Tuesday, 27 November 2018

भारूडकन्या कृष्णाईतिचं वय अवघं १६ वर्षे. पण तिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख बनवलीय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील आरळी गावची ही भारूड कन्या म्हणजे कृष्णाई प्रभाकर उळेकर. समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून शेतकरी, तरूण पिढी, मुलींच्या शिक्षणापर्यंत ती सगळ्या विषयावर कडक शब्दांत आणि पहाडी आवाजात भारूडातून प्रबोधन करतेय.

अगदी पाचवीला असताना गावच्या शाळेत कृष्णाई नृत्य कलेत भाग घेऊन मंचावर नृत्याविष्कार सादर करीत होती. त्यावेळी गावकऱ्यांनाही तिच्या कलेचं कौतुक वाटायचं. पुढे तिनं भारूड सादरीकरणासाठी डोक्यावर कपड्यांचं गाठोडं, हातात काठी घेतली अन् पाहता-पाहता ती या कलेतून सबंध राज्याला परिचित झाली.
कृष्णाई पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयात कला शाखेत १२ वीत शिकत आहे. त्यामुळे पुण्यातील मोठ्या सांस्कृतिक
                                                                                          कार्यक्रमात तिचे कार्यक्रम होत आहेत. इतक्या कमी वयात भारूड कलेच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या उंचीवर गेलेली कृष्णाई एकमेव युवा भारूडकार असावी. या कलेबद्दल बोलताना ती म्हणाली, “दुसरीत असल्यापासून मला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला मिळाला. वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करत होते. मला नृत्यामध्ये अनेक बक्षीस मिळाली. वक्तृत्व स्पर्धेत, ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुका, जिल्हा विभागात पहिला क्रमांक आला होता. वडिलांनी मला ‘नाथांचं भारूड कर’, असा सल्ला दिला. मग मी भारूडाची वेगवेगळी पुस्तकं वाचायला सुरूवात केली. मला नाथांचं ‘बुरगुंडा’ हे भारूड आवडलं. मी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते सादर करायचं ठरवलं. अखेर तो क्षण आला. शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला. एकापेक्षा एक सादरीकरण होत होते. रात्री १२ च्या दरम्यान अंगावर दंड घातलेली फाटकी साडी, डोक्यावर गठुडं, हातात काठी व त्याला सुया, पिना, फुगे, काळे मणी, कंगवे बांधून मी प्रेक्षकांमधून मंचावर प्रवेश केला. लोक अचंबित झाले. मी मंचावर गेले आणि ‘माझं बयो, तुला बुरगुंडा होईल गं’ ह्या भारूडाचं सादरीकरण केलं. तेव्हा मिळालेल्या प्रतिसादाने मी अक्षरश: भारावून गेले. त्यावेळी वाजलेल्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पुढे हेच भारूड घेऊन महाराष्ट्रभर फिरते आहे. राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद पाहून माझ्या आई-वडिलांना आनंद झाला. भारूड हे समाज परिवर्तनाचं मोठं माध्यम असून, या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याची संधी मला मिळालीय, याचा मनस्वी आनंद वाटतो.” कृष्णाई म्हणते, “पारंपरिक भारुड लोकांना रूचत नाही, त्यामुळे मी समाजातील ज्वलंत प्रश्नावर भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन सुरू केलं. यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे, हुंडाबंदी यासह मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या दुष्काळावरही प्रबोधन सुरू केलं.” कृष्णाईला या कलेबद्दल राज्य शासनाचा राज्य युवा पुरस्कार मिळाला आहे. अनेक संस्था-संघटनांनी तिचा सन्मान केला आहे. तिच्या कलेबद्दल गावकऱ्यांनाही हेवा वाटतो.


- चंद्रसेन देशमुख.

शाळेनं मला काय दिलं - गुरुजी, म्या मोठा बनेल नव्हं...

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील सालनापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतली ही गोष्ट. एका वर्षापूर्वी रडतरडत शाळेत येणारा ओम. अल्लड स्वभावाचा, माझ्या अनिल दादा सारखा! कोणताही प्रश्न असो उत्तर हमखास. माझ्या अवती भवती फिरणारा. आईने शाळेत सोडलं की खूप रडायचा, "ये मम्मी मी येस घरला", अश्रुंनी न्हालेला ओम माझ्या पायाला घट्ट धरायचा. कोणतेही काम असो ओम माझ्या अवती भवती फिरत रहायचा.
अगदी न चुकता रोजच ओम माझ्यासाठी चॉकलेट, गोळ्या आणायचा. जय आणि ओम ही मला खूप आवडणारी पण सगळयात जास्त खोड्या करणारी मुलं. आई खूप काबाडकष्ट करून मोठ्या आशेनी मुलांना शिकवित होती. ती नेहमी सांगायची, ‘गुरुजी ओमकडे लक्ष देत रहा!’
जि.प. शाळेत माझ्या आश्वासनानंतर दाखल झालेला ओम पहिल्या वर्गात सर्व क्षमता प्राप्त करून उतीर्ण झाला आणि पूर्ण गाव माझ्या शाळेची प्रशंसा करू लागला. आता इयत्ता दुसरीला ओम खूप गैरहजर राहू लागला. वारंवार सुट्टी मागू लागला. आज बरेच दिवसानी ओमची आई शाळेत आली. पण प्रकृती ढासळलेली. दुसऱ्याला प्रेरणा देणारी स्त्री आज अशक्त झालेली आढळली. बोलण्यात विलक्षण कमकुवतपणा जाणवत होता. आणि अशातही ती मला म्हणाली, ‘सर, माझ्या दुखण्याने ओमची शाळा बुडत आहे. पण, माझा ओम घरी अभ्यास करतोय त्याला एक उत्कृष्ट व्यक्ती बनवा. सुसंस्कारीत आदर्श माणूस बनवा.’ बोलताना तिला सतत रडू येत होतं.
मला माहित नाही गरीबी, श्रीमंती जात पात काय आहे पण माणसं शिक्षणाचं महत्त्वं जाणू लागली की ते मुलांना शंभर टक्के शाळेत पाठवतातच .
जवळ जवळ दोन वाजले होते. ओमचा रडण्याचा आवाज आला. ओम खूप रडत होता आणि त्याचा अप्पा मला आवाज देत होता. ओमच्या आईला आज ऑपरेशनसाठी नेत होते. ती म्हणत होतं, "माझ्या ओमला सांभाळा गुरुजी!"
ओमला मी म्हटलं, अरे, उदया जाऊ आपण भेटायला. पण हा उदया येणार नव्हता. ओमच्या आईने दवाखान्यात रात्री १०.३० ला आपला जीव सोडला. आईवर जीवापाड प्रेम करणारा, आईचा पदर न सोडणारा माझा ओम किंकाळत होता. म्हणत होता, ये आई उठणं गं. पण काळ ओमला एकटं राहण्यासाठी सोडून गेला होता. त्याच्या कपडयावर एकही डाग नसायचा मी विचारलं की तो म्हणायचा, आई म्हणते साहेब व्हायचं तुला! पूर्ण गावकऱ्यांच्या डोळयांत अश्रू आणणारा हा प्रसंग. ७ वर्षाचा ओम कधी पायाजवळ तर कधी पोटाजवळ आईला बिलगत होता. दोन रात्र पोरगा झोपला नाही. आई, आई जप सतत सुरू होता. पण आज माझा ओम शाळेत आला आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी! मी म्हटलं, ‘ओम, सर्दी झाली रे बेटा तुला!’
गुरूजी आई गेली ना देवाच्या घरी, नदीवर आंघोळ केल्यामुळे सर्दी झाली... पण मला बाम कोण लावील, गुरूजी आई नाही येईल का हो... माझ्या मांडीला बिलगून माझा ओम म्हणत होता. गुरुजी मला मोठं व्हायचं आहे... गदगदलेल्या अश्रुंना सावरत त्याला मी म्हटलं, ‘नक्कीच मोठा होशील तू.’
आईच्या विरहानंतर माझ्या ओमला शाळविषयी ममत्व वाटतं. आधार वाटतो. हे नातं आहे शिक्षक आणि विद्यार्थाचं! जगावेगळं....
- विनोद राठोड.

नकुशी नाही, हवीशी


बाजारात नेहमीप्रमाणे भाजी घेऊन झाली. भाजीवाली मावशी तिच्या बाजूला बसलेल्या मुलीला म्हणाली, "नकुश्या ताईंच्या हिशेबाचं बघ की." हिशोबाच्या वहीत डोकं खुपसून बसलेली एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी छानसं हसली. तिनं पिशवीतली भाजी वरखाली केली. बोटांनी आकडेमोड केली आणि पटापट हिशोब सांगितला. मी पहातच राहिले. माझ्या चेहयाचा अंदाज बहुधा मावशीला आला असावा. ती म्हणाली, ''ताई, ही मुलगी, नकुशा ''. आतापर्यंत नकुशा या नावाबद्दल खूप ऐकलं होतं. वाचलं होतं. पण कधी कुणाला या नावानं हाक मारताना पाहिलं नव्हतं. मी म्हटलं, ''काय गं, एवढ्या सुंदर मुलीला नकुशा नाव चांगलं नाही वाटत''. त्यावर मावशी काहीच बोलली नाही.
त्यानंतर जेव्हाजेव्हा मावशीकडे भाजी घेत होते, तेव्हातेव्हा नकुशा भेटत होती. दरवेळी ती छान बोलायची. हळूहळू मावशीसोबतच्या गप्पांमधून समजलं, नकुश्या हाच त्यांच्या घराचा मुख्य आधार आहे.
मावशीचं कुटुंब मूळचं साता-याचं. नकुशी पहिलं अपत्य. मावशी सांगत होती, ''आमच्या गावाकडं मुलगी झाली की नकुशीच नावं ठेवतात. त्यात काय चुकीचं वाटलं नव्हतं. पण आता वाटतंय. आम्ही मुंबईला आलो. आजूबाजूच्या मुलीची नावं असतात. आमच्या मुलीला तिच्या नावानं चिडवतात. म्हटलं आता तिच्या लग्नानंतर तिच्या नव-याला सांगेन, बाबा आमच्या नकुशीचं आता तरी नाव बदल ,लक्ष्मी ठेव. ही जन्माला आली तेव्हा खूप राग आला होता. भीती वाटली. हिचा बाप तर बघेचना पोरीकडं. कसंतरी वाढवलं पोरीला. पण पोरीनं स्वतःच्या मेहनतीनं शिक्षण घेतलं. दहावी शिकली. घरात कायम गरिबीच. नकुश्याच्या पाठीवर तीन मुलं. भाऊ म्हणाला, मुंबईत ये. म्हणून मुंबईला आलो. आता भाजी विकतो. त्याचा सगळा व्यवहार नकुश्यानं आपल्याच डोक्यावर घेतलाय. माझ्या पोरांनाही तीच शिकवते. दिवाळीत तिने फराळाचा स्टॉल लावला होता. चांगला चालला. आम्हाला नसतं सुचलं. पण नकुश्यानं निभावलं सारं. आता वाटतंय मुलगी हवी तीसुध्दा नकुश्यासारखीच.. नकुशी नाय तर हवीशी''.
मावशी बोलायची थांबली. मी काहीच न बोलता तिचा हात हातात घेतला. बाजूला नकुशा भाजी विकण्यात गुंतली होती. घरी आले तरीही नकुशा डोळ्यांसमोरून हलत नव्हती.

- स्वप्ना हरळकर.

Sunday, 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं ? --डॉ.कैलास दौंड

माझे शालेय शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी, सोनोशी आणि येळी या खेडेगावी झाले. ग्रामीण भागात मिळणारे शिक्षण हे शहरात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा चांगले की वाईट हे त्यावेळी कळत नव्हते पण आपल्याल्या शिकवणारे शिक्षक आत्मीयतेने शिकवत आहेत. हे ध्यानात यायचे. शाळेबद्दल आपुलकी वाटायची. खेडेगावात शालेय शिक्षणासोबतच शेती व शेतीसंबंधी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तिथल्या गरीब पण प्रेमळ माणसांचा संस्कार आपोआप आतमध्ये झिरपत गेला. 
भुतेटाकळी येथे पहिली दुसरीला असताना शाळेची,
शिक्षकांची भीती कधीच वाटली नाही. मंदिर, नदी आणि पटांगणात खेळायचो. खूप मजा यायची. त्यामानाने सोनोशीत तिसरीमध्ये, अपरिचित मित्र आणि नवखे शिक्षक यांची भीती वाटली. त्यातच तो छडी वाजे छमछमचा काळ होता. ते गाणे म्हणायला कितीही चांगले वाटले तरी अनुभवताना घाम फुटे. भीती आणि धाक यामुळे अभ्यासात मागे पडलो. मग एक कमी मारणारे शिक्षक वर्गाला मिळाले आणि पुन्हा अभ्यासाने गती घेतली. एकनाथ कराड नावाचे तेव्हाचे नावाजलेले शिक्षक या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांची शिस्त करडी होती. रोज शेवटच्या तासाला ते पाढे म्हणून घेत. गीताईचा बारावा अध्याय, समरगीते, प्रार्थना गीते ते खूप सुंदर चाली लावून म्हणून घेत .
कधीकधी दुपारी आम्हीे नदी किंवा विहिरीत पोहायला जायचो तेव्हा मग हेच शिक्षक भीती बनून आमच्यासमोर उभे राहयचे .या शाळेत दर गुरूवारी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यात सक्तीने एकेका वर्गाला सहभागी व्हावे लागे. प्रत्येकाला काही ना काही सादर करावे लागे. मला भाषण करायला आवडायचे. सातवीत स्कॉलरशिप परीक्षेला आम्हाला बसवले होते. परीक्षेच्या दिवशीच माझे वडील आजारी होते. पाथर्डीला येण्याजाण्यासाठी दहा रुपये आवश्यक होते. मी संकोचाने आजारी वडिलांकडे पैसे मागू शकलो नाही. परिणामी शिक्षक इतर मुलांना घेऊन निघून गेले. मी मात्र परीक्षेपासून वंचित राहिलो.
येळी येथील हायस्कूलचे शिक्षण बरेच काही शिकवणारे आणि स्वयंशिस्त लावणारे होते. शाळा सात किलोमीटरवर. अभ्यासात बरा होतो. घरी वीज नव्हती. चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागे. घरची माणसे लवकर झोपत. सुरक्षिततेसाठी ते चिमणीदेखील उंचीवरील देवळीत ठेवत. परिणामी अभ्यास थांबवावा लागे. शिक्षक अवांतर वाचनासाठी पुस्तके देत. येथेसुद्धा आमले आडनावाचे एक मारहाण आणि अपमान करणारे शिक्षक होते. त्यांना वैतागून नववीत शाळेत न येताच रस्त्यात बसून तीन महिने काढले. सुदैवाने त्यांची बदली झाली आणि माझी शाळा सुरू झाली.
एक मात्र निश्चित म्हणेन की माझ्या त्यावेळेच्या खेड्यातील शाळा शहरातल्या शाळांहून कमी नव्हत्या. आजच्या इतक्या त्या बालस्नेही नव्हत्या हेही खरेच कारण अजून ही संकल्पना यायला व रूजायला अवकाश होता. ते आमच्या पिढीचे काम आहे.
-डॉ.कैलास दौंड -

शिक्षक, कवी, कादंबरीकार आणि समीक्षक

माझ्या शाळेनं मला काय दिलं ?- मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझं माध्यमिक शिक्षण जून 1979 ते मार्च 1985 या कालावधीत झालं. आमच्या गावातील या शाळेत जवळपासच्या पाच-सहा गावांतली शेतकरी कुटुंबातील मुलं शिकण्यासाठी येत. शाळेतील मुलांचा त्यावेळचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट, गांधी टोपी आणि खाकी हाफ पँन्ट तर मुली पांढरा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट घालत. आमच्या शाळेत दीक्षित सर मुख्याध्यापक असताना त्यांनी वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून खूप चांगले आणि अनोखे उपक्रम शाळेत राबवल्याचं माझ्या स्मरणात आहे. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई यांच्याशी गप्पा त्यांच्याच मुख्याध्यापक पदाच्या काळात झाल्या. शाळेत त्यावेळी ग्रंथालय छोटं असताना सुद्धा खूप चांगली पुस्तकं मिळायची. आमच्यावेळी वाचनासाठी घेतलेलं पुस्तक आठवड्यात एकदाच बदलून मिळायचं, त्यामुळे ते पूर्ण वाचून मगच मी परत जमा करीत असे. साने गुरूजींचं 'श्यामची आई' हे शाळेत असतानाच वाचलं होतं. चांगल्या वाचनाची सवय 
शाळेतील या उपक्रमांमुळेच लागली. आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या पुणे जिल्ह्यात तेव्हा जवळजवळ पन्नास माध्यमिक शाळा होत्या. त्या काळात बहुतांश आंतरशालेय नाट्य स्पर्धांचं आयोजन आणि साहित्यिक उपक्रम आमच्याच शाळेत झाले. मुलांना शाळेत चालत अथवा सायकलवरून येण्याशिवाय अन्य साधन त्या काळी उपलब्ध नव्हतं. तरी सुध्दा पी. टी. शिकवणाऱ्या नांगरे सरांच्या करड्या शिस्तीमुळे वेळेवर जाण्याचा तेव्हा झालेला संस्कार आजही कायम आहे. दहावीच्या वर्षी तर दीपावलीच्या सुट्टीनंतर रात्रीचे जादा वर्ग शाळेत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत चालत. रात्री घरी जाण्याची सोय नसायची. मग आम्ही मुलं त्या काळात पैसे देऊन कोणाच्या तरी घरी राहत असू. मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घरी जात असू. त्यानंतर शेतकरी असलेल्या वडिलांना थोडी फार मदत करून पुन्हा शाळेत जावं लागायचं. शाळेची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच अशी असायची. मात्र दहावीचे जादा वर्ग सकाळीही दहा ते अकरा या वेळेत चालंत. आम्हाला लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे ट्युशन किंवा क्लासला जाण्याची वेळ आमच्यावर आली नाही. मन लावून शिकवणारे शिक्षक असल्यामुळेच पालकंही शालेय शिस्त आणि प्रशासनात फारसा हस्तक्षेप करीत नसंत.
शाळेला प्रचंड मोठं मैदान आहे. साहजिकच शनिवारची सामुदायिक कवायत आणि ती सुद्धा वाद्यांच्या साथीत, हा आनंदाचा सोहळाच असायचा. रोजची शाळेची प्रार्थना सुद्धा शाळेच्या मोठ्या प्रांगणात होत असायची. गावातील शाळा असूनही या शाळेचे अनेक विद्यार्थी अमेरिका ते पूर्वेकडील तैवान सारख्या देशांत आणि प्रशासनात अगदी जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
माझ्या शाळेनं मला केवळ पुस्तकी शिक्षणच दिलं नाही, तर आयुष्याकडे बघण्याची दृष्टी दिली. या अफाट जगात कुठेही गेलं तरी आपला निभाव लागेल, हा आत्मविश्वास दिला. आज मी जेव्हा मुलांसमोर शिक्षक म्हणून उभा असतो तेव्हा माझ्या शाळेनं दिलेला हा आत्मविश्वास मला माझ्या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्याचं बळ देतो. म्हणूनच माझी शाळा कायम माझ्या बरोबर असते. कारण तिचं देणं आता माझ्या जगण्यात उतरलेलं आहे.
मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक, बोरिवली

शाळेनं मला काय दिलं?-प्रवीण घुगे.प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. प्रत्येकाच्या आयुष्याची जडणघडण आणि विकास शाळेतच होत असतो. मी ग्रामीण भागातल्या शाळेत शिकलो. सुरूवातीला जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर अणदूर इथल्या माध्यमिक शाळेत माझं शिक्षण झालं. पण शाळेत नेहमीच्या पाठ्यपुस्तकी शिक्षणाशिवाय इतर उपक्रम असायचे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आम्हांला एक विश्व पाहायला मिळालं. तेव्हा मी शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलो होतो. मुलांच्या मनामध्ये लोकशाही मूल्यं रूजवण्याचं काम अशा उपक्रमांनी केलं.
शाळेचा मुख्यमंत्री आणि आज बालशिक्षण आयोगाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे, यात अर्थातच शाळेचे संस्कार आणि उपक्रम याचाच भाग आहे. त्यामुळे शाळेतल्या अभ्यासेतर उपक्रमांतून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं, असं मला वाटतं. 

शाळेनं मला काय दिलं? - अमोल उदगीरकर


आजुबाजुचे अनेक लोक शाळेबद्दल नॉस्टालजीक वगैरे होतात तेव्हा मला ती भावना समजून घेता येत नाही. मला माझ्या शाळेबद्दल भरभरून अशा किंवा काहीच भावना मनात येत नाहीत. मी दहावीपर्यंतचं शिक्षण परभणीमधल्या बालविद्यामंदिर या शहरातल्या सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या शाळेत घेतलं. माझ्या शाळेसंबंधित बहुतेक आठवणी कोंदट, घुसमटलेल्या आहेत. माझा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा होता. माझे आवडते विषय म्हणजे भाषा विषय आणि सामाजिक शास्त्रे. पण हे विषय वर्णनात्मक असल्याने त्या विषयांमध्ये कधीही भरभरून मार्क्स मिळत नव्हते. त्या काळातल्या पद्धती प्रमाणे आमच्या शाळेत पण गणित आणि विज्ञान या विषयात हुशार असणारे विद्यार्थी म्हणजेच हुशार आणि उज्ज्वल भवितव्य असणारे विद्यार्थी अशी थोडी भाबडी आणि थोडी भंपक धारणा होती. ज्याचे भाषा विषय आणि इतिहास वैगेरे विषय चांगले आहेत त्याच्याकडे फक्त एक बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणून बघण्यात येई. मी कधीही शाळेत 'ब्राईट' मुलांच्या यादीत नव्हतो. हुशार विद्यार्थ्यांचे जे 'कंपू' होते त्यात पण मी कधी नव्हतो. आजूबाजूच्या हुशार मुलांशी (गणितात भरभरून गुण मिळवणाऱ्या) अनेकदा तुलना झाल्याने माझ्या मनात नकळत बराच न्यूनगंड तयार झाला. जो अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. अजूनही मी स्वतःला अनेकांपेक्षा कुठेतरी कमी लेखतो याची मूळं माझ्या शालेय जीवनात आहेत. शाळेने मला आयुष्यात फक्त हीच एक गोष्ट दिली.
सगळेच हुशार विद्यार्थी नंतर सायन्स शाखेत जाऊन आयुष्यात यशस्वी वगैरे होणार आहेत असं एक गृहीतक पण होत. त्याचा मला फार त्रास झाला. मला आठवतं, दहावीला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तुकड्या पाडण्यात आल्या होत्या. गणित आणि विज्ञानात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'अ' तुकडीत टाकण्यात आलं होतं. मी बऱ्यापैकी हुशार असूनही मला मध्यम हुशार मुलांच्या तुकडीत टाकण्यात आल होतं. माझ्यासोबत नेहमी राहणारे, एकाच बेंचवर बसणारे, सोबत डब्बा खाणारे मित्र एकदमच त्या दिवसांपासून माझ्याकडे तुच्छतेने बघायला लागले. नवीन प्रकारची वर्णव्यवस्था होतीच ती. त्या अडनिड्या दिवसात मनावर बरेच चरे उमटले. मानसशास्त्रात एक 'औरंगझेब कॉम्प्लेक्स' नावाची संकल्पना आहे. 'वरून मी खूप आनंदी आहे, कणखर आहे’ असं दाखवणारा (pretend करणारा)माणूस जेव्हा आतून खूप असुरक्षित असतो तेव्हा तो माणूस औरंगझेब कॉम्प्लेक्सचा शिकार आहे असं मानलं जातं. मी माझ्या शाळेतल्या दहा वर्षात याच कॉम्प्लेक्सचा शिकार होतो. जरा कठोर वाटेल पण शाळा हा फक्त माझ्यासाठी एक सुधारित कोंडवाडा होता. ज्या दिवशी माझा शाळेशी संबंध संपला त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. शाळेतून बाहेर पडल्यावर मी नंतर कधीही शाळेमध्ये पाउल टाकलं नाही. आता मागे वळून बघितल्यावर लक्षात येतं की फक्त शाळेला दोष देण्यात अर्थ नाही. तो काळच काही अजाण समजुतींना घट्ट कवटाळून बसला होता. आताही त्यात काही फारसे बदल झाले असतील असं वाटत नाही.
मी दहावीला चांगले गुण मिळवून पण 'आर्टस' शाखेत गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला 'झाले मोकळे आकाश' ही भावना मनात आली. काही चांगले मित्र आणि थोडे चांगले शिक्षक हेच शाळेत घालवलेल्या लांबलचक दहा वर्षांचं संचित. माझे अनेक शालेय मित्र आज आयुष्यात लौकिकार्थाने यशस्वी आहेत, मोठ्या पदांवर आहेत आणि त्यांच्या मनात शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. म्हणजे ज्या शाळेशी आपली नाळ कधीच जुळली नाही त्याचं शाळेने अनेक विद्यार्थ्यांचं जीवन पण घडवलं आहे, याची आता जाणीव होत आहे. बहुतेक शाळा आणि मी हेच एकमेकांसाठी 'मिसफिट' असू. हल्लीच्या शिक्षणव्यवस्थेत आणि पर्यायाने शाळांमध्ये पण जरा वेगळी आवड निवड, अभिरुची, कल असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुणाहीपेक्षा कमी नाही, असलाच तर थोडे वेगळे आहात असा दिलासा देणारी यंत्रणा व्हावी. आणि जमलं तर अती हुशार, हुशार, निम्न हुशार, ढ असं (झू मध्ये प्राण्यांचं होतं तसं) कंपार्टमेंट करण बंद व्हावं एवढीच अपेक्षा.

अमोल उदगीरकर -
चित्रपट लेखक, समीक्षक, पुणे

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -सुकांत चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार

माझी शाळा रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुर्धे इथली जिल्हा परिषदेची. दररोज 3-4 किलोमीटरची पायपीट. सोडायला आईवडील नाहीत की रिक्षावाले काका , स्कुल बस नाही. सवंगड्यांसोबत गप्पा मारत शाळेतून जाणंयेणं. 
चिंचा, पेरू, आंबा पाडणं आणि बागायदार किंवा कोणी वडीलधारी बघण्याच्या आधी जीव मुठीत धरून सुसाट पळून जाणं. यातही एक वेगळाच आनंद असायचा. दप्तर म्हणजे खांद्यावर पिशवी. एक-दोन पुस्तकं आणि पाटी यांचंच काय ते ओझं. गुरुजींचा आदर करा, हे सांगण्याची वेळ आमच्या पालकांवर कधीच आली नाही. शाळा सुटल्यावर पोहणं. आल्यावर दिवाबत्ती करणं, काहीतरी खाणं आणि मग अभ्यास. तेव्हा वीज नव्हती. टीव्ही, मोबाइलचा प्रश्नच नव्हता.
पूर्वी म्हणजे 35-40 काहीही साधनं नव्हती तरी मुलं उत्तम शिकली. दप्तरांचं ओझं न ताण न घेता शिकली. आज सगळं काही आहे तरी मुलं तणावाखाली आहेत. का बरं? मुलांना नेमकं हवंय तरी काय? या प्रश्नाचा भुंगा कायम मोठ्यांच्या डोक्यात आहे. मुलांना हवंय मोकळं वातावरण, मात्र तेच नेमकं आज मिळत नाहीये, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
शब्दांकन - जान्हवी पाटील, रत्नागिरी

माझ्या शाळेनं मला काय दिलं?-- डॉ. शीतल आमटे

शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोर कितीतरी गोष्टी उभ्या राहतात. माझ्या शाळेचे नाव लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा. मी १९८७ ते १९९६ पर्यंत शाळेत जात असे. आनंदवनपासून पाच किलोमीटर दूरवर ही शाळा होती. आम्ही पहिले सायकल रिक्षा आणि मग जुन्या जोंगाने शाळेत जात असू. आईवडिलांना आम्हाला जगातील कुठल्याही चांगल्या शाळेत घालता आले असते पण त्यांनी हीच शाळा निवडली त्याचे कारण शाळेत मराठी मिडीयम होते आणि आमच्या सारख्याच आर्थिक परिस्थितीतील इतरही मुली होत्या आणि मुख्यतः: बऱ्याच मुली गरीबही होत्या. आमच्यात empathy सारख्या महत्वाच्या भविष्यातील उपयोगाच्या skills develop करण्यासाठी त्यांनी आम्हाला या शाळेत घातले. 
लाल कौलांची आमची छोटीशी बसकी शाळा, आमचे मोडके डेस्क बेंच, अतिप्रचंड ग्राउंड उत्तम शिक्षक, सतत आमच्या शाळेत डोकावून पाहणारी बाजूच्या मुलांच्या शाळेतील मुले, आमचा रणगाडा ( जुनी जीप ज्यातून आम्ही शाळेत जात असू) आणि लाल -पांढऱ्या स्कर्ट ब्लाउज मध्ये दप्तर हातात धरून जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी. आमची शाळा गरीब असली तरी आम्हाला सुजाण नागरिक बनविण्यासाठी लागणारे सामाजिक शिक्षण देण्यास समर्थ होती. शिक्षणाचा शाळेने कधी बाऊ केला नाही किंवा शाळेचे कधी पेपरात जाहिरातींद्वारे कोडकौतुक झालेले मला आठवत नाही. किंबहुना उत्तम शिक्षण, सुजाण शिक्षक, मनापासून शिकणारे विद्यार्थी आणि आवश्यक तेवढेच शिक्षणेतर कार्यक्रम असे optimum पॅकेज होते. त्यात कधी आम्ही झाडे लावताना झाडांपेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष देऊन पर्यावरण दिन साजरा केला नाही की सोशल वर्क नावाखाली गरीब मुलांना आपलेच फाटलेले कपडे अगदी संकोचाने वाटले नाहीत. पण खेड्यातील मुलींसोबतच शिकलो आणि त्यांच्यात मिसळलो. मी तर सातवीपासून मागच्याच बेंचवर प्रतिभा नावाच्या मुलीसोबत बसत असे. ती आठ किलोमीटर वरून चालत येई पण रोज डब्यात माझ्यासाठी एक भाकर जास्त आणी. आपल्या डब्यापेक्षा तिच्याच डब्यातील भाकर जास्त खाल्ल्याचे मला आठवते. त्याबदल्यात मी तिला शिक्षणातील कठीण संकल्पना शिकवीत असे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय असा भेदभाव राहिला नाही. 'ते' आणि 'आम्ही' असाही भेद राहिला नाही.
आज माझा मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा चित्र पूर्ण बदलले आहे. शिक्षणक्षेत्र हा बाजार झालेला आहे. आमची जुनी शाळा सेमी इंग्लिश झाली आहे. मराठी माध्यमाची चांगली शाळा शोधणे हा महत्प्रयासाचा कार्यक्रम होता. एकतर आम्ही आनंदवनात राहतो तिथे शाळा कमी आणि त्यातच सर्व शाळा अर्धवट इंग्लिश, म्हणजे संपूर्ण माध्यम एका भाषेत नाही. त्यामुळे फार अडचण व्हायला लागली. मुलाच्या बाबतीत दोन तीन वर्ष चांगली शाळा शोधली. पण सर्व शाळांमध्ये काही ना काही प्रश्न असल्याने त्याला सध्यातरी जवळच्या शाळेतच घालण्याचा निर्णय घेतला. ही शाळा फार मोठी नाही, पण मोठाल्या कॉर्पोरेट शाळांसारखे इथे प्रश्न तरी येऊ नयेत. परवाच एक मैत्रीण तिच्या मुलांबद्दल सांगत होती की हल्ली अगदी मुलांमधल्या चर्चा म्हणजे फोन. 'माझ्या आईकडे apple फोन आहे आणि तुझ्या आईकडे vivo ' यावरून दोघांचे उच्च-नीचता ठरविण्याबद्दल भांडण झाले. त्यांच्याकडे सोशल वर्कच्या तासात आजूबाजूची गरिबी दाखवून आणतात आणि पर्यावरणावर भाष्य करतात. एक झाड लावून त्यापुढे काहीच होत नाही. त्या झाडाचे कुणाला पडलेले नसते, फक्त शाळेच्या रिपोर्टमध्ये एक ऍक्टिव्हिटी म्हणून ते केले जाते. मुलांना दप्तराचे ओझे आणि त्यावर आईवडिलांच्या अपेक्षांचे टेन्शन. अश्या बऱ्याच चर्चा ऐकल्या की सुन्न व्हायला होते.
- डॉ. शीतल आमटे- करजगी मुख्य कार्यकारी अधिकारी, 
महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)

माझ्या शाळेनं मला काय दिलं? - श्रीरंजन आवटे.

का कोण जाणे; पण सुरूवातीपासून शाळेची प्रचंड भीती माझ्या मनात होती आणि काहीही झालं, तरी अशा ठिकाणी जायचं नाही, असा चंगच मी बांधला होता. मी काही शाळेत जात नाही, हे पाहून माझ्या काकाने मला भीती घातली की शाळेत गेला नाहीस तर गुरामागं पाठवतो तुला. खरं म्हणजे आमचं काही शेत नव्हतं; पण गावात असल्याने दररोज गुरांमागे जाणा-या पोरांकडे पाहून भीतीने का असेना मी शाळेत पाऊल टाकलं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील पारेवाडी कोर्टी आणि वीट या गावांमध्ये माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यात शाळेविषयी सर्वाधिक प्रेम वाटलं ते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट या माझ्या माध्यमिक शाळेत. ओहोळ सर आणि आवटे सर या दोघांच्या आग्रहाखातर कोर्टी या माझ्या राहत्या गावापासून ८ किमी दूर असणा-या गावी मी शिकायला लागलो. नंतर तालुक्याच्या गावाहून उलट प्रवास करत मी वीटला येत असे. ‘वीटची गोडी अवीट’, अशी कोटीही आम्ही अनेकदा करायचो. 
इयत्ता सहावी ते दहावी या पाच वर्षांच्या काळात शाळेनं जे काही दिलं त्याबद्दल आम्ही शाळेचे मनापासून ऋणी आहोत. स्कॉलरशिप असो वा एमटीएस, इलिमेन्टरी-इंटरमिजिएट चित्रकलेच्या परीक्षा असोत किंवा खोखोचा सराव सगळ्या बाबतीत आमचे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत राहीले. आमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर दोन्ही वेळेस आमचे शिक्षक आमच्यासाठी अधिक वेळ तास घेत असत. आम्ही स्कॉलरशिप, एमटीएसमध्ये नंबर पटकावले; अगदी टी एन शेषन (तेव्हा त्यांच्याविषयी फार काही माहीत नव्हतं) यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला पण त्याहून अधिक त्या अभ्यासातला वेळ प्रचंड एंजॉय केला. शाळेला सुट्टी असेल तर मला बोअर व्हायचं इतकी शाळेविषयी आत्मीयता निर्माण झालेली होती. शाळेचं ग्रंथालय किंवा प्रयोगशाळा फार काही सुसज्ज नव्हती; पण आजकाल अभावानेच दिसणारी आस्था आमच्या शिक्षकांमध्ये होती. 
आमच्या शाळेला प्रशस्त पटांगण होतं. आज शहरातील अनेक शाळांमध्ये मैदानच नसतं हे पाहून वाटतं, खेळाशिवाय शाळेला काय अर्थ! शाळेतील अनेक मुलं खोखोमध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर चमकत होती; मात्र बहुतेकांप्रमाणे मला सर्वाधिक क्रिकेट आवडायचं. ‘अ’ तुकडीच्या विरूध्द ‘ब’ तुकडी अशी आमची ११ रूपयांची मॅच असे. या मॅचेस धमाल आणायच्या. मी त्यात इतका बुडून जायचो की एका मॅचमध्ये कॅच घेऊन मी पडलो आणि मला फ्रॅक्चर झालं. अर्थातच या सा-याच गोष्टीत आम्ही मिळून मिसळून सर्वत्र होतो त्यामुळे खूप चांगले मित्र मिळाले. वर्गातल्या मुली शाळेत असताना मैत्रिणी झाल्या नाहीत कारण मुलींशी बोलायची परवानगीच नव्हती. अगदी मुला-मुलींसाठी शाळेत जाण्याचे रस्तेही वेगळे होते. शाळेतून बाहेर पडल्यावर वर्गातल्या काही मुलींशी छान मैत्री झाली. शाळेची सहल गेली तेव्हाही आम्ही सर्वांनी त्या पर्यटनाच्या ठिकाणांपेक्षाही एकमेकांसोबतचं असणं अधिक एंजॉय केलं. 
आज शाळेचे मुख्याध्यापक असणारे मारकड सर आम्ही मुलांनी वाईट मार्गाला लागू नये, म्हणून आवर्जून गणिताच्या तासातच इतर गोष्टी सांगत असत. त्यांची स्वतःची अध्यात्माची एक समज आहे आणि त्यातून स्वतःच्या शोधासाठी ते आम्हा सर्वांना प्रवृत्त करत असत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत असे. स्लो सायकलिंग, लिंबू चमचा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा... असे अनेक उपक्रम सुरू असत. शाळेत असतानाच आम्ही काही मित्रांनी मिळून ‘नूतन भारत’ नावाची संघटना स्थापन केलेली होती. अगदी काही महिने ही संघटना टिकली; पण नवं काही करण्याची इच्छा सतत निर्माण होईल, असं वातावरण शाळेनं आम्हाला दिलं. इयत्ता दहावीला असताना आजबे सर आमचे वर्गशिक्षक होते. आमच्या वर्गातून कोणीतरी बोर्डात यावं, अशी सर्वांची इच्छा होती. ती मात्र अपुरी राहिली. अवघ्या काही मार्कांनी माझा बोर्डातला नंबर गेला. मी मात्र प्रचंड आनंदी होतो. स्कॉलरशिप, एमटीएस या परीक्षांमधील यशाहूनही लोकांच्या नजरेत दहावी ही ग्रेट परीक्षा असल्याने मला कमालीचा आत्मविश्वास मिळाला होता. त्याहूनही अधिक म्हणजे अत्यंत खुल्या, निरोगी आणि निखळ अशा वातावरणात आपल्याला शिकता आलं, याचा मला आनंद होता. शाळेच्या अभ्यासाच्या धबडग्यात आपलं मनसोक्त वावरणं, असणं हरवलं नाही, याचं बरचंसं श्रेय माझ्या पालकांना आणि शाळेला आहे आणि लाभलेली मैत्री ही सर्वांत मोठी उपलब्धी. याहून आणखी काय हवं असतं

श्रीरंजन आवटे.

मला माझ्या शाळेनं काय दिलं? - -आमदार उदय सामंत.


माझे बालपणातील ते दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसतात. मित्रांसोबत गप्पा मारणे, कधी खूप मस्ती करणे तर कधी शिक्षकांना घाबरून गुपचुप बसणे, अभ्यासाचे टेन्शन नव्हते तरीदेखील गुरूजींच्या भीतीने वेळेत परिपाठ करणे, कधी दांडी मारणे, मधल्या सुट्टीत सर्वांसोबत जेवणे, शाळेचा स्नेहसंमेलनाचा दिवस या सगळ्या गोष्टींतून माझे बालपण कधी निघून गेले कळलेच नाही. ते दिवस आठवले की आजही मला आनंद होतो. त्या आठवणी आजही माझ्या मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत.
माझ्यावेळी सर, मॅडम असा प्रकार नव्हता. गुरूजी आणि बाई असे शिक्षकांना संबोधत होतो. त्यांचा मुलांवर आदरयुक्त धाक होता. त्या भीतीने का होईने आम्ही सर्व मुले घाबरून वेळेवर अभ्यास करणे, शिस्तबध्द वागणे हे संस्कार आपोआपच आमच्यावर झाले. तसेच घरी आईवडिलांचा प्रेमळ धाक त्यामुळे वर्तणुकीबद्दल कोणाची तक्रार नाही. शाळेत जाताना मज्जा वाटायची, कोणताही ताणतणाव अगदी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत नव्हता. आज प्राथमिक शिक्षण घेतानाही मुले तणावाखाली दिसतात.
माझ्यावेळी शाळेत आम्ही सर्व मुलांनी अंगण सारवले आहे. हे काम करताना कमीपणा वाटायचा नाही, उत्साहाने आम्ही काम करत होतो. शाळेत कधीच असुरक्षित वाटलं नाही. त्यावेळी माध्यमे नसल्याने जीवनाचा पुरेपूर आनंद मुलं घेत होती. आता माध्यमांचा प्रभाव तसंच शाळेतील अभ्यासाचा ओझं कमी होणं गरजेचं आहे, मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नये.
माझे शिक्षण पाली येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. पण लहानपणापासून समूहामध्ये राहण्याची सवय असल्याने आज राजकारणात यशस्वी झालो. शिक्षणामुळे राजकारणात नाही आलो तर जपलेल्या माणुसकी, आपुलकीमुळे नेतृत्वाची क्षमता निर्माण झाली. आज शेकडो नागरिकांच्या मला शुभेच्छा आहेत. त्यामुळे शिक्षण घेणे महत्वाचे आहेच. पण, आपल्यातील चांगल्या कौशल्यांना वाव देणेही महत्त्वाचे आहे.
- आमदार उदय सामंत, रत्नागिरी मतदारसंघ आणि अध्यक्ष, म्हाडा
शब्दांकन - जान्हवी पाटील.

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -- ईर्शाद बागवान


शाळेचे दिवस एकत्रितपणे छान होते. आठवतात अधूनमधून. चौथीपर्यंतच्या इनामदारबाई आठवतात, चेहऱ्यावरून हात फिरवत मायेने बोटे मोडणाऱ्या. चंदा नावाची वर्गमैत्रीण, त्यावेळच्या मानाने बरीच उंच. भलीथोरली. सारखं मांडीवर बसवून घेत कौतुक करणारी. शांतीलाल, प्रवीण, संतोष यांसारखे बेरकी दोस्त. शाळेच्या वाटेवर भेटणारा येडा पांग्या आठवतो. किडक्या दातांनी हातपाय खुरडत हसतखिदळत सदा मागेमागे पळणारा. पाटीतली चिंचाबोरंपेरू विकणारी यमाईही आठवते. तसंच पाचवीनंतरच्या वर्गातले इंग्रजीचे कडक्क घाऱ्या डोळ्यांचे सावंत सर. त्यांची एक छडी इंग्रजीचा आयुष्यभराचा बेस पक्का करून गेली. दोन दिवस हात पोळत होता. असेच साबळे सर बीजगणिताचे. पण त्यांची शैली विनोदी. कधीमधी चिडायचे तेव्हा मग थेट लाथाच घालायचे. पण इतकं भारी शिकवायचे की, गणित पहिलं कुणाचं होतंय, अशी स्पर्धा लागायची आमच्यात. पीटीचे माने सर आठवतात. काळेकभिन्न. बुटके. जाड मिशा. कायम हातात छडी. शांतीत खेळायलासुद्धा न देणारे. आणि धनवे सर संस्कृतचे. कायम पान तोंडात. गोरे. धष्टपुष्ट. मिशांचा आकडा. पाठांतर छडीच्या तालावर करून घेणारे.
ही लिस्ट फारच मोठी होईल. एकूण आमच्या वेळी शिक्षणात छडीशिवाय पर्याय नव्हता. पण एक मात्र झालं. आमचा पाया बाकी भक्कम केला या छडीने. आयुष्यभर न विसरण्याजोगा. तसं तर एखादेवेळीच प्रत्यक्ष छडी खाल्ली असेल. पण छडीची खरीखुरी भीती मनात होती. मायेने जवळ घेणारे शिक्षक फक्त प्राथमिकला.
आता वाटतं, छडी नसती तरी भागलं असतं कदाचित. प्रेमाने जग जिंकता येतं. आम्ही तर, निरागस मुले होतो न कळत्या वयातली.
कधीकधी, खूप हमसून रडण्याचेही प्रसंग आले. पीटीच्या सरांनी खेळात घ्यायला कायमच नकार दिला आणि आपण कायम प्रेक्षकाचाच रोल निभावला तेव्हा. उताऱ्याची पूर्ण केलेली वही मित्राकडे राहून तो ती घरी विसरल्यावर आपल्याला मार खावा लागला तेव्हा. फुटबॉलचे खिळेवाले बूट घालून येणारे चौहान सर मित्राला लाथा घालत होते तेव्हा. कारण काय तर उत्तर येत नाही. आणि गॅदरिंगमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा असूनही, गाण्याची प्रॅक्टीस करूनसुद्धा ऐनवेळी नाव घेतलं नाही म्हणून.
अशावेळी संस्कारक्षम आपण आणि अत्याचारक्षम आजुबाजूचे, असं वाटायचं. खूप रडू यायचं. मस्तीखोर नसताना, भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा तर अजूनच ताप द्यायच्या.
धर्मातली ऐकीव बंधनं तर प्रार्थनेला हात जोडून नीट लक्ष केंद्रीत होऊ द्यायची नाहीत. शिक्षकांची नजर चुकवून हात हळूच पसरवले जायचे आणि तौबा तौबाचा गजर तोंडून चालू असायचा. आताशा वाटतं, आजच्या काळातल्या शाळांनीही धर्म जसा काय वाटून घेतला आहे. मराठी शाळांमध्ये सगळे मराठी सणवार, व्रतवैकल्ये, प्रार्थना, भजनं, गीता वगैरे. इंग्रजी शाळांत ख्रिश्चन धर्मपारायणं, उर्दू शाळांत मुस्लिम उपासनापद्धती. हे सगळंच, खरं तर अति होतंय.
आपण मुलांना त्यांच्या कलाने नीट वाढू देत नाही. त्यांच्यावर कायमच काही ना काही लादत राहतो. आपल्याकडे निकोप शाळा कधी निर्माण होणार? जिथे धर्म नसेल, पण संस्कार असतील. जे शिक्षकवृंदांच्या हालचाली, बोलण्या- वागण्यातून मुलांवर होतील. वातावरण मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक वाढीसाठी उपयुक्त असेल. जिथून विकार वाऱ्यावर उडून जातील. आणि राहीले तरीही सामाजिक नुकसान न होण्याच्या पातळीपर्यंत राहतील. उद्याचं भविष्य म्हणून आपण मुलांकडे पाहतो. आणि त्यांच्या बाबतीत अति काळजी असल्याचं दाखवत वाढीच्या अंगाने निष्काळजी राहतो.
आजच्या माझ्या मुलीच्या मराठी शाळेचे चित्र तरी फारसे सुखावणारे खचितच नाही. आजच्या शाळा म्हणजे भरमसाठ लिखाण आणि बेसिक कमकुवत, अशी गत. पळा पळा स्पर्धा करा एवढंच का आपल्या जगण्याचं सूत्र? चांगला नागरिक बनण्याची शाळा ही पहिली पायरी आहे. हेच आपले ध्येय असावं. म्हणजे जराशाने भावना दुखण्या - दुखवण्याची वेळ कुणावरही येणार नाही. सब्र का माद्दा बढेगा. समोरच्याला ऐकून घेण्याइतकी, समजण्याइतकी कुवत आपल्यांत निर्माण होईल. जरी ते नावडते असले तरीही.
शाळेनं मला काय दिलं, हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा बराच काळ उत्तराच्या शोधात मेंदू ब्लँक होतो. मग वाटतं, शाळेने भलेबुरे संस्कार तर केलेच. ज्ञानही दिलं. मित्र दिले. पण सगळंच मागं पडलं. जगण्यातल्या कोलाहलात हरवलं कुठेतरी. आत्ता या धावपळीच्या जगण्यात पदोपदी कामाला येतो संयम. आणि तो बहुतांशी माझ्या स्वभावाचा भाग असला, तरीही नीट विचार करता, त्याला आकार दिला शाळेनेच हेही आकळतं. ह्या बाबतीत शाळेचे अनंत आभार मानायलाच हवेत
- ईर्शाद बागवान.

शिकणे आनंदाचे -आणि तानाजीने अभ्यासाचा गड सर केला

शून्यात लावलेली नजर, डोळ्यातून वाहणारे पाणी, दप्तर उचलण्याचीदेखील ताकद नसलेला तो आज पहिल्यांदाच शाळेत आला होता. त्याचं नाव तानाजी. पण गुणवत्तेचा गड सर करण्याचं फार मोठं आव्हान आमच्यासमोर होतं... तानाजी पहिल्यांदा माझ्या वर्गात नव्हता. पण गतिमंद असलेल्या तानाजीच्या तक्रारी दुसऱ्या शिक्षिका ऐकवायच्या, एवढंच नाही तर त्याच्या आईशीही या शिक्षिका चिडून, वैतागून बोलत. मला हे सगळं कुठंतरी खटकत होतं.
दोन वर्षानंतर तानाजीचा वर्ग माझ्याकडे आला. या विशेष मुलांच्या बाबतीत गुणवत्तेचे माझे स्वतःचे असे निकष आहेत. त्या मुलांनी सद्यस्थितीच्या पुढे जाण्याची नुसती धडपड जरी केली आणि अर्धं पाऊल जरी पुढं टाकलं तरी त्याचा आभाळाएवढा आनंद मला होतो. तानाजीबाबतही त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले.
तानाजीशी गप्पा मारणे, त्याला वर्गात समोर बसविणे असे उपचार त्याला माणसांत आणण्यासाठी सुरु केले. पण हा ध्यानस्थ योग्याप्रमाणे ठराविक ठिकाणी बसून खिडकीतून आईची वाट बघत बसायचा. माझ्या प्रयत्नाला कुठलाच प्रतिसाद देत नव्हता.
एक दिवस तानाजीची आई वर्गात आली. तिला वाटले की आता नवीन बाई ‘तिचा मुलगा शाळा शिकायला कसा अयोग्य आहे’ याचाच पाढा वाचतील, म्हणून बिचारी पूर्वतयारीनेच आली होती. येता क्षणी तिने पडती बाजू घेत स्वत:च्या नाशिबाला दोष दिला आणि तो वेडा आहे, त्याला फक्त वर्गात बसू द्या वगैरे विनवण्या सुरू केल्या तेव्हा माझेही डोळे किंचित पाणावले! तिला जवळ बसवून घेतलं आणि सांगितलं की “बाई, आधी तुम्ही तुमच्या मुलाला ‘वेडा’ म्हणणे बंद करा. त्याला काही येत नाही असं तुम्हीच नका ठरवू. कारण प्रत्येक मूल शिकू शकतं, फक्त प्रत्येकाला लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असतो, एवढंच! मी बघेन त्याच्या अभ्यासाचं, तुम्ही नका काळजी करू.” माझ्या समजावण्याने त्या थोड्या शांत झाल्या.
आता तानाजीच्या आईला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याच्या अभ्यासामागे लागणं भाग होतं. आणि इथून सुरू झाला एक प्रवास!! म्हणतात ना की प्रत्येक रोप प्रकाशाच्या दिशेने वाढतं. त्याचप्रमाणे वर्गात नित्यनेमाने घेतले जाणारे उपक्रम, कविता, नाच, गाणी वर्गातील उपलब्ध शैक्षणिक साहित्य या सर्व कृतीच्या ‘प्रकाशा’कडे तानाजी नजर वळवून बघू लागला. आणि माझ्या तानाजीच्या नजरेत मला त्यांची हसरी छटा दिसू लागली!
आता तो वर्गात सामूहिक कवितेच्या सादरीकरणात उभे राहून थोडेफार हातवारे करू लागला. वहीवर रेघोटया मारून माझ्याकडून ‘बरोबर आहे’ असं म्हणवून घेण्यात आणि हक्काने घरचा अभ्यास मागण्यात रमू लागला. खेळता खेळता जागा बदलून कुठंही बसणं आणि दप्तर सापडत नाही म्हणून डोळ्यातून घळघळ पाणी काढत मला दप्तर शोधायच्या कामगिरीवर लावणं असं सुरू झालं.
मूलभूत वाचन प्रशिक्षणातील कृती त्याला खूप आवडतात. या कृतींमुळे तानाजीचा वाचनाचा वेग आश्चर्यकारकपणे वाढला आहे. त्याला अजून अक्षरांचे लेखन व्यवस्थित जमत नसले तरी तो अक्षरं ओळखतो. एक दिवस ‘पाणी’ हा शब्द मी वाचला तर या पठ्ठयाने ‘मी नळावर पाणी भरतो’ हे वाक्य सांगितलं, त्याची प्रगती पाहून मी खूप खूष झाले.

- रोहिणी विद्यासागर.

Tuesday, 13 November 2018

पालावर साजरी झाली दिवाळी

जालना जिल्ह्यातलं अंबड शहर. दिवाळीचे दिवस. शहराबाहेरच्या पालांवर लगबग सुरू होती. ‘समाजभान’ची टीम आली होती. पणत्या, सुगंधी तेल, उटणी, साबण, कपडे, फटाके, फराळ आणि उत्साह आपुलकी घेऊन. ''आपण खूप आनंदात सण साजरे करतो. पण शहराबाहेरच्या राहुट्यांमध्ये उत्सवांमुळे काहीच फरक पडत नाही. फिरस्तीवर असणाऱ्यांच्या पालांवर दिवाळीतही अंधारच असतो.'' ‘समाजभान’चे दादासाहेब थेटे सांगत होते. थेटे इंदिरानगर मधल्या छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात 

शिक्षक. अंबड, घनसावंगी तालुक्यातल्या गोरगरीब, तांड्यांवर राहणाऱ्या मुलांचं, पालकांचं प्रबोधन करून त्यांना शाळेत आणलं आहे. ‘समाजभान’ची सुरुवात 2011 च्या दिवाळीत 20 समविचारी मित्रांच्या चर्चेतून झाली. सुरवातीचं नाव मैत्रेय प्रतिष्ठान. बाबा आमटे त्यांचं प्रेरणास्थान. आनंदवनातून परतल्यानंतर 2016 मध्ये ‘समाजभान’ असं नामकरण. समाजभान टीममध्ये अखंड कार्यरत असणारे 20 जण. याखेरीज मोहिमेसोबत कार्य करणारे जिल्हाभरात 1 हजार मित्र.
2016 पासून ' एक दिवा पेटवूया , चला दिवाळी साजरी करूया' उपक्रम. गेल्या वर्षी सौर उर्जेवर चालणारे दिवे तांड्यावर वाटण्यात आले होते. यावेळीही वंचित घटकांसोबत आणि पालावरही दिवाळी साजरी होईल, अशी आखणी करण्यात आली. 15 दिवस आधी तयारीला सुरुवात. शहरातल्या दानशूर व्यक्तींचाही सहभाग. कुणी चिवडा,लाडू,शंकरपाळी,फराळाची जबाबदारी पार पाडली तर कुणी इतर सामग्रीची.
पालावर 130 ऊसतोड कामगार. या कुटुंबांबरोबरच भंगारवेचक, एचआयव्हीग्रस्त अशा 320 हून अधिक महिलांना साड्या वाटण्यात आल्या. 450 हून अधिक मुलांना फटाके आणि खाऊ. समाजभानमुळे खऱ्या अर्थानं वंचितांची दिवाळी साजरी झाली.
-अनंत साळी.

पोलिसांचं बॅंडपथक आणि भाऊबीज

परवाची भाऊबीज. रत्नागिरीतल्या माहेर या सामाजिक संस्थेचा परिसर. पोलीस मुख्यालयाचं बँडपथक आलं होतं. मोठीमोठी वाद्यं. मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता. बँडपथकाचा इथला असा पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे हरखून गेलेली. 'जयोस्तुते... सत्यम् शिवम् सुंदरम्.... सारे जहाँ से अच्छा... जहाँ डाल डाल पर सोने की चिडियां.....' अशा विविध गाण्यांच्या धून. मुलांबरोबर हळूहळू संस्थेतल्या आजीआजोबांचे पायही थिरकायला लागले. आम्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. दिवाळी आपापल्या परीनं प्रत्येकानं साजरी केली. निराधारांनाही सणाचा आनंद लुटता आला पाहिजे, असं आमच्या 'आपुलकी' संस्थेला वाटत होतं.

विशेष घटकांसाठी काम करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी आम्ही संस्था सुरू केली. महिनाभरापूर्वी आम्ही माहेरमधल्या मुलांची सहल काढली होती. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांची भेट घडवून आणली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या. या मुलांसाठी पोलीस दलाकडून काहीतरी करण्याची इच्छा मुंढे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आम्ही मुलांसाठी पोलीस बॅंडचा कार्यक्रम ठेवण्याची विनंती केली. त्यांनी लगेचच ती मान्यही केली. रात्रीची ड्युटी आटपून पोलिसांनी मुलांसाठी कार्यक्रम केला.
मुलांनी पोलिसांना शुभेच्छापत्रं आणि स्वतः तयार केलेली कागदी फुलं दिली. बँडपथकानं भाऊबीज ओवाळणी म्हणून माहेरला आर्थिक मदत दिली.
''संस्थेतून शाळेत आणि शाळेतून संस्थेत असा या मुलांचा दिनकम असतो. मात्र आपुलकीने मुलांची दिवाळी खरोखरच आनंदाची केली.'' माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सौरभ मलुष्टे, विनोद पाटील, प्रथमेश पड्याल अशा आम्हा सर्वांचं कौतुक करून हुरूप वाढवला. मूळची पुण्याची संस्था असलेली माहेर देशात विविध ठिकाणी काम करत असून रत्नागिरीतला आश्रम १० वर्षांपूर्वी सुरू झाला. सध्या ३०च्या वर मुलं संस्थेत आहेत. 

-जान्हवी पाटील.

Monday, 5 November 2018

ll पहिल्यांदाच जिल्हाधिकार्‍यांना पाहिलं l दिवाळीआधीच गाव सजलं ll

दिवाळी काही दिवसांवर होती. तरीही, गाव सडा, रांगोळ्यांनी सजलेलं. रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरलेल्या. गावातील भजनी मंडळ हातात टाळ-मृदंग घेऊन सज्ज झालेलं. औक्षणासाठी महिलांनी आरतीचं ताट तयार केलेलं. गावच्या वेशीवर जिल्हाधिकार्‍यांची गाडी येताच भजन सुरू होतं. महिला, गावातील नागरिक पुढे सरसावतात. आबालवृध्दांचीही पाहुण्यांना पाहण्यासाठी धडपड सुरू होते. ही नवलाई स्वातंत्र्यापासून प्रथमच गावात कलेक्टर येत आहेत म्हणून होती. तुळजापूर तालुक्यातल्या वागदरी गावात कलेक्टरांचं अनोखं, दिमाखदार स्वागत झालं आणि कलेक्टरही भारावून गेले. दणक्यात स्वागत करूनही गावकऱ्यांनी कलेक्टरसाहेबांकडे काहीही मागितलं नाही, हे विशेष.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, असं गाव सहसा नसेल. नळदुर्ग-अक्कलकोट रोडवरच्या दीड हजार लोकसंख्येच्या वागदरी गावाने मात्र स्वातंत्र्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी पाहीले. आजवर कधीही जिल्हाधिकारी गावात आलेलेच नव्हते. म्हणूनच, गावकऱ्यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना गावात निमंत्रित केलं होतं. त्यांचा अनोखा स्वागतसोहळा शनिवारी, २७ ऑक्टोबरला साजरा झाला.
त्याचं झालं असं, वागदरी गावातले सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर दोन वर्षांपासून राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा अधिकारी वर्गात मोठा संपर्क आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना एकदा गाव पाहण्यासाठी आणा, अशी विनंती गावकर्‍यांनी मिटकर यांना केली. गावकऱ्यांची ही मागणी मिटकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्यापर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर एकदाही कुठलेही जिल्हाधिकारी वागदरीमध्ये गेलेले नाहीत, हे ऐकल्यानंतर गमे यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी यासाठी लगेच होकार दिला. कुठल्याही शासकीय औपचारिकतेशिवाय गावभेटीचा कार्यक्रम ठरला. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, त्यांच्या पत्नी भारतीताई आणि मुलगी ऋतुजा, असे तिघे गावात दाखल झाले. गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून सुमारे १ किलोमिटर अंतरापर्यंत, म्हणजे गावातील भवानसिंह महाराज मंदिरापर्यंत रस्त्यावर रांगोळी, फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘रामकृष्ण हरी’च्या जयघोषात, टाळकऱ्यांनी पाऊल खेळत, महिलांनी जागोजागी औक्षण करत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या, महिलांकडून औक्षण करून अंगावर फुलांचा वर्षाव केला जात होता. मिठाई वाटली जात होती. गावात प्रथमच जिल्हाधिकारी आले होते ना!
स्वागतानंतर भवानसिंह महाराज मंदिरासमोर रात्री भजनसंध्या कार्यक्रम आयोजला होता. यावेळी जिल्हाधिकारीही भजनात दंग झाले.
तीर्थक्षेत्र अक्कलकोटला जाताना नळदुर्गपासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर म्हणजे मुख्य रस्त्यालगत असलेल्या वागदरी गावाला संतविचारांची परंपरा लाभली आहे. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती. फारशी बरी परिस्थिती नसली, तरी वारकरी सांप्रदायाच्या संस्कारांप्रमाणे गावकऱ्यांमध्ये कायम समाधान जाणवते.
गावात रस्ते, नाल्या, पाणी, अारोग्य, अशा मूलभूत बाबींचा विकास झालेला असला तरी इतर गावांप्रमाणे त्यात काही उणीवाही जाणवतात. मात्र, यासाठी गावकऱ्यांना आंदोलने, मोर्चे काढावे लागले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांची भेट ही अनौपचारिक ठरावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तरीही जिल्हाधिकारी गमे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना अडचणी जाणून घेतल्या.
- चंद्रसेन देशमुख.

Friday, 2 November 2018

आईवेगळ्या कोमलला जगवणारे आरोग्य अधिकारी - कर्मचारीनिफाड तालुक्यातील विंचूर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी गोड बातमी समजली. सुजाताने प्रसूतीवेदना सहन करत 22 ऑक्टोबर, 2017 रोजी कोमलला जन्म दिला. 
पण, बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम. इथून पुढं, जिवंत राहाण्यासाठी दोघींचा संघर्ष सुरू झाला. सुजाता हरली, मरण पावली. कुटुंबियांनी कोमलकडे पाठ फिरवली. तरीही कोमल जगली, तिची तब्येत सुधारली. कसं घडलं हे? कोणी घडवलं?
अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांनी कोमलच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ११ दिवस ती जिल्हा रुग्णालयात असताना, आजी लीलाबाई गायकवाडसोबत अंगणवाडी सेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली. आईविना पोरक्या कोमलच्या तब्येतीची विचारपूस अंगणवाडी सेविका दररोज तिच्या घरी जाऊन करत होत्या. तिची शक्य तेवढी काळजी घेत होत्या.अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही घरी भेट देऊन कोमलच्या कुटुंबियांना समजावलं. कमी वजनाच्या कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करायला सांगितलं. यासाठी तिचे पालक तयार होत नव्हते. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ शुभांगी भारती यांनी पुढाकार घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने कुटुंबाचं मतपरिवर्तन झालं आणि 5 महिन्यांची कोमल जिल्हा रूग्णालयातल्या शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. तेव्हा तिचं वजन होतं 3 किलो 300 ग्रॅम.
आता ती चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीत होती. त्यामुळे, योग्य आहार मिळून 15 दिवसांतच तिचं वजन 4 किलो 700 ग्रॅमपर्यंत वाढलं. केंद्रात डॉ. जाधव, डॉ. भारती यांनी तिची देखभाल केली. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी, नियमित तपासणी सुरूच ठेवलं. अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस यांनी दररोज पाठपुरावा करून, तिला पोषण आहार देऊन तिची काळजी घेतली. आता तिचं वजन तब्बल 9 किलो 700 ग्रॅम इतकं झालं आहे. नुकताच 22 तारखेला या सगळ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विंचूर येथील अंगणवाडीत कोमलचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. 

- प्राची उन्मेष

Thursday, 1 November 2018

नातीचा वाढदिवस आणि आयसीयूची सुरुवात

बीडमधलं जिल्हा सामान्य रुग्णालय. 16 ऑक्टोबरची दुपार. खासदार प्रीतम मुंडे यांचीे उपस्थिती. विराचा पहिला वाढदिवस. विरा, सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांची नात. सामाजिक भान ठेवूनच आजोबांनी नातीचा वाढदिवस साजरा केला. खटोड यांना काहीच दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांचा फोन आला.रूग्णालयात नव्या आयसीयू विभागासाठी दहा महिन्यापूर्वी मागची इमारत आणि यंत्र उपलब्ध झाली होती पण खाटा नसल्यामुळे आयसीयू विभाग सुरू करणं शक्य नव्हतं. खटोड यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. स्वखर्चानं 20 खाटा देण्याचं आश्वासन त्यांनी थोरात यांना दिलं.
पुण्यातून 20 खाटा त्यांनी खरेदी केल्या. त्यासाठी 1 लाख 10 हजार रूपये खर्च केले. तर बीडमधून गाद्या खरेदीसाठी 50 हजार रूपये खर्च केले. विराच्या वाढदिवसानिमित्त ते रुग्णालयाला देण्यात आले.
खटोड गेल्या 14 वर्षांपासून वडील झुंबरलाल खटोड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 31 डिसेंबरला राज्यस्तरीय कीर्तनमहोत्सव आयोजित करतात. सामुदायिक विवाह सोहळा, महिला अत्याचार विरोधी प्रबोधन महारॅली, कॉपीमुक्त परिक्षा रॅली असे विविध उपक्रम ते राबवतात. खटोड यांच्या मुलामुलींचे विवाहही सामुदायिक विवाह सोहळ्यातच झाले आहेत.
बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत मुलींच्या नामकरण सोहळ्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. नातीकडूनही समाजकार्य सुरू राहावं अशी इच्छा गौतम खटोड व्यक्त करतात.
-दिनेश लिंबेकर .