Friday 7 April 2017

रक्तदानाची व्हॉट्स ऍप चळवळ

धुळ्यातील मालेगाव रोडवरचं जिनिअस ऑटो स्पेअर शॉप. या दुकानाचा मालक कल्पेश दीपक शर्मा उर्फ 'केडी'. या साध्या-सुध्या पस्तिशीतल्या केडीने रक्तदात्यांची मोठी फौज तयार केली आहे. केडी यांचे वडील दीपक एका ऑपरेशनसाठी दवाखान्यात होते. केडी आणि मोठा भाऊ विनोद दोघांचंही रक्तदान चळवळीत मोठं काम. त्यामुळे रक्त मिळण्यात अडचण नव्हतीच. पण शेजारील बेडवरच्या रुग्णाच्या नातेवाईकांची घालमेल वडील बघत होते. हा रुग्ण बाहेरगावचा. धुळ्यात ओळखी नाहीत. त्यातून हव्या त्या गटाचे रक्त मिळण्यात त्यांना अडचणी येत होत्या. ते बघून वडिलांनीच दोन्ही मुलांना सांगितलं की आधी त्या रुग्णाची गरज भागवा. या आजारातून वडील बाहेर आले नाहीत. पण त्यांचे हे शेवटचे शब्द मात्र मुलांना प्रेरणा देऊन गेले. ‘दुसऱ्याला आधी मदत करायची, त्याची गरज भागवायची ही शिकवण वडिलांकडून मिळाल्याचं, केडी सांगतात. 
जून २०१६ ला केडीने आपल्या जवळच्या मित्रांसह वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'श्री दीप रक्त सेवा' नावाचा व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानाचं काम करता करता या व्हॉट्स ऍप ग्रुपवर आज घडीला ३,३०० रक्तदाते जोडले गेले आहेत. दुर्मिळ ब्लड ग्रुपसाठी स्वतंत्र लिंक तयार केल्या आहेत. अवघ्या काही महिन्यात धुळे, नाशिक, जळगाव, मलकापूर, नंदुरबार जिल्ह्यात, ‘श्री दीप रक्तसेवा’ नावाचे १७ ग्रुप तयार झाले आहेत. कुणाकडूनही आर्थिक मदत न घेता आणि २४ तास रक्तदानाची सेवा देणारा महाराष्ट्रात एवढा मोठा एखादाच ग्रुप असेल.
पार मुंबईपर्यंतच्या गरजूंना या खानदेशातल्या ग्रुपची मदत होते, यावरून या तरुण रक्तदात्यांचा झपाटा आपल्या लक्षात येईल. जातपात, धर्म, प्रदेश अशा सर्व गोष्टी बाजूला ठेवून हे तरुण रक्तदाते ‘करुनी दान रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे’ या बांधिलकीने सक्रीय आहेत. गरजूंपर्यंत रक्तदाता पोचण्याची एक व्यवस्था ग्रुपवर केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकाकडून किंवा रुग्णालयाकडून केडीला अथवा व्हॉट्स ऍप ग्रुपला कळवलं जात. केडी त्या भागातल्या ग्रुपवर रक्तगट आणि गरजू व्यक्तीचा नंबर टाकतात. काही वेळाने रक्तदात्याचा, गरजूला रक्तदान केल्याचा रिप्लाय येतो. रक्तदाते गरज भासल्यास रात्री-अपरात्रीदेखील रक्तदानाला तयार असतात. ते चहा-नाश्त्याचा खर्चसुद्धा गरजवंताला करू देत नाहीत, हे विशेष.
 सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करता येतो हे केडीने दाखवून दिलं आहे. केडीने हव्या त्या रक्तगटाचे हवे तिथे आणि पाहिजे तितके रक्त उपलब्ध करून देण्याचा अनेकवेळा विक्रम केला आहे. रक्तदानाची ही व्हॉट्स ऍप चळवळ केडीच्या चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नामुळे आता ग्रामीण भागात आणि तालुक्यापर्यंत जाऊन पोहचली आहे.
केडी यांचा संपर्क क्र. - 9423622267 / 9373709091
 - प्रशांत परदेशी

No comments:

Post a Comment