Friday 7 September 2018

प्रकाशयात्री



चंद्रभागा गुरव यांची ही गोष्ट. त्या स्वतः दिव्यांग. बीड जिल्हा रुग्णालयात त्या नेत्रदान समुपदेशक म्हणून काम करतात. हे काम कौशल्याचं आणि दुसऱ्याच्या मनाशी संवाद साधणारं. त्यामुळे तसं अवघडही. त्यात एखाद्याच्या घरातील व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू होतो तेंव्हा कुटुंबियांची मन:स्थिती ठीक नसते. त्यांच्यासाठी हा दुःखद क्षण असतो. अशाही परिस्थितीत गुरव मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना भेटून आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांमुळे एका अंधाच्या आयुष्याच
ी वाट उजळणार असल्याचे सांगत प्रभावीपणे त्यांचे समुपदेशन करतात. आपल्या व्यक्तींचे किमान डोळे तरी जिवंत राहू शकतात आणि ते इतरांच्या कामी येऊ शकतात. हे त्या सांगतात आणि या दु:खद प्रसंगातही नातेवाईक नेत्रदानाला होकार देतात.
गुरव म्हणतात, “जिल्हा रुग्णालयात २००७ पासूनच नेत्रदानाला सुरुवात झाली परंतु, समुपदेशकाचे पद रिक्त असल्याने केवळ नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचे काम सुरु होते. माझी नियुक्ती झाल्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये पहिले नेत्रदान करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी अपघातात मृत पावलेले अंबादास डोंगरदिवे (रा. चिंचाळा ता. वडवणी) यांच्या नातेवाईकांचे आम्ही समुपदेशन केले अन् त्यांनी नेत्रदानाला होकार दिला. तिथूनच जिल्हा रुग्णालयातील नेत्र संकलनाचा श्रीगणेशा झाला. यानंतर २०१२-१३ या वर्षात ५८, २०१३-१४ या वर्षात ६८, २०१४-१५ या वर्षांत ७४, २०१५-१६ या वर्षात ६४ तर २०१६-१७ या वर्षात ३० डोळे संकलीत करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तर २०१७-१८ मध्ये ३७ आणि एप्रिल ते आॅगस्ट २०१८ यामध्ये १० डोळे संकलित झाले आहेत.”
आतापर्यंत सहा वर्षांत एकूण ३४० डोळ्यांचे संकलन जिल्हा सामान्य रुग्णालयाने केले आहे. यामध्ये २०१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांत नेत्रदानाची उद्दिष्टपूर्ती करुन बीड जिल्हा रुग्णालयाचा नेत्रविभाग राज्यात अग्रेसरही राहिला. नेत्रदान करणाऱ्या वर्गाविषयीही गुरव यांची निरीक्षणं आहेत. त्या म्हणतात, “अल्पशिक्षीत लोकांचे समुपदेशन करुन त्यांना नेत्रदानासाठी तयार करणे शिक्षित लोकांच्या तुलनेत निश्चित सोपे असते.” अपघातात मृत्यू पावलेले पती पत्नी यांचे अन् त्याच दिवशी आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याचे असे एकाच दिवसांत तीन जणांचे नेत्रदान करुन सहा डोळे संकलित करण्याचा प्रसंगही कायम लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. बीड येथे संकलित केलेले डोळे जालना येथील गणपती नेत्रालयाच्या आय बँकेत पाठवले जातात. तिथेच गरजूंना नवी दृ़ष्टी देण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. गुरव यांच्या या कामामुळे त्या प्रकाशयात्री ठरल्या आहे. 


- अमोल मुळे.

No comments:

Post a Comment