Sunday 18 August 2019

इतिहास सामान्य माणसांचा असतो का? (इतिहासात डोकावताना)



शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाबद्दलची विद्यार्थ्यांची मतं काय आहेत हा पीएचडीचा सुरवातीचा टप्पा. यासाठी २५ प्रश्नांची एक प्रश्नावली मी तयार केली होती. त्या अगोदर महाराष्ट्र बोर्डाच्या ६ वी ते १० वीच्या इतिहास आणि कला या दोन्ही विषयांच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास केला. अभ्यासक्रमातील विविध मुद्दे आणि त्यांचे उद्देश आणि दिलेले अपेक्षित परिणाम पडताळून बघण्यासाठी त्या त्या मुद्द्यानुसार प्रश्नांची रचना केली होती. महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात इतिहास हा विषय चढत्या क्रमाने शिकवला जातो. घर, आजूबाजूचा परिसर, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जग अशा क्रमाने हा विषय तिसऱ्या इयत्तेपासून शिकवायला सुरुवात होते. अभ्यासक्रमामध्ये क्षेत्रभेटी, आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तू, बाजार, स्थानिक संग्रहालये आणि वाचनालयं यांना भेटी देणं हे बऱ्यापैकी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. हेतू हा, की विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराशी जोडलं असण्याची जाणीव व्हावी. आजूबाजूच्या परिसरातील वयस्कर लोकांशी गप्पा हा देखील इतिहास शिक्षणाचा भाग म्हणून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.
इतिहास आणि कला या दोन्ही अभ्यासक्रमांचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवली, की हे दोन्ही अभ्यासक्रम तर नीट विचार करून अतिशय पद्धतशीरपणे बनवले आहेत. परंतु ह्या सगळ्याच मुद्द्यांची पडताळणी करून बघणं अतिशय आवश्यक होतं. त्या अनुषंगाने मग प्रश्नावली तयार केली.
विद्यार्थ्यांचे इतिहास ह्या विषयाचं आकलन बरंच व्यापक होत जावं अशी या अभ्यासक्रमाची आणि त्यात दिलेल्या उद्दिष्टांची रचना निश्चितच होती. त्यामुळे मग इतिहास ही संकल्पना विद्यार्थ्यांना कितपत कळली आहे हे चाचपण्यासाठी त्या संबंधित ४ प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नावलीमध्ये टाकले. त्यावर जी उत्तरं आली त्यांचा आणि अभ्यासक्रमातील उद्दिष्टांचा काहीही संबंध नव्हता.
एका प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना 'इतिहास' हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर खालीलपैकी काय काय येतं त्यावर खूण करा असं विचारलं होतं. ५ पर्याय दिले होते. हवं तितक्या पर्यायांवर खूण करण्याची मुभा होती. ८०% पेक्षा अधिक विद्यार्थांनी ‘युद्ध’ या शब्दावर खूण केली होती. ६०% विद्यार्थ्यांनी 'राजे आणि राण्या' या पर्यायावर खूण केली होती. ८४% विद्यार्थ्यांनी 'शिवाजी आणि किल्ले' हा पर्याय निवडला होता. २१% विद्यार्थ्यांनी 'श्रीमंत लोकं' असा पर्याय निवडला होता. आणि फक्त ७% विद्यार्थ्यांनी 'सामान्य लोकं' ह्या पर्यायावर खूण केली होती. टक्केवारीकडे बघितली तर लक्षात येईल की बहुतांश विद्यार्थ्यांना इतिहास म्हणजे फक्त युद्ध, राजे, राण्या आणि महाराष्ट्र आहे म्हणून शिवाजी महाराज हे एवढंच वाटतं. इतिहास जर सामान्यांचा असेलच तर त्यातही त्याचं झुकतं माप हे 'श्रीमंत लोकं' याकडे अधिक होतं. म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या उपक्रमांद्वारे जो काही स्थानिक इतिहास शिकवला जातो तो देखील बहुदा राजकीय इतिहासच सांगितला जात असावा.
आणखी एक प्रश्न होता ज्यात इतिहास असा शब्द न वापरता पुरातन संस्कृती असा शब्द वापरला होता. 'पुरातन संस्कृती' हे ऐकल्यावर सुचणारे कोणतेही चार शब्द यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. इथं देखील बहुतांश विद्यार्थ्यांनी लढाया, युद्ध, किल्ले आणि राजे यांचा उल्लेख केला. काही जणांनी पुरातन संस्कृती म्हणजे चांगले संस्कार असं लिहिलं. फक्त २% विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आजी आजोबांच्या आठवणी लिहिल्या. त्याच विद्यार्थ्यांनी कलेचा देखील उल्लेख केला आहे.
पुढच्या एका प्रश्नात भूतकाळाबद्दलच्या कल्पना लिहा असं सांगितलं होतं, परंतु ८०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इथं व्याकरणीय व्याख्या लिहिली.
दोन प्रश्न ऐतिहासिक पुस्तकं आणि ऐतिहासिक सिनेमा बद्दल होते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलीच नाहीत. ज्यांनी दिली त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी इतिहास पाठयपुस्तक असं उत्तर लिहिलं आहे तर काही जणांनी शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा उल्लेख केला आहे. फार थोड्या जणांनी काही संतचरित्रांचा उल्लेख केला आहे.
या प्रश्नांना विदयार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांतून कळतं, की त्यांच्या दृष्टीने इतिहास ही संकल्पना फक्त लढाया आणि युद्ध यापुरती मर्यादित आहे.
इतिहास ह्या संकल्पनेमधील काळाचं प्रवाहीपण त्यांच्यापर्यंत पोचलं नाही. त्यामुळे इतिहास हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक प्रकारे खूप पूर्वी, कुठेतरी लांब घडलेल्या राजकीय घडामोडींपुरता मर्यादित आहे. त्यामध्ये त्यांना त्यांची अशी स्वतःची भूमिका किंवा जागा दोन्ही दिसत नाही. त्यामुळेच इतिहास शिकणं त्यांना कंटाळवाणं वाटतं. आणि हा असा कंटाळवाणा इतिहास त्यांच्या डोक्यात इतका पक्का बसला आहे, की भूतकाळाविषयी कल्पना करा असं सांगितलं की ते बावरून जातात. त्यांना व्याकरणातील व्याख्येव्यतिरिक्त काहीच सुचत नाही. काहीही डोळ्यासमोर येत नाही. इतिहासाच्या पुस्तकातील इतिहास त्यांना त्यांचा वाटतच नाही. तो तसा वाटण्यासाठी बरेच प्रयत्न करायला लागणार आहेत. परंतु कोणतेही प्रयत्न करायला सुरुवात करण्याअगोदर विद्यार्थ्यांची विचार पद्धती, त्यांना होत असणारं आकलन हे वेळोवेळी तपासून बघत राहणं अत्यंत गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांचे विचार तपासून बघण्याच्या प्रक्रियेतील आणखी काही निरीक्षणं पुढील भागात.
- डॉ. अनघा भटl

No comments:

Post a Comment