Sunday 18 August 2019

ब्रह्मेपीडियातील एक एन्ट्री: रेक्याविक (आखुडबुद्धी बहुशिंगी)


रेक्याविक ही आईसलंडची राजधानी आहे. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचे सरळ उत्तर देणे हा इथे फाऊल समजला जातो. (महाराष्ट्रातही अशाच वृत्तीचे एक गाव आहे असे समजले जाते.) रेक्याविकच्या रेनडिअरची सूपची बरीच तारीफ होत असली तरी आजवर कुणाच परदेशी पर्यटकाला अस्सल रेनडिअर सूप चाखायला मिळाले नसल्याचा दावा रेक्याविकवासी करतात. रेक्याविकच्या रस्त्यांवर जागोजागी 'ओव्हनवरच्या रेनडिअरचं अमृततुल्य सूप'च्या पाट्या लागलेल्या असतात. ही पाककृती किमान आठशे वर्षे जुनी असून तिची मूळ प्रत हजारो वर्षांपूर्वीच गहाळ झाल्याचे समजते. एकूण हॉटेलांची संख्या पाहता रेक्याविकमधले समस्त नागरिक केवळ हॉटेलमध्येच जेवत असावेत अशी शंका येते. पण तसे नसून परदेशी बावळट पर्यटकांना फसवायला ही हॉटेल असतात.
रेक्याविकमध्ये शाळा, कॉलेज, संस्था यांची एकूण बेरीज केली असता ती रेक्याविकच्या लोकसंख्येपेक्षा अधिक भरते, या कारणाने तिला नॉर्डिक प्रदेशाच्या सांस्कृतिक राजधानीचाही मान मिळाला आहे.
रेक्याविकच्या लोकांचे तिरकस बोलणे हे संपूर्ण नॉर्डिक प्रदेशात प्रसिद्ध आहे. उदा-
"किती वाजले हो अमुंडसेनगुरुजी?"
"सूर्य दिसतोय ना आकाशात? मग तरीही काय विचारता?"
"हो, पण यामुळे वेळ कशी कळणार? शिवाय, हा मध्यरात्रीचा सूर्य असला तर?"
"ते समोरचं दुकान पाहिलंत? ते बरोब्बर चार वाजता बंद होतं."
"अच्छा. पण यावरून आत्ताची वेळ कशी कळणार?"
"सोप्पंय. ते दुकान बंद झालं की तितका वेळ चारमधून वजा करायचा. म्हणजे मग आत्ता किती वाजले होते हे त्यावेळी कळेल."
"अहो, तुमच्याकडं घड्याळ आहे ना? त्यात वेळ बघून सांगा की."
"वा रे वा! शहाणेच आहात की! पुन्हापुन्हा वेळ पाहिल्यामुळं माझं घड्याळ बिघडलं तर?"
थोडक्यात, कोणतीही माहिती सहजासहजी न देण्यासाठी या गावाचा लौकिक आहे. जसे की-
एक प्रवासी: ब्रिम्बोर्गचं दुकान कुठाय हो काका?
काका: कोण ब्रॉम्बोर्ग?
एप्र: ब्रिम्बोर्ग! वाणसामानाचं दुकान आहे त्यांचं.
काका: ते तर बंद झालं ना १९४६ साली.
एप्र: आं? मला परवाच म्हणाले चालूय म्हणून.
काका: अच्छा. म्हणजे गृन्सवेजरमधल्या गल्लीत बॅकेच्या पिछाडीस आहे ते?
एप्र: हो तेच!
काका: काही कल्पना नाही बुवा! पहिल्यांदाच ऐकतोय हे नाव.
एप्र: काकू, ब्रिम्बोर्गचं दुकान-
काकू: ज स्वी फ्रान्सेझ. (मी फ्रेंच आहे रे गधड्या.)
एप्र: अरे बाळा, ब्रिम्बोर्गचं दुकान कुठाय सांगितलंस तर मी तुला एक चॉकलेट देईन.
बाळ: (नाक उडवत) हूं! त्यात काय? नाही सांगितलं तर बाबा मला दोन चॉकलेटं देतील.
एप्र: मी तीन देईन. आता तरी सांगशील?
बाळ: ह्या गल्लीतून सरळ गेलात की उजव्या हाताला एक छप्पर असलेलं घर लागेल.
"सगळ्याच घरांना छप्पर असतं ना?"
"हो, पण या घराला उतरतं छप्पर आहे."
"अच्छा. इथं सगळीच उतरती छपरं दिसतायत. मी काढेन शोधून. पुढं काय?"
"पुढं एक चौक लागेल. त्या चौकातून डावीकडं गेलात की एक खाटकाचं बंद पडलेलं दुकान लागेल."
"बरं. बंद पडलेलं दुकान कसं ओळखायचं पण?
"खाटकाच्या दुकानासमोरून डावीकडं जाणारा एक बोळ लागतो. त्या बोळातून पुढं गेलात की एक फुलवाल्याचं दुकान दिसेल."
"फुलवाल्याजवळ आहे का ब्रिम्बोर्गचं दुकान?"
"नाही हो. फुलवाला दिसला की समजायचं आपण रस्ता चुकलो. मग तिथं कुणालाही विचारा. कुणीही सांगेल."
"अरे देवा!"
"आणि माझी चॉकलेटं कुठायत?"
गेल्या महायुद्धात शत्रूकडून माहिती काढून घेण्याचा सराव दोस्तराष्ट्राने इथं रेक्याविकलाच केला होता. रेक्याविकची एकूण लोकसंख्या १२५६७ (१९०६ च्या जनगणनेनुसार) असून सध्या इथं यापेक्षा कितीतरी जास्त लोक राहतात. (नक्की किती ते कुणी सांगत नसल्यानं हे अज्ञान.) पेंग्विनची शिकार, फुटबॉल खेळणे, घरबांधणी आणि नॉर्डिक डान्स हे इथले प्रमुख व्यवसाय असावेत.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment