Sunday 18 August 2019

खुर्रम - एक नवचरित्र (आखुडबुद्धी बहुशिंगी)


बारशावेळी कानात कुर्र करण्याऐवजी आत्या आरामबानूनं 'खुर्र' केल्यामुळे जहांगिरच्या मुलाचे नाव खुर्रम असे ठेवले गेले. नंतर 'त्याच्या घोरण्याचा आवाज खर्र-खर्रऐवजी खुर्र-खुर्र येतो म्हणून नाव खुर्रम पडले' अशी पश्चात-उपपत्ति त्याची बायको मुमताज हिने मांडली. वय झाले तरी कुरकुरीत दिसतो तो खुर्रम - असाही कर्मधारय समास काही दरबारी व्याकरणपंडित सोडवत असत.
मोठेपणी, नारो नावाचे लोक आपले नाव बदलून नारायणपंत वगैरे करत नावात वजन आणतात तसे त्याने आपले नाव खुर्रमखानसाोा असे बदलले. पण, ज्या पर्शियन राजघराण्याशी त्याची सोयरीक जुळून आली होती त्यांची हे खानसाोा वाचल्यावर खुर्रम हा मुघल दरबारातला खानसमा आहे अशी समजूत झाली. आणि ते बिथरून दिल्लीतूनच वरात घेऊन माघारी फिरले. त्यांच्यापाठी सैन्य पाठवून सलीममियां (ऊर्फ जहांगिर)ला त्यांचे मन वळवून हे नाते जोडावे लागले. नंतरही कधी भांडण झाले की ही कंदाहारी बेगम- "हो हो. यापेक्षा चांगलं समरकंदमधल्या कंदमुळं विकणाऱ्यांचे स्थळ चालून आले होते. पण माझी अक्कल चरायला गेली होती म्हणून मी तुम्हांला कबूल केले." असा उद्धार करायची. खुर्रम तिला अकलेचा कंदाहार (खंदार-ए-अक्ल) असे चिडवायचा आणि ती त्याला लाहौरबिल्लाकुवत म्हणायची.
तिच्या कटकटीला वैतागून खुर्रमनं मुमताज नावाची दुसरी बेगम आणली. ही मुमताज डॉल्बी साऊंडमध्ये घोरायची. ती आपल्या ज्या घोरण्याबद्दल तक्रार करते तो तिच्याच घोरण्याचा महालाच्या कानाकोपऱ्यात साठून राहिलेला प्रतिध्वनी असतो असे खुर्रमचे म्हणणे होते. खरेखोटे महालातले खच्चीच जाणे. परंतु तिच्या घोरण्याला वैतागून खुर्रमने तिसरी बेगम आणली. ती पुरेशी घोरत नसल्याने त्याची झोपमोड होत नाही म्हणून त्याला चौथी बेगम आणावी लागली.
घरात चारचार बेगमा असल्याने तो बराच काळ दरबारातच बसून असे. त्यामुळे खुर्रमच्या काळात राज्यात कमालीची शांतता नांदत होती.
कालांतराने मुमताज जेव्हा चिरनिद्रिस्थ झाली तेव्हा तिला सगळ्यांसोबत न पुरता तिच्यासाठी स्वतंत्र थडगे बांधावे म्हणजे इतर मृतांना त्रास होणार नाही अशी कल्पना त्याला औरंगजेब या लाडक्या मुलाने सुचवली. हा औरंगजेब भलताच हुशार आणि हरहुन्नरी मुलगा होता. तो फावल्या वेळात टोप्या शिवायचा आणि त्याचे खिसे नेहमी रंगांनी भरलेले असायचे. (यावरूनच त्याला हे नाव मिळाले.) तब्बल बावीस वर्षं खपून मुमताजसाठी स्नोअरप्रूफ कबर बांधल्यावर आपलीही सोय यातच केली आहे हे खुर्रमला कळले. आणि या बातमीच्या धसक्याने तो आजारी पडला.
औरंगजेबशिवाय खुर्रमला दारा शिकोह नावाचाही एक मुलगा होता. मुराद या मुलाचं नाव त्याने रझा मुराद या फेमस व्हिलनवरुन ठेवले होते. पुढे या मुरादला खरोखरचा व्हिलन समजून औरंगजेबने कैदेत टाकले. जनरली, व्हिलनबरोबर त्याचा बापही व्हिलन असतो (जसे शक्ती कपूरचा बाप प्रेम चोपडा असतो तसे) त्या न्यायाने त्याने खुर्रमलाही कैदेत टाकले. जिल्हा कोर्टापुढे ही केस हिअरिंगला यायच्या आधीच जिल्हेसुभानीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोर्टाने त्यांच्यावरील आरोप शाबीत झाले आहेत असे समजून या दोघांना मरेपर्यंत शिक्षा ठोठावली.
खुर्रमला आपले मूळ नाव कधीच आवडले नाही. शाळेत असताना संजय दत्तचा साजन सिनेमा पाहून तो खूपच प्रभावित झाला होता. त्याने संजयदत्तसारखे लांब केस वाढवून त्याच्यासारखी शायरी करायलाही सुरुवात केली होती. हळूहळू, तो सगळीकडे साजन हे टोपणनावच वापरू लागला. एकदा वर्गात दंगा करताना सापडल्यावर त्याने पंतोजीनाही साजन हेच नाव सांगितले होते. पण पंतोजींना नीट ऐकून आल्याने त्यांनी 'काय नाव म्हणालास रे पोरा?' असे पुन्हा विचारले. त्यावर त्याने मोठ्या आवाजात 'स-हा-ज-हा-न' असे सांगितले. मास्तरांनी त्याचे नाव शहाजहान असे लिहून टाकले. अर्थात, दहावीच्या सर्टिफिकेटवर हेच नाव छापले गेले. बऱ्याच जुन्या कागदपत्रात खुर्रमचा शहाजहान असा उल्लेख आहे याचे मूळ या कथेत आहे.
मुमताजमहलसाठी जी कबर बांधली तीत प्रचंड भ्रष्टाचार झाला. या भव्य कबरीच्या टेरेस वॉटरप्रूफिंगमध्ये गोंधळ होऊन तिथून पाणी ठिबकत असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीटरचा शेरा आल्यावर तर त्याचे धाबेच दणाणले. एस्टिमेटपेक्षा जास्त खर्च, कन्स्ट्रक्शन शेड्यूलचा पार बोऱ्या वाजलेला, नर्मदेत राडारोडा टाकल्याच्या नगरपालिकेच्या नोटीसा, ज्या ठिकाणी उंची काळा कडाप्पा लावायचा तिथे स्वस्तातला संगमरवर लावलेला आणि वर ही वॉटरप्रूफिंगची भानगड- या सगळ्यामुळे वैतागून औरंगजेबाने खुर्रमला बादशहा पदावरून सस्पेंड केले असल्याचे नवे संशोधनांती सिद्ध झाले आहे.
सोळाव्या शतकानंतर खुर्रम बराचसा विस्मरणात गेला. प्रदीपकुमारने ताजमहाल सिनेमामध्ये त्याचा रोल केल्यावर तर खुर्रम नाहक बदनाम झाला. (जसे भारतभूषणमुळे बैजूबावरापेक्षा तानसेन जास्त लोकप्रिय झाला तसेच.) पण १९८०च्या दशकात महिलागृहउद्योगने त्याचे पुनरुज्जीवन केले. लिज्जत पापडच्या जाहीरातीत खुर्रम खुर्रम असा आवाज काढणारा ससा दाखवल्यावर खुर्रम आबालवृद्धांत एकदमच लोकप्रिय झाला. त्याने बांधलेली मुमताजची कबर बघायला आणि कबरीच्या सुळक्याला पकडून फोटो काढायला लोक गर्दी करू लागले. लोकही खुर्रम म्हणजे 'अरे हो, तो प्रदीपकुमारचा रोल केलेला माणूस...' अशी ओळख दाखवू लागले.
असा रीतीने, एक बादशहा (व्हाया प्रदीपकुमार) ते पापडाचा अनऑफीशियल ब्रँड अँबसेडर असा खुर्रमचा प्रवास संपूर्ण झाला.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment