Friday 7 September 2018

'आधारा'तून बळ

बीडमधलं आगरनांदूर नावाचं छोटंसं गाव. या गावातल्या ख्वाजाभाई शेख यांचा पत्र्याच्या चाळण्या विकायचा व्यवसाय. हातावरती पोट असलेल्या या कुटुंबाचं कुठल्याच बँकेत खातं नाही, ख्वाजाभाईंचा मुलगा साजिद तिथल्याच जिल्हा परिषद शाळेत शिकतो. एकदा ख्वाजाभाई चांगलेच आजारी पडले, पण पैसे नसल्याने दवाखान्यात जाण्याची टाळाटाळ करू लागले. त्यावेळी साजिदने स्वत:च्या शाळेतल्या बँकेत जमा करून वाचवलेले 500 रूपये वडिलांच्या हातात ठेवले आणि त्यांना दवाखान्यात जाण्यास भाग पाडले. या प्रसंगाने तर ख्वाजाभाईंच्या डोळ्यात पाणीच आलं. या प्रसंगानंतर साजिदच्या वडिलांनी आपले तंबाखूचे व्यसन सोडून बचतीला सुरूवात केली आहे आणि ते आता बँकेत साठविण्यासाठी साजिदला नियमित पैसे देतात.
दुसरा प्रसंग असा की बीडमधल्याच कासारवाडी जिल्हा परिषद शाळेला इतर शाळांप्रमाणे डिजिटल व्हायचं होतं, पण त्यासाठी पैसे कमी पडत होते. तेव्हा शाळेतील शिक्षिकांनी 2016-17 च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या मदतीने सुमारे 2000 रोपं तयार केली आणि शहरात ऑफिसेस, संस्थांना विकून मिळालेल्या पैशातून शाळा डिजिटल केली. बीडच्या गेवराई परिसरातील बऱ्याच शाळांमध्ये तुम्हांला वडाची छान वाढू लागलेली रोपे दिसतील. आणि वारली चित्रकलेद्वारे साकारलेला सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा लोगो दिसेल- 'आधार' परिवाराचा.
काय आहे हा 'आधार' परिवार? गेवराई तालुक्यातील सुमारे 700 शिक्षकांनी एकत्र येत जवळपास 10 ते 12 लाखांचा निधी स्वकमाईतून जमा केला, त्यातून चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती संलग्नता शुल्क दरवर्षी भरले जाते, नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातासारखी संकटे ओढविलेल्या मुलांना आर्थिक तसेच वैद्यकीय मदत केली जाते. दरवर्षी 15 ऑगस्टच्या सुमारास भव्य चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात येते. एवढंच नाही तर राज्यातील अनाथ मुलांचं पहिलं स्काऊट गाईड पथकही यांनीच उभारलं आहे. या आधार उपक्रमामागची संकल्पना आहे-गेवराई क्रमांक दोनचे विस्ताराधिकारी प्रवीण काळम- पाटील सर यांची.
काळम- पाटील सरांनी एकदा एक बातमी वाचली होती, की रिक्षात जर दिव्यांग व्यक्ती बसली तर एक रिक्षाचालक त्या व्यक्तीचे निम्मेच भाडे घ्यायचा, ही बातमी ऐकून त्यांचं मन हेलावलं. एखादा सामान्य रिक्षाचालक इतकं करू शकतो, तर शासनाच्या सेवेत असलेले, दर महिन्याला ठराविक पगार मिळणारे आपण अधिकारी आणि शिक्षक यांनीही विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवं, या कल्पनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला.
त्यांनी सहकारी शिक्षकांना ही संकल्पना बोलून दाखविली आणि त्यांनी ही कल्पना उचलून धरली. जुलै 2014 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात प्रत्येक शिक्षकाकडून वार्षिक 500 रूपये जमा केले जातात. जमा झालेला पैशांचा विनियोग केवळ विद्यार्थी कल्याण आणि गुणवत्ता वाढीसाठीच केला जातो. त्यातून अपघात ग्रस्त मुलांना उपचारासाठी मदत, शालेय बचत बँक, परिसर भेट, दरवर्षी वृक्ष लागवड, चित्रकला आणि क्रीडा स्पर्धा तसेच शहरांप्रमाणे साहसी खेळांचं प्रशिक्षण देणारी शिबिरे मोफत आयोजित केली जातात. असे नानाविध उत्तम उपक्रम घेणाऱ्या काळम- पाटील सरांना 2016-17 साली महाराष्ट्र सरकारचा ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कारही मिळालेला आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment