Sunday 2 September 2018

अनोखे रक्षाबंधन



निसर्गसौंदर्याने नटलेला, गोदावरी-प्राणहिता-इंद्रावती नद्यांनी वेढलेला, स्वतःची आदिवासी संस्कृती जोपासणारा गडचिरोली जिल्हा. हा जिल्हा जसा हेमलकश्यात आदिवासींसाठी झटणाऱ्या डॉ. प्रकाश आमटेंसाठी प्रसिद्ध आहे, तसाच जंगलात लपून राहणाऱ्या नक्षलवाद्यांसाठीही तितकाच ओळखला जातो. नक्षलवाद्यांकडून या जिल्ह्यात अनेकदा छोटे- मोठे स्फोट, हल्ले, रस्ते- पूल उखडून टाकणे अशा कारवाया सुरूच असतात.

आणि त्याचमुळे या जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांचा वावरही सर्वाधिक आहे. राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा गडचिरोलीत पोलीस आणि त्यांच्यासोबतच राज्य राखीव दल, तसेच केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीविताची आणि सार्वजनिक व्यवस्थेची निगराणी करण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. वेळप्रसंगी काही जवानांना आपल्या प्राणाचीही आहुती द्यावी लागते.
मात्र गडचिरोलीच्या संरक्षणासाठी झटणारे हे जवान काही मूळचे गडचिरोलीचे नाहीत. राज्यातील वेगवेगळ्या शहरातून आणि बऱ्याचदा थेट दुसऱ्या राज्यातून त्यांची नेमणूक इथे झालेली आहे. स्वत:चे घर आणि कुटुंबापासून दूर राहून गडचिरोलीत आपले कर्तव्य बजावित आहेत. वाढदिवस असो की सण- समारंभ, सामान्यांप्रमाणे त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येत नाही. म्हणूनच एटापल्लीच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी 2017 साली जवानांना राखी बांधून ‘अनोखे रक्षाबंधन’ साजरे केले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय’ ही केंद्र शासनाची अनुसूचित जाती- जमाती आणि भटक्या जातीतील मुलींसाठीची खास शिक्षणाची योजना आहे. देशातील ज्या-ज्या ठिकाणी हा समाज जास्त आहे, जिथे महिला साक्षरतेचे प्रमाण कमी आहे आणि स्त्री- पुरूष लिंग गुणोत्तरातही जास्त तफावत आहे, अशा ठिकाणी या शाळांची स्थापना करण्यात आलेली आहे. बहुतांश शाळा या निवासी असून तिथे जिल्हाभरातल्या मुली शिक्षण घेतात.
एटापल्लीच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातही आजूबाजूच्या खेड्या- पाड्यातून आलेल्या अनेक मुली शिक्षण घेत आहेत. जवान जसे आपली घरापासून दूर आहेत, तशाच या मुलीही आपल्या कुटुंबापासून आणि गावापासून दूर आहेत, म्हणूनच इथल्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांनी हा रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम करण्याचे ठरवले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना स्वत: राख्या बनविल्या, औक्षणाचे ताट तयार केले. शिक्षिकांनी विद्यार्थिनी आणि जवानांसाठी मिठाईदेखील आणली. सीआरपीएफचे जवान तसेच इतर शाळेतील काही विद्यार्थ्यांना राख्या बांधण्याचे निश्चित केले गेले.
प्रत्यक्ष कार्यक्रम एटापल्लीतील केंद्रीय राखीव दलाच्या कॅम्पवर झाला. विद्यार्थिनींनी फुलांच्या रांगोळीने संपूर्ण परिसर सजविला होता. सुमारे 40 विद्यार्थिनींनी तितक्याच जवानांना स्वहस्ते बनविलेल्या राख्या बांधल्या आणि औक्षणही केले. या वेळी जवान आणि काही विद्यार्थिनी भावुक झाल्या होत्या. जवान कर्तव्य बजावित आपल्या घरापासून दूर होते, तर विद्यार्थिनीसुद्धा शिक्षणासाठी घरापासून दूर आहेत. मात्र आपले रक्षण करण्यासाठी घराची आठवणही न काढणाऱ्या जवानांना या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनींना नात्याच्या बंधनात जोडून घेतले आणि जवानांनीही नव्या बहिणींच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी प्राणाचीही आहुती देण्याचे वचन दिले.

- नकुल लांजेवार, शिक्षक.

No comments:

Post a Comment