Monday 3 September 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 16


आपली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, जाती व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. तसा संघर्ष आमच्याही वाट्याला आहेच. फरक इतकाच 'मी कोण' आणि कोणत्या व्यवस्थेसाठी फिट बसू शकतो इथूनच या संघर्षाला सुरूवात होते. त्यामुळे व्यक्तिगत, सामाजिक आणि किमान कागदोपत्री तरी भारतीय नागरिक आहोत की नाहीत यासारखे अनेक असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. त्यासाठी आम्ही अजून लढतोय, स्वतःशी, समाजाशी आणि शासनाशीही.
18 वर्ष संस्थेत राहून स्वतःचं अनाथपणाचं लेबल पुसायला निघालेली मी बाहेर उघड्या समाजाशी आता दोन हात करणार होते. सहानुभूती, नाकारलेपणाचं ओझं माझ्यावर इतकं होतं की अनाथ मुलं वाईट मार्गाला लागतात, चोऱ्या करतात, गुंड होतात, पोरी धंदा करतात, यासारखी अनेक बिनडोक 'लेबल' लावणाऱ्या लोकांना आपण चांगलंच वागून दाखवायचं या इरेने मी पेटून उठले होते. स्वतःच्या पंखातलं बळ तपासण्यासाठी स्वजबाबदारीवर मी वयाच्या 18 वर्षांनंतर संस्था सोडली.
अर्थातच हा संघर्ष मी जाणीवपूर्वक स्वीकारला होता. अत्यंत कोवळ्या वयात घेतलेला हा निर्णय असल्याने स्वतःला 'चांगलं' आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वतःवरच येऊन ठेपली होती. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर कुठं जाणार? हा प्रश्न होताच. पुण्यासारख्या नवख्या ठिकाणी काही दिवस ओळखीच्यांकडे घालवले. पण, संस्थेत आश्रित म्हणून राहणे आणि दुसऱ्याच्या घरी आश्रित म्हणून राहणे, यातील फरकही समजायला वेळ लागला नाही. सहानुभूती नको असल्याच्या भूमिकेने टोकाचा स्वाभिमान उफाळून यायचा. त्यामुळे खरंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनाही नकळतपणे दुखावतही होते. त्यासाठी शनिवारवाड्यावर 2 रात्री काढायला लागणं असो की कुणाकडूनही पैसे मागायचे नाहीत म्हणून वडापाववर पोट भरणं असो या गोष्टी स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी जाणीवपूर्वक मीच स्वीकारलेल्या होत्या.
पुण्यासारख्या ठिकाणी राहण्याच्या अडचणीतून माग काढायचा तर वसतिगृह, नोकरी करत शिकणं या दोन गोष्टींवर फोकस केलं. कागदपत्रांच्या अनेक अडचणी त्या तेव्हाही आणि आजही आहेतच. अनाथ असल्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे स्वतःला कायम असुरक्षित वाटणं! कुणी आपल्या अनाथपणाचा गैरवापर तर करणार नाही ना? किंवा माझ्याकडे सहानुभूतीने तर पाहणार नाही ना म्हणून अनेकदा मी माझ्या आईबाबांच्या 'स्टोऱ्या' सांगून त्यांचे डेसिग्नेशन दर वर्षाला बदलवत राहायचे. खोटं टिकवून ठेवण्याची स्मरणशक्ती माझ्याकडे नसायची. मग अवतीभोवतीचे लोकं समजून जायचे. स्वतःला आहे तसं स्वीकारणं हे आताशा जमायला लागलंय.
नोकरी करत शिकणं हा एक सुखद अनुभव असायचा माझ्यासाठी. कारण आत्मसन्मानाचा उगम त्यातूनच झाला होता. मेकअप किंवा इतर महागड्या गोष्टींचं आकर्षण कधीच नव्हतं, त्यामुळेही माझे हे दिवस सुखाचे असायचे. हॉस्टेलवरच्या मैत्रिणींना त्यांचे पालक भेटायला येतात, फोन करतात तसं मला कुणी नाही येत, या स्वरांचं व्हायोलिन बॅगग्राऊंडला सतत वाजायचं माझ्या मनात. त्यातून व्हायोलिनचे स्वर इतके गंभीर असायचे की तळमळ असायचीच कायम मनात.
खूप मैत्रिणी, वाचन, गायन, डायरी लेखन, नोकरी आणि अभ्यास नि कॉलेज एव्हढ्याच विश्वात मी मग्न असायचे. आयुष्याचं ध्येय ठरवणं वगैरे काय, हे तर त्या दरम्यान कोसो दूर होतं. फक्त चांगलं वागायचं, वाईट मार्गापासून सुरक्षित ठेवायचं आणि स्वावलंबी व्हायचं बस एवढीच अपेक्षा होती स्वतःकडून. यात मी काही प्रमाणात यशस्वी झाले आहे.
अर्थातच माझ्या अवतीभोवती माझ्यावर मुलीसारखे प्रेम करणारे, आधार देणारे, काळजी करणारे अनेक जण होते. त्यामध्ये संस्थेचे संचालक डॉ. पाठक, भाऊ पाडळीकर, जोशी कुटुंब, विद्यार्थी सहाय्यक समिती, पत्रकारितेतल्या, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक जवळच्या मित्र मैत्रिणीचं माझ्या जडणघडणीतील योगदान कधीही न विसरण्यासारखं आहे. कुठलंही लेबल न चिकटवता 'माणूस' म्हणून स्वीकारणं हे यांच्या नात्यातील महत्त्वाचं सूत्र आहे. आजही माझं आयुष्य अनेक कारणांनी अनवट वळण घेत असलं तरी या लोकांची साथ मला कायम आहे. त्यामुळेही जगण्याविषयीचं प्रेम वाढत राहतं. चांगले-वाईट अनुभव हेच माझे खरंतर पालकत्व निभावतात, असं मला कायम वाटत राहतं.
आज मागे वळून पाहताना मला खूप चांगल्या लोकांचा सहवास, प्रेम मिळाला म्हणून मी इथंवर येऊ शकले, याची जाणीव कायम आहे. अशीच माणसं आमच्या भावंडांना मिळावी, प्रशासनाचाही या कार्यात पाठिंबा मिळावा म्हणून आमच्या 'सनाथ' संस्थेच्या वतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमातून, सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार करून आम्हा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची मोर्चे बांधणी चालू आहे.
अनाथांसाठी आरक्षणामध्ये वसतिगृह, शिष्यवृत्ती, नोकरी एक टप्पा आम्ही ओलांडला असला तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. अनाथांसाठी आरक्षण हे आम्हाला सरकारने दाखवलेलं गाजर आहे. पण किमान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी का होईना अनाथांसाठी सरकार दरबारी काहीतरी कागद पुढे सरकले, याचा आनंद आहेच. आरक्षणाची, शासकीय योजनांची अंमलबजावणी चालू असतानाच 18 वर्षावरील मुलींचे वसतिगृह, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, कागदपत्रांसाठी विविध कार्यशाळा राबवणं, समाज आणि बालगृहातील मुले यातील अंतर दूर करणं नि प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहचण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी आमच्या ‘सनाथ’ संस्थेकडून चालूच आहे.
शेवटी एकच सांगावस वाटतं. हे सगळं लिहिण्यामागे, उद्देश एकच होता. सहानुभूती तर सोडाच कुणाही याचकाला त्याचा आत्मसन्मान जागृत करून त्याला स्वबळावर उभं करता आलं तर ती मदत त्याचं आयुष्य उभं करते. आपल्यापेक्षा कुणीही कधीही खालच्या- वरच्या पातळीवर भेटला तर त्याला माणूस म्हणून स्वीकारण्याची, मदत करण्याची, प्रसंगी माफ करण्याची वृत्ती जोपासली तर काही प्रमाणात तरी आपल्या प्रश्नाचं निराकरण होईल.
बाकी संघर्षाची लढाई आजही संपलेली नाहीच. कुणीतरी उठतं त्याच्या अकलेनुसार, स्वभावानुसार अनाथांवर शिंतोडे उडवतं, बिनबुडाचे आरोप-प्रत्यारोप करतं, आमच्या अख्ख्या समुदायाला नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने पेटून उठणाऱ्या, अशा दांभिक समाजालाही ओळखू लागल्याने 'फिरुनी नवी जन्मेन मी' हे आशेचे गीत माझ्या मनात कायम भिनत असतं. कारण अस्तित्त्वाची लढाई तुमच्या इतकीच आम्हालाही जिंकायची आहे कुणाच्याही, कसल्याही कुबड्या न घेता. इतका स्वाभिमान काकणभर जास्तच आहे आमच्यात!
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment