Friday 21 September 2018

जरबेरा फुलाने उपळ्याला दिली २५ देशात ओळख

उस्मानाबादपासून १० किलोमीटर अंतरावरील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचं उपळा गाव. उस्मानाबाद तालुक्यातल्या उपळा गावाच्या नावापुढे ‘माकडाचे’, असा उल्लेख आढळतो. अर्थातच गावात माकडांची मोठी संख्या होती. कालांतराने माकडे निघून गेली. मात्र, गावकऱ्यांनी ओळख टिकवण्यासाठी विकत माकडे आणली. याच गावाची ही आगळी गोष्ट. गावाचं अर्थकारण बागायती शेतीवर अवलंबून आहे. फुलशेती, द्राक्ष, पपई बागा, ऊस, अशा पिकांमुळे शिवार हिरवागार दिसतो.
उस्मानाबादजवळच्या शिंगोली शिवारात २००५-०६ मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जरबेराची फुलशेती उभी राहीली होती. यातील यशानंतर तरूणांनी स्वत:च्या शेतात प्रत्येकी १० गुंठ्यावर जरबेराची शेती उभारली. त्यातही यश आल्यानंतर तरूणांनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांना या व्यवसासाठी प्रोत्साहित केले. उपळ्याचे मनोज पडवळ यांनीही गावातील शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी मार्गदर्शन केले. कमी क्षेत्र, नगदी पैसा, या सूत्रामुळे पाहता पाहता अनेक शेतकरी या व्यवसायात उतरले. या यशातून सुरू झालेला फुलशेतीचा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित राहीला नाही तर जगाभरात २५ देशापर्यंत पोहोचला. उपळ्यात २००९ मध्ये अवघ्या १० गुंठ्यावर उभारलेल्या जरबेरा फुलशेतीचा विस्तार सुमारे १३ एकरपर्यंत पोहोचला. गावातील १०० वर शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात १० गुंठे व त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पॉलिहाऊसमध्ये जरबेराची फुलशेती सुरू केली. हैद्राबाद, दिल्ली, नागपूर, सोलापूर, पुणे, मुंबई, अशा शहरात फुलांची विक्री सुरू झाली. त्यानंतर जरबेरा फुलांच्या उत्पन्नात विक्रम केल्यामुळे पोर्तुगालच्या जरबेरा कंपनीने उपळा नावाची फुलाची स्वतंत्र जात विकसित केली. या फुलाचे नामकरण पाळणा हलवून करण्यात आले. आता या फुलांचे उत्पादन जगभरातील २५ देशात सुरू असून, वाणाच्या रूपाने गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.
विवाह समारंभ, उत्सव काळात सुमारे १५ ते १७ रूपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा फुलांकडे ओढा वाढत गेला. मात्र समारंभ-उत्सावाचा हंगाम संपल्यानंतर फुलांचे दर कमालीचे खाली येत होते. या काळात फुलांची मागणीच येत नसल्याने शेतकऱ्यांना फुले उकिरड्यावर टाकून द्यावी लागत होती. अलीकडच्या काळात फुलांच्या दरातील चढउताराचे व्यवस्थापन न पेलवल्याने शेतकरी हताश झाले. भावातील घसरण आणि उत्सव काळातील मिळणारा भाव, याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांनी हळहळू फुलशेती मोडायला सुरूवात केली आहे. मात्र, देशातील प्रमुख शहरासह परदेशापर्यंत पोहचलेल्या जरबेरामुळे उपळा गावाची वेगळी ओळख झाली.
महाराष्ट्रात जरबेरा फुलशेतीमध्ये उस्मानाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यात उपळ्यात सर्वाधिक १३ एकर जरबेरा असल्याने राज्यात सर्वाधिक उत्पन्न घेणारे गाव म्हणून उपळ्याची ओळख झाली होती. आता मात्र गावात २ एकरवरच फुलशेती उरली आहे.
पोर्तुगालच्या मोन्टी प्लान्ट कंपनीने जरबेरा उत्पादनात आघाडीवर गेलेल्या उपळा गावाचा इतिहास शोधला. या वातावरणात अधिक दर्जेदार आणि टिकाऊ फुले येत असल्याने शेतकरी या उत्पादनाकडे अधिक प्रमाणावर वळत असल्याचे कंपनीच्या निरिक्षणातून समोर आले. त्यानंतर कंपनीने उपळा आणि पाडोळी या दोन गावांच्या नावावर जरबेरा फुलांच्या दोन जाती विकसीत केल्या. या वाणांचा पाळणा हलवून नामकरण सोहळा पाडोळी(ता.उस्मानाबाद) येथे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी पार पडला. विशेष म्हणजे या नामकरण सोहळ्यासाठी खास पोर्तुगालवरून मोन्टी प्लान्ट कंपनीचे सीईओ डेव्हिड यार्कोनी आले होते. त्यांनी उपळ्यातील शेतकऱ्यांचे मेहनतीबद्दल तोंड भरून कौतुक केले होते.
सध्या मात्र उपळ्यातून जरबेरा हद्दपार होत असला तरी देशातील विविध राज्यांसह पोर्तुगाल, जपान, कोलंबिया, अशा जगभरातील २५ देशात उपळा जातीचे वाण पोहोचले असून, हे वाण अत्यंत दर्जेदार आहे, असे मोन्टी प्लान्ट कंपनीचे राज्य व्यवस्थापक धनंजय कदम यांनी सांगितले.
उपळ्याने जरबेराकडे पाठ फिरवली असली तरी जिल्ह्यातील पाडोळीसह अन्य भागात जरबेरा फुलशेती वाढतच आहे. जिल्ह्यात एकूण ५५ एकर क्षेत्रावर जरबेराची फुलशेती आहे. हंगाम संपल्यानंतर काही दिवस तोटा सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हंगामात फुलाला चांगला दर मिळतो, असे तरूण शेतकरी मनोज पडवळ सांगतात.
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment