Sunday 18 August 2019

दीनदुबळ्यांसाठी माऊलीची सेवा



 नवी उमेदवर आपण १६ जुलैला पोस्ट प्रकाशित केली होती. बीड जिल्ह्यातल्या पाडळी शिवारात वन्यजीवांसाठी पाणवठे उभारणाऱ्या व्यक्तीविषयी. पण या व्यक्तीचं काम एवढयापुरताच मर्यादित नाही. या व्यक्तीचं नाव माऊली सिरसाट. वय साधारण ३५ च्या आसपास. पशुसेवा, रुग्णसेवा, वृक्षारोपण कुठलंही काम असो माऊली झपाटून काम करतात.
१५ व्या वर्षांपासून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलं. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने त्यांचा आदर्श. परिसरातली अनेक माणसं पैशांअभावी डोळ्यांची शस्त्रक्रिया करू शकत नाहीत, असं माऊली यांच्या लक्षात आलं. त्यांनी मुंबईतलं जे. जे. रुग्णालय आणि डॉ लहाने यांच्या मदतीनं शिबीर सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे सुमारे 500 वृद्ध व्यक्तींची डोळ्याची शस्त्रक्रिया मोफत होऊन त्यांना दृष्टी आली. साक्षाळ पिंपरी गावात एकाच कुटुंबातल्या ६ व्यक्ती अंध आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून देत, माऊली त्यांना सांभाळत आहेत.
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात त्यांनी योगदान दिलं. चार वर्षांपूर्वी परिसरात नदीकाठी त्यांनी एक हजार झाडं लावली. स्वखर्चानं पाणी देऊन त्यांनी ती जगवली. दुष्काळामुळे यंदा अजिबातच पाणी नव्हतं. माऊली यांनी विंधनविहीर घेतली आणि झाडांना पाणी दिलं. त्यासाठी त्यांनी स्वतःची मोटरसायकल आणि अंगठी विकली. त्यामुळे गावालाही दुष्काळात पाणी मिळालं. तागडगाव इथले सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणे हेही माऊलींचे आदर्श. त्यांच्यापासून प्रेरणा घेत माऊलींनी वन्यजीवांच्या देखभालीचं काम सुरू केलं. वंचित , दुष्काळी भागात ते करत असलेलं काम चर्चेचा विषय आहे. 


- सूर्यकांत नेटके 

No comments:

Post a Comment