाचा व्यवसाय केला असता तर आणखी कमाई झाली असती. पण ते गाईच्या दुधावर पहिला हक्क वासरांचा मानतात. त्यामुळे गाई- वासरे दिवसभर मोकळे असतात. रात्री त्यांना बांधून सकाळचे दूध काढले जाते. बाकी दिवसभर वासरे दूध पित असतात. एक वेळचे दूधच ते काढतात. आणि ५० रुपये लिटरने ज्या घरात लहान मुले आहेत अशा कुटुंबालाच विकतात.
अहमदनगर येथील बँक कॉलनी भागात गुरुजींनी घरातच आधुनिक गोशाळा काढलीय. शेणाचा वापर गोबर गॅससाठी होतो. त्यावर स्वयंपाक होतो. गोबर गॅसची स्लरी पाईपद्वारे जमा करून शेतात खत म्हणून वापरतात आणि गोवऱ्या बनवतात. या गोशाळेत गाईंना स्वयंचलीत वॉटर सिस्टिमद्वारे हवे तेव्हा पाणी देता येते. गोमूत्र एका ड्रममध्ये जमा केले जाते. दूध मशिनद्वारे काढले जाते. कडबा बारीक करण्यासाठी कुट्टी मशीन, चारा साठवणीसाठी व्यवस्था आहे. गोशाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे २४ तास गाईंवर नजर ठेवता येते.
आयुर्वेदात गाईच्या शुद्ध तुपाचे गुणधर्म सांगितले आहेत. ते तयार करण्याची खास पद्धधत आहे. जी अतिशय कष्टाची आहे. पितळी, लोखंडाची भांडी वापरून लाकडी रवीने घुसळून हे तूप त्यांच्या पत्नी सोनालीताई बनवतात. हे तूप अडीच हजार रु. किलो भावाने विकले जाते. त्यासाठी ऍडव्हान्स बुकींग होते. आता गुरुजींनी शेत जमीन घेतली आहे. आता गोशाळा या शेतात स्थलांतरित केली आहे.

- सुरेश कुलकर्णी.

'सावली'ची आयडाॅल

आई-वडिलांनी लहानपणीच साथ सोडलेली. त्यामुळे अनाथपणाचा शिक्का. जवळच कुणीच नाही. अहमदनगर येथील ‘सावली’ अनाथालयात राहणाऱ्या रेश्माची (नाव बदलण्यात आले आहे) ही व्यथा. सावत्र आईशी होणाऱ्या वादामुळे वडिलांनी तिसरीत शिकणाऱ्या लहानग्या रेश्माला ‘सावली’मध्ये सोडले. तिच्या पालकांशी संस्थेने वारंवार संपर्क साधला परंतु त्यांचा प्रतिसाद आला नाही. आईवडिलांच्या आठवणींमधून रेश्माला बाहेर काढण्याचे काम ‘सावली’ चे संस्थापक नितेश बनसोडे यांनी केले. मन रमवण्यासाठी ती गायला लागली. बनसोडे सांगतात, ‘तिच्या आवाजातील गुणवत्ता समजली. आणि आम्ही आठवड्यातून एकदा गायन वर्गाचे आयोजन केले, यासाठी मनोहर इंगळे सरांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले’. सोबतच रेश्माने घेतलेली मेहनत कामी आली आणि ‘इंडियन आयडाॅल’ च्या अंतिम ५० पर्यत रेश्माला पोहोचता आले.

रेश्माला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सावली’ मधील प्रिती, सपना, कृष्णा, शेखर इत्यादि मित्रमंडळी हजर होती. इंडियन आयडाॅल’ साठी केलेला अहमदनगर ते मुंबई प्रवास, मुंबई मधील गगनचुंबी इमारती आणि एकूणच प्रवासाबद्दल बोलताना रेश्मा म्हणते, "अंतिम फेरीपर्यत पोहोचण्यास जरी अपयश आले तरी, श्रेया घोषाल यांच्यापुढे गाण्याचा आनंद काही औरच होता, क्षणभरासाठी मी माझे दु:खच विसरुन गेले". शाळा, अभ्यास, शेतीकाम यातून फारसा वेळ मिळत नसल्याने रोज सायंकाळी चालणारा ‘परिपाठ’ हाच तिच्यासाठी सराव असायचा असेही तिने सांगितले. शिवाय स्वत:ची पार्श्वभूमी कुठेही तिच्या मार्गात आड आली नाही. उलट ’सावली’ मधील मायेची ऊब या सर्व प्रवासात प्रेरणा ठरल्याचे ती सांगते.
रेश्मा सध्या नूतन कन्या विद्यालयात १० वीत आहे. सध्या परीक्षा असल्याने ती अभ्यासात मग्न असते. पण अभ्यासाचा तणाव घालवण्यासाठी ती ‘जाने मन तू खूब है’ हे ‘इंडियन आयडाॅल’ मध्ये तिने म्हटलेले गाणे गुणगुणत असते.
- श्रीनिवास देशपांडे.

हॉकर्स ..!



आनंद काकडे. एम कॉम. नोकरीसाठी प्रयत्न केले. पण वशिल्याशिवाय कुठं काही जमेना. एका खासगी कंपनीत महिना सात हजार रूपयांवर काम करू लागला. घरात म्हातारे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार. अहमदरनगरजवळच्या देहरे या गावी त्याचे कुटुंब. त्याची नोकरी पुण्यात. उत्तम शिक्षणामुळे घरातील सर्वांची भिस्त त्याच्यावर आणि मिळकत नसल्याने तो त्रस्त. बाहेर राहून भागायचं नाही. तो देहरेला परतला. कोणीतरी त्याला अहमदनगरच्या बसस्थानकावर गोळ्या-बिस्कीटं विकण्याचा सल्ला दिला. गावा-घराजवळ राहुन चार पैसे मिळतील या आशेने पस्तीशीतल्या आनंदने अंगात खाकी रंगाचं शर्ट चढवलं. वडापाव, पाणी बॉटल, गोळ्या, बिस्कीट... मालक ट्रे मध्ये देईल ते साहित्य दिवसभर नगरच्या बसस्थानकावर बसमागे धावत धावत विकू लागला. यातून त्याला २०० ते ३०० रूपये उरतात. पूर्वीच्या सात हजारांपेक्षा गावात राहून नऊ हजार कमावत असल्याचा आनंद असला तरी, तो समाधानी नाही. नोकरीसाठी प्रयत्न का नाही करत असे विचारले तर तो म्हणतो, "साहेब, माझ्याकडे वशिला नाही. लाच द्यायला लाखो रूपये नाही. मला नोकरी कशी लागेल? प्रयत्न केले पण हतबल झालो. शेवटी हॉकर झालो. पण सरकारने मराठा आरक्षण दिले तर, नक्की नोकरी मिळेल!"
हॉकर्स! ये वडापाववाला, वडापाव लो... पाणी बॉटल, पाणी बॉटल... ऊसाचा ताजा रसवाला.....बस स्थानकात गाडी शिरताच असा एकच गोंगाट करणारे फेरीवाले. गाडीच्या खिडक्यांमधून हे फेरीवाले प्रवाशांना आमच्याकडचेच काही तरी घ्या म्हणून विनवत असतात. काही वर्षांपूर्वी गाडीच्या आत चढून साहित्य विकणारे फेरीवाले आता नियमानुसार गाडीत चढू शकत नाहीत. त्यामुळे बस आली की, त्या मागे धावत जाऊन खिडकीच्या बाहेरून जेवढा धंदा होईल, त्यावर त्यांना समाधान मानावे लागते. 
अहमदनगरच्या स्वस्तिक बसस्थानकात कुतूहल म्हणून या हॉकर्ससोबत संवाद साधला तेव्हा तिथे आनंदची भेट झाली. राजु भंडारे हा चाळीशीतला इसम त्याच्यासमवेत भेटला. त्याची कथा आणखीनच विदारक. दहावीपर्यंत शिकला. गेल्या २० वर्षांपासून तो हॉकर आहे. अहमदनगरला एका झोपडपट्टीत राहतो. घरी खाणारे तोंडे सहा. कमावता हा एकटा. घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला. पण खाणारं आणखी एक तोंड वाढवून करू काय? असा त्याचा रोखठोक प्रश्न. कमाई कमी असल्याने आता लग्न करायचंच नाही, असा त्याचा निश्चय.
सुनील पवार १५ वर्षांचा मुलगा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बाजारहिवरं या गावी त्याचे कुटुंबीय राहतात. घरी दोन एकर कोरडवाहू शेती. आई, वडील दोघेही गावात मजुरी करतात. सुनील कधीच शाळेत गेला नाही. गावात हाताला काम नाही म्हणून नगरला आला. गेल्या तीन वर्षांपासून बसस्थानकावर हॉकर काम करतो. सुरेश जगताप हेही १५ वर्षांपासून हॉकर्स आहेत. तेही झोपडपट्टीत राहतात. त्यांची पत्नीही छोटे मोठे कामं करून घराला हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. काहीही झाले तरी मुलांना शिकवायचेच असा त्यांचा ठाम निश्चय आहे. 'साहेब, सरकारची काही मदत होईल का, घरकूल मिळण्यासाठी?' हा त्यांचा अंतर्मुख करणारा प्रश्न. शिवम हा बिहारमधून आलेला मुलगा. १२-१३ वर्षांचा असेल. तो वडिलांसोबत मजुरी करतो. नगर बसस्थानकावर मराठी आणि बिहारी हॉकर्सची संख्या अधिक आहे.
बसस्थानकावर परवानाधारक कॅन्टीन चालकाला हॉकर्ससाठी परवाने दिले जातात. जो अधिक साहित्य विकेल त्याला अधिक कमिशन मिळत असल्याने साहजिकच त्यांच्यात विक्रीसाठी, ग्राहक ओढण्यासाठी चढाओढ होते. अनेकदा यातून वादाचे प्रसंगही उद्भवतात. शासनाने फेरीवाल्यांसाठी धोरण ठरवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पावले उचलावी अशी एकमुखी मागणी आनंद, राजु, सुनील, सुरेश या सर्वांनीच केली. 
- नितीन पखाले.

सावलीमुळं सुटला गुन्हेगारीचा शिक्का

अजय मूळचा पैठाणचा. लहानपणीच आई- बापाचं छत्र हरवलं अन पोटापाण्याची जबाबदारी वृध्द आजोबांवर पडली. आजोबांचं वय झालेलं. त्यामुळं हाताला काम नाही. मग एका मंदिराच्या आश्रयाला राहू लागले. मंदिरात येणा-या भाविकांकडून मिळणारे पैसे व वस्तू यातून नातू- आजोबा गुजराण करू लागले. मिळालं तर खायचं नाहीतर पोटभर पाणी पिऊन झोपायचं. अशा त-हेने नातू- आजोबांचा जीवनाशी संघर्ष चालू होता. 
अजय लहान होता पण गुणी, प्रामाणिक होता. लवकर उठून मंदिराची झाडलोट करून वृद्ध आजोबांची सेवा करत असे. एक दिवस अचानक कुणी तरी आजोबांचा खून केला. अन गणेशचं मायेचं शेवटचं पांघरूणही नियतीनं हिसकावून घेतलं. पुढे खुनाचा तपास चालू झाला. गुन्हेगार सापडला नाही म्हणून पोलिसांनी खुनाचा आरोप अजयवर केला. हाणून-मारून त्याला गुन्हेगार केला अन बालसुधारगृहात नेलं गेलं. तिथंही शारीरिक आणि मानसिक छळ वाट्याला आला. बालगुन्हेगाराचा शिक्काच त्याला लावला गेला. बाहेरच्या जगाची सर्व कवाडे त्याच्यासाठी बंद झाली होती. ही कवाडे कधीच उघडणार नाहीत या भीतीने तो पूर्ण खचला होता. प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. चार वर्ष अशीच गेली. 

 एक दिवस बालसुधारगृहातील अधिका-यांचा 'सावली'अनाथाश्रमाच्या नितेश बनसोडे यांना फोन आला. त्यांनी अजयला सावलीत नेण्याचा आग्रह केला. नितेश यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता करून अजयची सुटका केली. त्यावेळी त्याचं वय होतं नऊ वर्ष. या दरम्यान त्याचं शिक्षण काहीच झालं नव्हतं. सावलीत आला तेव्हा खूप अशक्त, शांत आणि एकटा एकटा राहत होता. अशा वेळी त्याला सावरणं सावलीसमोरचं मोठं आव्हान होतं. बनसोडे यांनी ते स्वीकारलं अन पेललं देखील! अजय म्हणतो, मी सावलीत आलो नसतो तर माझ्यावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का कधीच पुसला गेला नसता.
आता अजॅयमध्ये बदल होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे त्याची शाळा सुरु झाली आहे. आणि सावलीच्या विविध उपक्रमात हिरारीनं भाग घेत आहे.
 बाळू भांगरे,