
नकळत आपण घरापासून दूर राहतो आहे ही जाणीव तीव्र होत गेली. आणि आपण घरी आल्यावर प्रत्येकाचं आपल्याकडे लक्ष असावं अशी इच्छा मूळ धरू लागली. घरी आल्यावर पूर्वीप्रमाणे बाहेर हुंदडणं शक्य होत नसे. मग करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही. या माध्यमाचं आकर्षण माझ्याप्रमाणेच इतर मुलांनाही होतंच. त्यांचंही आमच्यासारखं वेळी अवेळी बाहेर फिरणं बरंच कमी झालं होतं. याचा परिणाम म्हणजे आम्हा भावंडांची भांडणं. आतासारखे तेव्हा कार्टून दाखवणाऱ्या चॅनल्सची रेलचेल नसायची. पण, एकदोन चॅनल्स होतेच. माझ्या भावांना नेहमीच कार्टून पहायचं असे तर मला शब्दप्रधान कार्यक्रम पहायचे असतं. कार्टून हे ऐकण्यापेक्षा पाहण्याच्या प्रकारात मोडत असल्याने त्यातून माझं मनोरंजन होत नसे. यावरून त्यांचं आणि माझं सतत भांडण आणि बेबनाव व्हायचा. ही शाळेत असते तेच बरं, असंही ते एकदोनदा बोलले आहेत. त्यावेळी खरं तर मम्मीपप्पांनी मला ओरडा दिला. पण, मनात निर्माण झालेली ही भावना धोक्याची एक सूचनाच होती. माझं माझ्या, कुटुंबापासून हळूहळू विलग होणंच सूचित करणारी.
मला घरी आल्यावर इतरांकडे जायला आवडत नसे. व्हायचं काय की, भाऊ लहान असल्याने मम्मीचं अधिक लक्ष त्यांच्यामध्ये असायचं. पप्पा त्यांच्या वेळीअवेळी ड्युटीला जावं लागण्याने वाट्याला खूपच थोडे यायचे. त्यात जर काका-मामांकडे जावं लागलं तर मम्मी सगळ्यांना भेटण्यात गर्क होऊन जायची. आणि मला एकटेपणाची भावना घेरून राहायची. त्या एकटेपणाविषयी, तेव्हा स्पष्ट करून सांगणं मला शक्य होत नव्हतं. किंवा ते न सांगता समजून घेण्यासारखंही नव्हतं. मी सतत मम्मीच्या मागे फिरायचे आणि आपल्या घरी चल म्हणून रडत राहायचे. करमायचंच नाही मुळी. काका-मामाच्या मुलींनाही सांगितल्याशिवाय माझ्यासोबत खेळण्याची इच्छा नसे. अशात तिथं वाट्याला येणारे दोन दिवस घालवावेत ही कल्पनाच असह्य होत असे.
माझं रडणं, घरी चल म्हणून भुणभुण लावणं मम्मीलाही वीट आणत असेल ना? तिनेही ही शाळेतच बरी असा विचार केला असेल का कधी? याचं उत्तर जाणून घेण्याची हिंमत माझ्यात नाही, हे प्रांजळपणे कबूल करते. कारण असा विचार येणं स्वाभाविक आहे असं मलाच वाटतं.
- अनुजा संखे
No comments:
Post a Comment