Friday 7 April 2017

उसाचा रस भारी...येतो तुमच्या दारी

नवं काही करणार्‍याला गुगलची साथ असतेच...
उस्मानाबाद जिल्ह्यातलं मुरूम गावं. गावातली ७० कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून सकाळी चहाऐवजी उसाचा रस घेतात. रस्त्याच्या बाजूला, बसस्थानकावर मिळणारा उसाचा थंडगार रस आपण कधी-कधी घेतो. विशेषत: उन्हाळ्यात रसाचा आस्वाद घेणारे अनेक शौकीन आहेत. पण, मुरूम शहरात पावसाळा वगळता दररोज उसाचा रस मिळतो - तोही घरपोच, ताजा, सकाळी सात वाजता. रस पुरवणारा शेतकरी आहे रामलिंग रेवणाप्पा मुळे. विशेष म्हणजे दुधाप्रमाणे या शेतकऱ्याकडे उसाचा रतीब लावण्यात आला आहे. त्यातून त्यांना चांगला रोजगारही मिळाला आहे, शिवाय उसाच्या रसाचे सेवन करणाऱ्यांचे आरोग्यही ठणठणीत आहे. उसाचा रस आरोग्यदायी मानला जातो. शेतामध्ये गुऱ्हाळात किटलीने रस पित होतो, असं सांगणारी जुनी पिढी आता काळाआड जात आहे. पण, नव्या पिढीलाही रसाचे महत्त्व उमगले आहे. 
उमरगा तालुक्यातील तुगाव इथं मुळे यांची शेती. शेतात एक एकरावर उस आहे. दिवसभर शेतात काम करून रामलिंग पहाटेच्या कामाचे नियोजन करतात. पहाटे चार वाजताच गुऱ्हाळ सुरु होते. रस गाळला जातो. आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये हा रस भरला जातो. आणि मुरूम गावात रतीब ठरलेल्या घरी पोहोचवला जातो. २०१० पासूनचा हा त्यांचा नित्यनेम. रामलिंग यांचे वडील रेवणाप्पा यांचा रसविक्रीचा व्यवसाय होता. तेही रसविक्रीसाठी मुरुमला जायचे. तेव्हा घागरीत रस आणून ग्लासमधून त्याची विक्री व्हायची. आता ही जुनी पद्धत अनेकांना पटत नाही. रेवणाप्पांनंतर हाच व्यवसाय नव्या पद्धतीने चालवायचा रामलिंग यांनी निर्णय घेतला. शहरी लोकांना रसाचे महत्त्व पटवून द्यायचे तर आधुनिक साधनं वापरायला हवीतच. त्यांनी आधार घेतला तो ‘गुगल’चा. उसाच्या रसाचे शरीराला होणारे फायदे कोणते, याची माहिती गुगलवरून घेतली. आणि माहितीपत्रके छापली. ही पत्रके पुढे घरोघरी वाटली. मुरुमवासियांना रसाचे महत्त्व पटले. आणि रसाला मागणी येऊ लागली. मग पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्याद्वारे लिटरप्रमाणे रस विक्री त्यांनी सुरू केली. आधुनिकता, स्वच्छता आणि वेळेवर मिळणाऱ्या सेवेमुळे ग्राहकांमध्ये वाढ झाली. आता ७० कुटुंबात दररोज आणि ३० हून अधिक कुटुंबात अधूनमधून रसाची मागणी आहे.
मुळे म्हणतात, "वडिलांमुळे मी या व्यवसायात झोकून दिलं. रसविक्रीतून एकरी चार लाख रुपये मिळतात. शिवाय लोकांसाठी आरोग्यदायी काम केल्याचा आनंद मिळतो. या गुऱ्हाळावर माझं घर चालतं. रसाचं महत्त्व समजल्याने आता परिसरातील ग्रामीण भागातही विक्री वाढली आहे". आता दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा होत नसल्याचेही ते सांगतात. पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रसवंतीगृह सुरू केले असून, इथंही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment