Friday 21 September 2018

बाबाकडची खास पोतडी



बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात तसं घडत मात्र नाही. ज्या घरामध्ये आई-बाबा दोघेही नोकरी करतात, त्या घरात बाळाची बहुतांश काळजी, जबाबदारी ही आईच उचलताना दिसते. अशीही मांडणी केली जाते की बाबा पैसे कमावून आणतो, तो दिवसभर घरात नसतो आणि म्हणून मुलांना सगळ्यात जास्त सहवास आईचाच मिळतो. आता काही घरांमध्ये तरी हे चित्र बदलताना दिसत आहे. बाबाप्रमाणे आईसुद्धा दिवसभर नोकरी करते. काम करते. पण तरी सुद्धा असंच चित्र दिसतं की आईचा सहवास मुलांना जास्त आहे. याचं कारण आपल्या समाजाच्या जडणघडणीत तर आहेच, पण बाबाच्या मानसिकतेत सुद्धा आहे. आपल्या लहानग्या मुलाला किंवा मुलीला वाढवणं, तिच्यासाठी काही करणं, यात आपणही काही भूमिका बजावू शकतो याची ओळख सुद्धा कित्येक घरातल्या बाबा मंडळींना झालेली नसते.
त्यासाठीच काही उदाहरणं सुचवावीशी वाटतात. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा बाळाला आईचा आवाज स्पष्ट ऐकू येत असतो आणि बाकीचे आवाज थोडे अस्पष्ट ऐकू येत असतात. मात्र तेव्हापासूनच जर बाबा बाळाशी गप्पा मारत राहिला तर बाळाला त्याचा आवाजही ओळखीचा वाटेल.
निदान बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासून आई इतकाच सहवास जर बाबाचाही मिळाला, त्याला जवळ घेतलं, आई अंगाई गीत गात असेल तर बाबांनीही ते शिकून घ्यायला काहीच हरकत नाही. बाळ काही गाण्याचं परीक्षण करत नसतं !! त्याला फक्त तो आवाज परिचित व्हायला हवा.
अगदी लहानशा बाळाला समजो न समजो, पण त्याला वेगवेगळ्या छान छान गोष्टी सांगू शकतो. या अशा गोष्टी सांगून बाबा बाळाला जवळ घेईल, त्याला हसवेल, बाबाच्या चेहऱ्याकडे बघून बाळ खूप काही शिकेल, हे तर बाबा कोणत्याही वयात करू शकतो. अगदी चार ते पाच महिन्याच्या बाळाला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी बाबाला सांगता येतील.
याचं शास्त्रीय कारण असं आहे की बाळाच्या मेंदूतला Wernicke या नावाचा भाग जन्मापासूनच कार्यरत असतो. ऐकलेल्या शब्दांचं आकलन हे या भागाचं काम आहे. हे शब्द स्मरणकेंद्रात जातात. साधारणपणे एक वर्षाच्या आसपास broka हा भाग विकसित होतो. हा बोलण्याला मदत करणारा एरिया आहे. आजपर्यंत जे wernicke मध्ये save झालेलं आहे, थोडक्यात एका वर्षापर्यंत जे ऐकलेले आहेत तेच शब्द बाळ बोलतं. म्हणून बाबानीही बोलायला हवं. आईपेक्षा बाबाचे नवे शब्द, बोलण्यातले उतार-चढाव, काही गमती जमती, या वेगळ्या असू शकतात आणि बाळाला त्यासुद्धा अवगत होऊ शकतात.
याशिवाय अजून एक गोष्ट बाबा करू शकतो ती म्हणजे खेळ. बाबा जर आपल्या मुलांच्या प्रेमात बुडालेला असेल तर त्याला खूप सारे खेळ सुचतात. एका बाबाने नुकत्याच चालायला आपल्या मुलीला एक आकाराने मोठा, पण अतिशय हलका असा एक बॉल आणून दिला. ती जशी चालायची तसा तो बाबा तिच्या पायासमोर तो बॉल आणून ठेवायचा. मुलगी मजेने तो बॉल उडवायची. घरातल्या घरात ती फुटबॉल खेळू लागली. असे अनेक प्रकारचे खेळ बाबाला सुचू शकतात.
बाबांनी आपल्या पोतडीतल्या अशा कितीतरी गोष्टी, खेळ, मजेच्या युक्त्या आपल्या मुलां- मुलींसाठी उघड केल्या पाहिजेत. अनेक घरांमध्ये बाबा म्हणजे 'घाबरायचं असतं असं एक माणूस' अशी प्रतिमा असते. पण आताच्या बाबाला ही प्रतिमा बदलून मुलांचा किंवा मुलींचा मित्र ही प्रतिमा निर्माण करता येऊ शकते आणि ती देखील अगदी बाळाच्या जन्मापासूनच.

- डॉ. श्रुती पानसे, बालमानसतज्ञ

No comments:

Post a Comment