Monday 3 April 2017

भाऊबंधकीत फुलली प्रेमाची 'गुलाब' शेती


धुळे जिल्ह्यातील अजनाळे गाव. इथल्या तीन राजपूत भावांची आणि त्याच्या शेतीची ही गोष्ट. हा परिसर माळरानाचा. चार महिने तापमान ४५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त. पाण्यासाठी कायमचीच फरपट. या बिकट परिस्थितीत तवरसिंग पुढे आला आणि दोन भावांना सोबत घेऊन त्यानं माळरानावर गुलाबाचं नंदनवन बहरवलं. या गुलाब शेतीत आहेत 'डच रोजेस'. लाल, गुलाबी, नारंगी, पांढरा, पिवळा असे दिलखेच रंगाचे गुलाब पाहिल्यावर रुक्ष माळरानावरील हे ओयासिस वाटते.
तवरसिंग यांनी पुण्यात राहून गुलाब शेतीच तंत्र अवगत केलं. गावी परतल्यानंतर रोजगार निर्माण करण्यासोबत शेतीत नवीन प्रयोग करण्याचा चंग बांधला. भावांना मदतीला घेतलं आणि दोन वर्षात तीन ग्रीनशेड नेट उभारून गुलाबशेती विकसित केली. प्रत्येकी एक एकराचे तीन शेड उभारून त्यात डच रोजेसची लागवड केली. आणि लागवडीच्या अवघ्या चौथ्या महिन्यापासून राजपूत यांना उत्पादन मिळू लागलं.



आज प्रत्येक शेडमधून वर्षाला सरासरी पाच लाख गुलाब त्यांना मिळतात. मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांत राजपूत आपले गुलाब पाठवतात. तिथे त्यांना सरासरी तीन ते पाच रुपये दर प्रति गुलाब मिळतो. हाच दर व्हेलेंटाईन डेच्या काळात तब्बल दहा रुपयांपर्यंत मिळतो.
 प्रत्येक पॉली हाऊससाठी त्यांना ५० लाखांचा खर्च आला. आता त्यातून प्रत्येक वर्षी १५ ते १८ लाखांचं उत्पन्न मिळतं. नॅशनल हॉल्टिकल्चर बोर्डनंही त्यांना अर्थ सहाय्य दिलं. बँकेचे हप्ते, उत्पादन खर्च आणि मजुरी वगळता तिघा भावांना प्रत्येकी पन्नास हजार निव्वळ नफा या गुलाब शेतीतून मिळतोय. शिवाय २० मजुरांना कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. पाण्याचा प्रश्न त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून सोडवला. अडीच कोटी लिटर पाणी क्षमतेच्या शेततळ्याच्या पाण्यावर वर्षभर गुलाब आपल्या रंगांची आणि सुगंधाची उधळण करीत असतात.
 कलम तयार करण्यापासून मशागत, फवारणी, छाटणी, कापणी, पॅकेजिंग आणि मार्केटिंग अश्या सर्व आघाड्यांवर राजपूत बंधू स्वतःच काम पाहतात. त्यामुळे प्रत्येक झाडाकडे त्यांचे बारीक लक्ष राहतं. भाऊबंधकीत फुललेली ही गुलाब शेती अनेकांना भुरळ घालणारी आणि तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा देणारीही आहे

- प्रशांत परदेशी.

No comments:

Post a Comment