Tuesday, 27 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं


आमचं लग्न फक्त दोन प्रेमीजिवांचं मिलन नव्हतं तर एकमेकांना एकमेकांच्या साथीने परिपूर्ण करणं होतं. अपंगत्व अंगावर कशामुळे येतं असं तुम्हांला वाटतं? अनेक कारणांमुळे आपण घरात सतत काही न काही निर्णय घेत असतो. ते पूर्ण करून संसार नीट चालवतो वा आपली हौस भागवतो. मात्र या निर्णयप्रक्रियेत जेव्हा कुटुंबातील अपंग व्यक्तीला जाणिवपूर्वक वा अजाणतेपणे सामील करून घेतलं जात नाही. तेव्हा, आपल्यातील कमतरतेच्या टोकदार जाणिवेने मन जखमी होतं. लग्नाआधी आणि नंतरही मला अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. पण, संधी असली की, मी माझं मत प्रदर्शित करते.
पण, काहीवेळा सगळ्यात जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला डावललं जातंय, आपल्यालाही एखादं मत असू शकतं हेच विचारात घेतलं जात नाही तेव्हा आपलं अपंगत्व ठळकपणे जाणवतं.पण, दहा महिन्याच्या ओजसला घेऊन स्वतंत्र संसार मांडला तेव्हा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यातली मजा, जबाबदारीची जाणीव आणि घेतलेले निर्णय पार पाडताना होणारी धांदल सर्वच गोड आणि भुरळ पाडणारं होतं. एकट्याने संसार करण्याचा निर्णय हा आम्हा उभयतांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता.
खरंतर, ओजसचं आयुष्यात येणं हेच आम्हाला स्वतःचं घर असावं या विचाराशी घेऊन आलं. त्याचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच साजरा करायचा असं ठामपणे ठरवून घर शोधलं आणि जे आवडलं ते घेतलंही. अर्थात हे ठरवणं जितकं सोपं तितकंच अंमलात आणणं कठिण होतं आमच्यासाठी. आमच्यावर कधीही कोणतीही महत्त्वाची जबाबदारी वा धावपळ करण्याची पाळी आली नव्हती. पण, एकदा ठरवलं म्हणजे मागे हटायचं नाही असा माझा हट्टी स्वभाव. म्हणूनच आम्ही ते स्वप्न कसं प्रत्यक्षात साकारलं ते थोडक्यात सांगते. १५ एप्रिल २०१६. ओजसचा पहिला वाढदिवस. मार्च संपत आला आणि आम्ही ओजसच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू केलं. घरातल्यांशी बोलून काय ते ठरवू असं भरतचं म्हणणं. पण, मी त्यावर आक्षेप घेतला. ‘आपल्या घरात आपल्या बाळाचा वाढदिवस कसा करायचा हे आपणच ठरवूयात’. मी इतक्या ठामपणे म्हटलं की, भरत लगेच कामाला लागला. आम्ही सुट्ट्यांचं गणित केलं. वाढदिवशी रामनवमी असल्याने बॅंक हॉलीडे तर १४ ला आंबेडकर जयंतीची सुट्टी होती. घर नवीन. आणि ओजसचा वाढदिवसही पहिला. त्यामुळे सर्व पाहुणे पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होते. म्हणून सत्यनारायण पूजा घालावी असंही आम्ही ठरवलं. त्या अनुषंगाने मी लॅपटॉप उघडला आणि नावं लिहायला सुरुवात केली. नातेवाइक आणि मित्रमैत्रिणींची संख्या सव्वाशेच्या घरात पोहोचली. पुढचा प्रश्न म्हणजे जेवण. बऱ्याच केटरिंगवाल्यांशी आम्ही बोललो. त्यातून एकाला निवडलं आणि मेनू ठरवला.
विरारमधल्या केक बनवणाऱ्या प्रत्येक बेकरीशी फोनवर बोलून घेतलं. त्यातल्या एकीला डिजाइन्स वॉट्सॅप करायला सांगितलं. टेस्टिंगला पेस्ट्रीसुद्धा मागवली. मिकीमाऊस हातात चार फुगे घेऊन पळतोय आणि त्या फुग्यावर Ojas लिहिलंय असा केक फायनल झाला. मग आम्ही माणसं दोन गटात विभागली. फोनाफोनीला सुरुवात केली. एकीकडे जशी जमेल तशी स्वच्छतेची मोहिमही आम्ही राबवत होतोच. पण, नुकतेच पाय फुटलेल्या ओजसने “तुम्हाला ते शक्य नाही”असं दाखवून दिलं. तो नुकताच पावलं टाकायला शिकला होता. त्यामुळे एका जागेवर बसणं त्याच्याने शक्य नव्हतंच. सतत काही तरी धरून उभंच रहा, टेबलावरचं ओढ किंवा कशावर तरी चढण्याचा प्रयत्न करा. चळवळ्यावर लक्ष ठेवणं जिकिरीचं व्हायचं. त्याच्या वाळ्यांना असलेल्या घुंगरांनी तो कुठे जातोय आणि काय करत असावा हे आम्ही समजून घेत असू. मी आईंना आणि मम्मीला दोन दिवस आधी यायला सांगितलं आणि स्वच्छता त्यांच्यावर सोपवली.
पूजा म्हटली की, पुजेचं सामान, प्रसाद बनवणं, नैवेद्याचं तयार करणं सारंच आलं. आधी आम्ही भटजींशी सामानासहित यावं असं ठरवून घेतलं. मग, प्रसादाच्या सामानाची खरेदी केली. पुजेच्या दिवशी सकाळी माझ्या मावशीने प्रसाद आणि नैवेद्याचा स्वयंपाक केला. एकूण आमच्या आगाऊपणे घेतलेल्या निर्णयाला सगळ्यांचाच हातभार लागला. वाढदिवसाला नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी आपल्या कुटुंबासहित आले. केटरर्सला दृष्टिहीन लोक अधिक असल्याची कल्पना दिलेली असल्याने त्यांनी जेवण वाढण्याचं कामही स्वतःहून घेतलं. ओजससुद्धा फारसा रडला नाही. बासुंदी पुरीच्या बेताचं मित्रमैत्रिणींनी खूपच कौतुक केलं हेही महत्त्वाचं. एकूण काय तर पूजा आणि वाढदिवसाचा अनोखा मिलाफ सर्वांच्या साक्षीने आनंदाने पार पडला.
आपल्या घरात पूजा घालणं किंवा मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करणं हे खरंच खूप विशेष नसतंच. विशेष असतो त्या अरेंजमेन्टमधला आपला उत्साह, सहभाग आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. नाही तर विचार करा की, तुम्ही आपल्या मुलीच्या वाढदिवसाला बाहुलीचा केक आणायचा म्हणता आणि तुमच्याच जवळचं कोणीतरी पटकन् तुम्हाला तोडून म्हणतं की, त्यातलं तुम्हाला काय कळतं? असं कोणीतरी दुर्लक्ष करणं दुखावतंच ना! एक व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी या सर्वातून जावं लागतं. कदाचित पावलोपावली स्वतःची काम करण्याची इच्छा, योग्यता आणि क्षमता समोरच्याला पटवून द्यावी लागत असल्याने आणि बऱ्याचदा त्या दुर्लक्षित होत असल्याने माझ्यासारख्या अनेक अपंग लोकांचं मन अधिक संवेदनशील, अधिक ठाम आणि आत्मविश्वासाने फुलत असावं. माझ्या या लेखन प्रपंचातून खरंच मी काय साधलं? मोकळेपणी बोलता येणं प्रत्येकालाच जमत नसतं. मला माझ्या समस्या, माझी धडपड आणि त्यातून वाट काढून व्यवस्थितपणे जगण्याची माझी प्रक्रिया शब्दबद्द करता आली ती निव्वळ नवी उमेदमुळे. फक्त तेवढंच नाही. सर्व वाचकांच्या प्रतिक्रियांनी आपलं कोणीतरी ऐकतंय ही सुखद भावना संपूर्ण मालिकेत सोबत करत राहिलीय. तुम्हा सर्वांचे व्यक्तीशः मी आभार मानते. शिवाय कोणत्याही दृष्टीहीन वा अपंग व्यक्तीशी काहीही प्रश्न, शंका किंवा सहज संवाद साधावासा वाटला तर तो नक्की साधावा. मीही फेसबूकवर उपलब्ध आहेच. धन्यवाद.


 - अनुजा संखे

स्वयंउदयोगातून 'समृद्धी'


अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राहणारे विपुल कुलकर्णी. अनेक नोकऱ्या करूनही जीवनात स्थैर्य काही येत नव्हतं. एका डेअरी फार्मवर व्यवस्थापक म्हणून काम करताना मनात विचार आला, 'आपणच आपला उद्योग का सुरू करू नये?' आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. दूध आणि दुग्धजन्य उत्पादनाचा त्यांचा 'समृद्धी' ब्रॅण्ड आज पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

तीन वर्षांपूर्वी विपुल यांनी संकरित गायींची खरेदी केली. व्यवसाय सुरू करण्याआधी संगमनेर, राहुरी, राहाता इथल्या डेअरी फार्मची पाहणी करून त्यातले बारकावे त्यांनी जाणून घेतले. उत्तम व्यवस्थापनातून दर दिवसाला चांगलं दूध संकलन होऊ लागलं. सहा महिन्यांनंतर पुन्हा गायी आणल्या. सध्या विपुल यांच्याकडे 63 संकरित गायी असून दररोज सरासरी पाचशे लिटर दूध उत्पादन होतं. याशिवाय नातेवाईकांकडून अडीचशे ते तीनशे लिटर दूध विकत घेऊन त्याची ते विक्री करतात. दररोज साधारण साठ लिटर दुधावर प्रक्रिया करुन खवा, तूप, ताक, दही, श्रीखंड, लस्सी तयार करतात. जामखेड शहरात त्यांचं विक्री केंद्र आहे. लग्न, समारंभांसाठी त्यांच्या पदार्थांना मोठी मागणी असते. सकाळी सहाला सुरू झालेले विक्री केंद्र रात्रीपर्यंत सुरू असतं .विपुल यांनी नियोजनपूर्वक आपला व्यवसाय विस्तारला. त्यांनी जामखेडमध्ये साडेसात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली . वर्षाला एकरी बारा हजार रुपयांचं भाडं ते त्यासाठी देतात. तिथे गायींसाठी पाच लाख रुपये खर्च करून अर्ध्या एकरवर शेड उभारणी केली . गायींना मुक्त संचार करता यावा म्हणून शेडजवळच जागा केली आहे. गोठ्यातील शेण, मुत्राचं एका जागी संकलन केलं जातं. यातून निर्माण होणारं शेणखत दोन हजार रुपये प्रति ट्रॉली दरानं विकलं जातं . त्यातून पहिल्या वर्षी सव्वा लाख तर दुसऱ्या वर्षी पावणेदोन लाख रुपये मिळाले.
भाडेतत्वावरच्या अडीच एकरात चाऱ्यासाठी त्यांनी ऊस लागवड केली आहे. हा सगळा चारा ते विकत घेतात. कुट्टी यंत्राचा वापर करून तो जनावरांना देतात. सुरुवातीला चाऱ्याचा शोध घ्यावा लागायचा. आता चारा उत्पादकच थेट संपर्क करतात. शिवाय पाऊस व अन्य अडचणीच्या वेळी वापरात यावा म्हणून परिसरातून कडब्याची खरेदी केली जाते. जामखेड तालुक्‍यात कायम दुष्काळी स्थिती असते. कुलकर्णी यांच्या डेअरी फार्मवर शेतमालकाने पाण्याची सोय केली आहे. तरीही दुष्काळात पाणीटंचाई भेडसावलीच. त्या काळात दोन महिने दररोज दीड हजार रुपयांचं पाणी विकत घेऊन त्यांनी ते जनावरांना दिलं आणि व्यवसाय टिकवला.
व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला वर्षभर संस्थेला दूध दिलं. मात्र नफ्याचं प्रमाण वाढवायचं तर थेट विक्रीला पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं. त्यातूनच जामखेडमध्ये थेट विक्री सुरू केली आणि दूध व उत्पादनांचा "समृद्धी' ब्रॅन्ड विकसित केला. हा व्यवसाय फळफळण्यात विपुल यांचे बंधू वैभव आणि पत्नी व भावजयीचाही वाटा आहे.
खवा, पनीर निर्मितीसाठी त्यांनी पॅकेजिंगचं यंत्र घेतलं आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमाही त्यांनी केला. येत्या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार देशी गीर गायी खरेदी करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न आहे. व्यवसायासाठी विपुल यांनी बॅंकेकडून तेरा लाखांचं कर्ज घेतलं होतं. व्यवसायातील उत्पन्नातून त्यांनी ते केवळ अडीच वर्षात फेडलं. आता त्यांनी पुन्हा लाखांचं कर्ज घेतलं आहे. जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा आदर्श गोपालक म्हणून गौरव झाला आहे.
 --- सूर्यकांत नेटके

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -14

टेक्नोलॉजी हे आम्हासारख्या दृष्टीहीन व्यक्तींसाठी एक वरदान आहे. पूर्णपणे मला मान्य झाल्यावरच मी हे विधान करतेय. स्मार्टफोनने आयुष्य खाजगी ठेवण्यासाठी मोठं सहाय्य केलं आहे. ऍन्डरॉइड फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ऍक्सेसिबिलिटी हे फिचर उघडल्यावर तुम्हाला त्यात टॉकबॅक हा ऑप्शन दिसतो. तो ऑन केला की, फोन बोलायला लागतो आणि त्याच्या टचिंग स्टाइलमध्ये बदल होतो. डोळस व्यक्ती, जे ऍप उघडायचं असेल त्यावर एकदा टच करते आणि ते ऍप ओपन होतं. पण, हे दृष्टीहीन व्यक्तीच्या बाबतीत शक्य नसतं. आधी बोट फिरवून त्यांना आपल्याला कोणतं ऍप ओपन करायची आहे, ते शोधून कन्फर्म करावं लागतं आणि मग त्यावर दोनदा टॅप करावं लागतं. अशाने चुकून टच झालं म्हणून कोणतीही ऍप नको असताना ओपन होण्याची शक्यताच राहत नाही. एवढी मदत करणारा फोन असल्याने, फेसबुक, वॉट्सॅप, ट्विटरसारख्या अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवरचा दृष्टीहीनांचा वावर वाढला आहे. त्यांचे विचार ते एकाच वेळी समाजातल्या कितीतरी लोकांपुढे मांडू शकत आहेत. अनेक सपोर्टिव ऍप्सच्या मदतीने आपलं रोजचं आयुष्य सुकर करू शकताहेत. ऍप्सच्या या खजिन्यापैकीच एका अत्यंत मौलिक ऍपचा मी इथे उल्लेख करू इच्छिते.
बी माय आईज (Be My Eyes) हे ते ऍप. कितीही टेक्नोलॉजी असली, तरी कधीतरी डोळस व्यक्तीच्या मदतीची गरज भासतेच. उदाहरणार्थ, ओजसला औषध पाजायचंय आणि माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी योगायोगाने घरी नाहीत. औषधाचं नाव माहिती असून फक्त ते नाव वाचता येत नसल्याने मला ते पाजता येणार नाही. अशावेळी मला ‘बी माय आईज’ या
ऍप्लिकेशनचा उपयोग होतो. ऍप ओपन केली की, जवळच्या स्वयंसेवकाला विडियोकॉल करा असा ऑप्शन येतो. तसं मी केलं की, समोरची व्यक्ती फोन उचलते आणि मग मी बाटल्या त्याला दाखवून त्यातलं मला बाळाला कोणतं औषध पाजायचं ते निवडून घेते. अर्थात यासाठी स्वयंसेवक व्यक्तींनी हे ऍप आपल्या फोनमध्ये घेऊन आपलं नाव त्यात नोंदवून ठेवावं लागतं.
खरंच, किती सुसह्य होतंय आयुष्य! नाही तर, कॉलेजमध्ये भरतच्या प्रेमात असताना कुठे होते हे स्मार्ट फोन? ‘आय लव यू’ सारखा अत्यंत खाजगी मेसेजही कोण्यातरी मैत्रिणीच्या मदतीने पाठवावा लागला असता आणि त्याला वाचून घ्यायलाही कोण्यातरी मित्राला दाखवावा लागला असता. गंमत आणि अगतिकता यांच्या मिलाफाचा अनुभव स्मार्टफोनने दिला असंच म्हणता येईल.
फक्त एवढंच नाही. आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये आजकाल अपंग व्यक्तींचा विचार केलेला आढळतो. ट्रेनने रोजचा प्रवास करणाऱ्यांना हे ठाऊक आहेच की, पुढल्या स्टेशनची अनाउंन्समेन्ट तिन्ही भाषांमध्ये केली जाते. त्यामुळे “आता कोणतं स्टेशन येईल? शेजारच्याने सांगितलं नाही किंवा आपला अंदाज चुकलाच तर आपण दुसऱ्याच स्टेशनला तर उतरणार नाही ना?” ही भिती कमी झाली आहे. पण, पूर्ण गेली असं मात्र म्हणता येणार नाही. कधी एखाद्या जुन्या गाडीने प्रवास करावा लगतो, जिच्यात ही सिस्टमच नाही, कधी स्पिकरचा आवाज एवढा लहान असतो की, ट्रेनच्या आवाजातून ती बाई काय बोलतेय हेच कळत नाही. तर कधी अनाउन्समेन्टच मागेपुढे होत असते. पण, काहीच नसल्यापेक्षा काहीतरी होतंय हे महत्त्वाचं.
प्लॅटफॉर्मसुद्धा दृष्टीहीन व्यक्तींची सोय लक्षात घेऊन बनवले जात आहेत. मधला भाग अत्यंत गुळगुळीत, कडेपासून अडीच तीन फूट आत पायाला स्पर्शने कळतील असे पट्टे आणि अगदी कडेचा भाग खरखरीत पद्धतीने बांधलेला असतो. यामुळे काय होतं? तर, चालण्याच्या भरात चुकून रुळांकडे जाणारी दृष्टीहीन व्यक्ती लगेच सावध होऊन उजवी वा डावीकडे सरकून सुरक्षितपणे चालू शकते. नाही, तर... किती दाखले देऊ अंधत्वामुळे रुळात पडलेल्या माझ्यासारख्यांचे? काहींना तर अंधत्वाबरोबरच हातापायांचं अपंगत्व आलंय कायमचं. अपंगांसाठी असलेल्या डब्ब्यातली गर्दी हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण, तो डब्बा आम्हाला कळावा म्हणून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बीपरची सोय केलेली आहे. शिवाय तिथे चौकोन तुकड्यांनी बनवलेली जमीन असते. म्हणजे जे दृष्टीहीन आहेत त्यांना ऐकून तर जे अंध आणि कर्णबधीर आहेत त्यांना स्पर्शाने कळावं हा हेतू. पण, बऱ्याचदा बीपर वाजत नाहीत आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या ट्रेनचा डब्बा त्या बीपरकडेच थांबतो असंही नाही. पण, काही प्रवासी मदत करून तेवढी गैरसोय टाळतात. जिथे आवश्यक तिथे मदत केली पाहिजे, हे जितकं खरं तितकंच आपल्याला ती मागताही आली पाहिजे, हेही खरंच.
- अनुजा संखे

Sunday, 25 February 2018

फलटणकरांची मॅक्सीनमावशी

''काय रे, कुठं चाललायस? शाळेत गेला नाहीस का?'' एखाद्या हूड लहानग्याला असं खास फलटणी ठसक्यात दरडावणाऱ्या, मुलामुलींची ने -आण त्यांच्या स्वतःच्या रिक्षातून करणार्‍या मॅक्सीनमावशी फलटणकरांसाठी त्यांच्या कुटुंबातल्याच एक सदस्य. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये मॅक्सीनमावशीचं असलेलं योगदान फलटणकरांसाठी विशेष अभिमानाचं आहे. जवळपास 85 वर्षांच्या मॅक्सीनमावशींचं अजूनही मराठी भाषा, मराठी संस्कृती याबाबत संशोधन सुरूच आहे. फलटणमधून पांढर्‍या रिक्षातून गोल हॅट घालून फिरणाऱ्या मूळच्या नॉर्वियन वंशाच्या या विदूषी फलटणकरांना कधीच लांबच्या वाटल्या नाहीत.
७ ऑक्टोबर १९३५ मध्ये अमेरिकेतल्या मिशिगन प्रांतात मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म झाला. वडील नॉर्वियन निर्वासित , तर आई फिनलँडमधील निर्वासित. मॅक्सीनना किशोरवयापासूनच भाषांची आवड होती. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी भाषेतून एमए केल. अमेरिकेत असतानाच भाषाअभ्यासातून त्यांना मराठी भाषेविषयी माहिती मिळाली. त्या ओढीनेच फलटण इथली आपली मैत्रिण जाई निंबकर यांच्या साथीने १९६१ मध्ये त्या भारतात आल्या. हैदराबादमधल्या विवेकवर्धिनी महाविद्यालयात सुमारे दोन वर्षे त्यांनी अध्यापन केलं . विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य सावळेकर आणि त्यांच्या पत्नीने त्यांना आई-वडिलांप्रमाणे आधार दिला.
१९६६ मध्ये 'पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातल्या मराठी बोलींमधली सामाजिक विविधता' या विषयावर काम करण्यासाठी त्यांना फुलब्राइट -हेज फेलोशिप मिळाली. त्यानंतर मॅक्सीनमावशींनी फलटणमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
फलटणमध्ये प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनाची स्थापना त्यांनी केली. शिक्षणापासून वंचित असणार्‍या गोरगरीब मुलांना आपल्या कडेवर बसवून त्यांनी शाळेमध्ये आणलं. शिक्षण दिलं. त्यांना शिकवताना योग्य पद्धतीने मराठी भाषा बोलली-लिहिली जाईल, हे पाहिलं. फलटणमध्ये, आज अशी एक शिक्षित पिढी केवळ मॅक्सीनमावशींच्या देखभालीमुळेच निर्माण झाली आहे. मराठी भाषेचे धडे त्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिले. ''मराठीसारखी अवघड भाषा जगा्त नाही. पोट फोडणं, अक्षरांचे पाय मोडणं, यामुळे मराठी ही अतिभयानक भाषा वाटते, असं मॅक्सीनमावशी मराठीवरच्या प्रेमातूनच गंमतीने म्हणतात. मराठी व्याकरणाबाबत त्या आग्रही आहेत. बोलण्याची ढब सातारी, कोल्हापुरी असली तरी बोलणं मात्र शुद्धच असलं पाहिजे, असं त्या मुलांना नेहमी सांगायच्या. संतसाहित्यावर मॅक्सीनमावशीचं अपरंपार प्रेम. संतपरंपरेतील अभंग आणि ओव्या गाऊन मॅक्सीनमावशी मंत्रमुग्ध करतात. मराठी भाषेसंदर्भात सुमारे अर्धा डझन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
मॅक्सीनमावशी गेल्या तीन-चार वर्षांपासून हैद्राबादला स्थायिक आहेत. राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून प्रौढ शिक्षणामध्ये त्या संशोधन करत आहेत. अधूनमधून त्या फलटणमध्ये येत असतात. त्यांनी स्थापन केलेल्या प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनाचं कामकाज पाहत असतात. आपली मायभूमी सोडून हजारो किलोमीटर दूर येऊन एखाद्या परक्या भाषेसाठीझटणार्‍या मॅक्सीन बर्नसन उर्फ फलटणकरांच्या मॅक्सीन मावशींना मराठी भाषा दिनानिमित्त मानाचा मुजरा !

- संग्राम निकाळजे 

Saturday, 24 February 2018

सांगायला आनंद वाटतो की...

“आमच्या व्हरकटवाडीपासून जवळचं मोठं गाव १५ किलोमीटर अंतरावर असलेलं दिंद्रुड. सॅनिटरी पॅड खरिदण्यासाठी तिथल्या दुकानात जायचं म्हटलं, तरी २० रु खर्च येतो. पण आता आमच्याच गावातल्या अंगणवाडीत मशिन बसल्याने, तेवढ्यासाठी जाण्यायेण्याचे ४० रु तरी नक्की वाचतील. या मशिनचा फायदा समजल्याने अवघ्या ५ रुपयात मिळणारं हे पॅड घेण्यासाठी मुलींचा प्रतिसादसुध्दा चांगला आहे." ८०० लोकसंख्येचं गावव्हरकटवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. व्हरकटवाडीच्या अंगणवाडीत, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून ग्रामीण भागातील पहिलं सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन नुकतंच बसवण्यात आलं आहे. या मशीनची देखभालव्यवस्था सांभाळणार्‍या याच गावातल्या आशा स्वयंसेविका अयोध्या व्हरकटे या मशिनमुळे गावातील महिलामुलींची कशी सोय झाली आहे ते सांगत होत्या.


या व्हरकटवाडीत, जिथे एसटी बसही अजून पोचू शकलेली नाही, तिथे मशीन कसं बसलं? संपर्क संस्थेचा, युनिसेफच्या सहकार्याने राज्यातल्या आमदारांना बालहिताची कामं करण्यासाठी प्रेरित करण्याचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात मी, बीड जिल्ह्याचा संपर्क आणि नवी उमेदचा प्रतिनिधी आहे. आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांची भेट घेऊन मासिक पाळी काळातलं मुलींचं आरोग्य या विषयावर चर्चा केली. मासिक पाळी काळातल्या मुलीच्या शाळेतल्या अनुपस्थितीवर उपाय करण्यासंबंधीही चर्चा झाली. भीमराव यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर महिनाभरात कडा गावात आनंदराव धोंडे महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन्स बसवण्यात आली. लगोलग कड्याच्याच अमोलक शिक्षण संस्थेतही व्हेंडिंग मशीन्स बसवली. या घटनेला नवी उमेदवर आणि वृत्तपत्रातूनही चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ते वाचून माझ्याच गावातले रहिवासी आणि व्हरकटवाडीला मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दूत म्हणून कार्यरत असणारे दीपक पवळ यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना सर्व माहिती दिली. त्यांची हॅपी नारी या संस्थेच्या विक्रेत्याशी भेट घडवून दिली. अमोलक शिक्षण संस्थेच्या मधुराणी राऊत यांच्याकडूनही दीपकने माहिती घेतली. त्यानंतर, दीपक यांनी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन निधीतून व्हरकटवाडीतल्या अंगणवाडीमध्ये मशीन बसवलं. यासाठी दीपक पवळ यांचं प्रशासकीय अधिकार्‍यांनी कौतुक केलं आहे. 
दीपकचं संपर्क आणि नवी उमेद टीमतर्फे अभिनंदन.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातर्फे आज घडीला महाराष्ट्रातल्या एक हजार गावांत दीपकसारखे ग्रामदूत काम करताहेत. या अभियानाचे जिल्हा समन्वयक गजानन देशपांडे यांनी सांगितलं की, या मशीनची उपयुक्तता आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आम्ही इतर ठिकाणी देखील अशा मशिन बसवणार आहोत. तसं झालं तर एक हजार गावांतल्या मुली-स्त्रियांची फार मोठी सोय होईल.
व्हरकटवाडीत या मशिनला कसा प्रतिसाद आहे? दीपकने सांगितलं की, मशीन बसवण्यात आल्यापासून दररोज चार -पाच पॅड विकली जात आहेत. मुलींचा पॅडखरेदीसाठीचा प्रवास आणि त्रास आता वाचला आहे.


- राजेश राऊत .

एक आत्महत्या टळली; नवी वाट गवसली


जिल्हा नाशिक. तालुका निफाड. इथल्या खेरवाडी (नारायणगाव) इथल्या एका शेतक-याची ही गोष्ट. दिनकर बाकेराव संगमनेरे. द्राक्ष उत्पादक. बी.कॉम. नोकरी न करता दिनकर यांनी वडिलोपार्जित साडे तीन एकर शेती करण्याचा निर्णय घेतला होता. दोन एकरात द्राक्ष. आणि दीड एकरात भाजीपाला आणि इतर पिकांचं उत्पादन ते गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत. सगळं छान सुरळीत होतं.
मात्र, मागच्या पाच-सहा वर्षांपासून सतत पडणा-या दुष्काळामुळे आणि वातावरणातल्या बदलामुळे त्यांना शेतीत सतत प्रचंड नुकसान सहन करावं लागलं.
द्राक्षाच्या फळधारणेच्या काळात अतिवृष्टी, विविध रोग यामुळे उत्पादनाचा दर्जा खराब व्हायला लागला. उत्पादन घटलं. खर्चापेक्षा उत्पादन कमी. डोक्यावरचं कर्ज वाढू लागलं. सहकारी सोसायटींचं साडेतीन लाख, स्थानिक पतसंस्थांचं दोन लाख, सोनं तारण आणि पाहुणे, मित्रपरिवार, दुकानदार या सगळ्यांचं मिळून दहा लाख रूपयांचं कर्ज झालं.
शेती पिकत नसल्याने, हे कर्ज फेडायचं कसं? हा मोठा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. देणेदार पैशासाठी तगादा लावू लागले. पाहुणे, मित्र सगळ्यांनीच पैशाची मागणी सुरु केली. कुणी त्यांना सावलीला उभं करत नव्हतं. एकीकडे शेतीत राबणं सुरु होतं. गेल्या वर्षी तर दिनकररावांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली. शेती पिकली नाही. कर्जाचं व्याज वाढत होतं. रात्रंदिवस फक्त कर्ज आणि देणेकरी डोळ्यासमोर येऊ लागले. झोप, अन्नावरची वासना उडाली. जे कालपर्यंत चांगले वागणारे जवळचे लोकदेखील पदोपदी अपमान करू लागले. हे सगळं बघून दिनकररावांची सहनशक्ती संपू लागली होती. निराशा मनात खोल घर करू लागली. त्यातचं निफाड तालुक्यात रोज अनेक शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या त्यांच्या कानावर येत होत्या. आता आपल्यालाही हाच मार्ग, या विचाराने त्यांना घेरलं.
याचं काळात कौस्तुभ या त्यांच्या मोठ्या मुलाने दहावीत 87 टक्के गुण घेतले. तर दुसरा मुलगा अंगद हा देखील विशेष प्राविण्यासह सहावी उत्तीर्ण झाला. या दोन्ही मुलांना दिनकरावांनीच कधीतरी आयएएसचं स्वप्न दाखवलं होतं. आता दोन्ही मुलं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होती. नैराश्याच्या गर्तेतही, एका क्षणी, आपल्या माघारी या मुलांचं काय होणार, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्याच क्षणी त्यांनी आत्महत्येच्या विचाराला मूठमाती दिली. तोच क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निग पाईंट ठरला. मी माझ्या मुलांना, कुटुंबाला निराधार करणार नाही. असा त्यांनी पक्का निश्चय केला.
दिनकर सांगतात, “पुन्हा माझं विचारचक्र चालू झालं. शेती पिकत नाही, तर मग या परिस्थितीतून मुक्त होण्याचा दुसरा मार्ग कोणता?” हा विचार करत असतानाचं त्यांच्या डोक्यात आलं की, आजकाल शहरांप्रमाणे खेडयातही ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट या बेकरी पदार्थांना खूप मागणी आहे. आपण हेच पदार्थ ग्रामीण भागात विकायचे. त्यातूनचं ‘स्वाभिमान मोबाईल बेकरी’ची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. चांगल्या दर्जाचा माल विकत घ्यायचा आपल्या गाडीवर निफाड तालुक्यातल्या खेडेगावांत विकायचा. अर्थात हे सगळं करायचं तर पुन्हा पैसा हवाच. पैसे कुठून आणायचे? डोक्यावर आधीचं लाखोंचं कर्ज; अजून पैसे कोण देणार? या परिस्थितीतही शंकरराव आवारे आणि सतीश संगमनेरे हे मित्र मदतीला धावून आले. गाडीवर माल वाहून नेण्यासाठी स्टँड आणि माल खरेदीसाठी पाच-पाच हजार रुपयांची मदत केली. दिनकररावांनी गाडीला स्टँड बसवले. शहरातून उत्कृष्ट दर्जाचा माल खरेदी केला. आणि ‘स्वाभिमान मोबाईल बेकरी’ सुरु झाली.
दिनकररावांचं वेगळेपण इथंही दिसून आलं. निराश झालेल्या शेतक-यांना व्यवसायाकडे वळण्याचा, आत्महत्या न करण्याचा संदेश द्यायचा असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी आपल्या गाडीच्या स्टॅडला बोर्ड लावला. त्यावर त्यांनी कर्जबाजारी शेतक-यांसाठी एक संदेश लिहिला– “मी एक शेतकरी, दिनकर बाकेराव संगमनेरे, कर्जबाजारी शेतकरी, कर्ज फेडण्यास असमर्थ म्हणून मी हताश नाही झालो, पोटाची खळगी भरण्याकरिता जसा मी व्यवसाय निवडला त्याचप्रमाणे माझ्या असंख्य शेतकरी बांधवाना माझे हेच सांगणे आहे, की आपणसुद्धा कोणत्याही व्यवसायाची संकल्पना मनात राबवा व तिला सुरूवात करा, परंतु चुकूनही आत्महत्या करू नका”.
दिनकररावांचं आयुष्य आता अगदी बदलून गेलं आहे. त्यांच्या या उपक्रमाचं शेतक-यांनी मनापासून स्वागत केलं. काही दिवसात त्यांचा या व्यवसायातील नव्वळ नफा दीड ते दोन हजार रूपयांवर गेला आहे. दिनकर बाकेराव संगमनेरे या शेतक-यानेे नवी वाट शोधून काढली. स्वतःचं, कुटुंबाचं जीवन तर सावरलंच. आणि नाशिक जिल्ह्यातल्याच नव्हे, तर राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना कृतीतून नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे.
- उन्मेष गौरकर.

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -13

ऑफिसमधल्या कामाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहीन. आधी आम्ही घर कसं आवरतो-सावरतो हे सांगते. संध्याकाळ म्हणजे कसरत. हे करू की, ते? असं होतं. बेबी सिटिंगमधून ओजस आणि ऑफिसातून भरत घरी येण्याच्या आधी मी घरी येते. पहिली धांदल उडते ती स्वयंपाकाची. मी घरात येते आणि हात पाय धुवून सरळ किचन गाठते. बऱ्याचदा काय बनवायचं ते ठरवूनच येते. सहसा वरणभात, एखादी भाजी बनवायची असते. मी गॅस कसा पेटवते? त्याहीपेक्षा मी स्वयंपाक कसा करते हे जाणून घ्यायला सगळ्याच स्त्रिया आतूर असतात.
आवाज, गंध, स्पर्श आणि वेळेचा अंदाज यांवर माझं स्वयंपाक करताना बारीक लक्ष असतं. तुम्ही लक्ष देऊन ऐकलंत तर लक्षात येईल की, गॅस लावतानाही ‘फट्’ असा आवाज येतो. त्यावरूनच मला कळतं की, गॅस लागला आहे. काहीही बनवताना मी आधी भांडं धुवून घेते. मग ते गॅसवर ठेवून गॅस लावते. एक दोन मिनिटं ते भांड तसंच राहिलं की, त्यातलं पाणी सुकतं आणि मग मी पुढची फोडणी वगैरे सोपस्कार करते.
चिकन रस्स्याची माझी रेसिपीच तुम्हांला माझा स्वयंपाक कसा होतो ते सांगेल. ही रेसिपी निवडण्यामागचं कारण चिकन बनवताना भाजणं, वाटण, तळणं, चिरणं, साफ करणं असं सगळंच करावं लागतं. तुमची बरीचशी उत्तरं यातून मिळतील असं वाटलं म्हणून हे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसवर भांडं चढवल्यावर तो लावण्याआधी लागणारी प्रत्येक सामुग्री मी किचनच्या कट्ट्यावर काढून ठेवते. तेल घातलं आणि मग मसाले शोधत बसले असं करत नाही.
संसारात अगदी नवीन असताना एकदा, कुकरमधल्या तेलाने जाळ पकडला होते. मी आणि भरत आम्ही दोघंच घरी होतो. कशीबशी आग विझवली होती. पण, त्या प्रसंगाने कायमचा धडा शिकवला हे मात्र खरं.
मी आधी खोबऱ्याचा मोठा तुकडा चिमट्यात पकडून तो गॅसवर भाजते. त्या भाजत्या खोबऱ्याचा खमंग गंध सुटला की, गॅस बंद करून मी तोच चिमटा बेसिनमध्ये धरते आणि अंधूक झालेल्या ज्वाळेवर जोरजोरात फुंकर घालून ती विझवते. आग विझली की, नळाखाली तो तुकडा धरून हाताने हळूहळू चोळून काळेपण घालवते. मग तो तुकडा मिक्सरच्या भांड्यात ठेवते. सोललेल्या लसणाच्या ८-१० पाकळ्या, दोन तिखट हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, आल्याचा मोठा तुकडा, दोन काळीमिरी, दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि वरून नावालाच पाणी घालते. मिक्सरवर वाटण करून घेतलं की, गॅसच्या शेजारी ठेवते. हे झाल्यावर मी सुरीने कांदे चिरते. गरम मसाल्याचे डबे, लसणाच्या आणखी काही पाकळ्या आणि चिरलेला कांदा मी हाताशी ठेवते. कूकर गॅसवर ठेवून गॅस पेटवते. थोड्या वेळाने मी तीन पळ्या तेल घालते. तेल गरम झालं की, त्याचा एक गंधही येतो आणि तडतड असा आवाजही येतो. मग, मी त्यात दालचिनीचा मोठा तुकडा, काळीमिरी, लवंग एकएकच घालते. गरममसाला त्यात तळला गेला की, एक गोडसर तिखट असा खूपच खमंग वास येतो. त्यावर लसूण ठेचून घालते. चर्रर्र... आवाज यायचा जरा कमी होतोयसं वाटलं की, त्यावर कांदा घालते. कांदाही छान नाद निर्माण करतो. लाल होताना त्याचाही मस्त गंध सुटतो. मग, त्यावर मी वाटण घालते. ते चमच्याने एकजीव करताना थोडंसं सुकतंयसं वाटलं की, त्यावर एक चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालते. या प्रमाणात आता फरक पडत नाही. सवय झालेय मला. चमचे इकडचे तिकडे होऊ न देण्याची तेवढी काळजी घ्यायची बस्स! सगळं एकजीव झालं की, त्यावर चिकन घालून ते मी मंद आचेवर मिक्स करत राहते. रटरटचा आवाज हलकासा यायला लागला की, त्यात मी ग्लासाच्या मापाने पाणी घालते आणि मग, कूकर पुन्हा गॅसवरून उतरवून त्यावर झाकण घट्ट दाबून बसवते. तो पुन्हा गॅसवर ठेवून गॅस चालू करते आणि स्लो गॅसवर दोन शिट्ट्या घेते. खरंतर टोपातच शिजवलेलं चिकन मला आवडतं. पण, ते पर्फेक्ट शिजल्याचं मला नेमकं कळत नाही म्हणून मी कुकरचा पर्याय निवडला आहे.
हे सर्व मी करत असताना भरत पूर्णपणे ओजसला सांभाळत असतो. त्याच्यासोबत गार्डनमध्ये जाणं, घरात कधी क्रिकेट तर कधी चेस खेळणं तर कधी त्याच्यासोबत त्याचे प्रश्न सोडवणं असं सगळंच तो करतो. आम्ही हे एन्जॉय करतो, हेही तेवढंच खरं.
- अनुजा संखे 

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 12

एका गरजेतून निर्माण झालेलं नातं हेच पूर्ण सोसायटीमध्ये आम्हा दोघांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारं एक प्रभावी माध्यम ठरलं. आमच्याशी थेट बोलायला कचरणारे, आमच्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तींशी दुरान्वयानेसुद्धा काहीच संपर्क न आलेले इतर लोक आमची अश्विनीताईंकडे चौकशी करू लागले. मी कसं काम करते हा त्या सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न असायचा. हेच काही प्रश्न तपशीलांसहित तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. मी सकाळी उठले की, स्वतःचं आवरायला लागते. अंघोळ, दात घासणं, ऑफिससाठी ड्रेस्ड अप होणं आणि नाष्टा करणं हा सकाळचा माझा भरगच्च कार्यक्रम असतो. आणि याच कार्यक्रमात पहिला प्रश्न निर्माण होतो. मी ड्रेस कसा निवडते? टॉप तर त्यांच्या निरनिळ्या डिजाईनमुळे, वेगळ्या प्रकारच्या कट्समुळे, त्यांवर असलेल्या शोच्या बटनांमुळे, कट्समुळे, गळ्यांच्या आकारामुळे कोणीही सहज ओळखू शकतं. पण, लेगइन्स बरोबर शोधून जोड तयार करणं हे कठिण जातं. सर्वसाधारणपणे लेगइन्स सारख्याच कापडाच्या असतात. जरी कापडात फरक असलाच तरी त्याच कापडाच्या एकापेक्षा जास्त लेगइन्स असतातच. अशात नुसतं स्पर्शावरून रंग ओळखणं अशक्य आहे. मी यावर मात्र तोडगा शोधून काढला आहे. इस्त्रीवाल्या भैयाला मी जोड तयार करून द्यायला सांगते. जर त्याला जमलं नाहीच तर सकाळच्या स्वयंपाकासाठी येणाऱ्या बाईला सांगून मी माझे कपडे रेडी करते. माझ्या चांगल्या व्यक्तीमत्त्वाचं मोठं श्रेय माझ्या चांगल्या पोषाखाला जातं. ते नीट असलेच पाहिजेत अशी सवय विकसित करणाऱ्या माझ्या मम्मी, पप्पा आणि दोन्ही भावांना. मला जी अडचण येते ती तेवढीशी भरतला येत नाही. पॅंट्स, जिन्स आणि शर्ट्स असा आटोपशीर पेहराव असल्याने आणि या प्रत्येक प्रकारात बटन, कापड, खिशांचे प्रकार, बक्कल यात असलेल्या वैविध्यामुळे तो आपले कपडे सहज निवडू शकतो.
दुसरं आव्हान असतं ओजसला सुखरूपपणे पाळणाघरात सोडणं. भरतच्या खांद्यावर अजूनही गाढ झोपेत असलेला ओजस आणि पांढरी काठी हातात घेऊन पुढे मी. भरत एका हातावर ओजसला घेऊन दुसऱ्या हाताने माझा हात पकडतो आणि आम्ही असंच चालत राहतो. एकट्याने चालणं काय किंवा बाळाला घेऊन दोघांनी चालणं काय टेक्निक एकच असलं तरी बाळ म्हटलं की, जरा अधिक काळजी, अधिक भिती आणि अधिक हळू चालावं लागतं. रस्त्यातले खड्डे, अधेमधे बसलेले किंवा झोपलेले कुत्रे, रस्त्याच्या कडेला लायनीत उभ्या केलेल्या मोटरसायकली, विजेचे किंवा आणखी कशाकशाचे खांब, एक ना दोन. किती अडथळे असतात मनात दाटलेले, साधं एक पाऊल टाकताना! यांपैकी कितीतरी गोष्टी इतर डोळस लोक नोटिससुद्धा करत नसतील. खरं सांगायचं तर हे अडथळे माहिती असले तरी प्रत्येक वेळी पाऊल पुढे टाकताना दृष्टीहीन असूनही मीही कधी यांचा फारसा विचार केला नव्हता. एकट्याने चालताना मुळात आपल्या काही लागलं तर? किंवा आपण पडलो तर?, वा कुत्र्यावर पाय पडून तो चावला तर? अशा प्रश्नांवर विचार करायला वेळ नसतो आणि त्याही महत्त्वाचं म्हणजे तसा विचार करायचा झालाच तर मीच काय कोणीही पूर्णतः दृष्टीहीन असलेली व्यक्ती कधीच एकटी चालू शकत नाही. पण, जेव्हा आपल्या खांद्यावर गाढ झोपलेलं आपलं छोटं बाळ असतं तेव्हा हे सगळे प्रश्न मनात मोठं चिन्ह लेऊन उभे राहतात आणि पावलागणिक विचार करायला भाग पाडतात.
खड्ड्यात पाय जाऊन झटका बसला तर तो उठणार, आपल्याला लागलं तर त्याला आपसूकच
मागे धक्का बसणार, कुत्र्यावर पाय पडण्याच्या भितीने आपणच आधी किंचळणार. मग कसं बिनधास्त चालवणार मला? या सगळ्या रिस्क तरीही असतातच. त्यात काळजी एवढीच की, जर तो उठला तर पाळणाघरात नको म्हणून रडेल. त्याची घालमेल आणि आपल्या जिवाचे हाल एवढं करूनही कधीतरीच टाळले जातात.
- अनुजा संखे 

प्रयोगातून फुलवली शेती

बीड जिल्ह्यातील उदंडवडगाव. महादेव जाधवांची इथं 30 एकर शेती. त्यांचं निधन झालं आणि जबाबदारी आली थोरल्या मुलाकडे. दत्तात्रय जाधव यांच्यावर. कमी पाऊस, अल्प उत्पन्न यातूनच मार्ग काढायचा होता. ते केवळ सातवी पास. पण शेती कसायची ठरल्यावर त्यांनी मनाशी एक ठरवलं. त्यानुसार राज्यात होणारी कृषी प्रदर्शनं आणि प्रयोगशील शेतकरी यांना भेटी देणं सुरु केलं. त्यातून माहिती घेतली, स्वतःजवळ असलेल्या ज्ञानात भर घातली. आणि 20 एकर शेती चांगल्या पद्धतीने कसण्याचा निर्णय घेतला. मोठ्या भावाचं बघून, ऐकून धाकट्या शंकरनेही मदतीचा हात पुढं केला. 2007 मध्ये जाधव यांनी 20 पैकी एका एकरात मल्चींगवर किरण जातीच्या टरबुजाची लागवड केली. परंतु टरबूज काढणीच्या वेळीच बोअर कोरडी पडली आणि पीक धोक्यात सापडलं. तेव्हा टँकर लावून बाग जगवावी लागली. विशेष म्हणजे अशा संघर्षात टँकरवर जगलेले तीन टन टरबूज मुंबईच्या बाजारात नऊ रूपये किलो दराने भाव खाऊन गेले. यातून 20 हजार तर इतर ठिकाणच्या विक्रीतून दहा हजार असे 30 हजार रूपये हाती आले. टरबुजावर झालेला 15 हजार रूपयांचा खर्च वजा जाता केवळ पंधरा हजार रूपयांचा नफा त्यांच्या हाती आला.

 
जाधव बंधूनी 2015 मध्ये, अर्धा एकरात नऊ लाख रूपये खर्च करून सेडनेट उभारलं. त्यात काकडीचं पीक बहरात आले होते. काकडीची पहिल्या तोडणीची पट्टी 60 हजार रूपये आली होती. 6 जून 2015 मध्ये, रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीत सेडनेट भुईसपाट झाल्याने जाधव यांचं अठरा लाख रूपयांचं नुकसान झालं. या संकटातून सावरून त्यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे.
आता 20 एकर शेतीपैकी तीन एकरात जाधव यांनी नोव्हेंबर 2017 रोजी क्लश सिडस 885 या वाणाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना मल्चिंग पेपर, भेसळ खत, शेणखत, पिकासाठी सुरक्षा पेपर, फवारणी, मजुरी असा एक लाख 20 हजार रूपयांचा खर्च आला आहे. सध्या खरबुजाचं पीक काढणीला आलं आहे. पिवळसर रंग आणि गोड चवीचं 32 टन खरबूज बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात निर्यात होणार असून सहा लाख रूपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
याच गावातून आधी दोन किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडा घेऊन शेतात जावं लागायचं. आता तिथंच जाधव बंधूंनी आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी आता ठिबक सिंचन, तीन विहिरी, 26 बोअर शेतीत घेतले आहेत. त्यात विशेष म्हणजे अडीच एकर शेतीत 29 लाख रूपये खर्चाचं शेततळं खोदलं आहे. 96 बाय 86 स्क्वेअर मीटर शेततळ्याची खोली स्लोपमध्ये 39 फूट आहे. सध्या पूर्ण क्षमता असलेल्या शेततळ्यात चार कोटी 20 लाख लिटर पाणी साठलेलं आहे. आता एप्रिलपासून याच पाण्यावर शेती फुलणार आहे. या शेतीत जवळपास दीड कोटी रूपयांची गुंतवणक त्यांनी केली आहे.
शेती करत असतांना आलेल्या अनभुवनातुन आणि नफा, तोट्यातून शेतकरी दत्तात्रय जाधव, शंकर जाधव या दोन भावांनी जवळपास ४०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. २४ वर्षापूर्वी सूर्यफूल, बाजरी, तूर, ज्वारी ही पारंपरिक पिकं घेणाऱ्या या शेतकऱ्यांनी आज टरबूज, खरबूज, शिमला मिरची, काकडी अशी नफा देणारी पिकं घेत क्रांतीच केली आहे.

- दिनेश लिंबेकर, बीड 

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 11

आई झालं की, कसं वाटतं? असा प्रश्न माझ्या एका मैत्रिणीने विचारल्यावर, ओजस आल्यापासून माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल झालाय का, यावर मला जाणवलं आहे, या न त्या निमित्ताने मी सतत कोणावर तरी अवलंबून होते. अशी कितीतरी कामं होती, जी इतरांच्या मदती वा सल्ल्याशिवाय एकटीने करणं शक्य नव्हती. किंवा करणं शक्य असलं तरी करण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणाची तरी गरज असणं, हे माझ्यासाठी बंधनकारक होतं. अशा वेळी, आपलं दुसऱ्यावर अवलंबून असणं खूपच मानसिक क्लेश देणारं ठरतं.
अशात जेव्हा ओजस माझ्या मांडीवर आला आणि स्वतःहून दूध पिऊ लागला, तेव्हा मनात अगदी आत एका सुखाच्या भावनेचा जन्म झाला. जे मानसिक त्रास आजवर झाले होते, त्यांचं विसर्जन त्याच्या जवळ असण्याने, त्याला खरी माझी गरज असल्याच्या जाणिवेने झालं. त्याच्या लेखी आज मला जेवढं महत्त्व आहे, तेवढं अन्य कोणी कधीच दिलेलं नाही, या भावनेने मला पान्हा फुटला. आई मुलांच्या बाबतीत का एवढी पजेसिव असते, याचं मूळ सापडल्यासारखं झालं. त्याचं दिसामासाने वाढणं हे माझ्यासाठी अगदी नवीन होतं. भरतला त्याच्या भावांची तीन मुलं वाढताना जवळून बघता आल्याने तो थोडा तरी ट्रेन्ड होता असं म्हणता येईल. पण, मला त्याचा बिलकुलच अनुभव नव्हता. शेजाऱ्यांची मुलं असल्यावर कुठे आपल्याला त्यांचं काही करावं लागतं? खेळवण्यापुरतं आणलं की, झालं.
एक गंमत इथं सांगायलाच हवी. ओजस झाला. आणि आम्ही अजून हॉस्पिटलमध्येच होतो. भरत माझ्याजवळ असल्याचं पाहून मम्मी आणि आई दोघी चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला म्हणून खाली गेल्या. ओजस माझ्या मांडीवर पहुडला होता. भरतने आपल्या हातात त्याचा हात धरून ठेवला होता. आम्ही गप्पा मारत होतो. अचानक ओजसने तार सप्तकातला सूर लावला. मी तोपर्यंत एकट्याने, त्याला उचलायलाही शिकले नव्हते. भरतला सांगून बघितलं, तर त्यालाही एवढ्या लहान बाळाला कसं उचलायचं, ते माहित नव्हतं. एकूण काय तर कोणीही असं नव्हतं, ज्याला आम्ही विनंती करून बाळाला उचलून घेऊ शकलो असतो. त्याचं रडणं तर मिनिटामिनिटाला वाढतच होतं. आम्ही खूपच घाबरलो. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. पण, त्याला शांत करणं काही जमलं नाही. मम्मीच्या फोनवर भरतने फोन केला आणि बाळ खूप रडतंय, तर तुम्ही लगेचंच वर या, असंही सांगून टाकलं. मम्मी आणि आई फूल टेन्शनमध्ये वर आल्या आणि पाहतात तर काय की, ओजस, मी आणि भरत तिघंही घळघळा रडतोय. मम्मीने त्याला उचललं. त्याच्या मानेखाली माझा हात सरकवला आणि दुधाशी नेलं. त्याने एकही क्षण न दवडता चुटुक चुटुक दूध प्यायला सुरुवात केली. मम्मी नंतर खूप ओरडली. आणि त्या दोघी आम्ही रडतोय म्हणून हसतसुद्धा होत्या. हे आणखी वेगळंच! आज ही गोष्ट आठवली की, खूप हसू येतं पण, रडत्या बाळाला घेता न येणं हे कुठेतरी मनात टोचलंच!
तो दहा महिन्यांचा झाला आणि आम्ही एकट्याने संसाराची जबाबदारी घेतली. ऑफिसचा पहिला दिवस अजून स्पष्ट आठवतो. आदल्या दिवशी पाळणाघर शोधून, त्या ताईशी सगळं ठरवून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी तयारी करून, झोपेतल्या ओजसला भरतने खांद्यावर घेतलं आणि मी आमची पांढरी काठी हातात घेऊन पुढे चालत पाळणाघरात गेलो. ताईच्या हातात, तान्ह्या ओजसला देताना गळा दाटून आला होता. त्याला तिची कणभरही ओळख नव्हती. पण, ती आपल्या आश्वस्त स्वरात मला समजावत राहिली. मी मन घट्ट केलं आणि तिच्याकडे पाठ फिरवली. सकाळी ८ वाजता सोडलेल्या ओजसला मी थेट संध्याकाळी सव्वा पाचला मांडीवर घेतलं. मी आले, तेव्हाही झोपेतच होता पण, कसं कोण जाणे त्याने मला ओळखलं. तो सताड डोळे उघडून माझ्याकडे दोन क्षण बघत राहिला आणि रडायला लागला. त्याला शांत करताना मीही रडतच होते. त्याला लगेच छातीशी घेतलं आणि पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत राहिले. लबाड! तोंडावरची ओढणी बाजूला करून ताईकडे पाहून हसायलाही लागला होता. दुसऱ्या दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आणि संध्याकाळी बेफाम तापाने ओजस अक्षरशः फणफणला.
नव्या घरात येऊन नुकतेच दोन चार दिवस झालेले. कोणाशीच ओळख नाही. मम्मीला बोलवावं तर तिला एवढ्या रात्री ताबडतोब निघून ये सांगणं म्हणजे तिला प्रचंड मानसिक ताण दिल्यासारखं होणार होतं. बाळाला एवढा ताप असला की, त्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यावं एवढंही आम्हाला माहित नव्हतं. काय करावं ते कळेना. शेवटी शेजारच्यांचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलं. बाळाचे तर डोळेही उघडत नव्हते. अत्यंत घाबऱ्याघुबऱ्या मी समोरच्या काकडे कुटुंबियांचा दरवाजा वाजवला. इथपासूनच माणुसकीच्या नात्याने मदतीला म्हणून आलेल्या अश्विनीताईंसोबत कायमचे, मनाच्या कुपीत हळूवारपणे जपून ठेवावेत असे ऋणानुबंध निर्माण झाले.
 - अनुजा संखे

Tuesday, 20 February 2018

पारधी मुलांच्या शिक्षणाचा 'संकल्प'

भीक मागणं, भंगार वेचणं, दारू विकणं अशी कामं करणारी पारधी समाजातली मुलं. मंगेशीताईंना मुंबईच्या वास्तव्यात ही मुलं दिसली. त्यातली अनेक तर विदर्भातलीच. स्वत:चे बेडे (वस्त्या) सोडून ही मंडळी मुंबईत स्थलांतरित होतात. पण का होतात... भीक मागून का जगतात? या प्रश्नांनीच मंगेशी मुन फुसाटे यांना त्यांच्या मूळ गावी, वर्ध्याला आणून सोडलं.
वर्ध्याला बेडयांवरती राहाणारा पारधी समाज. निरक्षरता, गरिबी, प्रचंड व्यसनाधीनता, चोरी, भीक या दुष्टचक्रात अडकलेला. त्यातून या मुलांना बाहेर काढण्यासाठी मग मंगेशीताईंनी रोठा इथं संकल्प वसतिगृह उभारलं. सध्या इथे 32 मुलं शिक्षण घेत आहेत. वसतिगृहात किमान 100 मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी मंगेशी यांची धडपड सुरू आहे.
पारधी एका गावी स्थिर नसल्यामुळे घरांची नोंद नसते. कागदपत्रं नसतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ होत नाही. मंगेशी सकाळी 7 वाजल्यापासून मुलांच्या आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी, दाखले गोळा करण्यासाठी फिरतात.
स्वतः चे दागिने मोडून वर्ष 2012 पासून मंगेशीताईंनी हे काम सुरू केलंय. त्यांची आईही समाजकार्य करणारी. तरीही, सुरुवातीला मंगेशीचं हे काम तिच्या वडिलांना तितकंसं पसंत नव्हतं. पण मुंबईतली नोकरी सोडून काम करण्यामागची मुलीची तळमळ लक्षात घेऊन वडील देवराव फुसाटे यांनी वसतिगृहासाठी जमीन दान केली. मंगेशीचे पती रमेश यांनी 8 लाख रुपयांचे कर्ज काढून बांधकाम पूर्ण करून दिलं. शेतात पिकणाऱ्या धान्यातून मुलांची खाण्याची सोय झाली.
मुंबईत भीक मागणारी पाच सहा मुलं मंगेशी यांनी वसतिगृहात आणली. वर्धाच्या बेड्यांवरचीही मुल आणली. व्यसनी मुलांना वसतिगृहात शिस्तीने राहायला लावायचं, हे आव्हान होतं. रात्री अपरात्री फिरून व्यसन करणार्‍या मुलांना शोधून मंगेशीताईंनी वसतिगृहात आणलं आहे. अलीकडेच जिल्हाधिकारी किशोर नवल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी वसतिगृहाला भेट देऊन त्यांचं काम जाणून घेतलं.
मुलांनी मागितलेल्या भिकेवर जगणारे, व्यसनाधीन, ही वंचित पारधी समाजाची ओळख मंगेशी यांना 'संकल्पच्या' माध्यमातून बदलायची आहे.

- सचिन मात्रे.

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -10

लग्न झालं आणि मी संपूर्णतः वेगळ्या प्रकारच्या वातावरणात आले. सासरकडच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतींपासून ते जेवणाखाण्याच्या सवयीपर्यंत सर्वच तऱ्हा निराळ्या होत्या. जुळवून घेणं सुरू झालं ते पहिल्या दिवसापासूनच. घरातली सगळी कामं सुरुवातीला मी करायचे पण, त्यांची सवय नसल्याने ती कसलेल्या गृहिणीप्रमाणे तंतोतंत होत नसत. सासूबाईंना हे आवडत नसे. एकदोनदा मला त्या यावर रागावल्या. मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट सांगून टाकलं की, आई, मी लग्नाआधी ही कामं कधीच केली नव्हती. पण, मी केलेलं काम जर तुम्हाला आवडत नसेल तर पुन्हा कधीच करणार नाही. आणि खरोखरच तेव्हापासून मी झाडू मारणं आणि लादी पुसणं ही दोन्ही काम करणं बंद केलं. आईंनीही मला ती पुन्हा कधीच करू दिली नाहीत आणि हे सारं प्रेमाने आणि समजुतीने झालं हे विशेष. त्या माझं खूप करायच्या. अगदी पाण्याचा ग्लास हातात आणून द्यायच्या. सुरुवातीला मला हे छान वाटायचं. पण, मी नोकरी करत नसल्याने सतत काहीच न करता घरात बसून राहणं अंगावर यायला लागलं. मी किचनमध्ये काम करता यावं म्हणून प्रयत्न करू लागले. पण, आईंना ते आवडलं नाही. त्यांनी मला किचनमध्ये काम करायला प्रोत्साहन दिलंच नाही. त्यांना खूप भिती वाटायची की, मी गॅस कसा चालू करणार? चटका लागला तर? आणि मी स्वयंपाक बनवला तरी तो कसा असेल चवीला? हे प्रश्न बहुधा त्यांना पडत असावेत. काही का असेना पण, माझी किचनमध्ये लुडबूड करण्याची हौस मात्र विरत चालली होती. त्यांचं मन नेटकेपणाने वळवण्याचा मी आणि भरतने खूप प्रयत्न केला. पण, ते काही सहजासहजी शक्य झालं नाही.
माझ्या गर्भारपणात गावाला अचानक काहीतरी तातडीचं काम निघालं आणि आईपप्पांना तिथे जावंच लागलं. तेव्हा मी आनंदाने सर्व जबाबदारी घेतली. त्यांना जायला सांगितलं. कितीतरी दिवसांनी मी किचनमध्ये येत होते. मला बाकी कामांची आवड नसली तरी स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळेच थोडंफार बनवायलाही शिकले होते.
पण, आई गेल्यावर जेव्हा लायटर हाती धरला आणि गॅस चालू करण्याची वेळ आली तेव्हा माझा हात भितीने थरथरत होता. मी कसाबसा गॅस चालू केला आणि पोहेच बनवले. या घटनेने मला विचार करायला भाग पाडलं की, मी माझ्या आत्मविश्वासाची किंमत चुकवून एकत्र कुटुंब टिकवून धरलं पाहिजे का? प्रश्न एवढा कठिण होता की, एकटीने तो सॉल्व होणार नाही हे मला कळून चुकलं. भरतशी एक मित्र म्हणून जे काही वाटतंय ते स्पष्टपणे बोलायचं असं ठरवलं. संध्याकाळी भरत ऑफिसमधून आल्यावर ही बाजू पटवून सांगितली आणि त्याला बिनदिक्कतपणे ती पटली. आम्हा दोघांचा स्वतंत्र संसार हाच यावर उपाय असू शकतो असं आम्हा दोघांचं एकमत झालं आणि योग्य वेळ येताच यासंदर्भातला आपला निर्णय मोठ्यांना सांगायचा असंही आम्ही ठरवलं. हा निर्णय घेणं तितकंसं सोपं नव्हतं. दोन्ही घरच्या प्रत्येक नातेवाइकाच्या ‘आम्ही सर्व करू शकतो’ हे गळी उतरवावं लागलं. आनंदाने मुळीच नाही पण, आमच्या हट्टाने सर्वांनी ते मान्य केलं. यातच ओजसचा जन्म झाला आणि तो थोडा मोठा झाल्यावर वेगळा संसार मांडायचं आम्ही ठरवलं.
बाळ आपलं भविष्य सुरक्षित करून आल्यासारखंच आमच्या जीवनात आलं. मला एका बॅंकेत क्लर्कची नोकरी मिळाली तर भरत ऑफिसर म्हणून दुसऱ्या बॅंकेत रुजू झाला. दोघांच्या बॅंकेतल्या नोकऱ्यांनी स्वतःचं घर असावं या स्वप्नाला धुमारे पुटले. ओजसचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच व्हावा असं ठरवून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. स्वतःचं घर होईपर्यंत आम्ही एकत्रच राहिलो. घराचा ताबा मिळाला आणि दहा महिन्यांच्या ओजसला घेऊन मी आणि भरत दोघंच फ्लॅटवर दाखल झालो.
नोकरी सांभाळून संसार करण्याला मम्मी तारेवरची कसरत का म्हणत होती ते पहिल्या दिवशीच कळलं. ओजसची आजारपणं, स्वयंपाक करणं, कपडे, भांडी आवरणं, एक ना दोन. जी काम दोन वर्षाच्या संसारात केलीच नाहीत ती एकदमच अंगावर आली. मी आणि भरतने सगळी कामं वाटून घेतली आणि ती करू लागलो. आजही कपडे मशिनला लावणं, वाळलेले कपडे काढून त्यांच्या घड्या घालणं आणि धुतलेले वाळत घलणं हे काम भरत करतो. मी, स्वयंपाक आणि भांडी कधीतरी. मला बरं नसलंच तर किंवा कधी एकट्यानेच रहायची वेळ आलीच तर भरतला स्वतः पुरतं अन्न शिजवता यावं या हेतूने मी त्याला खिचडी, मॅगी, चहा आणि कॉफी हे पदार्थही
बनवायला शिकवले आहेत. आता खूप आव्हानं, जबाबदारी आणि त्यासोबतच येणारी टेन्शन्स आहेत. पण, एकमेकांशी वागण्यातला मोकळेपणा, ओजसला वाढवण्यातलं स्वातंत्र्य आणि मनानेच काहीबाही कॉंबिनेशन करण्याची मोकळीक या बदल्यात आम्हांला मिळालंय हे काही कमी नाही.
 - अनुजा संखे

रेशीमशेतीचा धागा सुखाचा...


"दुष्काळाने बरचं काही शिकवलं. रेशीम शेतीची वाटही दुष्काळानेच दाखवली." बीडमधल्या सोनीमोहा गावचे संदीपान तोंडे सांगत होते.
बालाघाटाच्या डोंगरकुशीत वसलेलं,धारूर तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातलं सोनीमोहा. तीन हजार लोकसंख्या. इथल्या ८० टक्के गावकर्‍यांचं ऊसतोडणी हेच मुख्य काम. ७५० हेक्टर शेतीजमीन. मात्र सगळी मुरमाड. त्यामुळे पिकांचं उत्पादन कमीच. वर्षातले सहा महिने ऊसतोडणीसाठी स्थलांतर, पश्चिम महाराष्ट्रात, कर्नाटकात.
या स्थलांतरामुळे आरोग्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत अनेक प्रश्न उभे राहायचे. खरीप, रब्बीच्या पारंपरिक पिकांभोवतीच इथली शेती फिरत होती. जेमतेम उत्पन्न हाती पडायचं. मुरमाड जमिनीमुळे रताळ्यांचं सर्वाधिक उत्पादन निघायचं पण त्याची उपवासाच्याच काळात विक्री होत असे, तेवढीच. त्यामुळे काही वर्षांपूर्वी कमी पाण्यावर येणाऱ्या तुतीच्या लागवडीकडे गावातले रावसाहेब मुळे, सुदाम साठे, विठ्ठल भोसले हे शेतकरी वळले.
चार वर्षांपूर्वी त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. बंगळूरु, रामनगर इथं रेशमाच्या कोषांची विक्री करून एकरी दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळू लागलं. त्यांची ही प्रगती पाहून गावातले ८० शेतकरी रेशीम शेतीकडे वळले. त्यांना रेशीम संचालनालयाचे मार्गदर्शन मिळत आहे.
तुतीच्या पानापासून रेशीम कोष तयार होतात. अंडीपुंजापासून एक महिन्यात हे कोष तयार करण्यात येतात. यासाठी किटकांना दिवसातून दोन वेळा तुतीचा पाला टाकण्यात येतो. हे कोष विक्रीयोग्य झाल्यानंतर बंगळूरु,रामनगर येथे प्रति क्विंटल ४० ते ४५ हजार रुपये भाव मिळतो.
कोषांना चांगला भाव मिळू लागल्यानं सोनीमोहा गावात रेशीम शेतीची चळवळच सुरू झाली. पीकपेऱ्यात बदल झाला अन् गावाचं चित्र पालटलं.
रेशीमशेतीने साथ दिल्याने अनेकांच्या हातातला कोयता सुटला. ऊसतोडणीपेक्षा अधिक पैसा यात मिळू लागल्याने आर्थिक स्थैर्य आलं. स्थलांतर थांबलं, आराेग्य सुधारलं, कुटुंबाबरोबर स्थलांतरीत होणारी मुलं शाळेत जाऊ लागली, मुलींचंही शिक्षण सुरु झाले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतूनही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रति एकरी २ लाख ९० हजार रुपये मिळतात. यंदा २० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. विठ्ठल भोसले, प्रल्हाद तोंडे, लक्ष्मण तोंडे, गोपीचंद साठे, नवनाथ भोसले, बळीराम दराडे, सुभाष तोंडे, भास्कर तोंडे, पांडुरंग तोंडेे यांनी ऊसतोडणी थांबवली असून त्यांच्यासाठी रेशीमशेतीचा धागा सुखाचा ठरला आहे.

अमोल मुळे.

Saturday, 17 February 2018

तमाशाच्या पैशांतून विद्यार्थ्यांना मिळाले टॅब

पुण्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा. तुम्ही अगदी गुगल मॅपवर शोधायला गेलात तरी आयएसओ 9001/2008 मानांकित वाबळेवाडी जि.प. शाळा सहजच सापडते. शाळेत प्रवेश केला की नजरेत भरते डावीकडे उत्तम राखलेल्या हिरवळीतील ‘अंक- अक्षर उद्यान’ आणि उजवीकडे विद्यार्थ्यांसाठी खुला रंगमंच. हिरवळीत साकारलेल्या या उद्यानात मधे- मधे लावलेल्या फरशांवर अंक आणि अक्षरे तसेच, बेरीज- वजाबाकी आणि गुणाकाराची चिन्हे रेखाटलेली आहेत. त्यावर खेळता- खेळता मुलांचा सहज अभ्यास होतो. समोरच कौलांची बैठी इमारत असलेली छोटी शाळा आहे. या शाळेची एकही भिंत रिकामी नाही. भिंतीवर नद्यांची नावे, इंग्रजीचे शब्दार्थ, गणित आणि विज्ञानाची सूत्रे असे बरेच काही आकर्षक रंगात रंगविलेले दिसले.थोडंसं पुढे गेलो की विज्ञान कक्ष दिसतो, मग संगणक कक्ष दिसतो आणि कलाकुसरीला वाहिलेला ‘आर्ट क्लास’ ही दिसतो. आपल्याला खरेतर इयत्ता, तुकडी असे वर्ग बघण्याची सवय असते. विज्ञान कक्ष अनेक सुंदर आणि साध्या-सोप्या उपकरणांनी सजलेला होता. इथं ग्रहताऱ्यांची बनलेली आणि आपणहून फिरणारी सूर्यमाला आहे, पचनसंस्था, श्वसनसंस्था यांचे जोडता येणारे आणि वेगळे करता येणारे कृत्रिम पार्ट आहेत, सौरऊर्जेवर पाणी तापविणाऱ्या बंबाची प्रतिकृती, नद्यांवर बांधलेल्या धरणाची प्रतिकृती आणि अगदी चारचाकी गाड्यात इंजिन कसे काम करते त्याचीही प्रतिकृती आणि अनेक तक्ते आहेत.
वाबळेवाडीची शाळा खरंच सर्वार्थाने वेगळी आहे. या शाळेत इयत्ता आणि हुशारीनुसार तुकड्या पाडून शिक्षण दिले जात नाही. इथं तुम्हांला आवड असलेल्या वर्गात बसून शिकता येते. म्हणजे गणिताची आवड असणाऱ्यांसाठी ‘गणित कक्ष’, प्रयोगातून विज्ञान शिकायचे असेल तर ‘विज्ञान कक्ष’!! एकाच वेळी वेगवेगळ्या वयाची मुले एका विषयाचा अभ्यास करत असतात आणि तो पारंपरिक घोकंपट्टीचा नसतो तर प्रात्यक्षिक ज्ञानाचा आणि कृतीआधारित अभ्यास असतो. गणितासाठी सुद्धा ज्ञानरचनावादाचा उपयोग करीत ‘अंक- अक्षर उद्यान’, आईस्क्रीमच्या काड्या, गोट्या, रंगीत मणी यांच्या सहाय्याने हसत खेळत गणित शिकविले जाते. शिवाय कंटाळा आला की मातीकाम, कागदकाम, शिवणकाम शिकविणारा सुंदर ‘आर्ट क्लास’ आहेच. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे एक कायमस्वरूपी प्रदर्शनच या कक्षात मांडलेले आहे


महाराष्ट्रातील काही मोजक्या शाळांप्रमाणे वाबळेवाडीची शाळादेखील विनादप्तर शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब मिळालेले आहेत. 100 टक्के डिजिटल होण्याची या शाळेची गोष्टही ऐकण्यासारखी आहे. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सर त्याविषयी बोलताना सांगतात, “प्रत्येक गावात दरवर्षी एखादी यात्रा- जत्रा भरते, आमच्याही गावात दरवर्षी ग्रामदैवताची यात्रा भरते. यात्रा म्हणलं की सगळ्या प्रकारचे हौसे- नवसे- गवशे येतात. गेली कित्येक वर्षे गावातल्या यात्रेतील तमाशाचे संपूर्ण शिरुरला आकर्षण असायचे. मात्र एका वर्षी यात्रेसाठी झालेल्या सभेत मी या संगणकयुगात विद्यार्थ्यांसाठी संगणक आणि टॅबची गरज आहे, हा मुद्दा मांडला. कोणत्याही मनोरंजनापेक्षा मुलांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे समजावून सांगितले आणि ग्रामस्थांनी सुमारे 1.20 लाखांची तमाशाची सुपारी रद्द करुन ते पैसे शाळेचा संगणक कक्ष उभारण्यासाठी दिले” हे ऐकून अर्थात गावाचेही कौतुक वाटले.


- स्नेहल बनसोडे-शेलुडकर. 

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -9

मी शिक्षण व्यावसायिक पद्धतीने घेतलं असलं, तरी नोकरी मिळणं तितकंसं सोपं नव्हतं. अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी माझ्या नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याच्या निर्णयाचं खूप कौतुक केलं. पण, पूर्ण वेळ पत्रकार म्हणून नोकरी द्यायची हिंमत कोणीही दाखवली नाही. तिथं माझं अंधत्वच आड आलं. पण, तरीही कधी या वाहिनीवर तर कधी त्या वृत्तपत्रातून इन्टर्नशिप करत मी अनुभव मिळवत राहिले.
हा खटाटोप चालू असतानाच पीजी डिप्लोमा इन मिडिया ऍंड डिसेबिलिटी कम्युनिकेशन या कोर्ससाठी माझी निवड झाली मी पुन्हा पूर्णवेळ विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरले. याच डिप्लोमाच्या आधारे मला बंगलुरूमधल्या एका फंडिंग एजन्सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली असं म्हणता येईल.
भारतातल्या निरनिराळ्या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या एनजीओंना फंड देऊन त्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या अंधअपंगांसाठी काम करवून घेणं असा फंडिंग एजन्सीचा उद्देश. मी प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून २०१३ च्या जानेवारीत रुजू झाले. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्यामागे ठामपणे उभं असण्याच्या जाणिवेने, बंगळूरूसारख्या सर्वस्वी भिन्न असलेल्या शहरात आत्मविश्वासाने एकटी वावरू शकत होते, त्या माझ्या पप्पांना मे महिन्यात, काळाने कायमचं हिरावून नेलं. पप्पांचं नसणं हे मी समजूच शकत नव्हते. म्हणजे पप्पांच्या नंबरवर फोन करायचा आणि पुन्हा पप्पा कधीच ‘हॅलो बेटा’ म्हणणारंच नाहीत हे समजण्यापलीकडचं होतं माझ्यासाठी. त्यांना कधीच भेटता येणार नाही हे तर स्पष्टच होतं. पण, इतरांप्रमाणे, मी त्यांना फोटोंमधूनही पाहू शकणार नसल्याची जाणीव अक्षरशः जीवघेणीच होती.
आम्हा पाच जणांच्या कुटुंबात माझं अंधत्व आणि त्यामुळे भावनाप्रधान असलेलं मन समजू शकणारे माझे पप्पाच गेले होते. परत कधीच न येण्यासाठी. “हिच्या जागी आपली डोळस मुलगी असती आणि जर तिला उच्च शिक्षणानंतर बाहेरगावी नोकरीनिमित्त जावं लागलं असतं, तर? तर, आपण तिला थांबवलं असतं का?” त्यांनी मम्मीला विचारलेल्या एका प्रश्नानेच माझं भविष्य साकारू शकणाऱ्या नोकरीत रुजू होण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळेच की काय, कोण जाणे! त्यांच्या जाण्यानंतर मी त्या नोकरीत रमूच शकले नाही.
बंगलोरला आले आणि पप्पा कायमचे दुरावले ही जाणीव सतत मन कुरतडत राहायची. मी कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं आणि नोकरी सोडून पुन्हा बोइसरला आले. याच काळात भरतला बॅंकेत नोकरी लागली आणि आमच्या लग्नाचं घरच्यांनी मनावर घेतलं. घरात कोणाचा मृत्यू झाला की, वर्षभरात लग्न करावं यावर दोन्ही घरच्यांचं एकमत झालं. २०१४ च्या फेब्रुवारीत आमचं लग्न झालं आणि कॉलेजपासूनच्या आमच्या प्रेमाला एका सुंदर नात्याचं कोंदण मिळालं. त्यावेळच्या अवस्थेचं वर्णन सुखदुःखाचा मिलाफ असं करता येईल.

 - अनुजा संखे

खाऊच्या पैशांची 'टॉयलेट' कथारोजगारासाठी पुण्याला गेलेले आईवडील. त्यामुळे घरात फक्त त्या दोघींचंच वास्तव्य. घरात टॉयलेट नसल्याने रात्री, अपरात्री नैसर्गिक विधीसाठी या चिमुरड्या बहिणींनी बाहेर जायचं कसं?
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आमला तांडा इथल्या निकिता आणि अस्मिता या बहिणींची ही गोष्ट.
घरची गरिबी. या दोघीही सुटीच्या दिवशी मोलमजुरीला जातात. आईवडिलांनी पाठवलेल्या पैशात त्यांचा शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह भागवायचा. घरची सर्व कामं करून दोघीही अभ्यास करतात. आपल्या घरीसुद्धा शौचालय असावं, असं त्यांना सतत वाटत होतं. ते कसं होणार याची चिंता होती. गावात तपासणीसाठी आलेल्या गुड मॉर्निंग पथकाने खड्डा असेल, तर शौचालयाचं बांधकाम करून देण्याची हमी दिली. स्वप्नवत वाटणारं टॉयलेट साकारण्यासाठी निकिता-अस्मिताची धडपड सुरू झाली. आई बाबा तर पुण्याला. खड्डा खोदण्यासाठी पैसे आणायचे कुठून? शाळेत बचत बँकेत जमा केलेले पैसे काढायचे आणि त्यातून खड्डा खोदायचा, ही कल्पना निकिताला सुचली. हे पैसे काढून तिने शौचालयाचा खड्डा खोदला. जे मोठ्यांना जमलं नाही, ते त्या चिमुकलीने करून दाखविलं.


स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावागावांत शौचालय बांधकाम करण्यासाठी दिग्रस पंचायत समितीचे गुड मॉर्निंग पथक तालुक्यात जनजागृती करीत आहे. तालुक्यातील आमला (तांडा) येथे हे पथक पोहोचलं. त्यांनी नागरिकांना शौचालय बांधकामाची माहिती दिली. ’खड्डा तुम्ही खोदून द्या, सरकार शौचालयबांधकाम करून देते’, असं त्यांनी नागरिकांना सांगितलं. हे ऐकून आठवीतल्या निकिता राजेश राठोडची उत्सुकता शिगेला पोहोचली. तिने खाऊचे आणि शाळेच्या बचत बँकेत जमा केलेले पैसे एकत्र करून सरपंच किरण तायडे, पोलिस पाटील माया जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने 800 रुपयांत खड्डा खोदून घेतला.
दुस-या दिवशी गुड मॉर्निंग पथक गावात येताच त्यांना आता शौचालय बांधून द्या, अशी विनंती केली. तिची इच्छाशक्ती बघून गुड मॉर्निंग पथकाने सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून निकिताच्या घरी शौचालयाचं बांधकाम सुरू केलं आहे. तिच्या या धडपडीचं कौतुक होत आहे. बालवयात निकिताने समाजासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. “गावात घरोघरी शौचालय बांधलं जात आहे. पण, आम्हा बहिणींना उघड्यावर शौचास जायला लागायचं. त्याची आम्हाला लाज वाटत होती. त्यामुळेच खाऊंच्या पैशातून शौचालय उभे करण्याची कल्पना सुचली”, असं तिने सांगितलं. 

- नितीन पखाले.


पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 8


बारावीतच पुन्हा एकदा, पुढे काय या प्रश्नाने मला वेढलं. साधं सरळ बीए न करता काहीतरी विशेष करावं, असं मला वाटत होतं. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल असं वाटलं. बारावीच्या परिक्षेनंतर बीएमएम कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये आहे ते शोधून काढलं आणि त्याच्या प्रवेशपरिक्षेचा अभ्यास सुरू केला. खरं तर, मला प्रवेशपरीक्षा ही संकल्पनाच स्पष्ट झाली नव्हती. मी करंट इशूजचा खूप सखोल अभ्यास केला. पण, जनरल नॉलेजचा काहीच अभ्यास केला नाही. तो करावा लागतो, हे मा्हीतही नव्हतं आणि त्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल असंही कोणी नव्हतं. ठरवल्याप्रमाणे लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली पण, आवश्यक असलेल्या मेरिटमध्ये आले नाही. माझा नंबर एसआयईएस कॉलेजच्या बीएमएमसाठी लागला होता. पण, रुइया सोडण्याची इच्छा झाली नाही. कदाचित, मी होऊ घातलेल्या बदलाला तयार नव्हते हेच खरं.
बीएमएमच्या नादात मी बीएला ऍडमिशन घेऊन ठेवावं ही साधी गोष्टही विसरून गेले होते. इथे बीएमएमची लिस्ट लागली आणि त्यात माझं नावच नाही म्हटल्यावर मी अक्षरशः घाबरले. कारण, बीएची ऍडमिशन बंद झाली होती. मी आमच्या उपप्राचार्या वत्सला पै यांच्याकडे गेले आणि माझी सर्व हकिकत सांगितली. त्यांनी विशेष तरतूद करून मला बीएला प्रवेश दिला. पण, तरीही पत्रकारितेत करिअर करण्याचा किडा मात्र वळवळतच राहिला.
मी मुंबई मराठी पत्रकार संघाची माहिती काढली आणि तिथे जाऊन आले. तिथल्या सरांना भेटल्यावर आणखीच हुरूप आला आणि तो सहा महिन्यांचा कोर्स मी पूर्ण केला.
बीए उत्तीर्ण झाल्यावर मधल्या सुट्टीत मी एमएसीजे या मुंबई विद्यापीठातून चालणाऱ्या प्रोफेशनल कोर्सची माहिती मिळवली. विद्यापीठात फोन करून पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्याशी संपर्क साधला. यांचा उल्लेख इथं अनिवार्यच आहे. कारण, मी संपूर्णतः दृष्टीहीन असून माझी पत्रकार होण्याची इच्छा सांगितल्यावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न देता त्यांनी मला “तुम्ही नक्कीच पत्रकारितेचा अभ्यास करू शकता, फक्त जिथे विडियो प्रोडक्शन करावं लागतं त्याऐवजी तुम्ही असाइनमेन्ट्समध्ये काय करू शकता याचा मला जरा विचार करू द्या. तुम्ही उद्या भेटायला येऊ शकता का?” असं विचारलं. मी ठरल्याप्रमाणे गेले, तर सरांकडे माझ्यासाठीचा पूर्ण प्लॅन डिजाइन केलेला होता. त्यांनी सर्व विषयांची माहिती दिली आणि व्हिडीओ प्रोडक्शनच्या बाबतीत सर काय म्हणताहेत याकडे माझं लक्ष लागलं. ते म्हणाले, "असाइनमेन्टमध्ये दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर होईल अशा जाहिराती आणि शॉर्ट फिल्म तयार कराव्या लागतात. तू शुटिंग तर करू शकणार नाहीस. पण, त्यामागचं तंत्र समजून घेता येईल. शिवाय, रेडिओसारख्या श्राव्य माध्यमासाठीचे कार्यक्रमही तुला बनवता येतील". मी त्यांच्या या तोडग्याने खूपच प्रभावित झाले. त्यांच्या हातात मला प्रवेश नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता. तरीही, माझं अंधत्व हे पत्रकारितेमध्ये अडसर ठरू शकत नाही, हे त्यांनी फक्त सहकारी शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर खुद्द मलाही पटवून दिलं. त्यांच्या एका ठाम निर्णयाने मी पत्रकारिता आणि संज्ञापन या विषयात एमए करू शकलेे. असं करणारी मी पहिली अंध विद्यार्थिनीही ठरले. 

- अनुजा संखे

Friday, 16 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -7

दहावीत असतानाच, पुढे काय करायचं, असा प्रश्न मनात येई. पण, तेव्हा काहीच सुचायचं नाही. मोठे विचारायचे, त्याला उत्तर एकच. कॉलेज करायचं. मी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाले. आणि माझ्या शाळेपासून जवळ असलेल्या रुइया महाविद्यालयात दाखल झाले. शाळेच्या छोट्या, मर्यादित आणि बंदिस्त जगातून बाहेर पडण्याची संधी म्हणजे हे कॉलेजजीवन होतं. आठवी ते दहावी जरी आम्ही सरस्वती हायस्कूल, नायगाव या डोळस मुलांच्या शाळेत जात असू. तरीही डोळस मुलांमध्ये वावरणं तेवढंसं शक्य व्हायचं नाही.
‘या मुलींना कसं दिसत नाही’! असं आश्चर्य मुलांना सतत असायचं. शाळेत मुलं आणि मुली वेगळे बसत. खूपच कमी मुली दृष्टीहीन विद्यार्थीनींशी मैत्री करण्याची इच्छा असणार्‍या. खरं तर, दृष्टीहीन विद्यार्थिनींना जवळ घेऊन बसा म्हणून प्रत्येक वेळी त्यांना सांगावं लागे. माझी दोघीतिघींशी छान मैत्री झाली होती. त्या मला माझ्या कविता देवनागरीत लिहून द्यायच्या अशी आठवण मी जपून ठेवली आहे. शाळेच्या अशा वातावरणातून कॉलेजमधल्या मोकळ्या वातावरणाला सरावण्यातच वर्ष गेलं.
माझ्या शाळेत जरी एकट्याने चालायला शिकवलं असलं तरी पहिल्याच दिवशी एकटीने घरी येताना उडालेली धांदल शब्दात सांगण्यासारखी खचितच नाही. हा एकटेपणा वर्गात लेक्चर्स अटेंड करताना खूपच अंगावर यायचा. प्राध्यापक वर्गात आले की, त्यांच्या विषयावर काहीतरी बोलत आणि प्रत्येकाला आपल्या परिचय देण्यास सांगितलं जाई. आम्ही जेवढे म्हणून दृष्टीहीन विद्यार्थी वर्गात असू तितक्यांना सर्वात पुढल्या बाकावर बसवलं जात असे. गंमत अशी की, कमी मुलं वर्गात असली की, ती एकदम मागचे बेंच पकडून बसत असत पण, आम्ही मात्र पहिल्याच बेंचवर बसायचं हा नियम होता. हा ना कोणत्या प्राध्यापकांनी घातलेला पायंडा होता ना एखादा नियम पण, चोख बजावला जायचा. त्यामुळे इतर डोळस विद्यार्थ्यांशी मैत्री करण्यात अडचण यायची. क्वचितच कोणी स्वतःहून बोलायला आलं तर...!
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास यांसारख्या विषयांसाठी नेमलेली पुस्तकं ब्रेलमध्ये उपलब्ध करून घेणं, हे खूपच जिकिरीचं असायचं. मग, सगळा अभ्यास प्राध्यापकांनी दिलेल्या नोट्सवर अवलंबून. वर्गातली अशी कोण व्यक्ती असेल, जी आपल्याला नोट्स देऊ शकेल? याचा शोध
घ्यावा लागे. मग, विनंती करून जर नोट्स मिळाल्याच तर त्या रेकॉर्ड करायला किंवा ब्रेलमध्ये लिहून घेता याव्यात, म्हणून एखादी वाचून दाखवणारी व्यक्ती शोधावी लागे. त्यांच्या वेळा आणि आपल्या वेळा सांभाळत हे काम करताना एवढा वेळेचा अपव्यय व्हायचा की, अभ्यास करणं नकोसं व्हायचं. नोट्स मिळवा, मग त्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगा. मग त्या ब्रेलमध्ये लिहा. एका वेळेत जे डोळस विद्यार्थ्यांना उपलब्ध होत होतं तेच आम्हाला तिप्पट वेळ मोजून करावं लागत होतं.
आता मात्र बरेच पर्याय आहेत. पुस्तकंच्या पुस्तकं स्कॅन करून ती सरळ ब्रेलमध्ये प्रिंट करून घेता येतात. जे मोबाईल किंवा कम्प्युटर वापरतात, त्यांना पीडीएफ कॉपी मिळाली की, ते स्क्रिन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकतात. तरीही इतर विद्यार्थ्यांची आणि वाचकांची गरज अधूनमधून भासतेच.
आमच्या ‘सेल्फ विजन सेंटर’तर्फे ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त मोठा, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. याचं आयोजन सेंटरमध्ये येणारे दृष्टीहीन विद्यार्थी करतात. सूत्रसंचलनापासून ते नृत्य, गायन, नाटक, कविता सादरीकरण, कथाकथनापर्यंत सर्व प्रकार आयोजित करण्याबरोबरच सादरही हीच मुलं करतात. माझ्या कॉलेजजीवनाची पाचही वर्षं मी ब्रेल डेच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि स्टेज फिअरवर मात करण्याचा पुन्हा पुन्हा सराव होत राहिला.
- अनुजा संखे

Tuesday, 13 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -6

अजाणत्या वयात अंधत्व आल्याने, माझ्याप्रमाणेच बहुसंख्य मुलांना आईवडिलांची ऊब, भावंडांसोबतचं प्रेम आणि तक्रारींनी भरलेलं आयुष्य, आपल्या नातेवाईकांच्या आपले-तुपलेपणाच्या भावना आणि यातून निर्माण होणारी एक सुरक्षिततेची जाणीव यांपासून जाणीवपूर्वक वेगळं राहून, भविष्य साकारावं लागतं. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, कौटुंबिक संरक्षक कवच गमवायला लागतं. ही पहिली किंमत लहान वयातच द्यावी लागते. नकळत्या वयातच आपल्या बरोबरीची आपल्यासारखीच मुलं आणि सर्वाशी सारख्याच ओलाव्याने आणि दुराव्याने वागणाऱ्या आयांभोवती, आम्हा जेमतेम सहा सात वर्षांच्या मुलींचं जग गुंफलं गेलं होतं. चूक केल्यावर ओरडा चुकला नाही. आणि चांगलं केल्यावर कौतुक मिळालंच, असंही प्रत्येक वेळी झालं नाही.
नकळत आपण घरापासून दूर राहतो आहे ही जाणीव तीव्र होत गेली. आणि आपण घरी आल्यावर प्रत्येकाचं आपल्याकडे लक्ष असावं अशी इच्छा मूळ धरू लागली. घरी आल्यावर पूर्वीप्रमाणे बाहेर हुंदडणं शक्य होत नसे. मग करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही. या माध्यमाचं आकर्षण माझ्याप्रमाणेच इतर मुलांनाही होतंच. त्यांचंही आमच्यासारखं वेळी अवेळी बाहेर फिरणं बरंच कमी झालं होतं. याचा परिणाम म्हणजे आम्हा भावंडांची भांडणं. आतासारखे तेव्हा कार्टून दाखवणाऱ्या चॅनल्सची रेलचेल नसायची. पण, एकदोन चॅनल्स होतेच. माझ्या भावांना नेहमीच कार्टून पहायचं असे तर मला शब्दप्रधान कार्यक्रम पहायचे असतं. कार्टून हे ऐकण्यापेक्षा पाहण्याच्या प्रकारात मोडत असल्याने त्यातून माझं मनोरंजन होत नसे. यावरून त्यांचं आणि माझं सतत भांडण आणि बेबनाव व्हायचा. ही शाळेत असते तेच बरं, असंही ते एकदोनदा बोलले आहेत. त्यावेळी खरं तर मम्मीपप्पांनी मला ओरडा दिला. पण, मनात निर्माण झालेली ही भावना धोक्याची एक सूचनाच होती. माझं माझ्या, कुटुंबापासून हळूहळू विलग होणंच सूचित करणारी.
मला घरी आल्यावर इतरांकडे जायला आवडत नसे. व्हायचं काय की, भाऊ लहान असल्याने मम्मीचं अधिक लक्ष त्यांच्यामध्ये असायचं. पप्पा त्यांच्या वेळीअवेळी ड्युटीला जावं लागण्याने वाट्याला खूपच थोडे यायचे. त्यात जर काका-मामांकडे जावं लागलं तर मम्मी सगळ्यांना भेटण्यात गर्क होऊन जायची. आणि मला एकटेपणाची भावना घेरून राहायची. त्या एकटेपणाविषयी, तेव्हा स्पष्ट करून सांगणं मला शक्य होत नव्हतं. किंवा ते न सांगता समजून घेण्यासारखंही नव्हतं. मी सतत मम्मीच्या मागे फिरायचे आणि आपल्या घरी चल म्हणून रडत राहायचे. करमायचंच नाही मुळी. काका-मामाच्या मुलींनाही सांगितल्याशिवाय माझ्यासोबत खेळण्याची इच्छा नसे. अशात तिथं वाट्याला येणारे दोन दिवस घालवावेत ही कल्पनाच असह्य होत असे.
माझं रडणं, घरी चल म्हणून भुणभुण लावणं मम्मीलाही वीट आणत असेल ना? तिनेही ही शाळेतच बरी असा विचार केला असेल का कधी? याचं उत्तर जाणून घेण्याची हिंमत माझ्यात नाही, हे प्रांजळपणे कबूल करते. कारण असा विचार येणं स्वाभाविक आहे असं मलाच वाटतं. 

 - अनुजा संखे

जेव्हा लष्करी अधिकार्‍यांच्या पत्नी एकत्र येतात

अ‍ॅड मीनल वाघ भोसले यांचे पती नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन सेंटरमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यंच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टींगदरम्यान लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा ताण मीनलेने अनुभवला. मित्रपरिवारातील एका अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबाची सुरू झालेली वाताहत मीनल यांना अस्वस्थ करून गेली. याच कालावधीत चीता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे १४ हून अधिक अपघात झाले. त्यामध्ये १७ हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. पतीसोबत चर्चा करताना समजलं की कालबाह्य आणि सदोष लष्करी सामग्रीमुळे लढाऊ विमानांचे अपघात होत असून त्यामुळेच वैमानिकांचे जीव जात आहेत. अशा अपघातांत नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी त्यांनी आवाज उठवण्याचा निर्धार केला. पती लष्करी अधिकारी असताना त्याच यंत्रणेविरोधात आवाज उठवणं अवघडच. लष्करी अधिकाऱ्यांच्या समविचारी पत्नींना सोबत घेत त्यांनी चार वर्षापूर्वी ARMY WIVES AGITATION GROUP अर्थात लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीची संघटना स्थापन केली.
लष्करी अधिकारी आणि जवानांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी कालबाह्य, सदोष लष्करी सामग्रीचा वापर थांबविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन मिग २१ विमानाप्रमाणे अपघातांच्या मालिकेत सापडलेल्या लष्कराच्या चीता व चेतक हेलिकॉप्टर्सचा वापर त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी केली. या मागणीला पर्रिकर यांनी प्रतिसाद देत काही तांत्रिक पर्याय दिले. लष्कराची लढाऊ विमानांची गरज पाहता ही खरेदी पैसे असूनही लगेच शक्य नसल्याने चीताच्या जुन्या इंजिनऐवजी नवीन इंजिन बसवून त्याचं नामकरण ‘चित्तल’ असं करण्यात आलं. दुसरीकडे, स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून ‘कामाऊ’ हे नवीन लढाऊ विमान लष्करी सेवेत दाखल केलं गेलं. हे सगळं मार्गी लागत असताना मीनल यांच्या संघटनेने अपघातात मृत्यू पावलेल्या जवानांच्या पत्नींना त्यांचा आर्थिक हिस्सा मिळावा यासाठीही काम सुरू केलं आहे. या प्रयत्नांमुळे एका वीरपत्नीला मुंबई परिसरात पेट्रोलपंपासाठी जागा मिळणार आहे.

 -प्राची उन्मेष

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 5

माझ्या शाळेबद्दल जितकं लिहावं, तितकं कमीच. मोठी दूरदृष्टी ठेवून तिने आम्हा मुलींना घडवण्याचा प्रयत्न केला. मी इतर उपक्रमांबद्दल सांगितलंच आहे. पण, सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे आपल्या दृष्टीहीन मुलींना बाहेरच्या जगाची, त्याच्या अंधत्वाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची जाणिव करून देणं. मुलींना शक्य तितकं सक्षम करणं, हेच शाळेचं मुख्य धोरण. याचसाठी आमची शाळा सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं की, मुलींना डोळस मुलांच्या शाळेत पाठवत असे.
“Inclusive Education” म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण पद्धती. ही संकल्पना समाजात मूळ धरण्यापूर्वीपासूनच दृष्टीहीन विद्यार्थीनींना जवळच्या सरस्वती हायस्कूल, नायगाव या शाळेत पाठवलं जायचं. या शाळेत पाठवण्यामागचा उद्देश असा की, मुलींच्या मर्यादित, बंदिस्त आणि अतिशय सुरक्षित वातावरणातून त्यांना खऱ्या जगाची ओळख व्हावी, जेणे करून महाविद्यालयात गेल्यावर सगळंच अगदी नवीन नसावं. मुलींना डोळस व्यक्तींमध्ये व्यवस्थित वावरता यावं. खरंच, किती दूरदृष्टी होती शाळेकडे!
याच शाळेत विद्यार्थीच नव्हे, तर कितीतरी असे शिक्षक होते, ज्यांना अंध व्यक्तींशी कसं बोलावं वा वागावं याची कल्पना नव्हती. जसजशा, दरवर्षी दृष्टीहीन विद्यार्थिनी वाढत गेल्या, तसतशी त्यांची सर्वांना सवय झाली. शिवाय, नृत्य आणि गायन प्रकारात या मुलींना असलेली गती हेसुद्धा कुतुहलाचं कारण बनलं होतं.
पुढे पुढे तर वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या भव्य सोहळ्यात या दृष्टीहीन विद्यार्थिनींचा सहभाग अनिवार्य झाला. या माझ्या शाळेची अगदी ठसठशीत असलेली आठवण म्हणा किंवा मला लाभलेली देणगी म्हणा. “अभ्यास जत्रा.” खूपच मनोरंजक आणि आव्हानात्मक असा हा उपक्रम. त्यावेळचे मुख्याध्यापक शशिभूषण गव्हाणकर यांच्या बाबांनी सुरू केला होता. सरांचे बाबा म्हणून आम्हा सर्वांचेही बाबाच. या जत्रेत प्रत्येक वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन तीन जणांच्या गटात विभागलं जाई. प्रत्येक गटाकडे विषय ठरवून दिले जात. इतिहासाचा गट एखादी घटना अभिनयातून समजावून देई. तर विज्ञानाचा गट छोटे मोठे प्रयोग करून दाखवत असे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे गट अभ्यासेतर कविता बोलून दाखवत. त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे पोस्टर्स बनवत. यात उत्साह वाढत होताच शिवाय इतर
शाळांच्या शिक्षकांनी केलेलं कौतुक आणखीच आत्मविश्वास वाढवून जायचे. बरेचदा, बाबा स्वतः येऊन काही प्रश्न विचारत. त्यांचा आवाज ओळखलाच, तर हसून उत्तरं देत असू आम्ही. पण, जर का ते पाहुण्यांसोबत असले, तर मात्र नीट समजावून आपलं पोस्टर दाखवत असू. खरंच, काय मिळालं बरं मला या प्रकारच्या उपक्रमातून? ही शाळासुद्धा तितकीच माझी आहे, जितकी माझी कमला मेहता ही जाणीव या जत्रेने करून दिली पहिल्यांदा.
अनोळखी लोकांसमोर एखाद्या विषयावर धीटपणे कसं बोलावं, हेही प्रात्यक्षिक इथेच झालं. आणि, इतर विद्यार्थ्यांचा दृष्कोिन बदलला. या मुलींनाही आपल्यासारखाच अभ्यास असतो आणि त्याही मेहनत करून चांगलं प्रेजेंटेशन करू शकतात. हे इतर डोळस मुलांना कळलं आणि काही मुलींनी स्वतःहून मैत्री करायला सुरुवात केली. मी मला सिद्ध करू शकले, या उपक्रमामार्फत, हेच खरं. आता तिथे म्हणे ‘अभ्यास जत्रा’ भरत नाही. मुलांना स्वतःतल्या उणिवांवर मात करून त्यांना जमेच्या बाजूमध्ये बदलू शकणारी जत्रा बंद? या पेक्षा खेदाची बाब नव्हे.
- अनुजा संखे

टीम व्हिजनची नवी दृष्टीनवी मुंबईतला संदेश भिंगार्डे काही वर्षांपूर्वी एका अंध मुलीचा पेपर लिहिण्यासाठी सहायक म्हणून गेला होता. त्याच वेळी या मुलांसाठी अजून काहीतरी करायला हवं याची जाणीव झाली.
साहित्य , नाटक-सिनेमा, विविध कला, पर्यटन, ट्रेकिंग यातून आपण किती आनंद मिळवत असतो! हा आनंद दृष्टीआव्हानित मुलांनाही मिळायला पाहिजे असं संदेशला वाटलं. अभ्यास, परीक्षांसाठी अंधांचं वाचनिक, लेखनिक होण्यापलीकडे मदत केली पाहिजे. त्यांना कलांचा आस्वाद घेता यावा ,निसर्गाची ओळख व्हावी, त्यांनी एक समृद्ध व्यक्ती म्हणून समाजात जगावं यासाठी काही करावं, असं वाटत होतं. यातूनच जुलै २०१३ मध्ये, उदय झाला टीम व्हिजनचा. यात साथ मिळाली प्रज्ञा पटेल, ऋतुजा शिंदे, अभय पाटील, पविथ्रा रामस्वामी, मृणाली खोपकर या कॉलेजमित्रमैत्रिणींची.
टीम व्हिजन अंध मित्रमैत्रिणींना ट्रेकिंगला घेऊन जाते. ट्रेकिंगदरम्यान कसं चालायचं, कुठे पाय ठेवायचा, कुठे नाही वगैरे प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं जातं. निसर्गसौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. चित्रपट, नाटक बघताना त्यातल्या कलात्मक बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
गायन ,वक्तृत्व, वाद, नृत्य, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा टीम व्हिजन घेते.
अभ्यास,व्यक्तिमत्त्व विकास, करिअरविषयक मार्गदर्शन केलं जातं. मुलांना आव्हानांवर मात करत आनंदानं जगण्याचं बळ देण्याचं काम टीम व्हिजन अगदी मनापासून करत आहे . या मुलामुलींसाठी ध्वनिमुद्रित वाचनालय टीम व्हिजनने सुरू केलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमधल्या पुस्तकांच्या ऑडीओ फाइल्स मुलांसाठी तयार करून पोचवल्या जातात. आतापर्यंत सुमारे 600 दृष्टीआव्हानित मित्रमैत्रिणींशी टीम व्हिजनचे बंध गुंफले आहेत.
-विजय भोईर.

Saturday, 10 February 2018

घंटा नसलेली अनोखी शाळा!

Image may contain: 2 people, outdoor


मी मूळचा बीडचा, घरची परिस्थिती तशी जेमतेमच, त्यामुळे डी.एड. केलं आणि ते करतानाच जाणवलं, मानवी समाजाचे भविष्य मानली जाणारी पिढी घडविण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळतंय, अजून काय पाहिजे? 2005 मध्ये पहिली नेमणूक झाली ती औरंगाबादच्या पैठणमधील चिंचाळा नावाच्या एका दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषद शाळेवर. विद्यार्थी नियमित नाहीत, शाळेचं बाह्यरुपही उदासवाणं. पहिल्या दिवशी या शाळेचा कायापालट करायचा मी निश्चय केला.
Image may contain: 29 people, people smiling, people sitting
त्यासाठी आधी ग्रामस्थांसोबत बोलू लागलो. नवीन आलेला तरुण शिक्षक काहीतरी वेगळं घडविण्यासाठी धडपड करतोय, हे लोकांना समजलं. लोकांनीही आर्थिक मदत दिली. त्यातून सर्वप्रथम शाळा सुंदर रंगांनी रंगविली. मी स्वत: मुलांच्या मदतीने भिंतींवर राष्ट्रीय नेत्यांची, फळा- फुलांची, पाठातल्या शब्दांची आणि अंकांची वेगवेगळी चित्रं भिंतींवर रंगविली. शाळेसमोर सुंदर असे फुलझाडांचे उद्यान विकसित केलं.
या शाळेत काम करताना मी कधीही घड्याळाकडे पाहिलं नाही. प्रसंगी रात्रीचे आठ- नऊ वाजेपर्यंत शाळेत थांबून काम केले. शाळेचे भौतिक स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांना शाळा खूपच आवडू लागली, मुलं उत्साहाने दररोज शाळेत येऊ लागली. मात्र केवळ बाह्य स्वरूप सुंदर असून चालणार नाही तर विद्यार्थ्यांची आणि शाळेची गुणवत्ता वाढविणेही गरजेचं, हे मला समजत होतं.

Image may contain: 13 people, people smiling, people standing and outdoor                                                                                          या शाळेत चौथीपर्यंतच्या वर्गासाठी आम्ही दोनच शिक्षक शाळेत होतो. त्यामुळे मुलांना उत्तम शिकवणं, हे ध्येय आणखी थोडं कठीण होतं. म्हणूनच आम्ही शिक्षकांनी मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. त्यातलाच एक म्हणजे - ‘दत्तक मित्र’. यामध्ये प्रगत विद्यार्थी आणि अभ्यासात काहीसा मागे असलेला विद्यार्थी यांच्या जोड्या बनविल्या. हुशार विद्यार्थ्याने अप्रगत विद्यार्थ्याला मदत करायची, त्याला आलेल्या अडचणी सोडवून द्यायच्या. अगदीच उत्तर नाही मिळालं तर शिक्षकांकडे यायचं अशी पद्धत घालून दिली. शिवाय ‘रिंगण स्वाध्याय’ उपक्रमात आम्ही मुलांचे गट बनवित असू, यात कधी गणिताचे एखादं उदाहरण सोडवायचं असे किंवा इंग्रजी शब्दांचे अर्थ असत. शिवाय गटांची स्पर्धा ठेवली जाई, त्यामुळे आपल्या गटातील प्रत्येक विद्यार्थी हुशार व्हावा यासाठी इतर सवंगडी मदत करत असत.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दिनांकाचा पाढा, शिष्यवृत्ती तसेच नवोदय विद्यालय अभ्यासिका, कौन बनेगा ज्ञानपती?, इंग्लिश डे असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतले. विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे, हे ग्रामस्थांना दिसत होते. त्यामुळे आम्हांला लोकसहभागातून तीन संगणकही मिळाले. विद्यार्थ्यांना संगणकशिक्षण देण्यासही सुरुवात केली. अगदी सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी शाळेत येत राहिले.
महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेची घंटाच मी काढून टाकली. शाळेची वेळ खरंतर सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 अशी होती. मात्र विद्यार्थी 8-8.30 लाच शाळेत हजर व्हायचे. वर्गाच्या किल्ल्याही गटनायकांच्या हाती सोपविलेल्या होत्या. आम्ही शाळेत येण्याआधीच विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास चालू केलेला असे. कोणी खेळात किंवा बागकामात रमलेला असे. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी शाळेतच रेंगाळत. कोणी गोष्टीची पुस्तकं वाचत बसे, तर कोणी संगणकावर काम करत असायचा. घरी शैक्षणिक वातावरण नसलेले विद्यार्थी शाळा भरण्याच्या आधी आणि शाळा सुटल्यावर हक्काने शाळेतच अभ्यास करीत बसायचे.
वाळके सर सध्या बीडच्या पारगाव जोगेश्वरीच्या शाळेत कार्यरत आहेत, तिथं त्यांनी राज्यातला पाहिला ऑडिओ- व्हिडिओ शालेय स्टुडिओ उभारलाय
सोमनाथ वाळके.

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 4

माझ्या भविष्यकाळाबद्दल रंगवलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हा विश्वास मम्मीपप्पांमध्ये डॉक्टर जयेश यांनी निर्माण केला. दादरच्या कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत मला घातलं. आणि माझ्या सर्वांगीण विकासाबद्दल असलेल्या त्यांच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या. पहिलीच्या वर्गात माझा प्रवेश झाला. माझ्यासारख्याच आणखी दहा जणी त्या वर्गात होत्या.
तो दिवस मला अजून आठवतो. २५ जुलै १९९४ रोजी माझी ऍडमिशन झाली. शाळेचा तिसरा तास चालू होता. आणि अनिताताई वर्गाला ब्रेलवाचन शिकवत होत्या. त्या वर्गात काय शिकवत आहेत, ते त्यांनी मला लक्ष देऊन ऐकायला सांगितलं. ते ऐकून नंतर क्रमाने त्यांना बोलूनही दाखवलं. माझ्या अचूक सांगण्याने त्या खूपच प्रभावित झाल्या. लगेच त्यांनी मला ब्रेल वाचायचं शिकवायला सुरुवात केली. देवनागरी लिहिताना मुलांना बाराखडी प्रथम शिकवली जाते. तसंच ब्रेललेखन वा वाचन शिकवताना प्रथम विशिष्ट टिंबांच्या समुहावरून बनलेल्या अक्षरांचे गट तयार केलेले असतात, तेच शिकवलेही जातात.
मला पहिल्याच दिवशी अ, ब, ल, क हा गट शिकवला. एका मोठ्या गॅपनंतर तीच अक्षरं मला ओळखायला लावली. मी ती बरोबर ओळखली आणि अनिताताईंनी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवायला सुरुवात केली. त्यांच्या आणि मंजिरीताईंच्या विशेष शिकवण्यामुळे मी आठवडाभरातच ब्रेल लिहाय-वाचायला शिकले. शाळा खूपच व्यावहारिक होती असं म्हणता येईल. क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तर घेतला जायचाच. शिवाय रोजच्या व्यवहारात उपयोग होऊ शकतील, अशा गोष्टीही मुलींना शिकवण्याकडे शाळेचा कल असायचा. क्रमिक अभ्यासाबरोबरच संगीत, नृत्य, हस्तकला हे विषय अनिवार्य होते. गाणं किंवा विणकाम, शिवणकाम किंवा क्ले वर्कमधल्या प्रकारात किमान उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळाले नाहीत, तर ती विद्यार्थिनी चक्क सगळ्याच परिक्षेत नापास होई. मग, क्रमिक अभ्यासक्रमात तिला कितीही भरगच्च मार्क मिळालेले असोत. यामुळे आमच्या शाळेतल्या कोणत्याही मुलीला या सर्व कलाप्रकारांमध्ये किमान पास होण्याइतकं तरी प्राविण्य असतंच. याचा मला अभिमान आहे.
मुलींचा खरोखरंच सर्वांगीण विकास व्हावा यावर शाळेचा भर असे. दृष्टीहीन मुलांना सर्वच पालक व्यवस्थित हाताळू शकतात, असं नाही. त्यामुळे डोळस मुलांना जे ज्ञान पाहून आणि निरिक्षणातून सहज मिळतं, ते या मुलांना मिळत नाही. म्हणजे दुकानातून वस्तू कशा विकत घ्याव्यात, पैसे कसे द्यायचे, आपली वस्तू बरोबर आहे-नाही, हे कसं तपासायचं, हे तोंडी सांगून कळणं शक्य नसतं. प्रात्यक्षिकाशिवाय हे शिकणं शक्य नाही, हे ओळखूनच शाळेने दुकानप्रकल्प चालवला होता. यात आम्हा मुलींना प्रत्येकी एक रुपया मिळे. तो घेऊन वर्गानुसार ठरलेल्या दिवशी आम्ही दुकानात जाऊन जे आवडेल ते घेऊन येत असू. आणलेला खाऊ वर्गात घेऊन यावा लागे. सर्व वर्गमैत्रिणींमध्ये तो थोडा थोडा वाटावाही लागे. त्यामुळे शेअरिंग ही संकल्पनाही मनावर कोरली गेली. व्यवहाराला आपलेपणाचा स्पर्श झाला, तो या शेअरिंगच्या कल्पनेतून.
आज मी अशी कितीतरी मुलं पाहते जी आपली वस्तू, खाऊ कोणालाच द्यायला मनापासून तयार होत नाहीत. ओजसही त्यांपैकीच. आपलं खेळणं पटकन कुणाला मनापासून देणार नाही. पण, ते तुझंच आहे, तुझा मित्र वा मैत्रिण थोड्या वेळापुरतं त्या खेळण्याशी खेळेल हे सतत त्याला सांगणं, समजावणं, ही माझी जबाबदारी आहे, नाही का? वाटून खायचं कसं, हे त्याला कळावं म्हणून आम्ही एक प्रयोग नेहमी करतो. कोणताही खाऊ द्यायचा झाला तर तो एकाच डिशमध्ये काढून त्याच्या पुढ्यात ठेवतो. आणि थोड्या वेळाने आळीपाळीने त्याच्याकडे तो मागतो.सुरुवातीला तो देत नव्हता. पण, आता कोणीही मागितलं तर तो काहीतरी देतोच देतो. स्वतःहून ऑफर करणंही हळूहळू तो शिकेल अशी आशा आहे.
आणखी एका बाबतीत शाळेचा उल्लेख करायलाच हवा. दृष्टीहीन व्यक्ती एकटीने चालू शकते, बाहेरच्या जगात वावरू शकते, प्रवास करू शकते, हा आत्मविश्वास दृष्टीहीन विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या पालकांमध्ये निर्माण करणं सोपं नसतं. हे करताना मुली पूर्णार्थाने स्वतंत्र व्हाव्यात, असा उद्देश मनाशी बाळगून त्यांना एकट्यानं चालण्याचं, जगात वावरण्याचं प्रशिक्षण शाळा देते. आठवीतल्या मुलींना आधी पांढरी काठी कशी हाताळावी, हे शिकवलं जातं. शाळेच्या प्रांगणात चालण्याचा सराव झाल्यावर, रस्त्यावर त्यांना कसं चालावं, याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. एकट्यानं चालताना लोकांची मदत कशी घ्यावी, आपल्याला काय मदत हवी आहे, ते कसं सांगावं, त्यांनी आपला हात कसा पकडावा आणि आपण त्यांना कसं पकडावं, हे प्रत्यक्षपणे शिकवलं जातं. मग, मुलगी नीट तयार झालीये, असं वाटल्यावर तिची परीक्षा म्हणून तिला एकटीला बाहेर पाठवलं जातं. मोबिलिटी शिकवणाऱ्या शिक्षिका तिच्याशी एकही शब्द न बोलता तिचं सबंध रस्ताभर निरीक्षण मात्र करत राहतात.
एकूण काय, कॉलेजला जाताना बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने पहिलं पाऊल टाकायला मला माझ्या शाळेने शिकवलं. आईवडिलांनी मी या जगात आल्यावर चालायला शिकवलं होतं, तेवढंच महत्त्वाचं, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं ,पुढे टाकलेलं हे पाऊल होतं!
- अनुजा संखे