Monday 17 September 2018

बालसंगोपनाची परीक्षा अजब आहे..



आम्हाला दोन मुले आहेत - एकोणीस वर्षांचा मुलगा आणि चौदा वर्षांची कन्या. म्हणजे एकूण तेहेतीस वर्षांचा "संगोपन अनुभव". मात्र या अनुभवांती लक्षात आले की पन्नास जन्म घेऊन शंभर मुले वाढवल्यावर कदाचित हा विषय मला उमगू लागेल. कदाचित. कारण आयुष्यात एका ठाम निष्कर्षास मी पोचलो आहे - there is no such thing as a wise old man or a wise old woman. बालसंगोपनाची माझी प्रेरणास्थाने तीन आहेत - श्री अरविंद गुप्ता (http://www.arvindguptatoys.com/), John Holt आणि माझ्या सासूबाई. अनुभवाच्या ठेचा खात आणि प्रेरणास्थानांचे स्मरण आणि काहीसे अनुकरण करून हा प्रवास करत आलो आहे. यशापयशाचे निदान कसे आणि कोण करणार? माझ्या मते ही परीक्षा अजब आहे. तिचा एक निकाल नसतो. इथून पुढे अनेक वर्षे तो निकाल लागत राहील. 
१९९८ साली मुलाचा जन्म झाला. पहिले तीन महिने मजाच मजा. त्या वयाचे मूळ म्हणजे गोंडस खेळणे. त्यासोबत खेळण्यात वेळ कसा जातो कळत नाही. परंतु लवकरच मला असे जाणवले कि उत्तम अन्न, उत्तम खेळणी, कपडे याखेरीज देण्यासारखे आपल्याकडे फारसे काही नाही. तेव्हा वाचनाचा सपाटा लावला. खरे तर थोडा उशीरच झाला होता. पुढचे बारा महिने शंभर पुस्तके वाचली. गांधी व मंडेलांची आत्मचरित्रे, जॉन होल्ट, फ्रान्झ काफ्का, कुरुंदकर, प्रेमचंद, जी . ए, इब्सेन, चेकॉव्ह, हेमिंग्वे ... खूप वाचले, खूप विचार केला. त्याचा एक फायदा मी अनुभवला तो असा - "अमुक चूक, अमुक बरोबर असे मला वाटते. त्याची करणे अशी... तुझं मत वेगळं असेल तर चर्चा करू" अशी संभाषणे मुलांशी लीलया साधता येऊ लागली". त्यातही गम्मत म्हणजे मुलगा अशा संभाषणांसाठी उत्सुक असतो, मुलगी मात्र "बोअर करू नको" सांगून मोकळी होते. तिचा पिंड प्राणी प्रेम आणि विलासी वृत्ती असा आहे. प्राणी प्रेमात मात्र मी माफकच प्रगती करू शकलो हे अपयशात मोजावे लागेल. 
त्यामुळे मुलांच्या सांगोपनाच्या विषयावर उपदेश देण्यास मी स्वतःला असमर्थ समजतो. It is a new battle every day. आणि त्याला "battle" मानण्यात आपण कुठेतरी चुकतो असं वाटत राहतं. पूर्वी म्हणत असत की It takes a village to raise a child. शहरी जीवनात हा विचार संपुष्टात आला आहे. त्या विचारास नवचैतन्य देऊन अंमलात आणले पाहिजे असे वाटते. आपल्या मुलांवरील आपला focus थोडा कमी करून नात्यातील, शेजारातील मुलांत, रस्त्यावरील बालमजुरांत देखील आपण थोडे रमलो तर बालसंगोपनाचा अनुभव आपोआप enrich होईल असे वाटते.
बाबाचं मनोगत: अमलेश कणेकर, इंजिनिअर.

No comments:

Post a Comment