Sunday 18 August 2019

‘गुरांचे वैद्य’ गंगाराम जाधव


रत्नागिरीतलं नाखरे गाव. इथं राहणारे गंगाराम रामजी जाधव. वय 78. व्यवसाय शेती. आजही ते शेतात नांगरणी करतात. परिसरात त्यांची ओळख आहे ती ‘गुरांचे वैद्य’ अशी. गेली ५० वर्षे गंगाराम जाधव गुरांवर मोफत उपचार करत आहेत. तोही जंगलातील झाडपाल्याचा! गुराच्या रोगाचे अचूक निदान आणि त्यावर रामबाण उपचार! त्यामुळे आजतागायत त्यांनी उपचार केलेले गूर दगावलेलं नाही.
आज ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते. पण ५० वर्षांपूर्वी गायी-गुरे हेच शेतीचं मुख्य साधन होतं. त्यात कोकणातली शेती डोंगर उतारावरील दळ्या दळ्याची! त्यामुळे आजही काही ठिकाणी बैलजोडीशिवाय नांगरणी होऊ शकत नाही. त्यामुळे गायीगुरांना अनन्यसाधारण महत्त्व. मग जर गुरं आजारी पडली तर संसाराचा गाडाच जणू थांबायचा. त्यात कोकणातील शेतकऱ्याची परिस्थिती बेताचीच, पैसा अडका नसल्यात जमा. नवीन जनावर विकत घेण्याची ऐपत नाही. संपूर्ण कोकणातील हीच परिस्थिती नाखरे गावातही. तेव्हा गुरांचे डॉक्टरही नव्हते. अशावेळी धावून येत ते गुरांचे वैद्य गंगाराम जाधव.
जाधव यांना गुरांवरील औषधोपचाराचा वारसा त्यांचे वडील बंधू केरू रामजी जाधव यांच्याकडून मिळाला. केरू जाधव यांनीही साधारण १९८५-८६ सालापर्यंत शेतकऱ्यांना ही सेवा दिली. त्यांच्या पश्चात गंगाराम यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला. विशेष म्हणजे आता त्यांनी ही पुंजी त्यांचा २१ वर्षीय नातू साहिल दिलीप जाधव याला दिली आहे.
जंगलातील काही ठराविक वनस्पती, त्यांची पाने, मुळं, साल आदींपासून त्यांची ही औषधं तयार होतात. आजही या वनस्पती येथील जंगलात उपलब्ध आहेत. मात्र याबाबत इतरांना माहिती न सांगण्याचा पूर्वापार चालत आलेला अलिखित नियम पाळला जातो. कारण या वनस्पतीबद्दल अधिक माहिती मिळाल्यास समाजकंटकांकडून या वनस्पती नष्ट करण्याचाही धोका संभवतो.
गंगाराम जाधव यांनी गुरांचे विविध आजार पूर्णतः बरे केले आहेत. अगदी हाड मोडले तरी त्याला भाली (लाकडी पट्ट्या बांधून केलेले प्लास्टर) बांधून हाडे जुळवली आहेत. कोकण पट्ट्यात, विशेषतः रत्नागिरीत घटसर्प हा गुरांचा आजार अधिक दिसून येतो. यावर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. तसेच धनुर्वात, सर्पदंश, अन्न विषबाधा, हगवण, विविध ताप, अजीर्ण आदी आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. आतापर्यंत हजारहून अधिक गुरांना त्यांनी जीवनदान दिलं आहे. आणि अर्थातच त्या गुरांवर पोट असणाऱ्या त्या शेतकरी कुटुंबालाही मदतीचा हात दिला आहे.
आजचे आधुनिक तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण शेतीला अत्यावश्यक असलेला गुरांचा आपला मूळ ठेवा सोडून चालणार नाही. कारण या गुरांच्या मलमूत्रापासून तयार होणारे शेणखत, तसेच शेतीला इतर पोषक बाबी या गुरांमुळेच मिळतात. तसेच डोंगराळ भाग असलेल्या कोकणात सर्वच ठिकाणी मशीन नेणं सोयीस्कर नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची कास धरताना गुरांना विसरून चालणार नाही, असं मत ते व्यक्त करतात.
-अभिजित नांदगावकर
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=455184485088938

No comments:

Post a Comment