Thursday 20 April 2017

नवा दृष्टिकोन आला, शेतीत बदल घडू लागला


जिल्हा नाशिक. तालुका दिंडोरी. द्राक्षांसाठी प्रसिद्ध. इथल्या वणी गावात वरुण पाचपेंड या तरुणाची वडिलोपार्जित २२ एकर शेती. या शेतीनंही आजपर्यंत द्राक्षंच पाहिलेली. पण, शेतात राबराबून पिकाला मिळणारा अत्यल्प भाव, निर्यातीसाठी पाठवल्यानंतर, नाकारून अचानक परत येणारा माल या सगळ्यातून वडिलांना येणारी हतबलता, हे सगळंच वरुणनी लहानपणापासून अनुभवलं. त्यामुळेच आता त्यानं या नेहमीच्या शेतीपद्धतीला फाटा द्यायचं ठरवलं. नव्या दृष्टीने शेतीकडे बघायला आणि शिकायला हवं म्हणून वरुणनी अग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला. सध्या तो शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. पण सोबतच वडिलांबरोबर त्यानं शेतीत प्रयोग चालू ठेवले. शेतीत टोमॅटोची लागवड केली. आंतरपीक पद्धतीनं झेंडू आणि तुळशीची लागवड केली. यामुळे टोमॅटोवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला नाही. उत्पादनही वाढले. हे सगळं सुरु असतानाच ‘स्पिरुलीना’ म्हणजेच शेवाळशेतीविषयी लेख वाचनात आला. 
अहमदनगर येथे जाऊन त्याने ‘स्पिरुलीना’ शेतीचं प्रशिक्षणही घेतले. तसेच ही शेती कुठे सुरू आहे, बाजारपेठेत तिला मागणी किती अशी माहिती त्यानं गोळा केली. नगर, पुणे, आष्टी, बाभळेश्वर या ठिकाणी ही शेती सध्या सुरू आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन त्याने पाहणीही केली. आता नाशिकमध्येही शेवाळशेती सुरू व्हावी यासाठी तो शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करतो आहे. मात्र शेवाळशेतीविषयी कमालीचे गैरसमज असून याविषयी कुठलाही धोका पत्करण्यास शेतकरी तयार नाहीत, असं तो सांगतो. 
शेवाळशेती करण्यासाठी विशिष्ट आकारातील टॅकमध्ये मीठ तसेच काही रासायनिक घटक मिसळून खारे पाणी तयार केले जाते. त्यात स्पिरुलीनाची पूड विरघळून घेतली जाते. दिवसातून तीन ते चार वेळा ती हलवावी लागते. विशिष्ट तापमानात या वनस्पतीची वाढ उत्तम होते. १० -१५ दिवस ही प्रक्रिया सुरू राहते. मग पाण्यावर हिरव्या रंगाचा थर तयार होतो. त्या थरावर प्रक्रिया करत स्पिरुलीनाची भुकटी मिळते. या भुकटीचा वापर उत्पादनाच्या गरजेनुसार करता येतो.
वरूण म्हणतो, स्पिरुलीना ही एक समुद्रातील वनस्पती आहे. जैवप्रतिबंधक म्हणून तिचा उपयोग केला जातो. समुद्राच्या खारट पाण्यात तिची वाढ चांगली होत असली तरी कृत्रिम पध्दतीने बाथरुममधल्या टपापासून घराच्या छपरावरही ही शेती कमी खर्चात करता येऊ शकते. यासाठी पारंपरिक पध्दतीने लागणारा वेळ, पैसा आणि श्रम सहज वाचविता येऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न यातून मिळू शकते. आज बाजारपेठेत स्पीरूलीनाला विशेष मागणी आहे. कित्येक आजारांवर औषधे तयार करण्यासाठी स्पिरुलीना वापरली जाते. याशिवाय ही वनस्पती पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणूनही वापरली जाते’.
 सध्या प्रायोगिक तत्वावर तो ही शेती करतो आहे. पुढे व्यापक स्वरुपात, व्यवसायिक दृष्टया हे काम करण्यासाठी त्याचं संशोधनही सुरू आहे. सध्या शेवाळशेतीसोबतच अमेरिकन केशर व ड्रॅगन फ्रुट यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष लागवड त्याने केली आहे.
- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment