Sunday 2 September 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 13


अनेक अनुभव विदारक असले तरी संस्थेतल्या माझ्या भावंडांच्या एकेका भन्नाट आठवणीची माळ कशी गुंफू? मुलांच्या एकेक सवयी, खोड्या, मारलेल्या थापा, चोरून थिएटरमध्ये पाहिलेले सिनेमे, अधीक्षकाला दिलेला त्रास, त्याने केलेली मारहाण, काही देणगीदारांशी झालेली घट्ट मैत्री, आम्हाला गोष्टी सांगायला, गाणं शिकवायला येणारे आजोबा, सहज आमच्याशी खेळायला येणाऱ्या आमच्याच वयाच्या काही कॉलेजच्या ताया, रात्री गच्चीवरून पांघरूण घेऊन खाली उड्या टाकून शेजारी टीव्हीवर पाहिलेली क्रिकेटची मॅच, मग रात्रभर शिक्षा म्हणून अंगणात काढलेली रात्र हे सगळं किती आणि काय काय....
आम्हा मुलांना हॉटेलमध्ये जाण्याचा कधी प्रसंगच आला नाही. ते आतून कसं असतं याचंही आम्हाला अप्रूप असायचं. एकदा एका देणगीदाराने 'आमच्या ढाब्यावर जेवायला येणार का', असं विचारल्यावर ते काय असतं? असा 'अब्बा डब्बा चब्बा' चेहरा करून एकमेकांकडे पहात राहलो. त्याला आमचं अगाध 'ज्ञान' लक्षात आल्यावर 'अरे, आमच्या हॉटेलमध्ये जेवायला येणार का?' मग लगेच एका सुरात बेंबीच्या देठापासून सर्वांनीच होकार भरला.
झालं, एक दिवस सगळी चिल्ली-पिल्ली आणि आम्ही मोठे ताई-दादा गेलो त्यांच्या ढाब्यावर जेवायला. मस्त पाहुणचार केला त्यांनी आमचा. त्यांनी प्रत्येकाला काहीतरी छोट्या छोट्या भेटवस्तू दिल्या. जोडीला गोळ्या, चॉकलेट होतंच. आजूबाजूला काही ग्राहकांची ये-जा सुरू होती. आमचं सगळं लक्ष त्यांनी दिलेल्या भेटवस्तू आणि खेळावर.
जरावेळ ढाब्याच्या परिसरात धुमाकूळ घालून जेवायला बसायच्या 20 मिनिटं आधी ढाबा मालकांनी विचारलं, 'काय खाणार?' सगळ्यांनी काही पण चालेल म्हणून सांगितलं. आमच्यातल्या एका दादाने मात्र 'नॉनव्हेज मिळेल'ची पाटी वाचली होती. त्याने लगेच मला नॉनव्हेज पाहिजे म्हणून मोठ्याने सांगितले. आम्ही सर्वांनीच त्याची ही फर्माईश ऐकल्यावर 'मग आम्हाला पण तेच पाहिजे' म्हणून आग्रह धरला.
झालं, त्यांनी आमच्यासाठी नॉनव्हेज केलं नव्हतं. पण आमचा देणगीदार काकांना आमची इच्छा नाकारायची नव्हती. म्हणून मोठ्या मुलांसाठी 10 प्लेट चिकन, मटण त्यांनी समोर आणून ठेवलं. एकच कल्ला. सर्वचजण मग बाकीचं जेवण विसरून या प्लेटवर तुटून पडली. पोट भरत आल्यावर काही प्लेट्स जशाच्या तश्या राहिल्या होत्या. आमच्यातल्या एका दादाने त्या अशा काही फस्त केल्या की त्या सर्व प्लेट्स पाण्यात धुतल्यासारख्या दिसत होत्या. चाटून पुसून खाणे याचं लख्ख उदाहरण! त्या दादाला नंतर आम्ही कितीतरी वर्ष चिडवत होतो. एका दादाला तर मुलं झाल्यावरही त्याची बोट चोखायची सवय कशी जात नाही, त्याची बायको, मुलं ती सवय घालवण्यासाठी काय काय प्रयत्न करताहेत, संतोषच्या ताटातील पोळी खाली लपवलेला गाजर हलवा पळवताना येणारी मजा, रात्री सगळे कामवाल्या आया झोपल्यावर कोठी खोलीतून पळवलेला गूळ, शेंगदाणे काढून रात्रभर दबक्या आवाजात चिक्की करण्याचा घातलेला घाट, टीव्हीच्या लाकडी कव्हरला लावलेल्या कुलुपाची डुप्लिकेट किल्ली करणं, प्रत्येकाची टोपण नावं, बापरे असे भन्नाट प्रसंग आठवून तर आम्ही आजही लोटपोट होतो.
आता मोठे झाल्यावर एकमेकांना जेव्हा भेटतो कधीतरी या आठवणींना उजाळा मिळतोच आणि आमच्यातलं मैत्र अधिक घट्ट होत जातं.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment