Monday 3 September 2018

‘बापपणातलं सुख’

कालचीच गंमत. घरात इथं तिथं गोष्टीची, चिंटूची पुस्तकं पडलेली असतात. मनाला वाटेल तसं पुस्तक उचलायचं आणि वाटेल तिथून वाचायला सुरुवात करायची असा शिरस्ता. दोन्ही मुलींना मी वाचून दाखवत असते. कधी गोष्ट सांगणं सुरू असतं. मोठी आता मराठी पुस्तकं वाचू लागली आहे. धाकटीला अजून तरी लेखन-वाचन नाही. त्यामुळे वाचून दाखवलेली गोष्ट पानं उलटून आठवेल तशी ती वाचत राहते. 
कालही असं करता करता ती कपाटातली पुस्तकं आणून दुकान दुकान खेळली. मग अचानक म्हणाली, “आई, मला चिंटूसारखं पुस्तक तयार करायचं आहे.” म्हटलं कर. मग म्हणाली, “पण, एवढं मोठं नाही यायचं मला. छोटं चालेल का?” तिला म्हटलं, “तुला हव्या तेवढ्या पानांचं कर.” "चार पानांचं चालेल का?" म्हणाली. तिने कागद आणले. ते स्टेपल करून दिले. तिनं त्या कागदांवर हवी तशी चित्रं काढली. आता हे पुस्तक तिला विकायचं होतं. किंमतही तिनंच ठरवली. चार रुपये. मी म्हटलं, “महाग वाटतंय गं.” तर लगेच तिनं ती एक रुपया केली.
आता हे लिहिताना गंमत वाटते. मुलांचं डोकं कसं चालतं, काय विचार चालू असतात, याचंही विशेष वाटतं. या सगळ्यात मी आईपणाचं सुख अनुभवत असते. आपण जे शिकवतोय, जगतोय ते मुलांना आवडतं आहे आणि हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व आकार घेतंय, हे पाहणं सुखावह असतं.
मुलांच्या वाढीत गर्भावस्थेपासून पहिले एक हजार दिवस, म्हणजे पहिली तीन वर्ष सर्वात महत्वाची असतात. या काळात बाळांना मिळणारं प्रेम, त्यांची घेतली जाणारी काळजी, त्यांना देले गेलेले अनुभव यावर त्यांचं पुढचं आयुष्य उभं राहतं. या तीन वर्षात आई बाळाजवळ जास्त काळ असते. पण इथं बापाचीही भूमिका महत्त्वाची ठरते. अगदी शून्य दिवसापासूनच्या बाळाला सांभाळण्यात बाबाची भूमिका महत्त्वाची ठरते. बाबा मुलांसोबत खेळतात, त्या मुलांचा शारिरीक - बौध्दिक विकास हा अन्य मुलांपेक्षा अधिक असतो. ज्या मुलांचं लहान वयात बाबासोबत चांगलं नातं तयार होतं, अशी मुलं मोठेपणी कोणत्याही प्रकारचा ताण चांगल्या प्रकारे हाताळू शकतात, असंही आढळून आलं आहे.
म्हणूनच, आईपणाच्या कौतुकासोबत बापपणाचंही कौतुक करायचं ‘नवी उमेद’ने ठरवलंय.  हे कॅंम्पेन घेऊन लवकरच येत आहोत. या कॅंम्पेनमधून बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ, संशोधक बाळ-बाप नात्याबद्दल लिहितील, बोलतील. आणि आपले काही नामांकित मित्रही त्यांचे बापपणाचे अनुभव शेअर करतील.
अणि हो, ‘नवी उमेद’च्या वाचकांसाठीही हा विषय खुला आहेच. वाचकांकडून आम्हाला काय हवंय, ते उद्या पेजवरून कळवणारच आहोत.
- वर्षा जोशी-आठवले.

No comments:

Post a Comment