Sunday, 18 August 2019

मूल कुपोषित असल्याचं लक्षात आलं की अंगणवाडी ताई इथे पाठवते


''मूल कुपोषित असल्याचं लक्षात आलं की अंगणवाडी ताई त्याला इथे पाठवते.'' बीड जिल्हा रुग्णालयातले हनुमंत पारखे सांगत होते. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करताना अनेकदा मुलंही सोबत. या मुलांच्या खाण्यापिण्याची आबाळ ठरलेली. त्यामुळे जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं. शासनानं २०१५ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी अर्थात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू केलं. . बीड जिल्ह्यातल्या या केंद्रानं गेल्या ४ वर्षात ५५० हून अधिक मुलं कुपोषणमुक्त केली आहेत.
''कक्षात मूल भरती झालं की प्रथम त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या होतात. वजन न वाढण्याची काय कारणं आहेत ती शोधली जातात. कुठला आजार असेल तर त्यानुसार उपचार केले जातात. '' डॉ पारखे सांगतात.
कुठलाही आजार नसेल तरीही बालकाचं वजन, वय आणि उंचीच्या प्रमाणात नसेल तर आहारतज्ञांच्या देखरेखीखाली त्याला पोषणआहार दिला जातो. आहारतज्ज्ञ सावित्री कचरे सांगतात, '' १४ दिवस बालकाला कक्षात ठेवतो. पहिले सात दिवस मिल्क ७५ आणि नंतरचे सात दिवस मिल्क १०० फॉर्म्यूला देतो. दूध, मुरमुरे, खाद्यतेल, साखर यापासून हा फॉर्म्यूला तयार केला जातो. याशिवाय, शिरा, उपमा, फळे, अंडी दिली जातात. वजनाची रोज तपासणी करतो.''
वर्ष २०१५ मध्ये ७५, २०१६ मध्ये १७५, सन २०१७ मध्ये २०९ तर सन २०१८ मध्ये १२० बालकांवर उपचार झाले. कक्षाची सध्याची क्षमता २० खाटांची आहे.
विशेष म्हणजे मुलांसोबत थांबणाऱ्या पालकांच्याही भोजनाची व्यवस्था असते. १४ दिवसांची बुडीत मजुरी म्हणून दिवसाला १०० रुपये त्यांना दिले जातात. रुग्णालयातून घरी गेल्यावर कशी काळजी घ्यावी ते आईला समजावतात . पोषणयुक्त आहाराबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देतात. अंगणवाडी ताई, डॉक्टर, परिचारिका , आहारतज्ज्ञ सर्वांच्या समन्वयातून हे कार्य होत आहे.


-अमोल मुळे , बीड 

इतिहास सामान्य माणसांचा असतो का? (इतिहासात डोकावताना)शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाबद्दलची विद्यार्थ्यांची मतं काय आहेत हा पीएचडीचा सुरवातीचा टप्पा. यासाठी २५ प्रश्नांची एक प्रश्नावली मी तयार केली होती. त्या अगोदर महाराष्ट्र बोर्डाच्या ६ वी ते १० वीच्या इतिहास आणि कला या दोन्ही विषयांच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास केला. अभ्यासक्रमातील विविध मुद्दे आणि त्यांचे उद्देश आणि दिलेले अपेक्षित परिणाम पडताळून बघण्यासाठी त्या त्या मुद्द्यानुसार प्रश्नांची रचना केली होती. महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात इतिहास हा विषय चढत्या क्रमाने शिकवला जातो. घर, आजूबाजूचा परिसर, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जग अशा क्रमाने हा विषय तिसऱ्या इयत्तेपासून शिकवायला सुरुवात होते. अभ्यासक्रमामध्ये क्षेत्रभेटी, आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तू, बाजार, स्थानिक संग्रहालये आणि वाचनालयं यांना भेटी देणं हे बऱ्यापैकी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. हेतू हा, की विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराशी जोडलं असण्याची जाणीव व्हावी. आजूबाजूच्या परिसरातील वयस्कर लोकांशी गप्पा हा देखील इतिहास शिक्षणाचा भाग म्हणून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.
इतिहास आणि कला या दोन्ही अभ्यासक्रमांचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवली, की हे दोन्ही अभ्यासक्रम तर नीट विचार करून अतिशय पद्धतशीरपणे बनवले आहेत. परंतु ह्या सगळ्याच मुद्द्यांची पडताळणी करून बघणं अतिशय आवश्यक होतं. त्या अनुषंगाने मग प्रश्नावली तयार केली.
विद्यार्थ्यांचे इतिहास ह्या विषयाचं आकलन बरंच व्यापक होत जावं अशी या अभ्यासक्रमाची आणि त्यात दिलेल्या उद्दिष्टांची रचना निश्चितच होती. त्यामुळे मग इतिहास ही संकल्पना विद्यार्थ्यांना कितपत कळली आहे हे चाचपण्यासाठी त्या संबंधित ४ प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नावलीमध्ये टाकले. त्यावर जी उत्तरं आली त्यांचा आणि अभ्यासक्रमातील उद्दिष्टांचा काहीही संबंध नव्हता.
एका प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना 'इतिहास' हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर खालीलपैकी काय काय येतं त्यावर खूण करा असं विचारलं होतं. ५ पर्याय दिले होते. हवं तितक्या पर्यायांवर खूण करण्याची मुभा होती. ८०% पेक्षा अधिक विद्यार्थांनी ‘युद्ध’ या शब्दावर खूण केली होती. ६०% विद्यार्थ्यांनी 'राजे आणि राण्या' या पर्यायावर खूण केली होती. ८४% विद्यार्थ्यांनी 'शिवाजी आणि किल्ले' हा पर्याय निवडला होता. २१% विद्यार्थ्यांनी 'श्रीमंत लोकं' असा पर्याय निवडला होता. आणि फक्त ७% विद्यार्थ्यांनी 'सामान्य लोकं' ह्या पर्यायावर खूण केली होती. टक्केवारीकडे बघितली तर लक्षात येईल की बहुतांश विद्यार्थ्यांना इतिहास म्हणजे फक्त युद्ध, राजे, राण्या आणि महाराष्ट्र आहे म्हणून शिवाजी महाराज हे एवढंच वाटतं. इतिहास जर सामान्यांचा असेलच तर त्यातही त्याचं झुकतं माप हे 'श्रीमंत लोकं' याकडे अधिक होतं. म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या उपक्रमांद्वारे जो काही स्थानिक इतिहास शिकवला जातो तो देखील बहुदा राजकीय इतिहासच सांगितला जात असावा.
आणखी एक प्रश्न होता ज्यात इतिहास असा शब्द न वापरता पुरातन संस्कृती असा शब्द वापरला होता. 'पुरातन संस्कृती' हे ऐकल्यावर सुचणारे कोणतेही चार शब्द यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. इथं देखील बहुतांश विद्यार्थ्यांनी लढाया, युद्ध, किल्ले आणि राजे यांचा उल्लेख केला. काही जणांनी पुरातन संस्कृती म्हणजे चांगले संस्कार असं लिहिलं. फक्त २% विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आजी आजोबांच्या आठवणी लिहिल्या. त्याच विद्यार्थ्यांनी कलेचा देखील उल्लेख केला आहे.
पुढच्या एका प्रश्नात भूतकाळाबद्दलच्या कल्पना लिहा असं सांगितलं होतं, परंतु ८०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इथं व्याकरणीय व्याख्या लिहिली.
दोन प्रश्न ऐतिहासिक पुस्तकं आणि ऐतिहासिक सिनेमा बद्दल होते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलीच नाहीत. ज्यांनी दिली त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी इतिहास पाठयपुस्तक असं उत्तर लिहिलं आहे तर काही जणांनी शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा उल्लेख केला आहे. फार थोड्या जणांनी काही संतचरित्रांचा उल्लेख केला आहे.
या प्रश्नांना विदयार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांतून कळतं, की त्यांच्या दृष्टीने इतिहास ही संकल्पना फक्त लढाया आणि युद्ध यापुरती मर्यादित आहे.
इतिहास ह्या संकल्पनेमधील काळाचं प्रवाहीपण त्यांच्यापर्यंत पोचलं नाही. त्यामुळे इतिहास हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक प्रकारे खूप पूर्वी, कुठेतरी लांब घडलेल्या राजकीय घडामोडींपुरता मर्यादित आहे. त्यामध्ये त्यांना त्यांची अशी स्वतःची भूमिका किंवा जागा दोन्ही दिसत नाही. त्यामुळेच इतिहास शिकणं त्यांना कंटाळवाणं वाटतं. आणि हा असा कंटाळवाणा इतिहास त्यांच्या डोक्यात इतका पक्का बसला आहे, की भूतकाळाविषयी कल्पना करा असं सांगितलं की ते बावरून जातात. त्यांना व्याकरणातील व्याख्येव्यतिरिक्त काहीच सुचत नाही. काहीही डोळ्यासमोर येत नाही. इतिहासाच्या पुस्तकातील इतिहास त्यांना त्यांचा वाटतच नाही. तो तसा वाटण्यासाठी बरेच प्रयत्न करायला लागणार आहेत. परंतु कोणतेही प्रयत्न करायला सुरुवात करण्याअगोदर विद्यार्थ्यांची विचार पद्धती, त्यांना होत असणारं आकलन हे वेळोवेळी तपासून बघत राहणं अत्यंत गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांचे विचार तपासून बघण्याच्या प्रक्रियेतील आणखी काही निरीक्षणं पुढील भागात.
- डॉ. अनघा भटl

अन् त्याला मिळालं जीवदान


  रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचं आवार. इथं एक वटवृक्ष उभा होता. न्यायालयाचा गेल्या 150 वर्षांपासूनचा साक्षीदार. नुकताच म्हणजे शनिवारी सकाळी हा वृक्ष कोसळला. या वृक्षाचं पुनर्रोपण करता येईल का असा विचार सुरू झाला. जिल्हा न्यायाधीश जोशी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतला. बार असोसिएशनच्या सदस्यांनी ही कल्पना उचलून धरली.
त्यानंतर या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा निवडण्यात आली. मोठा खड्डा खणण्यात आला. या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, फिनोलेक्स कंपनी आदींनी सहकार्य केलं. मूळ वृक्षाच्या काही फांद्या तोडून क्रेनच्या साह्याने उचलून त्याच्या पुनर्रोपणाला सुरुवात झाली. शनिवारी रात्री सुरू झालेले हे काम तीस तासांच्या मेहनतीने अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने व यंत्रणेच्या सहकार्याने पूर्ण झाले. विशेष म्हणजे न्यायाधीश साहेब व अधिकारी वर्ग पहाटेपर्यंत उपस्थित होते.
१५०वर्षांचा साक्षीदार असलेला हा वृक्ष पुन्हा उभा राहिल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते. न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला गेला आहे. वृक्ष सहजगत्या तोडता येतात. परंतु, वृक्ष टिकवण्याचा क्षण किती आनंददायी असतो हे या उपक्रमामुळे सिद्ध झालं.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

गोष्ट सुनीताबाईंची
ऐरोली, नवी मुंबईच्या सुनीता शिंदे. शिक्षणासाठी लहानपणीच घर सोडून मावशीकडे जावं लागलं. पण पुढं परिस्थिती बदलली आणि शिक्षण सुटलं. मग लग्नही लवकर झालं. लग्नानंतर नाशिकला राहायला आल्यावर आता तरी सगळं सुरळीत होईल असं त्यांना वाटलं होतं. पण, परिस्थिती बेताची. परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांनी नाशिक सोडलं आणि ठाणे गाठलं. पुन्हा ठाण्यातून ऐरोली, नवी मुंबईत त्यांनी स्वतःचं घर घेतलं. मनोज आणि धीरज ही अशी दोन मुलं.
स्वतःच घर घेतल्यावर आता सगळं नीट चालू राहील असंही त्यांना वाटलं.

पण सुखापेक्षा दुःखाचा दरवाजाच मोठा होता. स्वतःचं घर घेतल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे २००५ मध्ये त्यांच्या घरी चोरी झाली. घरात ठेवलेले सगळे दागिने चोरीला गेले. पुन्हा एकदा परिस्थिती ‘आ’ वासून समोर उभी राहिली. पण सुनीता खचल्या नाहीत. पुन्हा तिने जिद्दीने कामाला सुरूवात केली, पती सूर्यकांत सोबत होते. पुन्हा गाडी रुळावर येईल असं वाटत असताना नोव्हेंबर २००७ मध्ये एका अपघातात सुनीता यांच्या पतीचं निधन झालं. तेव्हा मनोज दहावीत तर धीरज सातवीत होता. आता पुढे येणाऱ्या कठीण प्रसंगाला त्यांना एकहाती तोंड द्यायचं होत. मुलांचं शिक्षण व्हायचं होतं.
मुलांना शिकवून मोठं करायचं हे त्याचं स्वप्न. त्यामुळे या सगळ्या दु:खातून पुन्हा नव्या जोमाने त्या उभ्या राहिल्या. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना साथ दिली ती त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी. सुनीता शिलाई मशीन चालवत. आधी आवड आणि स्वतःपुरत्या असलेल्या या छंदाचं त्यांनी व्यवसायात रूपांतर केलं. पतीच्या निधनानंतर लगेच काम करणं आवश्यक होतं. त्यांनी तशी कामाला सुरवातही केली. पण लोक उगाच नावं ठेवू लागले. पण याकडे लक्ष न देता त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवलं. शिवणकाम सुरू झालं आणि यातूनच त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि घर चालवलं.
मनोजचं स्वप्न होत क्रिकेटपटू व्हायचं. पण त्याच्या यशाची दिशा काही वेगळीच होती. बारावीनंतर कराड येथे त्याने आर्मीच्या प्रशिक्षणासाठी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि अवघ्या सहा महिन्यात तो आर्मीत भरती झाला. 18 वर्षांचा मनोज आता लान्सनायक पदावर आहे. धीरजला सुद्धा आर्मीचं स्वप्न खुणावत आहे आणि तो त्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही घडलो कारण आमची आई आमच्या पाठीशी नाही तर नेहमीच आमच्या सोबत असते असं ही मुलं सांगतात. “माझा एक मुलगा आर्मीमध्ये आहे आणि दुसरा प्रयत्न करतोय हेच माझ्या कष्टांचं आणि आयुष्याचं सार्थक”, असं सुनीता म्हणतात.
- विजय भोईर, नवी मुंबई
#नवीउमेद

रोप देणारी राखी

रत्नागिरीतल्या अविष्कार संस्थेची शामराव भिडे कार्यशाळा. विशेष मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारी. सण पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.
यंदा रक्षाबंधनासाठी शाळेत वेगळ्या प्रकारे तयारी सुरू आहे. विद्यार्थी बिया वापरून राख्या तयार करत आहेत. ही राखी विसर्जित केली की त्यातून रोप उगवतं. राखी सोडल्यानंतर ती थोडा वेळ पाण्यात भिजत घालायची. नंतर कुंडीत किंवा मातीत कुस्करुन टाकायची. त्यापासून अल्पावधीतच रोपं तयार . संकल्पना आहे वृक्षवल्ली नर्सरीच्या व्यवस्थापक माधुरी साळवी कळंबटे यांची. त्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे.
कार्यशाळेतल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना यात सामावून घेतलं आहे. तीव्र मतिमंदत्व गटातल्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्राचे लहान तुकडे करायला देतात. मध्यम मतिमंदत्व गटातली मुलं कागदी तुकड्यांचा लगदा करणं, शाडूच्या मातीसमवेत त्याचं मिश्रण करणं ही कामं करतात. कागदी लगदा ४० टक्के तर शाडूची माती ६० टक्के. विद्यार्थी हे मिश्रण मळतात. मग त्याचे छोटे गोळे, त्याला आकार देणं,त्यात झेंडू, टोमॅटो आदीच्या बिया घालणं, राखी रंगवणं, दोरे बांधणं, गाठी मारणं, विक्री करणं सौम्य मतिमंदत्व गटातले विद्यार्थी करतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. विद्यार्थी उत्साहानं ही कामं करत आहेत.
५ ते १० ग्रॅम वजनाच्या सुमारे २५० राख्या कार्यशाळेत तयार होत आहेत. ''हे बंधन निसर्गसंरक्षणाचे आहे, तसेच विशेष मुलांच्या कलाकुसरीला वाव देणारं आहे.'' असं माधुरी साळवी कळंबटे आणि कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर सांगतात.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2490647157648620 

एकच प्याला (आखुडबुद्धी बहुशिंगी)


परवाच कुणी गडकरी नावाच्या मराठी प्लेराईटरनं लिहिलेला एक ओल्ड म्युझिकल प्ले बघायचा योग आला. (खरंतर ऐकायचा योग आला असं म्हटलं पाहिजे. वाचकांच्या सोयीसाठी त्यातल्या मुख्य पात्रांचे संवाद कंसात आणि बिनमहत्त्वाच्या नटांचे संवाद कंसाबाहेर दिले आहेत.)
पद्माकर : ठीक आहे. ऊठ सिंधू, या घरात पाणी प्यायलासुध्दा राहू नकोस! चल- (चल छैय्या छैय्या छैय्या चल छैय्या छैय्या…)
सिंधू : दादा, या घरातून कुठं (हॅलो, हां कोण बोलतंय? जांबुवंतराव का? अहो, जरा मोठ्यानं बोला. इथं नाटकाला आलोय, इथल्या आवाजामुळं नीट ऐकू येत नाहीय. काय म्हणालात? च्यायला! मध्येच कट झाला.)
पद्माकर : कुठंही! (डिंगडिंगडिंगडिंगडिडीडिंगडिंग डॉमडॉम- क्रेझी फ्रॉगची ट्यून वाजते) या नरकाबाहेर अगदी कुठंही!
सिंधू : हा नरक? (डिंग डिंग) हे पाय जिथं आहेत तिथं नरक? ( टूं डुंडू टुंडूडू डगडगडग टंडडंग टंडडंग- दूरदर्शनच्या जुन्या बातम्यावाली रिंगटोन वाजते. पण ती पूर्ण वाजण्याआधीच टॅंडॅंट्यांड्य़ांटॅं ट्यांट्यां- आयपीएलवाली रिंगटोन वाजल्यानं त्यात हा आवाज दबला जातो. लोकांना डिस्टर्ब करणाऱ्या दूरदर्शन रिंगटोनवाल्याची चांगलीच खोड मोडली असं आवाज दबलेल्या काही नाट्यप्रेमींचं मत होतं.) दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग, तिथंच माझं वैकुंठ, आणि तिथंच माझा कैलास! (हाहा- कुणीतरी तळीराम होऊन आलेला प्रेक्षक चुकून हसतो. स्टेजवरचा तळीराम चपापतो.)
सिंधू गाऊ लागते-
कशी या त्यजू पदाला। (आला आला वारा)
वसे पादयुग जिथे हे। मम स्वर्ग तेथ राहे॥
(हू लेट द डॉग्ज आऊट… हू लेट द डॉग्ज आऊट… हू हू)
या रिंगटोनमुळं लोकांच्या संभाषणात मध्येमध्ये अडथळा आणणारं नाटक थांबतं आणि मुख्य पात्रांचा संवाद सुरु होतो.
प्रेक्षक (हू लेट द डॉग्ज आऊट-वाला) : हॅलो, कोणाय?
पलीकडून : ओरडताय का हो असे नाटकात असल्यासारखे?
प्रेक्षक : अहो, नाटकालाच आलोय मी. पण तुम्ही कोण?
पलीकडून : मी तुमच्या मागच्याच रांगेत बसलोय. त्याच काये, आमच्या बंटीला तुमची ट्यून खूप आवडली. त्याला ती ऐकवली तर आम्हांला शांतपणे नाटक बघू देईल थोडावेळ.
प्रेक्षक : मुलाला कशाला आणलंत नाटकाला? रडून-ओरडून पोरं नुस्ती डिस्टर्ब करतात. घरी आजीआजोबा नाहीत का?
पलीकडून : आहेत ना. पण तेही नाटक बघायला आलेत. तुमच्या बरोब्बर पाठीमागं झोपलेत ना, ते आजोबा आणि खलबत्त्यात कुटून पॉपकॉर्न मऊ करून खातायत ना त्या आजी. दोघांना खूप आवड आहे हो नाटकाची.
प्रेक्षक : ते दिसलंच! आणि आजोबा चांगलेच घोरतायत!
पलीकडून : हो, थोडा त्रास होतो त्यांना नाटकाच्या आवाजाचा. पण थोडीफार तरी ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे ना आयुष्यात?
सिंधू : (मध्येच) स्वलोकी चरण हे नसती
प्रेक्षक : (वस्सकन ओरडून) थांबा हो, आम्ही कुठं काय पळून चाललो आहोत काय?
पलीकडून : काय हो, तुमच्या सोबत आहेत त्या तुमच्या मिसेस का?
प्रेक्षक : हो. तुम्हांला कशाला पाहिजे?
पलीकडून : काही नाही, आमच्या बायकोला तिची साडी खूप आवडली. मंगलगिरी कॉटन दिसतीय. कुठून घेतलीय हो?
प्रेक्षक : अस्सल सोलापुरी सिल्क आहे हो. माझ्या मेव्हण्यानं आणलीय तंजावरमवरून. आणखी काही?
पलीकडून : काही नाही. ठेवा फोन. (सिंधूला) ओ, झाला आमचा फोन, करा तुमचं गाणं सुरू-
सिंधू : हू लेट द डॉग्ज आऊट… हू हू….
***
शेवटी काय, नाटकाचं उद्दिष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच असतं ना?
- ज्युनिअर ब्रह्मे

कैद्यांना मूर्त्यांनी दिला रोजगार


  गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात लगबग सुरू आहे. इथले १८ कैदी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती घडवत आहेत.
सुंदर आणि स्वस्त मूर्ती हे या मूर्त्यांचं वैशिष्ठय. कागदाच्या लगद्यापासूनची १२ फूट मूर्ती यंदाचं विशेष आकर्षण. वेगवेगळ्या आकारातल्या शाडूच्या मूर्ती. साधारण ५०० रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत. यंदा दीड हजारांहून अधिक मूर्ती तयार करण्याचा कैद्यांचा संकल्प आहे. त्यासाठी अहोरात्र काम सुरू आहे.
कैद्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी कारागृहात आठ कारखाने आहेत. वेगवेगळ्या कलाकौशल्यानुसार हे काम सुरू असतं. साधारण तीन वर्षांपूर्वी एका कैद्यानं गणेशमूर्ती घडवायला सुरुवात केली. मग इतर २० कैद्यांनी हे प्रशिक्षण घेतलं. गेल्या वर्षी गणेशोत्सवात १३ लाख रुपयांची विक्री झाली. गणेशोत्सवाखेरीज १९ लाखांचा व्यवसाय मूर्ती विभागानं केला. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम सांगत होत्या. या माध्यमातून कैद्यांना रोजगार उपलब्ध झाला. महसुलातही वाढ झाली. मूर्तींना वाढता प्रतिसाद पाहता यंदा डिसेंबरपासूनच काम सुरू झालं. मुंबई आणि गुजरातहून निविदा प्रक्रियेद्वारे शाडू माती, रंग, आभूषण साहित्य मागवलं जातं.
मूर्ती उत्सवाच्या सात दिवस आधी प्रवेशद्वाराजवळ नव्या विक्री केंद्रात ठेवल्या जातील. मूर्त्यांसाठी अधिकाऱ्यांसह ग्राहकांनीही आगाऊ नोंदणी सुरू केली आहे.


- प्राची उन्मेष, नाशिक 

कलाशिक्षण, इतिहास आणि अडकलेपण (इतिहासात डोकावताना भाग १)जे जे कलामहाविद्यालयात मी प्रवेश घ्यायचं ठरवलं तेव्हा बांधीव, ठोस असं काहीतरी जे सतत आजूबाजूला होतं त्यातून बाहेर पडायची तीव्र इच्छा होती. त्या वयात कलाकार व्हायचंय की नाही ह्यापेक्षा ते मोकळेपण अधिक हवंहवंसं वाटलं. जी काही थोडीफार पूर्वतयारी केली होती त्या जोरावर प्रवेशपरीक्षेच्या दिव्यातून जाऊन मला शिल्पकला शाखेमध्ये प्रवेश देखील मिळाला. कॉलेज सुरु झालं आणि अचानक आयुष्यातून अभ्यास निघूनच गेलाय असं वाटायला लागलं. एकदम मोकळं. आणि मग हळूहळू तो मोकळेपणा झेपेनासा झाला. कॉलेजमधल्या अति कंटाळवाण्या विषयांवरची कामं करताना हळूहळू संदर्भहीन असं काहीतरी करत असल्याची जाणीव तीव्र होऊ लागली. विचित्र अशा अधांतरीपणामध्ये जे जे मधील चार वर्ष संपली. त्या चार वर्षांमध्ये आपण नक्की काय केलं, कोणते आकार बघितले, कोणती माध्यमं हाताळली, काय शिकलो, निर्मिती प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि ती अनुभवली का ह्यातील कशाचाही अर्थबोध होत नव्हता.
अशातच मग कोणाशीतरी पुरातत्त्वशास्त्राबद्दल एक मोघम चर्चा झाली. आणि ह्या विषयामुळे तेव्हा जे काही तुटलेपण वाटत होतं त्यावर काहीतरी उत्तर सापडेल असं वाटायला लागलं. आणि बऱ्यापैकी तसंच घडलं देखील. Archaeology शिकताना एकूणच माझ्या विचारांमधील, मला सतत पडणाऱ्या प्रश्नांमधील आणि आजूबाजूला सतत घडणाऱ्या गोष्टींमध्ये असणारा एक सुसंगतपणा जाणवू लागला. आपल्या आत आणि बाहेर जे काही घडतंय त्याची पाळंमुळं शोधताना मजा येऊ लागली. जे जेमध्ये ज्या मोकळेपणाच्या ओढीने मी गेले होते तो मोकळेपणा मला इतिहास आणि पुरातत्त्व असे रूढार्थाने कंटाळवाणे विषय शिकताना जाणवू लागला. गोष्टींची उकल होत जातानाचा मोकळेपणा होता तो.
पुरात्तत्वशास्त्राचा एमएचा अभ्यासक्रम संपल्यानंतर मग मी वेगवेगळ्या शाळा आणि कला महाविद्यालयांमधून कार्यशाळा घ्यायला सुरवात केली. कला ही स्वैर नसून ती मोकळी आहे. आणि हा मोकळेपणा फक्त आणि फक्त अभ्यासामधून येऊ शकतो असं काहीतरी विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा तो छोटासा प्रयत्न होता. इतिहास, पुरातत्व आणि कला हे विषय एकत्र बांधून मी ह्या कार्यशाळांचे विषय निश्चित केले होते. परंतु आपल्या एकूणच शिक्षणव्यवस्थेमध्ये या विषयांमध्ये इतकी फूट पाडलेली आहे की इतिहास आणि कला ह्यांचं नातं वैगरे जाणून घेण्यात बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना फारसा रस नसायचा. अर्थात काही मोजके अपवाद वगळता.
मग मला हळूहळू लक्षात यायला लागलं की ह्या सगळ्याच परिस्थितीचं मूळ आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये आहे. तेच जाणून घ्यायच्या विचाराने मी पीएचडी करायचं ठरवलं. विषय होता : इतिहास. ह्या विषयातून शाळेत विद्यार्थी नेमकं काय शिकतात? इतक्या महत्त्वाच्या विषयामुळे त्यांना समाजभान किंवा आत्मभान येतं का? काळाच्या मोठ्या पटलावर स्वतःला ते नेमकं कुठं बघतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कलेचं महत्त्व किती आणि कसं?
पीएचडी संपायला साधारण सहा वर्ष लागली. या काळात मी १२ ते १५ या वयोगटातले जवळपास २००० विद्यार्थी आणि २०० शिक्षक यांचा विविधप्रकारे अभ्यास केला. विविध शिक्षण तज्ज्ञांना भेटले. विविध प्रकारे प्रयोग केले. मुलाखती घेतल्या. या कालावधीमध्ये विविध छोट्या छोट्या आडवळणावरच्या गावांमध्ये फिरले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, पनवेल आणि इतर काही शहरी भागांमध्ये विविध खाजगी शाळा ते पालिकेच्या शाळांना भेटी दिल्या. ह्या सहा वर्षांच्या कालावधीत काही उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्न तयार झाले. जुन्या प्रश्नांची मोडतोड झाली. एकूण अतिशय रंजक प्रवास होता तो. मुलांबरोबरच्या गप्पा, शिक्षकांबरोबरच्या चर्चा यामुळे माझा राग आणि त्रागा कमी होऊन त्याची जागा फक्त कळकळीने घेतली. मला वाटत होतं त्यापेक्षा ही समस्या अधिक खोल आहे आणि तिला समाजातील कोणताही एक घटक जबाबदार नसून आपण सगळेच जबाबदार आहोत ही जाणीव प्रकर्षाने झाली. ह्या सगळ्याच प्रक्रियेमधील काही रंजक प्रयोग आणि ते करताना आलेले अनुभव पुढील काही भागांत.
- डॉ. अनघा भट

लिंग गुणोत्तरातील तफावत आणि मुलांवरील बलात्कारांचं वाढतं प्रमाण (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)

तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या एका मैत्रिणीचा फोन आला. अगं, खूप टेन्शनमध्ये आहे. टेन्शनच कारण काय तर मुलाला लग्नाकरिता मुलगी मिळत नाही. मला आधी थोडं हसूच आलं. पण ज्यावेळी ती वधू शोधाच्या कहाण्या सांगू लागली तेव्हा त्याचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. बदलत्या जीवनशैलीनुसार मुलामुलींच्या जोडीदाराविषयी मागण्या, अपेक्षा बदलल्या आहेत. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेणं कठीण होऊन बसलं आहे. या पुढे जाऊन मैत्रिणीने जो अडथळा सांगितला तो भयानक होता. ती म्हणाली, की हल्ली मुली भेटणंच कमी झालंय. म्हणजे सगेसोयरे, ओळखीपाळखीचे, दूरदूरच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा मुली सापडत नाहीत. याचा अर्थ मुलाच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर खूपच घटला आहे. याचं एक कारण सगळ्यांना मुलगा जन्माला यायला हवा. दुसरं निरीक्षण समाजातील मुलींच्या सुरक्षिततेतील हेळसांड. स्त्रिया सुरक्षित नाहीत म्हणून देखील त्यांना जन्म देणं टाळलं जातंय.
देशात गेल्या २२ वर्षांमध्ये अल्पवयीन मुलांवरील बलात्कारामध्ये चौपट वाढ झाली आहे. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सहा संस्थांनी एकत्र येऊन तयार केलेल्या एका अहवालातून हे नुकतंच स्पष्ट झालं आहे. १९९४ ते २०१६ या २२ वर्षांतील राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या आकडेवारीचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. १९९४मध्ये अल्पवयीन मुलांवरील बलात्काराची आकडेवारी तीन हजार ९८६ होती. २०१६मध्ये वाढून ती १६,८६३ झाली आहे. 'चाइल्ड राइट्स इन इंडिया-अॅन अनफिनिश्ड अजेंडा' या संस्थेने तयार केलेला हा अहवाल लहान मुलांशी निगडीत कुपोषण, गुन्हेगारी आणि शिक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करतो. लहान मुलांच्या दृष्टीने चार महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आवश्यक तेवढे लक्ष पुरविले जात नाही. यामध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, खेळण्याचे स्वातंत्र्य, मनोरंजन व आराम, कुटुंब आणि समुदाय आधारित संरक्षण यंत्रणा या बाबींचा समावेश आहे, असंही अहवालात म्हटलं आहे.
लिंग गुणोत्तरातील तफावत आणि बलात्कारांचं वाढतं प्रमाण हे दोन्ही मुलींच्या संख्येत होणारी घट अधोरेखित करतात. मुख्यत: देशाच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न कालानुरूप गडद होऊ लागला आहे. मात्र मुलांना या समस्येची फारशी झळ पोहोचताना दिसत नाही, असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, खेळण्याचे स्वातंत्र्य, मनोरंजन व आराम, कुटुंब आणि समुदाय आधारित संरक्षण यंत्रणा या बाबींचा समावेश आहे. परंतु, अहवालात म्हटलं आहे की त्या गोष्टींपासून तिला वंचितच ठेवलं जातं. गावखेड्यात मुलींच्या आरोग्याची देखभाल होत नाही, त्यामुळे तिच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो, तिला रूढीपरंपरेत अडकल्यामुळे खेळण्याचे, आरामाचे स्वातंत्र्य नसते. कुटुंब आणि समुदाय आधारित संरक्षण यंत्रणा या बाबींचा अभाव अशा कारणांनी मुलींना जन्मच देणं टाळलं जातं. साहजिकच लग्न करण्याकरिता मुली मिळणं कठीण होऊन बसलं आहे. यावर एकच उपाय समाजात स्त्रीविषयी विचार बदलायला हवेत. घराघरात मुलीचा जन्म नाकारला जाऊ नये असा आग्रह धरावा.


- लता परब
#नवीउमेद

दीनदुबळ्यांसाठी माऊलीची सेवा नवी उमेदवर आपण १६ जुलैला पोस्ट प्रकाशित केली होती. बीड जिल्ह्यातल्या पाडळी शिवारात वन्यजीवांसाठी पाणवठे उभारणाऱ्या व्यक्तीविषयी. पण या व्यक्तीचं काम एवढयापुरताच मर्यादित नाही. या व्यक्तीचं नाव माऊली सिरसाट. वय साधारण ३५ च्या आसपास. पशुसेवा, रुग्णसेवा, वृक्षारोपण कुठलंही काम असो माऊली झपाटून काम करतात.
१५ व्या वर्षांपासून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलं. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने त्यांचा आदर्श. परिसरातली अनेक माणसं पैशांअभावी डोळ्यांची शस्त्रक्रिया करू शकत नाहीत, असं माऊली यांच्या लक्षात आलं. त्यांनी मुंबईतलं जे. जे. रुग्णालय आणि डॉ लहाने यांच्या मदतीनं शिबीर सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे सुमारे 500 वृद्ध व्यक्तींची डोळ्याची शस्त्रक्रिया मोफत होऊन त्यांना दृष्टी आली. साक्षाळ पिंपरी गावात एकाच कुटुंबातल्या ६ व्यक्ती अंध आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून देत, माऊली त्यांना सांभाळत आहेत.
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात त्यांनी योगदान दिलं. चार वर्षांपूर्वी परिसरात नदीकाठी त्यांनी एक हजार झाडं लावली. स्वखर्चानं पाणी देऊन त्यांनी ती जगवली. दुष्काळामुळे यंदा अजिबातच पाणी नव्हतं. माऊली यांनी विंधनविहीर घेतली आणि झाडांना पाणी दिलं. त्यासाठी त्यांनी स्वतःची मोटरसायकल आणि अंगठी विकली. त्यामुळे गावालाही दुष्काळात पाणी मिळालं. तागडगाव इथले सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणे हेही माऊलींचे आदर्श. त्यांच्यापासून प्रेरणा घेत माऊलींनी वन्यजीवांच्या देखभालीचं काम सुरू केलं. वंचित , दुष्काळी भागात ते करत असलेलं काम चर्चेचा विषय आहे. 


- सूर्यकांत नेटके 

सखी ग्रुपमुळे होते आहे जलपुनर्भरण

जालना शहर. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जालन्यावर दुष्काळाचं सावट आहे. पावसाचं घटतं प्रमाण आणि आहे त्या पाण्याचा मुक्त वापर यामुळे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. जलसंकटावर यावर काहीतरी ठोस उपाय हवा म्हणून अनेक जण प्रयत्नशील आहेत.
जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे सोबतच वाया जाणारे पाणी थांबवून ते जमिनीत जिरवून जमिनीतील पाणी पातळी वाढवता येते. पण यासाठी नुसते प्रयत्न करून, जलपुनर्भरणावर पेपरमध्ये लिहून, भाषणं देऊन लोक विसरून जातात. यावेळी मात्र हे काम इथल्या स्त्रियांनी मनावर घेतलं. कदाचित त्यामुळे जलपुनर्भरणाची ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचते आहे असं म्हणायला हवं.
जालना शहरातील 60 महिला. जलपुनर्भरणाचं तत्त्व लोकांना समजावून सांगत आहेत. एकीकडे या कामासाठी आवश्यक मनुष्यबळाची सांगड त्यांनी घातली आहे. पावसाळा आला की रोजंदारी मजूर बारीक बारीक दुरुस्तीच्या कामासाठी निघून जातात. त्यामुळे कामगार उपलब्ध होत नाही आणि परिणामी इच्छा असून देखील जलपुनर्भरणाची संधी निघून जाते. त्यामुळे लोकांना जलपुनर्भरणाचे महत्त्व सांगतानाच या महिलांनी गरजू प्लंबर मजुरांची एक टीमचं तयार केली आहे. ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याची एखाद्याची तयारी असते त्यांना हा सखी मंच प्लंबर, मजूर पुरवतात. त्यामुळे कामाला लगेच सुरुवात होते.
दिवसेंदिवस वाढत चाललेली पाणीटंचाई लक्षात घेता जलपुनर्भरणाची गरज ओळखून ‘सखी ग्रुप ऑफ जालना’ हा साठ सख्यांचा ग्रुप शहरातील अनेक भागांमध्ये फिरून त्यांच्या इतर सख्यांना जलपुनर्भरणासाठी प्रोत्साहित करत आहे. जालन्यातील महिलांच्या ग्रुपच्या माध्यमातून जलपुनर्भरणाविषयी फक्त जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्षात हा उपक्रम पूर्ण करून घेण्याचं काम सुरू आहे. चालू महिन्यामध्ये जलपुनर्भरणाचे 10 उपक्रम पूर्ण झाले असून आणखी दहा उपक्रम प्रगतीपथावर असल्याची माहिती या ग्रुपच्या सदस्यांनी दिली. ग्रुपमधील महिला रोजच्या घर कामातून वेळ काढतात. नंतर एकत्र येत शहरातील विविध भागात जाऊन तेथील महिलांना भेटतात. हा उपक्रम महिलांना समजून सांगितल्यानंतर त्या घरातील कर्त्या पुरुषाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात आणि त्यांच्याकडून हा उपक्रम करून घेऊ शकतात. त्यामुळे महिलांना प्रोत्साहित करण्यावर सखी ग्रुप जास्त भर देत आहे. उपक्रमासाठी विविध साहित्य जमा करताना, मजुरांची उपलब्धता या अडचणीमुळे नागरिक हे जलपुनर्भरण करण्यासाठी धजावत नाहीत. मात्र, या कामासाठी लागणारे साहित्य, मजुर ते सर्व काम पूर्ण होईपर्यंत लागणारी मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. यामुळे अनेक जण प्रोत्साहित होत असल्याचेही या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
आजतागायत 10 कुटुंबीयांनी या जलपुनर्भरण संकल्पनेला मूर्त रूप दिले असून अजून 30 ते 40 परिवारांनी या संदर्भात चौकशी केली आहे. या सख्यांनी चालवलेल्या उपक्रमास नगर परिषद तसेच सरकारी पातळीवर प्रयत्न झाले तर शहरातील पाणी पातळी वाढून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निघून जाईल अशी भावना या सखी ग्रुपच्या निर्मला लड्डा, निर्मला साबू, विद्या राव यांनी व्यक्त केली.
- अनंत साळी, जालना
 व्हिडीओ लिंक  : https://www.facebook.com/watch/?v=2844059842333699

इसवी सन पूर्व काळ (आखुडबुद्धी बहुशिंगी)इसवीसन पूर्व काळ हा इसवीसन लागू व्हायच्या आधीचा काळ होता. या काळात कालगणना उलट्या दिशेने केली जायची. म्हणजे इसपूर्व ३०० नंतर इसपूर्व २९९ उजाडायचे, यानंतर इसपूर्व २९८, मग इसपूर्व २९७ असा क्रम असायचा. आधी इसपूर्व चौथे शतक, नंतर इसपूर्व तिसरे शतक आणि त्यानंतर इसपूर्व दुसरे शतक असे या काळात घडायचे.
अर्थात, काळ उलटा चालत असल्याने तत्कालिन मनुष्ये आधी मरत, मग आजारी पडत, मग टुणटुणीत होत, त्यानंतर तरूण होऊन शिक्षण घेत बाल्यावस्थेत जात आणि शेवटी जन्म घेऊन आपल्या आईबापांचे लग्न होण्याची वाट पाहात रहात. अशा प्रकारे, कित्येकांना आपल्या मरणानंतरची पुढची साठ-सत्तर वर्षे विनाकारण पृथ्वीवर जीवन कंठावे लागे. लोकांना वृद्धावस्थेतील आपले ज्ञान दिवसेंदिवस कमी करत जावे लागत असल्याने, बहुतेक लोकांचा भर स्मरणशक्तीपेक्षा विस्मृतीवर अधिक असे. पाठशाळांत शिक्षकमंडळी याच कामी अधिक मेहनत घेत. पाचवीला पोरांना शिकवलेले वीस ते तीसपर्यंतचे पाढे मोठ्या परीश्रमांति ते त्यांच्या मेंदूतून काढून टाकत. अशा प्रकारे, शाळेत येण्यापूर्वी एकपाठी पंडीत असलेला विद्यार्थी पहिलीला जाईपर्यंत त्याला जुजबी अक्षरओळख राहिल इतपतच त्याची तयारी झालेली असे. काही चतुर पालक याच उलट्या क्रमाचा फायदा घेऊन शिक्षकांकडून फी वसूल करून घेत.
कालगणना उलटीकडून होत असल्याने त्या काळातल्या लोकांना भविष्याची चिंता नसे, तर आपला भूतकाळ कसा असेल याची भीती त्यांना सतत भेडसावत असे. आपला भूतकाळ ते भविष्यवेत्त्यांकडून (किंवा भूतवेत्त्यांकडून) जाणून घ्यायचा प्रयत्न करत. भविष्यात काय घडले आहे हे ज्ञात असल्याने लोक आपल्या भविष्यकाळातील अनुभवांचे गाठोडे आपल्यापेक्षा वयोवृद्ध लोकांसमोर मांडून अकलेच्या चार गोष्टी सुनावत असत. वृद्ध लोकही भविष्याकडे एक नजर ठेवून त्या आदराने ऐकून घेत असत.
या काळात, आधी शोधांचा यथाशक्ती वापर होऊन मग काही वर्षांनी तो शोध लावला जाई. उदाहरणार्थ, इ०स०पूर्व ४०००मध्ये चाकांचा वापर रथांसाठी होऊ लागला तर चाकांवर मडकी बनवण्यास इ०स०पूर्व ४२०० मध्ये सुरुवात होऊन शेवटी इ०स०पूर्व ४५०० मध्ये मनुष्यास चाकाचा शोध लागला. सर्वच गोष्टी उलट्या होत असल्याने लोक आधी औषध खायचे, मग आजारी पडायचे (हल्लीही तेच होत असते असा काहींचा अनुभव आहे) त्यानंतर साथीचे रोग यायचे. शर्विलक आधी तुरुंगात खितपत पडत, मग राजसैनिकांतर्फे बंदी बनवले जात आणि त्यानंतर आपल्यावरच्या अन्यायाचे परीमर्जन होण्यासाठी चोऱ्या करत. नवे वर्ष सुरु होताना लोक इतरांना 'आगामी वर्ष तुम्हांला सुखाचे गेले असावे.' असे अपेक्षून 'गतसालासाठी' शुभेच्छा देत. हे असेच चालू राहिले तर हळूहळू मानव जात नष्ट होऊन पृथ्वीवर डायनोसॉर नामक सरपटणाऱ्या प्राण्यांचे राज्य येईल हा धोका दिसू लागला होता. शिवाय, उलट कालगणनेमुळे पृथ्वीवर पुन्हा शीतयुग येण्याचीही भीती होतीच.
एकूणात या उरफाटया कालगणनेमुळे मानवाच्या प्रगतीला खीळ बसू लागल्याने प्रचंड विचारांती काही विद्वान मनुष्यांनी ही कालगणना बदलावी असा सल्ला दिला. (भारतवर्षातल्या पुण्यपत्तन नामक ग्रामातल्या काही पंडीतांनी याला विरोध दर्शवला होता असे समजते.) कालगणना कशी असावी या वादात काही वर्षे तशीच निघून गेली. पण निर्णय काही होईना. शेवटी एके दिवशी इसपूर्व दोन, इसपूर्व एक अशी उलटी मोजदाद करत सर्व वर्षे संपली. नाईलाजाने लोकांना ही उलट कालगणना बंद करून सध्या आहे तशी सरळ वर्षे मोजण्यास सुरुवात करावी लागली. आणि मग माणसे आजच्यासारखे सरळ जीवन जगू लागली. हे करताना, तत्कालिन माणसांना शून्याची कल्पना नसल्याने इसवी सन ० हे वर्ष कालगणनेत आलेच नाही. अर्थात, इ०स०पूर्व १ नंतरचे वर्ष थेट इसवीसन १ सुरू झाल्याने अनेक माणसांची वये एका वर्षातच दोन वर्षांनी वाढली.
- ज्युनिअर ब्रह्मे

शेणापासून लाकूड तयार करणारा अवलिया

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातले मिलिंद रघुनाथ पाटील. मिलिंद यांनी शेणापासून लाकूड तयार करतात. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पाच जणांना रोजगारदेखील उपलब्ध करून दिला आहे.
मिलिंद वाठोडा गावचे. तिथे २०१३ मध्ये त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला. तेव्हा गाईंच्या शेणाचं काय करायचं, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. बाजारात शेणखताला अपेक्षित किंमत नाही. गुणवत्तापूर्ण खत कवडीमोल भावानं विकावं लागत असल्याचं दुःख त्यांना सतावत होतं. शेणाच्या इतर उपयोगाबाबत त्यांनी युट्युबवर शोध घेतला. त्यातूनच गवसला शेणापासून लाकूड तयार करण्याचा यशोमंत्र. त्यासाठीचं यंत्र शोधून, खरेदी करून गोठ्यात आणलं.
मिलिंद यांच्या गोठ्यातला शेणाचा प्रत्येक कण लाकडात परावर्तित केला जातो. दररोज ३०० दांड्या तयार होतात. तीन इंच बाय साडेतीन फूट लांबीच्या. दर १२ रुपये किलो.
हे लाकूड ते हॉटेल व्यावसायिक आणि आणि खानसामाना पुरवत आहेत. त्यांच्या लाकडाला आज ग्रामीण भागामध्ये अपेक्षित मागणी नाही. पण अंत्यविधीपासून अनेक कारणांसाठी असलेले या लाकडाचे उपयोग लोकांच्या हळूहळू लक्षात येत आहेत. कमी होणारी झाडांची संख्या आणि लाकडाची वाढती मागणी याचं समीकरण विसंगत आहे. हीच विसंगती मिलिंद यांच्या पथ्यावर पडणार आहे.
लाकडात गोमूत्राचा अंश असून ते पर्यावरणपूरक असल्याचं मिलिंद सांगतात. शेणापासून दररोज लाकूड तयार केले जात असल्यामुळे गोठा स्वच्छ राहतो. गोठ्यामध्ये रोगराई पसरण्याची शक्यताही कमी झाली आहे. . मिलिंद रोज अडीचशे ते साडेतीनशे लिटर दूध ते शिरपूर शहरात विकतात. एकूणच मिलिंद यांनी गोठ्यात 'आम के आम आणि गुठलियोन के दाम' या म्हणीला प्रत्यक्षात आणली आहे.

-कावेरी परदेशी, धुळे 

गोष्ट वाडा कोलमच्या पेटंटची


अनेक घरांमध्ये खाल्ला जाणारा वाडा कोलम तांदूळ. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातलं पालसई गाव. बुधाजी पाटील यांनी १९१० मध्ये तालुक्यात प्रथमच वाडा कोलम आणि वाडा झिनिया या जातीचे भात लावले. त्याची चव अतिशय उत्तम. इतर शेतकऱ्यांनाही हे पीक आवडलं. पाटील इतरांनाही बियाणं पुरवू लागले. दिवसेंदिवस या जातीला प्रसिद्धी मिळू लागली.
बुधाजी यांचे पुत्र गोपाळ आणि पद्मन हेदेखील प्रयोगशील शेतकरी. तांदुळाच्या विविध प्रकारच्या १११ जातींवर त्यांनी प्रयोग केले.यात आय.आर. ८, बनाल ९ व १, गुजरात ४ व १, रेशमा, पितवर्णी या जाती होत्या. विक्रमी भात उत्पादन घेतल्याबद्दल १९७० मध्ये राज्याच्या कृषी संचालनालयानं त्यांचा सन्मान केला. १९७१ मध्ये कृषी संचालनालयाचा 'शेतीनिष्ठ' पुरस्कार.
वाडा कोलम आणि वाडा झिनिया तालुक्याबाहेर पोहोचल्या होत्या. त्यांची चव उत्तम होती. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यात या जाती असमर्थ ठरत होत्या. कमकुवत रोप रोगाला सहज बळी पडत असे. पद्मन यांच्या मनात याबाबत कायम सल असे.
ही सल दूर केली त्यांचे पुतणे किरण पाटील यांनी. किरण यांनी १९९२ मध्ये कृषीमध्ये डिप्लोमा केला. काकांच्या मनातली सल दूर करण्यासाठी १९९५ पासून त्यांनी प्रयत्न सुरू केले. १७- १८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर किरण यांनी वाडा कोलम आणि वाडा झिनिया जातीचे सुधारित वाण तयार केले. यात साथ लाभली त्यांचे गुरू शास्त्रज्ञ डॉ प्रशांत जोशी यांची. जोशी मूळचे अकोला जिल्ह्यातल्या भामोद गावचे. सध्या हैदराबादला असतात. चवीला कुठलाही धक्का न लावता ,रोपं मजबूत करण्यासाठी, भरपूर फुटवे आणि न लोळणारं झाड बनवण्यासाठी लागणारा जीन्स, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा जीन्स, या जातीच्या रोपांमध्ये विकसित केला. त्यानंतर भात पिकवणाऱ्या विविध राज्यात जाऊन शेतकरी नेमून चाचणी घेतली. २०१६-१७ च्या जूनमध्ये १३० ते १३५ दिवसात तयार होणारी सुधारित वाडा कोलम आणि १२० ते १२५ दिवसात तयार होणारी सुधारित वाडा झिनिया या जाती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या. या वाणांना १७ मे २०१९ ला भारत सरकारकडून पेटंट मिळालं आहे. तसंच पुण्यातील कृषी आयुक्तालयाकडून परवानाही मिळाला आहे.
या दोन सुधारित जातींसोबतच मधुमेही रुग्णांना चालू शकेल असा काळा तांदूळ आणि काळा गहू किरण यांनी विकसित केला आहे.
किरण पाटील:- 94226 81261 

-संतोष के पाटील, पालघर 

मूल अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)


एका शाळेत पालक सभा सुरू होती. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलाला शाळेतून काढण्याबाबतचा विषय अजेंडावर होता.जमलेले सर्वच पालक चिंतातुर दिसत होते.काही मुलाबद्दल सहानभूती दर्शवत होते,तर काही मुलाला शाळेत न ठेवण्याच्या समर्थनात होते. प्रत्येकाचं मन अस्वस्थ करणारा विषय. आणि असणारच कारण त्यांच्या मुलांचा प्रश्न होता. पालक आपापसात त्या मुलाच्या पालकांना दोष देत होते. खरंतर कोणाला दोष देण्यापेक्षा अमली पदार्थांच्या व्यसनाची समस्या दूर कशी होईल, याचा विचार व्हावा. प्रत्येक पालकांनी फक्त आपलंच मूल नाहीतर समाजातील कोणतंच मूल याच्या आहारी जाऊ नये याबाबत सतर्क राहून त्याबद्दलची माहिती घ्यावी.
'ड्रग्ज फ्री कॅम्पस' या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाच्यावतीने शाळा आणि कॉलेजमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते. या मोहिमेदरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यात असं लक्षात आलं की अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सहज मिळतात.अनेकदा पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण गांजाचे असते . शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये गांजाची प्रचंड क्रेझ आहे. गांजा वनस्पतीजन्य असल्याने त्यात शरीराला हानिकारक असे काहीच नाही, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. यासाठी इतिहासातील महापुरुषांचे दाखले दिले जातात. इतर अमली पदार्थांपेक्षा गांजा स्वस्त मिळतो. आधी सिगारेट आणि नंतर गांजाच्या आहारी गेलेली मुले अधिक तीव्रतेच्या नशेसाठी पुढे एमडी,चरस,कोकेन घेण्यास सुरुवात करतात.
एक जागरूक पालक म्हणून प्रत्येकानं जबाबदारी ओळखून आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पालक, नोकरी व्यवसायामुळे व्यस्त असतात. त्यामुळे मुलांकडे रोजच्यारोज लक्ष ठेवणं त्यांना शक्य होत नाही.तरीही आपण वेळोवेळी शाळेबद्दल,अभ्यासाबद्दल त्यांच्या मित्रांबद्दल चौकशी करणं गरजेचं आहे. मुलांबरोबर वेळोवेळी संवाद ठेवून, त्यांच्या अडचणी सोडवून आपण त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला पाहिजे.


- लता परब   #नवीउमेद

गोष्ट गाईच्या डोहाळे जेवणाची
नाशिकची बबिता... अगदी शांत स्वभावाची... कुणाबरोबरही पटकन मैत्री करणारी... सध्या पंचवटी मधील बळी मंदिर परिसरात तिची जरा जास्तच चर्चा ऐकायला मिळते आहे. नाशिकचे उद्योजक संजय जरीवाले यांनी या बबिताला गंगापूर येथील बालाजी मंदिराच्या गो शाळेतून ती अगदी लहान असताना तिला दत्तक घेतले. देशी गाई वाचाव्या, त्यांना संरक्षण मिळावं यासाठी संजय भाई नेहमी प्रयत्न करीत असतात. शेतात वासरू आणल्यानंतर तिचं नामकरण केलं गेलं.
आज बबिता गाय तीन वर्षाची झाली आहे. गायीविषयी सर्व सामन्याच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी आणि एक गाय दत्तक घेऊन तिचं पालन पोषण करावं हा संदेश समाजात देण्यासाठी त्यांनी एक आगळा कार्यक्रम केला. चक्क! गायीचे डोहाळे जेवण करण्याचा भन्नाट कार्यक्रम त्यांनी आखला. दीडशे लोकांना जेवायला बोलावले. बबिताला पट्टा, बाजूबंद, मुकुट आणि हार घालून सजवण्यात आलं. परिसरातील महिलांनी देखील यावेळी आवर्जून हजेरी लावली होती. त्यांनी तिची पूजा, आरती केली गेली. गाणी म्हणून त्या फुगड्या खेळल्या. जणू त्यांची ती सखी आहे असे समजून तिला घास देखील भरवत होते. जेवणामध्ये पुरणपोळीचे मांडे, आमरस, आमटी आणि गरमागरम भजी होती आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि शेत मजुरांना त्यांनी आवर्जून बोलावल. मुक्या प्राण्यांना प्रेम दिल्याने ते देखील आपल्यावर प्रेम करतात याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
“मुक्या प्राण्यांना प्रेम दिल्याने ते आपल्यावर त्याहून अधिक प्रेम करतात. गोसेवा ही पुण्यसेवा आहे. आज सगळीकडे दुष्काळाचे चित्र आहे. गरीब शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं अवघड झालं आहे. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना आर्थिक मदत मिळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या गाईच्या डोहाळे जेवणाचा उपक्रम केला,” असं संजय जरीवाले यांनी सांगितलं. 

- प्राची उन्मेष, नाशिक

निलम गोऱ्हे यांची मुलाखत

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून आमदार डॉ नीलम गोर्‍हे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. २००२ पासून त्या विधानपरिषद सदस्य आहेत. विधानसभेचं अध्यक्ष वा उपाध्यक्षपद, विधानपरिषदेचं सभापती वा उपसभापतीपद महाराष्ट्रात, भारतातदेखील क्वचितच स्त्रियांना मिळालेलं आहे. स्त्रियांच्या समस्यासोडवणुकीसाठी सतत काम करणार्‍या नीलमताईंना उपसभापतीपद मिळालं, हे विशेष. अभ्यासू, व्यासंगी आणि तळातल्या समस्यांची सखोल जाण असणार्‍या नीलम गोर्‍हे या सामाजिक संस्थांसाठी हक्काच्या आमदार होत्याच. आता उपसभापती या त्यांच्या नव्या भूमिकेतून त्या पूर्वीसारखंच सकस काम करतील याची खात्री त्यांच्याशी झालेल्या भेटीने झाली.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=372139080111278

त्यांच्यामुळे आज अनेक तरुण शहरात न जाता गावात स्वतःचा व्यवसाय करत आहेत


जवळजवळ २६ वर्ष त्यांनी स्वतःला शेती, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास यासाठी वाहून घेतलं आहे. त्यांचं नाव विनायक महाजन. वय ६३. अवघ्या दापोलीला ते काका म्हणून परिचित.
कोळथर गावात त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण. मुंबईतल्या भगूबाई मफतलाल पॉलीटेक्निकलमधून मेकेनिकल इंजिनिअरिंग. वर्ष ७३-७४ च्या सुमाराला शिक्षण घेताघेताच नोकरीला सुरुवात. एका बड्या शीतपेय कंपनीच युनिट नुकतंच भारतात आलं होतं. त्या कंपनीसाठी बाटल्या तयार करण्याचं यंत्र तयार करण्याचं काम काकांच्या कंपनीला मिळालं. काम करत असताना जाणवलं की हे पेय हानिकारक आहे. देशी फळांपासून शीतपेय बनवल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यालाही होईल. समाजाचा विचार करण्याचा वारसा घरातूनच लहानपणापासून मिळाला होता. कोकम सोडा, आवळा सोडा तयार करण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. दापोलीत कुडावळे इथं महाजन बेव्हरेजेस सुरू केली.
९३-९४ च्या सुमाराला काकांनी सहकुटुंब कोकणात कायमस्वरूपी राहण्याचं ठरवलं. गावाला कायमस्वरूपी आल्यावर शेतीतल्या अनेक समस्यांचं अधिक चांगल्या प्रकारे आकलन होऊ लागलं. मग शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर ' शाश्वत कृषी संवाद' बुलेटिन चालवलं. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या बैठका. बाहेरगावी अभ्यासदौरे.
'कोकणात खूप विविधता आहे. शहरात जाण्यापेक्षा आपल्या मातीत राहून मालक व्हा' , हा विचार त्यांनी तरुणांना दिला. दापोलीत भाजीपाल्याची गरज होती. सगळी भाजी बाहेरगावावरून येत असे. काकांनी भाजी पिकवणाऱ्या ३०-४० शेतकऱ्यांना एकत्र आणलं. २०१० मध्ये शेतकऱ्यांची ' दापोली तालुका शेतकरी सेवा सहकार मर्यादित' संघटना सुरू झाली. त्यांना हक्काची जागा मिळवून दिली. हे शेतकरी आता एकूण गरजेच्या दीड टन भाजी दापोलीत विकू लागले आहेत. काही तरुण व्हाट्सपद्वारे भाजी विकतात. कुणाला कुठला उद्योग सुरू करायला असेल,शेती वा फुलांसबंधी माहिती हवी असेल तर काका निस्वार्थपणे सदैव तयार असतात.
गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं बंधाऱ्यांचं आरेखन केलं. साखळी बंधारे बांधले.
त्यांचा भर नैसर्गिक , सेंद्रिय शेतीवर. दोन वर्षांपूर्वी त्यांनी 'नियोजन नक्षत्र' अँप तयार केलं. यात हवामान,आर्द्रता ,कोणतं पीक कुठल्या ऋतूत घ्यायचं, कसं घ्यायचं , शेतीशी संबंधित इतर माहिती आहे. अडचणीच्या वेळी कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून त्यांनी हाईक या सोशल अँपवर 'ग्रामोदय' गट सुरू केला . जवळपास २५० शेतकरी या गटाचे सदस्य आहेत. .त्यांचं 'बळी आणि राजा' नावाचं पुस्तक 2010 ला प्रकाशित झालं. शेतीची हानी आणि त्यावर मार्ग याबाबत पुस्तकात विवेचन आहे. एकच पीक न घेता बहूपीक घेतल पाहिजे असा त्यांचा आग्रह. कोकणात बरक्या फणसाला कोणी विचारत नाही. काकांनी त्यापासून चॉकलेट तयार केली. आंबा, काजू यावर त्यांचे असंख्य प्रयोग सुरू असतात. कोकण कृषी विद्यापीठाची उत्तम साथ त्यांना आहे.
केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानात ग्रामसमन्वयक म्हणून योगदान ते देत आहेत. गावांचा संपूर्ण विकास हेच त्यांचे उद्दिष्ट. त्यांच्यामुळे आज अनेक तरुण शहरात न जाता गावात स्वतःचा व्यवसाय करत आहेत.


- संतोष बोबडे, पुणे

अफवा (आखुडबुद्धी बहुशिंगी)

अफवा हे बातमीचंच एक प्राथमिक स्वरूप आहे. सहसा, अफवा खोटी ठरली की तिला बातमी म्हटलं जातं. मानवाच्या इतिहासात पूर्वीपासून बातमी आणि अफवा यांच्यात संघर्ष चालू आहे. मोंगल काळात युद्ध होत असल्याची अफवा उठल्यानं खरोखरची युद्धे लढली गेल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातही अफवांचं पीक वेळोवेळी आलेलं दिसून येतं. अफवेचा एक प्राथमिक प्रकार म्हणजे हूल. नारायणराव पेशव्याला मारण्यास गारदी शनिवारवाड्यात शिरले तेव्हा हूल पडून बाजार बंद पडला होता. एवीतेवी बाजार बंद पडलाच आहे तर लागल्या हाती नारायणरावाला संपवावं अशा विचारांनी गारद्यांनी त्याला मारलं असावं. आणि मग, अशा हूल मराठी राजकारणात नेहमीच पडत आल्या.
हूलीचं एक विस्तारीत स्वरूप म्हणजे अफवा. ही अफवा शक्यतो एखाद्यास गुप्त रहस्य सांगावं तशी सांगितली जाते. अफवा जितकी गुप्त तितकी अफवा वेगानं पसरते. पानिपतच्या युद्धात सदाशिवभाऊ पडले आणि सदाशिवभाऊ पडले नाहीत अशा दोन स्वतंत्र अफवा एकाचवेळी मराठी सैन्यात पसरल्या होत्या. कित्येकांनी खातरजमा करावी म्हणून लढणं थांबवलं होतं. पण अब्दालीच्या सैन्यानं लढाई न थांबवल्यानं निष्कारण संहार झाला. पुढं, अठराव्या शतकात इंग्रजांनी बस्तान बसवलं आले तेव्हा त्यांना ठगी किंवा बॉलिवूड सिनेमांपेक्षा भारतातल्या अफवाच त्यांना जास्त अपायकारक वाटल्या होत्या. बातम्या आणि घटना यांची नोंद करण्यासाठी त्यांनी गॅझेटिअर सुरु झालं यामागं या अफवांची भीती होती. अफवांची खातरजमा करून घेता यावी म्हणूनच पुढं इंग्रजांनी तारखातं सुरु केलं. पण तारांपेक्षा अफवा वेगानं पसरत असल्याने टेलिफोन येईपर्यंत अफवांना फारसा आळा बसला नाही. छोटा नागपूर प्रांतातील धनबादजवळचे केऊरझडंग हे गाव शंभर नंबरी अफवांसाठी प्रसिद्ध आहे. (हे गाव अस्तित्वात नाही अशीही एक अफवा आहे.) असं म्हणतात की एकेकाळी इथल्या अफवा उत्तरेस दिल्ली तर दक्षिणेस गुंटूरपर्यंत पोचायच्या. या गावाची ख्याती इतकी आहे की एखादी अफवा केऊरझडंगची आहे असं म्हटल्यावर शहाणेसुरते लोकही त्यावर पटकन विश्वास ठेवतात.
या गावात सगळे गावकरी दिवसरात्र पिंपळाच्या पारावर बसून अफवांचं पीक काढत असावेत. १९८१ साली आपल्या गावी स्कायलॅब कोसळणार आहे ही अफवा केऊरझडंगमधून पसरवली गेली तेव्हा अनेकांना आपलं मरण अटळ वाटलं होतं. काही भोळ्या लोकांनी आपली सगळी शेती विकून धनबादला जाऊन, नवे कपडे खरेदीलत्ते करून, अमिताभ बच्चनचे दोनदोन सिनेमे पाहून मरण्यापूर्वी जीवाची चैन केली होती. स्कायलॅब १९७९ सालीच कोसळलेलं असताना अशी अफवा लोकांना पटवून देणं हे मोठं हुशारीचं काम म्हटलं पाहिजे. याहीपुढं जाऊन केऊरझडंगच्या लोकांनी नवी अफवा पसरवली आहे अशी अफवाही मध्यंतरी पसरली होती आणि बऱ्याच लोकांचा यावर विश्वासही बसला होता.
१९९०च्या दशकात गणपती दूध पितो, हनुमानाचे पाऊल सापडले, रावणाच्या महालाचे अवशेष सापडले अशा काही मोजक्या गाळीव अफवा केऊरझडंगमधून आल्या. पुढच्या दशकात, टीव्हीवर अनेक न्यूज चॅनेल सुरु झाल्यावर साईबाबांचा व्हिडीओ सापडला, तीन डोक्यांचं रेडकू जन्मलं टाईप अफवा उठू लागल्या. (त्या काळात इंडिया टीव्हीचं हेडऑफिस केऊरझडंगला आहे अशी अफवा प्रचलित होती.) आणि स्मार्टफोन क्रांतीनंतर तर अफवा पसरवण्याच्या तंत्राचा परमोच्च विकास झाला. या काळात कित्येक वृद्ध कलाकार जिवंतपणीच पुन्हापुन्हा मेले, कित्येकदा मध्यरात्रीचे कॉस्मिक किरण लोकांचे मोबाईल खराब करून गेले, वडाच्या पानांनी कित्येकांचे फोन रिचार्ज झाले, लोकांना कित्येकदा मोठमोठ्या लॉटऱ्या लागल्या. थोडक्यात, अफवा पसरवणं ही एका गावाची मक्तेदारी न राहता आता समाजाची एक सामूहिक जबाबदारी बनली. आणि आता आपलं अवतारकार्य समाप्त झालं असल्यानं केऊरझडंग हे गाव नकाशातून गायब झालंय (अशी अफवा जोरात आहे).

- ज्युनिअर ब्रह्मे

एक दिवस वाहनाविना


निसर्ग व पर्यावरणाचंही संवर्धन व्हावं असं प्रत्येकजण फक्त म्हणत असतो. पण काही तरूणांनी मात्र यासाठी पुढाकार घेतला आहे. हे तरूण आहेत, यवतमाळचे. ‘एक दिवस वाहनाविना’ हे अनोखं अभियान त्यांनी नुकतंच सुरू केलं आहे. आठवड्यातून किमान एक दिवस प्रत्येकाने कोणतेही वाहन न चालविता पायदळ किंवा सायकलने आपली कामे करावी, अशी या अभियानाची संकल्पना आहे.
प्रत्येक गावात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरात प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र वाहन आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर आली की, प्रदूषणासोबतच वाहतुकीचाही खोळंबा करतात. यावर उपाय म्हणजे वाहनांचा कमीतकमी वापर करून आपलं गाव प्रदूषणमुक्त करण्यास हातभार लावणे. यासाठी पुढाकार कोण घेणार आणि घेतल्यास लोकांना यासाठी तयार करणं जिकिरीचं काम. कारण घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डेअरीतून दूध आणायचे झाल्यास आपण गाडी स्टार्ट करून भूर्रकन जातो. अशावेळी एक दिवस गाडीविना दैनंदिन कामे करा ही संकल्पना लोकांच्या गळी उतरविणं सोपं नव्हतं. मात्र यवतमाळमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांनी हे शिवधनुष्य उचललं. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी समाज माध्यमांवरून वातावरण निर्मिती करण्यात आली. वृत्तपत्रांमधून पॉम्प्लेट वाटण्यात आले. एकदिवस गाडीविना म्हणजे पूर्णत: पायदळ किंवा सायकलने फिरले पाहिजे, हेच गृहीतक ठेवण्यात आले. समाज माध्यमांवरून जनतेला केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरात याची जनजागृती व्हावी यासाठी पायदळ रॅली काढण्यात आली. गेली ६० वर्षे सायकलवरूनच आपला दिनक्रम करणारे शहरातील ज्येष्ठ नागरिक उमेश वैद्य यांनी रॅलीतील सहभागी नागरिकांना पायदळ चालणे आणि सायकल वापरण्यामागचे फायदे सांगितले. या रॅलीस तरूणांसह विविध क्षेत्रातील नागरिक, खेळाडू, महिलांनी उत्तम प्रतिसाद देऊन आठवड्यातील एक दिवस वाहनाविना दैनंदिन कामे करण्याचा निश्चय केला. स्वत:शी प्रामाणिक राहून या अभियानास सहकार्य करून रविवार अथवा आपल्या सोईनुसार आठवड्यातून किमान एक दिवस वाहनाशिवाय फिरूया, असं सर्वांनी ठरवलं. आता या उप्रकमाची सुरवात होऊन एक महिना लोटला. अभियानात सहभागी झालेला प्रत्येकजण आठवड्यातून एक दिवस वाहनाविना राहण्याचा प्रयत्न करीत असून अनेकांना यात यश आले आहे. आता या अभियानात सहभागी होण्यासाठी अनेक उत्सुक लोकं पुढे येत आहेत. त्यामुळे या अभियानाने चळवळीचं रूप घेतलं आहे.


- नितीन पखाले, यवतमाळ

‘गुरांचे वैद्य’ गंगाराम जाधव


रत्नागिरीतलं नाखरे गाव. इथं राहणारे गंगाराम रामजी जाधव. वय 78. व्यवसाय शेती. आजही ते शेतात नांगरणी करतात. परिसरात त्यांची ओळख आहे ती ‘गुरांचे वैद्य’ अशी. गेली ५० वर्षे गंगाराम जाधव गुरांवर मोफत उपचार करत आहेत. तोही जंगलातील झाडपाल्याचा! गुराच्या रोगाचे अचूक निदान आणि त्यावर रामबाण उपचार! त्यामुळे आजतागायत त्यांनी उपचार केलेले गूर दगावलेलं नाही.
आज ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते. पण ५० वर्षांपूर्वी गायी-गुरे हेच शेतीचं मुख्य साधन होतं. त्यात कोकणातली शेती डोंगर उतारावरील दळ्या दळ्याची! त्यामुळे आजही काही ठिकाणी बैलजोडीशिवाय नांगरणी होऊ शकत नाही. त्यामुळे गायीगुरांना अनन्यसाधारण महत्त्व. मग जर गुरं आजारी पडली तर संसाराचा गाडाच जणू थांबायचा. त्यात कोकणातील शेतकऱ्याची परिस्थिती बेताचीच, पैसा अडका नसल्यात जमा. नवीन जनावर विकत घेण्याची ऐपत नाही. संपूर्ण कोकणातील हीच परिस्थिती नाखरे गावातही. तेव्हा गुरांचे डॉक्टरही नव्हते. अशावेळी धावून येत ते गुरांचे वैद्य गंगाराम जाधव.
जाधव यांना गुरांवरील औषधोपचाराचा वारसा त्यांचे वडील बंधू केरू रामजी जाधव यांच्याकडून मिळाला. केरू जाधव यांनीही साधारण १९८५-८६ सालापर्यंत शेतकऱ्यांना ही सेवा दिली. त्यांच्या पश्चात गंगाराम यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला. विशेष म्हणजे आता त्यांनी ही पुंजी त्यांचा २१ वर्षीय नातू साहिल दिलीप जाधव याला दिली आहे.
जंगलातील काही ठराविक वनस्पती, त्यांची पाने, मुळं, साल आदींपासून त्यांची ही औषधं तयार होतात. आजही या वनस्पती येथील जंगलात उपलब्ध आहेत. मात्र याबाबत इतरांना माहिती न सांगण्याचा पूर्वापार चालत आलेला अलिखित नियम पाळला जातो. कारण या वनस्पतीबद्दल अधिक माहिती मिळाल्यास समाजकंटकांकडून या वनस्पती नष्ट करण्याचाही धोका संभवतो.
गंगाराम जाधव यांनी गुरांचे विविध आजार पूर्णतः बरे केले आहेत. अगदी हाड मोडले तरी त्याला भाली (लाकडी पट्ट्या बांधून केलेले प्लास्टर) बांधून हाडे जुळवली आहेत. कोकण पट्ट्यात, विशेषतः रत्नागिरीत घटसर्प हा गुरांचा आजार अधिक दिसून येतो. यावर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. तसेच धनुर्वात, सर्पदंश, अन्न विषबाधा, हगवण, विविध ताप, अजीर्ण आदी आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. आतापर्यंत हजारहून अधिक गुरांना त्यांनी जीवनदान दिलं आहे. आणि अर्थातच त्या गुरांवर पोट असणाऱ्या त्या शेतकरी कुटुंबालाही मदतीचा हात दिला आहे.
आजचे आधुनिक तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण शेतीला अत्यावश्यक असलेला गुरांचा आपला मूळ ठेवा सोडून चालणार नाही. कारण या गुरांच्या मलमूत्रापासून तयार होणारे शेणखत, तसेच शेतीला इतर पोषक बाबी या गुरांमुळेच मिळतात. तसेच डोंगराळ भाग असलेल्या कोकणात सर्वच ठिकाणी मशीन नेणं सोयीस्कर नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची कास धरताना गुरांना विसरून चालणार नाही, असं मत ते व्यक्त करतात.
-अभिजित नांदगावकर
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=455184485088938

जेव्हा संवाद हरवतो (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)


सीमा लोकलच्या नेहमीच्या प्रवासातील सखी. ट्रेनमध्ये चढली की आपल्या सख्यांचा शोध घेत, वाट काढत एकदाची घोळक्यात पोचते. घर मुलगा, व नवरा यांचं कसं आवरून आले याचा रोजचा पाढा वाचते, नंतर इतरांच्या सुख दुःखाची चौकशी करून तिचं स्टेशन आलं की उतरते. त्यांच्या ग्रुपमध्ये मी नसले तरी मला त्यांच्या सगळ्यांच्या कर्मकहाण्या बऱ्यापैकी माहिती होतं.आजही सीमा ट्रेनमध्ये चढली. पण नेहमीप्रमाणे ती बोलत नाही हे पाहून तिच्या सख्या तिला कारण विचारत होत्या. ती बळेबळेच काही नाही म्हणत होती.तरी एकीने खोदून तिला बोलतं केलं.
सीमाचं तिच्या 18 वर्षांच्या मुलाबरोबर जोराचं भांडण झालं होतं. तो नेहमी जातो तसा क्लासेस आणि पुढे कॉलेज करता जात नव्हता. त्याचं काही कारण ही सांगत नव्हता. ती ही त्याला सुनवून आली होती की आम्ही दोघे तुझ्यासाठी मर मर करतो, कष्ट उपसतो तुला त्याच काहीच किंमत नाही. एकुलता एक मुलगा वाया जातोय वाटून ती दुःखी झाली होती. त्यात एक मैत्रीण समजवण्याचा प्रयत्न करत होती. त्यातच तिने सी लिंकवर झालेल्या घटनेची आठवण करून मुलाबरोबर जास्त हुजत घालू नको मुलं काहीही निर्णय घेतात, असंही सांगितलं. आधीचं सीमा खूप टेन्शनमध्ये असताना खरंतर त्या मैत्रिणीने त्या घटनेचा उल्लेख करायला नको होता. तिचा उद्देश वाईट नव्हता, तरीही.
सीमाच्या बोलण्यात नेहमी असायचं की मी ,माझा नवरा व मुलगा कसे बिझी असतो,आम्हाला तिघांना एकत्र बोलण्याकरता ठरवून वेळ काढावा लागतो. नवऱ्याच्या बिझी असण्याचा नेहमी उल्लेख असे. तिघाचंच कुटुंब, त्यातही एकमेकांशी सवांद नाही. हीच कठीण बाब सीमाच्या लक्षात येत नव्हती, व त्याचे परिणामही.
सध्याच्या काळात मुलांना घराबाहेर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला नाही तर ते चुकीच्या मार्गाने जातात किंवा चुकीचे पाऊल उचलतात. त्यांना वेळोवेळी विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढून आपण सोबत आहोत हा विश्वास दाखवणं गरजेचं. मुलांवरचं प्रेम म्हणजे फक्त त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं नसून, त्यांच्या रोजच्या जीवनातील घडामोडींवर लक्ष ठेवून, योग्यवेळी मदत करणं गरजेचं.
सी लिंकच्या घटनेचा उल्लेख करता माझ्याही मनात चर्रर्र झालं होतं. कारण त्या मुलाने मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या केली होती.
- लता परब
#नवीउमेद

युवकांनी थांबवली मुक्या जीवांची पाण्यासाठीची भटकंती...


बीड जिल्ह्यातला शिरूर तालुका. शिरूरपासून १० किलोमीटर अंतरावर पाडळी गाव. उथळा नदीजवळ वसलेलं. परिसरात हरीण, मोर, कोल्हा आणि इतर वन्यजीवांचा मोठा वावर. परंतु, मराठवाड्यातल्या इतर भागांप्रमाणे या भागातही पाणीटंचाई. वन्यप्राण्यांसाठी ती जीवघेणी ठरत होती. चार -पाच महिन्यांच्या अंतरात तीन मोर आणि काही हरणं मृतावस्थेत आढळली. वाहनाखाली येणं, विहिरीत पडणं, कुत्र्यांची शिकार होणं ही जरी त्याची कारणं असली तरी पाण्याच्या शोधातून हे सारे घडले. इथले युवा सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट यांना ही बाब लक्षात आली.
माऊली आणि त्यांच्या मित्रांनी संपूर्ण पाडळी शिवारात वन्यजीवांसाठी पाणवठे उभारण्याचं ठरवलं. मार्च महिन्यापासून हा उपक्रम सुरू झाला. दीडशे लिटरचे १० आणि ७५ लिटरचे १५ पाणवठे वन्यजीवांच्या अधिवासात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवसापासूनच प्राणी हे पाणी पिऊ लागले.
ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ हे पाणवठे आहेत, त्यांनी नियमित पाणी भरण्याची जबाबदारी घेतलीये. असे जवळपास ५० शेतकरी आहेत. गावातील युवक, ज्येष्ठही या उपक्रमात योगदान देत आहेत. कोणी टाकी भेट देतो तर कोणी टाकीत नियमित पाणी भरतं. पाणवठ्यांमध्ये सकाळ - संध्याकाळ अडीच हजार लिटर पाणी नियमित भरलं जातं. दिवसेंदिवस या उपक्रमातील लोकसहभाग वाढत असून वन्यप्राण्यांना जीवनदायी ठरतोय.
पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही या परिसरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. चांगला पाऊस होऊन जलाशयात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत हे पाणवठे नियमित भरण्याचा युवकांचा निर्धार आहे.
आपल्या गाव परिसराचे आणि निसर्गाचे वैभव असलेले वन्यजीव जगावेत, हीच या उपक्रमामागील निःस्वार्थ भावना आहे.

- अनंत वैद्य, बीड.

दिव्याचा पाड्यावर पुढल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही


नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातली माळेगाव पंचायत. इथलं दिव्याचा पाडा. लोकसंख्या ८५०. छोटंसं, टुमदार, आदिवासी वस्तीचं गाव. अत्याधुनिक सेवासुविधांपासून लांब. पावसाळ्यात सरींमध्ये बुडालेलं निसर्गरम्य गाव उन्हाळ्यात मात्र थेंबथेंब पाण्याच्या प्रतीक्षेत. त्यामुळे स्थलांतर ठरलेलं. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला, नाशिकमधल्या निर्मल गंगा गोदा बहुउद्देशीय संस्थेनं.
संस्थेनं सरपंच तानाजी दिवे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. गावात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ उपक्रम कसा महत्वपूर्ण ठरेल हे त्यांना समजावून सांगितलं. शासनाच्या कोणत्या योजना आपल्याला उपयोगी पडतील ते सांगितलं. मातीचं परीक्षण झालं. जमिनीची धूप झाली होती. मातीची पत कमालीची घसरली होती. यामुळे पीक अत्यल्प प्रमाणात येत होतं.
ही परिस्थिती बदलण्यासाठी गावात ‘समतल चर आखणे’ हा प्रकल्प हाती घेतला. जून महिन्यात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत श्रमदान शिबीर राबवलं. सरपंच दिवे यांनी अडीच एकर माळरान खुलं करून दिलं. संस्थेला, शासकीय यंत्रणेला मदत केली. गावकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, निर्मल गंगाच्या शीतल गायकवाड, दिपाली खेडकर आणि रोहिणी दराडे यांची साथ मिळाली. गावातील पाझर तलावाचाही गाळ काढण्यात आला. नियोजित वेळेत काम पूर्ण झालं.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरीमध्ये नुकताच दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी वाहून गेलं. दिव्याच्या पाड्यावर मात्र समतल चर, बंधाºयामुळे पाणी अडवलं गेलं . गाळ काढल्यामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी साचलं. यामुळे पुढल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही, असं गावकरी म्हणताहेत.
संस्था आता गावातलं स्थलांतर रोखण्यासाठी काम करणार आहे. निर्मल गंगाच्या अध्यक्ष शीतल गायकवाड सांगतात, ''गावातली नैसर्गिक संसाधनं वापरून रोजगार निर्मितीचं संस्थेचं लक्ष्य आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे. युवकांना शेळीपालन, कुक्टपालनचं प्रशिक्षण देण्यात येईल. माती परीक्षणानंतर कृषी विभागाच्या मदतीने फळबाग योजना, रोपवाटिका कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.''


-प्राची उन्मेष , नाशिक 

खुर्रम - एक नवचरित्र (आखुडबुद्धी बहुशिंगी)


बारशावेळी कानात कुर्र करण्याऐवजी आत्या आरामबानूनं 'खुर्र' केल्यामुळे जहांगिरच्या मुलाचे नाव खुर्रम असे ठेवले गेले. नंतर 'त्याच्या घोरण्याचा आवाज खर्र-खर्रऐवजी खुर्र-खुर्र येतो म्हणून नाव खुर्रम पडले' अशी पश्चात-उपपत्ति त्याची बायको मुमताज हिने मांडली. वय झाले तरी कुरकुरीत दिसतो तो खुर्रम - असाही कर्मधारय समास काही दरबारी व्याकरणपंडित सोडवत असत.
मोठेपणी, नारो नावाचे लोक आपले नाव बदलून नारायणपंत वगैरे करत नावात वजन आणतात तसे त्याने आपले नाव खुर्रमखानसाोा असे बदलले. पण, ज्या पर्शियन राजघराण्याशी त्याची सोयरीक जुळून आली होती त्यांची हे खानसाोा वाचल्यावर खुर्रम हा मुघल दरबारातला खानसमा आहे अशी समजूत झाली. आणि ते बिथरून दिल्लीतूनच वरात घेऊन माघारी फिरले. त्यांच्यापाठी सैन्य पाठवून सलीममियां (ऊर्फ जहांगिर)ला त्यांचे मन वळवून हे नाते जोडावे लागले. नंतरही कधी भांडण झाले की ही कंदाहारी बेगम- "हो हो. यापेक्षा चांगलं समरकंदमधल्या कंदमुळं विकणाऱ्यांचे स्थळ चालून आले होते. पण माझी अक्कल चरायला गेली होती म्हणून मी तुम्हांला कबूल केले." असा उद्धार करायची. खुर्रम तिला अकलेचा कंदाहार (खंदार-ए-अक्ल) असे चिडवायचा आणि ती त्याला लाहौरबिल्लाकुवत म्हणायची.
तिच्या कटकटीला वैतागून खुर्रमनं मुमताज नावाची दुसरी बेगम आणली. ही मुमताज डॉल्बी साऊंडमध्ये घोरायची. ती आपल्या ज्या घोरण्याबद्दल तक्रार करते तो तिच्याच घोरण्याचा महालाच्या कानाकोपऱ्यात साठून राहिलेला प्रतिध्वनी असतो असे खुर्रमचे म्हणणे होते. खरेखोटे महालातले खच्चीच जाणे. परंतु तिच्या घोरण्याला वैतागून खुर्रमने तिसरी बेगम आणली. ती पुरेशी घोरत नसल्याने त्याची झोपमोड होत नाही म्हणून त्याला चौथी बेगम आणावी लागली.
घरात चारचार बेगमा असल्याने तो बराच काळ दरबारातच बसून असे. त्यामुळे खुर्रमच्या काळात राज्यात कमालीची शांतता नांदत होती.
कालांतराने मुमताज जेव्हा चिरनिद्रिस्थ झाली तेव्हा तिला सगळ्यांसोबत न पुरता तिच्यासाठी स्वतंत्र थडगे बांधावे म्हणजे इतर मृतांना त्रास होणार नाही अशी कल्पना त्याला औरंगजेब या लाडक्या मुलाने सुचवली. हा औरंगजेब भलताच हुशार आणि हरहुन्नरी मुलगा होता. तो फावल्या वेळात टोप्या शिवायचा आणि त्याचे खिसे नेहमी रंगांनी भरलेले असायचे. (यावरूनच त्याला हे नाव मिळाले.) तब्बल बावीस वर्षं खपून मुमताजसाठी स्नोअरप्रूफ कबर बांधल्यावर आपलीही सोय यातच केली आहे हे खुर्रमला कळले. आणि या बातमीच्या धसक्याने तो आजारी पडला.
औरंगजेबशिवाय खुर्रमला दारा शिकोह नावाचाही एक मुलगा होता. मुराद या मुलाचं नाव त्याने रझा मुराद या फेमस व्हिलनवरुन ठेवले होते. पुढे या मुरादला खरोखरचा व्हिलन समजून औरंगजेबने कैदेत टाकले. जनरली, व्हिलनबरोबर त्याचा बापही व्हिलन असतो (जसे शक्ती कपूरचा बाप प्रेम चोपडा असतो तसे) त्या न्यायाने त्याने खुर्रमलाही कैदेत टाकले. जिल्हा कोर्टापुढे ही केस हिअरिंगला यायच्या आधीच जिल्हेसुभानीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोर्टाने त्यांच्यावरील आरोप शाबीत झाले आहेत असे समजून या दोघांना मरेपर्यंत शिक्षा ठोठावली.
खुर्रमला आपले मूळ नाव कधीच आवडले नाही. शाळेत असताना संजय दत्तचा साजन सिनेमा पाहून तो खूपच प्रभावित झाला होता. त्याने संजयदत्तसारखे लांब केस वाढवून त्याच्यासारखी शायरी करायलाही सुरुवात केली होती. हळूहळू, तो सगळीकडे साजन हे टोपणनावच वापरू लागला. एकदा वर्गात दंगा करताना सापडल्यावर त्याने पंतोजीनाही साजन हेच नाव सांगितले होते. पण पंतोजींना नीट ऐकून आल्याने त्यांनी 'काय नाव म्हणालास रे पोरा?' असे पुन्हा विचारले. त्यावर त्याने मोठ्या आवाजात 'स-हा-ज-हा-न' असे सांगितले. मास्तरांनी त्याचे नाव शहाजहान असे लिहून टाकले. अर्थात, दहावीच्या सर्टिफिकेटवर हेच नाव छापले गेले. बऱ्याच जुन्या कागदपत्रात खुर्रमचा शहाजहान असा उल्लेख आहे याचे मूळ या कथेत आहे.
मुमताजमहलसाठी जी कबर बांधली तीत प्रचंड भ्रष्टाचार झाला. या भव्य कबरीच्या टेरेस वॉटरप्रूफिंगमध्ये गोंधळ होऊन तिथून पाणी ठिबकत असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीटरचा शेरा आल्यावर तर त्याचे धाबेच दणाणले. एस्टिमेटपेक्षा जास्त खर्च, कन्स्ट्रक्शन शेड्यूलचा पार बोऱ्या वाजलेला, नर्मदेत राडारोडा टाकल्याच्या नगरपालिकेच्या नोटीसा, ज्या ठिकाणी उंची काळा कडाप्पा लावायचा तिथे स्वस्तातला संगमरवर लावलेला आणि वर ही वॉटरप्रूफिंगची भानगड- या सगळ्यामुळे वैतागून औरंगजेबाने खुर्रमला बादशहा पदावरून सस्पेंड केले असल्याचे नवे संशोधनांती सिद्ध झाले आहे.
सोळाव्या शतकानंतर खुर्रम बराचसा विस्मरणात गेला. प्रदीपकुमारने ताजमहाल सिनेमामध्ये त्याचा रोल केल्यावर तर खुर्रम नाहक बदनाम झाला. (जसे भारतभूषणमुळे बैजूबावरापेक्षा तानसेन जास्त लोकप्रिय झाला तसेच.) पण १९८०च्या दशकात महिलागृहउद्योगने त्याचे पुनरुज्जीवन केले. लिज्जत पापडच्या जाहीरातीत खुर्रम खुर्रम असा आवाज काढणारा ससा दाखवल्यावर खुर्रम आबालवृद्धांत एकदमच लोकप्रिय झाला. त्याने बांधलेली मुमताजची कबर बघायला आणि कबरीच्या सुळक्याला पकडून फोटो काढायला लोक गर्दी करू लागले. लोकही खुर्रम म्हणजे 'अरे हो, तो प्रदीपकुमारचा रोल केलेला माणूस...' अशी ओळख दाखवू लागले.
असा रीतीने, एक बादशहा (व्हाया प्रदीपकुमार) ते पापडाचा अनऑफीशियल ब्रँड अँबसेडर असा खुर्रमचा प्रवास संपूर्ण झाला.
- ज्युनिअर ब्रह्मे

खरचं तो... स्वप्न पूर्ण करतोय..स्वप्नं कधी खरी होत नसतात असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, अशोक काकडे या युवकाचं ध्येयच मुळी इतरांनी पाहीलेलं स्वप्नं पूर्ण करण्याचं आहे. आत्तापर्यंत अनेकांची ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यास अशोकने जीवाचे रान केलं आहे. किरणचं स्वप्न पूर्ण करायचं त्याचं सध्या ध्येय आहे.
रायपूर हे 11 हजार लोकसंख्येचं बुलढाणा जिल्ह्यातलं गाव. आजूबाजूची 25 ते 30 खेडी जोडलेली. आठवडी बाजारही याच गावात भरतो. जिल्ह्यापासून केवळ 18 किलोमीटरवरचं असूनही इथं शिक्षणाच्या सुविधा नाहीत. जवळच असलेल्या पिंपळगाव सराई या ठिकाणी इयत्ता 12 वी पर्यंत शाळा आहे. आणि याच शाळेत आसपासच्या सर्व गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. इथं शिकणारी किरण बैरागी ही मुलगी या वर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण चक्क 89 टक्के मार्क घेऊन झाली आहे. तिच्यासाठी हे चक्कच म्हणावे लागेल. कारण किरणची आर्थिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. तिचे आई वडील मोलमजुरी करणारे. आणि किरणला सुद्धा त्यांच्यासोबत सुट्टीच्या दिवशी काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता. किरणपेक्षा अजून एका लहान बहिणीची जबाबदारी. या सर्व परिस्थितीची जाण किरण लहान वयातच आली. त्यातूनच तिने जिद्दीने अभ्यास केला. मनात गाठ बांधली ती चांगली टक्केवारी मिळवण्याची. जिद्दीने परिश्रम घेत तिने चांगली टक्केवारी मिळवून दाखवली.
किरणच्या परिस्थितीचा विचार करता दहावीनंतर तिला बाहेर गावी शिक्षणास पाठवणं शक्य नव्हतं. आता किरणला आपलं शिक्षण म्हणजे दिवा स्वप्नच वाटू लागलं होतं. शिक्षण घेण्याची उमेद आहे, मात्र परिस्थिती आपलं स्वप्न पूर्ण करू देणार नाही हे तिचा लक्षात आलं. त्यामुळे किरण खूप खचली होती. तिच्या मैत्रिणींना किरणचे मार्क्स पाहून अभिमान तर वाटला. परंतु किरण आता आपल्यासोबत पुढचं शिक्षण घेऊ शकेल का ही चिंता सुद्धा तिच्या मैत्रिणींना वाटू लागली. मैत्रिणींना आपापल्या पालकांकडे हे बोलून दाखवलं. आणि गावात चर्चा सुरू झाली. या पोरीचं शिक्षण कसं होणार, आता तिची जबाबदारी कशी घ्यायची ही चर्चा सुरू झाली. गावातून ही खबर पोहोचली ती थेट येथील अशोक काकडे पर्यंत.
अशोक काकडे यांनी आतापर्यंत अनेक मुलींना स्वखर्चाने शिक्षण दिलं आहे. त्यापैकी एक मुलगी सीआयडी आॅफिसर आहे. अशोक यांना बातमी कळताच त्यांनी थेट रायपूरला जाऊन किरणच्या आई-वडिलांची चर्चा केली. आणि किरणची संपूर्ण जबाबदारी अशोक काकडे यांनी स्वीकारली. त्यामुळे तिच्या आईवडीलांनी तिच्या शिक्षणाला संमती दिली. अशोक यांनी चिखली या तालुक्याच्या ठिकाणी किरणची अडमिशन करून तिला शिकवणी वर्ग लावून दिला. किरणला आता डॉक्टर बनवायचंय. उच्च शिक्षण घ्यायचं. ती म्हणते, “बाबासाहेबांनी सांगितले की शिका, संगठीत व्हा आणि संघर्ष करा. मात्र अशा परिस्थितीत शिक्षण कसं घेणार, या परिस्थितीशी संघर्ष कसा करणार असा प्रश्न मला पडला होता. समाजात अशोक सरांसारखी माणसं आहेत म्हणून माझ्यासारख्या मुलींचे हे शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होत आहे.”
- दिनेश मुडे, बुलढाणा

अनिकेतच्या कुंचल्याची गोष्ट

रत्नागिरीचा अनिकेत चिपळूणकर. अनिकेत मतिमंद आहे, पण त्याची कला पाहून आपण थक्क होतो आणि तो खरंच मतिमंद आहे का? असा प्रश्न पडतो. अनिकेत वारली पेंटींग करतो. पेंटींग करताना तो त्यात अगदी एकाग्र झालेला असतो. त्याचं मतिमंदत्व Autism प्रकारातील आहे. म्हणजेच ही मुलं स्वमग्न असतात. फारशी कोणात मिसळत नाहीत. त्यामुळे अनिकेत एकदा चित्र काढायला बसला की तो त्यात आकंठ बुडून जातो. मात्र त्याला कोणतं चित्र काढायचं, त्यात काय हवं आहे याची पूर्वकल्पना द्यावी लागते. एकदा सांगितल्यानंतर मग त्यानुसार अनिकेतच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर जे साकारते ते अप्रतिम असते. विशेष म्हणजे वारली पेंटिंगमधील आकारांनी आजच्या नव्या जमान्यातील एखाद्या गोष्टीलाही तो ज्याप्रमाणे वारलीच्या स्वरूपात साकारतो हे पाहणे वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
सुरेश चिपळूणकर यांचा अनिकेत हा मोठा मुलगा. ९२ साली त्याचा जन्म झाला. आणि काही महिन्यातच लक्षात आलं की अनिकेतची मानसिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. पाच वर्षांचा झाल्यानंतर सर्वसामान्य शाळेतच त्याला घालण्यात आलं. पण तरीही त्याच्यात अपेक्षित बदल काही दिसून आला नाही. एव्हाना त्याची चित्रकला उत्तम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. दरम्यान तपासणीत अनिकेत हा विशेष मूल (मतिमंद) असल्याचं निदान झालं. त्यामुळे रत्नागिरीतील आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यामंदिर या विशेष मुलांच्या शाळेत अनिकेतला घातलं. याच निर्णयामुळे अनिकेतच्या आयुष्याला दिशा मिळाली.
शाळा प्रमुख डॉ. शमीन शेरे यांनी अनिकेतचे अंगभूत चित्रकलेचे गुण, हस्तकौशल ओळखलं. त्यामध्ये अनिकेत त्रिकोण, गोल, चौकोन, रेषा असे वारली पेंटिंगसाठी उपयुक्त आकार उत्तमरीत्या साकारत असल्याचे शमीन शेरे यांच्या लक्षात आलं. त्यामुळे शेरे यांनी अनिकेतला अधिक प्रशिक्षित केलं आणि वारली प्रकाराची ओळख करून दिली. याचबरोबर ठाण्यातील जव्हार आदिवासी पाड्यातील प्रसिध्द वारली पेंटर, अभ्यासक हरेश्वर वानगा यांच्या एका कार्यशाळेत मार्गदर्शन मिळालं. आता अनिकेतने वारली पेंटींग चांगलं आत्मसात केलं आहे.
अनिकेतच्या चित्रांचे आतापर्यंत १० वेळा विविध शहरांत प्रदर्शन भरले आहे. यामध्ये रत्नागिरी, पुणे आणि मुंबईमध्ये प्रत्येकी ३ वेळा, तर गोव्यामध्ये १ प्रदर्शन भरले आहे. त्याने रत्नागिरी स्टेशनला साकारलेले भव्य वारली भित्तीचित्र विशेष गाजलं. त्याची खूप प्रशंसाही झाली. यामध्ये वारली पेंटिंगच्या स्वरूपात त्याने साकारलेली ट्रेन त्याच्या विशेष कल्पकतेची पोचपावती ठरते.
अनिकेत आता २७ वर्षांचा आहे. सध्या तो रत्नागिरीतच "अवेकनिंग चारिटेबल ट्रस्ट" या डॉ. शमीन शेरे यांनीच दिव्यांग व्यक्तींच्या आधारासाठी, त्यांना आर्थिक स्त्रोत उत्पन्न करून देणासाठी स्थापन केलेल्या संस्थेत आपली कला जोपासत आहे. आणि त्यातूनचा त्याचा उदरनिर्वाह करत आहे. रत्नागिरीतील नाचणे रोड-बाळकृष्ण नगर येथे या ट्रस्टचे हस्तकला केंद्र व कलादालन आहे.
#नवीउमेद #रत्नागिरी
व्हिडीओ लिंक :https://www.facebook.com/watch/?v=3113140072037128

- अभिजित नांदगावकर

अडीच लाखांवर मुलं मराठीत नापास (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या )

अडीच लाखांवर मुलं मराठीत नापास बाळ जन्माला येतं. मग एकेक करून बाळाची प्रगती सुरू होते. पालथं पडणं, पुढे सरकणं, रांगणं, चालणं, बोलणं. बाळाचे सुरुवातीचे बोल आपल्या कानावर पडावेत म्हणून सगेसोयरे जिवाचा कान करतात. बाळाच्या मुखातून येणारा पहिला शब्द. त्याचं कोण कौतुक! भाषा येणं, समजणं किंवा बोलणं किती महत्त्वाचं, हे या घटनेतून लक्षात येतं.
बाळाला त्याची स्वतःची भाषा मिळण्याचा प्रवास सुरू होतो. वयाच्या दोन ते तीन वयापर्यंत बाळ आईची भाषा बऱ्यापैकी आत्मसात करतं. आता बाळाची परीक्षा सुरु होते. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. बाळाने योग्य उत्तर दिलं की शाब्बासकी. काही चुकलं तर प्रेमाने समजावून सांगणं. बाळ अणि घरातील सर्वजण, हा खेळ आनंदाने, प्रेमाने खेळू लागतात. बाळही आनंदाने नव्या शब्दांचा स्वीकार करत समृदध होत असतं. भाषा अवगत करण्याचा हा प्रवास किती छान!
पुढे बाळाचा शालेय प्रवास सुरू होतो. शाळेत इंग्रजी भाषेची ओळख होऊ लागते. शिकताना अडखळायला होतं. या आधी भाषा शिकण्याकरिता बाळाला असे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागलेले नसतात. आता हळूहळू ही इंग्रजी येत नाही म्हणून घरातले लोक ओरडू लागतात. बाळ गोंधळतं. आपल्याला ही नवी भाषा येत नाही म्हणून आई-बाबा इतकं का रागवतात? यापूर्वी ते किती छान भाषा शिकवत, शब्दओळख करून देत असत. या गोंधळात बाळ आपल्या स्वतःच्या भाषेपासून दूर जाऊ लागतं. आईवडिलांच्या पसंतीस उतरण्यासाठी नव्या भाषेचा अभ्यास करू लागतं. बाळाचा इयत्ता ते इयत्ता प्रवास सुरू होतो.
मातृभाषा म्हणजे जन्मतःच ज्या भाषेचा स्वीकार बाळ सहज करतं, ज्या भाषेतून बाळ विचार करू लागतं, ती भाषा. अचानक परिस्थिती बदलते. त्याला नव्या भाषेला तोंड द्यावं लागत. एखादा विद्यार्थी नव्या भाषेचा स्वीकार सहज करत नाही. हळूहळू तो आपली मातृभाषादेखील विसरू लागतो. तो कोणत्या भाषेतून विचार करतोय याची शंका येण्याइतपत तो स्वभाषा विसरून जातो. म्हणून काय आपल्या मुलांनी मातृभाषेतच नापास व्हायचं?
यावर्षी राज्यात ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी दहावीची मराठीची परीक्षा दिली. त्यापैकी २ लाख ५७ हजार ६२७ विद्यार्थी नापास झाले. एवढ्या मोठ्या संख्येने मुलं चक्क मराठीत नापास. वझे केळकर महाविद्यालयाचे मराठी भाषा विभागप्रमुख, ‘मराठी प्रथम’ या ऑनलाईन नियतकालिकाचे संपादक आणि भाषा सल्लागार समितीचे सद्स्य डॉ प्रकाश परब यांना आम्ही त्यांचं मत विचारलं. ते म्हणाले की, मातृभाषेचं ज्ञान कमी कमी होत जाणं, हे भाषिक र्‍हासाचं एक प्राथमिक लक्षण आहे. परिपूर्ण माणूस बनण्यासाठी भाषा मदत करते. म्हणून या घटनेकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती उपाययोजना केली पाहिजे. बदललेला अभ्यासक्रम व मूल्यांकन पद्धती लक्षात घेऊन शिक्षकांचं प्रशिक्षण करणं. नापास विद्यार्थी नेमक्या कोणत्या बाबतीत मागे पडले हे शोधून काढून त्यांना तसं मार्गदर्शन करणं. भाषावापराचे भरपूर स्वाध्याय सोडवून घेणं. शिक्षकांनी असे स्वाध्याय तयार करणं. पाठांतराऐवजी भाषेचा उपयोग करण्यावर भर देणं, असे उपाय परब सरांनी सुचवले आहेत.

- लता परब

परभणीतला शेक हॅन्ड ग्रुप
कोणाला शैक्षणिक साहित्य, कोणाला दवाखान्यासाठी आर्थिक मदत, निराधारांना कपडे अशी वेगवेगळ्या प्रकारची आतापर्यंत ३४३ जणांना मदत. परभणीतल्या शेक हॅन्ड ग्रुप . मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये तसंच विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुलांना वर्षभर शैक्षणिक साहित्य पुरवलं जात आहे.
आपल्या परीने गरजूंना मदत करावी या हेतूने काही तरुणांनी पाच सहा वर्षांपूर्वी काम सुरू केलं. रक्तदान शिबीर, नेत्रदानविषयक जागृती , उपेक्षित विधवांना सणानिमित्त किराणा सामान भरून देणं , असं विविध प्रकारचं ग्रुपचं काम. धर्मादाय आयुक्तालयातल्या शिवशंकर पोपडे यांना त्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी ग्रुपच्या शरद लोहट, संतोष चव्हाण, मुंजाभाऊ शिळवणे,भास्कर वाघ यांना ग्रुपची अधिकृत नोंदणी करण्यासाठी आग्रह धरला. मग शेक हँड फाऊंडेशनची स्थापना झाली.
प्रत्येक सण निराधार , विधवा ताईंच्या घरी साजरा करण्याचं ठरलं. विविध तालुक्यात गिरणी, मिरची कांडप, दुग्धपालनासाठी शेळ्या, शिलाई मशीन विधवा ताईंना देण्यात आलं आहे. गेल्या वर्षी नागपंचमी आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं १५ ऑगस्टला सदस्यांनी ब्राह्मणगावला भेट दिली. तिथल्या छायाताई घाडगे यांना शिलाई मशीन दिलं . कार्यक्रमाला सरपंच बाबासाहेब विधाटे यांना आमंत्रण दिलं होतं . त्यांच्याशी चर्चा झाली. गावातल्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. सदस्यांनी दोन तीनदा पाठपुरावा केल्यावर घरकुलांची समस्या सुटली.
ग्रुपचं काम पाहून कांतराव झरीकर, डॉ राजगोपाल कालानी, नितीन लोहट यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मदतीला पुढे आले आहेत. त्यातून बोरी इथल्या पीडित कुटुंबाला दिवाळीनिमित्त ४७ हजार रुपयांची मदत देण्यात आली. अ‍ॅड.प्रमोद सराफ यांनी ग्रुपच्या कामाची माहिती धर्मादाय सहायक आयुक्त श्रीकांत भोसले यांना दिली. भोसले यांनी त्यांना मंगनाळी इथल्या गोविंद महाराज सार्वजनिक वाचनालय आणि खडकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाविषयी माहिती दिली. ग्रुपने या संस्थांना मदत केली. त्यासाठी राम सोनटक्के यांचं मोलाचं साहाय्य लाभलं. आता ग्रुपच्या सदस्यांची संख्या २०० वर पोहोचली आहे. 

- बाळासाहेब काळे. 

ऐन टंचाईत १२० म्हशींच्या सकस आहाराची केली सोय


 वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं बोरगाव हातला. संपूर्ण तालुक्यातच वैरणाची टंचाई होती. त्यावर मार्ग काढत संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबूडरे, भारत मानकर या युवकांनी १२० म्हशींच्या सकस आहाराची सोय केली.
परिसरात निम्न वर्धा धरण आहे. अडीच हजार हेक्टरवर पसरलेलं. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. मात्र काही ठिकाणी चढउतार असल्यानं उन्हाळ्यात पाणी आटलं. तिथं हिरवीगार चाऱ्याची बेटं निर्माण झाली. पंचवीस पंचवीस एकराची दोन बेटं असून आजूबाजूला पूर्ण पाणी. नांदुरा काळे गावापासून सात किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. चाऱ्याच्या शोधात असताना संदीप , गुड्डू, सचिन आणि भारतला हे बेट गवसलं. चौघांकडे वडिलोपार्जित शेती आणि म्हशीसुद्धा. पण म्हशींच्या चाऱ्याचा प्रश्न होता.
बेटावर म्हशी नेण्याचं त्यांनी ठरवलं. नियोजन केलं . नावेला काही म्हशी बांधल्या. उरलेल्या म्हशी पाण्यात सोडल्या. त्यांच्या मागे पोहत पोहत त्या बेटावर नेल्या.

 म्हशींना मुबलक प्रमाणात हिरवा चारा. पाण्याचाही प्रश्न मिटला. म्हशी तिथून परत येऊ शकत नसल्यामुळे त्यांची राखण करण्याची काळजी मिटली. आता दररोज बेटावर जाऊन दूध काढणं, ते आणायचं आणि विकायचं कसं हा प्रश्न होता.
त्यासाठी चौघांनी एक नाव विकत घेतली. ती चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मग चौघे पहाटे साडेपाच वाजता दुचाकीवरून किनाऱ्यावर येऊ लागले. गाड्या तिथेच ठेवायच्या. नाव वल्हवत बेटावर जायचं. बेटावर पोहोचायला एक तास. वारा असेल तर नाव वल्हवणे त्रासदायक. तिथं पोहोचल्यावर म्हशींचं जवळपास १०० लिटर दूध काढायचं, ते नावेनं आणायचं. मग नाव किनाऱ्यावर उभी करून दुचाकीनं परिसरात दूधविक्री. संध्याकाळी पुन्हा बेटावर दूध काढायला जायचं. सकस हिरव्या चाऱ्यामुळे दूध चांगल्या प्रतीचं असतं.
आपल्या कल्पकतेनं आणि मेहनतीनं संदीप , गुड्डू, सचिन आणि भारतनं बेरोजगार युवकांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे. 


- सचिन मात्रे , वर्धा 

ब्रह्मेपीडियातील एक एन्ट्री: रेक्याविक (आखुडबुद्धी बहुशिंगी)


रेक्याविक ही आईसलंडची राजधानी आहे. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचे सरळ उत्तर देणे हा इथे फाऊल समजला जातो. (महाराष्ट्रातही अशाच वृत्तीचे एक गाव आहे असे समजले जाते.) रेक्याविकच्या रेनडिअरची सूपची बरीच तारीफ होत असली तरी आजवर कुणाच परदेशी पर्यटकाला अस्सल रेनडिअर सूप चाखायला मिळाले नसल्याचा दावा रेक्याविकवासी करतात. रेक्याविकच्या रस्त्यांवर जागोजागी 'ओव्हनवरच्या रेनडिअरचं अमृततुल्य सूप'च्या पाट्या लागलेल्या असतात. ही पाककृती किमान आठशे वर्षे जुनी असून तिची मूळ प्रत हजारो वर्षांपूर्वीच गहाळ झाल्याचे समजते. एकूण हॉटेलांची संख्या पाहता रेक्याविकमधले समस्त नागरिक केवळ हॉटेलमध्येच जेवत असावेत अशी शंका येते. पण तसे नसून परदेशी बावळट पर्यटकांना फसवायला ही हॉटेल असतात.
रेक्याविकमध्ये शाळा, कॉलेज, संस्था यांची एकूण बेरीज केली असता ती रेक्याविकच्या लोकसंख्येपेक्षा अधिक भरते, या कारणाने तिला नॉर्डिक प्रदेशाच्या सांस्कृतिक राजधानीचाही मान मिळाला आहे.
रेक्याविकच्या लोकांचे तिरकस बोलणे हे संपूर्ण नॉर्डिक प्रदेशात प्रसिद्ध आहे. उदा-
"किती वाजले हो अमुंडसेनगुरुजी?"
"सूर्य दिसतोय ना आकाशात? मग तरीही काय विचारता?"
"हो, पण यामुळे वेळ कशी कळणार? शिवाय, हा मध्यरात्रीचा सूर्य असला तर?"
"ते समोरचं दुकान पाहिलंत? ते बरोब्बर चार वाजता बंद होतं."
"अच्छा. पण यावरून आत्ताची वेळ कशी कळणार?"
"सोप्पंय. ते दुकान बंद झालं की तितका वेळ चारमधून वजा करायचा. म्हणजे मग आत्ता किती वाजले होते हे त्यावेळी कळेल."
"अहो, तुमच्याकडं घड्याळ आहे ना? त्यात वेळ बघून सांगा की."
"वा रे वा! शहाणेच आहात की! पुन्हापुन्हा वेळ पाहिल्यामुळं माझं घड्याळ बिघडलं तर?"
थोडक्यात, कोणतीही माहिती सहजासहजी न देण्यासाठी या गावाचा लौकिक आहे. जसे की-
एक प्रवासी: ब्रिम्बोर्गचं दुकान कुठाय हो काका?
काका: कोण ब्रॉम्बोर्ग?
एप्र: ब्रिम्बोर्ग! वाणसामानाचं दुकान आहे त्यांचं.
काका: ते तर बंद झालं ना १९४६ साली.
एप्र: आं? मला परवाच म्हणाले चालूय म्हणून.
काका: अच्छा. म्हणजे गृन्सवेजरमधल्या गल्लीत बॅकेच्या पिछाडीस आहे ते?
एप्र: हो तेच!
काका: काही कल्पना नाही बुवा! पहिल्यांदाच ऐकतोय हे नाव.
एप्र: काकू, ब्रिम्बोर्गचं दुकान-
काकू: ज स्वी फ्रान्सेझ. (मी फ्रेंच आहे रे गधड्या.)
एप्र: अरे बाळा, ब्रिम्बोर्गचं दुकान कुठाय सांगितलंस तर मी तुला एक चॉकलेट देईन.
बाळ: (नाक उडवत) हूं! त्यात काय? नाही सांगितलं तर बाबा मला दोन चॉकलेटं देतील.
एप्र: मी तीन देईन. आता तरी सांगशील?
बाळ: ह्या गल्लीतून सरळ गेलात की उजव्या हाताला एक छप्पर असलेलं घर लागेल.
"सगळ्याच घरांना छप्पर असतं ना?"
"हो, पण या घराला उतरतं छप्पर आहे."
"अच्छा. इथं सगळीच उतरती छपरं दिसतायत. मी काढेन शोधून. पुढं काय?"
"पुढं एक चौक लागेल. त्या चौकातून डावीकडं गेलात की एक खाटकाचं बंद पडलेलं दुकान लागेल."
"बरं. बंद पडलेलं दुकान कसं ओळखायचं पण?
"खाटकाच्या दुकानासमोरून डावीकडं जाणारा एक बोळ लागतो. त्या बोळातून पुढं गेलात की एक फुलवाल्याचं दुकान दिसेल."
"फुलवाल्याजवळ आहे का ब्रिम्बोर्गचं दुकान?"
"नाही हो. फुलवाला दिसला की समजायचं आपण रस्ता चुकलो. मग तिथं कुणालाही विचारा. कुणीही सांगेल."
"अरे देवा!"
"आणि माझी चॉकलेटं कुठायत?"
गेल्या महायुद्धात शत्रूकडून माहिती काढून घेण्याचा सराव दोस्तराष्ट्राने इथं रेक्याविकलाच केला होता. रेक्याविकची एकूण लोकसंख्या १२५६७ (१९०६ च्या जनगणनेनुसार) असून सध्या इथं यापेक्षा कितीतरी जास्त लोक राहतात. (नक्की किती ते कुणी सांगत नसल्यानं हे अज्ञान.) पेंग्विनची शिकार, फुटबॉल खेळणे, घरबांधणी आणि नॉर्डिक डान्स हे इथले प्रमुख व्यवसाय असावेत.
- ज्युनिअर ब्रह्मे

साडेतीन दशकांपासून फलक लिहित 'ते' करतात लोकजागर

मोबाईलच्या एका क्लिकवर सध्या हवी ती माहिती, बातम्या मिळवणं सोपं झालं आहे. पण, ३५ वर्षांपूर्वी अशी स्थिती नक्कीच नव्हती. अशी विविध साधनं नव्हती, समाज माध्यमं नव्हती. पण, त्या काळात होती ‘शेख अब्दुल समद नबी’ यांच्यासारखी माणसं.
बीड जिल्ह्यातील पाटोद्याचे शेख अब्दुल समद नबी. समद भाई ही त्यांची परिसरात ओळख. शालेय शिक्षण सुरू असताना समद भाई यांना नेहमी वाटायचं की आपल्या लिहिता, वाचता येण्याचा समाजाला फायदा व्हावा, लोकांच्या ज्ञानात, माहितीत भर पडावी. हा विचार त्यांनी कृतीत आणायचा ठरवला. आणि पाटोदा शहरात पंचायत समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व इतर दोन ठिकाणी फलक लिहायला सुरुवात केली. हा युवक का आणि काय लिहितोय, याचं सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटायचं. परंतू, काळ गेला तसे समद भाई लिहित असलेले फलक लोकांसाठी माहितीचे स्त्रोत बनले. अनेकांना आपल्या गाव परिसरात काय घडामोडी घडताहेत हे या फलकावरुन कळायचं. शिवाय सुविचार, दिन विशेषही ते फलकावर नियमित द्यायचे. गोरगरीबांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही ते या फलकावर देतात. हे फलक वाचण्याची लोकांना अशी सवय झाली होती की एखादा दिवस हुकला की समद भाई कुठे गेले, आज बोर्ड का लिहिला नाही, अशी विचारणा व्हायची.
गेली साडेतीन दशकं त्यांचं हे काम अखंडितपणे सुरू आहे. यासह सामाजिक सलोखा जपण्यासाठी ते नित्य प्रयत्नशील असतात. यातूनच त्यांना शासनाने सन २००६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देऊन गौरवलं. आज तंत्रज्ञानाच्या जमान्यातही त्यांनी आपले फलक लिखाणाचे काम सोडलेले नाही, हे विशेष.

- अनंत वैद्य, बीड.

आणि समुद्रकिनारा स्वच्छ झाला

मेरीटाईम बोर्डाकडून स्वच्छ सागरतट अभियान राबविण्याच्या सूचना रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाला आल्या. इथले प्रादेशिक अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले. सूचना मिळताच त्यांनी जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीच्या बैठका घेतल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीने सागर स्वच्छतामोहिमेत स्वत:हून सहभाग घेतला. स्वतः कॅप्टनसाहेब समुद्र स्वच्छ करताना पाहून आणखी काही लोक अभियानात सहभागी झाले आणि हां हां म्हणता वर्षभरात रत्नागिरीतील जवळपास 23-25 समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट झाला. यातूनच समुद्रकिनारी रोजगारनिर्मितीही झाली. हे सगळं नियोजन यशस्वी केलं, ते संजय उगलमुगले यांनी. उगलमुगले सर 14 ते 15 तास प्रत्यक्ष कामावर हजर राहिले आणि त्यांच्या टीमने त्यांना उत्तम सहकार्य केलं.
प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आपले कर्तव्य ठरल्याप्रमाणे बजावतच असतात. त्या कर्तव्यापलीकडे जाऊन शासनासाठी काम करणारे अधिकारी समाजात फार कमी पाहावयास मिळतात. कँप्टन संजय उगलमुगले यांनी 2 वर्षांपूर्वी रत्नागिरी प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. अतिशय संयमी, शांत मात्र कामात तितकेच हुशार, तल्लख असणारे उगलमुगले अल्पावधीतच रत्नागिरीत विशेषत: सर्व ग्रामपंचायतीत सुपरिचित आहेत.


कोकणाला 720 किमी सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. याठिकाणी नियमित स्वच्छता व काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मेरीटाईम बोर्डाकडून हा उपकम सुरू करण्यात आला. या अभियानासाठी मेरीटाईम बोर्डाकडून 3 कोटी 9 लाख इतका निधी उपलब्ध झाला होता. निर्मल सागरतट अभियानात सहभाग घेतल्यानंतर कोणत्या ग्रामपंचायतीने काय करायचे कशाप्रकारे सुविधा उपलब्ध करता येईल. या निधीचा 100 टक्के विनियोग करून सागरी किनाऱ्यांचा कायापालट करायचा. त्यासाठी केवळ ग्रामपंचायत नाही तर लोकसहभाग महत्त्वाचा होता. त्यामुळे उगलमुगले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सागर स्वच्छता अभियानात स्वत: सहभाग घेतला. अधिकारी सहभागी झाल्याचे पाहून ग्रामस्थही मोठ्या संख्येने समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले.
लहान वयात मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांना समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी सहभागी करून घेतलं. त्याचबरोबर काही उपकमात जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
आज रत्नागिरीच्या समुद्र किनाऱयांवर या अभियानातून पर्यटकांना बसायला बेंचेस, चेजिंग रूम, गार्डन, ओपन जीम, पार्कींग व्यवस्था, पथदीप, स्वच्छतागृह झाली आहेत. या सगळ्या सुविधांची देखभाल आणि देखरेख करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कँप्टन संजय उगलमुगले-प्रादेशिक बंदर अधिकारी रत्नागिरी म्हणाले, की निर्मल सागरतट अभियान एका वर्षासाठी राबविण्यात आलं होतं. मात्र या अभियानातून रोजगारनिर्मिती करून कायमस्वरूपी स्वच्छता कशी राखली जाईल, पर्यटकांना चांगल्या सुविधा यातून कशा मिळतील या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न केले आहेत. भविष्यातही स्वच्छता, देखभाल, देखरेख ठेवण्यात येईल. या कामात सर्वच ग्रामपंचायती तसंच मेरीटाईम विभागाचे आमचे सर्व कर्मचारी अधिकारी यांची मेहनत आहे.


- जान्हवी पाटील,रत्नागिरी 
 #नवीउमेद
Janhavi Patil