Thursday, 27 September 2018

सर्जनशील सुप्रिया
सोलापूर जिल्हा. माळशिरस तालुका. इथल्या नातेपुतेपासून १० किलोमीटरवरचं पिरळे गाव. या गावापासून एक किलोमीटरवरच्या शिंदेवस्तीची प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेतील सुप्रिया शिवगुंडे या शिक्षिकेची ही गोष्ट. शाळा द्वीशिक्षकी. आणि पटसंख्या 26. या शाळेतील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांना नुकताच मायक्रोसॉफ्टचा 'इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट' हा पुरस्कार मिळाला आहे.
स्काईपच्या माध्यमातून 'टू बिकम क्रिएटिव्ह...' नावाचा लेसन मायक्रोसॉफ्टमध्ये प्रसिद्ध झाला. या लेसनमध्ये भाग घ्यायचा असेल तर लेसन रजिस्टर केल्यावर वेळ व दिनांक ठरवून सुप्रिया शिवगुंडे आपल्या वर्गात येऊन, जगाच्या पाठीवर स्काईप लाईनद्वारे अॉनलाईन व्हिडीओ कॉलींगद्वारे शिकवू शकतात. या माध्यमातून त्यांनी भारतासह जगभरातील अनेक शाळेतील शिक्षक व मुलांशी संवाद साधला आहे. यामध्ये स्कॉटलंड, आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल, बांग्लादेश इ. देशातील मुलांना त्यांनी स्काईप लाईनद्वारे शिक्षण दिलं आहे. हा उपक्रम शिक्षकांसाठी उत्तम मॉडेल असल्याचं सुप्रिया सांगतात. त्यांनी वर्गातील मुलांचे व्हिडीओ करून युटूब चॅनलवर प्रकाशित केले आहेत. सुप्रिया शिवगुंडे याच नावाचं युट्युब चॅनल त्या चालवतात. अनेक व्हिडीओ तिथे पहायला मिळतात.


सुप्रिया म्हणतात, “खरं तर काम सर्वच शिक्षक करत असतात. पण, त्यांच्या पध्दती वेगवेगळ्या असतात. मुलांपर्यंत ते पोहचत नाही. मात्र या माध्यमातून मुलांपर्यंत शिकवलेले पोहचले जातं.” गणित, इंग्रजी व इतर विषयावर मुलांच्या कृतीतून व मुलांच्या आवाजात व्हिडीओ केलेले असल्यामुळे लहान मुलं उत्साहात असतात. हे व्हिडीओ ग्रामीण भागातून परदेशात जातात, याचा त्यांना अभिमान वाटतो, पालकांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार करून, मुलं शाळेत कशा पध्दतीने शिकत आहेत, यासाठी फोटोंच्या माध्यमातून पीपीटी आणि व्हिडिओ तयार करून पालकांना देण्यात येत असत. परंतू त्यातून पालकांचे समाधान झालं नाही. कृती काय असा प्रश्न त्यांना पडला, त्यानंतर मुलांचे व्हिडीओ त्यांना पाठवायला सुरूवात केली. हे व्हिडीओ मोठे असल्यामुळे युटूब चॅनल सुरू करून त्यावर अपलोड करायला त्यांनी सुरूवात केली.
सुप्रिया शिवगुंडे यांचं संपूर्ण कुटुंब प्राथमिक शिक्षक आहेत. माळशिरस तालुक्यातील शिवपुरी हे त्यांचं गाव. त्यांच्यासह पाच बहिणी, एक भाऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यामुळे घरातील शैक्षणिक वातावरणाची पार्श्वभूमी त्यांना मिळाली. आणि याचाच त्यांना फायदा झाला.
सलग दुसऱ्यांदा हा त्यांना पुरस्कार मिळाला आहे. आकर्षक साहित्य निर्मितीसाठी पहिल्यांदा २०१७/१८ मध्ये तर स्काईप लेसनसाठी २०१८/१९ चा मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार मिळाला आहे.
सुरूवातीला माळशिरस तालुक्यातील कुरबावी या शाळेत त्यांनी असे प्रयोग राबवले. सुप्रिया सांगतात, “ही माझी शाळा अशी प्रत्येकाची भावना असते. ‘आपली शाळा, आपले शिक्षक’ अशी प्रत्येकाची भावना झाली पाहिजे, आपल्याला जे मिळाले नाही, ते आपल्या पाल्यांना मिळावे, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे पालकांना विश्वासात घेऊन हे उपक्रम राबवण्यात आले.” 'एज्युकेशन विथ यूट्यूब...' असा उपक्रम त्यांनी घेतला. त्यामुळे पालकांचा उत्साह वाढला, पट वाढला. शाळेविषयी आत्मीयता वाढली. आपली मुले त्यांना कशा पध्दतीने शिकतात व बोलतात. याचे त्यांना कुतूहल वाटू लागले. असे व्हिडीओ मुलांच्याच आवाजात असल्यामुळे मुले मनोरंजकतेने शिकतात. कार्यानुभव हा त्यांचा आवडता विषय. ‘हात सर्वकामी तर बुद्धी सर्वगामी’ या उक्तीप्रमाणे त्यांनी मुलांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण केली. तंत्रज्ञानाची आवड असणा-या या शिक्षिकेने आर्टवर्कवर आधारित 'टू बिकम क्रिएटीव्ह...' नावाचा स्काईप लेसन तयार करून स्वतःच्या शाळेप्रमाणेच इतर शाळांमध्येही सर्वसमावेशक अध्यापनाचे कार्य करीत आहेत.
- गणेश पोळ.

लव्ह यू कबीर

रखरखत्या उन्हात, सावली बनून आमच्या जीवनात
त्याच्या येण्याने चार दिशांची चार तोंडे
एकाच ठिकाणी केंद्रीत झाली
बाळोते... शी.... शू...आईचे दूध.... आजारपण...
दवाखाना... सिझरमुळे तिला होणारा त्रास..
रात्री अपरात्री उठणे... जागणे..
नो वेळापत्रक
लगेच पालथे पडणे, कपडे, वाॅकर
ओरडणे, चित्कार... रांगणे...
दात येणे... त्याचे चावणे... आता चालणे
अनेकविध हावभाव
त्याच्या अगम्य भाषेतली बडबड...
आम्ही आवाज चढवून बोलू लागलो की,
मध्ये येऊन संगीतकारासारखे हातवारे करून
आम्हांला गप्प करणे...
‘बाहेर न्या’चा त्याचा हट्ट...उत्साहात सगळे पाहणे...
मला कधीतरी थोपटणे...केस ओढणे...
आत्यांशी खेळणे...आईला वैतागवणे...
आता कसं छान आणि वेगळं वाटतंय..
मी बाप असूनही...
मला आता तोच माझा बाप
आणि आई भासतो...
लव्ह यू कबीर.... !!!
- पी. एस. कांबळे.

वर्दीतली माणुसकी

रात्री 11 ची वेळ. च्रंद्रपूरचं शासकीय रुग्णालय. शबाना सय्यद ही गर्भवती प्रसूतीसाठी दाखल झालेली. तिची शस्त्रक्रिया करावी लागणार हे ठरलं. रक्तगट होता ए निगेटिव्ह. या गटाचं रक्त मिळणंही दुर्मिळच. शेवटी निःस्वार्थ सेवा फाऊंडेशनशी संपर्क साधण्यात आला. शबाना यांच्या पतीने फाउंडेशनकडे मदत मागितली. फाउंडेशनचे कार्यकर्ते सक्रिय झाले. रक्तगट दुर्मिळ असल्याने यासंबंधी शेकडो व्हॉट्सअप ग्रुपवर आवाहन केलं गेलं.
मध्यरात्री रक्तदात्यांची शोधाशोध सुरु असताना फाउंडेशनच्या संयोजकांना एक फोन आला. केव्हा आणि कुठं यायचं आहे अशी विचारणा कॉलरने केली. रक्तदात्याचे नाव ऐकून कार्यकर्त्यांना धक्काच बसला. हा फोन होता चंद्रपूर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा. सर्व माहिती घेऊन काही वेळातच अगदी साधेपणाने ते जिल्हा रुग्णालयात पोचले. त्यांनी स्वतः अर्ज भरला आणि रक्तदान करून, चळवळीचे कौतुक करून रवाना देखील झाले.
शबानाचे पती अबू सय्यद म्हणाले की, “रुग्णाच्या अडलेल्या नातेवाईकांना वेळेवर प्रतिसाद जरी मिळाला तरी हायसं वाटतं. त्यातच देशभर कार्यरत असलेल्या 'रक्तदान महादान निःस्वार्थ सेवा फाउंडेशन' च्या कार्यकर्त्यांचं बळ गरजू रुग्णाला मिळालं. आणि समाज माध्यमांची ताकद ओळखून त्याला प्रतिसाद देत पोचणारे संवेदनशील -निगर्वी अधिकारी देखील. मग काय सेवेचे हे वर्तुळ आपसूक पूर्ण झाले.”
- ओमप्रकाश चुनारकर.

आता आमचं नातं मित्रत्त्वाचं होऊ लागलं आहे

मी प्रथमच वडील होणार होतो. मनात विचार येत होते, माझं बाळ कसं असेल? मुलगा किंवा मुलगी काही असो ते निरोगी असावे असा विचार मनात येत होता, अशाच नाना विचारांच्या तंद्रीत असताना अचानक लहान मूल रडण्याचा आवाज कानी आला. अगदी मनातून वाटले हे आपलंच बाळ आणि ते खरंपण होतं. सिस्टर आल्या त्यांनी सांगितलं, “मुलगा झाला आहे, बाळाची व आईची तब्येत एकदम चांगली आहे.” मला एकदम काय बोलावं काही सुचत नव्हतं. मला खूप खूप आनंद झाला होता. मी एखादा राजा असतो तर गळयातील माळ काढून त्याक्षणी नक्कीच दिली असती. मी विचारलं कधी बघता येईल बाळाला. तिने सांगितलं, अर्धातास लागेल अजून. कधी एकदा बाळाला बघतो, असं मला झालं होतं. तो आनंद काही वेगळाच होता तो शब्दात कधीच वर्णन करून सांगता येणार नाही. शेवटी तो क्षण आला. मी त्याला पाहिलं आणि खळकन् आनंदाश्रू आले, त्याचा गोरापान गुलाबी रंग एखादया गुलाबाच्या कळीसारखा दिसत होता. छोटे छोटे नाजूक हात, पाय, नाजूक ओठ, नाक, कान, मोठं कपाळ त्याच्या सौंदर्यात भर घालत होते. त्याच्या डोक्यावर असलेल्या केसांमुळे तो अधिकच सुंदर दिसत होता. मला तर त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. त्याने हळूच डोळे उघडून पाहिलं. त्याचं ते पहिलं पाहणं मी अजूनही विसरू शकत नाही. मी देवाचे आभार मानले. घरचे सगळे बाळाला बघायला आले. माझा आईने बाळासाठी ‘विश्‍वम’ हे नाव सुचवलं.
विश्‍वम रडला की त्याला घेणं, त्याला खेळवणं, त्याल हवं नको ते पाहणं हे सगळं मी अगदी आनंदाने केलं. त्याच्या सगळया वेळा ठरलेल्या होत्या. तो दिवसा जास्त झोपायचा आणि रात्री जागायचा. त्यामुळे आम्हीपण रात्री जागत असू. तसं जागं राहण्यात पण एक वेगळाच आनंद होता. कधी तो खूप रडला तर मी अगदी घाबरून जायचो. त्याला कडेवर घेऊन वेगवेगळे आवाज काढून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायचो. आजपण ती माझी तारांबळ आठवली की मला माझंच हसू येतं. आता त्याला माणसं ओळखू येऊ लागली. त्याला रोज न चुकता फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं, त्यांची नावं सांगणं हे सर्व काही चालत असे. तासनतास त्याच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जायचा तेही कळत नव्हतं. त्याला ट्रिपल पोलीओचं इंजेक्शन दिलं त्यावेळेस त्याचं रडणं बघून मलाही रडू आलं होतं.
हळूहळू विश्‍वम मोठा होत होता. रोज रात्री झोपायच्या आधी अंगावर उडया मारणं, धिंगाणा करणं असे उदयोग चालत. मी जेवत असलो की हापण माझा सोबतच माझा मांडीवर येऊन बसायचा. अगदी हॉटेलमधे गेले तरी मी विश्‍वमला सोबत घेऊनच जेवायचो. त्याला खाऊ घालणं, त्याच्यासोबत खेळणं, त्याला आंघोळ घालणं अशा कितीतरी गोष्टी मी करत होतो. पहाता पहाता दिवस जात होते. आता विश्‍वमला गोष्टी कळू लागल्या म्हणून न चुकता रोज रात्री एक गोष्ट मी त्याला सांगत असे. साधारणपणे तो वर्षभराचा झाला त्यावेळेस पासून मी त्याला गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. आजपर्यंत हा दिनक्रम चालूच आहे. आणि विशेष म्हणजे त्याला रोज वेगळी गोष्ट सांगावी लागते. कोणतीही गोष्ट रिपीट झालेली त्याला चालत नाही. यातून आमच्या दोघांचे संबंध अजून चांगले व घनिष्ठ होत गेले.
आता विश्‍वम तिसरीत आहे. त्याला नदीत डुंबायला, डोंगर चढायला, शेतात जायला अशा अनेक गोष्टीत खूप रस आहे. अ‍ॅक्शन मूव्ही त्याला खूप आवडतात. आता वाचनाचा नाद देखील लागला आहे. एकदा वाचलेले, लिहिलेले त्याच्या सहज लक्षात राहतं. त्याला चित्र काढायला आवडतात. गोष्टी लिहायला तो शिकला आहे. नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडतात. त्याच्या शाळेतील सगळया गोष्टी तो मला सांगतोच तसंच मित्रासारख्या माझाशी गप्पा मारतो, खेळतो. वडील आणि मुलगा हे नातं आहेच. पण आता आमचं नातं मित्रत्त्वाचं होऊ लागलं आहे. त्याने फक्त मोठं व्हावं, सुखी व्हावे, स्वतःची जबाबदारीची जाणीव त्याला नेहमी असावी, असं वाटतं.
- चैतन्य सुरेश कुलकर्णी, व्यावसायिक.

Monday, 24 September 2018

गावानं अभिनंदनाचे बॅनर्स लावलेला शिक्षक

"चांगला माणूस होण्यासाठी१५ टक्के ज्ञान आणि ८५ टक्के नम्रता हवी." यंदाच्या मायक्रोसॉफ्ट आय सी टी पुरस्कारानं सन्मानित सुनील आलूरकर सांगत होते. आलूरकर नांदेड जिल्ह्यातल्या आलूर गावचे. वडिलांची शेती. घरची परिस्थिती साधारण. वडील शिकलेले नव्हते, मात्र मुलानं खूप शिकावं ही इच्छा. मग पाचवीपासून पुढलं शिक्षण मामाकडे, अलिबागला. बी.एड झाल्यानंतर पुन्हा गावाला.
१५ वर्ष शिक्षण क्षेत्रात असलेल्या आलूरकर सरांचा आदर्श शिक्षक म्हणून खरा प्रवास सुरू झाला २०१३ पासून. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातल्या हिंगणी गावातली जिल्हा परिषद शाळा. शाळेची परिस्थिती बिकटच. मुलांना शाळेविषयी, अभ्यासाविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून सर लॅपटॉप वापरू लागले. दृक्श्राव्य माध्यमाचा वापर शिकवण्यासाठी होऊ लागला. गावात शिवजयंतीचा कार्यक्रम. डीजे, मिरवणुका यावरचा खर्च वाचवूया, तो शाळेसाठी खर्च करूया. सरांचं आवाहन. वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा राजू पाटील आणि प्रा संतोष देवराये यांनी गावकऱ्यांचं प्रबोधन केलं. गावकऱ्यांनी कल्पना उचलून धरली आणि शाळेत प्रोजेक्टर आला. रिसोर्स बँक तयार झाली. विविध साधनांच्या वापरामुळे मुलांना विषय चांगले समजू लागले. आवडू लागले. परिणामी २०१३ला शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यांच्या कामाची दखल राज्य आणि देशपातळीवर घेतली गेली. गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गावानं जागोजागी त्यांचे बॅनर्स, होल्डिंग लावले. एखाद्या शिक्षकाचे असे बॅनर्स लागण्याची ही पहिलीच वेळ. सध्या २०१८ पासून माहूर तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या शाळेत ते कार्यरत आहेत.
आलूरकर सरांची कामगिरी एका शाळेच्या यशापुरता मर्यादित नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती उद्याच्या भागात.
-उन्मेष गौरकर.

Saturday, 22 September 2018

इथं, चक्क विहिरीत भरते शाळा

लातूरमधील औसा तालुका. इथली देवंग्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. ही शाळा वर्षातले काही महिने चक्क विहिरीत भरते. होय, तुम्ही योग्य तेच वाचलंत. आठवीपर्यंत असणाऱ्या या शाळेचे काही वर्ग खरंच विहिरीत भरतात. देवंग्रा शाळा आठवीपर्यंत असली तरी वर्गखोल्या मात्र दोनच आहेत. पण त्या खोल्याही लहानशा आहेत आणि सहावी–सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकविणे शिक्षकांनाही अवघड जाते.
शाळेच्या संगीता कानडी मॅडम यांनी या जागाटंचाईवर भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्या सांगतात, "शाळेची जागा लहानच आहे, आणखी जमीन मिळविण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण तोवर विद्यार्थ्यांचे हाल करणे मनाला पटत नाही. आमच्या शाळेजवळच एक उथळ अशी विहिर आहे, तिच्यात पावसाळ्याचे काही दिवसच फक्त थोडं पाणी असतं. गावकऱ्यांनी कचरा टाकून टाकून ती बुजविण्याचा प्रयत्न चालवला आहे. दिवाळीनंतर पाणी आटतं, मग आम्ही शिक्षक तो कचरा उपसून शेतातले दगड आणि काळी माती टाकून बसण्यायोग्य जमीन बनवतो आणि मग चटई टाकून माझा विहिरीतला वर्ग तयार होतो."
कानडी मॅडम सांगतात, “विहिरीतला कचरा काढण्यासाठी शाळेतले आम्ही चारही शिक्षक मेहनत करतो. एकेकदा तर दोन ते तीन ट्रक गाळ निघाला आहे. मग एखादा मजूर मदतीला घेऊन ती जागा दगड, मातीने भरून काढतो. वर भरपूर काळी माती टाकून लेव्हलिंग करून घेतो आणि तिथेच वर्ग भरवतो.” 2016 साली तर या विहिरीतच कानडी मॅडम यांनी देवंग्रा शाळेचे विज्ञानप्रदर्शन भरविलं होतं. त्यात पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विज्ञान प्रदर्शनात मेणबत्तीवर ग्लास ठेवून मेणबत्ती जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हा प्रयोग केला होता.तसेच केसावर प्लास्टिकचा कंगवा अथवा मोजपट्टी घासली आणि मग ती कागदाच्या तुकड्यांवर फिरविली तर त्याला कागदाचे तुकडे चिकटतात, हा स्थितिक विद्युत उर्जेचा प्रयोगही केला होता. लहान मुलांनी जड वस्तू पाण्यात बुडते तर, लाकूड, प्लास्टिकचे बॉल पाण्यावर तरंगतात अशा प्रकारचे प्रयोग केले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना म्हणजेच देवंग्राच्या ग्रामस्थांना आवर्जून आमंत्रण दिलं होतं. जेणेकरून त्यांनीही शाळेत, शिक्षणात आणि पाल्यांच्या प्रगतीत रस घ्यावा, असं कानडी मॅडम यांनी सांगितलं.
ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची विशेष गोडी लागावी यासाठीही देवंग्रा शाळेत प्रयत्न होतात. इंग्रजीच्या तासाला शक्यतो इंग्रजीमधूनच संवाद साधावा असा आग्रह असतो. इंग्रजी स्पेलिंग्जची अंताक्षरी घेतली जाते. वर्गातील मित्र–मैत्रिणींची नावंही स्पेलिंगसह सांगण्याचा खेळ घेतला जातो. इंग्रजी शब्दांचे शब्दकोडं घेतलं जातं. हावभावातून इंग्रजी शब्द ओळखण्याचा ‘हॉटसीट‘चा गेमही घेतला जातो. इंग्रजीची छोटी छोटी कोडी आणि गाणी यातून विद्यार्थ्यांना रमविलं जातं. “मुलांच्या गुणवत्तेसाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करतच आहोत, फक्त गरज आहे ती शाळेसाठीच्या जागेची!” कानडी मॅडम सांगतात.

- स्नेहल बनसोडे– शेलुडकर

Friday, 21 September 2018

बाप म्हणून मीही तिच्यासोबत हळूहळू वाढतो आहे

 नऊ महिने आईच्या पोटात वाढून, तिला पोटात लाथा मारुन, जन्माला येताना ही ठमी आईला चकवून आली ती बाबाचाच चेहरा घेऊन. डोळे मात्र आईसारखे, टपोरे. क्षणभर मी स्वतः लाच हातात घेतल्याचा भास झाला. प्रसूती नंतरच्या दहाव्या मिनिटाला तिला माझ्या हातात दिले. तिची आई अजूनही OT मध्ये होती. आईला पाहण्याआधीच तिने डोळे किलकिले करून बाबाला पाहिलं. हृदयाचा ठाव घेणारी तिची नजर, नवीन जग बघतानाचा तान्हा निरागसपणा थेट काळजाला भिडला. आणि माझ्या पापण्या ओलावल्या. डोळ्यातून दाटलेल्या पाण्याने मला जाणीव करून दिली, मी बाप झालोय. Love at first sight हे माझ्या बाबतीत दुसऱ्यांदा घडलं होतं. 
पहिल्या miscarriage नंतर ह्या वेळी आम्ही जरा जास्तच काळजी घेत होतो. 'एकच अपत्य' जे होईल ते, मुलगा वा मुलगी. आयुष्यात हा क्षण एकदाच येणार, पुन्हा नाही. त्यामुळे ते भरभरून जगायचे हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. आम्ही दोघांनी करिअरच्या नवीन वाटा चालण्याआधी एक ब्रेक घ्यायचं ठरवलं. हिला नववा महिना लागल्यावर मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. कंपनीच्या HR मॅनेजरला तर विश्वास बसेना की मी बायकोच्या डिलिव्हरी साठी जॉब सोडतोय. पण तोपर्यंत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या माझ्या प्रसूती कळा एव्हाना सुरू झाल्या होत्या. योग्य आर्थिक नियोजन आणि कुटुंबातील सर्वांचे पाठबळ यामुळे निर्णयापर्यंत येणं सोपं झालं होतं. आता मी पूर्ण वेळ येणाऱ्या बाळासाठी उपलब्ध होतो.
बाळाने पहिल्यांदा शी केली ,नर्स मावशींनी तिला साफ करून दुपट्यात बांधली. नंतर मी मावशींकडून दुपटे बांधण्याची कला शिकून घेतली आणि माझ्यातल्या बाबाचा प्रवास सुरु झाला. बाळाची शू-शी साफ करणे, कपडे बदलणे, मालिश, तिच्या बाललीलांकडे तासन् तास पहात राहणे ह्या सर्व गोष्टींचा मी मनापासून आनंद घेतला. बाळाचं दूध पिऊन झालं की तिला ढेकर काढण्याचं काम माझाच झालं, दिवसा, रात्री, अपरात्री अगदी कधीही. बाळाची नखं कापण्याचं नाजूक काम पण माझ्याकडेच. पेज, भात, केळं भरवणे, गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे न संपणारी यादी. मला माझ्या मुलीला भरपूर वेळ देता आला. त्यामुळे आमच्यातील नातं छान मुरलंय. "ए बाबा" शिवाय आमचा दिवस सुरूच होत नाही. मुलीला वाढवताना आम्ही उभयतांनी खूप गोष्टी तिच्याबरोबर नव्याने अनुभवल्या, खूप गोष्टी नव्याने शिकल्या. नुकतेच आम्ही दोघे बापलेक पोहायला शिकलो आहोत. पेटी आणि गायनाचे प्राथमिक धडे दोघे गिरवतोय. सध्या मुलीला सायकल शिकण्याची ओढ लागलीय. रोज रात्री बाबाच्या कुशीत गोष्टी ऐकता ऐकता तिला पुस्तकांची गोडी लागलीय. आता बाईसाहेब स्वतःतः पुस्तके वाचतात. नवीन नवीन अफलातून प्रश्न विचारतात. उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करतात
आज सुश्रुता 6 वर्षांची आहे. बाप म्हणून मीही तिच्या सोबत हळूहळू वाढतो आहे. तान्ह्या बाळापासून ते एक स्वतंत्र व्यक्ती होण्याच्या तिच्या या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा शारीरिक, मानसिक, भावनिक आनंद घेत आहोत. तिच्यासोबत आम्हाला आमचं बालपण पुन्हा नव्याने जगायची संधी मिळतेय. हे क्षण जगायला मिळत आहेत हेच बहुदा बापपणातील सुख असावं.
- दिलीप कानडे.

जरबेरा फुलाने उपळ्याला दिली २५ देशात ओळख

उस्मानाबादपासून १० किलोमीटर अंतरावरील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचं उपळा गाव. उस्मानाबाद तालुक्यातल्या उपळा गावाच्या नावापुढे ‘माकडाचे’, असा उल्लेख आढळतो. अर्थातच गावात माकडांची मोठी संख्या होती. कालांतराने माकडे निघून गेली. मात्र, गावकऱ्यांनी ओळख टिकवण्यासाठी विकत माकडे आणली. याच गावाची ही आगळी गोष्ट. गावाचं अर्थकारण बागायती शेतीवर अवलंबून आहे. फुलशेती, द्राक्ष, पपई बागा, ऊस, अशा पिकांमुळे शिवार हिरवागार दिसतो.
उस्मानाबादजवळच्या शिंगोली शिवारात २००५-०६ मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जरबेराची फुलशेती उभी राहीली होती. यातील यशानंतर तरूणांनी स्वत:च्या शेतात प्रत्येकी १० गुंठ्यावर जरबेराची शेती उभारली. त्यातही यश आल्यानंतर तरूणांनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांना या व्यवसासाठी प्रोत्साहित केले. उपळ्याचे मनोज पडवळ यांनीही गावातील शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी मार्गदर्शन केले. कमी क्षेत्र, नगदी पैसा, या सूत्रामुळे पाहता पाहता अनेक शेतकरी या व्यवसायात उतरले. या यशातून सुरू झालेला फुलशेतीचा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित राहीला नाही तर जगाभरात २५ देशापर्यंत पोहोचला. उपळ्यात २००९ मध्ये अवघ्या १० गुंठ्यावर उभारलेल्या जरबेरा फुलशेतीचा विस्तार सुमारे १३ एकरपर्यंत पोहोचला. गावातील १०० वर शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात १० गुंठे व त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पॉलिहाऊसमध्ये जरबेराची फुलशेती सुरू केली. हैद्राबाद, दिल्ली, नागपूर, सोलापूर, पुणे, मुंबई, अशा शहरात फुलांची विक्री सुरू झाली. त्यानंतर जरबेरा फुलांच्या उत्पन्नात विक्रम केल्यामुळे पोर्तुगालच्या जरबेरा कंपनीने उपळा नावाची फुलाची स्वतंत्र जात विकसित केली. या फुलाचे नामकरण पाळणा हलवून करण्यात आले. आता या फुलांचे उत्पादन जगभरातील २५ देशात सुरू असून, वाणाच्या रूपाने गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.
विवाह समारंभ, उत्सव काळात सुमारे १५ ते १७ रूपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा फुलांकडे ओढा वाढत गेला. मात्र समारंभ-उत्सावाचा हंगाम संपल्यानंतर फुलांचे दर कमालीचे खाली येत होते. या काळात फुलांची मागणीच येत नसल्याने शेतकऱ्यांना फुले उकिरड्यावर टाकून द्यावी लागत होती. अलीकडच्या काळात फुलांच्या दरातील चढउताराचे व्यवस्थापन न पेलवल्याने शेतकरी हताश झाले. भावातील घसरण आणि उत्सव काळातील मिळणारा भाव, याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांनी हळहळू फुलशेती मोडायला सुरूवात केली आहे. मात्र, देशातील प्रमुख शहरासह परदेशापर्यंत पोहचलेल्या जरबेरामुळे उपळा गावाची वेगळी ओळख झाली.
महाराष्ट्रात जरबेरा फुलशेतीमध्ये उस्मानाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यात उपळ्यात सर्वाधिक १३ एकर जरबेरा असल्याने राज्यात सर्वाधिक उत्पन्न घेणारे गाव म्हणून उपळ्याची ओळख झाली होती. आता मात्र गावात २ एकरवरच फुलशेती उरली आहे.
पोर्तुगालच्या मोन्टी प्लान्ट कंपनीने जरबेरा उत्पादनात आघाडीवर गेलेल्या उपळा गावाचा इतिहास शोधला. या वातावरणात अधिक दर्जेदार आणि टिकाऊ फुले येत असल्याने शेतकरी या उत्पादनाकडे अधिक प्रमाणावर वळत असल्याचे कंपनीच्या निरिक्षणातून समोर आले. त्यानंतर कंपनीने उपळा आणि पाडोळी या दोन गावांच्या नावावर जरबेरा फुलांच्या दोन जाती विकसीत केल्या. या वाणांचा पाळणा हलवून नामकरण सोहळा पाडोळी(ता.उस्मानाबाद) येथे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी पार पडला. विशेष म्हणजे या नामकरण सोहळ्यासाठी खास पोर्तुगालवरून मोन्टी प्लान्ट कंपनीचे सीईओ डेव्हिड यार्कोनी आले होते. त्यांनी उपळ्यातील शेतकऱ्यांचे मेहनतीबद्दल तोंड भरून कौतुक केले होते.
सध्या मात्र उपळ्यातून जरबेरा हद्दपार होत असला तरी देशातील विविध राज्यांसह पोर्तुगाल, जपान, कोलंबिया, अशा जगभरातील २५ देशात उपळा जातीचे वाण पोहोचले असून, हे वाण अत्यंत दर्जेदार आहे, असे मोन्टी प्लान्ट कंपनीचे राज्य व्यवस्थापक धनंजय कदम यांनी सांगितले.
उपळ्याने जरबेराकडे पाठ फिरवली असली तरी जिल्ह्यातील पाडोळीसह अन्य भागात जरबेरा फुलशेती वाढतच आहे. जिल्ह्यात एकूण ५५ एकर क्षेत्रावर जरबेराची फुलशेती आहे. हंगाम संपल्यानंतर काही दिवस तोटा सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हंगामात फुलाला चांगला दर मिळतो, असे तरूण शेतकरी मनोज पडवळ सांगतात.
- चंद्रसेन देशमुख.

बाबाकडची खास पोतडीबाळ जन्मल्यानंतर त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात तसं घडत मात्र नाही. ज्या घरामध्ये आई-बाबा दोघेही नोकरी करतात, त्या घरात बाळाची बहुतांश काळजी, जबाबदारी ही आईच उचलताना दिसते. अशीही मांडणी केली जाते की बाबा पैसे कमावून आणतो, तो दिवसभर घरात नसतो आणि म्हणून मुलांना सगळ्यात जास्त सहवास आईचाच मिळतो. आता काही घरांमध्ये तरी हे चित्र बदलताना दिसत आहे. बाबाप्रमाणे आईसुद्धा दिवसभर नोकरी करते. काम करते. पण तरी सुद्धा असंच चित्र दिसतं की आईचा सहवास मुलांना जास्त आहे. याचं कारण आपल्या समाजाच्या जडणघडणीत तर आहेच, पण बाबाच्या मानसिकतेत सुद्धा आहे. आपल्या लहानग्या मुलाला किंवा मुलीला वाढवणं, तिच्यासाठी काही करणं, यात आपणही काही भूमिका बजावू शकतो याची ओळख सुद्धा कित्येक घरातल्या बाबा मंडळींना झालेली नसते.
त्यासाठीच काही उदाहरणं सुचवावीशी वाटतात. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा बाळाला आईचा आवाज स्पष्ट ऐकू येत असतो आणि बाकीचे आवाज थोडे अस्पष्ट ऐकू येत असतात. मात्र तेव्हापासूनच जर बाबा बाळाशी गप्पा मारत राहिला तर बाळाला त्याचा आवाजही ओळखीचा वाटेल.
निदान बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासून आई इतकाच सहवास जर बाबाचाही मिळाला, त्याला जवळ घेतलं, आई अंगाई गीत गात असेल तर बाबांनीही ते शिकून घ्यायला काहीच हरकत नाही. बाळ काही गाण्याचं परीक्षण करत नसतं !! त्याला फक्त तो आवाज परिचित व्हायला हवा.
अगदी लहानशा बाळाला समजो न समजो, पण त्याला वेगवेगळ्या छान छान गोष्टी सांगू शकतो. या अशा गोष्टी सांगून बाबा बाळाला जवळ घेईल, त्याला हसवेल, बाबाच्या चेहऱ्याकडे बघून बाळ खूप काही शिकेल, हे तर बाबा कोणत्याही वयात करू शकतो. अगदी चार ते पाच महिन्याच्या बाळाला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी बाबाला सांगता येतील.
याचं शास्त्रीय कारण असं आहे की बाळाच्या मेंदूतला Wernicke या नावाचा भाग जन्मापासूनच कार्यरत असतो. ऐकलेल्या शब्दांचं आकलन हे या भागाचं काम आहे. हे शब्द स्मरणकेंद्रात जातात. साधारणपणे एक वर्षाच्या आसपास broka हा भाग विकसित होतो. हा बोलण्याला मदत करणारा एरिया आहे. आजपर्यंत जे wernicke मध्ये save झालेलं आहे, थोडक्यात एका वर्षापर्यंत जे ऐकलेले आहेत तेच शब्द बाळ बोलतं. म्हणून बाबानीही बोलायला हवं. आईपेक्षा बाबाचे नवे शब्द, बोलण्यातले उतार-चढाव, काही गमती जमती, या वेगळ्या असू शकतात आणि बाळाला त्यासुद्धा अवगत होऊ शकतात.
याशिवाय अजून एक गोष्ट बाबा करू शकतो ती म्हणजे खेळ. बाबा जर आपल्या मुलांच्या प्रेमात बुडालेला असेल तर त्याला खूप सारे खेळ सुचतात. एका बाबाने नुकत्याच चालायला आपल्या मुलीला एक आकाराने मोठा, पण अतिशय हलका असा एक बॉल आणून दिला. ती जशी चालायची तसा तो बाबा तिच्या पायासमोर तो बॉल आणून ठेवायचा. मुलगी मजेने तो बॉल उडवायची. घरातल्या घरात ती फुटबॉल खेळू लागली. असे अनेक प्रकारचे खेळ बाबाला सुचू शकतात.
बाबांनी आपल्या पोतडीतल्या अशा कितीतरी गोष्टी, खेळ, मजेच्या युक्त्या आपल्या मुलां- मुलींसाठी उघड केल्या पाहिजेत. अनेक घरांमध्ये बाबा म्हणजे 'घाबरायचं असतं असं एक माणूस' अशी प्रतिमा असते. पण आताच्या बाबाला ही प्रतिमा बदलून मुलांचा किंवा मुलींचा मित्र ही प्रतिमा निर्माण करता येऊ शकते आणि ती देखील अगदी बाळाच्या जन्मापासूनच.

- डॉ. श्रुती पानसे, बालमानसतज्ञ

ना कुठलं कर्ज, ना अनुदान, केवळ बचतीतून भांडवल

नाशिक जिल्हातील इगतपुरीमधलं बलायदुरी गाव. या गावातला राणी लक्ष्मीबाई महिला बचतगट. शासनाच्या तालुकास्तरावरच्या कृषी प्रशिक्षणाचा लाभ गटानं घेतला आणि ५-६ वर्षांपूर्वी मिरचीची शेती सुरू केली. पूर्वी पाचपाणी पद्धतीन शेती व्हायची. मात्र अत्याधुनिक तंत्रामुळे सुरुवातीला एकरी २५ ते ३० हजार रुपयांच्या घरात मिळणारा नफा आता एकरी ६-७लाख रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गटावर कुठल्याही बँकेचं कर्ज नाही, गटानं कधी शासनाचं अनुदान घेतलं नाही. केवळ बचतीतून गटानं भांडवल उभं केलं आहे. बलायदुरीसारख्या छोट्या गावात महिला सक्षमीकरणाचा संदेश रुजावा यासाठी भगीरथ भगत यांनी 2006 मध्ये या गटाची स्थापना केली. महिलांसोबतच्या संवादात अडथळा येऊ नये म्हणून आईला गटात सहभागी करून घेतलं. नंतर पत्नी माधुरी गटाची धुरा सांभाळू लागल्या. महिन्याला ५० रुपये बचत. राष्ट्रीयकृत बँकेत खातं. अडचणीत हेच पैसे उपयोगी पडणार असल्याचं सांगत माधुरी बचतीला प्रोत्साहन द्यायच्या. आज बचत २०० रुपयांवर पोहोचली आहे.
सदस्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर मदतपेटी तयार करण्यात आली आहे. रुक्मिणी भगत यांच्या बैलाचा मृत्यू झाला तेव्हा आणि वादळात लता चव्हाण यांच्या घराचं छप्पर उडून गेलं तेव्हा ही मदतपेटीच कामी आली. कोणाच्या घरात मंगलकार्य असल्यास ३० हजार रुपयांचं कर्ज. तर कोणाच्या मुलीचं लग्न झालं तर तिला दोन किंवा तीन हजाराचं अर्थसहाय्य.
या गटाला अलीकडेच पुण्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बायफ मित्र संस्थेच्या डॉ. मणिभाई देसाई गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशपातळीवर वैशिष्ठयपूर्ण काम करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी केसरकर यांनी बचतगटाच्या कामाचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचतगट उपयुक्त ठरल्याची भावना माधुरी भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राची उन्मेष, नाशिक

मीचि मज व्यालो

मीचि मज व्यालो 
...आणि प्रतीक्षा संपते! मुलगी झाल्याचं सांगितलं जातं. मी माझी बायको – रमा कशीये विचारतो आणि समोरच्या पाळण्यातल्या त्या बाळाकडे पाहतो. तिचे डोळे नितळ असतात. ती वर असलेल्या दिव्याकडे टुकूटुकू पाहत असते. मी हळूच तिच्या कानात सांगतो, तुझे डोळे नदीसारखे आहेत. म्हणून तुझं नाव रावी!
मी रात्री उशिरा घरी परततो. घरातले सगळे दिवे लावतो. तेव्हा जाणवतं, आज आपल्या आतलं काहीतरी बदललंय आणि मनात शब्द येतात –
घरातल्या अंधाराला सांगितलं,
तू आली आहेस...
मग चप्पलस्टँडला, टीव्ही-पलंगाला
आणि बुक शेल्फला.
किचनमधे धूळसाचल्या डब्यांना
आणि न धुतलेल्या भा़ड्यांना
वॉशिंग-मशीन, फ्रीज, गीझर -
सगळ्या गॅजेट्सना.
बादल्यांना, संडासातल्या कोंदट हवेला
अख्ख्या घराला.
त्यांना समजलं का नाही
मला माहीत नाही
पण मी मला समजण्यासाठी
त्यांना सांगितलं –
तू आली आहेस
कुंड्यांमधल्या मलूल झाडांना
पाणी घालत सांगितलं,
तू आली आहेस
त्यांनाही समजलं नसावं
तरी सांगितलं, कारण –
जसं पानांच्या देठात नवं पान
असतं वाढत
तसंच यूटरसमधून आणखी एक गर्भाशय
घेऊन तू आलीस आहेस.

रावीच्या जन्माआधी दोन-तीन वर्षं मी आणि रमाने मूल हवं की नको, यावर खूप विचार केला होता. लग्न झालंय, म्हणजे आता ‘बाय डिफॉल्ट’ मूल जन्माला घालायला हवं, असं आम्हा दोघांना वाटत नव्हतं. कारण मूल जन्माला घालणं आणि ते वाढवणं हे जबाबदारीचं काम आहे. त्यासाठी मनाची-शरीराची तयारी लागते, असं आमचं मत होतं. अखेरीस बराच काथ्याकूट करून आम्ही हो असा निर्णय घेतला. तेव्हाच मी ठरवलं की, शारीरिकदृष्ट्या जरी आपण रमाला होणारे त्रास शेअर करू शकत नसलो, तरी निदान मानसिकदृष्ट्या आपण तिच्यासोबत राहायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं, सोनोग्राफी करणं यासाठी मी रमासोबत प्रत्येक वेळी गेलो. आम्हाला तर सोनोग्राफी सारखी करायला सांगावी असंच वाटायचं, कारण बाळ पाहण्याचा तेव्हा तो एकमेव मार्ग होता!
अगदी पहिल्या दिवसापासून (भीत भीत. कारण याबद्दल कधीच कोणी शिकवत नाही) मी रावीला हाताळू लागलो आणि थोड्या सरावाने ते सहज जमलं. सिझेरियन झालं असूनही रमाने दीड महिन्यात घरी यायचा निर्णय घेतला. मग आम्ही दोघं मिळून रावीचं सगळं करू लागलो. अर्थात त्यासाठी सासू-सासर्‍यांची मदत घेतली.
बाळाला आई-बाबाचा जितका जास्त स्पर्श होईल तेवढी त्याची वाढ चांगली होते असं आम्ही वाचलं होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून रावीला अंघोळ घालायची असा निर्णय घेतला. असंही सुरुवातीच्या काळात खसाखसा घासणं, चोळणं इ. गोष्टींची काहीही आवश्यकता नसते असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे रावीला तेल लावण्याचा भाग मी आवडीने माझ्याकडे घेतला. हळूहळू मसाज करणं, हातापायांचे व्यायाम करणं इ. गोष्टी मी व्हिडिओज पाहून करू लागलो. यातून रावी आणि माझ्यात एक वेगळं बाँडिंग तयार झालं. हाता-पायाचे व्यायाम करताना विशिष्ट आवाज काढला की ती खिदळायची. आता तेल लावायचंय हे तिला कळलं की, मस्तपैकी पडून राहायची. माझ्याकडून सगळं नीट करून घ्यायची! आता हा आनंदसोहळा घरभर फिरत करावा लागतो!
रावीला झोपवणं हादेखील आमच्यातला एक महत्त्वाचा बाँड आहे. हॉस्पिटलमध्ये असल्यापासूनच मी तिला गाणी ऐकवत झोपवायला सुरुवात केली. थोडी मोठी झाल्यावर मग आम्ही गोष्ट सांगू लागलो, तेव्हा रमा आणि माझा एक खेळच सुरू झाला. गोष्टीसाठी आम्ही एकमेकांना विषय द्यायचो आणि तत्काळ त्यावरून गोष्ट रचून सांगायचो. आणि बरेचदा असं व्हायचं की, गोष्ट इंटरेस्टिंग वळणावर यायची, तेव्हाच बरोब्बर रावी झोपी जायची!
रावी दोनेक महिन्यांची झाल्यापासून आम्ही तिला पुस्तकं दाखवत आहोत. तिला हाताळू देतो आहोत, फाडू देत आहोत, एका मर्यादेपर्यंत तोंडात घालू देत आहोत. रावीला यथेच्छ तोंडात घालता यावं म्हणून रमाने तर तिच्यासाठी खास कापडी पुस्तक तयारही केलंय.
मान धरायला लागल्यावर, मी आणि रमा तिला नेमाने बाहेर नेऊ लागलो. थोडी मोठी झाल्यावर तिला पानं, फुलं अशा गोष्टी मुद्दाम हाताळायला देऊ लागलो, पक्षी दाखवू लागलो. आता आम्ही तिला भाजी आणायलाही नेतो. तिथले वेगवेगळे रंग पाहून तिला खूप आनंद होतो. आम्ही तिला भाज्या, कागद, कुरकुर वाजणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या/रॅपर्स आणि लहानसहान रिकामे डबे अशा वस्तू देखरेखीखाली मुद्दाम हाताळू देतो. जेणेकरून तिला वेगवेगळे रंग, आवाज आणि टेक्श्चर्स समजावीत. महागड्या, खूप आवाज करणार्‍या खेळण्यांपेक्षा या घरातच असणार्‍या साध्या वस्तूंशी ती वेगवेगळ्या प्रकारे खेळते. नजर लागू नये म्हणून तीट लावणं किंवा जिवती वगैरे गोष्टींनाही आम्ही फाटा दिला.
आता जेव्हा रावी नऊ महिन्यांची होईल, तेव्हा आम्हीही नऊ महिन्यांचे पालक होऊ. आमच्या पालकत्वाच्या प्रवासाची नुकतीच कुठे सुरुवात झालीये. आजवरचा हा प्रवास खूप ऊर्जा मागणारा आणि तेवढीच ऊर्जा देणारा असा आहे. ‘मीचि मज व्यालो’ असं जे तुकाराम म्हणतो, त्याचा अनुभव या प्रवासात मला सतत येतो. रांगता येऊ लागल्यापासून रावीला घरभर फिरून कोपरान् कोपरा पाहायचा असतो. पण दरवेळी ते शक्य नसतं. मग ती हट्ट करते, रागावते. आणि मग कधीकधी मलाही राग येतो. तो व्यक्तही होतो. पण पुढच्या काही क्षणांत ती तिचा राग आणि माझं रागावणं विसरून जाते. मग नेहमीच्याच निर्मळपणाने माझ्याकडे पाहून हसते! अशा वेळी मला प्रश्न पडतो, की कोण कोणाला वाढवतं आहे, मी रावीला की रावी मला?
बाबाचं मनोगत: प्रणव सखदेव, लेखक-कवी

बापपणातलं सुख: अजून काय हवं असतं एखाद्या बापाला?

दीड वर्षांपूर्वी मी ऑपरेशन थिएटरबाहेर आतुरतेने वाट बघत बसलो होतो, डॉक्टर बाहेर आले, बाळाचे बाबा कुठे आहेत विचारलं. मी आहे सांगितल्यावर म्हणाले, “अभिनंदन, मुलगी झाली!”
आठ महिन्यांची प्रतीक्षा संपली होती. मला मुलगीच हवी होती आणि झालीही, त्यामुळे काय करू आणि काय नाही असं झालं होतं. बातमी द्यायला पहिला फोन आईला केला. पहिला हुंदका दाबून धरला आणि घरी निरोप दिला. मला खूप भरून आलं होतं, आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. बाप झाल्यावर कळेल, असं घरात बोललं जायचं. तेच अनुभवत होतो. ही भावनाच माझ्या बापपणातल्या सुखाची सुरुवात होती.
तिला बघत राहणं, तिला हातात घेणं, तिला मांडीवर घेऊन बसणं, तिची सर्वतोपरी काळजी घेणं चालू झालं. तिच्याजवळच बसून राहावंसं वाटायचं. चार दिवसाच्या पिटुकलीची नखं मी पहिल्यांदा काढली. तिला नीट पकडण्यासाठी नर्सने दाखविल्याप्रमाणे दुपट्यात गुंडाळणं मला चांगलं जमायचं. ती रडली की हातावर झुलवणं, झोपली की तिच्याकडं बघत राहाणं, उठली की खेळत बसणं चालायचं.
ती कधी एकदा मला ओळखेल, माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपेल, माझ्याकडे येण्यासाठी झेपावेल असं झालं होतं. तेवढं दूध पाजायचं सोडलं तर बाकी तिची सगळी कामं मी एन्जॉय करतो. ती आजारी पडली किंवा अस्वस्थ झाली की खूप गलबलायला होतं, तिचा त्रास बघवत नाही. सध्या तर मला वेळच वेळ असल्याने जमेल तेवढा वेळ तिच्यासोबत घालवतो. बायकोला तिच्या कामानिमित्ताने बाहेर जावं लागत असल्याने बऱ्याचवेळा आम्ही दोघंच घरी असतो. तिला आईची आठवण येणार नाही एवढी काळजी मी घेतो, ती पण फुल्टू एन्जॉय करते. आम्ही दिवसभर मस्ती करू शकतो. हल्ली त्रासही देते पण मी एन्जॉय करतो. बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणारा मी तिच्याबाबतीत पेशन्स ठेवून असतो. बाहेरून आलो की पहिलं तिला बघायचं असतं, तिला जवळ घ्यायचं असतं.
सर्वच बाळांचं पालथ पडणं, उठून बसणं, रांगणं, चालणं, दात येणं, बोलणं त्यांच्या बापासाठी स्पेशल असतं तसं ते माझ्यासाठीही होतं. माझ्या पिल्लाची ही वाढ मी अनुभवली. तिची वाढ बघत असतांना मध्येच खूप टेन्शन यायचं, आपलं पिल्लू मोठ होणार मग आपल्याला सोडून दुसरीकडे जाणार, मग परत विचार यायचा की आपण तिला सोडायचंच नाही, घरजावई करून घ्यायचा असं काही काही. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मला नेहमीच कौतुक वाटतं. आपला फोटो बघून बाबा म्हणून ओळखणं, आपण नसतांना आपली आठवण काढणं हे फार भारी वाटतं. माझ्यासारखी दिसते किंवा माझ्यासारख्याच सवयी/गुण आहेत म्हटलं की अजून भारी वाटतं. सर्वात जास्त भारी कसलं वाटत असेल तर झोपेतून उठली, झोपमोड झाली किंवा अर्धवट झोपेत असेल तर ती बाबा म्हणत उठते किंवा रडते. ही गोष्ट माझ्यासाठी खूपच सुखद आहे. अजून काय हवं असतं एखाद्या बापाला?
आम्ही तिचं नाव ‘रुहा’ ठेवलंय. ‘रूह’ हा उर्दू शब्द आहे, रूह म्हणजे ‘आत्मा’. आमच्या आत्म्याचा एक भाग म्हणा किंवा आमच्या आयुष्याचा आत्माच म्हणा ना. आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर मी मागे पडत असतांना, नैराश्य येत असतांना रुहाच्या निमित्ताने एक नवचैतन्य माझ्या आजूबाजूला सतत आहे. तिला बघून अजून उमेदीनं उभं रहावसं वाटतं. तिच्यासाठी अनेक स्वप्न पाहिली आहेत. बापपणातलं सुख तर ती देतच आहे, बापपणाची जाणीव ठेऊन जबाबदारीही निभावलीच पाहिजे ना..
- रुहाचा बाबा..अर्थात अमित नागरे.

खरी कमाई

बीड जिल्ह्यातल्या स्काऊट गाईडनी आठवड्यात 50 रुपयांची खरी कमाई केली आहे. मुलांमध्ये वेळीच प्लॅस्टिकबाबत जागृती झाली पाहिजे , असं जिल्हा स्काऊट -गाईड कार्यालयाला वाटत होतं. मार्गदर्शन लाभलं राज्य आयुक्त संतोष मानुरकर यांचं. मग प्लॅस्टिक बंदीला पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्हा स्काऊट गाईडनं जुलै महिन्यात प्लॅस्टिक निर्मूलन सप्ताह जाहीर केला. ७८ शाळांमधल्या स्काऊट गाईडनी यात भाग घेतला. मुलांनी घरातल्या, शेजारच्या घरातल्या , गावातल्या प्लॅस्टिक पिशव्या गोळा करायच्या. एक पिशवी एक रुपयाला. मुलांनी ७ दिवसात २७ हजार पिशव्या जमा केल्या. बिस्किटाचे पुडे , चॉकलेट, कुरकुरे अशा खाद्यपदार्थांवरील प्लॅस्टिक आवरणं गोळा केली. शाळेत जमा करण्यात आलेल्या पिशव्या जिल्हा स्काऊट गाईडकडे सुपूर्द करण्यात आल्या.
जुलै महिनाअखेरीला जिल्हा कार्यालयात कार्यक्रम झाला. मुलांनी आपले अनुभव सांगितले. प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ घेतली. मुलांना प्रमाणपत्रं देण्यात आली. खरी कमाईचे धनादेश देण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यावेळी उपस्थित होते. 
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची जाणीव झाली, मुलं हा संस्कार जीवनभर लक्षात ठेवतील, असं मानुरकर यांनी सांगितलं.
मुलांनी जमा केलेल्या पिशव्या सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधणीसाठी देण्यात येणार आहेत.
 - दिनेश लिंबेकर.

Monday, 17 September 2018

माझं बापपण हे दुसरं बालपण होतंय...


मी एक दिवस बाबांना विचारलं, " बाबा, मी जन्मलो तेव्हा तुम्हांला आनंद झाला होता का हो?"
"हो रे," गंभीर चेहरा करत बाबा म्हणाले, "नंतर तुला पाहिलं आणि मी तुझ्या आईला म्हणालो होतो, त्याची आठवण झाली."
"काय ?"
"मी म्हणालो होतो की, यापेक्षा आपण एक चिंपांझी पाळूया. पण तुझी आई ऐकते का कधी?" बाबा करवादून म्हणाले. मला हे बापजन्मी सुचलं नसतं. पण हे डोक्यात आलं ते माओ, माझा ज्येष्ठ पुत्र यानं हा प्रश्न विचारला तेव्हा.
"अरे काय सांगू तुला, भलताच आनंद झाला होता मला."
"का हो बाबा?"
"घरात माझ्यापेक्षा लहान असलेलं कुणीतरी आलं, म्हणून मला आनंद झाला रे."
मी माझ्या आईबाबांचा एकमेव मुलगा असल्यानं मला थोरल्याच्या वाटणीचं जबाबदारीनं वागणं आणि धाकल्याच्या वाटणीचं मार खाणं, अशी दुहेरी जबाबदारी बजावावी लागायची. माओ जन्मल्यापासून माझं धाकटेपण संपलं एकदाचं. आणि आईही 'एका पोराचा बाप झालाय, तरी काडीची अक्कल नाही मेल्याला!' असा उद्धार येताजाता करू लागली.
बालपण गेलं तितक्याच सुखात आता बापपण जातंय. आठेक महिन्यांचा असताना माओ बोलायला शिकला. दीड वर्षांचा झाल्यावर त्याला पूर्ण वाक्य बोलता येऊ लागलं. अडीच वर्षांचा असताना तो
'पुलेपुले चाले माजा घोला,
बगत बशतो बाबा माजा वेला' - अशा स्वयंस्फूर्त कविता करू लागला. साडेतीन वर्षांचा झाला तेव्हा आम्ही त्याला कसंबसं गप्प बसायला शिकवू शकलो होतो. अशा या पोराचा बाप असणं म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगच जणू! फाटक्या पिशवीतून गहू सांडावे, तसे या पोरट्याच्या डोक्यातून प्रश्न पडत असतात. "तेवीस अठ्ठे किती?" हा प्रश्न कुण्या पोरानं बापाला विचारलाय कधी? आमच्या लेकरानं मला विचारलाय. मीही बींच्या कवितेतल्या गरीब बापासारखं (कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करून) उत्तर दिलं होतं.
शाळेत जायला लागल्यापासून तर प्रश्नांच्या जोडीला तुलनाही सुरु झालीय. 'अनिशचे बाबा त्याला सोडायला कारमधून येतात, तुम्ही का येत नाही?' (आता अनिशच्या बापाचं ऑफीसमध्ये लफडं आहे, हेही याला एकदा सांगावं का?) इथंपासून 'शर्मिष्ठाची मॉम शॉर्ट्समध्ये जॉगिंगला जाते, तेव्हा तुम्ही पायजम्यात दूध आणायला का जाता?' इथपर्यंतचे प्रश्न असतात. 'बावळटासारखं तोंड उघडं ठेवून बसू नका!' हे बायकोचं वाक्यही तो शिकलाय. आधीच क्वचित तोंड उघडणारा मी गरीब बाप, अशानं मुकाच व्हायचा. टीव्हीवर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, सिनेमा यापैकी काहीही चालू असलं की, मी बिचारा मान खाली (मोबाईलमध्ये) घालून बसतो - न जाणो पुढचा प्रश्न सप्पकन यायचा. फुटबॉलमध्ये ब्लॅकबेल्ट का नसतात, टेनिसमधला लव्ह कुणाचं कुणाशी असतं, क्रिकेट हाफचड्डी घालून का खेळत नाहीत... वगैरे सोपे प्रश्न ठीकायत. पण सिनेमा सुरु असला तर प्रश्न कुठल्या विषयावरून येईल याचा अजिबात भरवसा नाही. (त्यात हल्लीचे बालपटही फक्त प्रौढांसाठी असणारे वाटतात.) परवा सिनेमाआधी धुम्रपानाची जाहिरात बघून "परवा संध्याकाळी हरीभाऊंच्या टपरीमागं काय करत होतात हो?" असा सवाल केलेला माओनं.
हे प्रश्न विचारणं, तुलना करणं तसंही दुर्लक्ष केल्यानं चालून जातं. पण आपल्या बापाला काडीची अक्कल नाही, अशी दृढ समजूत आजी-आजोबा आणि आईनं त्याच्या इवल्यश्या डोक्यावर कोरलीय. त्याला कशाचीच जोड नाही. प्रगतीपुस्तकावर (ह्याला प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतात- इति माओ) सही करायला मी शाळेत गेलो, तेव्हा मला लिहितावाचता येतं का, अशा नजरेनं हे कार्टं बघत होतं. सही करून होताच थंडपणे 'चुकीच्या कॉलममध्ये सही केलीत बाबा..' असं म्हणाला. शाळेतल्या बाईनंही 'पटलं रे बाबा' अशा अर्थानं त्याच्याकडं बघत मान हलवली.
माओ एकटा असतानाचा बापपणाचा आनंद द्विगुणित झाला, कनिष्ठ चिरंजीव- मिष्का याच्या आगमनानं. त्याची तर, मी त्याचा छोटा भाऊ आहे अशीच समजूत आहे. मला बळजबरीनं अंघोळ घालणं, कपडे घालणं, (उलट्या) चपला घालणं अशी कामं तो मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन करत असतो. बाप म्हणजे आपला खेळगडी (आई घरगडी समजते, ते वेगळं!) असा याचा ठाम समज असल्यानं अल्टामिरा गुहेतल्या अज्ञात चित्रकाराप्रमाणं माझ्या अंगाला कॅनव्हास मानून त्याची चित्रकला बिनदिक्कत सुरु असते. एका दुपारी झोपेतून उठल्यावर मिशीची एक बाजू पिवळी आणि दुसरी निळी दिसल्यावर मी चांगलाच हादरलो होतो. आईला मात्र, लेकराला रंगसंगतीचं ज्ञान चांगलंय याचंच कौतुक!
मनुष्याचं वृद्धत्व हे दुसरं शैशव असं म्हटलं जातं. माझं बापपण हे दुसरं बालपण होतंय, असं हल्ली दिसू लागलंय. परवा एका सिनेमात हिरो-हिरॉईन लगट करू लागले तेव्हा माओ चक्क "बाबा, असले चावट प्रसंग काय पाहताय बावळटासारखे?" असं ओरडला, आणि मिष्का तर... गादी ओली कुणी केली असं विचारल्यावर बेडरपणे माझ्याकडं बोट दाखवून, ‘बाबा’ असं म्हणाला. हे असंच चालू राहिलं, तर दोन्ही पोरं मला पाळण्यात घालून झोके देतील तो दिवस दूर नाही.
बाबाचं मनोगत: ज्युनिअर ब्रह्मे

माझी मुलगी, माझी ऊर्जा


माझी एकुलती एक मुलगी ऊर्जा उर्फ परी. तिचं हे नाव मीचं ठेवलं. कारण तिच्या जन्मानं आमच्या आयुष्याला खर्‍या अर्थानं ऊर्जा मिळाली. जन्म नोव्हेंबर 2008 चा. डोक्यावर काळंभोर जावळं, गाजरासारखा लाल गोरा रंग, ठसठशीत सरळ नाक, इवले इवले नाजूक हातपाय असं ते नाजूक बाळ जेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं तेव्हा माझ्यातला बाप खूप सुखावला होता. 
आज उर्जा दहा वर्षाची आहे. चौथ्या वर्गात शिकत आहे. ऊर्जाचा जन्म होण्यापूर्वी अनेक संकटांनी आमच्या कुटुंबावर हल्ला चढवला होता. पण हे छोटसं पाखरू आमच्या घरात आलं आणि ती सारी दुःख क्षणार्धात तिच्या हसण्यात विरून गेली. तिचं खाणं-पिणं झालं की, तिला खांद्यावर घेऊन तिचा ढेकर काढताना आम्हा दोघांची, घरातल्या प्रत्येकाची उडणारी तारांबळ, रात्री तिच्या अंगावर पांघरूण आहे का ते बघणं, तिला डास तर चावत नाहीत ना, तिला थंडी वाजत किंवा उकडत तर नाही ना... या काळजीनं माझं दचकून जाग होणं..पुढं ती रांगू लागली की, पलंगावरून तर पडणार नाही ना, खालचं काही उचलून तोंडात तर घालणार नाही ना, याची चिंता आणि यातून बायकोला माझ्याकडून वैताग येईल इतक्या दिल्या जाणार्‍या सततच्या सूचना, हे सारं आठवलं की आज हसू येतं. आपण फारच काळजी करायचो, पोरीची असं वाटतं.
आजही शाळेची बस यायला उशीर झाला किंवा पोरगी खेळायला गेली की, उगाच काळजी वाटते. कुठेही कामात असलो की, घरी फोन केला किंवा घरून फोन आला तर पहिला प्रश्‍न ऊर्जा कुठे आहे? तसा माझा स्वभाव बिनधास्त, बेफीकीर. पण माझ्या पोरीचा विषय आला की, मी फार काळजी करणारा बाप होतो. पण आता मात्र मी माझ्या या काळजीच्या स्वभावाला थोडी मुरड घातली आहे. कारण आता जर मी माझ्या मुलीची सतत काळजी करत बसलो, तिला जर सतत नजरेसमोर ठेवलं, तर तिचा विकास होणार नाही. जगात कसं वागायचं, मित्र-मैत्रिणी कसे मिळवायचे, रोज येणारे बाहेरच्या जगातील प्रश्‍न कसे हाताळायचे, या सगळ्याची तिला सवय होणं खूप गरजेचं आहे. तिची बुद्धी खूप तल्लख आहे. ऊर्जाला कोणतंही गाणं, कविता, शब्द सगळं एका झटक्यात लक्षात राहतं. परवा तिला घेऊन औरंगाबादला गेलो, तर तिथले गल्लीबोळातील रस्ते तिला पक्के लक्षात होते. मोबाईल, कॉम्प्युटर यात तर ती मोठ्यांना देखील मार्गदर्शन करत असते.
तिला रोज रात्री एक गोष्ट सांगायची जबाबदारी माझी. गोष्टी ऐकताना अनेक वेळा ती गाढ झोपी जाते. पण, पप्पा गोष्ट, हे तिचं रोज ठरलेलं आणि आवडत वाक्य. अनेक वेळा कामामुळं गोष्ट सांगणं जमत नाही. त्यामुळे आता मी तिला गोष्टीची पुस्तकं आणून दिली आहेत.
ज्या गोष्टींना पर्याय नाही. त्या रडत रडत करण्याऐवजी हसत केल्या पाहिजेत. तर त्या बोअर होत नाहीत. हे तिला शिकवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, आता हे तिलाही कळू आणि वळूही लागलं आहे. हे सगळं करत असताना निसर्गाशी नात तुटणार नाही, याची मी जाणीवपूर्वक काळजी घेतो. मग घरासमोर बाग करणं असो किंवा कधी लव्हबर्ड, मासे पाळणं असो किंवा आठवडयातून एकदा नदीवर, शेतावर, डोंगरावर घेऊन जाणं असो, असे कार्यक्रम मी तिच्यासाठी आवर्जून आखतो.
आमच्या ऊर्जानं मोठं व्हावं हे सगळ्या वडिलांसारखं मलाही वाटतं. पण मोठं होत असताना तिच्यातला माणूस कधी हरवणार नाही. उलट तो अधिक खुलावा हाच माझा नेहमी प्रयत्न असतो.
बाबाचं मनोगत : उन्मेष गौरकर.

बालसंगोपनाची परीक्षा अजब आहे..आम्हाला दोन मुले आहेत - एकोणीस वर्षांचा मुलगा आणि चौदा वर्षांची कन्या. म्हणजे एकूण तेहेतीस वर्षांचा "संगोपन अनुभव". मात्र या अनुभवांती लक्षात आले की पन्नास जन्म घेऊन शंभर मुले वाढवल्यावर कदाचित हा विषय मला उमगू लागेल. कदाचित. कारण आयुष्यात एका ठाम निष्कर्षास मी पोचलो आहे - there is no such thing as a wise old man or a wise old woman. बालसंगोपनाची माझी प्रेरणास्थाने तीन आहेत - श्री अरविंद गुप्ता (http://www.arvindguptatoys.com/), John Holt आणि माझ्या सासूबाई. अनुभवाच्या ठेचा खात आणि प्रेरणास्थानांचे स्मरण आणि काहीसे अनुकरण करून हा प्रवास करत आलो आहे. यशापयशाचे निदान कसे आणि कोण करणार? माझ्या मते ही परीक्षा अजब आहे. तिचा एक निकाल नसतो. इथून पुढे अनेक वर्षे तो निकाल लागत राहील. 
१९९८ साली मुलाचा जन्म झाला. पहिले तीन महिने मजाच मजा. त्या वयाचे मूळ म्हणजे गोंडस खेळणे. त्यासोबत खेळण्यात वेळ कसा जातो कळत नाही. परंतु लवकरच मला असे जाणवले कि उत्तम अन्न, उत्तम खेळणी, कपडे याखेरीज देण्यासारखे आपल्याकडे फारसे काही नाही. तेव्हा वाचनाचा सपाटा लावला. खरे तर थोडा उशीरच झाला होता. पुढचे बारा महिने शंभर पुस्तके वाचली. गांधी व मंडेलांची आत्मचरित्रे, जॉन होल्ट, फ्रान्झ काफ्का, कुरुंदकर, प्रेमचंद, जी . ए, इब्सेन, चेकॉव्ह, हेमिंग्वे ... खूप वाचले, खूप विचार केला. त्याचा एक फायदा मी अनुभवला तो असा - "अमुक चूक, अमुक बरोबर असे मला वाटते. त्याची करणे अशी... तुझं मत वेगळं असेल तर चर्चा करू" अशी संभाषणे मुलांशी लीलया साधता येऊ लागली". त्यातही गम्मत म्हणजे मुलगा अशा संभाषणांसाठी उत्सुक असतो, मुलगी मात्र "बोअर करू नको" सांगून मोकळी होते. तिचा पिंड प्राणी प्रेम आणि विलासी वृत्ती असा आहे. प्राणी प्रेमात मात्र मी माफकच प्रगती करू शकलो हे अपयशात मोजावे लागेल. 
त्यामुळे मुलांच्या सांगोपनाच्या विषयावर उपदेश देण्यास मी स्वतःला असमर्थ समजतो. It is a new battle every day. आणि त्याला "battle" मानण्यात आपण कुठेतरी चुकतो असं वाटत राहतं. पूर्वी म्हणत असत की It takes a village to raise a child. शहरी जीवनात हा विचार संपुष्टात आला आहे. त्या विचारास नवचैतन्य देऊन अंमलात आणले पाहिजे असे वाटते. आपल्या मुलांवरील आपला focus थोडा कमी करून नात्यातील, शेजारातील मुलांत, रस्त्यावरील बालमजुरांत देखील आपण थोडे रमलो तर बालसंगोपनाचा अनुभव आपोआप enrich होईल असे वाटते.
बाबाचं मनोगत: अमलेश कणेकर, इंजिनिअर.

Sunday, 9 September 2018

बाबाचं मनोगत : सुधाकर तिप्पनाकजे. सिनेमॅटोग्राफर.

तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफीच्यावेळी ‘डुगडुग’ आवाज ऐकला आणि नेमकं काय वाटलं ते शब्दात मांडणं अशक्य आहे. बाळाची वार खाली असल्यामुळे बाळाच्या आईच्या हालचालींवर मर्यादा होत्या. घरात आम्ही दोघेच. तोपर्यंत सर्व काम वाटून करत होतो. मग मात्र सर्व कामं माझ्यावर घेतली. तसंही तिचा बराचसा वेळ आणि शक्ती उलट्या करण्यामध्येच जात होती. बाळ पोटात असताना त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात, वगैरे हल्ली बरंच सुरू असतं. पण मी असलं काही नाही केलं. आईचं हे सर्व सुरू असायचं. पण मी सकाळी ऑफिसला निघताना सकाळचा नाश्ता बनवून जायचो. रात्री आल्यावर घरची काम आवरायचो. मधल्या काळात पांढऱ्या रंगांची सुती कापडं आणून दुपटी शिवून घेतली, पांढऱ्या रंगांचीच झबली, लंगोट घेतले. ते 3-4 वेळा धुवून बॅग तयार ठेवली. मुंगी, डास असं काहीही चटकन दिसायला, आम्ही लेक वर्षाची होईपर्यंत, तिला पांढऱ्या रंगाचेच कपडे वापरत होतो.
आमच्या लेकीचं आगमन डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेच्या 20 दिवस आधीच झालं. ‘कामगार दिना’ला आणखी एक कामगार जन्माला आला, असं आम्ही गंमतीनं म्हणतो. सकाळी 6 ला हिला प्रसववेदना सुरू झाल्या. दुपार होत आली तरी वेदना सुरूच. मला जरा टेन्शन येऊ लागलं. फायनली डॉक्टरांनी लेबररूममध्ये घेतलं. मला म्हणाले, तुम्ही हवं तर येऊ शकता आत. मी आत गेलो. बायकोचा हात हातात धरून तिला धीर देणं सुरू होतंच. दुपारी तीनच्या सुमारास लेकीचा जन्म झाला. माझ्या बाळाला या जगात येताना मी पाहिलं. नाळ कापून डॉक्टरांनी बाळाला हातात दिलं. नर्ससोबत लगेच लेकीला स्वच्छ करायला सरसावलो. नर्सनेही मग मला करू दिलं. आमच्या बाळाची पहिली आंघोळ, पहिली शी मीच साफ केली. त्यावेळी ते एवढंसं पिल्लू खरंचं ‘आपलं बाळ आहे’ या विचाराने खूप मस्त वाटत होतं. पॅटर्नल लीव्ह घेऊन पंधरा दिवस घरीच थांबलो. दोन्हीकडील आजीमंडळीची प्रकृतीमुळे फारशी मदत नव्हती. एक बाई ठरवली होती. पण शरण्याचं आगमन लवकर झाल्यामुळे, ती बाई आधीच्या कामात अडकली होती. मग सगळी सूत्र परत हातात घेतली. बाळाला मसाज कसा करायचा, ते बाळाच्या आईने डॉक्टरांकडून शिकून घेतलं. बाकी ऑफिसला जायच्या आधी आणि नंतर बाळ, बाळंतिणीच्या सर्व आघाड्या मी सांभाळत होतो.
घरी असताना सतत तिच्याशी बोलत राहणं, खेळणं सुरू असायचं. तिच्याकरता माझ्याकडे खूप वेळ नसतो. पण मी जेवढा वेळ देतो, तो क्वालिटी टाईम असावा, हे पाहतो. तिला नेहमी कर्नाटकी शास्त्रीय संगीत ऐकवायचो. रांगायला लागली तशी माझ्या मागे सतत असायची. मला घरी यायला कधीकधी रात्री बाराही वाजायचे. पण मी घरी आल्याशिवाय आजही ती झोपत नाही. आईसोबत दिवसभर असायची, पण हाक मात्र मलाच पहिली मारली. तिची पहिली हाक “आssssssप्पाssss” अजूनही माझ्या कानात आहे. शरण्या वर्षाची झाल्यावर तिला आम्ही बोर्डबुक्स आणली. बोटं ठेवून चित्र दाखवायचो. एनिमल प्लॅनेट पाहताना ती प्राण्यांचं पुस्तक घेऊन जो प्राणी दिसायचा त्याचं चित्र दाखवू लागली. आणि मग आमची भटकंती सुरू झाली. आमचं फिरणं हे नुसतीच मजा, असं नसतं. पवनचक्की, धरण, नदी, जंगल, तलाव, भातशेती, ऊसाचा मळा, मुंबई, मंगलोर या गोष्टी तिला अडीच तीन वर्षांची असताना नीट कळायला लागल्या. कशाचा उपयोग काय, कुठून काय मिळतं हे तिला सर्व कळू लागलं. या भटकंतीमुळे तिचा भूगोल चांगला तयार होतोय. विमानापासून, रेल्वे, सरकारी बस आम्हांला फिरायला काहीही चालतं. प्रवासात आणि इतर वेळीही ती सारखे प्रश्न विचारत असते. आणि आम्ही तिला समजेल असं, तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. माझं बालपण खेड्यात गेलं. नारळी पोफळी, आंबे, फणसांच्या वाडीत, ओहोळामध्ये खूप धमाल करायचो. ती मजा तिला नाही घेता येत. पण मग जेव्हा गावी जातो, तेव्हा याच पुरतं उट्ट काढतो.
मी कॅमेरा क्षेत्रात काम करतो. कामाच्या वेळा पूर्वी खूप बदलत्या असायच्या. कधी कधी 15-20 दिवस बाहेरगावीही. दिवसभर मला कितीही फोन करावासा वाटला तरी आप्पा कामात आहे हे समजतं तिला. बऱ्याचदा फक्त ती आणि तिची आईही फिरायला जातात. मग रात्री फोन करून पूर्ण दिवसभराचं शेअरिंग असतं. कामाने कितीही थकून आलो, शरण्याचा आवाज ऐकला, तिला पाहिलं की थकवा कुठच्याकुठे निघून जातो. सर्व बच्चेकंपनीप्रमाणे तिच्यासाठीही तिचा आप्पा सुपरमॅन आहे. आप्पा सोबत असला की तिला खूप सुरक्षित वाटतं. ती चार वर्षांची असताना तिच्या एडेनॉईड्स ग्रंथी काढल्या. एण्डोस्कोपीसारख्या सर्व टेस्टपासून हॉस्पीटलमधून घरी येईपर्यंत शरण्या फक्त माझ्याच कुशीत होती. “तुझ्या कुशीत मला खूप सेफ वाटतं”, असं म्हणत होती. तिचा माझ्यावरचा हा विश्वास आणि तिच्या चाचण्या सुरू असताना माझी होत असलेली घालमेल. प्रचंड अस्वस्थ करणारी. लेकीमुळे मी फार हळवा झालोय, हे नक्की. घरात असलो की, भातुकलीपासून, सर्कस ते सायकल सगळ्यासाठी तिला मीच हवा. आणि मी घरात काहीही काम करत असेन तर मला असिस्टंट म्हणून लगेच ती तयार.
आमच्या लेकीला मातृभाषेसोबत, पितृभाषाही आहे. मी कन्नड आणि माझी पत्नी मराठी. दोन्ही घरांची तिला सारखीच ओढ असावी, म्हणून तिच्याशी आम्ही दोघेही आमच्याआमच्या भाषांमध्ये बोलतो. याचा फायदा झालाच. तिला भाषांची गोडी लागली. आता ती सहा वर्षांची आहे आणि तिला पाच भाषा येतात.
हे सर्व करताना तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, याची जाणीव मी नेहमीच ठेवतो. तिला तिच्या कलाने काही गोष्टी करायच्या असतात. त्यात आम्ही लुडबूड नाही करत. त्यामुळे तिचे काही निर्णय घ्यायला तिच्यावरच सोपवतो. कामामुळे आमची राहण्याची शहरं, घर, शाळा सतत बदलली. पण याची तिने कधी कुरबूर नाही केली. उलट छानपैकी एडजस्ट झाली. तिच्याशी सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलण्यानेच हा फायदा झाला.
बाबाचं मनोगत : सुधाकर तिप्पनाकजे. सिनेमॅटोग्राफर, मुंबई

बाबाचं मनोगत :मुलींच्या रूपाने स्वतःचे बालपण अनुभवले

मी पेशाने पत्रकार. त्यामुळे नेहमी फिरस्ती. महाविद्यालयीन दशेपासून लिहित असलो तरी लग्‍न झाल्यानंतर पूर्णवेळ पत्रकारितेत आलो. एका वर्षात घरात पहिलेच अपत्य जन्माला आले. कन्येच्या रूपाने घरात लक्ष्मी आल्याचे सर्वांनाच आनंद झाला. माझ्यासाठी सुरूवातीची काही वर्षे करिअरच्या दृष्टीने संघर्षाची होती. परंतू मला परभणीत राहून काम करता येत असल्याने पहिली मुलगी साक्षी हिच्या संगोपनातील आनंदाचे क्षण मला पुरेपूर अनुभवता आले. सर्वांची लाडकी असल्याने तिला सांभाळायला आजी-आजोबा, काका होतेच. शिवाय मी व पत्नी अनिता तिची संपूर्ण काळजी घेत असू. लहान असताना तर अक्षरशः रात्रभर जागून पहाटे कधीतरी झोपायचो. बाप म्हणून पार पाडायच्या कर्तव्यांचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नव्याने अनुभवास मिळाली. ती पहिलीत जाईपर्यंत मी सोबत होतो. नंतर मात्र जॉबसाठी मला एकट्याला हिंगोलीत रहावं लागलं. तरीही मी 6 महिन्यांच्या काळासाठी कुटुंबाला सोबत नेलं. त्यानंतर थेट उस्मानाबादला बदली झाल्याने तिकडे एकट्यालाच जावं लागलं. साक्षी आता आठवीत शिकतेय. तिच्या जन्मानंतर पाच वर्षांनी आमच्या घरात दुसरी कन्या सिध्दीचे आगमन झाले. तिचा जन्म परभणीत झाला असला तरी साधारणतः 8 महिने कुटुंब उस्मानाबादला नेल्याने सिध्दीच्या संगोपनात मला पूर्णतः सहभागी होता आलं. अवघ्या 5-6 महिन्यांची असल्यापासून ती खूप गोड हसायची. तिच्या हसण्यामुळेच शेजारी-पाजारी मला ओळखायला लागले. नंतरच्या काळात दारात उभी राहून ती रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना काका म्हणून हाक मारायची.
माझ्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी माझ्या परीने पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. स्वतःचं घर सोडून साधारणतः 9 वर्षे मला कधी एकट्याला तर कधी कुटुंबासोबत भाडेतत्त्वावर परगावी रहावे लागले. मुलींना आंघोळ घालण्यापासून ते गंध-पावडर लावण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी मी अगदी मनापासून केल्या. त्यांच्यासाठी नवनवीन कपडे आणून अगदी बाहुलीप्रमाणे सजवून त्यांना फिरायला नेत असे. त्यांचं हसणं, रडणं, रूसणं, कधी-कधी लाडात येऊन हट्टीपणा करणं या सर्व गोष्टी मला आवडायच्या. माझं बालपण मी त्यांच्या रूपात बघायचो. दिवसाचा पूर्ण वेळ जरी मला त्यांच्यासोबत व्यतीत करता येत नसला तरी जो काही वेळ मला मिळे तो मी त्यांचे लाड करण्यात, त्यांच्याशी खेळण्यात घालवत असे.
मुलींची आबाळ होऊ नये, त्यांना चांगले शिक्षण घेता यावं म्हणून मी बाहेरगावाहून ये-जा करणं पसंत केलं. पण पुन्हा घर हलवले नाही. दोन्ही मुलींचे फोटो काढण्याची मला खूप आवड आहे. लहानपणापासून ते आता तिसरीत जाईपर्यंत सिध्दीचे आणि आठवीत गेलेल्या साक्षीचे अनेक दुर्मिळ क्षण मी कॅमेर्‍यात कैद केले आहेत. सिध्दीला आपणहून दुसर्‍यांशी बोलायला खूप आवडते. तर साक्षीचा स्वभाव याच्या अगदी विरूद्ध आहे. सिध्दी शाळेत घडलेल्या सर्व गोष्टी आधी मम्मीला अन् नंतर मला सांगते. तिच्या अभ्यासातील अडचणी दूर करणं, वही-पेन, चित्रकलेचे साहित्य अशा अनेक गोष्टींना तत्काळ प्रतिसाद मिळत असल्याने ती माझ्यावर जास्तच प्रेम करत असावी. तिचे सर्व हट्ट पुरवताना मी माझ्या बालपणात पुन्हा गेलो आहे असंच वाटत राहतं. दोघींनाही रांगोळी, चित्रकलेची खूप आवड आहे. सिध्दीचे कधी कधी मला फार कौतुक वाटते. बालवाडीपासून अभ्यासात ती अव्वल असते. मी स्वतः पैसे कमवून मोठेपणी विमानाने फिरायला जाणार, मोठमोठ्या पर्यटनस्थळांना भेटी देणार असे जेव्हा ती बोलू लागते ना तेव्हा या छोट्या पिल्‍लाचं मला खूप कौतुक वाटतं. आईपेक्षाही तिला माझाच जास्त लळा आहे. सुटीच्या दिवशी बागेची सैर ठरलेलीच असते. दोन्ही मुली जेव्हा मनसोक्‍त खेळतात आणि तितक्याच चढाओढीने अभ्यास करतात तेव्हा खरोखर मला खूप छान वाटते. आयुष्यात दोघींनाही खूप खूप शिकायचं आहे. खूप कामं करायची आहेत. सुहृदयी बाप म्हणून, मित्र म्हणून मी त्यांच्यासोबत नेहमीच असेन.
बाबाचं मनोगत : बाळासाहेब काळे. पत्रकार, परभणी

Friday, 7 September 2018

बाबाचं मनोगत :रिशान असाच चांगला माणूस रहावा

समाजाभिमुख वकिलीची कल्पना प्रत्यक्षात आणणारे अॅड असीम आणि त्यांच्या पत्नी अॅड रमा सरोदे यांची स्वतःच्या बाळासोबत एक दत्तक मुलं असावं अशी इच्छा होती. पण, घरच्यांचx एकमत झालं नाही. आज त्यांचा मुलगा रिशान १२ वर्षाचा आहे. रिशान शब्दाचा अर्थ आहे - गुड हयुमन बिईंग. 
रिशान माझ्यासोबत माझ्या विविध जाहीर सभांना, वेश्या, अपंग, एचआयव्हीबाधी, कारागृहातले कैदी अशा समाजघटकांच्या कार्यक्रमांना, भारतात आणि ऑस्ट्रेलिया- दुबईतल्या न्यायालयांमध्ये येत असतो. अशा ठिकाणी येण्याचा एक वेगळा प्रभाव त्याच्यावर पडतोच. त्याची विचार करण्याची प्रक्रिया, एखादया विषयावर भूमिका घेण्याची ताकद मला आत्ताही जाणवते. मला कामामुळे ब-याचदा समाजकंटकांकडून धमक्या येतात, जिवालासुध्दा भीती असते. यामुळे रिशानला नक्कीच असुरक्षित वाटतं. अशा वेळी मी त्याला केसेसबद्दल माहिती देतो. चांगलं काम केलं, तरी लोक त्रास देतात हे समजावून सांगतो.
रिशानच्या मनात माझ्या आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या खूप आठवणी असाव्यात असं मला वाटतं. यात खरं तर रमाने आई म्हणून बाजी मारली आहे. रिशानच्या काही आठवणी मला आजही महत्वाच्या वाटतात.
एकदा त्याने मला विचारलं, की टु झीरो व्टेन्टी, थ्री झीरो-थर्टी, फोर झीरो फोर्टी, फाईव्ह झीरो फिफ्टी - तर मग वन-झीरो वन्टी असं आपण का नाही म्हणत? अत्यंत लॉजिकल विचार करणारा हा मुलगा असल्याची त्याने दाखविलेली चुणुक मला सुखावून गेली होती. माझ्यातल्या काही वाईट गोष्टीही त्याच्यात आहेत. उदा - गणिताचा त्याला असलेला कंटाळा. मी त्याला गणिताचं महत्व सांगायला जातो तेव्हा तो सांगतो, “बाबा, अरे जवळपास 85 % मुलांना गणित आवडत नाही. मी काही एकटाच नाही.” यावर काय बोलणार? मी त्याच्या वयात इतका स्मार्ट नव्हतो. कदाचित प्रत्येकच आई-बापाला आपल्या मुला/मुलीबद्दल असंच काहीतरी वाटत असेल.
रमाचे आणि माझे अनेकदा वादविवाद होतात. एकदा रिशानने मला बाजूला नेउन समजावणीच्या सुरात म्हटलं “बाबा, तू जे आईला सांगतोस ते बरोबर असतं. पण ते तू न ओरडता सांगत जा ना!” नंतर मला कळलं की तो असंच रमाशीही बोलला. हा मुलगा तर माझाच बाप आहे, असं मला वाटलं.
रिशानसाठी पुरेसा वेळ देणं योजलं तरी शक्य होत नाही. तरी वेळ काढून मी त्याला बातम्या आवर्जून वाचून दाखवतो. कधी टीव्हीवरील बातम्या बघताना चर्चा करतो. रिशान मुळात चौकस आहे. त्याची स्वतःची अशी मतं असतात. एखादी समस्या असते, तेव्हा तो नक्कीच आम्हा दोघांशी बोलतो.
आपल्या मुलाने खूप पुस्तकं वाचावी असं बहुतेक पालकांना वाटतं. रिशानच्या वाचण्याचा फॉर्म वेगळा आहे. तो व्हिज्युअल वाचनाने म्हणजे गुगल सर्च, यु- टयुबवरील माहीतीपट याने स्वतःला अपडेट ठेवतो. त्याची या वयात सगळयांशी मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती, जनसंपर्क याचं आम्हाला कौतुक आहे. आमच्याकडे येणा-या परदेशातील मुला-मुलींशीसुध्दा रिशान सहज संवाद साधतो.
७ वर्षांच्या रिशानने नागपूर आकाशवाणीने घेतलेल्या मुलाखतीत, अगदी आत्मविश्वासाने वाघांना वाचवा, प्राण्यांना-झाडांना जगू द्या हे पोटतिडकीने सांगितलं होतं. त्याला लिखाणाची, कवितांची, फुटबाँल, स्विमिंग, कुकींग याची आवड आहे. त्याने मोठेपणी वकील बनावं की शेफ की आणखी काही, याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याने एक संवेदनशील आणि काळजी घेणारी व्यक्ती असणं महत्वाचं आहे.
काहीही कारण नसतांना आनंदी राहाण्याचं बालवय रिशानने पार केलं आहे. कारण हल्ली तो अनेकदा ‘बोअर’ होतो. आधी तो खेळणी खेळण्यात मग्न असायचा, वहया-पुस्तकांच्या इमारती करायचा. पण आता तो नेहमी टिव्ही बघतो किंवा मोबाईलवर यु-टयुब बघतो. मला हे आवडत नाही असं त्याला सांगायचं आहे. त्याच्यातील सर्व ताकदीने त्याला जे पाहिजे ते मागतो. अनेकदा इमोशनल करून मागतो. पण मग आम्हालाही त्याला काहीतरी चांगले सांगायचं आहे. ते तो ऐकेल कां? त्याच्या सर्व क्षमता त्याने वापराव्यात, वाचन वाढवावं, सगळं जग पुस्तकातूसुध्दा बघावं असं त्याला पटवुन दयायचं आहे.
आम्हा बाप-लेकाचे खटके उडतात आणि तो रागात मला काही बोलतो. तर मीही अजाणतेपणे माझ्या वडिलांना असंच बोलून गेलो होतो आणि माझ्या बाबांना त्याचं वाईट वाटले असेल, हे मला आता उमजतंय.
एकदा मी आणि रमा आपापल्या कामांसाठी घराबाहेर होतो. रिशानची आजी (डॉ.मंगल)आजारी होती. आम्ही घरी आलो आणि आश्चर्यचकीत झालो. आजीला त्रास होउ नये म्हणून रिशानने अक्षरशः पोळया आणि बाकी स्वयंपाक स्वतः केला होता. बेडवर झोपलेल्या आजीला वस्तू कुठे आहेत, कशानंतर काय करायचं, असं विचारत त्याने स्वयंपाक केला होता. त्याची ही संवेदनशीलता आणि समजदारी नक्कीच महत्वाची आहे. आजीवर त्याचा जीव आहे. आजी आजारी असली की, तिला गरम पाण्यात पाय शेकायला सांगणार, हातपाय चेपून देणार असा त्याचा सेवाभाव. वाटतं की रिशान असाच चांगला माणूस रहावा. समाजातल्या ताकदवान प्रवाहात तो भलतीकडेच वहावत जाउ नये.
आम्ही येरवडा आणि इतर कारागृहांमध्ये मोफत कायदा सहाय्यता, कैदयांची सुटका झाल्यावर त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत करायचो. नव-याचा खून केल्याबद्दल अटक झालेल्या एका बाईला जामिनावर सोडवल्यावर तिनेही काम मागितलं. आपण कुणाला नेहमीसाठी गुन्हेगार समजू नये, प्रत्येकावर विश्वास ठेवावा इत्यादी सांगणं सोपं असतं. कारण तिला आमच्या घरी काम द्यायचं नाही यावर माझी आई, रमाची आई व इतर ठाम होते. लहानग्या रिशानला घरी तिच्यासोबत कसे ठेवायचं, हा मुद्दा होता. पण आम्ही तिला रिशानला सांभाळायचं काम दिलं. ती 2 वर्षे आमच्यासोबत होती. माझा मदतनीस संजय जाधव आमच्या घरातलाच सदस्य. हा रिशानचा संजयकाका. त्याला मी थोडं जरी ओरडून बोललो तरी रिशान माझ्याशी अबोला धरायचा. संजयकाकाला सॉरी म्हण, असं सांगायचा. मला वाटतं, रिशानचा स्वभाव संजयसारखा सेवाभावी व्हावा. रिशानवर परिणाम करणारी अशी अनेक माणसं आहेत. अशा अनेक छान लोकांसोबत तो मोठा झाला आहे.
पुस्तकं वाचून पालकत्व निभावता येत नाही. उलट पुस्तकी पालकत्वामुळे नैसर्गिक वागणं गायब होउ शकतं. जीवनानुभवातून आपलं मूल माणूस म्हणून घडवणं आणि त्याला पाठींबा देणं हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं.
बाबाचं मनोगत : अॅड.असीम सरोदे. मानवी हक्क विश्लेषक


बाबाच्या खांद्यावरून...


"हॅलो बाबा, कसे आहात? तब्येत कशी काय तुमची?" अशी काही प्रश्नोत्तरं.
... काही वर्षांपूर्वी ही जाहिरात बघितली होती. त्यामध्ये नोकरीला लागलेला एक मुलगा परगावी राहायला गेलेला आहे. तो घरी फोन करतो. बाबा फोन उचलतात. ते त्याच्याशी बोलायला तितकेच उत्सुक असतात, पण औपचारीक संवाद साधल्यानंतर तो सहजपणे 'आईला फोन द्या ना' असं म्हणतो. ते आईला फोन देतात आणि मग तो मुलगा तिच्याशी खूप वेळ आणि खूप गप्पा मारतो. बाबांशी गप्पा मारायच्या असतात, हे वळणच नसल्याने असं घडतं.
मुलांना शिस्त लावण्यासाठी, धाक दाखवण्यासाठी, मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात आणि त्याच्या हातून चुका घडू नयेत यासाठी पूर्वीच्या बाबाकडे सोपवलेली ही एक जबाबदारी असायची. त्यामुळे बाबा एक अंतर ठेवायचे. त्याचं कदाचित मनातून काही बाबांना वाईट वाटत असेलही. परंतु हे वास्तव बाबांनी स्वीकारलेलं होतं.
आताच्या काळातला बाबा मात्र बदललेला दिसतो. एक नुकताच घडलेला प्रसंग. सचिन आणि सुगंधा यांची पहिलीतली लेक शिवानी. शिवानीचं आईशी खूप छान नातं आहे, याचा आनंद
सचिनला आहे. पण लेक आईशी जेवढं बोलते तेवढं माझ्याशी बोलत नाही, ही खंतसुद्धा त्याच्या मनात आहे. आता जर बाबा अशी खंत करायला लागला असेल, तर ती किती चांगली गोष्ट आहे. आपला बाबा बदलायला लागला आहे हे खरं !
बाबाने बदलायला हवंच आहे. आपल्या भारतीय घरामध्ये एक गोष्ट हमखास घडते. ती म्हणजे बाळाच्या आसपास आई, आजी अशा स्त्री वर्गाचा गराडा जास्त असतो. विशेषतः दोन्ही आज्या. यात नव्या आईला तिच्या जबाबदाऱ्या शिकवल्या जातात, पण नव्या बाबाला मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं. बाबाला त्रास नको, त्याला जमणार नाही, असंच म्हटलं जातं. काही घरांमध्ये तर, या नव्या बाबाला त्याची आई सांगते की, 'तू कशाला करतोयस? तुझ्या बायकोला करूदे.' अशा, नव्या बाबाला काम करण्यापासून वाचवणार्‍या आज्यांच्या हे लक्षात येत नाही की, यात बाबाचंच नुकसान आहे. बाबा आणि बाळ यांच्यात पुरेसा बंध निर्माण होणं हे ही तितकंच गरजेचं. नाही का?
एका संशोधनातून असं दिसून आलेलं आहे की बाळाचे सामाजिक संबंध सुधारणं, वाढवणं आणि टिकवणं यासाठी बाबाशी असलेल्या जवळीकीची मदत होते. याची सुरुवात कधीपासून व्हायला हवी? तर अगदी जन्मापासून. बाळाला हाताळणं, त्याची सगळी कामं करणं आणि मुख्य म्हणजे बाळाशी बोलणं हे सगळं बाबांनी वेळ काढून करायला पाहिजे. वय वर्ष 0 ते 2 हा बाळाच्या आयुष्यातला फार महत्वाचा वेळ असतो. या वयात आईएवढाच बाबाही मुलांच्या आसपास राहिला तर. मुलांच्या मेंदूविकासासाठी ते खूपच छान! थोडं मेंदूच्या भाषेत बोलायचं तर बाबाचा आवाज, त्याचा स्पर्श, केलेली गंमत याविषयीचे बाळाच्या मेंदूतले न्यूरॉन जुळतील. मग बाबांशी पण भरपूर गप्पा मारता येतील. जाहिरातीतल्या त्या बाबासारखं होणार नाही. याची सुरुवात बाळांच्या जन्मापासून किंवा शक्य तितक्या लवकर करायला हवी.
बाबाची भूमिकाच फार स्पेशल असते. एखाद्या खूप गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर सहजपणे बाबा स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतो. तेव्हा त्या लेकराला इतर सर्वांपेक्षा उंच असल्याचा आभास होतो. इतर कोणाहीपेक्षा आपल्याला जास्त दिसतं आहे, इतर कोणाहीपेक्षा आपण आता खूप आनंदात आणि मजेत आहोत, आत्ता आपणच 'भारी' आहोत, एका भक्कम खांद्यावर आहोत, आपल्याला कोणाचा तरी आधार आहे, ही सगळी जाणीव मुलांना होत असते. ही जाणीव बाबाच करून देणार, दुसरं कोण? 

- डॉ. श्रुती पानसे, बालमानसतज्ञ

बाबाचं मनोगत :माझ्या पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो..

बालकाचे घरात आगमन झाले की, त्याचे साऱ्या घरादाराला कौतुक. बाळाची आई, आई होण्याचा आनंद लपवू शकत नाही; पण तेवढाच आनंद बापाला होत असतो. मी हा आनंद अनुभवला आहे. बालकांची बालवयात आईएवढी काळजी बापही घेत असतो, ती मी घेतली आहे. मी आदर्श बाप म्हणून बाळांची काळजी घेतली, त्याचे समाधान महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे पहिल्यांदा मुलीचा बाप झाल्याच्या आनंदाने मी सुखावलो, तो मी कसाच लपवू शकलो नाही.
आमच्या खेड्यात प्लॉनिंग वगैरे काही नसतं. लग्नानंतर लगेच वर्ष- दोन वर्षात बाळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते. पहिली दोन-तीन वर्षे लोटली की उपचाराची घाई होते. माझं लग्न झाल्यानंतर बराच काळ म्हणजे अगदी आठ वर्ष बाळाची वाट पहावी लागली. आठ वर्षानंतर मुलगी झाली, पुन्हा चार वर्षाने मुलगा झाला.
घरात लहान मूल असलं की बापाला काळजी असते. दिवसभर कामासाठी बाप अन्यत्र
असला तरी लक्ष घराकडे असते. तीन-चार वर्ष वयापर्यत मुलांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी, या वयात बौध्दिक वाढ होण्यासाठी बाप काळजी करतो. घरात लहान लेकरं असली की ते गोकुळ असतं. घरातल्या गोकुळाचं सुख मी अनुभवलं आहे. लहान लेकरांच्या हट्टाने व्यसनमुक्त होण्याचं सुख मिळवणाराही मी कदाचित अपवादात्मक बाप असेल.
पोरांच्या सांगण्यामुळे मी व्यसनमुक्त झालो. त्यालाही आता चार वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला. मला आता त्याचा अभिमान वाटत आहे.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या मागास तालुक्या्तील कोळवाडी हे माझं मूळ गाव. गावं नव्हे, खेडं. इथली चार-दोन पुढारलेली माणसं सोडली तर सारी कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर, बांधकामावर जाणारे मजुर. अर्ध्याहून अधिक लोक ऊसतोड कामगार. माझं कुटुंबही त्यातलं. माझ्या आईवडीलांनी तब्बल पंचवीस वर्ष ऊस तोडायचं काम केलं. मी थकलेल्या आजी-आजोबांसोबत गावी रहायचो. सुटीच्या दिवशी शिरुर कासारच्या बाजारपेठेत असलेल्या अशोक गणपत भांडेकर यांच्या हॉटेलात काम करायचो. त्यातूनच शाळेसाठी लागणारा खर्च भागायचा. ग्रामीण भागातील कष्टकरी माणसं व्यसनाच्या आहारी जातात. सर्वाधिक तंबाखू खाल्ली जाते. ग्रामीण बाजारात अगदी किलोने त्याची खरेदी होते. अलिकडच्या काळात तंबाखुसह मावा, गुटखा खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.
माझंही तसंच झालं. शाळा शिकताना हॉटेलचं काम सोडून बांधकामावर मजुर, वाळूचे टॅक्टचर भरायला जायला लागलो. याच काळात, वयाच्या पंधराव्या वर्षी नकळत मला तंबाखुचं व्यसन लागलं. बघता- बघता तंबाखु, माव्याच्या आहारी गेलो. पुढे पत्रकारितेत आलो. समाजिक कामात झोकून दिलं. मात्र हे व्यसन सुटत नव्हतं.
माझ्या घरात फक्त मीच तंबाखुच्या पूर्णपणे आहारी गेलेलो. वडीलांनीही अनेक वेळा मला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला. मी तंबाखु, माव्याला सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मला सोडत नव्हती.
मुलगी शिवानी, मुलगा मेघराज आणि पत्नी शारदा यांनी मला व्यसनमुक्त करण्याचा चंगच बांधला. चार-पाच वर्षांची लेकरं मला तंबाखू खाण्याबाबत डिवचत, माझा रागराग करत. पोरांच्या बोलण्याचा राग येई. त्यांच्या सततच्या आग्रहाने एकदा इतका राग आला की खिशातील तंबाखुची, माव्याची पुडी फेकून दिली. १९९४ साली वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी लागलेलं व्यसन पोरांमुळे २०१४मध्ये म्हणजे वीस वर्षांनी सुटलं. माझे सहकारी अचंबित झालेच.
कितीही प्रयत्न केले तरी सहजपणे कधीच न सुटणारी तंबाखु सोडून एक वर्षांचा काळ लोटल्यावर मात्र सगळ्यां सहकाऱ्यांनी मिळून माझं कौतुक केलं.
मी व्यसनमुक्त होऊन आता चार वर्षाचा काळ लोटतोय. आता आमच्या बापलेकरांत वेगळंच मैत्रीचं नातं निर्माण झालय. पोरगी मुद्दामहून विचारते, “पप्पा तंबाखू खाल्ली काय?” मी उत्तर देतो, “नाही खाल्ली अन्‌ खाणारही नाही.” आमच्यात झालेल्या मैत्रीच्या नात्याचाही मला अभिमान वाटतो. खरं म्हणजे केवळ पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो.
बाबाचं मनोगत : सूर्यकांत नेटके.

बाबाचं मनोगत:तुलसीसोबत असताना नो मोबाइल, नो टिव्ही..तुलसी, कधी मला शाळेतले किस्से सांगते तर कधी दोन चार कथा एकत्र करून तिने तयार केलेली रिमिक्स कथा ऐकवते. मागच्या आठवड्यात तर तिने चक्क एक कथा लिहिली आणि नंतर ती चित्र स्वरुपात आकाराला आणली. तिला हे अवघ्या तिसरीत असताना कुठून आणि कसं सुचतं? असा विचार मी नेहमी करतो. आणि तिच्या सहवासाचा आनंद घेतो. 
तुलसीचा अभ्यास घेण्यात आणि तिला बहुअंगी बनविण्यात तिच्या आईचा आणि माझे आई-वडील, बहीण, भाऊ यांचा मोठा वाटा आहे. मी पत्रकार असल्याने कामाची निश्चित वेळ नाही. ‘बातमी तिथे आम्ही’ असं सूत्र असलं तरी माझा उर्वरित वेळ हा तुलसीसाठीच ठरलेला. मग कधी माझ्या मित्रांसोबत तिच्या भेटीगाठी तर कधी तिच्या मैत्रिणींना भेटायला जाणं हे ठरलेलं. बऱ्याच वेळेला तर न ठरवता आम्ही दोघं धुळे शहरात नाहीतर महामागार्वर किंवा शेत-शिवारात फिरायला निघून जातो.
तुलसी म्हणते, माझं सर्वात अधिक आणि तत्काळ ऐकणारी व्यक्ती म्हणजे माझे पप्पा. (म्हणजे मी!). अभ्यासातल्या अडचणींतून मार्ग कसा काढायचा, हे मी तिला सांगतो. अन्यथा अभ्यासाव्यतिरिक्त विषयांवर आमच्या गप्पा खूप रंगतात. सध्या तर ती नवं नवे चुटकुले मजेत सांगते. या सर्व आनंदात मात्र तिला पैशाची बचत केली पाहिजे, हे वयाच्या मनाने लवकर कळायला लागलं, याचं दुःख मला आणि माझ्या पत्नीला सलतं. पण असो, हे सर्व ती माझ्यासोबत मनमोकळेपणे बोलते, माझ्यासोबत रमते, हे मी तिला दिलेल्या ‘क्वालिटी’ वेळेमुळेच असावे. तिच्यासोबत असताना नो मोबाईल, नो टीव्ही! आपल्या मुलीकडून असे किस्से, कहाण्या ऐकण्याची मजाच काही और असते. 
तुलसी, शाळेत जायला लागली, त्याआधीच्या दिवसांत मी तिच्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. सुरुवाती्ची दोन वर्ष तर मीच दिला शाळेत सोडायला आणि आणायला जात होतो. त्यावेळी मी तिला सांगितलेल्या गोष्टींची आज मला ती परतफेड करत आहे. या कथा ‘तिच्या’ रंगात रंगल्या आहेत आणि हाच 'ति'चेपणा मला बापपणाचा आनंद देतो. आज कदाचित काही गोष्टी ती मला सांगत नसेलही. मात्र काळाबरोबर आम्ही बापलेक आणखी पक्के मित्र बनू असं वाटतं. 
बाबाचं मनोगत
: प्रशांत परदेशी. 

बाबाचं मनोगत:आमच्या ‘संगोपन विद्यापीठा’ची कधी कधी तीही ‘कुलगुरू’ असते!

माझ्या आयुष्यातल्या दोन मुलींनी गेल्या चार वर्षांत माझ्यातल्या ‘भारतीय पुरुषी परंपरे’त लहानाचा मोठा झालेल्या ‘पुरुषा’ला छान ‘माणसाळवलं’ आहे. बायको, भाग्यश्री. आणि आमची मुलगी, मुद्रा.
आम्ही आई-बाप होणार आहोत, ही ‘गूड न्यूज’ समजली, तेव्हापासून मला आमच्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट करण्याची मोहीम बायकोनं उघडली. खरं सांगू का, मूल बायकोच्या पोटात होतं. त्यामुळे ती ते प्रत्यक्ष अनुभवत होती. मी अतिशय उपरा होतो.
शेवटी तो दिवस आला. नुकतंच माणसांच्या जगात प्रवेश केलेली, लुकलुकत्या नजरेनं पाहणारी आमची मुलगी माझ्या हातात दिली गेली. त्या क्षणापासून माझा ‘बाप’ म्हणून नवा जन्म सुरू झाला. मी मोहरून गेलो. सारखं मुलीला हातात घ्यावंसं वाटत होतं. इतर काहीच करावंसं वाटत नव्हतं. कशातच लक्ष लागत नव्हतं. असा बदल कसा घडून आला किंवा येतो, याचं कोडं मला आजही सुटलेलं नाही.
तसं २०१६ हे वर्षंच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. मी मुद्रित माध्यमातील पत्रकारितेतून ऑनलाईन पत्रकारितेत गेलो. मला घरूनच काम करता यायला लागलं. याचा परिणाम असा झाला की, मी पूर्णवेळ पालक झालो. (आणि बायकोही घरूनच काम करत असल्यानं तीही).
यामुळे आम्हा दोघांपैकी एकजण तिला एका वेळी सांभाळतो, तर दुसरा ऑफिसचं काम किंवा घरकाम करतो. बायकोचा तिच्या भाचरांना सांभाळण्याचा समृद्ध पूर्वानुभव, आमच्या डॉक्टरांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि आमचं तारतम्य, एवढ्याच भांडवलावर आमचं ‘संगोपन विद्यापीठ’ आकाराला आलं आहे.
मुद्रा आता पावणे दोन वर्षांची आहे. सुरुवीतापासून तिची दुपटी बदलणं, सू-शी धुणं, तिला कपडे घालणं, अशी कामं मी आनंदानं करत आलो. ती सहा महिन्यांची असल्यापासून पुस्तक उघडून तिला चित्रं पाहण्याची सवय लावल्यामुळे ती कुठलंही पुस्तक काळजीपूर्वक उघडते, उचलते. ती तिच्या घरच्या गोष्टीच्या पुस्तकाची पानं कधीकधी फाडते. आम्हीही तिला फाडू देतो. पण हा प्रकार ती कधीच पुस्तकाच्या दुकानात करत नाही.
एरवी आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी मुलीला हव्या असतात. त्यात ती खूप वेळ रमून जाते. ती दिवसातून शंभर वेळा तर्कविसंगत वागते-बोलते. निष्फळ कृती करते आणि निरर्थक बडबडही. आणि त्यात मीही सामील व्हावं असा तिचा हट्ट असतो. तिच्यासाठी हे सारं महत्त्वाचं आहे आणि गरजेचंही. त्यामुळे त्यांच्याकडे उदारपणे पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं. माझा हा ‘आध्यात्मिक’ प्रवास केवळ मुलीमुळेच होऊ शकला.
काही महिन्यांपूर्वी, ती नऊ-साडेनऊला झोपेतून उठली की, रात्री तिच्यासोबत झोपलेला तिचा बाबा तिला दिसत नसे. मग ती झोपेतून उठल्यावर पहिला प्रश्न आईला करी – ‘बाबा?’ मग मी जाऊन तिला ‘भॉक’ करी. मग ती खूश होई.
मुलीला प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघंही लागतो. आमच्या दोघांपैकी कुणीही नजरेआड झालेलं चालत नाही. ती लगेच जो दिसत नाही, त्याच्या नावानं धावा करते.
सुरुवातीला आंघोळ केल्यानंतर मुलगी केस पुसताना खूप रडायची. मी ते काम माझ्याकडे घेतलं आणि केस पुसण्याची पद्धत बदलली. त्याचा योग्य परिणाम होऊन मुलीचं केस पुसताना रडण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत बंद झालं. आंघोळ करताना तिला डोक्यावर पाणी टाकलेलं अजिबात चालायचं नाही. मग मी आंघोळ करताना कसा डोक्यावर पाणी टाकतो, डोक्याला साबण लावतो आणि डोकं धुतो हे तिला दाखवलं. त्यामुळे हळूहळू तिची भीती कमी झाली. ती आता डोळे बंद करून छान डोकं धुवू देते. आणि मीही तिच्या डोळ्यात चुकूनही साबण जाऊ न देता तिचं डोकं धुतो. आंघोळ झाल्यावर ती टबात बसून खेळते आणि मी बाथरूमच्या दारात बसून तिच्याशी गप्पा मारतो. हा खेळ तिला खूप आवडतो. खेळून झाल्यावर तिचं अंग पुसायचं कापड कधी साडीसारखं, कधी बौद्ध भिक्कूसारखं, कधी धोतरासारखं नेसून ते आधी आईला दाखवायचं आणि मग अंग पुसून कपडे घालायचे असा आमचा ठरलेला कार्यक्रम असतो.
आमच्या बेडरूमची एक संपूर्ण भिंत पुस्तकांनी भरलेली आहे. काचेच्या पारदर्शक कपाटांतून दिसणाऱ्या पुस्तकांविषयी तिला आकर्षण निर्माण व्हावं, यासाठी मी काही पुस्तकं समोरून दिसतील अशी ठेवली. त्यामुळे आमची मुलगी त्यावरील चित्रं ओळखायला शिकली. विनोदकुमार शुक्ल, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, नाना पाटेकर, मॅनेजर पांडेय, अमर्त्य सेन, हिटलर या लेखकांची नावं सांगून ती पुस्तकं ओळखायला तिला आम्ही शिकवलं. हल्ली ती वर्तमानपत्रातली चित्रं ओळखायला लागली आहे.
माझ्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती बोलायला लागली, तेव्हा सर्वांत पहिल्यांदा ‘बाबा’ म्हणायला लागली. अजूनही दिवसभर तिचं सतत ‘बाबा, बाबा’ चालू असतं. तिला प्रत्येक वेळी, प्रत्येक खेळात आणि प्रत्येक गोष्टीत बाबा हवा असतो. कधी कधी त्याचा राग येतो, कंटाळा येतो, वैतागही येतो. पण पोर एवढुशी. बरं तिला रागावलं की, ती एवढुसं तोंड करून रडते. ते पाहवत नाही. मग तिला प्रेमानं जवळ घ्यावं लागतं.
विशेषत: ती आजारी पडते तेव्हा तिचा मलुल चेहरा पाहवत नाही. तिला होणारा त्रास सहन होत नाही. जीवाची तगमग होते. तिला कधी एकदाचं बरं वाटेल असं होतं. अशा वेळी तहान-भूक, झोप, कामाचं शेड्यूल सगळं काही बिघडतं. पण आपल्या मुलीला लवकर बरं वाटावं ही एकमेव गोष्ट इतर कशाहीपेक्षा मोठी वाटते.
हल्ली आम्हा दोघांचा एक नवीन आवडता खेळ आहे. ती वेगवेगळ्या अॅक्शन करते. त्यानुसार मी त्या करतो. मी त्या कृती न चुकता करू लागल्यावर ती आता विचार करून करून वेगवेगळ्या गोष्टी करते आणि त्या तशाच मी करतो की नाही ते पाहते. अर्थात आमच्यातल्या उंचीच्या फरकामुळे कधी कधी मी तिच्या परीक्षेत नापासही होतो. तेव्हा ती मला उदार मनानं माफ करून दुसरी अॅक्शन करायला सांगते.
तिला अजून पूर्ण वाक्यं बोलता येत नसली तरी आम्ही दोघं नवरा-बायको काय बोलतो, हे तिला बरोबर कळतं. किंवा तिच्यासमोर एखादी कृती केली की, ती कृती ती न चुकता करते. त्यामुळे हल्ली मला आणि बायकोला विचार करून किंवा इंग्रजीत बोलावं लागतं. (तिला इंग्रजी समजायला लागेल त्या दिवसापासून आम्हाला नवीन भाषा शिकावी लागेल किंवा एखादी ‘क’ची भाषा.) कृती तर फारच सावधपणे कराव्या लागतात.
आम्ही जसं तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, तसंच तीही आम्हाला शिकवते. तिला हवं ते आमच्याकडून करून घेते. विशेषत: माझ्याकडून. तेही हट्ट करून, खोटं रडून, गळ्यात पडून. त्यामुळे हल्ली आमच्या ‘संगोपन विद्यापीठा’ची कधी कधी तिची आई कुलगुरू असते, कधी कधी मी असतो; तर कधी कधी तीही असते.
मुलीमुळे माझ्या स्वभावाची, ‘पुरुषीपणा’ची बरीचशी टोकं बोथट झाली आहेत. मी बाप झाल्यापासून इतरांचा जास्त विचार करणारा, जास्त समजूतदार आणि मुख्य म्हणजे हळवा, संवेदनशील आणि उदार झालोय. 
 राम जगताप, संपादक, www.aksharnama.com