Sunday 18 August 2019

लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला दाताच्या डॉक्टरने शेतकऱ्यांना दिली अनोखी भेट

वाटल्या 7 लाखांच्या दंतकवळ्या
झाली दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत...

उस्मानाबादचे दंतचिकित्सक डॉ.कृष्णा देशमुख. शहरातील सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांचा दंतचिकित्सा विभाग आहे. डॉ.पायल व कृष्णा देशमुख यांच्या कुटुंबात सानवी नावाची पहिली मुलगी जन्माला आली. डॉक्टर शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले. त्यामुळे डॉक्टरांनी लेकीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद शेतकऱ्यांसमवेतच वाटून घ्यायचं ठरवलं.
दुष्काळाच्या छायेतला उस्मानाबाद जिल्हा. आर्थिक गणित कोलमडल्याने शेतकऱ्यांची स्थिती भयंकर आहे. आरोग्यउपचारासाठी पैसे नसल्याने दुखणी अंगावरच काढावी लागतात. डॉ. देशमुखांना त्यांच्याकडे येणाऱ्या काही शेतकरी रुग्णांच्या दातांच्या समस्या जाणवत होत्या. अनेक शेतकऱ्यांचे वृध्दापकाळाने दात पडल्याने त्यांना जेवताही येत नव्हतं. काहींच्या हिरड्यांची झीज झालेली. पैशांअभावी कवळ्या बसवणं त्यांना अशक्य होतं. कवळी घ्यायची तर किमान 10 ते 12 हजार रुपये लागतात. सरकारी दवाखान्यात कवळी मिळत नाही. मुलीच्या वाढदिवशी जमेल तितक्या शेतकऱ्यांना या व्यथेतून मुक्त करायचं, असं त्यांनी ठरवलं.
डॉ कृष्णा यांनी प्रसारमाध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केलं. मोफत दंततपासणी आणि मोफत कवळी वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
10 ते 29 मेपर्यंत जिल्हाभरातील 500 दुष्काळग्रस्त / गरजू शेतकऱ्यांनी त्यांच्या दवाखान्यात दातांची तपासणी करून घेतली. त्यापैकी 70 गरजू शेतकऱ्यांना मोफत दंतकवळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कवळी वाटपाचा कार्यक्रम सानवीच्या पहिल्या वाढदिवसादिवशी म्हणजे 29 मे रोजी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे यांच्यासह नगराध्यक्ष मकरंदराजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. खासदार ओमराजेंनी या उपक्रमाचं कौतुक केलं. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तपासणी आणि प्रत्येक कवळीचा खर्च 10 हजार रुपये आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 70 शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कवळ्यांचा एकूण खर्च 7 लाखांवर गेला. मात्र, मुलीच्या जन्मदिनाचा आनंद इतरांना समाधान वाटूनच खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकतो, अशी भावना डॉ.पायल व डॉ.कृष्णा देशमुख यांनी व्यक्त केली.
- चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment