Sunday 9 September 2018

बाबाचं मनोगत : सुधाकर तिप्पनाकजे. सिनेमॅटोग्राफर.

तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफीच्यावेळी ‘डुगडुग’ आवाज ऐकला आणि नेमकं काय वाटलं ते शब्दात मांडणं अशक्य आहे. बाळाची वार खाली असल्यामुळे बाळाच्या आईच्या हालचालींवर मर्यादा होत्या. घरात आम्ही दोघेच. तोपर्यंत सर्व काम वाटून करत होतो. मग मात्र सर्व कामं माझ्यावर घेतली. तसंही तिचा बराचसा वेळ आणि शक्ती उलट्या करण्यामध्येच जात होती. बाळ पोटात असताना त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात, वगैरे हल्ली बरंच सुरू असतं. पण मी असलं काही नाही केलं. आईचं हे सर्व सुरू असायचं. पण मी सकाळी ऑफिसला निघताना सकाळचा नाश्ता बनवून जायचो. रात्री आल्यावर घरची काम आवरायचो. मधल्या काळात पांढऱ्या रंगांची सुती कापडं आणून दुपटी शिवून घेतली, पांढऱ्या रंगांचीच झबली, लंगोट घेतले. ते 3-4 वेळा धुवून बॅग तयार ठेवली. मुंगी, डास असं काहीही चटकन दिसायला, आम्ही लेक वर्षाची होईपर्यंत, तिला पांढऱ्या रंगाचेच कपडे वापरत होतो.
आमच्या लेकीचं आगमन डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेच्या 20 दिवस आधीच झालं. ‘कामगार दिना’ला आणखी एक कामगार जन्माला आला, असं आम्ही गंमतीनं म्हणतो. सकाळी 6 ला हिला प्रसववेदना सुरू झाल्या. दुपार होत आली तरी वेदना सुरूच. मला जरा टेन्शन येऊ लागलं. फायनली डॉक्टरांनी लेबररूममध्ये घेतलं. मला म्हणाले, तुम्ही हवं तर येऊ शकता आत. मी आत गेलो. बायकोचा हात हातात धरून तिला धीर देणं सुरू होतंच. दुपारी तीनच्या सुमारास लेकीचा जन्म झाला. माझ्या बाळाला या जगात येताना मी पाहिलं. नाळ कापून डॉक्टरांनी बाळाला हातात दिलं. नर्ससोबत लगेच लेकीला स्वच्छ करायला सरसावलो. नर्सनेही मग मला करू दिलं. आमच्या बाळाची पहिली आंघोळ, पहिली शी मीच साफ केली. त्यावेळी ते एवढंसं पिल्लू खरंचं ‘आपलं बाळ आहे’ या विचाराने खूप मस्त वाटत होतं. पॅटर्नल लीव्ह घेऊन पंधरा दिवस घरीच थांबलो. दोन्हीकडील आजीमंडळीची प्रकृतीमुळे फारशी मदत नव्हती. एक बाई ठरवली होती. पण शरण्याचं आगमन लवकर झाल्यामुळे, ती बाई आधीच्या कामात अडकली होती. मग सगळी सूत्र परत हातात घेतली. बाळाला मसाज कसा करायचा, ते बाळाच्या आईने डॉक्टरांकडून शिकून घेतलं. बाकी ऑफिसला जायच्या आधी आणि नंतर बाळ, बाळंतिणीच्या सर्व आघाड्या मी सांभाळत होतो.
घरी असताना सतत तिच्याशी बोलत राहणं, खेळणं सुरू असायचं. तिच्याकरता माझ्याकडे खूप वेळ नसतो. पण मी जेवढा वेळ देतो, तो क्वालिटी टाईम असावा, हे पाहतो. तिला नेहमी कर्नाटकी शास्त्रीय संगीत ऐकवायचो. रांगायला लागली तशी माझ्या मागे सतत असायची. मला घरी यायला कधीकधी रात्री बाराही वाजायचे. पण मी घरी आल्याशिवाय आजही ती झोपत नाही. आईसोबत दिवसभर असायची, पण हाक मात्र मलाच पहिली मारली. तिची पहिली हाक “आssssssप्पाssss” अजूनही माझ्या कानात आहे. शरण्या वर्षाची झाल्यावर तिला आम्ही बोर्डबुक्स आणली. बोटं ठेवून चित्र दाखवायचो. एनिमल प्लॅनेट पाहताना ती प्राण्यांचं पुस्तक घेऊन जो प्राणी दिसायचा त्याचं चित्र दाखवू लागली. आणि मग आमची भटकंती सुरू झाली. आमचं फिरणं हे नुसतीच मजा, असं नसतं. पवनचक्की, धरण, नदी, जंगल, तलाव, भातशेती, ऊसाचा मळा, मुंबई, मंगलोर या गोष्टी तिला अडीच तीन वर्षांची असताना नीट कळायला लागल्या. कशाचा उपयोग काय, कुठून काय मिळतं हे तिला सर्व कळू लागलं. या भटकंतीमुळे तिचा भूगोल चांगला तयार होतोय. विमानापासून, रेल्वे, सरकारी बस आम्हांला फिरायला काहीही चालतं. प्रवासात आणि इतर वेळीही ती सारखे प्रश्न विचारत असते. आणि आम्ही तिला समजेल असं, तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. माझं बालपण खेड्यात गेलं. नारळी पोफळी, आंबे, फणसांच्या वाडीत, ओहोळामध्ये खूप धमाल करायचो. ती मजा तिला नाही घेता येत. पण मग जेव्हा गावी जातो, तेव्हा याच पुरतं उट्ट काढतो.
मी कॅमेरा क्षेत्रात काम करतो. कामाच्या वेळा पूर्वी खूप बदलत्या असायच्या. कधी कधी 15-20 दिवस बाहेरगावीही. दिवसभर मला कितीही फोन करावासा वाटला तरी आप्पा कामात आहे हे समजतं तिला. बऱ्याचदा फक्त ती आणि तिची आईही फिरायला जातात. मग रात्री फोन करून पूर्ण दिवसभराचं शेअरिंग असतं. कामाने कितीही थकून आलो, शरण्याचा आवाज ऐकला, तिला पाहिलं की थकवा कुठच्याकुठे निघून जातो. सर्व बच्चेकंपनीप्रमाणे तिच्यासाठीही तिचा आप्पा सुपरमॅन आहे. आप्पा सोबत असला की तिला खूप सुरक्षित वाटतं. ती चार वर्षांची असताना तिच्या एडेनॉईड्स ग्रंथी काढल्या. एण्डोस्कोपीसारख्या सर्व टेस्टपासून हॉस्पीटलमधून घरी येईपर्यंत शरण्या फक्त माझ्याच कुशीत होती. “तुझ्या कुशीत मला खूप सेफ वाटतं”, असं म्हणत होती. तिचा माझ्यावरचा हा विश्वास आणि तिच्या चाचण्या सुरू असताना माझी होत असलेली घालमेल. प्रचंड अस्वस्थ करणारी. लेकीमुळे मी फार हळवा झालोय, हे नक्की. घरात असलो की, भातुकलीपासून, सर्कस ते सायकल सगळ्यासाठी तिला मीच हवा. आणि मी घरात काहीही काम करत असेन तर मला असिस्टंट म्हणून लगेच ती तयार.
आमच्या लेकीला मातृभाषेसोबत, पितृभाषाही आहे. मी कन्नड आणि माझी पत्नी मराठी. दोन्ही घरांची तिला सारखीच ओढ असावी, म्हणून तिच्याशी आम्ही दोघेही आमच्याआमच्या भाषांमध्ये बोलतो. याचा फायदा झालाच. तिला भाषांची गोडी लागली. आता ती सहा वर्षांची आहे आणि तिला पाच भाषा येतात.
हे सर्व करताना तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, याची जाणीव मी नेहमीच ठेवतो. तिला तिच्या कलाने काही गोष्टी करायच्या असतात. त्यात आम्ही लुडबूड नाही करत. त्यामुळे तिचे काही निर्णय घ्यायला तिच्यावरच सोपवतो. कामामुळे आमची राहण्याची शहरं, घर, शाळा सतत बदलली. पण याची तिने कधी कुरबूर नाही केली. उलट छानपैकी एडजस्ट झाली. तिच्याशी सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलण्यानेच हा फायदा झाला.
बाबाचं मनोगत : सुधाकर तिप्पनाकजे. सिनेमॅटोग्राफर, मुंबई

No comments:

Post a Comment