Friday 7 September 2018

बाबाचं मनोगत:तुलसीसोबत असताना नो मोबाइल, नो टिव्ही..



तुलसी, कधी मला शाळेतले किस्से सांगते तर कधी दोन चार कथा एकत्र करून तिने तयार केलेली रिमिक्स कथा ऐकवते. मागच्या आठवड्यात तर तिने चक्क एक कथा लिहिली आणि नंतर ती चित्र स्वरुपात आकाराला आणली. तिला हे अवघ्या तिसरीत असताना कुठून आणि कसं सुचतं? असा विचार मी नेहमी करतो. आणि तिच्या सहवासाचा आनंद घेतो. 
तुलसीचा अभ्यास घेण्यात आणि तिला बहुअंगी बनविण्यात तिच्या आईचा आणि माझे आई-वडील, बहीण, भाऊ यांचा मोठा वाटा आहे. मी पत्रकार असल्याने कामाची निश्चित वेळ नाही. ‘बातमी तिथे आम्ही’ असं सूत्र असलं तरी माझा उर्वरित वेळ हा तुलसीसाठीच ठरलेला. मग कधी माझ्या मित्रांसोबत तिच्या भेटीगाठी तर कधी तिच्या मैत्रिणींना भेटायला जाणं हे ठरलेलं. बऱ्याच वेळेला तर न ठरवता आम्ही दोघं धुळे शहरात नाहीतर महामागार्वर किंवा शेत-शिवारात फिरायला निघून जातो.
तुलसी म्हणते, माझं सर्वात अधिक आणि तत्काळ ऐकणारी व्यक्ती म्हणजे माझे पप्पा. (म्हणजे मी!). अभ्यासातल्या अडचणींतून मार्ग कसा काढायचा, हे मी तिला सांगतो. अन्यथा अभ्यासाव्यतिरिक्त विषयांवर आमच्या गप्पा खूप रंगतात. सध्या तर ती नवं नवे चुटकुले मजेत सांगते. या सर्व आनंदात मात्र तिला पैशाची बचत केली पाहिजे, हे वयाच्या मनाने लवकर कळायला लागलं, याचं दुःख मला आणि माझ्या पत्नीला सलतं. पण असो, हे सर्व ती माझ्यासोबत मनमोकळेपणे बोलते, माझ्यासोबत रमते, हे मी तिला दिलेल्या ‘क्वालिटी’ वेळेमुळेच असावे. तिच्यासोबत असताना नो मोबाईल, नो टीव्ही! आपल्या मुलीकडून असे किस्से, कहाण्या ऐकण्याची मजाच काही और असते. 
तुलसी, शाळेत जायला लागली, त्याआधीच्या दिवसांत मी तिच्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. सुरुवाती्ची दोन वर्ष तर मीच दिला शाळेत सोडायला आणि आणायला जात होतो. त्यावेळी मी तिला सांगितलेल्या गोष्टींची आज मला ती परतफेड करत आहे. या कथा ‘तिच्या’ रंगात रंगल्या आहेत आणि हाच 'ति'चेपणा मला बापपणाचा आनंद देतो. आज कदाचित काही गोष्टी ती मला सांगत नसेलही. मात्र काळाबरोबर आम्ही बापलेक आणखी पक्के मित्र बनू असं वाटतं. 
बाबाचं मनोगत
: प्रशांत परदेशी. 

No comments:

Post a Comment