Sunday 25 November 2018

शाळेनं मला काय दिलं? - अमोल उदगीरकर


आजुबाजुचे अनेक लोक शाळेबद्दल नॉस्टालजीक वगैरे होतात तेव्हा मला ती भावना समजून घेता येत नाही. मला माझ्या शाळेबद्दल भरभरून अशा किंवा काहीच भावना मनात येत नाहीत. मी दहावीपर्यंतचं शिक्षण परभणीमधल्या बालविद्यामंदिर या शहरातल्या सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या शाळेत घेतलं. माझ्या शाळेसंबंधित बहुतेक आठवणी कोंदट, घुसमटलेल्या आहेत. माझा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा होता. माझे आवडते विषय म्हणजे भाषा विषय आणि सामाजिक शास्त्रे. पण हे विषय वर्णनात्मक असल्याने त्या विषयांमध्ये कधीही भरभरून मार्क्स मिळत नव्हते. त्या काळातल्या पद्धती प्रमाणे आमच्या शाळेत पण गणित आणि विज्ञान या विषयात हुशार असणारे विद्यार्थी म्हणजेच हुशार आणि उज्ज्वल भवितव्य असणारे विद्यार्थी अशी थोडी भाबडी आणि थोडी भंपक धारणा होती. ज्याचे भाषा विषय आणि इतिहास वैगेरे विषय चांगले आहेत त्याच्याकडे फक्त एक बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणून बघण्यात येई. मी कधीही शाळेत 'ब्राईट' मुलांच्या यादीत नव्हतो. हुशार विद्यार्थ्यांचे जे 'कंपू' होते त्यात पण मी कधी नव्हतो. आजूबाजूच्या हुशार मुलांशी (गणितात भरभरून गुण मिळवणाऱ्या) अनेकदा तुलना झाल्याने माझ्या मनात नकळत बराच न्यूनगंड तयार झाला. जो अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. अजूनही मी स्वतःला अनेकांपेक्षा कुठेतरी कमी लेखतो याची मूळं माझ्या शालेय जीवनात आहेत. शाळेने मला आयुष्यात फक्त हीच एक गोष्ट दिली.
सगळेच हुशार विद्यार्थी नंतर सायन्स शाखेत जाऊन आयुष्यात यशस्वी वगैरे होणार आहेत असं एक गृहीतक पण होत. त्याचा मला फार त्रास झाला. मला आठवतं, दहावीला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तुकड्या पाडण्यात आल्या होत्या. गणित आणि विज्ञानात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'अ' तुकडीत टाकण्यात आलं होतं. मी बऱ्यापैकी हुशार असूनही मला मध्यम हुशार मुलांच्या तुकडीत टाकण्यात आल होतं. माझ्यासोबत नेहमी राहणारे, एकाच बेंचवर बसणारे, सोबत डब्बा खाणारे मित्र एकदमच त्या दिवसांपासून माझ्याकडे तुच्छतेने बघायला लागले. नवीन प्रकारची वर्णव्यवस्था होतीच ती. त्या अडनिड्या दिवसात मनावर बरेच चरे उमटले. मानसशास्त्रात एक 'औरंगझेब कॉम्प्लेक्स' नावाची संकल्पना आहे. 'वरून मी खूप आनंदी आहे, कणखर आहे’ असं दाखवणारा (pretend करणारा)माणूस जेव्हा आतून खूप असुरक्षित असतो तेव्हा तो माणूस औरंगझेब कॉम्प्लेक्सचा शिकार आहे असं मानलं जातं. मी माझ्या शाळेतल्या दहा वर्षात याच कॉम्प्लेक्सचा शिकार होतो. जरा कठोर वाटेल पण शाळा हा फक्त माझ्यासाठी एक सुधारित कोंडवाडा होता. ज्या दिवशी माझा शाळेशी संबंध संपला त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. शाळेतून बाहेर पडल्यावर मी नंतर कधीही शाळेमध्ये पाउल टाकलं नाही. आता मागे वळून बघितल्यावर लक्षात येतं की फक्त शाळेला दोष देण्यात अर्थ नाही. तो काळच काही अजाण समजुतींना घट्ट कवटाळून बसला होता. आताही त्यात काही फारसे बदल झाले असतील असं वाटत नाही.
मी दहावीला चांगले गुण मिळवून पण 'आर्टस' शाखेत गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला 'झाले मोकळे आकाश' ही भावना मनात आली. काही चांगले मित्र आणि थोडे चांगले शिक्षक हेच शाळेत घालवलेल्या लांबलचक दहा वर्षांचं संचित. माझे अनेक शालेय मित्र आज आयुष्यात लौकिकार्थाने यशस्वी आहेत, मोठ्या पदांवर आहेत आणि त्यांच्या मनात शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. म्हणजे ज्या शाळेशी आपली नाळ कधीच जुळली नाही त्याचं शाळेने अनेक विद्यार्थ्यांचं जीवन पण घडवलं आहे, याची आता जाणीव होत आहे. बहुतेक शाळा आणि मी हेच एकमेकांसाठी 'मिसफिट' असू. हल्लीच्या शिक्षणव्यवस्थेत आणि पर्यायाने शाळांमध्ये पण जरा वेगळी आवड निवड, अभिरुची, कल असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुणाहीपेक्षा कमी नाही, असलाच तर थोडे वेगळे आहात असा दिलासा देणारी यंत्रणा व्हावी. आणि जमलं तर अती हुशार, हुशार, निम्न हुशार, ढ असं (झू मध्ये प्राण्यांचं होतं तसं) कंपार्टमेंट करण बंद व्हावं एवढीच अपेक्षा.

अमोल उदगीरकर -
चित्रपट लेखक, समीक्षक, पुणे

No comments:

Post a Comment