Sunday 18 August 2019

वर्दीतला माणूस


नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातलं सुलतानपूर. इथले राजेंद्र दिगंबर सामुद्रे. कर्नाटकात रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक. गेल्या वर्षी बंगळुरू रेल्वे स्थानकाजवळ पिक अप शेडमध्ये रेल्वेगाड्या थांबलेल्या असताना त्यातल्या वातानुकूलित यंत्रणा चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. यामुळे रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं. प्रकरणाचा तपास सामुद्रे यांच्याकडे आला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी होती. गुन्हेगार तीन राज्यातले असल्याचं निष्पन्न झालं. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तपास मोहीम राबवून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं. यातला एक जण शिक्षित होता. त्याचं योग्य समुपदेशन सामुद्रे यांनी केलं. न्यायालयानं त्याला सुनावलेली शिक्षा पूर्ण झाली. सामुद्रे यांनी परिचितांपैकी काही जणांना तरुणाविषयी सांगितलं. त्याला नोकरी देणार का विचारलं. या वर्षी जानेवारी महिन्यात एका मित्रानं त्याच्या पेट्रोल पंपावर तरुणाला कामावर लावलं. आज हा तरुण सन्मानानं जीवन जगत आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने त्यांची विशेष तपास पारितोषिकासाठी रेल्वे मंत्रालयाला शिफारस केली. याच वर्षी ५० हजार रुपये रोख आणि विशेष पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या रकमेतले ४४ हजार रुपये त्यांनी परिसरातल्या अत्यंत गरीब आणि होतकरू मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी त्यांनी दिले आहेत.
सामुद्रे यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली. 1996 मध्ये त्यांची कर्नाटक रेल्वे पोलिस दलात त्यांची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेमहाराज त्यांचे आदर्श आहेत. मदत करायला कायम तत्पर , अशी त्यांची ओळख आहे.

- रुपेश जाधव, नंदूरबार

No comments:

Post a Comment